रौतु का राज

Submitted by रघू आचार्य on 29 June, 2024 - 03:28
rautu ka  raaj

रहस्यपट म्हटले कि आपल्याकडे तो कसा असेल याचे आडाखे असतात.
हे प्रेक्षकांनी नाही बनवलेले. तरी कणेकर कृपेमुळे स्टिरीओटाईप्स आता इतिहासजमा झालेले आहेत.

धुव्वाधार पाऊस, रबरी ओव्हरकोट, गोल हॅट , गम बूट आणि हातात सुरा किंवा पिस्तुल. (पिस्तुल खूपच मराठी वाटतं, रहस्याचा थरार निघून जातो. रिव्हॉल्व्हर , गन म्हटलं कि त्या सस्पेन्सचा फील येतो. हे आता औषधाला सुद्धा दिसत नाही. कणेकर कृपा यासाठी कि पत्रकार असल्याने त्यांच्या फिल्लमबाजीचा प्रभाव हिंदीतही पडला होता. बॉलीवूडच्या नव्या दमाच्या दिग्दर्शकांना फिल्लमबाजी पटली होती. हिंदीत सुद्धा फिल्लमबाजीने प्रभावित असावेत असे काही शोज आले होते.

नव्या रहस्यपटांमधे एखादं सायकिक पात्र असणे मस्ट झालं. या शिवाय नायकाच्या भूतकाळात एखादी घटना घडलेली असणे हा नव्या रहस्यपटांचा एक अविभाज्य भाग झाला. तलाश सारख्या सिनेमात गूढाची झालर लावण्याचा प्रयत्न झाला. तो ही अधून मधून काही सिनेमात दिसला.

कहानी सारख्या चित्रपटांनी उत्तम रहस्यपटांची एक अनोखी शैली आणली. पण त्या दिग्दर्शकाला पुन्हा ती करामत जमली नाही. अशा रहस्यपटात धक्के देण्यावर जास्त भर असतो. तसेच प्लॉट गुप्तहेर संघटनेच्या भोवती विणलेला असल्याने त्याला आपोआपच वेगळं ग्लॅमर प्राप्त होतं.

पण असं कुठलंही ग्लॅमर नसलेलं, गूढाची झालर नसलेलं, गडदपणा नसलेलं रहस्य दाखवणारा रहस्यपट विरळाच.
नवाजुद्दीनचाच एक राजस्थानच्या हवेलीतलं रहस्य उकलणारा एक चित्रपट या आधी आला होता. हा अशा रहस्यपटांचा प्रारंभबिंदू म्हटले तरी चालेल.

आता रौतु का राज हा असाच रहस्यपट आला आहे. हा आणखी वेगळा आहे.
काशी - इन सर्च ऑफ गंगा हा असाच आणखी एक सिनेमा आहे. पण वेगळा बनवता बनवता तो पुन्हा रहस्यपटाच्या एका मनोवैज्ञानिक जॉनरकडे वाटचाल करू लागतो.

रौतु का राज हा ऑफबीट सिनेमा लक्षणीय आहे.
रौतु कि बेली हे मसूरीपासून जवळ असलेलं एक निवांत, निसर्गरम्य म्हणून दुर्गम गाव आहे. अशा गावात नेमणूक असलेला कुणीही नोकरदार मग पोलीस का असेना, गावातल्या धेंडांना दुखावू शकत नाही.

अशा गावात एक खून होतो.
या गावात रस्त्याला लागून असलेल्या एका प्राईम लोकेशन ला असलेल्या शाळेत महिला वॉर्डनचा मृत्यू होतो. पोलीस तिथे पोहोचतात तेव्हां प्रिन्सिपल आश्चर्याने "आपको किसने खबर की ?" म्हणून विचारतो. हे तरी दुर्गम गाव आहे, पण तुलनेने प्लेन मधे असलेल्या गावात पण काय चालतं हे अनुभवलेलं आहे. नैसर्गिक मृत्यू असं सर्टिफिकेट डॉक्टरने दिलंय तेव्हां पोलिसांचे काय काम असं स्टाफचं मत आहे.

शाळेत नवीन आलेल्या आणि क्राईम पॅट्रोल नियमित पाहणार्‍या एका नमुन्याने पोलिसांना खबर केलेली आहे. खरं तर पोलिसांना पण यात संशयास्पद काय आहे हे समजत नसतं. इथे नवाजुद्दीनची एण्ट्री होते. हा सुद्धा सुपरकॉप नसल्याने रूटीन म्हणून तपास करतो. उत्साही पोलीसांमुळे बॉडीची पोझिशन बदलते, हाताचे ठसे उमटतात. चाळिशीतल्या वरून धडधाकट दिसणार्‍या महिला वॉर्डनचा मृत्यू झाल्याने बॉडी पोस्टमार्टेमला पाठवावी असा निर्णय नवाजुद्दीन घेतो. पण तसे करू नये यासाठी वरीष्ठांकडून दबाव येतो. तसेच शाळेचे जे ट्रस्टी आहेत त्यांना त्रास देऊ नये म्हणूनही दबाव येत राहतो.

यामुळेच संशय येण्यासारखे काहीही नसताना नवाजुद्दीन चौकशी सुरू करतो. ही चौकशी पण अगदी वास्तवातले पोलीस ज्या निवांतपणे करतील तशीच आहे. कसून तपास चाललाय, चालता चालता पुरावे दिसताहेत असे काही घडत नाही. फक्त एक मोकळी सिरींज नवाजुद्दीनला वॉर्डनच्या खोलीबाहेरच्या खिडकीखाली मिळते. ती एकदा बघून तो ही फेकून देतो.

जी काही चौकशी ते करत असतात त्यात वॉर्डन एक ऑर्थोडॉक्स महिला असून शाळेतल्या अंध मुलामुलींना एकमेकांशी बोलूही देत नाही , तसे केल्यास कारवाई करते हे उघडकीला येते. एका प्रतिभावान आणि संवेदनशील अंध मुलाला आणि मुलीला बागेत बोलताना सापडले म्हणून निलंबनाची कारवाई केलेली असते.

तसेच प्रिन्सिपलचा पूर्वीचा सहाय्यक ज्याने एका अंध मुलीसोबत नको ते करण्याचा प्रयत्न केलेला असतो, त्यालाही काढून टाकलेले असते. त्याचे लोकेशन त्या दिवशी शाळेचेच असते.

स्वतः महिला वॉर्डनचे ट्रस्टी केसरींसोबत नाजायज संबंध असतात. तिचा मोबाईल खूनाच्या दिवशी गायब असतो. मात्र रूम सील केलेली असेपर्यंत तो सापडत नाही. वरून गो स्लो चे आदेश आल्यावर आणि पोस्टमार्टेम करायचे नाही हे ठरल्यावर सील काढल्यावर मोबाईल त्या रूममधे परत येतो. त्यात डेटा काहीही नसतो.

पोस्टमार्टेम करू नका असे आदेश दिल्यावरही नवाजुद्दीन व्हिसेरा आणि काही गोष्टी पोस्टमार्टेसाठी पाठवून देतो. त्याचा रिपोर्ट आल्यानंतर संशयास्पद मृत्यू मधे केस बदलते. त्यानंतर तपासाचा रोख बदलतो. या कारणामुळे ट्रस्टी केसरीकडे त्याचे जाणे येणे सुरू झाल्यावर त्याच्या तक्रारी थेट गृहमंत्रालयापर्यंत होऊ लागतात.

इकडे वॉर्डनने एका स्थानिक बड्या बिल्डरकडून प्राईम लोकेशनची शाळा बिल्डरला विकण्यासाठी ट्रस्टी केसरीवर प्रभाव टाकण्यासाठी वीस लाख रूपये घेतल्याचे उघड होते. हा तपास हळू हळू प्रत्येकालाच संशयाच्या कह्यात घेतो.

इतर सिनेमातल्याप्रमाणे जी जान से तपास न करताही समोर एव्हढे पुरावे येऊन पडलेत आणि तरीही वरून तपास करण्यावर येत असलेली बंधने यामुळे उकल कशी होणार हे रहस्यापेक्षा जास्त इंटरेस्टिंग बनते. जर शाळा बिल्डरच्या घशात गेली तर या मुलांचे काय होणार ?
याशिवाय अन्य अशा काही लोकांचा या डील मधे इंटरेस्ट आहे ज्याची खबर नवाजुद्दीनला सुद्धा नाही. त्यामुळे सगळं चित्र पलटणार असतं.

या अंध मुलांमधे असलेल्या टॅलेंटची दखल पोलिसामधला एक संवेदनशील मनुष्य म्हणून नवाजुद्दीन घेत असतो. तपास करतानाच त्याचं संवेदनशील मन अनेक गोष्टींचे आडाखे बांधत असतं...

आणि अशात अचानक नवाजुद्दीन तपास संपल्याचे जाहीर करतो. राजीनामाही देतो.
ज्याला आरोपी म्हणून पकडलेले आहे ते पाहता इतका वेळ चांगला चाललेला चित्रपट क्लायमॅक्स न दाखवताच गंडला असे वाटते..

पण इथून पुढे अर्धा तास सिनेमा वेगळ्याच दिशेला जातो. इथे तो ना रहस्यपट राहतो, ना पोलिसी चातुर्यकथा ना तपासपट.
हेच या चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे.
वेगळा चित्रपट पाहिल्याचे समाधान नक्कीच देणारा हा चित्रपट म्हटले तर चू़क होणार नाही. काही तरी वेगळा चित्रपट बनवायचाय असा अट्टाहासही कुठे जाणवला नाही.

राधिका आपटे आणि नवाजुद्दीन हे नेटफ्लिक्सच्या पे रोल वरचे कलाकार. त्यातला नवाजुद्दीन झी ५ वर पाहिल्याने नरेंद्र मोदी हे शिवसेनेकडून निवडणूक लढवताहेत असा फील आला. एखादा कलाकार प्रस्थापित होईपर्यंत तो अभिनयाचे कमालीचे प्रदर्शन करतो. पण एकदा तो अशा ठिकाणी पोहोचला कि आता सिद्ध करण्यासारखे काही राहिलेले नाही, तेव्हां त्याचा सफाईदार वावर तेव्हढा आपल्याला दिसत राहतो. त्यात चूकही काढता येत नाही तसेच काही विशेष आढळलेय असेही नाही, अशी गत नवाझुद्दीनची इथे झाली आहे.

राजेशकुमार या सह अभिनेत्याने सब इन्स्पेक्टर डिमरी चे पात्र छान उभे केलेले आहे. केसरी हे पात्र function at() { [native code] }उल तिवारींनी सफाईदार उभे केले आहे. अभिनय सर्वांचाच छान.
पक पक पकाक मधली नारायणी शास्त्री यात किती तरी वर्षांनी दिसलीये.

अवांतर :

रौतु कि बेली हे गाव पनीरसाठी प्रसिद्ध आहे. त्यावर टिव्हीवर स्वतंत्र कार्यक्रम झालेले आहेत. दुभत्या जनावरांसाठी इथले वातावरण स्वित्झर्लंडपेक्षा कमी नाही. मुख्य मसुरी हे पर्यटकांचे गाव बकाल आहे. पण आजूबाजूची गावे सुंदर आहेत. मसुरीपेक्षा बाजाराच्या सुरूवातीला असलेल्या शिखरावर असलेला लाल टिब्बा हे ठिकाण आकर्षक आहे. इथून हिमालयाच्या पर्वतरांगा दिसतात. दुर्बिणी घेऊन बसलेले लोक कांचनजंगा दाखवतात. ते दिसले का विचारतात आपण दिसले नाही तरी हो म्हणतो. महाबळेश्वर वरून सह्याद्रीची पर्वतशिखरे दिसतात तसा सीन इथे दिसतो. अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून घेतलेले चित्रीकरण नेत्रसुखद आहे.

पोलीस तपासाबद्दल गावातल्या चर्चेचे प्रतिनिधी म्हणून दोघे ज्ये ना दाखवलेले आहेत. त्यांची अधून मधून एकाच बाकड्यावर होत असलेली चर्चा छोट्याशा गावात घडलेल्या अशा प्रसंगांचे त्यांच्या संथ जीवनात खळबळ कशी उडवून देते हे दाखवून देते, तसेच सूत्रधाराप्रमाणे ते अधून मधून येत राहतात. हा प्रयोग आवडला.

वेग संथ असल्याने काहींना कंटाळवाणा वाटू शकेल.
काही गोष्टी तलाश प्रमाणे आहेत. त्या टाळल्या असत्या तर चालले असते. नाहीत टाळल्या तरी ठीकच आहे.
रहस्य असल्याने फार लिहीण्यात अर्थ नाही.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान परिक्षण..!
नवाझुद्दीन गुणी कलाकार आहे .. त्याचे चित्रपट आवडतात.
नेत्रसुखद चित्रीकरणासाठी चित्रपट नक्की बघेन..

ज्या लॉजिकने पिक्चर पब्लिक ने बघायला हवा आहे त्यात लॉजिकने कथेची ओळख अगदी जमली आहे, कोठेही स्पॉइलर न येउ देता! मस्त! बघण्याचा इंटरेस्ट वाढला नक्कीच.

बघण्याचा इंटरेस्ट वाढला नक्कीच >>> हो हो. मी चिकवा वर पिक्चर कसा आहे विचारलं होतं त्याचं इतक्या डिटेल मधे उत्तर दिल्याबद्दल थँक्यू आचार्य Happy

मी काल पाहिला… अगदी सेम नोट्स माझ्याही… चित्रपट उत्कंठा वाढवत नेत नाही, संयत वेगाने जातो आणि असं कसं संपला ह्या स्टेजला येऊन जो चेंज दाखवतो, दॅट कॅाट मी ॲाफगार्ड…
संशय घ्यायला जागा आहे पण चित्रपट संपतो… अगदी माईल्ड हिंट असल्यामुळे… आवडलाच!!!

फारएण्ड आणि र्मड धन्यवाद...

मी_अनु धन्यवाद....

हर्षल, हो असंच वाटलं होतं. एकेकाळी सस्पेन्स हा जॉनर आता संपणार असं वाटत होतं. त्यापेक्षा क्राईम पॅट्रोल बघा असं वाटायचं.
असे रहस्यपट आले तर पुन्हा बघावेसे वाटतील.

पाहिला - वन टाइम वॉच म्हणून चांगला वाटला.

खुनाच्या तपासात जो सर्वात निर्णायक पुरावा असेल, तो कधी/कसा मिळाला हे नंतर दाखवलेलं (नुसतं तेवढंच नाही, त्यासंदर्भात जाणूनबुजून प्रेक्षकांची दिशाभूल केलेली) मला आवडत नाही. ते चीटिंग वाटतं. अगदी तपास हा फोकस नाही म्हटलं तरीही.
'कहानी'तही मला तसंच वाटलं होतं. चुकीच्या नवर्‍याचे फोटो/व्हीडिओ का दाखवायचे पब्लिकला?

पण दोन्ही सिनेमे बघताना एन्जॉय केले हे खरं. 'कहानी' पुन्हादेखील पाहताना मजा आली होती. हा आवर्जून पुन्हा बघेन असं वाटत नाही. ते गाव बाकी मस्त आहे!

Submitted by स्वाती_आंबोळे on 5 July, 2024 - 22:49 >>> वन टाईम वॉच आहे हे बरोबर.

खुनाच्या तपासात जो सर्वात निर्णायक पुरावा असेल, तो कधी/कसा मिळाला हे नंतर दाखवलेलं (नुसतं तेवढंच नाही, त्यासंदर्भात जाणूनबुजून प्रेक्षकांची दिशाभूल केलेली) मला आवडत नाही. ते चीटिंग वाटतं. >> हा सिनेमा रहस्याची उकल या सदरातला वाटला नाही. तुमच्या मताशीही सहमत आहे. (आणि हे सबगोलंकारी नाही Lol )

कहानीचा जो फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटमधे साऊथला असंख्य सिनेमे निघतात. कहानी खूपच सौम्य आहे त्यामानाने . इंटरव्हलला कार दरीत कोसळते, शेवटच्या रीळात रीवाईंड करून दरीत कोसळण्याच्या आधी कुणीतरी बाहेर उडी मारतं असे प्रकार असतात. Lol

पाहिला चित्रपट.. आवडला.... तुम्ही अगदी परफेक्ट परीक्षण लिहिलयं..
थोडा संथ आहे पण एकदा पाहायला हरकत नाही.
पहाडी गावाचं सुंदर चित्रण.. खरंतर मी त्यासाठीच चित्रपट पाहिला.