मृत्यू... एक अटळ सत्य. कुणाच्याही काळजात आपल्या नुसत्या चाहुलीनं कापरं भरवणारा अज्ञात जगतातला गंभीर काळाशार डोह. आजपर्यंत नजाणो कित्येक लोक या अज्ञाताच्या डोहात बुडून गेलेत. कोणी तडफडून, टाचा घासून, अंगाची लाही लाही करून घेत, कुणी रोग-व्याधींच्या हजारो यातनांनी जीर्ण झालेली शरीराची लक्तरं नाईलाजाने वागवत- दीर्घकाळ सडत राहून, तर कुणी भीषण अपघाताने आपल्याच शरीराच्या उडालेल्या ठिकऱ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघत. कुणी शांत, निर्विकार निधड्या छातीने, तर कुणी काळीज विदर्ण करणाऱ्या भयासोबत. कुणी एकांतात, कुणालाही पत्ता लागू न देता, तर कुणी हितचिंतकांच्या गराड्यात आपल्या लोकांच्या मांडीवर, कुणी ऐंशी-नव्वद वर्षांचं दीर्घायुष्य जगून, तर कुणी आईच्या गर्भात आयुष्याची सुरुवात व्हायच्या अगोदरच.
प्रत्येक जण कधी ना कधी त्या अगम्याच्या भयाण डोहात विरघळून जातो. कायमचाच...
त्या डोहात 'तो' कुठून, कोणत्या ठिकाणावरून आलेला हे माहीत नाही. तो इथे यायच्या आधी किती काळ त्या ठिकाणी होता हे माहीत नाही. तो त्या अज्ञाताच्या डोहात किती काळ राहील हे सुद्धा माहीत नाही. तो यायच्या आधी हे विश्व अब्जावधी वर्षांपासून अस्तित्वात होतं तो गेल्यानंतरही ते विश्व अब्जावधी वर्षांसाठी अस्तित्वात राहील. मग तो इतक्या कमी ७०-८० वर्षांच्या काळासाठी इथे का आला होता? इथे पाहुणा असताना सुद्धा हे जग सोडून जायच्या कल्पनेनंच त्याच्या अंगावर शहारा का यायचा? आणि जे त्याला त्याच्या कायमच्या वस्तीस्थानवर कधीच घेऊन जाता आलं नाही त्या सगळ्याचा संग्रह करण्यासाठी एवढा का धडपडायचा? आणि कधीतरी आपल्याला हे सारं सोडून जायचंच आहे, हे माहीत असून सुद्धा त्याने कधीच का आपल्या जाण्याची तयारी केली नाही?.. सगळंच अनाकलनिय.
मृत्युला अटळ सत्य का म्हणतात? कारण तुमच्या जीवनात बाकी काही घडेल की नाही याची हमी नाही पण 'तुमचा मृत्यू होणारच.' हे मात्र नक्की. तुम्हाला चांगलं शिक्षण मिळेल की नाही, तुम्हाला रोजगार मिळेल की नाही, तुमचे लग्न होईल की नाही या सगळ्याची काहीही खात्री नाही पण तूमचा मृत्यू मात्र निश्चित होणार हे नक्की. कितीही गडगंज-धनाधीश असला, कितीही सामर्थ्यवान, विक्रमी-पराक्रमी असला तरी त्याला विधात्याने मोजून दिलेल्या श्र्वासांपेक्षा आगाऊचा श्वास घेता येत नाही.
तरुणांची एक गंमत असते, त्यांना असं वाटत असतं की आपला मृत्यू होणारच नाही, आणि झाला तरी कधी तरी ८०-८५ वर्षांनी होईल. पण कधीतरी आपल्या समवयिनाचा अकस्मात पडलेला देह पाहून मात्र तो सुन्न होतो त्याच्या या विश्वासाला तडा जातो काहीकाळासाठी तो अंतर्मुख होतो. वयाच्या पन्नाशी-साठीनंतर काही जणांना मृत्यूची चाहूल लागते. काहीजण त्या सत्याला स्वीकार करतात, तर काहीजण झुरत राहतात. संध्याछाया भिवविती हृदया अशी त्यांची गत होते. इतक्या वर्षांचं आयुष्य जगूनही त्यांना अजून जगायचं असतं.जीवनाचा अजूनही आस्वाद घ्यायचा असतो. याउलट कधी कधी जीवनाला कंटाळलेला एखादा १९-२० वर्षाचा तरूणही आयुष्याच्या यातनांनी पिचून स्वखुशीने आपली मान त्या मृत्यूच्या तोंडी देतो.
आपल्या मृत्यूची नेमकी वेळ माहीत नसल्याने प्रत्येक जण निश्चिंत असतो पण समजा मनुष्याला ती वेळ समजली तर फाशीची शिक्षा झालेल्या एखाद्या गुन्हेगाराला ज्याप्रमाणे धरणी चावते त्याप्रमाणे त्या मनुष्याची हालत होईल. फाशीची शिक्षा झालेल्या गुन्हेगाराला आपल्या मृत्यूची नेमकी वेळ माहिती असते. त्यावेळी त्याला मोठमोठी सुख देऊ केलीत तरी त्यांच्याकडे तो ढुंकूनही पाहणार नाही. ज्या धनासाठी, सुखासाठी त्याने तो गुन्हा केलेला असतो त्याच्या दहापट धन आणि सुख त्याला देऊ केलं तरी त्याला ते नको असतं. त्या उलट त्याला जर फाशीची शिक्षा रद्द होऊन जन्मठेपेची शिक्षा होणार असेल, तरी तो विश्वातला सगळ्यात आनंदी मनुष्य बनतो. त्याच्या हाती अक्षरशः स्वर्ग येतो.
खरंतर जीवन हीच मृत्यूची प्रक्रिया असते, मनुष्य जन्मल्यापासून या प्रक्रियेला सुरुवात होते आणि त्याच्या मरणानंतर ती पूर्ण होते.मृत्यू ही मनुष्याची आई असते तो तिच्या मांडीवर चिररविश्रांती घेतो.
एक प्रसंग सांगतो. सचिन दादा, माझ्यापेक्षा १०-१५ वर्षांनी मोठा असलेला नवीन लग्न झालेला कष्टाळू युवक. लहानपणी गरिबीचे चटके सोसल्याने 'पैसा म्हणजे सारं काही असतं.' अशी पक्की खूणगाठ त्यानं बांधली होती, 'अरे आयुष्यात पैशानेच सारं काही मिळत नसतं.' हा गुळमुळीत तात्विक विचार कधीच त्याच्या पचनी पडला नाही. कष्टाने दिवसातून दोन दोन ठिकाणी काम करून, रात्रभार अभ्यास करून, त्याने दहावी नंतर आयटीआय पूर्ण केला, आधीचा अनुभव गाठीशी असल्याने आणि आता शिक्षणही पूर्ण झाल्याने त्याने स्वतःच छोटंसं गॅरेज टाकलं. थोडा पैसा हाताशी खेळू लागल्यावर ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरू केला, तीन म्हशी घेऊन दुग्धव्यवसाय सुरू केला, आणि घरातच आईला किराणा दुकानही टाकून दिलं. आता बऱ्यापैकी सधनता आली होती, त्याने लग्न केलं, सगळं काही अगदी सुरळीत सुरू होतं. पण इतक्या मोठ्या व्यापामुळे दादा कायम व्यस्त राहायचा तो कधीच मला असा निवांत बसलेला दिसायचा नाही, कधी गावाच्या पारावर गप्पा मारताना दिसायचा नाही. तो कधी एक क्षणही वाया घालवायचा नाही. त्याच्याकडे काही काम असेल तरी दोन तीन दिवस त्याच्या घरी चकरा मारूनही त्याची गाठ पडत नसे. अगदी जवळच्या लोकांच्या लग्नसमारंभात सुद्धा तो जास्त काळ थांबायचा नाही. असा हा कायम व्यस्त असणारा आणि व्यवसायाला वाहून घेतलेला सचिन दादा. एके दिवशी अचानक त्याच्या घरातून गोंधळाचा आवाज आला. दहाबारा लोक त्याच्या घरात पाहण्यासाठी गेले, त्याची आई मोठ मोठ्याने रडत होती बायकोची बोबडी वळली होती, काय झालंय काहीच कळत नव्हतं, काही मिनिटांनी समजलं की काकूंना कोण्या अनोळखीचा फोन आला होता, सचिन दादाचा हृदयक्रिया बंद पडून गाडी चालवताना मृत्यू झाला होता. लोकांनी तत्काळ दवाखान्यात धाव घेऊन त्याचं शव ताब्यात घेतलं. अंत्यदर्शनासाठी ठेवलेल्या मंचावर त्या दिवशी पहिल्यांदा साऱ्या गावाने सचिन दादाला इतकं स्वस्थपणे बसलेलं पाहिलं. दुसऱ्या दिवशी त्याचं गॅरेज बंद होतं, त्याच्या ट्रान्सपोर्टची सगळी वाहने यार्डात तशीच उभी होती. आपल्या प्रगतीसाठी हरघडी पायाला भिंगरी बंधल्यासारखा धडपडणारा सचिन दादा त्याचं सर्वस्व असणारं सारं काही अगदी जिथल्या तिथे टाकून कुठेसा तडकाफडकी निघून गेला होता.
कधीतरी आपल्याला जायचं आहे. खूप जण गेले आहेत खूपजण जाणार आहेत, खूप जण जात आहेत. तुम्ही हा लेख वाचायला सूरवात केल्यापासूनसुद्धा कितीतरी जण त्या अज्ञाताच्या डोहात बुडाले आहेत. काही अकस्मात, तर काही आपल्या कापाळीच्या लांब लचक यातना भोगून. आजचं वर्तमानपत्र उघडून पहा, त्यात ज्यांचे काल अपघाती मृत्यू झालेत त्यांच्या बातम्या दिसतील. हे लोक परवा तुमच्या माझ्याप्रमाणेच हसत होते, नॉर्मल आयुष्य जगात होते , त्यांच्याकडेही त्यांचे फ्युचर प्लॅन्स होते, त्यांनाही तुमच्या माझ्याप्रमाणेच वाटायचं की अजून खूप वेळ शिल्लक आहे, पण त्यांना पुसटशीही जाणीव नव्हती की त्यांच्या आयुष्याच्या समईत काहीच थेंब शिल्लक आहेत. आपल्या नशिबात पुढे काय वाढून ठेवलंय याचा हिशोब मानवाच्या आवाक्याबाहेर असतो. तो मृत्यू नामक अचाट सौदागर कोणत्या रूपात आपला दूत पाठवेल काही सांगता येत नाही, कधी अपघाताच्या रूपात, कधी एखाद्या हृदयविकाराच्या झटक्याच्या रूपात किंवा एखाद्या शरीरातल्या बिघाडाच्या रूपात, तर कधी एखाद्या सद्यस्थितीत आपल्या नकळत मंदपणे फोफावणाऱ्या यातनादायक रोगाच्या रूपात...कुणी सांगावं त्या सौदागराने कदाचित त्याचा एखादा दूत आधीच आपल्याही शरीरात पाठवून ठेवला असेल आणि तो दूत आपल्या नकळत गुप्तपणे त्याची कामगिरी बजावत असेल.
आज सूर्य अस्तवायच्या आतही अनेक जण त्या काळयाशार डोहात गडप होतील. त्यात त्यांचा समवेश असेल ज्यांना तुमच्या माझ्याप्रमाणेच 'आपला मृत्यू अजून खूप लांब आहे.' असं वाटत असेल, ज्यांनी तुमच्या माझ्याप्रमाणेच आपल्या पुढच्या आयुष्याचे नियोजन लावून ठेवलं असेल, जे तुमच्या माझ्याप्रमाणेच दिवसरात्र एक करून आपल्या करीअर, नोकरी, धंदा, शिक्षण या साऱ्यांच्या पाठी लागले असतील. आपल्या 'उद्या' ची काही एक खात्री नसताना 'परवाची' स्वप्ने पाहणारे हे भोळे लोक, माझ्या वयाचे तुमच्या वयाचे कित्येक जण...कदाचित मी सुद्धा...आणि कदाचित...
असो ही कल्पना कितीही नकोशी वाटत असली तरीही कधी ना कधी आपल्या पैकी प्रत्येकालाच त्या मंडवातून जायचं आहे.
कदाचित यासाठीच संतांनी या मृत्यूच्या घटिकेपर्यंत काहीतरी साध्य करता यावं म्हणून भक्तीचा मार्ग विशद केला असावा, कदाचित आयुष्य म्हणजे त्या डोहाच्या पुढच्या प्रवासाच्या तयारीसाठी मिळालेला अवधी असेल. या अवधीत इथून काहीतरी संपदा आपल्याला मिळवायची असेल, जी आपल्याला मृत्यूनंतरही सोबत घेऊन जाता येत असेल. पण असंही असू शकेल की, आपण ती संपदा मिळवण्याऐवजी व्यर्थ गोष्टींचा संग्रह करण्यात व्यस्त असू ज्या आपल्याला कधीतरी इथेच सोडून जाव्या लागतील...आपला पैसा आपलं काम, आणि जीवाला जीव देणारी आपली माणसं - आपल्या रक्ताची, आपल्या जवळची, आपल्या जिव्हाळ्याची.
एका स्माशनाच्या बाहेर चार ओळी लिहिल्या होत्या :
मंजिल तो तेरी यही थी, पर तूने जिंदगी लगा दी यहां आते-आते।
क्या मिला तुझे दुनिया वालों से?
तेरे अपनोंने ही जला डाला तुझे जाते जाते।
जायचंय. हो प्रत्येकाच जायचंय आणि शेवटी चितेवर धूर होऊन कायमचं विलीन व्हायचंय, प्रत्येक जण विवश आहे. अहंकार, द्वेष, तिरस्कार सारं कुठल्या कुठे विरून जातील. काढणारे चार दिवस आठवणी काढतील, मग तेही कधीतरी तुमच्या पाठोपाठ तुम्ही गेलेल्या मार्गानं त्या डोहात गडप होतील.
लक्षात असू द्या, तो अज्ञाताचा डोह अजूनही तसाच अस्ताव्यस्त पसरलाय, काळ्याशार रहस्याचं वलय आपल्या भोवती लपेटून आपल्या दूतांनी आणलेली सावजं गिळंकृत करत. आपणही क्षणाक्षणानं तिकडेच चाललोय त्याच्या पोटात गडप व्हायला.
सध्या "मरणात खरोखर जग जगते
सध्या "मरणात खरोखर जग जगते "हे पुस्तक वाचतोय. एकच प्रत अमेझॉन वर होती ती उचलली. मृत्यू हा विषय वेगवेगळ्या परिप्रेक्षात घेतला आहे. माझ्या लेखना मधे मृत्यू हा विषय डोकावत असतो या बद्दल माझ्या काही हितचिंतकांना चिंता वाटते. मला वाटते जो विषय अटळ आहे त्या पासून लांब का पळायचे? जीवनात नैराश्याने ग्रासलेले लोक मृत्युचा विचार करतात अशीही एक समजूत आहे. आनंदाने जगणारे लोक मृत्यूचा विचारही करत नाही असाही एक समज आहे. खर तर मृत्यूला अशुभ मानल्यामुळे लोक तो विषय टाळतात. आपण सर्व आज तरी मर्त्य आहोत. त्यामुळे जे काही जीवन मिळालय ते आनंदाने जगून घ्या!
अगदी खरं आहे प्रकाशजी.
अगदी खरं आहे प्रकाशजी. जीवनावर इतकं काही लिहिलं जातं, चर्चा केली जाते, पण जो जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे त्याचं मात्र नाव घेणंही अशुभ मानलं जातं. पण आपण कितीही त्याच्यापासून दूर पळालो, तो आपल्याला कितीही नकोसा असला, तरी, ' तो अटळ आहे.' हे सत्य पचनी पडत नसल्यामुळे, ते सत्य स्वीकारण्याची आपली हिम्मत होत नाही हे माझं निरीक्षण आहे.
अगदी खरं आहे प्रकाशजी.
धन्यवाद ऍडमिन साहेब!
लेख व लेख लिहिण्याची शैली,
लेख व लेख लिहिण्याची शैली, दोन्ही आवडले. मात्र लेखात जो मूळ मुद्दा आहे तो सर्वांनाच ज्ञात असतो. त्यामुळे, 'मृत्यू अटळ आहे व या गोष्टीशी निगडित भावना व्यक्त करणे' या पलीकडे या लेखाचा हेतू काय असा प्रश्न पडला.
=====
लेखामुळे मृत्यूबाबतचे माझे अनेक शेर आठवले, त्यातला एक:
कधीचा चालतो आहे स्वतःचा अंत गाठाया
कधीपासून म्हणतो काळ... आता फक्त थोडेसे
@बेफिकीर
@बेफिकीर
लेख आपल्याला अवडल्याबद्दल आभारी आहे. लेख लिहिण्यामागील हेतूबद्दल म्हणाल तर तो फक्त
' जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या मृत्यू विषयी वाचकाला वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करायला भाग पाडणे.' एवढाच आहे. 'मृत्यू अटळ आहे त्याला घाबरून काही उपयोग नाही.' हे वाक्य अनेकदा आपल्या कानावर पडून पडून आता अगदी गुळमळीत वाटतं पण त्याच्या अशा गुळगुळीत वाटण्याने त्याच्या मागील गहन अर्थ मात्र अजूनही कमी झाला नाहीये. तोच अर्थ वेगळ्या शब्दात आणि विस्तृतपणे विशद करण्यासाठी हा लेख लिहिला आहे. लेखाचा आशय वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा यातील प्रयत्न मलाही थोडा कमकुवत वाटतोय, पुढच्या वेळी याकडे अधिक लक्ष देईन. कधीचा चालतो आहे स्वतःचा अंत गाठाया
कधीपासून म्हणतो काळ... आता फक्त थोडेसे >>> बहारदार
हा विषय पुढे स्वेच्छामरण
हा विषय पुढे स्वेच्छामरण दयामरण या विषयाकडे सहज जाईल. गेला तरी तो काही अवांतर ठरणार नाही. या अगोदर या विषयावरील धागे इथे आहेत. उदा. सुखांत
हो. तुमचं निरीक्षण योग्य आहे.
हो. तुमचं निरीक्षण योग्य आहे. धागा वाचला, यावर आणखी थोडा विचार करून याच धग्याचं संपादन करता येईल किंवा याला भाग 1 असं नाव देऊन दुसऱ्या धाग्यात दुसरा भाग लिहिता येईल.
या लेखाचा हेतू काय असा प्रश्न
या लेखाचा हेतू काय असा प्रश्न पडला. >> +१
मृत्यू.... तो चांगलाही नसतो किंवा वाईटही नसतो, तो फक्त असतो. प्रत्येक जीव एकटाच जन्माला येतो आणि एकटाच मरतो आणि तेच एक अटळ सत्य आहे. (बाकी सगळी मोहमाया).
Death The Great Equalizer
Some die of natural causes some in a tragic way
But for every single one of us a final night and day
Without respect for the power of wealth and without respect for fame
Death the great equalizer treats everyone as the same
Without respect for anyone or creatures great or small
The billionaires of the World to the Reaper's scythe do fall
At least the one who does claim every life promotes equality
Amongst the wealthy of the World and those in poverty
Some live on to a ripe old age and some die in their prime
And some even die as children they are not granted much time
Not ageist or discriminatory in any way
He claims the lives of the very young and those who are old and gray
He's a true egalatarian of him one can only say
And for each and everyone of us a final night and day.
- by Francis Duggan