गंगेचे दर्शन गंगोत्रीला या आधी घेतले होते. गंगा आरतीचा सोहळाही गंगोत्री, हरिद्वार, वाराणसी या ठिकाणी पहिला होता. पण करोडो लोकांचे जीवन समृद्ध करणाऱ्या या गंगेचा प्रत्यक्ष उगम पाहण्याची इच्छा मात्र अजूनही अपूर्ण होती. तसेच तिथेच पुढे असलेली तपोभूमी अर्थात तपोवन इथेही जाण्याची तीव्र इच्छा मनात होती. प्रामुख्याने या दोन ठिकाणी जायचा बेत लॉक डाऊन मधे आणि नंतरही आखून फसला होता. पुनः एकदा मे - जून २४ मधे जायचे ठरवले आणि ग्रुपची जमवाजमव चालू झाली. भाऊ राजेश, शाळासोबती दोन विवेक, मित्र रवी आणि सनील असा सहा जणांचा चमू ठरला. पैकी सनील सगळ्यात तरुण म्हणजे ४१ वर्षांचा बाकी आम्ही सगळे ५२-५३ वर्षांचे. 'गिर्यारोहणाची आवड' या एका पक्क्या समान धाग्याने सगळे बांधलेले आणि आधीही सह्याद्रीत अनेक भटकंत्या केलेले.
घरून ७ जूनला रात्री १० वाजता निघालो. बोरिवलीहून १९०१९ ट्रेनने ९ जून ला सकाळी साडेआठ वाजता हरिद्वारला पोहोचलो. लगेच टॅक्सी करुन पहिल्या मुक्कामी म्हणजे गंगोत्रीकडे निघालो. हरिद्वारला प्रचंड उकाडा असल्याने सगळे साध्या कपड्याताच होते. थोड्याच वेळात घाट सुरु झाले आणि हिमालयाच्या पर्वतांची भव्यता सर्वांच्या नजरेत भरू लागली. खिडकीतून मान मोडेपर्यंत वर बघूनही पर्वतशिखर दिसणे कठीण होत होते. बाकीचे पाचही जण प्रत्यक्ष पहिल्यांदाच हिमालय पहात असल्याने त्यांना हा अनुभव विशेषच होता. चालक काहीसा तऱ्हेवाईक असल्याने आम्हाला गांगोत्रीला पोहोचायला रात्रीचे साडेदहा वाजले. सुदैवाने GMVN (Garhwal Mandal Vikas Nigam- महाराष्ट्रात जसे MTDC तसे तेथील GMVN) मधे राहायची व्यवस्था आधीच केलेली असल्याने हॉटेल शोधायची आवश्यकता नव्हती. पण जसे आम्ही गाडीतून उतरलो तसा थंडीचा झटका आम्हाला जाणवला. सकाळच्या ४० डिग्रीमधून रात्री थेट ४ डिग्री मधे आम्ही आलो होतो. लगेच सॅक मधले सापडतील ते गरम कपडे काढून सर्वांनी चढवले. काहींनी चक्क चादर मिळाली ती लपेटली. थंडीमुळे थरथर कापत असल्याने कोणाच्याच हालचाली पटापट होत नव्हत्या. बोलणेही नीट जमत नव्हते. GMVN कडे चालायला लागल्यावर शरीर थंडीला काहीसे सरावले आणि थंडी थोडी आटोक्यात आली. १०-१२ मिनिटे चालून आम्ही GMVN मधे पोहोचलो अणि हायसे वाटले. गरम गरम जेवण तयार होतेच. सगळे भुकेले असल्याने मनसोक्त जेवलो. प्रवासाने कंटाळले असल्याने सगळे लगेचच झोपलो.
१० जून हा दिवस वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी राखीव असल्याने या दिवशी स्थानिक भटकंती केली. गाईड अभिषेक राणा (+917818045631) सोबत भेट झाली. जवळच्याच हर्शील येथे रहाणारा तरुण आणि ठराविक पहाडी काटक शरीरयष्टीचा. त्याने शासकीय केंद्रात वैद्यकीय तपासणी करुन घ्यायला सांगितली. नुकताच सहस्त्रताल मोहिमेत ९ जणांचा मृत्यू झाल्याने तपोवनला जाणाऱ्यांसाठी तपासण्या अनिवार्य केल्या होत्या. सुदैवाने आम्ही सगळे त्यात पास झालो आणि गोमुख तपोवनला जाण्याचा आमचा परवाना झाला. दुपारी पांडव गुफा भेटीस गेलो. बाजूने खळाळत वाहणारी गंगा आणि वर विविध सूचीपर्णी वृक्षांची सावली असल्याने २ किमी कसे पार झाले कळलेच नाही. पांडव गुफेत सिताराम बाबा नावाचे साधू वास्तव्य करुन होते. सगळे नमस्कार करुन पुढे गुफेबाहेर जात होते. मात्र आम्ही नमस्कार करताच सर्वांना बाबांनी त्यांच्या बाजूला बसायला सांगितले. विचारपूस केली. आम्हीही काही शंका विचारल्या. ६ महिने गंगोत्री गाव बर्फात असतानाही सिताराम बाबा पांडव गुफेत रहातात. बर्फाच्या मोसमात बर्फ वितळवून पाणी करावे लागते, गावात फक्त यांच्यासारखे साधू आणि पोलिस एवढेच वास्तव्यास असतात. बाकी पूर्ण गंगोत्री रिकामे असते. सिताराम बाबांनी असे अनेक किस्से सांगितले. सनातन धर्माच्या, पुराणातील गोष्टी सांगितल्या. मग त्यांच्या जवळच्या चुर्म्याच्या लाडवांचा बालभोग (आपल्या भाषेत अल्पोपहार) आम्हाला खायला दिला. छान कॉफी करुन दिली. सुमारे दीड तास बाबांसोबत सतसंग झाला. शेवटी बाबांनी 'तुमची गौमुख - तपोवन यात्रा चांगली होईल' असा आशिर्वाद दिला आणि आम्ही GMVN ला परतलो. संध्याकाळी गंगोत्री देवळात दर्शन घेतले, गंगा आरती घेतली आणि थोड्याशा पावसात पटापट हॉटेलवर आलो.
उद्या मुख्य ट्रेकला निघायचे. काहींनी अंघोळी उरकल्या, उद्याच्या सॅका तयार केल्या. जास्तीचे सामान एका सॅक मधे भरून एका दुकानात ठेवले. उद्या सकाळी ६:३० वाजता निघायची तयारी करुन सगळे झोपले.
११ तारखेला सकाळी वेळेत निघालो. काहींनी नाश्ता केला आणि बाकीच्यांचा बांधून घेतला. चहाप्रेमींचा चहा झाला आणि आम्ही देवळाजवळच्या कमानीपाशी पोहोचलो. अभिषेक वाट पहात होताच. लगेच चालायला सुरूवात केली. देवळाच्या वरच्या बाजूने घरांच्या - तबेल्या -गोठ्यांच्या मधून वळणे घेत शेवटी गंगोत्री देवळाला नमस्कार करून आम्ही गावाबाहेर पडलो. साधीच पायवाट, पण सतत उजव्या बाजूला भागिरथेची साथ. आता पुढे मोबाईल रेंज नाही म्हणून इथूनच घरी फोन करून झाले..आता भेट २-३ दिवसांनी परतल्यावरच. १५-२० मिनिटात आम्ही वनखात्याच्या चेक पोस्टपाशी पोहोचलो. इथे आमच्या परवानग्या तपासल्या आणि आम्ही पुढे निघालो. आता थेट ९ किमी वरचे चीडबासा येईपर्यंत दुकाने नाहीत. पायवाट तशी प्रशस्त म्हणजे साधारण ६ फूट रुंद पण उजव्या बाजूला दोन तीनशे फूट खोल.. थेट भागीरथी पर्यंत. काही ठिकाणी रुंदी २-३ फुटांपर्यंत कमी झालेली. दोन तीन ठिकाणीच डोंगर ढासळला होता तिथे जेमतेम फूट दीड फूट रुंदीची वाट. पण घसरून दरीत पडण्याची भीती अजीबात नाही. (सोशल मीडिया वर उगाच बागुलबुवा करून सांगतात). हळुहळू छोटे छोटे चढ उतार पार करताना दमछाक व्हायला लागली. अचानक एका ठिकाणी डोंगरावरच्या भागात भरल (blue sheep) चा कळप दिसला. इकडून तिकडे जाताना त्यांच्या पायांनी खाली दगड सुटत होते. आम्ही खाली येणाऱ्या दगडांवर लक्ष ठेवत भरलचा कळप पहात थांबलो. ते सगळे दूर गेल्यावर पुढे चालायला लागलो. साधारण ११ च्या सुमारास आम्हाला दूरवर अनेक सुचीपर्णी झाडे दिसू लागली. आम्हाला ती देवदारसारखी वाटली, पण ते चीड नावाचे वृक्ष असल्याचे गाईडने सांगितले. आणि त्यावरूनच त्या भागाला चीडबासा नांव पडल्याचेही सांगितले. थोड्याच वेळात आम्ही चीडबासाला पोहोचलो. सगळे भुकेले होते. सोबतचे पराठे फस्त झाले. काहींना खूप दमल्याने खायची इच्छा नव्हती त्यामूळे त्यांनी थोडे थांबून खजूर, चिक्की खाऊन घेतले. काहींनी हिमालयातील पोटचा आधारस्तंभ असलेली मॅगी खाल्ली आणि चहा घेऊन ताजेतवाने झाले. आता साधारण ५ किमी चालून भोजबासा गाठायचे होते. दोघांनी सॅक घेण्यासाठी पोर्टर केले. मधे काही छोटे लाकडी पूल पार केले. भोज वृक्ष पहिले. भूर्ज पत्र फक्त ऐकले होते ते प्रत्यक्ष हातात घेउन पहाता आले. झाडापासून त्याची पातळ साल आपोआप सुटी होते. अलगद ओढून काढली म्हणजे हाती लागते ते भुर्जपत्र.
कसेबसे पाय ओढत संध्याकाळी ४:३०च्या सुमारास आम्ही भोजबासाला पोहोचलो. थोडे खाली उतरून ६ खाटांच्या उबदार तंबूत शिरलो. गाईडने आमची छान सोय करून ठेवली होती. मागे खळाळत वाहणारी भागीरथी आणि पुढे ५-६ तंबू , GMVN ची पत्र्याची घरे असे भोजबासा गाव. लगेच झोपवेसे वाटत होते पण त्याची पूर्ण कल्पना असलेल्या गाईडने कोणीही आत्ता झोपायचे नाही अशी तंबी दिली. आत्ता झोपलात तर जेवायला उठणार नाही आणि रात्री नीट झोप लागणार नाही. त्यापेक्षा थोड्या वेळात जेवा आणि झोपा अशी ऑर्डर आली. काही उत्साही मंडळी बाजूला नदीवर फेरफटका मारून आली. मस्तपैकी गरमागरम चहा झाला. सूर्यास्ताच्या सुमारास जेवणं झाली. भागिरथीचा खळखळाट ऐकत तंबूत मंद प्रकाशात गप्पा गोष्टी करायला फारच मजा आली. सनील सोडून इतर कोणाच्यातच उद्या तपोवनला जायचे त्राण नव्हते. भागिरथीची खळखळ अंगाई ऐकत सगळे गाढ झोपलो.
(भोजबासा येथील तंबू )
१२ तारीख.. गौमुख- तपोवन(??) दर्शनाची. सकाळी नदी पलीकडे ट्रॉलीने जायचे होते. ज्यांना तपोवनची परवानगी आहे त्यांनाच ट्रॉली ने पलीकडे जाता येते. फक्त गौमुखवाल्यांना नदीच्या अलिकडूनच ४ किमी पुढे जाऊन गौमुखाचे लांबूनच दर्शन घेउन परतावे लागते. पलीकडून गौमुखाच्या अगदी जवळ म्हणजे अंदाजे पन्नास फुटांवर जाऊन दर्शन घेता येते.
(गौमुख)
नाष्टा चहा घेउन कालची मरगळ झटकत आम्ही सकाळी ७:३० च्या सुमारास ट्रॉली च्या रांगेत पोहचलो. कालचा थकवा जाऊन उत्साह वाटत होता. ट्रॉली म्हणजे लोखंडी दोरावर दोन पुलींवर लटकवलेला मोठ्ठा लोखंडी पाळणा. त्यात सहा माणसे, सामान चढवायचे आणि दोराने पलीकडच्या माणसांनी खेचून घेत ट्रॉली पार करायची. साधारण मध्यापर्यंत दोराला उतार असल्याने ट्रॉली सहज खेचली जाते. मध्यानंतर खेचायला खूप जोर लागतो. खेचणारे कमी पडत असतील तर ट्रॉली मधल्या माणसांना लोखंडी दोर खेचत थोडा हातभार लावावा लागतो. थंडीत नवीन माणसांना हा प्रकार जडच जातो. पण स्थानिक माणसे आणि गाईड लोकं हे वेळ मारुन नेतात. दोन तीन टप्प्यात आम्ही सगळे एकदाचे पलीकडे गेलो. पुढची ट्रॉली खेचण्यासाठी मदत केली आणि हात चोळत पुढे चालायला लागलो. ११ च्या सुमारास गौमुखाच्या साधारण ३०० मीटर आधी तपोवन फाट्यापाशी पोहोचलो. सनीलने तपोवनसाठी मला आग्रह केला. माझी जायची तयारी होती पण वारंवार दमछाक होत असल्याने माझ्यामुळे उशीर होण्याची भीती वाटत होती. पण गाईडनेही जोर केला. "आप पक्का टाईमपे पहुचेंगे | चलिये|" सांगत विश्वास दिला. हो ना करता करता शेवटी निघालो. पाणी , बिस्किटे आणि जाकीट सनीलने घेतले अणि आम्ही दोघे निघालो. गडबडीत कापूर घ्यायचा विसरलो पण शिवकृपेने त्याची गरज भासली नाही.
(तपोवन येथे मौनी बाबा यांच्या आश्रमाजवळ)
थोड्याच वेळात उभा चढ सुरु झाला. ८-१० पावले टाकली की थांबावेसे वाटत होते. काही ठिकाणी खडीचा भाग असल्याने एक फूट उंच पाय टाकावा तो अर्धा फूट खाली येत होता. अर्थात घसरण्याची शक्यता कोठेही नव्हती. दम लागल्यावर थांबलो की रिकव्हरी मात्र खूपच पटकन व्हायची. की परत सुरू. वीस पंचवीस थांबे केले. शेवटचा अंगावर येणारा चढ पार केला आणि तपोवन पठार पाहून हायसे वाटले. अनेक दिवस मनात घोळत होते तिथे आज पोहचलो होतो. पठारावर वहात आसलेल्या अमरगंगा या छोट्याश्या नदीच्याकडेने थोडे अंतर चालून गेलो. एका छोट्या चढावावर असलेल्या मौनी बाबांचा आश्रमात सुमारे १ वाजता पोहोचलो. बाबांनी बसायला सांगितले. एका इटालियन कुटुंबासोबत त्यांचा सतसंग चालू होता. ते झाल्यावर आमच्याशी थोडे बोलले. आम्हाला छान चहा करून दिला. २००८ सालापासून बाबा इथे कायमस्वरूपी रहातात. शिवलिंग पर्वताच्या अगदी पायथ्याशी आम्ही उभे होतो. फोटो काढले. सनीलला त्या वातावरणात, फोटोत देखिल एक वेगळीच ऊर्जा जाणवली. थोडावेळ परिसर पहिला, आसपासची शिखरे पहिली आणि दोनच्या सुमरास उतरायला सुरूवात केली. आता दम लागायचा प्रश्न नव्हता. मग आम्ही सह्याद्रीतले शूर. एक दोन ठिकाणीच थांबत सरसर उतरलो आणि अडीच वाजता गौमुखा जवळ पोहचलो. सह्याद्रीत चढाईचा वेळ उतराईच्या साधारण दुप्पट असतो. इथे मात्र दम लागण्याचे प्रमाण खूप जास्त असल्याने हे प्रमाण अंदाजे चौपट असल्याचे लक्षात आले.
गाईडने आम्हाला आणखीन पुढे नेत गौमुखापासून अगदी पन्नास फुटांवर नेउन दगडांवर बसवले.. बर्फाच्या त्या कमानीतून भागिरथी / गंगा फेसाळत बाहेर पडत होती. मागच्या हिमनगाचे बर्फ वितळून झालेले पाणी गौमुखातून बाहेर येते. प्रवाहाचा जोर इतका की "भगवान शंकराने गंगेला आपल्या जटेत घेऊन तिचा आवेग कमी केला आणि पृथ्वीवर सोडली" या पुराणकथेची क्षणात प्रचीती यावी. सुन्न होउन पहात राहिलो. सनील डुबकी मारण्याच्या तयारीने गेला पाण्यात. पण शेवटी बर्फाचा थंडावा आणि प्रवाहाचा जोर यामुळे बाटलीने डोक्यावर पाणी घेऊन बाहेर आला. माझे पाण्यात जायचे धाडस काही झाले नाही. थोडे पाणी पिऊन, हातपाय धुवून मी दगडावर बसून रूद्र म्हटला. सनीलने पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या, पण हात बधीर झाल्याने तिथेच दगडावर ठेवल्या आणि मला घेऊन यायला सांगितल्या. गंगा उगम मनसोक्त बघून डोळ्यात साठवून निघालो आणि पाच वाजता थेट ट्रॉली पाशी आलो. ठरवलेली मुख्य दोन ठिकाणे छान पाहून झाली होती. ट्रॉलीतून नदीपार करून तंबूत परतलो. येताना तसा उशीर झाला असल्याने पलीकडे ओढून घ्यायला दोघेच होते. त्यामुळे आम्हाला लोखंडी दोराला ओढत ट्रॉली खेचावी लागली. पण त्या त्रासापेक्षा नंतर ग्रीसचे हात त्या बर्फाच्या पाण्याने धुणे अधिक त्रासदायक होते. नेहमप्रमाणे गरम चहा झाला. इतर ग्रुप सोबत गप्पा, जेवण झाले. आज दर्शनाचे समाधान असल्याने रात्री तंबूत गप्पा बराच वेळ रंगल्या.
रस्ता चुकायचा प्रश्न नसल्याने गाईडने आम्हाला सकाळी लवकर निघून पुढे जायला सांगितले. तिघांच्या सॅक साठी पोर्टर ची व्यवस्था करून तो उशिरा निघेल असे ठरले. आम्ही ६:३० वाजता पोटभर दलिया खाऊन निघालो. आता माहितीची वाट आणि तीही थोडी उतरणीची त्यामूळे दोन वाजेपर्यंत गंगोत्रीमधे पोहोचलो. पाठोपाठ गाईडही आला. त्याच्यासोबत छान जेवण झाले. हॉटेलवर अंघोळी, थोडी कपडे धुलाई असे करत दिवस संपला.
आता आस केदारनाथ दर्शनाची. १४ तारखेला सकाळी ६ वाजता जीपने निघून श्रीनगर गाठले. तेथून दूसरी जीप करून सोनप्रयागला पोहोचायला रात्री ८ वाजून गेले. उद्या दोघे विवेक घोड्यावरून तर बाकी चौघे चालत जायचे ठरवून झोपलो.
सोनप्रयाग ते गौरीकुंड जीप सकाळी ५ वाजता चालू होत असल्याने आम्ही चौघे सकाळी ४:३० वाजता निघालो. जीपने गौरीकुंड गाठून ६: ३०च्या सुमारास चालायला सुरुवात केली. मंदाकिनी नदीच्या उजव्या बाजूची जुनी १४ किमीची वाट पूरात वाहून गेल्याने डाव्या बाजूस नवीन वाट केली आहे. मात्र नवीन वाटेने अंतर वाढून २२ किमी झाले आहे. घोड्यांच्या लीदेची-मुताची थोडी दुर्गंधी, तसेच घोडे, पिठ्ठू, डोली वाल्यांचे धक्के हे अपेक्षित त्रास सोडले तर वाट चांगली आहे. ठिकठिकाणी साफ सफाई शक्य तेवढ्या प्रयत्नपूर्वक चालू असते. तरीही काही त्रास वाटला की दूरचे डोंगरसौंदर्य पहात मन तृप्त करून घ्यायचे आणि पुढे चालायचे. थोडे खात, पीत, थांबत आम्ही संध्याकाळी ४:३० वाजता मंदीर परिसरात पोहोचलो. वाटेत एक विवेक घोड्यावरून परत जाताना भेटला. दुसरा विवेक दर्शन घेऊन संध्याकाळी एकटा चालत उतरून रात्री उशीरा हॉटेलवर पोहोचला.
केदारनाथ देवळाचा परीसर फिरलो. खूप मोठे काम चालू होते. मोठ्या धर्मशाळा, मागच्या बाजूला मोठ्ठा बांध, आदी शंकराचार्यांचा पुतळा अशी अनेक ठिकाणी कामे चालू होती. तेवढ्यात देवळाच्या मागे पाय रोवून उभी राहिलेली ती भीमशीला दिसली. देवळामागे अचूक अंतरावर पहारेकरी उभा रहावा तसा. आतून गोलाकार.. छोटी धरणाची भिंतच जणू... देवळावर येणारे पाणी थोपवून धरणारी.. चमत्कार... केवळ चमत्कार. पाण्याच्या लोंढ्याबरोबर किमान ५० टन वजनाची ही शिळा वहात आलीच कशी? आली तर बरोब्बर इथेच कशी थांबली? धरणाच्या भिंतीसारखा आतील गोलाकार नेमका देवळाच्याच बाजूला करून कशी थांबली? सगळया प्रश्नांची उत्तरे प्रलयात वाहून गेलेली.. या चमत्कारास आता नमस्कार हेच उत्तर ..
एका गुरुजींकडे रहायची आणि पूजेची व्यवस्था केली होती. त्यामूळे गर्दी गोंधळानंतर रात्री उशीराने का होईना पण गाभाऱ्यात जाऊन पूजा करायला मिळाली हे आमचे भाग्यच ठरले. सकाळी साडेसातच्या सुमारास निघून सोनप्रयागला पोहोचायला दुपारचे २ वाजले. १२ वाजता चेकाऊट करून दोघे विवेक आमचे सामान घेउन हॉटेल बाहेर थांबले होते. त्यांनी बद्रीनाथसाठी गाडीही पाहून ठेवली होती. लगेचच सगळे गाडीत बसलो आणि सोनप्रयाग सोडले. मधे एका झऱ्यापाशी थांबून हातपाय धुवून केदारनाथ चालीचा थकवा घालवला आणि पुढे निघालो. यावेळीही चालक विक्षिप्त असल्याने थोडे उशीरा म्हणजे रात्री दीड वाजता बद्रीनाथ गावात पोहोचलो. हॉटेल मिळाले. उद्या कसलीच घाई नसल्याने सगळे निवांत झोपले.
आज दर्शनासाठी कुठे चढून जायचे नव्हते. या ट्रीप मधे पहिल्यांदाच सगळे आरामशीर म्हणजे १० वाजता उठले. व्यास गुफा, गणेश गुफा, सरस्वती मंदीर, भीम पूल, स्वर्गारोहिणी (पांडव जेथून स्वर्गात गेले असे सांगताना तो मार्ग), माना गाव अशी स्थानिक ठिकाणे बघितली. संध्याकाळी ३ तास रांगेत उभे राहून बद्रीनाथाचे दर्शन घेतले. पण केदारनाथ सारखे गाभाऱ्यात जाणे इथे जमले नाही. ठिकठिकाणी कढईत छान केशरी, पिवळे दूध उकळताना दिसत होते. त्याचा आस्वाद घेतला, उद्याच्या हरिद्वार बसची तिकिटे काढली आणि जेवून हॉटेलवर आलो.
सकाळी ५:३० ची विश्वनाथ सेवा बस ६ वाजता सुटली. या ट्रीपमधील बस मधून पहिलाच प्रवास चालू झाला. केबिन मधे दोनजागांवर आलटून पालटून बसत संध्याकाळी ६ वाजता हरिद्वारला पोहोचलो. आता उद्याचा दिवस ऐच्छिक फिरण्याचा आणि परवा परतीचा. जवळच्या हॉटेलात चहा व नंतर जेवण उरकले. काहींनी उद्याच्या राफ्टिंग चे बुकिंग केले. हरिद्वारमधे प्रचंड उकाडा असल्यानं हॉटेलवर गप्पा मारत झोपलो.
सनीलने एक दिवस आधी निघायचे ठरवले. त्यामुळे तो सकाळी मनसा देवी दर्शन करून गंगेत डुबकी मारुन आला अणि आवरून स्टेशनला गेला. राजेश रवी आणि मी ऋषिकेशला राफ्टिंग करायला गेलो. रबराची हवेची बोट खळाळत्या पाण्यात ठेवून आम्हाला बोटीच्या काठावर बसायला सांगितले आणि बोट प्रवाहात ढकलण्यात आली. सुरुवातीला गंगेचे ते उसळते पाणी आणि दूर पडलेला काठ पाहून भीती वाटली. आमच्या बोटीतील तिघेजण फारच घाबरल्याने बोट परत कडेला लाऊन त्यांना उतरवावे लागले. नंतर खूप जोरात वारा आणि पाऊस सुरू झाला पण तोपर्यंत बोटीवर पक्का विश्वास बसला होता. त्यामुळे त्या वादळाची भीती वाटण्या ऐवजी मजा घेता आली. वातावरण थोडे शांत झाल्यावर राजेश आणि रवी बोटीच्या दोराला धरून पाण्यात उतरले आणि पुनः गंगास्नान केले. गंगा प्रवाहात अंदाजे ९ किलोमीटर वहात लक्ष्मण झुल्यापर्यंत येत मनसोक्त राफ्टिंग करून ट्रीपची सांगता केली. संध्याकाळी गुजराथी खानावळ शोधून भरपेट तवा रोट्या जेवलो.
आज २० जून. पंधरा दिवसांची भटकंती संपवून परतीच्या ट्रेन मधे बसलो. पहिल्या पाच दिवसांत ९०-१०० किलोमीटर ची चाल झाली असली तरीही कोणालाही दुखापत वा आजारपण न येता तशी बऱ्यापैकी कठीण ट्रेक यात्रा पूर्ण झाली हे मोठेच समाधान होते. शिवाय दोन आठवड्यात ४ किलो वजन करण्याचा मार्गही बोनस म्हणून मिळाला :). खिडकीतून बाहेर बघताना भरलचा मुक्त फिरणारा कळप, गौमुखातुन फेसाळत बाहेर येणारी गंगा, तपोवनची विशेष अशी तपोभूमी, केदारनाथ परीसर, चमत्कारी भीमशीळा अशा अनेक आठवणीची चित्रे आलटून पालटून डोळ्यासमोरून सरकत होती.
(शिवलिंग पर्वताच्या पायाशी)
सुंदर सहल वर्णन. परतताना बारा
सुंदर सहल वर्णन. परतताना बारा तास बस प्रवास करत हरिद्वारला येणे फारच वाटले. तिकडून नैनितालला जाता येत नाही का? ( मी कधी हिमालयात गेलो नाही.)
ट्रॉलीचा फोटो आहे का?
सुरेख वर्णन.
सुरेख वर्णन.
आहा! खूप छान सहल. गौमुखाचं
आहा! खूप छान सहल. गौमुखाचं वर्णन तर फारच सुंदर!
छान वर्णन! आवडले.
छान वर्णन! आवडले.
मस्त !
मस्त !
त्या ट्रॉलीबद्दल आधी कधी ऐकलं नव्हतं. इंटरेस्टिंग प्रकार वाटतोय.
छान लेख. प्रवास आणि चालीचाली
छान लेख. प्रवास आणि चालीचाली भरपूर आहे की.
फोटो अजून चालले असते.
अशा ट्रॉलीचा व्हिडीओ पाहिला आहे.
युट्युबवर बैरागी नामक ब्लॉगर आहे. त्याच्या एका ब्लॉग मध्ये. त्याने कोणाच्या तरी सांगण्यावर विश्वास ठेवून तपोवन तिकीट नव्हते घेतले. पुढून रस्ता आहे म्हणून. आणि लांबून गोमुख दर्शन घेवून परत जावे लागले.
छान लेख आणि सुंदर वर्णन.
छान लेख आणि सुंदर वर्णन.
तो परिसरच मंत्रमुग्ध करणारा आहे.
अजून फोटो चालले असते.
सुंदर प्रवासवर्णन...!
सुंदर प्रवासवर्णन...!
मस्त वर्णन.अजून पगोटोज6 असतील
मस्त वर्णन.अजून पगोटोज6 असतील तरी टाका.
भाग्यवान आहात, जाऊन आलात. _/
भाग्यवान आहात, जाऊन आलात. _/\_
मी त्या भागात दोनदा गेले पण चार धाम करु शकले नाही.
आता ती इच्छा मनातुन काढुन टाकली. ८५० लोकसंख्येच्या केदारनाथाला गेल्या वर्षी ४५ लाख लोकांनी भेट दिली. हे लोक एक दिवस जरी राहिले तरी यांचे चहा, जेवण, मल मुत्र विसर्जन यांचा तिथे किती ताण पडत असणार याबद्दल कळले /वाचले तेव्हा अवाक व्हायला झाले. ७-८ महिने बर्फाच्छादीत वातावरणात यातले किती डिकंपोस्ट होत असेल देव जाणे. हा ताण निसर्ग फार काळ सहन करणार नाही हे निश्चित. त्यामुळे आपण तिथे जाऊन उगीच अजुन ताण कशाला वाढवा हा विचार करुन गप्प बसले
वाह मस्तच !
वाह मस्तच !
सुरेख वर्णन.
सुरेख वर्णन.
तुमचा लेख वाचून फार बरं वाटलं
तुमचा लेख वाचून फार बरं वाटलं.
गौमुख, तपोवन व केदारनाथ करायची इच्छा आहे. अर्थात केदारनाथची गर्दी टाळून.
यावर्षी अक्षय तृतीयेला यमुनोत्रीचे अशक्य गर्दीचे व्हिडीओ आले होते. चेंगराचेंगरी झाली नाही नशिब. त्यामुळे पर्यावरणाचा ह्रास व वैयक्तिक इच्छा, त्यात माझी समजुत की संसाराच्या सगळ्या जबाबदाऱ्या संपवून वानप्रस्थाकडे वाटचाल करताना चारधाम करावे. त्याला तर फार वेळ आहे व त्यावेळी हे ट्रेक झेपतील का ही भितीही, यात कशाला झुकते माफ द्यावे समजत नाही.
सुरेख वर्णन
सुरेख वर्णन
आहा! खूप छान
आहा! खूप छान