*कहाणी निळ्या डोळ्यांच्या रवीची!*

Submitted by पराग र. लोणकर on 27 June, 2024 - 05:43

कहाणी निळ्या डोळ्यांच्या रवीची!*

दहावी झाल्यावर शाळा सोडल्यानंतर २० वर्षांनी आम्ही सर्व मित्र आज भेटणार होतो. पस्तीशीला आलेले सगळे मित्र आता कसे दिसतात, हे पाहायची उत्सुकता मनात होती. Whatsapp वगैरेचा जमाना नसलेला तो काळ होता. त्यामुळे अगदी निवडक मित्र आता संपर्कात होते. नोकरी-व्यवसायासाठी पुण्याबाहेर किंवा पुण्यातच दूरवर गेलेले अनेक मित्र आज २० वर्षांनी भेटणार होते.

विशेष उत्सुकता होती ती रवीला भेटण्याची. पाचवी ते सातवी असा माझा वर्गमित्र असलेला रव्या माझा खास दोस्त होता. आठवीत भाषा, विषय बदलल्याने आमचे वर्ग बदलल्याने अगदी रोजचे भेटणे कमी झाले असले तरी अधूनमधून भेटत होतो, कँटिनच्या सामोस्यांची एकत्रित मजा घेत होतो. लायब्ररीत कधीतरी जाऊन बसत होतो.

दहावीनंतर मात्र आमचे मार्ग एकदम बदलले. हुशार रवी सायन्सला गेला आणि मी कॉमर्स पदवीधर होऊन बँकेत चिकटलो.

रवीला भेटण्याची खूप जास्त उत्सुकता अजून एका गोष्टीसाठी होती. एका काळात तो अगदी खास, जिवलग दोस्त होताच, पण त्या विद्यार्थी वयात असतानाही, तो कमालीचा देखणा होता. या देखणेपणावर कडी केली होती, ती त्याच्या निळ्या डोळ्यांनी. एखाद्या मुलाने किती गोड दिसावं! त्याच्या त्या रुपानं आम्ही सामान्य रुपाची मुलं थोडं जळायचो देखील! खोटं कशाला बोलू? आई-वडील दोघेही उंच आणि तसे सुदृढ असल्याने, वयाच्या मानाने, आणि आमच्यापेक्षा तो तेव्हा, थोडा मोठाही वाटत असे.

असा हा देखणा रवी, आता पस्तीशीत कसा दिसतो, याचेही कुतूहल मनात होते.

या गेट-टू-गेदरचे अगदी सर्वांना- अजून एक आकर्षण होते, जे मी अजून तुम्हाला सांगितले नाहीये. आमची शाळा मुलं-मुली अशी एकत्र होती. त्यामुळे त्या वेळच्या- गणवेशात पाहिलेल्या मुली आता कशा दिसत असतील, ते पाहण्याचेही जवळपास सर्वांना आकर्षण होते. आमच्यातील एखाद-दुसरे कुणी अजून अविवाहित असतील, तर त्यांच्यासाठी समोरच्या पक्षातलं कुणी अविवाहित, घटस्फोटीत असल्यास, त्यांना तेथे खडा टाकता येण्यासारखंही होतं.

अशी माझ्या दृष्टीने आवर्जून या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची अनेक कारणं होती.

दहाची वेळ असताना मी ९.३०लाच आमच्या शाळेतील ठरलेल्या वर्गात जाऊन, माझ्या आवडत्या, सर्वात शेवटच्या बाकावर जाऊन तेथे स्वत:ला अॅडजस्ट केलं.

माझ्यासारखीच १-२ मंडळी बरीच आधी आलेली होती, त्यांच्याशी माझे ‘हाय, हॅलो’ झालेही होते.

आता फक्त शांतपणे वर्गात शिरणाऱ्या प्रत्येकाला आणि प्रत्येकीला न्याहाळणे आणि नंतर योग्य वेळी गप्पा, परिचय वगैरे सुरू करणे इतके बाकी होते.

एकेक जण येत होते. बरेचसे लगेच ओळखू येत असले, तरी त्यातले काही जण लक्षात येत नव्हते. इतक्यात एक उंचापुरा, हॅंडसम, मॉडेल वाटावा असा, पस्तीशीत देखील आपली प्रमाणबद्ध शरीरयष्टी राखून ठेवलेला एक ‘तरुण’ वर्गात शिरला आणि सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे खिळून राहिल्या. त्याने डोळ्यावर चढवलेला गॉगल मात्र माझ्यासकट सगळ्यांना जरा खटकलाच. म्हणजे मला खटकल्यानं, मला इतरांच्या नजरेत देखील ते खटकलेपण जाणवलं. त्याच्याबद्दल वाटलेलं कौतुक, त्याच्या अशा ‘शायनिंग’ मारण्यामुळे बरंचसं ओसरलं.

इतक्यात माझ्या लक्षात आलं, ‘अरे! हा तर रवी!’

आत्तापर्यन्त वर्गात बरीच मंडळी येऊन बसली होती. रवीनं सर्व वर्गावरून- एखाद्या राजानं प्रजेकडे किंवा एखाद्या सेलिब्रिटीनं चाहत्यांकडे नजर टाकावी तशी नजर फिरवली, आणि त्या समोरच्या गर्दीत मला पाहून तो – मनमोकळं हसून, माझ्याजवळ येऊन आपला हात पुढे करून उभा राहिला.

काही क्षणापूर्वी ज्याचा मनस्वी राग आला होता, त्याच्याबद्दलच आता कमालीची आत्मीयता दाटून आली. इतका राजबिंडा माणूस इतरांकडे न थांबता थेट माझ्या पुढ्यात येऊन हात पुढे करता झालेला पाहून मला थोडं आसुरी समाधानही वाटलं. बसल्या बसल्या त्याचा हात हातात घेऊन, मी त्याला माझ्या शेजारी बसवलं.

संपूर्ण वर्ग आमच्याकडे पाहत असल्याचे माझ्या लक्षात आले. पण मला आता त्याची पर्वा नव्हती. उलट आनंदच होत होता. रव्यानं गॉगल काढावा असे त्याला सुचवावे असे मला वाटून गेले, परंतु एकूण त्याचा डौल तो खूपच मोठा माणूस झाला असल्याचे दाखवत होता. त्यामुळे आपोआप मनात आलेल्या – स्वत:च्या न्यूनत्वाच्या भावनेमुळे - मी त्याला काही सुचवले नाही.

वर्ग भरला, आमच्या वेळच्या काही शिक्षकांनी वर्गात येऊन काही विचार मांडले, आणि सर्व जण मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी शाळेच्या चौकोनी इमारतींच्या मधल्या भागातील पटांगणात, मोकळ्या जागेत विखुरले.

जेवणाला अजून बराच वेळ होता.

आमच्या आवडत्या कँटिनच्या जागेपाशी काही जुनी- थोडीफार तुटलेली बाके ठेवलेली होती. मी आणि रवी तेथे, इतरांपासून थोडे दूर, थोडे निवांत बसायच्या उद्देशाने स्थिरावलो. बाकी बहुतेक सर्वांशी पहिल्या भेटीगाठी आम्ही या दिशेने चालत येताना करून घेतल्या होत्या.

सुंदर, देखणी मुलं अनेक असतात. मात्र शाळेत असताना रवीच्या निळ्या डोळ्यांमुळे तो अशा सुंदर मुलांमध्येही अगदी उठून दिसत होता. त्यामुळे आता या वयात, त्याचे ते डोळे बघायला मी उत्सुक होतो.

पण त्याच्या डोळ्यावर अजून तो डार्क काळा गॉगल होता. आता मात्र मी त्याला त्याचा गॉगल काढायला सांगितला. वर्गात गरज नसतानाही त्याच्या गॉगल घालण्यामागे काहीतरी कारण असावे असे मला सारखे वाटत होते. काहीतरी गडबड असावी. त्यामुळे आता मी गॉगल काढायला सांगितल्यावर तो गॉगल काढायला आढेवेढे घेईल असं मला वाटत होतं.

पण असे काहीही आढेवेढे न घेता रवीने त्याचा गॉगल शांतपणे काढून बाजूला ठेवून माझ्याकडे पाहिलं.

मला खूप मोठा धक्का बसला.

नाही, नाही, त्याच्या डोळ्यांना काहीही झालेलं नव्हतं. त्याचे डोळे तितकेच सुंदर होते, त्याच्या मूळ देखण्या रूपाला साजेसे, उलट त्याचे रुप अजूनच खुलवून टाकणारे.

आता मात्र रवी सर्वांपुढे भाव खाण्यासाठी वर्गात आणि बाहेर आल्यावरही गॉगल घालून बसला होता याची मला खात्री झाली आणि मी थोडासा वैतागून त्याला याचा जाब विचारला. शेवटी एके काळचा तो माझा जिगरी दोस्त होता, आणि इतक्या वेळ त्याने केलेल्या मनमोकळ्या संवादामुळे माझी भीड आता चेपली होती.

“थांब, थांब, चिडू नकोस. सांगतो मी हा गॉगल लावण्याचं कारण. आणि तेही खरं. इतरांना सांगतो तसं खोटं कारण मी तुला सांगणार नाही.”

माझ्या कपाळावर भलं मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं, जे माझ्याही लक्षात आलं.

“आपण दहावीनंतर वेगळे झालो. अकरावीला मी वेगळ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.” रवीनं बोलायला सुरुवात केली.

“शाळेपेक्षा खूपच वेगळं वातावरण कॉलेजमध्ये असतं. फारसं आपल्या पेहरावाकडे, दिसण्याकडे शाळेत फारसं लक्ष न देणारी मुलं-मुली कॉलेजमध्ये जायला लागताच या गोष्टींकडे लक्ष देऊ लागतात. असो, अर्थात माझ्या या कहाणीत याचा तसा काही थेट संबंध नाही.

कॉलेजच्या अगदी पहिल्याच दिवशी एक मुलगी माझ्याकडे आली, आणि तिने थेट माझ्याकडे फ्रेंडशिप मागितली. तिच्या धाडसाचं मला कौतुक वाटलं. नुसती मैत्री स्वीकारायची असल्याने मीही तिला होकार दिला. पण नंतर एक अनपेक्षित गोष्ट घडली. जवळपास रोजच कुणी ना कुणीतरी माझ्या जवळ येऊन माझ्या मैत्रीची मागणी करू लागलं. काही अतिधाडसी मुली तर थेट लग्नाचंच बोलू लागल्या. मला काहीच समजेना. साधारण महिनाभरच झाला असेल, एके दिवशी कहरच झाला. माझ्यावरून जवळपास ८-१० मुलींची चांगलीच जुंपली. अगदी मारामारीपर्यन्त गोष्ट गेली आणि प्राचार्यांनी या मुली आणि मला त्यांच्या कक्षात बोलावलं. तपशीलवार चौकशी झाली, आणि यामध्ये माझी काहीच चूक नसल्याचं प्राचार्यांच्या लक्षात आलं, आणि त्यांनी मला वर्गावर जाण्यास सांगितलं. मुलींना प्राचार्यांनी सक्त ताकीद दिली. परत असं काही घडलं तर कॉलेजमधून काढून टाकलं जाईल असंही सांगितलं. या गोष्टीचा संपूर्ण कॉलेजमध्ये चांगलाच गवगवा झाला.

पण त्यामुळे एक बरं झालं. ते अकरावीचं आणि पुढचं बारावीचं वर्ष कोणत्याच मुली माझ्या जवळ आल्या नाहीत. उलट मी समोरून येताना दिसताच मुली त्यांची वाट बदलू लागल्या. मला याचं आश्चर्य वाटलं, पण माझी डोक्याची कटकट गेली असल्यानं मी आनंदी होतो.

एफ.वाय.ला मी पुन्हा कॉलेज बदललं. पहिल्या दिवशी मी नवीन कॉलेजला गेलो आणि परत ‘ये रे माझ्या मागल्या’ असा मला अनुभव आला. पहिल्याच दिवशी दोन मुलींनी मला प्रपोज केलं- थेट लग्नासाठी!

मी जामच वैतागलो. खरं तर घाबरलोच. मला काय करावं तेच कळेना. असाच विमनस्क होऊन मी कॉलेजच्या वर्गांवरून जात असताना एका खोलीबाहेर मला ‘कौन्सिलर’ अशी पाटी दिसली. मी काय विचार केला माहीत नाही, परंतु मी थेट त्या खोलीत शिरलो. खोलीच्या अगदी दूरच्या टोकाशी साधारण पस्तीशी-चाळीशीच्या कौन्सिलर मॅडम बसल्या होत्या. मी परवानगी विचारल्यावर त्यांनी मला त्यांच्या जवळ बोलावलं. मी बऱ्यापैकी जवळ गेल्यावर त्यांची नजर आणि माझी नजर एकमेकांवर रोखली गेली आणि त्या क्षणीच मॅडम ताडकन उभ्या राहिल्या. त्यांच्या मनात काहीतरी चलबिचल चालू झाल्याचं मला स्पष्ट जाणवलं. त्या अस्वस्थ झाल्याचं लक्षात येत होतं. त्यांनी त्याही अवस्थेत मला बसायला सांगितलं आणि स्वत: मात्र उभ्याच राहिल्या. काही क्षणात त्या थोड्या भानावर आल्या, आणि त्याही त्यांच्या खुर्चीवर बसत्या झाल्या, कुणीतरी जबरदस्तीने बसवल्यासारख्या.

मी त्यांना माझं नाव आणि मला अकरावी, बारावी आणि आजच आलेले अनुभव सांगितले. त्या काही क्षण काहीच बोलल्या नाहीत. त्या काही विचार करत असाव्यात. नंतर मात्र त्यांनी हळूहळू बोलायला सुरुवात केली.

“रवीs मी जे काही सांगत आहे ते कदाचित; कदाचित काय, नक्कीच तुला विचित्र वाटणार आहे, अविश्वसनीय वाटणार आहे. पण मी काही क्षणांपूर्वीच तो अनुभव घेतला असल्याने, बहुतेक मी जे सांगत आहे, ते आणि तसेच असणार आहे. जरी हा कधीही, कुणीही न ऐकलेला चमत्कार असला तरी..”

मॅडम काही क्षण थांबल्या. मी काहीच बोललो नाही.

“तुझ्या डोळ्यात काहीतरी चुंबकीय शक्तीसारखं काहीतरी आहे. तुझ्या डोळ्यात पाहिलं की समोरची व्यक्ती; विशेषत: ती स्त्री असेल तर ती, तुझ्याकडे खेचली जाते. अगदी, तुझ्या प्रेमात पडते असं म्हटलंस, तरी ते चुकीचं होणार नाही. अगदी खरं आणि प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मगाशी तुझ्या नजरेला नजर मिळाल्यानंतर माझीही अवस्था तशीच झाली होती.”

मी माझ्या कपाळाला हात लावला.
“पण मग यावर उपाय काय?” मी थोडंसं वैतागून विचारलं.

“कधीच न ऐकलेली, कधीच न पाहिलेली अशी ही गोष्ट आहे. त्यामुळे सध्या तरी मला इतकंच करून बघावंसं वाटतं. तू एक डार्क काळ्या काचेचा गॉगल घे. तो अगदी प्रत्येक वेळी डोळ्यावरच ठेव. कुणी काही विचारलं तर ‘माझ्या डोळ्यांना बाहेरचा उजेड सहन होत नाही, म्हणून डॉक्टरांच्या सांगण्यावरून मला हा गॉगल कायम घालावा लागतो,’ असं सांग. तुला हे खूप वेळा आणि खूप लोकांना सांगत राहावं लागणार आहे, पण त्याला काही इलाज नाही. कदाचित तुझ्या समस्येवर यानं मात होऊ शकेल. आत्ता तरी मला इतकंच सुचतंय.”

मॅडम बोलायचं थांबल्या. बोलताना त्या जितकं दुसरीकडे बघून बोलता येईल तितक्या बोलत आहेत, हेही माझ्या लक्षात आलं. मी खुर्चीवर तसाच बसून राहिलेला बघून मॅडम जवळपास ओरडल्याच-

“आता इथे बसू नकोस. पहिलं बाहेर पड, या खोलीच्या नाही, तर कॉलेजच्या. आणि पहिल्यांदा एक गॉगल खरेदी कर, डार्क काळ्या रंगाचा. तो डोळ्यावर घाल आणि मगच कॉलेजमध्ये ये.”

मी उठलो, आणि मॅडमनी सांगितलं तसं केलं. त्या दिवसापासून आजपर्यन्त हा गॉगल माझ्या डोळ्यावर आहे. कायमचा. फक्त घरी असताना मला माझे डोळे मोकळे ठेवता येतात.”

रवी बोलायचं थांबला. रवीच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा की नाही, असा काही क्षण मला प्रश्न पडला. पण तो खोटं बोलत असेल, गंमत करत असेल असंही काही वाटत नव्हतं.

“अरे मग लग्न कसं केलंस? बायकोला काय सांगितलंस या साऱ्याबद्दल?”

“अरे तिला तर लग्नाआधीच सांगावं लागलं. तीही एक गंमतच झाली.”

“आमचा पाहण्याचा कार्यक्रम झाला. दोन्हीकडून एकमेकांना संमती कळवली गेली आणि पल्लवी, माझ्या बायकोच्या घरी वेगळंच महाभारत घडलं. आमच्या पाहण्याच्या कार्यक्रमात पल्लवीची तीन वर्षांनी लहान असलेली बहीण देखील उपस्थित होती. तिनं माझ्याशी लग्न करण्याचा घरी हट्टच धरला. पल्लवी आणि तिच्यात प्रचंड भांडाभांडी झाली. घरच्यांनी धाकटीला खूप समजावलं तेव्हा कुठे ती नाईलाजाने शांत झाली.

पल्लवीनं मला हे सांगितल्यावर मी तिला ही सगळी कहाणी सांगितली. तिचा लगेच विश्वास बसला, कारण तिनं प्रात्यक्षिक आधीच पाहिलं होतं. आता उलट तिचीच मला सक्त ताकीद आहे, ‘गॉगल घातल्याशिवाय घराबाहेर पडायचं नाही.” रवी हसत म्हणाला.

हे सगळं ऐकून मी थक्कच झालो होतो. विषय संपला. जेवण करून आम्ही शाळेबाहेर पडलो. पुण्यातील काही कामे करून रवी दुसऱ्या दिवशी सकाळच्या फ्लाईटने त्याच्या घरी, बंगलोरला जाणार होता. मी त्याला रात्रीच्या जेवणाला माझ्या घरी निमंत्रण दिलं.

संध्याकाळी सातच्या सुमारास तो माझ्या घरी आला. मी माझ्या बायकोला, 'रवीच्या डोळ्याला बाहेरचा कुठलाही उजेड सहन होत नाही, त्यामुळे तो गॉगल घालूनच घरात वावरेल,' अशी कल्पना दिली होती. त्यामुळे तो संध्याकाळच्या वेळी गॉगल घालून घरात आल्यावर तिला विशेष काही वाटलं नाही.

जेवण आटोपलं. आमच्या थोड्या वेळ गप्पा झाल्या. आता तो त्याच्या हॉटेलवर जाण्यासाठी निघणार होता. तोंड धुण्यासाठी त्यानं त्याचा गॉगल काढून हॉलमधील टीपॉयवर ठेवला आणि तो आतील बेसिनपाशी गेला.

मी बाहेर बातम्या बघण्यासाठी टीव्ही लावला. काही क्षण गेले असतील, तोच किचनमधून काहीतरी भांडे पडल्याचा आवाज आला, आणि पुढच्याच क्षणी रवी- तसा वेगानेच- बाहेर आला. “चल निघतो रेs” असं म्हणून टीपॉयवरचा गॉगल डोळ्यावर चढवून तो तडक माझ्या घराबाहेरही पडला.

मला काहीच समजलं नाही. मी आत, किचनमध्ये गेलो. प्रियाचा चेहरा कावराबावरा झाल्याचं साफ लक्षात येत होतं.

आत काय घडलं असावं, याचा अंदाज मला आला. परंतु नक्की काय झालं, हे प्रियाला विचारायचं धाडस माझ्यात नव्हतं...

**

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Lol मस्त! छान रंगवली आहे गोष्ट.
अलीकडेच, मी ज्यांच्या वर्गात अकरावी-बारावीत होते, त्यांच्या दहावीच्या batch चं गेट टुगेदर झालं. अर्थात मला आमंत्रण नव्हतं, पण मी नंतर फोटो बघितले तेव्हा लक्षात आलं की मुलींना ओळखणं त्या मानाने सोपं, पण मुलांना ओळखणं खूप कठीण गेलं. दाढी-मिशांमुळे चेहरे खूप बदलतात, कुणाकुणाला पूर्ण टक्कलच पडलेलं!

धमाल आहे गोष्ट!!मला आधी वाटलं की त्याच्या वेगळ्या डोळ्यांमुळे पैजा लागून मुली प्रपोज करत असतील की काय.

वाह! कमाल कथा!
निळ्या डोळ्याच्या राजबिंड्या तरुणाच्या पत्नीचं नाव ही ह्या कथेतली best गोष्ट आहे

आई ग Lol

मस्त जमली आहे!! एकदम धम्माल ! Lol

मुलींना ओळखणं त्या मानाने सोपं, पण मुलांना ओळखणं खूप कठीण गेलं. >> आमच्या शाळेच्या गेट टुगेदर च्या वेळी आमच्या एक बाई हेच म्हणाल्या. मी त्यांना म्हटलं, 'बरोबर आहे, मुलींना बायको नसते ना Wink '

मस्तच कथा. रवी आमच्या अहोंचे नाव व त्यांचे डोळे ब्राउन घारे होते पण कॉलेजात शाना मारुन असायचे. नंतर काही वर्शात टक्कल पडले हे ही खरेच.

निळ्ञा भोर डोळ्यांची हिप्नॉटिक जादु मी दोनदा अनुभवलेली आहे. एकदा अगदीच किशोर वयात. पुण्यातील जिमखान्यावरील उत्क र्ष बुक स्टो र मध्ये जाय ची व काही खरेदी करायची घरुन परवानगी होती. एकदा तिथे गेल्यावर अगदी गोरे घारे व निळ्या भोर डोळ्यांचे एक तरुणच सेल्समन भेटले त्यांना बघुन मी काय घ्यायचे होते तेच विसरले. व लाजत बाहेर पडले . तसे निळे डोळे परत बघितलेच नाहीत.

दुसरॅ वेळी ठाण्यात एक नवीन केनेल मध्ये गेले ले चेक करायला तिथले डाँ ह्यांचे डोळे फारच निळे भोर आहेत. त्यात त्यांनी मॅचिन्ग निळा बारीक चौकडीचा शर्ट घातलेला होता. म्हणजे तुम्ही सरळ कॉ न्व्हरसेशन होल्ड करु शकत नाही इतके निळे भोर. मला ते केनेल पसत पडले नाही मग बाहेर पडले. आटोत बसल्यावर विचार केला. जी एक कुलकर्णी ह्यांची निळ्या डोळ्यांची आकृती अशी काहीशी एक रुपक कथा आ हे ही आकृती एका उंच टॉवर मध्ये वर राहात असते. तिचे काही चाहते खाली वाळवंटात दर्शनाची वाट बघत बघत खंगून मरुन जातात व
मग कथेच्या शेवटी ती हळू हळू खाली येते. असे वर्णन आहे.

प्रकृतीची जादु. गॉड ब्लेस दीज मेन.

काही अतिधाडसी मुली तर थेट लग्नाचंच बोलू लागल्या. मला काहीच समजेना. >>>>>अकरावीला 15/16 च्या मुलींनी डायरेक्ट लग्नाची बोलणी करावी तेही १५/१६ वर्षाच्या मदनाचा निळ्या डोळ्याचा पुतळा असणाऱ्या मुलाला ???

अकरावीला 15/16 च्या मुलींनी डायरेक्ट लग्नाची बोलणी करावी तेही १५/१६ वर्षाच्या मदनाचा निळ्या डोळ्याचा पुतळा असणाऱ्या मुलाला ??? >>>>> कारण ..........
स्वयं हनी सिंग म्हणून गेला आहे - blue eyes hypnotize कर दी मैनु, i swear छोटी ड्रेस में बॉम्ब लग दीं मैनु