हिंदोळे

Submitted by बिपिनसांगळे on 5 June, 2024 - 13:02

हिंदोळे

आज तिचं लग्न होतं .
तिचं - जिच्याशी त्याला लग्न करायचं होतं .
होतं ! कारण सकाळीच तिचं लग्न लागलं होतं आणि आता तर संध्याकाळ झाली होती . दिवसभर त्याने कसातरी तळमळत काढला होता . तो बाहेर पडला. हवा अजूनही उष्ण श्वास सोडत होती . त्याच्या मनातही उष्ण खळबळ.
तो उगा इकडे- तिकडे भटकत राहिला . दुकानं , माणसं, गर्दी पहात . त्याच्या डोक्यात मुळात काही घुसतच नव्हतं .
तो चालत एका बारपाशी आला . जुनाट ,कळकट बार .रया गेलेला . आधी त्याच्या ते लक्षातही आलं नाही . इतकं त्याचं डोकं गच्च झालेलं होतं . त्याच्या नकळत तो आत शिरलादेखील .
एक मात्र होतं - आत गार्डन होतं . निवांत बसण्याची सोय होती. तो तिथे बसला . शांत . शांत होण्यासाठी .
त्याने ऑर्डर दिली . पहिला घोट त्याने घेतला अन त्याचं लक्ष बाहेर गेलं . समोर एक बिल्डिंग होती . तिच्यावर मोठ्या लोंबत्या लाईटच्या माळा सोडलेल्या होत्या. त्या वाऱ्यावर हलत होत्या . पुढे- मागे . त्याच्या मनातही तिच्या आठवणी हिंदोळे घेऊ लागल्या .
त्या लाईटच्या माळा म्हणजे - कोणाचं लग्न ? ... हा योगायोग असला तरी वाईटच होता .
त्याने त्याचं दुःख दारूत बुडवायची सुरुवात केली .
--------
त्याचा फोन वाजला . तिचा होता. अनेक वर्षांनी आजच .
‘ कसा आहेस ? ’ तिचा आवाज . त्याचा हात थरथरला .
“ मी… मी… छान आहे. तू कशी आहेस ?’ त्याने विचारलं .
मग ती बोलत राहिली .नोकरी, संसार ,सारी धावपळ .तो ऐकत होता .
ती म्हणाली ,’आज माझा लग्नाचा वाढदिवस आहे.’
‘ओह ! … हॅपी वेडिंग ऍनिव्हर्सरी ! मग आज काय विशेष ?’
‘काही नाही रे. किती वर्षं झाली आता लग्नाला .पण आज तुझी आठवण आली .माझ्या लग्नाच्या दिवशी मी तुला फोन करीन म्हणलं होतं .आणि तो राहिला ; पण माझ्या लक्षात होतं .’ पुढे ती बोलत राहिली .
मग त्यांचं संभाषण थांबलं. तो निघाला .त्याच जुनाट बारकडे. तो बार अजुनी तसाच होता . तो त्यासमोर उभा राहिला. त्याच्या डोळ्यांत पाणी आलं. त्याने ते पुसलं .
मग तो स्वतःशीच हसला .
तो आत गेला नाही . तो उलट फिरला आणि घराच्या दिशेने निघाला.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

तिच्याशी बोलून त्याचं दुःख हलकं झालं असावं.. आणि प्रेमभंगाचं दुःख बुडवण्यासाठी आता त्याला दारूची गरज नसावी.. असा आहे का कथेचा अर्थ..??

आय गेस, तिच्याशी बोलल्यावर त्याच्या लक्षात आले असावे की जे काही एकतर्फी होते तिथून तो कधीच मुव ऑन झालाय. त्या जुन्या बार जवळ गेल्यावर तेव्हाचा वेडेपणा आठवून डोळ्यात पणी आणि घराच्या ओढीने स्वतःशीच हसणे? की लग्न वाढदिवसाला संसारात गुरफटलेल्या तिला त्याची आठवण आली म्हणून एक वेगळेच समाधान?

अवांतर - एकतर्फी/ क्लोझर न मिळालेले प्रेम , त्याचे दु:ख पुढे बराच काळ संभाळणे हे मनाला झेपतच नाही.

की लग्न वाढदिवसाला संसारात गुरफटलेल्या तिला त्याची आठवण आली म्हणून एक वेगळेच समाधान? >>> असे काहीतरी असावे. किंवा लग्नाच्या दिवशी याला फोन करणार होती म्हणजे तिच्याही मनात काहीतरी नक्की होते. अगदीच सगळे एकतर्फी नव्हते याचे समाधान.

चांगली आहे कथा. ओपन एन्डेड असली तरी.

कथा वाचली.चिमुकली आहे, पण आवडली.इथले प्रतिसाद पण आवडले.परत वाचल्यावर वाटलं की 'अगदी लग्न नाही झालं आपलं हिच्याशी, पण हिला लग्नाच्या दिवशी माझी अनुपस्थिती जाणवली असेल, हिने आठवण काढून फोन/मेसेज करायला हरकत नव्हती, हे क्लोजर न मिळाल्याची रुखरुख. आणि त्यातून दरवर्षी बार.
तिने जेव्हा अनेक वर्षांनी फोन केला, मोकळं बोलली, फोन करण्याचं डोक्यात होतं पण राहून गेलं हे कबूल केलं तेव्हा 'आहे, हिच्याही मनात एक नाजूक कोपरा होता, इतकंही पुरेसं आहे' या क्लोजर ने शांत वाटलं.

वाचक मंडळी खूप आभार .

काही वाचक तर आवर्जून प्रतिसाद देतात . ऋणी आहे त्यांचा .