*** चिकवावर झालेल्या लोकाग्रहास्तव खास वेगळा धागा काढून तिकडच्या दोन्ही पोस्टी इथे डकवत आहे. ***
यारा दिलदारा एकदाचा पाहायला सुरूवात केली. या पिक्चरमधल्या कुठल्याही एका घटनेचा कुठल्याही दुसर्या घटनेशी काहीही संबंध नाही. तसा तो आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.
सुरूवातीलाच एका दुकानदाराकडे काही रँडम लोकं येऊन नये साल का चंदा मागतात. तेवढ्यात दुसर्या दिशेने अजून काही रँडम लोकं येतात. मग कळतं की या दोन टोळ्या आहेत. पहिली टोळी शक्ती कपूर कडे जाते आणि तो डायरेक्ट हातगाडीवर उडी मारून सुपरमॅन स्टाईल जायला लागतो. समोरून दुसर्या टोळीचा हेड हेडला अरब स्टाईल काळा रूमाल बांधून येतो आणि ढॅण! एकदम गाणं सुरू होतं. कट!
परत तोच दुकानदार, त्याच टोळ्या, तोच वाद. मग कुठूनसे अमजद खान आणि कादर खान येतात. ते म्हणे पोलिस असतात. मग दोन्ही टोळ्या अंताक्षरी खेळल्यागत गाणी म्हणायला लागतात. वैतागून दोन्ही पोलिस त्यांना हाकत हाकत नेतात. कट!
मग एक रोहिणी हट्टंगडी असते. झी च्या मालिकांसारखे हिच्याकडे काहीतरी पेपर्स सही करायला आणतात. मग कळतं की अरे यावर नवर्याची पण सही लागणारे. नवरा जाफ्री वॉक करून येतायेता कोणाची तरी बिघडलेली गाडी दुरूस्त करून देतो आणि उशीरा परततो. मग हाताला ग्रीस, बायकोने टाकलेला तुक आणि असिफ शेखचे आईला दिलेले शहाणपणाचे धडे यातून कळतं की हट्टंगडी नसती तर जाफ्रीबाबा अतिसामान्य आणि मेकॅनिक राहिले असते. कट!
एक साधारण अपार्ट्मेंट कॉम्प्लेक्सच्या पार्काच्या साइजची बाग असते. तिथे आगाऊ असिफ फिरत फिरत जातो. तिथे एक मुलगी केस उडवता उडवता पिंजर्यातले पक्षी उडवून लावत असते. नजरानजर होते. कट!
एक बार असतो. त्यात बेर्डे असतो. मगाशी पाहिलेली केसउडवी वेट्रेस म्हणून काम करत असते. सगळ्या टेबलांवरची सगळी लोकं तिच्यावर लाईन मारत असतात. तिचा बाप डेंजर असतो म्हणे. मग दारूडा अशोक सराफ येतो. तोच तिचा बाप. मग एक सो कॉल्ड फनी सीन होतो ज्याच्या शेवटास आपल्याला कळतं की शक्ती कपूरला तिच्याशी लग्न करायचं आहे. कट!
परत तीच अकॉपा साइजची बाग येते. परत दोघे समोर येतात. नजरानजर. कट!
केसउडवी मैत्रीणीला विचारते ये प्यार क्या होता है? तर म्हणे इंतजार असेल तर तेच प्यार. मग केसउडवी आगाऊ आसिफला इंतजार करायला लावते. तो संध्याकाळभर इंतजार करतो. तेवढा वेळ ही बया लपून त्याचा इंतजार पहात राहते. मग रात्र होते, पाऊसपण येतो म्हणे. मग आसिफ कारमधे बसून इंतजार मोड ऑन करतो. ती एकटीच पावसात नाचते. कट!
हट्टंगडी थेट डीएस्पी ला कॉल करून बेटा रातभर घर आयाच नही म्हणून तक्रार करते. बेट्याच्या गाडीवर केसउडवी 'मी आले होते' अश्या अर्थाचं काय काय लिहून गेलेली असते. हे लिहावं लागणार हे माहिती असल्याने ती पार्कमधे जातानाच पिवळा, केशरी, गुलाबी असे क्रेयॉन घेऊन गेलेली असते. कट!
कादर आणि अमजद चौकीत फालतूपणा करत असतानाच त्यांना आसिफला शोधायची डूटी लागते. मग ते त्याला शोधून त्याच्या हातांना दोरी बांधून त्याला चौकीत न्यायला लागतात. मग समोरून एक हिजड्यांचा ग्रूप येतो. कट!
एक डीएस्पी असतो. तो विजू खोटे असतो. कादर आणि अमजद त्याच्या समोर उभे राहतात. तो विचारतो हट्टंगडी पुत्र कुठे आहे? ते दोघे बाजूला होतात आणि त्यांच्या मागून तो मगाचचा ग्रूप येतो. त्यात असिफही निळा-गुलाबी घागरा चोली घालून असतो. मग हे सगळे एक पॅरडी गाणं म्हणतात. कट!
आजच्यापुरता माझा पेशन्स संपलाय. बाकी लिहीतेच सावकाश.
यारा दिलदारा पुढे चालू. कालच्या टीपेत भर म्हणजे पिक्चरमधे नुसता घटनांचा संबंधच हरवला नाहीये तर एकाच सीन मधल्या घडणार्या गोष्टींचा पण आपसात संबंध नाहीये.
पॅरडी गाण्यातून अमजदचे आडनाव देदे आणि कादरचं आडनाव लेले आहे यापलिकडे काहीही हाती न लागल्याने पिक्चर पुढे सरकतो. हट्टंगडी काकू पोराला फैलावर घ्यायचा निष्फळ प्रयत्न करताना दिसतात. आगाऊ आसिफ उर्फ राजेश तो कसा प्रेमात पडलाय पण त्याला तिच्याबद्दल काहीच माहिती नाही हे सांगतोय. इथे कलात्मकता पहा. आसिफच्या प्रत्येक वाक्यानंतर केसउडवी उर्फ रजनी तिच्या मैत्रिणीला हे असलंच काहीतरी सांगतेय. कट् टू अकॉपा साइजची बाग. आज इथे ठायी ठायी कपल्स दिसताहेत. राजेश आणि रजनी दोन ध्रुवांवर दोघे आपण स्टाईलने उभे राहून एक्मेकांशी प्यार का इजहार करतायत आणि लिटरली वीत वीत मोजत एकमेकांच्या जवळ येतायत. मेरे बिन रहा नही गया ना असं त्याचं वाक्य ऐकून मनातल्या मनात मला बरं वाटलं की आता बिन तेरे सनम लागणार. पण नाही! इथे तुमही हमारी हो मंझिल माय लव्ह चालू होतं.
गाणं ऐकायला सुंदर आहे पण बघायला... काऊबॉय पोषाखातला राजेश, घोडे, हॅमॉक, आग, त्यावर टांगलेली किटली असा निरर्थक जामानिमा आहे. रजनी कपात किटलीतला द्राव ओतते. तर इकडे राजेश फावड्याने गवताचे भारे तिच्या अंगावर टाकतो. हिरवीण आहे का घोडी ? त्यातलं बरंच वैरण तिच्या कपात पडतं वगैरे वगैरे. गाणं संपताना शेवटच्या कडव्याला सर्वत्र न्यू इयरला करतात तसे डेकोरेशन दिसतं. आत्तापर्यंतच्या प्रसंगांत ही एकच कंटिन्यूइटी! आठवा - सुरूवातीला ते गँगवाले न्यू इयरचा चंदा गोळा करत असतात नाही का?
रात्रीची वेळ असते. डोक्याला अरब स्टाईल काळा रूमाल वाल्याची (याचं नाव जॉनी आहे) गँग बहुतांश हिंदी पिक्चरांमधे असलेल्या मंदिराच्या पायर्या उतरते आहे आणि 'कोणीतरी अकेली आहे चल पळवूया' अश्या गप्पा मारते आहे. तर खाली एक लाल रंगाची गाडी आहे. ती चोरायचा त्यांचा प्लॅन नक्की होतो. तेवढ्यात गाडीच्या पलिकडून शक्ती कपूर (याचं नाव रामय्या. घराला आणि गोठ्याला पत्रे लावायचं सोडून हे काय करतोय हा?) आणि गँग उगवतात आणि आम्ही गाडीवर रूमाल टाकलय म्हणतात. मग असं ठरतं की कबड्डी खेळून गाडी कोणाची होणार हे ठरवायचं. परदेस काढायच्या आधी घईने या पिक्चरचा अभ्यास केला होता हे मला माहिती नव्हतं. कबड्डी संपल्यावर मारामारी सुरू होणार इतक्यात तिथे लेले-देदे येतात. ती गाडी म्हणे लेलेचीच असते. आणि तो गाडीचं दार उघडतो तेव्हा आतून गुड्डी मारूती निघते! ही देदे ची बहिण. मागच्या सीटवरून लेलेचा भाऊ पण गाडी बाहेर निघतो. यांच म्हणे प्रेम असतं एकमेकांवर! आणि त्या दोन टोळ्या कबड्डी खेळत होत्या तुमची गाडी पळवण्यासाठी तेव्हा काय पॉपकॉर्न खात मॅच बघत होते की काय हे? तर ते असो. यांचं लग्न इथे पक्कं होतं.
कालच्या अपडेट मधे बेर्डे बद्दल डीटेल्ड लिहीलं नव्हतं. पण तो परत परत दिसत राहणारे हा धोका आज माझ्या लक्षात आला. याला रजनीशी लग्न करायचं आहे. आधीचा जो फनी सीन होता तो याच संदर्भात होता. आता बेर्डे एक रिमोट वाली कार चालवतोय. कार पकडायला अशोक सराफ धावतोय. मग तुम्हारे बेटी की शादी मुझसे कर दो वरना मै तुमपे गुंड सोडूंगा वगैरे होतं. गुंड काका तयारच असतात तिथे. ते अशोकचा गळा धरून बदडणार इतक्यात तिथे येतो रामय्या वस्तावय्या. तो अशोकला वाचवतो आणि स्वतः तीच टेप लावतो - रजनीशी लग्न करून दे अशी. आता रजनी येते आणि म्हणते मला इज्जत असलेल्या माणसाशी लग्न करायचं आहे. तुझी है का भौ इज्जत? रामय्याला समजतं की हिला अमिरोंवाली इज्जत पाहीजे. तो तात्काळ मारूतीरायाच्या चरणी शरण जातो की मला इज्जत मिळवण्यासाठी आशिर्वाद दे आणि बॅग घेऊन चल दियेऽऽऽऽ (कुठे? कोण जाणे! त्याला 'इथे किलोवर इज्जत मिळेल' अशी पाटी असलेलं दुकान माहिती असावं)
हिरवीणीला ऑलरेडी इज्जत असलेला राजेश माहिती असल्याने ती त्याच्यासोबत पतंग उडवायला जाते. मागून careless whisper चं म्युझिक. खूप वारा आहे. गोदीच्या पदरासारखा तिचा फ्रॉक उडतोय आणि गुडघ्याच्या वर जातोय थोडाथोडा. इथे जरा कन्फ्युजन आहे. मधेच राजेश तिचा फ्रॉक उडू नये म्हणून धरतो. निदान सुरूवातीला आपल्याला तसं वाटतं. मग असं २-३ वेळा झाल्यावर तो फ्रॉक धरतोय की अजून वर करतोय ते समजेनासं होतं. ते त्यांनाही कळलं नसल्याने ते एकदम जमिनीवर लोळण घेतात. पुन्हा फ्रॉकचं टोक धरण्याचा प्रयत्न. आता मात्र रजनी विव्हळते - नही राजेश. तिला नेमकं काय झालं हे राजेशलाही कळत नाही आणि आपल्यालाही. तर म्हणे मै अब तुमसे और दूर नही रह सकती. त्यावर तो लग्नाचं विचारून टाकतो. उत्तरादाखल हाँ असं अजून विव्हळणं ऐकू येतं. अरे हाँ आहे तर मग विव्हळते कशाला?
पुढचा भाग ब्रेक के बाद!
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अब आगे -
राजेश घरी येतो आणि आई हट्टंगडीच्या खोलीत दार न वाजवता घुसतो. त्यावर ती चिडते तर हा म्हणे मी पैदा झालो तेव्हा पण तुला न विचारताच तुझ्या गोदमें आलो होतो. या आगाऊपणावर राजेशच्या चांगल्या कानफाटात वाजवाव्यात असं तिला वाटलं असावं हे स्पष्ट दिसतं. मग तो कॅज्युअली तिला सांगतो की मला लग्न करायचं आहे. आणि ती ही प्रेमाने विचारते की त्या नावगाव माहिती नसलेल्या मुलीशी का? कर की मग! इथे राजेश इतकाच मलाही धक्का बसला. पण हट्टंगडीचे जुने ट्रॅक रेकॉर्ड पाहता आणि अजून पिक्चर बराच शिल्लक आहे हे बघून ती काहीतरी गेम करणार याची खात्री पटली. राजेश केसउडवी बद्दल सगळं वाईट्साईट सांगतो, ती बारमधे काम करते वगैरे. तर माता हट्टंगडी एकदम प्रेमात तिला भेटायला तयार होते.
केसउडवी केस बांधून इकडे बापाला उमाळत सांगते आज हव्वी तेवढी दारू पी पण उद्या दारू पिऊ नको बाबा, कल माझी मंगनी आहे. आँ? हे कधी ठरलं? फक्त भेटण्याचं ठरलं होतं ना? बाप विचारतो कोण आहे तो? म्हणजे? बापाला माहिती पण नाही मुलगा कोण आहे आणि मुलगी डायरेक्ट मंगनीचं सांगतेय? पण बाबा अशोक उगाच इगो मधे आणत नाही आणि हातातली बाटली फेकून देतो.
तर पार्टी सुरू होते. राजेशचा मामा बाबा अशोकला काहीतरी ड्रिंक घे म्हणून गळ घालत असतो. त्या मामासोबत एक भुवया आणि खांदे उडवणारे काका आहेत. ते उगाचच हसतात. मग आई हट्टंगडी आग्रह करते की काहीतरी प्यायलाच हवं. हे सगळं नाट्य चालू असताना आणि समस्त पब्लिक पार्टी करत असताना बॅकग्राऊंडला मात्र राजेश आणि केसउडवी दोघेच निरर्थक नृत्यप्रकार करत असतात. अगदी फ्लेमेंको डान्स सुद्धा सोडला नाहीये यांनी. मामा ज्यूसमधे दारू मिसळून बाबा अशोकला देतो. काका पुन्हा खांदे उडवतात. पहा! तरी मला वाटलंच होतं की हट्टंगडी सुधारली कशी? मग काय जिसका डर था वही हुआ. ज्यूसच्या प्रत्येक ग्लाससोबत बाबाला दारू चढत जाते आणि तो मला 'अजून दारू द्या , मी काय वाट्टेल ते करतो' च्या लेव्हलला जातो. अशोक सराफचा अभिनय इथे अगदी पाहण्यासारखा आहे पण पिक्चरमधे गालबोटंच इतकी आहेत की गाल लक्षातच येत नाही. आई हट्टंगडी आणि मामा मिळून बाबा अशोकचा कुत्रा करतात आणि तेवढ्यात रजनीची मैत्रीण हा प्रकार तिला सांगते. मग हॉलमधे रजनीसह अश्रू आणि ड्वायलाकचा महापूर येतो की मला नको ही असली श्रीमंती. ही मी चालले. हट्टंगडी ठेवणीतलं छद्मी वगैरे हसते. तेवढ्यात राजेश पण आत येतो. त्याला 'हम रेल की पटरीयोंकी तरह है' वगैरे पकवून झाल्यावर राजेशला रेल की पटरीवर तिला ढकलून द्यावसं वाटलं असेल का? तुम्ही लोकं जेवर, उंची कपडे देता आणि इज्जत (हाच तो क्लू!) उतारता असं आई हट्टंगडीला ऐकवून रजनी बाहेर पडते. राजेश दारू देण्याबद्दल मामाच्या कानफाटात मारतो.
केसउडवी पुन्हा एकदा केस उडवत समुद्रकिनारी उभी असते. दुरून रामय्या धावत धावत येतो. त्याने एकाच्या तीन बॅगा केलेल्या असतात. त्या दाखवत तो म्हणतो बघ मी तुझ्यासाठी काय आणलं. ३ बॅगा भरून इज्जत! मुंबई, बँकॉक, सिंगापूर, हाँगकाँग, दुबई, शारजा सगळीकडे बिझनेस करून (मधल्या सगळ्या घटनांना नेमके किती दिवस लागलेत?) त्याने ही इज्जत गोळा केलेली आहे. आणि मग त्यातली एक बॅग उघडून त्यातली सगळी इज्जत तो वाळूवर ओतून देतो. त्यातून रॅंडमली भरलेले रँडम कपडे निघतात. रजनी विचारते माझ्याशी लग्न करशील का? रामय्या आनंदाने थुई थुई होतो आणि प्रचंड जीव ओतून होकाराचं स्पीच सुरू करतो. त्याच वेळी रजनीच्या मागून एक बकरी सावकाश सावकाश चालत येते आणि पूर्ण स्पीचभर ती त्या दोघांच्या मागे आपलं फूटेज खात चालत राहते. रामय्याला कसा बकरा बनवला याचा मेटाफोर की काय हा?
रामय्या आणि रजनीच्या मंगनीत रामय्या नितीन मुकेशच्या आवाजात गायला लागतो - ये तो होनाही था, कोई चाहे ना चाहे. म्हणजे? अरे भाई कहना क्या चाहते हो? पहिल्या ओळीलाच रजनीला गरगरायला लागतं. ते गाण्यामुळे होत असेल असं मला वाटेपर्यंत तिला पुन्हा चक्कर यायला लागते. मला आपला उगाच तो विव्हळण्याचा सीन आठवून गेला. पण निदान या पॉईंटला तरी असं काही कनेक्शन नाहीये. गाणं निर्विघ्नपणे पार पडतं
आत्तापर्यंतचे सीन्स पाहून आता सिनेमा सुसंगत होतोय की काय अशी मला शंका यायला लागली होती. पण...
राजेंद्रनाथ आणि मोहन चोटी एक पोलिस व्हॅन घेऊन जात असतात आणि लेले देदे जोडीला शिव्या देत असतात कारण त्याच व्हॅनमधे मागे लेले देदे आणि ५-६ (बहुधा) धंदेवाल्या बाया बसलेल्या असतात. अचानक बाया सिनेमातली न - सिडक्टिव्ह गाणी म्हणायला आणि लेले-देदे ला झोंबायला लागतात. या व्हॅनमधून खूप महत्त्वाची माणसं जात असल्यासारखा विजू खोटे (लेले-देदे चा बॉस) कुठल्याश्या कोपर्यात उभा राहून हे सगळं हेडफोन्स वर ऐकत असतो. राजेंद्रनाथ आणि मोहन चोटी त्या बायांबरोबर असल्याची स्वप्नं पहात गाडी भरधाव सोडतात. विजू खोटे त्यांच्या मागे जीप घेऊन लागतो. काहीही चाललेलं आहे! व्हॅनला आतून सर्वत्र काळं प्लॅस्टिक लावलेलं दिसतं आणि डान्स मूव्हज प्रमाणे व्हॅनचा साइज वाढत जातो. भानामती झाल्यागत मधूनच काळं प्लॅस्टिक गायब होतं आणि खिडकीची काच उघडून बायका बाहेर रस्त्यावरच्या लोकांना इशारे करतात. या लोकांमधे उगाच बाबागाडीत बसून बाटलीतून दूध पित जाणारा एक बुटका माणूस आहे. तो चेकाळून बाबागाडीतून उतरून नाचायला लागतो. तेव्हा ती गाडी ढकलणारी त्याची त्याच उंचीची बायको त्याला बडवते. जादू झाल्यासारखं काळं प्लॅस्टिक रिटर्न्स! गाडीतला नाच कंटिन्यूड. या सगळ्यात मोहन चोटी गाडीतून उडून गाईंच्या घोळक्यात पडतो आणि बरंच पुढे जाऊन राजेंद्रनाथ गाडी थांबवतो. या सगळ्या सीक्वेन्समधे गहन अर्थ दडलेला असून तो मलाच समजत नाहीये या विचाराने मला नैराश्य आलं.
आता मंगनी झाल्यामुळे केस बांधून रजनी पुन्हा एकदा समुद्रकिनारी बसलेली असते. हातावरची मेंदी पहात सुस्कारा सोडून ती उगाच त्यावर वाळूबिळू टाकते. तेवढ्यात येतो राजेश आणि डोकावून पाहतो. म्हणतो मी बी गरीब व्हनाऽऽऽर! आता येतोच या बस्तीमधे रहायला. ती म्हणते अब बहोत देर हो चुकी है आणि मंगनी पण हो चुकी है. राजेश म्हणतो थांब बघतोच हा रामय्या कोण आहे? आणि हाका मारत गल्ल्यांमधून फिरायला लागतो. धाडकन खोलीचं दार उघडून डेनिम शर्ट, कमरेला गमछा, धोतर, डोक्यावर कॅप आणि गळ्यात मोठ्ठं ऑक्सिडाईज्ड पेंडंट घातलेला स्टाइलिश रामय्या इंग्लिश बोलत बाहेर येतो. मग मारामारी. राजेश बेशुद्ध पडतो. रामय्या त्याच्या डोक्यात दगड घालणार इतक्यात रजनी म्हणते, भौ तू फाशी गेलास तर माझं कसं व्हायचं? म्हणून याला सोड! रामय्याला हे पटतं आणि तो दगड फेकून तिथून निघून जातो. बाबा अशोक म्हणतो, पोरी त्या राजेशला पाणी तरी दे. तर ती तो मगाचचा दगड दिलपर ठेवायचं म्हणते आणि पाणीबिणी देत नाही. नाईलाजाने राजेश स्वतःच शुद्धीत येतो आणि विहीरीपाशी ठेवलेली पाण्याची बादली आईस बकेट चॅलेंजच्या उत्साहात स्वतःच्या डोक्यावर उपडी करतो ( आपण कष्टाने भरलेली बादली या मेल्याने ओतून दिली याबद्दल तिथे उभ्या असलेल्या काकू त्याला बदडतात हा सीन बहुतेक कापला असणार ) मग पुन्हा रामय्याला चॅलेंज. तर तो म्हणतो जा बाबा घरी जाऊन हळद-दूध पी. तर राजेश मारामारी सुरू करतो. तेवढ्यात पोलिसांना घेऊन मामा येतो आणि रामय्याला अटक करायला सांगतो. तर राजेश म्हणतो हा माझा मित्र आहे आणि मला बॉक्सिंग शिकवतोय. एकदम गळ्यात गळेच! रामय्या म्हणे राजेशची टायसन सोबत मॅच आहे त्यासाठी त्याची प्रॅक्टिस करवतो आहे. मग दोस्तीखात्यात दोघे एकमेकांना गुद्दे मारुन घेतात. पोलिस त्रासलेला चेहरा करून पाहत राहतात. राजेश 'मी पुन्हा येईन' असं सांगून निघून जातो.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
यापुढचा सीन कुठला असेल वॉज अ नो ब्रेनर. बेर्डे आणि अशोक सराफचा. या अश्या पिक्चरमधे अजून कॉमिक रिलिफ असायची खरंच गरज होती का? तर सीन असा आहे - बेर्डे भूक हडताल करतो की माझं रजनीसोबत लग्न लावून द्या. अशोक सराफ त्याच्यापुढे खाण्याच्या थाळ्या आणि बीअर आणून ठेवतो आणि रजनीची कसम देऊन त्याला खायला लावतो. वर बिल न देता पळून जातो वगैरे. हा सीन पाहताना क्षणभर मराठी पिक्चर चालू असल्यागत वाटलं. सीन त्याच स्टाइलचा आहे. उदाहरणार्थ हे संवाद पहा -
बेर्डे: इन्सान भूक हडताल कब करता है
बघ्या १: जब उसका पेट भरा होता है
बघ्या २: जब वो पतला होना चाहता है
तर ते असो. आत्तापर्यंत हाच एक सीन जरा बरा वाटलाय बाकी सगळे सीन ऑबसीन आहेत.
मामाला राजेशच्या पपलू असण्याची इतकी खात्री आहे की तो जॉनी आणि कंपनीला रामय्याची बस्ती खाली करण्याची सुपारी देतो आणि वर म्हणतो की हे काही माझ्या भाच्याला जमण्यातलं काम नाही. काय विश्वास काय विश्वास! जॉनीच्या पथ्यावरच पडत असावं हे. तो लगेच जातो बर्याचश्या रंगीत बाटल्या फोडायला. बस्ती मधे बहुतेक फक्त एकच घर असतं कारण तिथेच सगळी फोडाफोड होते आणि माणसं उगाच इकडून तिकडे पळताना दिसतात. बस्तीत फक्त रामय्याची लोकंच राहात असल्याने ती जॉनीला लगेच ओळखतात.
इकडे राजेशची उर्दूत मलमपट्टी चालू आहे. ती करताना जाफ्री इतके शेरोशायरी करतो की मिनीटाभरात तो 'हुजूर इस कदर' वगैरे म्हणायला लागेल असं वाटलं. हा राजेश तर गरीब व्हायला गेला होता ना? परत माहेरी कसा गेला? तेवढ्यात छह म्हणजे छद्मी हट्टंगडी येते आणि म्हणते बघ त्यांनी तुला मारलं तर त्यांच्या मोहल्ले वर हल्ले करवून मी तुझा बदला घेतला. राजेशभौ म्हणतात तुमने पीछेसे वार करके मला कलंक लावलास. आता कलंक मतीचा झाडायला मी तिकडे जातो. जाफ्रीबाबा सांगा मी जायला पाहिजे की नाही? तर बाबा बोलेना! छह म्हणते हे काही 'प्यार करनेवाले' नाहीत ( कारण सिर्फ प्यार करनेवाले जानते है की आन बान शान क्या होती है) तर ते काही बोलणार नाहीत. बाबा जाफ्रीला उमाळा येतो आणि ते राजेश सोबत घर सोडायचं म्हणतात ( इथे बहुधा जाफ्रीच्या अनुनासिक स्वराला ऐकून मेंडके को भी जुकाम हो गया? असं छह विचारते ) मग जाफ्रीचे ब्याहता नारी की शोभा, असली पहचान वगैरे माफक ताशेरे ओढून झाल्यावर छह म्हणते तुम्ही कंगाल आहात आणि हे अंगात घातलेले कपडे पण मी दिलेले आहेत. तर म्हणे आम्ही हे इथेच सोडून जातो. बापरे! पुढचा सीन पहायला मी उत्सुक होते तर कशाचं काय! राजेश तेच कपडे घालून घराबाहेर पडलेला असतो. नाही म्हणायला जाफ्री जंपसूट मधे असतो. दोघे जाफ्रीच्या गॅरेजचं शटर उघडतात ( इथे 'हमारे पापा और हम' गाण्याच्या चार ओळी गद्यात म्हटल्या आहेत. गाणं कापलंय मात्र. )
रामय्या आणि गँग जॉनीच्या भावाला - रॉकीला - पकडून आणून त्याचं तोंड काळं करायचे मनसुबे आखत असते. तेवढ्यात येतो राजेश! म्हणतो हल्ला माझ्या आईनेच करवलाय तर मला प्रायश्चित्त करूद्या. मला तुमच्यात घ्या, मी आणतो त्याला. इतक्यावरून रामय्याला समजतं की हा काही टोटल अमीर नाहीये, यात गरीबाचा खून पण दिसतोय. रामय्या आहे का 23 & me?
जॉनी आणि कंपनी रस्त्यात नाच करत असते. नाच संपल्यावर बंधुप्रेम, गर्लफ्रेंड प्रेम वगैरे प्रदर्शन झाल्यावर रॉकी त्याच्या छावीला घेऊन एका व्हॅन मधे जातो. ही तीच काळं प्लॅस्टिक लावलेली व्हॅन आहे. पोलिसांनी काय रेंटवर वगैरे दिली असते की काय? राजेश बहुतेक टिपण लावून बसलेला असतो, तो या रॉकीला पकडतो. काय टायमिंग आहे! त्याच्या गळ्याला चाकू लावून जॉनी आणि कंपनीला म्हणतो आता तुम्ही एकमेकांना बुकला. बुकलिंग चालू असताना तो रॉकीला घेऊन जातो आणि रामय्या आणि गँगच्या हवाली करतो. मग ते त्याचं तोंड काळं वगैरे करतात रीतसर.
पुन्हा एकदा मला भीती वाटली की पिक्चर सुसंगत व्हायला लागलाय. पण the movie never fails you!
रामय्या स्मगलर आहे अशी कंप्लेंट बेर्डे पोलिसात करतो. मग बस्तीमें कोण येतं? बरोब्बर - लेले आणि देदे! रामय्याकडून त्याच्या उरलेल्या दोन बॅगांमधली इज्जत ते जप्त करतात, अगदी त्याच्या अंगातल्या कपड्यांसहित (शॉर्ट्स सोडल्यात रामय्याच्या अंगावर, घाबरू नका! ). इज्जतवाल्या सामानात एक दुर्बीण, एक कॅमेरा, तीन दारूच्या बाटल्यांची रिकामी खोकी (रिकामीच! कारण नंतर ती खाली पडतात तेव्हा अगदी अलगद पडतात), २ ओव्हरसाईज्ड गॉगल वगैरे. हे सगळं तुम्ही ढापलंत तर मी बिझनेस कशाचा करणार आणि मग माझं लग्न कसं होणार असं रडगाणं रामय्या गातो. मग हे पण दु:खी होतात आणि सगळं परत करतात.
बाबा जाफ्री आणि राजेश स्वैपाक करत असतात. तेवढ्यात खांदेउडवे काका येतात आणि राजेशला म्हणतात की तू घरी नाही आलास तर आई हट्टू तुला डिसइनहेरिट कर देगी. इथे जाफ्रीची जी एक्स्प्रेशन्स आहेत ती सांगायला माझे शब्द थिटे पडतायत. मग खांदेउडव्या म्हणतो की बाबा जाफ्री, तुमच्यासाठी तलाकचे पेपर पाठवलेत. राजेश म्हणतो करून टाक साइन - हाय काय नाय काय! अरे, याचं काय जातंय? पण जाफ्री करतो साइन. इकडे आई हट्टूला बाबा जाफ्रीची साइन बघून धक्का बसतो. उसकी ये हिंमत? मामा म्हणतो ही हिंमत आली गॅरेजमुळे (त्याच्या नावावर फक्त गॅरेज असतं म्हणे, मग ते मांडणी वगैरे असलेलं घर कुठून आलं? लब्बाड!) हट्टू म्हणते जॉनी को बुलाव. आख्ख्या मुंबईत फक्त जॉनीच काय तो आहे असं दिसतंय. रामय्या की तो कोई व्हॅल्यू ही नही है. हट्टू घालते सुपारीत अट की गॅरेज उध्वस्त कर पण मेहरा अँड सनको कुछ नही होना चाहिये. पण तिथे जॉनीला दिसतो राजेशचा शाहरूख पोजवाला फोटो आणि...
राजेश रामय्याच्या गॅगला गॅरेजमधे काम करायचं आमंत्रण देतो. पण गॅंग म्हणते सोचेंगे. ही खुशखबर बाबा जाफ्रीला सांगत सांगत राजेश चाललेला असतो इतक्यात त्याला बचाव बचाव ऐकू येतं. ती असते अमिता नांगिया. हे दोघं बचावायला तिथे गेल्यावर ती चुटक्या वाजवायला लागते (त्यासाठी आधी हातमोजे काढते ) मग चहूबाजूंनी चुटक्यांसहित निरनिराळे आवाज करत जॉनीची गँग अवतरते. मागून सुपरमॅनचं म्युझिक! मग जॉनी म्हणतो - म्युझिक! (म्हणजे वेगळं म्युझिक ) आणि ते सगळे नाचायला लागतात. हा त्या कबड्डीइतकाच एंटरटेनिंग प्रकार आहे. सुपारी घेतलेल्या गुंडाच्या टोळीतले लोक आपले सावज हेरून त्याला कोंडीत पकडतात आणि आधी डान्स करून मग त्याच्या हड्डीपसली ब्रेक करणारा हल्ला करतात. त्या डान्सला ब्रेक डान्स का म्हणायचे हे मला आज समजले. तर ते असो. या सगळ्यात राकेशला पोटात लागतो चाकू आणि राजेश रॉकीच्या डोक्यात घालतो हॉकीस्टिक. दोन्ही पार्ट्या आपापल्या जखमी लोकास्नी घेऊन जातात.
आई हट्टू एकदम इमोशनल. मैं अपने बेटे के पास जाऊंगी. मामा म्हणतो तू आत्ता गेलीस तर या तुझ्या कमजोरीचा ते लोक फायदा घेतील. एकूण जखमी राजेशच्या जवळ कोणी जायचं नाही असं डायरेक्टरने सांगून ठेवलेलं दिसतंय. आई हट्टूला समजतं की हा तर कंसमामा आहे आणि त्याला हाकलून ती लगेच एक अच्छी माँ आणि अच्छी पत्नी बनायला साधी साडी नेसून हॉस्पिटलात जाते. तिथे रजनी कविता लिहीत बसलेली असते - तुम जीते मै हारी, मै तुम्हारी सिर्फ तुम्हारी. हे सगळं रामय्याला प्रपोज करताना तिला आठवलं नव्हतं वाटतं.
इकडे जॉनीला डॉक्टर म्हणतात की बाबा, तुझा भाऊ मरण्यात आहे तर पोलिसात जा. पण तसं केल्यावर नाचायचा चान्स मिळणार नाही म्हणून तो ठाम नकार देतो.
आई हट्टू आधी बेहोश राजेशच्या इथे बसून इमोशनल होते मग बाबा जाफ्रीच्या घरी जाते. जाफ्री फुल जंपसूट मधे हट्टंगडीला बादलीभर उर्दूमिश्रित टोमणे मारतो . हट्टंगडी कबूल करते की मीच दिली सुपारी. जाफ्रीचा झापडी होतो आणि मारणारा आणि मार खाणारी एकदम रडतात. जाफ्री एखाद्या खाष्ट सासूच्या थाटात तू मर क्यूं नही गयी वगैरे म्हणतो. हट्टू जाफ्रीचे पाय धरून बेशुद्ध (!) होते.
बा, बाबा और बहू एकदम हास्पिटलात जातात आणि राजेशला फ्लाइंग किस देतात. हे असलं काहीतरी बघून राजेश पुन्हा बेहोश होतो. आणि फायनली जिसका हम सबको बेसबरीसे इंतजार था - देखो वो आ गया - बिन तेरे सनम! केसउडवी पुन्हा केस उडवायला लागते. पुन्हा तीच बाग, तसाच पिंजरा (यावेळी त्याला फुलांनी सजवलाय), तसेच पक्षी उडवणं वगैरे. या गाण्यात पाळीव प्राण्यांना बॅग्राउंडला ठेवायची परंपरा कायम राखण्यासाठी गायी आणल्या आहेत. बहुतेक डायरेक्टरला स्वित्झर्लंडचा इफेक्ट हवा असावा - एकदम हिरवी शेतं आणि चरणार्या गायी! पण आपल्या गोमातांनी शेपटीने माशा उडवत रोमँटिक स्विस ड्रीमचे वार वडगाव बुद्रुक करून टाकलंय. मधेच केसउडवी म्हशीसारखं इतक्या जोरात धावत येते की गायी घाबरून पळतात वगैरे. बाकी टाइमलाइनचा अंदाज यावा म्हणून फुलबाज्या लावून दिवाळी दाखवली आहे. पहा म्हणजे न्यू इयरला पिक्चर सुरू झाला तो दिवाळीपर्यंत चालू आहे.
रजनी रामय्याला पत्र आणि अंगठी पाठवते आणि मंगनी तोडल्याचं सांगते. इकडे रॉकी इहलोकाची यात्रा संपवतो. जॉनी म्हणतो राजेश तू म्येलास! तर तिथे मामा येऊन म्हणतो मै अपनी पुरी ताकत के साथ तुझ्यासोबत हूं. आणि मग ताकत म्हणून तो एका सूटवाल्याकडे बोट दाखवतो. हा सूटवाला हॉस्पिटलात दंडावर खरा विंचू मिरवत आलेला आहे. इतका वेळ तो विंचू काय 'चला आज हॉस्पिटलची ट्रीप वाटतं!' असं म्हणून बसून राहिला होता की काय? मामाने बोट दाखवल्यावर सूटवाला विंचवाला धरून चुरगळल्यासारखं करतो आणि अचानक विंचू प्लॅस्टिकचा बनतो. हा 'तात्या विंचू' मामाची ताकत का आहे हे काही समजलं नाही.
चिडलेला रामय्या राजेशला मारायला येतो. आधी रामय्याची गँग म्हणते अरे मारू नको, त्याने आम्हाला काम दिलं. मग मतपरिवर्तन होऊन निदान बरोबरीची मारामारी व्हायला हवी असं ठरतं. इकडे पारंपारिक बदला नियम फॉलो करत जॉनी आणि मंडळी (यात आता मामा आणि तात्या विंचू पण आहेत ) रजनीला पळवून नेतात. या सीन मधे अशोक, जाफ्री, लक्ष्या सगळ्यांनी मार खाल्लाय. रामय्या आणि राजेश स्लोमो मधे एकमेकांच्या डोक्यात लोखंडी बार वगैरे घालणार इतक्यात अशोक येऊन रजनीची वार्ता देतो.
रजनीला घेऊन जॉनी आणि कं. कुठल्याश्या थेटरात येते. इथे उगाच डिस्को लाइट्स चालू आहेत. जॉनीची गँग आपापल्या खुर्च्या पकडून बसते आणि स्टेजवर जॉनी रजनीला म्हणतो - डॅन्स! पायसने लिहून ठेवल्याप्रमाणे बॉलिवूड व्हिलन फार पूर्वीपासून कलेचे आश्रयदाते राहिले आहेत. पण म्हणून डान्सची इतकी आवड? काहीही करायच्या आधी गणपती बाप्पा मोरया वगैरे म्हणावं तशी ही जॉनी आणि कं नाच करते. तर ते ही असोच. रजनीला नीट नाचता येत नाही हे लक्षात आल्यावर जॉनी पारंपारिक बदल्याचं कार्य सुरू करणार इतक्यात येते अमिता नांगिया! ती म्हणते तुला हवं तर तिला मारून टाक पण मी तुला अतिप्रसंग करू देणार नाही. बात औरतजातकी इज्जतकी है वगैरे वगैरे (या पिक्चरचा प्रमुख कीवर्ड इज्जत आहे इतकं नक्की झालंय आत्तापर्यंत). कोण म्हणतं स्त्रीच स्त्रीची शत्रू असते म्हणून? तिच्या मदतीला रॉकीची महबूबा पण असते. महबूबा नांगियाला म्हणते तू रजनीला वाचव मी बाकी गँगकडे पाहते. मग नांगिया स्टेजवर जाते आणि जॉनी आणि नांगिया रूमालपाणी खेळल्यागत हातात चाकू घेऊन गोल गोल फिरायला लागतात. रजनी तात्काळ उठून नांगियाच्या मागे लपते आणि म्हणते 'मुझे बचालो' (दामिनीचा फेमस शॉट इथून कॉपी केला होता तर!). रूमालपाणी चालू असताना उरलेली गँग आपापल्या जागेवर उठून उभी राहते आणि नाचायला सुरूवात करते. काहीही झालं तरी चालेल, डान्स झालाच पाहिजे! नांगिया रजनीला पळायला सांगते आणि जॉनीवर हल्ला करते. जॉनी तिला चाकू मारतो. मग अचानक साक्षात्कार झाल्यासारखा रडायला लागतो.
रजनी पळते. तर बाहेर मामा आणि तात्या विंचू दारू पित पहारा देत असतात. मग पाठलाग सुरू होतो. जॉनी आणि कं. रजनीला कॉर्नर करणार इतक्यात रजनीच्या एका बाजूने राजेश आणि दुसर्या बाजून रामय्या येतो. मागून शंखध्वनी सुरू होतो. मला वाटलं आता 'महाऽऽऽभारऽऽऽत' असं पण ऐकू येणार. पण तसं काही होत नाही. मारामारी सुरू होते. फॉर अ चेंज यावेळी पोलिस मारामारी सुरू झाल्यावर लगेच येतात. पण ते लेले देदे असल्याने ते क्रेन घेऊन व्हिलन गँगच्या एकेका माणसाला एकीकडून उचलून दुसरीकडे टाकायला लागतात. अरे पोलिस आहात ना तुम्ही? थांबवा की मारामारी! पण नाही. मग या दरम्यान जॉनी मरतो. गँगचा बर्यापैकी खातमा होतो. उरतात राजेश आणि रामय्या. रामय्या राजेशवर चाल करणार इतक्यात रजनी राजेश समोर येते - नही रामय्या तुम इसे नही मारोगे! झालं का? बॅगेतली इज्जतही (वाळूत) गेली आणि रजनीही गेली. क्षणभर रामय्याच्या मनात विचार येऊन जातो की रजनीलाच भोसकून टाकावं पण मग त्याला आठवतं की त्याचं रजनीवर प्रेम आहे आणि तो चाकू टाकून देतो. पण राजेश मात्र रामय्याच्या अंगावर धावून जातो. हा कसला कृतघ्न माणूस आहे असा मी विचार करेपर्यंत तो निघाला कहानीमें ट्विस्ट! रामय्याच्या मागे मेल्याचं सोंग घेऊन पडलेला तात्या विंचू रामय्याला मारायला बघत असतो. ते इकडून राजेशने पाहिलेलं असतं आणि तो रामय्याला वाचवायला धावलेला असतो. हे पाहून तात्या स्वतःची तलवार स्वतःच्याच पोटात खुपसून मरतो. मग येतो मामा. तेव्हा मात्र लेले देदे ला आठवतं की ते पोलिस आहेत आणि मग ते मामाला अटक करतात. रामय्या राजेशच्या हातात रजनीचा हात देतो आणि पाचा उत्तरांची कहाणी साठा उत्तरांत संपूर्ण होते.
चिकवा वरचे प्रतिसाद इकडे डकवत
चिकवा वरचे प्रतिसाद इकडे डकवत आहे -
आजच्यापुरता माझा पेशन्स संपलाय. बाकी लिहीतेच सावकाश.
>>
ह्याट्ट
यारा दिलदारा वर लिहिताना बिन तेरे सनम चा उल्लेखही नाही...
ई बात कुछ हजम नाहीं हुई...
Submitted by अँकी नं.१ on 18 June, 2024 - 22:44
यारा दिलदारा एकदाचा पाहायला सुरूवात केली. >>> पण का? ऐसी भी क्या मजबुरी थी?
Submitted by MazeMan on 19 June, 2024 - 00:31
आजच्यापुरता माझा पेशन्स संपलाय >> Lol
ती हिरवीन केसाला रिबिनी बांधते आणि 36 तास झोपून उठल्या सारखे सुजीतकुमार नयन घेऊन वावरते... तीच ना?
गरीबांची सोनू वालिया
अशा चित्रपटांसाठी (वेगळा धागा नको असेल तर) इथे ऐच्छिक सोय आहे.
https://www.maayboli.com/node/84724
Submitted by रघू आचार्य on 19 June, 2024 - 01:14
आजच्यापुरता माझा पेशन्स संपलाय. बाकी लिहीतेच सावकाश. >> तुझे ठीक आहे ग पण रोहिणी हट्टंगडीचा असा काय नाईलाज झाला होता ह्यात काम करायचा ते शोध Happy बिन तेरे सनम बघूनही तुला सिनेमा बघावासा वाटला कसा ?
Submitted by असामी on 19 June, 2024 - 06:44
पाहिले पहिले गाणे, भयंकर आहे ! काय तो हिरो, काय ती हिरवीण, काय तो काळा स्लीवलेस बनियान , काय ते एडिटिंग, एकमेकाशी संबंध नसलेले दोन सिनेमे घेऊन प्रत्येकी एकेक मिनिट मिक्स केले असावेत असे वाटते. याला टाईम डोमेन मल्टिप्लेक्सिंग म्हणतात किंवा पायथॉन मध्ये झिप फन्क्शन !
Submitted by vijaykulkarni on 19 June, 2024 - 07:10
‘बिन तेरे सनम’ माझे अगदी लाडके गाणे आहे. तेव्हाही आवडायचे, आताही आवडते. तेव्हा खुप हिट झाले होते.
Submitted by साधना on 19 June, 2024 - 07:13
हा पिक्चर पहायची काहीही मजबुरी नाही. मलाच पहायचा होता. पण गेली कित्येक वर्षं मुहूर्त लागत नव्हता तो लागला एकदाचा. म्हटलं बघावं इतकं सुश्राव्य गाणं ज्या पिक्चर मध्ये आहे तो कसा आहे? आणि पाहायला लागल्यावर इथे शेअर करणार नाही असं होईल का? Happy
यारा दिलदारा वर लिहिताना बिन तेरे सनम चा उल्लेखही नाही..>>>> आत्ताशी फक्त अर्धा तास झालाय आणि पात्र परिचय चालू आहे. इतक्या सुरुवातीलाच हुकुमाचा एक्का घालायला ते लोक काय येडे आहेत का? Proud
विकु, फक्त गाण्यातले कपडे पाहून असं म्हणतात, उरलेल्या पिक्चरला काय म्हणाल? आसिफ ने मोठ्ठे तारे असलेला टीशर्ट घातलाय एंट्रीलाच. हिरविणीने शाळेतला पिनाफोर घातलाय चक्क एका सीन मध्ये. पांढरा शर्ट आणि डार्क निळा पिनाफोर!
सईद जाफरी, जो दुनियाका सबसे महान मेकॅनिक है, तो लवकरच त्या कपड्यात दिसेल याची मला खात्री आहे Proud
Submitted by rmd on 19 June, 2024 - 07:44
इतक्या सुरुवातीलाच हुकुमाचा एक्का घालायला ते लोक काय येडे आहेत का?
>>
म्हणून काय हीरो ला छक्का बनवायचं Uhoh
(त्यात असिफही निळा-गुलाबी घागरा चोली घालून असतो)
मेन गाणं बघायला आलेल्यांना मोकळं करायचं ना
नाहीतर बाकी सिनेम्यात त्यांना झोप आली तर गाणं मिस व्हायचं
अन् तसंही प्री यूट्यूब एरा मधे गाण्याचा व्हिडिओ बघायला फारसा स्कोप नसायचा (छायागीत अन् चित्रहार सोडता)
सईद जाफरी, जो दुनियाका सबसे महान मेकॅनिक है,
>>
हे मी दौड मधल्या चाको च्या टोन मधे ऐकलं
Submitted by अँकी नं.१ on 19 June, 2024 - 07:55
यारा दिलदारा पोस्ट भारी आहेत Happy नाव ऐकलेले आहे असे वाटत होते ते त्या गाण्यामुळेच असावे Happy
Submitted by फारएण्ड on 19 June, 2024 - 08:02
यारा दिलदारा म्हटलं की तीनच गोष्टी आठवतात - ‘बिन तेरे सनम‘, ‘तुम ही हमारी हो मन्झिल, माय लव्ह‘ आणि बिन तेरे सनम मधलं, ‘यह जानकर बलमजी Happy
Submitted by फेरफटका on 19 June, 2024 - 08:18
बिन तेरे सनम>> फार रोमँटीक वाटतं ऐकायला. कित्येक दिवस मला वाटायचं ओरिजनल गाणं वेगळंच असेल हे असिफ शेख वालं स्पुफ आहे Lol
Submitted by अंजली_१२ on 19 June, 2024 - 08:25
यारा दिलदारा मधले गाणे गेल्याच आठवड्यात ऐकले होते.
असाच आणखी एक सिनेमा होता. सातवां आसमान. तो एका मुलीबरोबर (गफ्रे नाही) पाहिला होता Proud
त्या आधी तिच्याच मोठ्या बहीणीबरोबर ( तिच्याबरोबर जायला आईला वेळ नव्हता म्हणून) शशीकपूर नंदाचा परदेसियोंसे ना अखिया मिलाना गाणे असलेला चित्रपट पाहिला होता. Proud
दोघींवर लाईन मारत असलेलं पब्लीक एव्हढासा नाही तर या नजरेने बघायचं बरेच दिवस.
बरेच दिवस सेलेब्रिटी म्हणून वावरलो त्या वयातच.
Submitted by रघू आचार्य on 19 June, 2024 - 08:56
तुम ही हमारी हो मन्झिल, माय लव्ह>>>
हे ऐकायला आवडायचे त्याकाळी. पाहिले होते का नाही आठवत नाही..
दोन्ही पाहिली आता. उगीच पाहिली. पण ‘बिन तेरे सनम’ वर्ड बाय वर्ड लक्षात आहे मला नी नवऱ्याला पण. अशीच अल्गो लक्षात राहती तर…
सातवां आसमान >>> विवेक मुश्रन नी मनुषा कोईरालाचा ना? त्यातलं एक गाणं पण वाजवून वाजवून फेमस केलं होतं तेव्हा.
गरीबांची सोनू वालिया >>>> मुळात सोनु वालियाच गरीब … त्यात ही म्हणजे गरीब स्क्वेअर.
Submitted by MazeMan on 19 June, 2024 - 10:26
यह जानकर बलमजी >>> हे अगदीच बच्चमजी सारखं वाटतंय Lol
Submitted by rmd on 19 June, 2024 - 10:06
- ‘बिन तेरे सनम‘, ‘तुम ही हमारी हो मन्झिल, माय लव्ह‘ आणि बिन तेरे सनम मधलं, ‘यह जानकर बलमजी >> चौथी गोष्ट अॅड कर त्यात - हमारे पापा और हम - अमित कुमार ने अशक्य धुमाकूळ घातलाय त्या गाण्यात.
Submitted by असामी on 19 June, 2024 - 10:31
असाम्या, पिक्चर आला होता तेव्हा कॅसेट वगैरे घेतली होतीस की काय? Proud
तसं पिक्चर सुरू होता होता एक बरं गाणं आहे 'अब तो तुम्हे है दिखाना हम में है कितना दम' असं काहीतरी. पण त्यात शक्ती कपूर आणि गँग आणि रायव्हल गँग इतकी पपलूगिरी करतात की गाण्याला पश्चात्ताप झाला असेल.
इच्छुकांसाठी टीप : रायव्हल गँग मधे अमिता नांगिया आहे. Proud
Submitted by rmd on 19 June, 2024 - 11:58
तुम ही हमारी हो मन्झिल, माय लव्ह >>> आवडलं गाणं. हे आधी कधी तरी ऐकलेले आहे.
Submitted by रघू आचार्य on 19 June, 2024 - 12:13
टोटल फोमो आल्याने थोडा पाहिला यारा दिलदारा. काय भीषण फालतू पिक्चर आहे! कादर, अमजद, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे - इतके कॉमेडीचे एक्के वाया घालवले आहेत. विजू खोटेने शोलेची परतफेड करायला अमजदचा बॉस म्हणून काम स्वीकारलेले दिसते.
गरीबांची सोनू वालिया >>>> मुळात सोनु वालियाच गरीब … त्यात ही म्हणजे गरीब स्क्वेअर. >>> Lol खरे म्हणजे रोहिणी हट्टंगडीच शार्प दिसते तिच्यापेक्षा यात. ती हिरॉइन सुचित्रा सेन ते बबिता अशा विविध अभिनेत्रींचे मिश्रण वाटते. सईद जाफ्री कोणत्यही अँगलने मेकॅनिक वाटत नाही. आता कधीही तो बासमती तांदूळ किंवा तत्सम "शाही जायकेदार" कसलीतरी जाहिरात करेल असे वाटते.
र्म्द, आता तुझी पोस्ट नीट वाचली. धमाल लिहीले आहे. सगळे सीन्स आठवले.
या पिक्चरमधल्या कुठल्याही एका घटनेचा कुठल्याही दुसर्या घटनेशी काहीही संबंध नाही. तसा तो आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. >>>
एक साधारण अपार्ट्मेंट कॉम्प्लेक्सच्या पार्काच्या साइजची बाग असते. >>>
हे लिहावं लागणार हे माहिती असल्याने ती पार्कमधे जातानाच पिवळा, केशरी, गुलाबी असे क्रेयॉन घेऊन गेलेली असते. >>> Lol फुटलो.
खरेच त्या बागेबद्दल संशोधन केले पाहिजे. अगदी इतक्याच कोपर्यात काय ते सीन्स घ्या असे ठरल्यासारखे सीन्स आहेत. एकतर असे कोण तरूण पोरं रॅण्डमली एकटे एखाद्या बागेत जातात? त्यात "त्याने मान वळवली व तेथे ती केस उडवत, पक्षी उडवत, लाजताना दिसली" अशी काहीतरी पटकथा असावी. पण त्या आधी काही सेकंद तो तेथूनच चालत येतो. तेव्हा त्याला ती समोर दिसायला हवी तेव्हाच. पण मग तो मान वळवायचा शॉट घ्यायचा मतलबच राहिला नसता.
झी च्या मालिकांसारखे हिच्याकडे काहीतरी पेपर्स सही करायला आणतात >>> Happy हे ही भारी. आणि काय ते ग्रीस. हात धुवायचा शोध तेव्हा लागला नसावा. तेव्हापासून कोणीही जेवायला बसले की रोहिणी हट्टंगडी "अपने हाथ धो ले" म्हणायला लागली.
आसिफ ने मोठ्ठे तारे असलेला टीशर्ट घातलाय एंट्रीलाच >>> त्याला बहुधा कोणीतरी तुझी स्टार पॉवर यात दाखव म्हंटले असावे Happy
Submitted by फारएण्ड on 19 June, 2024 - 13:20
तेव्हापासून कोणीही जेवायला बसले की रोहिणी हट्टंगडी "अपने हाथ धो ले" म्हणायला लागली. >>> Lol
झाले आता लोक यारा दिलदारा ला (गेम्स्टॉप च्य स्टॉकसारखे) मीम हिट बनवणार का?
Submitted by maitreyee on 19 June, 2024 - 13:23
बासमती तांदूळ किंवा तत्सम "शाही जायकेदार" >>> "हाहा:
स्टार पॉवर >> हा सुप्पर होता.
रमडची पोस्ट पण भारी.
रमडची पोस्ट वाचताना हे आधी वाचलेले आहे असे वाटून गेले. नंतर आठवले कि हा पिक्चर गेल्या आठवड्यात सुरू केला होता.
आता मेंदूत असा लोच्या झालेला आहे कि जे पाहिलेय ते वाचले असे वाटते आणि जे वाचलेय ते पाहिलेय असे वाटते.
हा सिनेमा नक्की पाहणार. बॅटमॅन बघण्यात वेळ दवडण्यात अर्थ नाही.
Submitted by रघू आचार्य on 19 June, 2024 - 13:27
विजू खोटेने शोलेची परतफेड करायला अमजदचा बॉस म्हणून काम स्वीकारलेले दिसते.
बासमती तांदूळ किंवा तत्सम "शाही जायकेदार"
"अपने हाथ धो ले"
>>>> Rofl अगदी अगदी!
Submitted by rmd on 19 June, 2024 - 14:21
असाम्या, पिक्चर आला होता तेव्हा कॅसेट वगैरे घेतली होतीस की काय? >> तुला कसं कळलं ? Lol यारा दिलदारा/खिलाडी हे भयंकर पॉप्युलर काँबो होते जतिन ललित साठी. हे सिनेमाबद्दल थांबव नाहितर फोमो येऊन बघायला लागेल Wink
Submitted by असामी on 19 June, 2024 - 15:43
तुला कसं कळलं ? >>> चोराची पावलं Lol
फोमो येऊन बघायला लागेल >>> Proud बघ की मग!
Submitted by rmd on 19 June, 2024 - 15:49
हिरवीण आहे का घोडी ? >>>
याचं नाव रामय्या. घराला आणि गोठ्याला पत्रे लावायचं सोडून हे काय करतोय हा? >>>
त्याला 'इथे किलोवर इज्जत मिळेल' अशी पाटी असलेलं दुकान माहिती असावं >>>
गोदीच्या पदरासारखा तिचा फ्रॉक उडतोय >>>
अरे हाँ आहे तर मग विव्हळते कशाला? >>> Lol
मस्त चाललाय रिव्यू. येऊदे अजून
Submitted by फारएण्ड on 19 June, 2024 - 17:32
च्यायला
कुठल्या ओटीटी वर आहे हा ??
अब तो देखणाईच पडेंगा
Submitted by अँकी नं.१ on 19 June, 2024 - 18:41
रमड _/\_ फारच भारी चाललाय रिव्ह्यु, आता यारा दिलदारा पाहावाच लागणार.
सगळी पोस्टच भारी आहे पण हा रेफरन्स बर्याच दिवसांनी पाहिला >> (याचं नाव रामय्या. घराला आणि गोठ्याला पत्रे लावायचं सोडून हे काय करतोय हा?) Lol
इच्छुकांसाठी टीप : रायव्हल गँग मधे अमिता नांगिया आहे. >> आणि हा खास दर्दी संदर्भ Proud
मुळात सोनु वालियाच गरीब … त्यात ही म्हणजे गरीब स्क्वेअर. >> MazeMan Lol
रोहिणी हट्टंगडी "अपने हाथ धो ले" म्हणायला लागली >> फा Biggrin
रच्याकने, आसिफ शेखची या सिनेमाविषयक टिप्पणी ( Proud ) >> https://youtu.be/FuJ0N1BOQbY
ओह, आणि रँडम सीन बघताना जाणवलेले >> ९०च्या चित्रपटांचे व्यवच्छेदक लक्षण, आऊट ऑफ नोव्हेअर इंडियन इकॉनॉमीवर कमेंट्स, या चित्रपटातही आहे. जसे गुप्तच्या ओपनिंग सीनमध्ये मनमोहन सिंगांच्या आर्थिक धोरणावर सखोल चर्चा आहे तसे इथे रोहिणी हट्टंगडीच्या एंट्री सीनमध्ये मिडलईस्ट क्रायसिसचा (१९९०-९१ चे गल्फ वॉर) भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल यावर चर्वण आहे. Happy
Submitted by पायस on 19 June, 2024 - 19:00
@रमड >>> खतरनाक रिव्ह्यू… आने दो.
याचं नाव रामय्या. घराला आणि गोठ्याला पत्रे लावायचं सोडून हे काय करतोय हा >>> Lol
रायव्हल गँग मधे अमिता नांगिया आहे. Lol Lol
इकडे राजेश फावड्याने गवताचे भारे तिच्या अंगावर टाकतो. हिरवीण आहे का घोडी>>> Lol
दिग्दर्शकाला एकंदरीतच हे कन्फ्युजन पिक्चरभर असावं. कारण बिन तेरे सनममध्ये पण गवताचा भारा उडवणे आहेच. किंवा मग आरेमध्ये शुटींग केलं असावं. तेवढंच कॉस्ट कटिंग.
Submitted by MazeMan on 19 June, 2024 - 19:24
तुम ही हमारी हो मंझिल…. यातलेच हे माहित नव्हते. दोन्ही गाणी तुफान गाजलेली पण पडद्यावर पाहायचे भाग्य आज रमड मुळे लाभले. थम्क्यु..
तो सगळा सेटप का लावलेला हे अर्थात चित्रपटात नसणारच..
किटलीतुन चहा ओतुन ती रिवाजाप्रमाणे हिरोला देणार असे वाटले होते पण तो घोड्यावर रिकिब वगैरे प्रकरणात गुंतल्याने कप ही हातात धरुन होती तेवढ्यात त्या गाढवाने हिला घोडी समजुन गवत हिच्या अंगावर टाकायला सुरवात केली… सगळा चहा फुकट गेला…. सकाळी असले सिन बघवत नाहीत, चहा फुकट घालवायचे सिन म्हणतेय मी.. चहा हे सकाळचे अमृत..
(असल्या किटल्या घेऊन कोण फिरते???)
Submitted by साधना on 19 June, 2024 - 19:52
अ आ च्या ऐवजी ईथेच धमाल सुरू झालिये Lol
अरे हाँ आहे तर मग विव्हळते कशाला? Lol ह्यावर खूप जोरात हसले
गरीब स्क्वेयर Rofl
rmd तुझ्यातली प्रतिभा ओसांडून वाहतेय...आता तिला बांध घालू नकोस Wink अस्मिता, फारेंड, पायस आता जोडीनं र्म्द कसं उच्चारायचं हे? Lol
Submitted by aashu29 on 20 June, 2024 - 01:28
इथले वाचून बिन तेरे सनम काल युट्यूब वर बघण्याचा प्रयत्न केला। अयशस्वी झालो. काय तो हिरो, काय हिरोईन काय त्यो ड्यान्स Lol
अख्खा पिक्चर सहन करू शकणाऱ्या rmd चा विजय असो. Happy
त्याचा रीमिक्स गाण्याचा विडिओ बरा आहे आणि तो आधी पाहिला होता. त्या काळात 2000 ते 2003 रिमिक्स चे पेव फुटले होते.
Submitted by झकासराव on 20 June, 2024 - 01:55
र्मड (अरेच्चा आपोआप आलं कि) , मस्त खुसखुशीत लिहीलंय. धमाल चालू आहे.
आख्खा प्रतिसादच कोट करावा लागेल.
न हसता वाचणं अशक्य झालं. Lol
फारएण्ड, श्रद्धा यांच्या जोडीला अजून एक पिसूबाई येऊन बसल्या.
अस्मिता, अनु यांच्या पिसाच्या तोफाही धडाधडत असतातच.
Submitted by रघू आचार्य on 20 June, 2024 - 02:02
यारा दिलदारा/खिलाडी हे भयंकर पॉप्युलर काँबो होते जतिन ललित साठी. >>>> हो हो, हे काँबो माझ्याकडे पण होतं.
पुढचा भाग ब्रेक के बाद! >>>> ओ तै, ते सारखं सारखं ब्रेक के बाद नको, एका दमात लिहून टाका बघू ..... Lol
Submitted by अरूण on 20 June, 2024 - 05:37
rmd यारा दिलदाराची संकलित चिरफाड एका वेगळ्या नविन धाग्यात करण्यात यावी ही णम्र विनंती.
Submitted by किट्टु२१ on 20 June, 2024 - 06:09
rmd यारा दिलदाराची संकलित चिरफाड एका वेगळ्या नविन धाग्यात करण्यात यावी ही णम्र विनंती. >>>> अणुमोदण
RMD : मनावर घेच आता, आणि ब्रेकत ब्रेकत नको, सलग भाग टाक ...... Happy
Submitted by अरूण on 20 June, 2024 - 06:13
सलग टाकायला सलग पाहायला लागेल ना! २० ते ३० मिनिटांपेक्षा जास्त पाहूच शकत नाही तुम्ही एकावेळी. शिवाय तेवढ्या वेळात पण इतक्या गमती झालेल्या असतात की पूछो मत Proud
धागा काढायला हरकत नाही. पण आता इथे बाकीच्यांच्या पण धमाल ऑडिशन्स झाल्या आहेत, त्यांचं काय करायचं?
Submitted by rmd on 20 June, 2024 - 08:01
आम्ही परत टाकू की.
Submitted by फारएण्ड on 20 June, 2024 - 08:16
Lol असं करूया, पुढचा भाग लिहून झाला की आत्तापर्यंतचे २ आणि हा नवीन असे तिन्ही मिळून धाग्याची सुरूवात करते. आणि इथल्या अॅडिशन्स कॉपी पेस्ट करते तिकडे पोस्टस मधे. त्यानंतर माझे अपडेट्स पण पोस्ट्स मधे टाकत जाईन. होपफुली आज दुपारपर्यंत धागा काढू शकेन.
मात्र ब्रेकत ब्रेकत लिहायला पर्याय नाही. रेग्युलरली (शक्यतो रोज) पुढचे भाग टाकेन इतकं नक्की सांगते Happy
Submitted by rmd on 20 June, 2024 - 08:28
२० ते ३० मिनिटांपेक्षा जास्त पाहूच शकत नाही तुम्ही एकावेळी. >>> Lol
धागा अप्रकाशित ठेवायची सोय आठवते अशा वेळी. (जन्माच्या आधीची गोष्ट).
Submitted by रघू आचार्य on 20 June, 2024 - 08:32
असं करूया, पुढचा भाग लिहून झाला की आत्तापर्यंतचे २ आणि हा नवीन असे तिन्ही मिळून धाग्याची सुरूवात करते. आणि इथल्या अॅडिशन्स कॉपी पेस्ट करते तिकडे पोस्टस मधे. त्यानंतर माझे अपडेट्स पण पोस्ट्स मधे टाकत जाईन. होपफुली आज दुपारपर्यंत धागा काढू शकेन. >>>> ह्ये ब्येष्टच होइल बगा .... Happy
Submitted by अरूण on 20 June, 2024 - 08:56
'यारा दिलदारा'ला वेगळ्या धाग्याचा 'सम्मान' मिळालाच पाहिजे, याला अनुमोदन. इथे बॅटमॅन वगैरे सामान्य (किंवा उद्योगभूषण यदुनाथ जवळकर म्हणतात तसं 'अतिसामान्य!!!') सिनेमांच्या गदारोळात त्या रत्नाला हरवून टाकू नका.
संसारात बंदिवान असलेल्या कमलला स्वतःचा स्वतंत्र बा फ (आणि सिनेमाला व्ह्यूज! 'यंग शेल्डन, पंचायत, वगैरे मालिकांना मागे टाकत 'ही' फिल्म झाली प्राईमवर ट्रेंड') मिळाला, मग केसउडवीला का नको? Proud
Submitted by श्रद्धा on 20 June, 2024 - 11:05
श्रद्धा Lol
केसउडवी हे विशेषण विसरलोच होतो Happy
काल थोडा पुढे पाहिला मीही. गवती चहा सीन सुद्धा.
आता तो तिला मी तुमच्यासारखे गरीब होऊनच दाखवतो म्हणतो असे काहीतरी दिसले मैप्याकि स्टाइल. मधे एक शक्त्ती कपूरचे गाणेही होते. फॉरवर्ड केले. नितिन मुकेशच्या आवाजात गाणे म्हणणारी व्यक्ती व्हिलन असू शकेल का हा विचार करतोय. कदाचित शक्ती कपूर पुढे मरणारा चांगला माणूस असावा.
Submitted by फारएण्ड on 20 June, 2024 - 11:16
हे चांगलं केलं.
हे चांगलं केलं.
सुरूवातीलाच एका दुकानदाराकडे काही रँडम लोकं येऊन नये साल का चंदा मागतात. तेवढ्यात दुसर्या दिशेने अजून काही रँडम लोकं येतात. मग कळतं की या दोन टोळ्या आहेत. >>> इथपर्यंत पाहिला होता आधी कधी तरी.
मग एक रोहिणी हट्टंगडी असते. >>> ही अर्थव्यवस्थेवर बोलत असल्याने सईद जाफ्री तिला निर्मला अशी हाक मारणार असे वाटले होते. रोहिणी अशा चित्रपटात पण हा ऑस्करला जाणार या हट्टाने जी जान से अभिनय करत असे. या प्रसंगातही तिचा अभिनय एका दिशेला,असिफ एका दिशेला आणि सईद जाफ्री समन्वयवादी आणि अनुभवी अभिनय करत बॅलन्स साधून आहे.
आत्तापर्यंतचे सीन्स पाहून आता सिनेमा सुसंगत होतोय की काय अशी मला शंका यायला लागली होती. >>>
आणि डान्स मूव्हज प्रमाणे व्हॅनचा साइज वाढत जातो. >> हे इतकं बारीक निरीक्षण असलं कि मजा येते.
गाडीतला नाच कंटिन्यूड.>> इंग्रजी शब्द गोव्यातल्या बीच ची आठवण करून देणारा आहे. तो बदलून मराठी करावा.
आपण कष्टाने भरलेली बादली या मेल्याने ओतून दिली याबद्दल तिथे उभ्या असलेल्या काकू त्याला बदडतात हा सीन बहुतेक कापला असणार >>
पेशन्सला सलाम ! ज्यांनी हा सिनेमा थिएटरला पाहिला त्यांचा या वेळी मोदीजींच्या हस्ते सत्कार ठेवावा, तेव्हढीच मतं वाढली अर ४०० पार होऊन जाईल.
गुंडा आता कल्ट क्लासिक बनलेला आहे. आपण मिळून यारा दिलदाराला तोच सन्मान देऊयात.
भन्नाट, लय भारी.
भन्नाट, लय भारी .
हा कुठला पिक्चर मला आठवत नाहीये. बिन तेरे सनम गाणं माहीतेय.
हा कुठला पिक्चर मला आठवत
हा कुठला पिक्चर मला आठवत नाहीये. . बिन तेरे सनम गाणं माहीतेय. >> अपघातानंतर गेलेली याददाश परतते तसेच हे गाणे पुन्हा पाहिल्यास याददाश वापस आयेगील. काय मी तुमची मदत करू शकतो का ?
ही मॅकडोनाल्डमधे कामाला असावीशी वाटणारी पिझ्झा गर्ल ( जी सिनेमात पण वेट्रेस आहे)
तीच जी मेकॅनिकल इंजिनियरिंग च्या वाळवंटात मृगजळाप्रमाणे चुकून आलेल्या गरीबांच्या सोनू वालिया सारखी चार वर्षे फुकटात सबमिशन करून घेण्याइतकी लाडात येऊ शकते ... आठवली का ?
नसेल आठवली तर दुर्दैवाने आपल्या उच्च अभिरूचीला दोष द्यावा.
थँक्यू थँक्यू - नुसत्याच
थँक्यू थँक्यू - नुसत्याच पोस्टी नव्हे, तर त्यातल्या लिन्क्सही पुन्हा जोडल्याबद्दल आभार
जाऊन गाणं बघितलं. कसलं फनी
जाऊन गाणं बघितलं. कसलं फनी आहे. पुर्वी टीव्हीवर बघितल्याचं स्मरतंय. दोघेही कार्टून दिसतायेत त्यात.
आसिफ शेख हम लोग मुळे माहीती होता. ही कोण माहीती नव्हती तेव्हा, अजूनही फार आठवत नाहीये. आत्ता नाव समजलं, हाहाहा. गाणं मात्र मस्त अर्थात ऐकण्यासाठी, बघण्यासाठी फनी.
अगदी फ्लेमेंको डान्स सुद्धा
अगदी फ्लेमेंको डान्स सुद्धा सोडला नाहीये यांनी
रामय्याला कसा बकरा बनवला याचा मेटाफोर की काय हा
आईस बकेट चॅलेंज
काय हे! चहा पित होते ना. आता टेबल साफ करावं लागलं….
मेकॅनिकल इंजिनियरिंग च्या वाळवंटात मृगजळाप्रमाणे चुकून आलेल्या गरीबांच्या सोनू वालिया सारखी
>>>> क्या बात है! मेकचे का तुम्ही?
मी पुन्हा येईन >>>> अज्जून कोणीतरी या पिक्चरचं फॅन आहे हे आज समजलं. लब्बाड….
पण हट्टंगडीचे जुने ट्रॅक
पण हट्टंगडीचे जुने ट्रॅक रेकॉर्ड पाहता आणि अजून पिक्चर बराच शिल्लक आहे हे बघून ती काहीतरी गेम करणार याची खात्री पटली. >>> हे जबरी आहे.
तो मधे कोठेतरी आईला का कोणालातरी त्या लडकीचे नाव रजनी आहे असे सांगतो तेव्हा हे गाणे चालून गेले असते
अगदी फ्लेमेंको डान्स सुद्धा सोडला नाहीये यांनी. >>> टोटली. मी ही लिहीणार होतो त्या डान्स बद्दल. बाजूच्या रूम मधे इतके नाट्य चालू असताना त्या रोम मधे फिडल वाजवणार्या नीरोला लाज वाटेल असे डान्सप्रकार यांचे तेथेच बाजूला सुरू असतात. इव्हन डान्स करताना उपचार म्हणून जिकडे मान वळवतात तिकडे नीट बघितले असते तरी दिसले असते. पण नाही. एक मिनीट मला यारा दिलदारा आहे की जेन ऑस्टेन च्या कादंबरीवरचा "तरूण तरूणींची सलज्ज कुजबूज" पद्धतीचा डान्स असलेला पिक्चर अशी शंका आली.
त्या सीनपुढचा पिक्चर अजून पाहायचा आहे. तो पाहून मग र्म्द ची पोस्टही पुन्हा वाचेन.
केसउडवी पुन्हा एकदा केस उडवत
केसउडवी पुन्हा एकदा केस उडवत समुद्रकिनारी उभी असते. दुरून रामय्या धावत धावत येतो. त्याने एकाच्या तीन बॅगा केलेल्या असतात. त्या दाखवत तो म्हणतो बघ मी तुझ्यासाठी काय आणलं. ३ बॅगा भरून इज्जत! मुंबई, बँकॉक, सिंगापूर, हाँगकाँग, दुबई, शारजा सगळीकडे बिझनेस करून (मधल्या सगळ्या घटनांना नेमके किती दिवस लागलेत?) त्याने ही इज्जत गोळा केलेली आहे. आणि मग त्यातली एक बॅग उघडून त्यातली सगळी इज्जत तो वाळूवर ओतून देतो. त्यातून रॅंडमली भरलेले रँडम कपडे निघतात. रजनी विचारते माझ्याशी लग्न करशील का? रामय्या आनंदाने थुई थुई होतो आणि प्रचंड जीव ओतून होकाराचं स्पीच सुरू करतो. त्याच वेळी रजनीच्या मागून एक बकरी सावकाश सावकाश चालत येते आणि पूर्ण स्पीचभर ती त्या दोघांच्या मागे आपलं फूटेज खात चालत राहते. रामय्याला कसा बकरा बनवला याचा मेटाफोर की काय हा? >>
हा सगळा पॅरा कहर आहे
पुढची पोस्ट लवकर येऊ दे.
जबरीच, प्रतिसादही भारी.
जबरीच, प्रतिसादही भारी.
रोम मधे फिडल वाजवणार्या
रोम मधे फिडल वाजवणार्या नीरोला लाज वाटेल असे डान्सप्रकार, जेन ऑस्टेन च्या कादंबरीवरचा डान्स >>>
बहुत हो चुका सस्पेन्स
बहुत हो चुका सस्पेन्स
पाहिला एकदाचा
अ गा ध आहे सगळंच
काय वाट्टेल ते होतं पुढे
एकच स्पॉइलर
असंच एकदा आसिफ अन् सईद मारामारी मधे जखमी होतात. आसिफ हॉस्पिटल मधे ऍडमिट, सईद म्हातारा असूनही बाहेर. मग रोहिणी आसिफ ला बघायला हॉस्पिटल मध्ये जाते, तर तिथे केसुडवी असते. म्हणून ती घरी परत जाते तर तिथे तिचं डोकं फुटतं (पण तिला ऍडमिट केल्याचं दाखवत नाहीत) पुढे आसिफ शुद्धीवर येतो तेंव्हा त्याला सईद, रोहिणी (कपाळावर फुली च्या शेप मधे पट्टी लावलेली) अन् केसुडवी एकत्र दिसतात. सगळे त्याला आपापल्या कपॅसिटी नुसार स्माईल अन् उडनचुंबन देतात. केसुडवी लाजते वगैरे. मग आसिफ खूश होऊन हॉस्पिटल मध्ये बागडतो अन् गाणं सुरू होतं...
रायव्हल गँग मधे अमिता नांगिया
रायव्हल गँग मधे अमिता नांगिया आहे
>>
क्लायमॅक्स च्या पूर्वी तिचा एक बऱ्यापैकी लेक्चर बाज डायलॉग आहे. चुकवू नये असं काही...
रोहिणी अशा चित्रपटात पण हा
रोहिणी अशा चित्रपटात पण हा ऑस्करला जाणार या हट्टाने जी जान से अभिनय करत असे. या प्रसंगातही तिचा अभिनय एका दिशेला,असिफ एका दिशेला आणि सईद जाफ्री समन्वयवादी आणि अनुभवी अभिनय करत बॅलन्स साधून आहे. >>>>
९०च्या दशकात कधीतरी tv वर
९०च्या दशकात कधीतरी tv वर बघितला असेल असं वाटतंय.... गाणी बऱ्याचदा ऐकली / बघितली आहेत ....पण आख्खा सिनेमा आता परत बघायलाच हवा परत
मस्तच लिहिलं आहे! मला 'बिन
मस्तच लिहिलं आहे! मला 'बिन तेरे सनम' हे गाणं माहिती आहे आणि आवडतं. २००३-४ च्या आसपास याचं रिमिक्स आलं होतं तेव्हा पहिल्यांदा ऐकलं होतं.
जबरी काम केलस बघ.. आता बक्षिस
जबरी काम केलस बघ.. आता बक्षिस म्हणून दुसर्या कुठल्यातरी असल्याच चित्रपटाची सुपारी द्यावी काय तुला????
प्रतिसाद आणि अॅडिशन्ससाठी
प्रतिसाद आणि अॅडिशन्ससाठी सगळ्यांना धन्यवाद! त्यामुळे धाग्याला चार चाँद लागताहेत.
तरूण तरूणींची सलज्ज कुजबूज
लडकीचे नाव रजनी आहे असे सांगतो तेव्हा हे गाणे चालून गेले असते >>> अशक्य हसतेय याला. हे तुलाच सुचू शकतं फा!
आता बक्षिस म्हणून दुसर्या कुठल्यातरी असल्याच चित्रपटाची सुपारी द्यावी काय तुला? >>> कुठल्या रे कुठल्या?
हा पिक्चर संपेपर्यंत डोक्याची बर्यापैकी मंडई होणारे असं दिसतंय त्यामुळे लगेच दुसरा कुठला असा पिक्चर हातात घेणार नाही बहुधा. बघूया.
पुढे आणखीनच भयानक होत चालला
पुढे आणखीनच भयानक होत चालला आहे पिक्चर
तो पोलिस व्हॅन मधला डान्स, तो चेस महाटुकार आहे. रमैय्या परदेशातून येतो ते बॅगा घेऊन तसाच थेट बीचवर. नवे कोरे कपडे बीचवर न ओतताही दाखवता आले असते असाच विचार डोक्यात आला. दुसरा तसाच विचार म्हणजे ही कोणती एअरलाइन आहे जी तीन बॅग्ज नेऊ देते
मग ही लग्नाचे विचारते तेव्हा मला वाटले तो म्हणेल लै चालू आहेस - मी गरीब होतो तेव्हा तयार नव्हतीस. आता मी माझ्या बरोबरीच्या कोणाला तरी विचारतो. पण त्याचा तर एकदम रमैय्या वस्ता वैयाच होतो. लिटरली. कारण त्यानंतरच्या त्याच्या गाण्याच्या शेवटी ते म्युझिक बॅकग्राउण्डला वाजवले आहे. केवळ याकरता त्याचे नाव रमैय्या ठेवले असावे. शक्तीला तेथे इतके फुटेज आहे की हिंदी सिनेमात तो एक भाषिक टच म्हणून भोजपुरी बोलतोय की हा एक भोजपुरी पिक्चर असून एक भाषिक टच म्हणून हिरॉइन हिंदी बोलत आहे हा प्रश्न पडतो.
मग तो राजेश कडमडतो तेथे. त्याचे "अॅक्शन" सीन्स काय वर्णावे! कसलेही सीन्स काहीतरी डॅशिंग दाखवल्यासारखे आहेत. जखमी झाल्यानंतर शुद्धीवर आल्यावर एक बादली पाणी डोक्यावरून घेतो ते ही स्लो मो मधे दाखवले आहे उगाचच. तो तेथे बेशुद्ध पडल्यावरचा सगळा सिक्वेन्सच अफलातून आहे. हीरोला हिरॉइनने कोणत्याही प्रकारे मदत करणे म्हणजे ती त्याचा प्रेमात आहे असा ठाम समज हिंदी पिक्चर्सनी करून दिल्यामुळे बेशुद्ध असलेल्या हीरोला पाणी सुद्धा द्यायला हिरॉइन जात नाही. इतकेच नव्हे तर ती राहू दे आपण जाऊ असा विचार तिचा बाजूला उभा असलेला बाप व वस्तीतील इतर कोणीही करत नाही. तेथे बाजूला विहीर असते. तेथे वस्तीतील बायका याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून एक बादली पाणी काढून ठेवतात. आणि तेथेच शोलेतील टाकी सीन मधे आरामात चहा पीत बसलेल्या अमिताभ स्टाइलने निर्विकार उभ्या असतात - जेव्हा शुद्धीवर येईल तेव्हा घेईल बादलीभर पाणी!
नाईलाजाने राजेश स्वतःच
नाईलाजाने राजेश स्वतःच शुद्धीत येतो >>> सिरीयसली. हे फार चपखल वर्णन आहे त्या सीनचे. जखमी माणसाला पाणी सुद्धा न देणारी "बस्ती" हिंदी पिक्चर मधे क्वचितच दिसते. कारण सहसा तेथे सगळे चांगल्या हृदयाचे लोक राहात असतात. आता मुकेश ऋषी सारख्या पॉवरफुल व्हिलन्सनी एखाद्याला जखमी केले असेल व ते तेथेच गुरकावून गेले असतील तर एकवेळ ठीक आहे. इथे तसेही काही नसते.
हातावरची मेंदी पहात सुस्कारा सोडून ती उगाच त्यावर वाळूबिळू टाकते. >>> हो इथे काय "डायरेक्शन" असावे याचे कोणीतरी संत्रे सोला. तसेच ते दूध-हळदीचेही.
शक्तीला तेथे इतके फुटेज आहे
शक्तीला तेथे इतके फुटेज आहे की हिंदी सिनेमात तो एक भाषिक टच म्हणून भोजपुरी बोलतोय की हा एक भोजपुरी पिक्चर असून एक भाषिक टच म्हणून हिरॉइन हिंदी बोलत आहे हा प्रश्न पडतो.
आरामात चहा पीत बसलेल्या अमिताभ स्टाइलने निर्विकार उभ्या असतात - जेव्हा शुद्धीवर येईल तेव्हा घेईल बादलीभर पाणी!
>>>>>
शक्तीला तेथे इतके फुटेज आहे
शक्तीला तेथे इतके फुटेज आहे की हिंदी सिनेमात तो एक भाषिक टच म्हणून भोजपुरी बोलतोय की हा एक भोजपुरी पिक्चर असून एक भाषिक टच म्हणून हिरॉइन हिंदी बोलत आहे हा प्रश्न पडतो.
>>>>>>>
आणि तेथेच शोलेतील टाकी सीन मधे आरामात चहा पीत बसलेल्या अमिताभ स्टाइलने निर्विकार उभ्या असतात - जेव्हा शुद्धीवर येईल तेव्हा घेईल बादलीभर पाणी!
>>>>>>
हा पिक्चर संपेपर्यंत डोक्याची बर्यापैकी मंडई होणारे असं दिसतंय त्यामुळे लगेच दुसरा कुठला असा पिक्चर हातात घेणार नाही बहुधा. बघूया.
>>>>>
तुझ्याकडून प्रेरणा घेऊन मी अक्षय कुमार आणि फरहीनचा 'नजर के सामने' पाहायला आणि लिहायला घेतलाय. (तसा सुरू केला होता लिहायला, पण पूर्ण झाला नाही तेव्हा!) टाकते लौकरच.
धाडस झालं तर बघ. 'मर्डर मिष्ट्री' आहे.
मेंदी वर वाळू का टाकायची ते
मेंदी वर वाळू का टाकायची ते काही कळलं नाही. पण हळद-दूध म्हणे अंगदुखी थांबायला, ब्रूजेस भरायला देतात.
आरामात चहा पीत बसलेल्या अमिताभ स्टाइलने निर्विकार उभ्या असतात - जेव्हा शुद्धीवर येईल तेव्हा घेईल बादलीभर पाणी! >>>
'नजर के सामने' >>>> श्र, बघ बघ आणि लिही लवकर त्याबद्दल. मी पाहीन हा पिक्चर संपला की
कुणीतरी तिला सांगितले असेल
कुणीतरी तिला सांगितले असेल 'मेंदी वाळू दे'...
श्रद्धा
श्रद्धा
एकदम रमैय्या वस्ता वैयाच होतो
एकदम रमैय्या वस्ता वैयाच होतो.
>>
आधी पण लक्ष्या ला फुटवायला अशोक रमैय्या ला हाका मारत तेंव्हा लक्ष्या प्रत्येक हाके नंतर वस्तावैया ओरडतो...
मेंदी वाळू दे >>
मेंदी वाळू दे >>
मेंदी वाळू दे >>>
मेंदी वाळू दे >>>
पुढचा भाग टाकायला जरासा उशीर
पुढचा भाग टाकायला जरासा उशीर होणारे, पब्लिक. पण आता पिक्चर पूर्ण करते आणि मग सगळाच अपडेट पोस्ट करते - ये वादा रहा! रविवार संध्याकाळपर्यंत लास्ट अँड फायनल इन्स्टॉलमेंट आ रही है.
'मेंदी वाळू दे' >>
'मेंदी वाळू दे' >>
Pages