Submitted by shantanuo on 11 September, 2018 - 09:51
गुगल इनपुट टूल्स वापरून ऑनलाईन टाइप करता येते.
https://www.google.com/inputtools/
पण मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये टाईप करण्यासाठी त्याचा उपयोग नाही. भाषाइंडीया या साईटवरून डाऊनलोड केलेल्या इनपुट एडिटरचा अनुभव कसा आहे?
https://bhashaindia.com/downloads.aspx
यात स्पेल चेक / एटो करेक्ट नाही. तशी अपेक्षाही नाही कारण हे फक्त इनपुट टूल आहे. हा मजकूर मी याच टूलाचा वापरा करूंन वर्डमध्ये लिहिला आहे. मजकूर सेव्ह होण्यात काही अडचण (सध्या तरी) आलेली नाही. बरहाच्या आठवणीने अजूनही व्यथित होणार्या मंडळीनी वापरून बघायला हवे असे. ऑफलाईन टंकलेखन कारण्याकरता अजून काय मार्ग आहेत?
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
"चांदवडची शिदोरी स्त्रियांचा
"चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न" या विकीसोर्सवरील पुस्तकातील मजकूर या अॅपमधून स्पेल चेक करून घेतला.
https://mr.wikisource.org/wiki/चांदवडची_शिदोरी_स्त्रियांचा_प्रश्न
हेच पुस्तक निवडण्याचं कारण की हे "टेक्स्ट" फॉर्ममध्ये उपलब्ध आहे आणि याचे मुद्रितशोधन झालेले आहे. प्रथम मी सर्वच्या सर्व दिडशे पाने या अॅपमधून स्पेलचेक करण्याचा प्रयत्न केला. अॅप क्रॅश झाले. कारण अॅन्ड्रॉईडमध्ये किती मजकूर एका वेळी कॉपी-पेस्ट करता येऊ शकतो याला काही मर्यादा असाव्यात. मग मी या पुस्तकाचे ४०-५० पानांचे ४ भाग करून ते स्पेल चेक करून घेतले. बहुतेक सर्व शब्द बरोबर निघाले. काही चुका आहेत पण त्या इतक्या रूळलेल्या आहेत की स्पेल चेकचे सॉफ्टवेअर नसते तर त्या चुका निवडणे शक्यच झाले नसते. उदा...
जाहिरनामा:जाहीरनामा
दारुची:दारूची दारची
मिळविण्याकरीता:मिळविण्याकरिता मिळविण्याकरता
गठ्ठयाकडे:गठ्ठ्याकडे पठ्ठयाकडे पठ्ठ्याकडे
दारिद्रय:दारिद्र्य दरिद्री
पध्दतीने:पद्धतीने
कांबरुणाला:लांबरुंद
ऐषआराम:ऐशआराम
स्फ्य्:स्तन्य
अघाडीने:आघाडीने अनाडीने
पोलिस:पोलीस
भाकित:भाकीत भाकत भाषित भाजित
संसदेसमेर:धर्मसंसद
ह्र:हृत
ह्रमग:हृदयंगम
ह्मत्या:आत्महत्या
पैत्रुक:पैतृक
हकीकती:हकिकती
कुतुहलाने:कुतूहलाने
शेतकारी:शेतकरी
ऊबदार:उबदार
फूटपाथवरील:फुटपाथवरील
दुर्मिळ:दुर्मीळ
पशुंच्या:पशूंच्या
अंमलात:अमलात
सरसरी:सरसर सरसरीन सरासरी सरी सरस
बेफिकीरी:बेफिकिरी बेफिकीर
ऋतुंत:ऋतूंत
संप्रेरांचे:संप्रेरकांचे संप्रेरक
दुर्मिळ:दुर्मीळ
वेश्यव्यवसाय:वेश्याव्यवसाय सेवाव्यवसाय शेतीव्यवसाय व्यवसायसातत्य
पीछेहाट:पिछेहाट
आंनदाने:आनंदाने खानदाने
फितुर:फितूर
मृगजवळच:मृगजळ
भडीमार:भडिमार
लुटालुटीची:लुटालूटीची
रोषणाई:रोशणाई
निव्वळ:निवळ
मुश्किल:मुश्कील
उरतली:उतरली उरतील उतरील उरती उरली
सोसयटीचं:सोसायटीचे
सम्मती:संमती
अंमजबजावणी:अंमलबजावणी
कात्री:कातरी कात्रण धात्री कातकरी काळरात्री
विस्कळित:विस्कळत विस्कळ
उल्लेक:उल्लेख
कबुलीजबात:कबुलीजबाब
अपशयी:अपयशी
पीछेहाट:पिछेहाट
पीडलेल्या:पिडलेल्या पडलेल्या पकडलेल्या
कोलित:कोलीत किलोत कोलत
मालत्तेचे:मालतीचे
अद्भूत:अद्भुत
हालाखीचे:हलाखीचे हातचलाखीचे चलाखीचे
निव्वळ:निवळ
लवचिक:लवचीक
आधरे:आरे धरे आधारे
अत्यंक:अत्यंत
व्याकुळ:व्याकूळ
मूठभर:मुठभर
गेलल्या:गेल्या झेलल्या गारठलेल्या
व्यवस्थामध्ये:व्यवस्थांमध्ये
अणि:अणी आणि
आह्वान:आव्हान
पीछेहाट:पिछेहाट
विक्राळ:विकराळ विक्रिया
तकलुपी:तकलादी
होतोसा:होतोस होता
रुपात:रूपात पुरात
सर्रास:सररास सरासर
आक्रमाणांना:आक्रमणांना आइसक्रिमांना
तुलनने:संतुलने
या प्रयोगात दोन गोष्टी माझ्या लक्षात आल्या. एक म्हणजे मजकूर युनिकोडमध्ये टाईप केलेला असेल आणि तो "टेक्स्ट" फॉर्ममध्ये उपलब्ध असेल तर स्पेल चेकला फार वेळ लागत नाही. हे पूर्ण पुस्तक तासाभरात तपासून झाले. पण प्रत्येक पानाचा फोटो काढून गूगल लेन्समधून युनिकोड मजकूर मिळवणे थोडे कठीण आहे. छापील चुकांबरोबरच लेन्सच्या चुका देखील तपासाव्या लागतात. शिवाय स्पेलचेकदेखील १००% अचूक नाही. त्यातील त्रुटी जशा समजतील तशा (पुढील आवृत्तीत) सुधारल्या जातील.
"इंग्रजी-हिंदी डिक्शनरी" अॅप
"इंग्रजी-हिंदी डिक्शनरी" अॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध करून दिले आहे.
https://play.google.com/store/apps/details?id=com.dictionary.shantanu.di...
बाजारात अशी बरीच अॅप असली तरी या अॅपमधील शब्दसंख्या बरीच जास्त आहे. बॉटनी, केमिस्ट्री, इंजिनिअरींग अशा विविध विषयांतील कठीण शब्दांना समर्पक प्रतिशब्द दिलेले आहेत. बहुतांश प्रतिशब्द संस्कृत भाषेतील असल्यामुळे हिंदीबरोबरच मराठी व इतर भाषिक देखील हे अॅप वापरू शकतात.
जाहिरातींचा भडिमार न करता जास्तीत जास्त अचूक अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच ही ऑफलाईन डिक्शनरी असल्यामुळे तुमचा डेटा प्लॅन वापरला जात नाही. इंटरनेटचा वापर न झाल्यामुळे तुमचा वैयक्तिक डेटा बाहेर कुठे जात नाही. विद्यार्थ्यांबरोबरच इतर सर्वांसाठी उपयुक्त.
अॅप पूर्णपणे मोफत आहे. सूचना, स्पॉन्सरशिप यांचे स्वागत आहे!
लिब्रे ऑफिसच्या रायटरमध्ये
लिब्रे ऑफिसच्या रायटरमध्ये मजकूर टाईप केल्यावर तो वर्डसारखाच ctrl + s म्हणजे कंट्रोल आणि "एस" या की-बोर्ड शॉर्टकटने सेव्ह करता येतो. या फाईलचा बॅक अप घ्यायचा असेल तर तीच फाईल वेगळ्या नावाने / वेगळ्या फोल्डरमध्ये सेव्ह करता येते. पण जर फाईल फारच महत्त्वाची असेल तर तिचा दररोज बॅक अप घ्यावा लागतो आणि दर वेळी वेगळे नाव द्यावे लागते. त्यासाठी Timestamp Backup with shortcut key नावाचे अॅड ऑन बनविले आहे.
https://extensions.libreoffice.org/en/extensions/show/42030
यामुळे फक्त Ctrl + Shift + T या शॉर्टकट द्वारे ही फाईल नवीन नावाने बॅक-अप फोल्डरमध्ये सेव्ह होईल. नवीन नावातच बॅक-अप कधी घेतला त्याची तारीख आणि वेळ असल्यामुळे आपले काम सोपे होते. Timestamp Backup नावाचे अॅड ऑन ओपन सोर्स लायसन्सद्वारे आधीच उपलब्ध होते. मी त्यात फक्त की-बोर्डसाठीचा शॉर्टकट जोडून घेतला आहे.
ही फाईल एका वेगळ्या फोल्डरमध्ये सेव्ह होईल. माझ्या संगणकावर त्या फोल्डरचा पत्ता असा आहे...
/home/ubuntu/.config/libreoffice/4/user/backup
तुम्ही जर विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम वापरत असाल तर तो पत्ता अर्थातच वेगळा असेल. टूल्स - ऑप्शन्स - पाथ - बॅकअप्स हा पर्याय वापरून तो पत्ता बदलता येईल या चित्रात दाखविल्याप्रमाणे...
लिब्रे ऑफिस नीट चालत नसेल तर "user" फोल्डर डिलिट करण्याचा सल्ला अनेक वेळा दिला जातो. अशा वेळी बॅक अप फोल्डरमधील फाईल्स देखील निघून जातात. तसे होऊ नये म्हणून हा पत्ता बदलला पाहिजे.
एखादी महत्त्वाची फाईल नेमक्या वेळी उघडताच न येणे किंवा काही पाने, आकृत्या गायब होणे असे प्रकार अधून मधून सगळीकडे घडतात. त्याची कारणे वेगवेगळी असली तरी त्यावरील उपाय मात्र एकच आहे, तो म्हणजे हे अॅड ऑन वापरून बॅक-अप घेत राहणे! बॅक-अप फोल्डर गूगल ड्राईव्ह किंवा अॅमेझॉन s3 बरोबर जोडून घेता आला तर फारच उत्तम. त्यामुळे हार्ड डिस्क निकामी झाल्यावर काय करायचे याची चिंता करावी लागणार नाही!!
Ctrl + s ची जशी सवय झाली आहे तशी Ctrl + Shift + T या शॉर्टकटची देखील सवय होईल. बॅक-अप हा आग्रह न राहता ती सवय झाली पाहिजे असे कोणीतरी (शुद्धलेखनाच्या बाबतीत) म्हटले आहेच.
"टेलिग्राम" हे व्हॉट्स अ
"टेलिग्राम" हे व्हॉट्स अॅपसारखेच काम करते. बहुतेक असेलच तुमच्या मोबाइलमध्ये, नसले तर डाऊनलोड करता येईल.
https://play.google.com/store/apps/details?id=org.telegram.messenger&hl=...
मी टेलिग्रामसाठी दोन बॉट बनविले आहेत. तुम्ही Marathispellbot ह्या बॉटला कोणताही मराठी मजकूर दिला की तो त्यातील चुका आणि त्यांना पर्यायी शब्द सुचवेल. SanskritSandhibot हा बॉट दोन किंवा अधिक शब्दांची (पाणिनीय सूत्रानुसार) संधी करून देईल. उदाहरणार्थ "कर्मणि एव अधिकारः ते" असे शब्द संस्कृत बॉटला दिले की तो त्याची "कर्मण्येवाधिकारस्ते" अशी संधी करून देईल. किंवा "हिम आलय" असे लिहून पाठविले तर "हिमालय" असा शब्द मिळेल.
खाली दाखविलेल्या चित्रात "नार्वेकर, घेई, महोदयीने" असे शब्द बरोबर असूनही चुकीचे म्हणून या यादीत आले आहेत. त्याकडे दुर्लक्ष करता येईल. "तसेचआमची" यात जागा सोडायला हवी होती. "वासाहती माहित आश्या" अश्या चुका मराठी माणूस सहसा करत नाही. हा गूगल अॅटो करेक्टचा प्रताप दिसतो. कौटुंबिक किंवा सोसायटी ग्रूपमध्ये आग्रहाने किंवा अभिमानाने मराठीत पोस्ट करायची असेल तर आधी टेलिग्राम बॉटकडून तो मजकूर तपासून घ्यावा.
"सभे आधी", "घेई नात", "रखड पट्टी", "युनियन चा" असे शब्द हल्ली तोडून का लिहिले जातात माहीत नाही. त्या शब्दांमध्ये स्पेस देण्याची अजिबात गरज नाही.
"सभे आधी", "युनियन चा" >> हे
"सभे आधी", "युनियन चा" >> हे तोडून लिहिण्याची हिंदी पद्धत आहे. सभा के पहले, युनियन का. मराठीत आपण ते एकत्र लिहितो.
मी इथली सम्पूर्ण चर्चा
मी इथली सम्पूर्ण चर्चा वाचलेली नाही पण मला मदत हवी आहे.
पूर्वी गुगल हिंदी इनपुट हे वार्ड एक्सेल ईमेल अगदी सगळीकडे चालत होतं. आता फक्त क्रोम मध्ये चालतं. त्यातूनही फेसबुक वर मराठी टायपिंग होत नाही. whatsapp application मध्ये पण वर्क होत नाही.
असं कोणतं app किंवा कीबोर्ड आहे का? जो सगळीकडे काम करेल. (माझा लॅपटॉप कंपनीचा आहे, पर्सनल नाही)
ऐसी अक्षरे या संकेतस्थळावरील
ऐसी अक्षरे या संकेतस्थळावरील या चर्चेत शेवटच्या प्रतिसादात एकाने "जीबोर्ड" च्या अॅटो करेक्टविषयी तक्रार केली आहे ती अशी:
>> देण्यासाठी, लिहिण्यासाठी, देऊनही वगैरे शब्द Gboard auto correct करून देण्या साठी, लिहिण्या साठी, देऊन ही असे करतो.
जीबोर्ड खरोखरच असे काही करत असेल तर "असून अडचण, नसून खोळंबा" याचे हे एक चांगले उदाहरण ठरेल. गूगल फुकट देत असलेल्या सुविधा चांगल्या असल्या तरी काही वेळा त्यातील ओव्हरस्मार्ट मदत नकोशी वाटते.
>> पोर्तुगीज या शब्दाचं सामान्य रूप काय असावं - पोर्तुगिजा का पोर्तुगीजा?
"पोर्तुगीजा" बरोबर.
>> वाचून वाचून ईंग्रजी शब्दांची विचित्र स्पेलिंग्ज सुद्धा जर लक्षात रहातात तर मराठी ऱ्ह्स्व-दिर्घ का नाही?" या प्रश्नाचं उत्तर दुर्दैवाने माझ्याकडे नाही. "लीहीणे" नक्की बरोबर नाहीये हे कळतं पण 'लिहीणे' का 'लिहिणे' चटकन लक्षात येत नाही. नशीब आमचं दुसरं काय?
सध्याची पिढी बहुतेक वाचन नेटवर करत असल्यामुळे आणि नेटवर भयानक अशुद्ध मराठी लिहिले जात असल्यामुळे कोणताच शब्द डोक्यात नीट रजिस्टर होत नाही. दुसरी गोष्ट फक्त वाचून वाचून इंग्रजी शब्दांची विचित्र स्पेलिंग्ज लक्षात राहतात यावर माझा विश्वास नाही. शाळेत या विषयावर भरपूर मेहनत घेतली गेलेली मला आठवते. मराठी ही काही इंग्रजीसारखी पोटापाण्याची भाषा नसल्यामुळे त्यावर मेहनत घेण्याची कोणालाच गरज वाटत नसावी.
>> मी परिश्रम / परीश्रम यातलं जे चुकीचं आहे ते लिहिलं तर तुमच्या मज्जातंतूना धक्का बसण्यापलीकडे काही दुष्परीणाम होतो का? की जेणे करून मी ऱ्हस्व-दिर्घ अचूक लिहीण्यासाठी कठोर परिश्रम करावेत?
असे लिहिण्याने "मज्जातंतूना धक्का बसण्यापलीकडे" बरेच काही घडते. पण ते "slow poisoning" सारखे असल्यामुळे त्याचे दुष्परिणाम लगेच लक्षात येत नाहीत. गुटखा, सिगरेट/ दारूचे सेवन सातत्याने आणि दीर्घकाळ केले की अगदी कॅन्सर नाही झाला तरी शरीरावर, मनावर, कुटुंबावर त्याचे परिणाम झाल्यावाचून राहात नाहीत. तसेच सातत्याने आणि दीर्घकाळ अशुद्ध भाषेचा अक्षरशः मारा करत राहिलात तर कदाचित पुढची पिढी फक्त नावालाच मराठी राहील. त्यांना आपल्या मातृभाषेत लिहा-वाचायला खूपच "डिफिकल्ट" होईल. व्यक्त होताच आले नाही तर मानसिक आरोग्याचाही सामना करावा लागेल.
"चॅट जीपीटी" नावाचा मशीन लर्निंगचा चमत्कार सर्वांना निदान ऐकून तरी माहीत असेलच. मराठी भाषेत त्या तोडीची सोय बनणे जवळपास अशक्य आहे. त्याचे एक महत्त्वाचे कारण सगळीकडे मनःपूत केले गेलेले अशुद्ध लेखन हे आहे.
>> असं कोणतं app किंवा
>> असं कोणतं app किंवा कीबोर्ड आहे का? जो सगळीकडे काम करेल.
मी प्रमुख आय.एम.ई. हे सॉफ्टवेअर वापरतो आहे गेली कित्येक वर्षे.
https://www.pramukhime.com/windows-application
बराहाप्रेमी त्या सॉफ्टवेअरची लिंक देतीलच. या दोन प्रमुख पर्यायांशिवाय भाषा इंडिया हे मायक्रोसॉफ्टचे सॉफ्टवेअर
https://www.microsoft.com/en-in/bhashaindia/downloads
आणि सी-डॅकचे आय.एस.एम. (Intelligent Script Manager) जे सरकारी कार्यालयात मोठ्या प्रमाणावर वापरले जाते, असे एकूण चार पर्याय आहेत.
https://www.cdac.in/index.aspx?id=ev_corp_gist_ism_launch
बराहा सोडून बाकी तीनही सॉफ्टवेअर फुकट आहेत. बराह एक महिना विनामूल्य वापरून पाहता येते. त्यानंतर सुमारे दोन हजार किंमत आहे.
"शुद्ध" हा शब्द बर्याचदा
"शुद्ध" हा शब्द बर्याचदा "शुध्द" असा चुकीचा लिहिला जातो. कारण फोनेटिक की-बोर्डवर जोडाक्षर बनविताना आपण "ध + द" लिहित आहोत की "द + ध" हे मुळीच समजत नाही. लिब्रे ऑफिसच्या रायटरमधील अॅटो करेक्टमध्ये जर *.ध्द.* > द्ध अशी नोंद केली तर तुम्ही लिहिलेला चुकीचा ध्द आपोआप सुधारला जाईल.
जर कुठून कॉपी पेस्ट केलेला मजकूर असेल तर अॅटो करेक्ट ट्रिगर होणार नाही. त्यासाठी Tools - Autocorrect - Apply हा पर्याय वापरावा लागेल. रेग्युलर एक्स्प्रेशनसाठी आपण स्टार (*) वापरला आहे. याचा अर्थ चुकीचा ध्द कुठेही /कोणत्याही शब्दात आला तरी सुधारला जाईल. ही सोपी युक्ती वापरून आपण आपल्या नेहमी होणार्या कोणत्याही चुका आपोआप सुधारू शकतो.
नमस्कार,
नमस्कार,
मी लिब्रे ऑफिसमध्ये आज मराठी स्पेलचेकर प्लस इन्स्टॉल केला. त्यानंतर मी काही देवनागरी मजकूर लिहून तो निवडून मग वर्ल्ड आयकॉनवर टिचकी मारली. परंतू त्यावर काहीच न होता एक नवीन रिकामे डोक्युमेंट उघडले जात आहे. मी https://extensions.libreoffice.org/en/extensions/show/20640 ह्या पानावरच्या सर्व सूचना पाळून पाहिल्या, पण समस्या तशीच आहे. काय गडबड होत असावी?
१) त्या मजकुरातील काही शब्द
१) त्या मजकुरातील काही शब्द लाल रंगात अधोरेखित होत आहेत का? त्यावर राईट क्लिक केल्यावर अपेक्षित पर्याय दिसत आहेत का? जर तुमच्या मजकुरात एकही चूक सापडली नसेल तर असे होणे बरोबर आहे. "मराठी प्लस" साठी मूळ मराठी स्पेलचेक अॅड ऑन इन्स्टॉल असणे आवश्यक आहे.
२) इंग्रजी स्पेल चेक प्लस योग्य प्रकारे चालत आहे का?
३) मी लिब्रे ऑफिसची नवीन आवृत्ती टेस्ट करून पाहिली आहे. जुन्या आवृत्तीत हे नीट चालते की नाही ते मला माहीत नाही.
अच्छा. तुमचा कयास बरोबर होता.
अच्छा. तुमचा कयास बरोबर होता. मी मूळ मराठी स्पेलचेक अॅड ऑन इन्स्टॉल केलाच नव्हता. इंग्रजीही नव्हता. आता व्यवस्थित सर्व चालू झाले आहे. अनेक आभार!
जीबोर्ड" च्या अॅटो
जीबोर्ड" च्या अॅटो करेक्टविषयी
ते तरी कुठून उचलणार? महाराष्ट्र सरकारकडे अधिकृत मसुदा मागविणार. त्यांनीच तो चुकीचा दिला नसेल कशावरून?
खाली दिलेल्या ओळी अॅटो
खाली दिलेल्या ओळी अॅटो करेक्टमध्ये टाकून स्पेल चेक अॅड ऑन नवीन बनविले.
block-list:block block-list:abbreviated-name=".*ु" block-list:name="ू" /
block-list:block block-list:abbreviated-name="अधी.*" block-list:name="अधि" /
block-list:block block-list:abbreviated-name=".*ध्द.*" block-list:name="द्ध" /
याचा अर्थ शब्दाच्या शेवटी जर र्हस्व उकार आला तर तो आपोआप दीर्घ होईल.
शब्दाच्या सुरुवातीला 'अधी' प्रत्यय आला तर तो 'अधि' असा र्हस्व होईल.
'ध्द' हे जोडाक्षर शब्दात कुठेही आले तरी ते 'द्ध' असे बदलले जाईल.
काही अपवादात्मक प्रसंगात यामुळे शुद्ध शब्द अशुद्ध शब्दात बदलला जाईल. उदाहरणार्थ 'अधीर' हा शब्द
'अधिर' असा होईल. तसे झाले तर undo या बटणावर क्लिक करून किंवा control + Z वापरून तो शब्द पूर्ववत करता येईल. 'अधिर' शब्द तसाही चुकीचा असल्यामुळे त्याखाली लाल रेघ येईल आणि राईट क्लिकवर 'अधीर' असा योग्य पर्याय दिसेल तो स्वीकारता येईल. अशा शब्दांची वारंवारता फार कमी आहे तर त्या मानाने अधीकार/ अधीकारी असे चुकीचे शब्द फार मोठ्या प्रमाणात वापरात आहेत. स्पेल चेक ऐवजी अॅटो करेक्ट मधील रेग्युलर एक्स्प्रेशन वापरून सुधारणा करण्याची ही कल्पना कोणाला अनावश्यक (किंवा आक्षेपार्ह / आक्रमक) वाटत असेल तर तसे लिहावे म्हणजे खाली दिलेल्या यादीचा फेरविचार करता येईल.
.*अा.* आ
.*आे.* ओ
.*आै.* औ
.*आॅ.* ऑ
.*अॅ.* ॲ
.*अॅ.* ॲ
.*ऎ.* ऐ
.*ाे.* ो
.*ाॅ.* ॉ
.*ॉं.* ाँ
.*ॅं.* ँ
.*र्य.* ऱ्य
.*र्ह.* ऱ्ह
.*ध्द.* द्ध
अभी.* अभि
प्रती.* प्रति
अनू.* अनु
अधी.* अधि
अती.* अति
.*ु ू
खाली दिलेले सर्व शब्द (वाटत नसले तरी) मराठीच्या/युनिकोडच्या नियमांनुसार चुकीचे आहेत.
अांबा आेसरी आैषध आॅन अॅपल ऎतिहासिक आजाेबा पाॅलिश कॉंग्रेस वर्हाड दर्यात शुध्द अभीमान प्रतीपादन अनूभव अधीकार अतीप्रसंग वाळु
Tools - Autocorrect - apply हा पर्याय वापरला तर वर दिलेले सर्व शब्द आपोआप बदलून मिळतील. हे असे...
आंबा ओसरी औषध ऑन ॲपल ऐतिहासिक आजोबा पॉलिश काँग्रेस वऱ्हाड दऱ्यात शुद्ध अभिमान प्रतिपादन अनुभव अधिकार अतिप्रसंग वाळू
टाईप करताना किंवा टाईप करून झाल्यावर अॅटोकरेक्ट "अप्लाय" करता येतो. लिब्रे ऑफिसच्या रायटरमधील ही सोय किती वेळ आणि श्रम वाचविते हे मायक्रोसॉफ्ट वर्डचा आग्रह धरणार्यांनी लक्षात घ्यायला हवे.
छान सुविधा.
छान सुविधा.
अॅटोकरेक्ट >> इथे कृपया ऑटोकरेक्ट असं लिहाल का? बऱ्याच दिवसांपासून सांगायचं होतं.
टेलिग्राममध्ये हे चार बॉट
टेलिग्राममध्ये हे चार बॉट उपलब्ध आहेत. टेलिग्राम हे व्हॉट्स-अॅप सारखेच एक अॅप आहे जे तरुणांमध्ये तसेच विद्यार्थीवर्गात खूप लोकप्रिय आहे.
MarathiSpellbot
टाईप केलेला किंवा गूगल लेन्समधून कॉपी/ पेस्ट केलेला मराठी मजकूर स्पेल चेक करून मिळेल. स्क्रीनशॉट
_____
SandhiSplitBot
संस्कृत शब्दाचा संधी विग्रह करून मिळेल. जर "कर्मण्येवाधिकारस्ते" असे टाईप केले तर "कर्मणि एव अधिकारः ते" असे उत्तर मिळेल. स्क्रीनशॉट
_____
SanskritSandhibot
दोन किंवा अधिक शब्दांची पाणिनीय सूत्रानुसार संधी करून मिळेल. जर "गण ईश उत्सव" असे टाईप केले तर मिळेल "गणेशोत्सव" स्क्रीनशॉट
_____
GuruChatGPTBot
तुम्ही विचारलेल्या (इंग्रजी भाषेतील) कोणत्याही प्रश्नाचे उत्तर चॅट जीपीटी देईल. माझ्या माहितीप्रमाणे चॅट बॉट इंग्रजीशिवाय इतर कोणत्याही भाषेत नीट उत्तर देऊ शकत नाही. त्याचे ट्रेनिंग एक-दोन वर्षांपूर्वी झाले असल्यामुळे नवीन घडामोडी त्याला माहीत नाहीत आणि काही वेळा अत्यंत चुकीची माहिती अतिशय आत्मविश्वासपूर्वक देतो! स्क्रीनशॉट
संस्कृत स्पेलचेक, संधी आणि
संस्कृत स्पेलचेक, संधी आणि विग्रह या प्रत्येकासाठी स्वतंत्र बॉट न बनविता एकच बॉट बनविला आणि त्याला नाव दिले "संस्कृत वन". (SanskritOneBot)
https://t.me/SanskritOneBot
टेलिग्रामच्या या बॉटला जर एकच शब्द दिला तर तो शब्द शुद्ध आहे की नाही ते पाहतो आणि शक्य असेल तर संधी विग्रह करून देतो. उदाहरणार्थ मी "कर्मण्येवाधिकारस्ते" असा शब्द दिला. त्याला प्रतिसाद असा मिळाला...
[{"message": "no spelling error found"}, {"कर्मण्येवाधिकारस्ते": "कर्मणि एव अधिकारः ते"}]
तर मेसेज असा आहे की हा शब्द शुद्धलेखनाच्या दृष्टीने बरोबर आहे. आणि त्याचा विच्छेद "कर्मणि एव अधिकारः ते" असा आहे.
_____
दोन शब्दांपेक्षा जास्त (जास्तीत जास्त १९) शब्द या बॉटला दिले तर तो त्याची संधी करून देतो. उदाहरणार्थ मी रामायणातील हा श्लोक दिला.
कः अनु अस्मिन् सांप्रतं लोके गुणवान् कः च वीर्यवान् धर्मज्ञः च कृतज्ञः च सत्यवाक्यः दृढव्रतः
बॉटने सर्वप्रथम स्पेल चेक करून सांगितले की यात काही शुद्धलेखनाची चूक नाही. त्यानंतर त्याने याची संधी करून दिली.
[{"message": "no spelling error found"}, {"कः अनु अस्मिन् सांप्रतं लोके गुणवान् कः च वीर्यवान् धर्मज्ञः च कृतज्ञः च सत्यवाक्यः दृढव्रतः": "कोऽन्वस्मिन्षांप्रतंलोकेगुणवान्कश्चवीर्यवान्धर्मज्ञश्चकृतज्ञश्चसत्यवाक्योदृढव्रतः"}]
पूर्वीच्या काळी कागद महाग असे तेव्हा जागा वाचविण्यासाठी म्हणून संधी अवश्य केली पाहिजे असे पाणिनी म्हणाले असतील असे मला वाटत होते. पण युनिकोडच्या जमान्यात देखील संधीमुळे सुमारे १०% डाटा वाचतो!
x = 'कः अनु अस्मिन् सांप्रतं लोके गुणवान् कः च वीर्यवान् धर्मज्ञः च कृतज्ञः च सत्यवाक्यः दृढव्रतः'
len(x)
92
y = 'कोऽन्वस्मिन्षांप्रतंलोकेगुणवान्कश्चवीर्यवान्धर्मज्ञश्चकृतज्ञश्चसत्यवाक्योदृढव्रतः'
len(y)
81
संधी मुळे वाचनाचा वेग वाढतो आणि गद्य मजकुराला पद्यासारखी गेयता येते.
_____
१९ शब्दांपेक्षा जास्त शब्द दिले तर विग्रह किंवा संधी करण्याचा प्रयत्न न करता बॉट फक्त ते शब्द शुद्धलेखनाच्या दृष्टीने बरोबर आहेत की नाही इतकेच पाहील. सोबत दिलेल्या स्क्रीनशॉटमध्ये आपण पाहू शकतो की "व्याख्यनमेव" आणि "संक्षिप्तपरिचयं" हे दोन शब्द चुकीचे म्हणून वेगळे काढले गेले आहेत. संधी न करता "संक्षिप्त परिचयं" लिहा अशी सूचना आहे ती दुर्लक्षित करता येईल.
संस्कृत भाषेच्या अभ्यासकांना याचा उपयोग होऊ शकतो. मराठी भाषेतील अनेक शब्द संस्कृतमधूनच आलेले असल्यामुळे मराठी आणि अन्य भारतीय भाषिकांना देखील याचा उपयोग होईल.
ज्यांना प्रमाण लेखन नको असेल
ज्यांना प्रमाण लेखन नको असेल किंवा महामंडळाचे नियम मान्य नसतील त्यांनी मनःपूत इकार / उकार काढण्यापेक्षा ऊंझा - जोडणीचा स्वीकार करावा. ऊंझा-जोडणी म्हणजे गुजराती भाषा परिषदेने (मूलतः भाषाशुद्धी अभियान) ऊंझा येथे भरविलेल्या अधिवेशनात घेतलेल्या निर्णयानुसार (ठरावाप्रमाणे) र्हस्व-दीर्घ अशा दोन-दोन इ-ई, उ-ऊ, ऐवजी फक्त एकच ई व ऊ चा वापर करावा, अर्थात फक्त दीर्घ ई ( ी ) व र्हस्व उ ( ु ) चीच चिन्हे वापरली जावीत असा निर्णय घेण्यात आला. (उदा. वीद्या, शीक्षक, वीनंती, रुप, वधु, धुर इ. )
ऊंझा जोडणीने र्हस्व इ काढून टाकली असली तरी "उ" च्या बाबतीत मात्र र्हस्व उ काढून न टाकता दीर्घ ऊ काढून टाकला आहे.
त्याचे कारण भारतीय भाषात दीर्घ ऊ पेक्षा पहिला उ जास्त वापरला जातो. ही गोष्ट अगदी सोप्या पद्धतीने सिद्ध करता येईल.
# grep 'ू' mr_IN.dic | wc -l
2512
# grep 'ु' mr_IN.dic | wc -l
6058
स्पेल चेकच्या डेटाबेस मधील शब्दांमध्ये पहिला उ हा दुसर्या ऊ पेक्षा तीनपट जास्त वापरला गेला आहे. त्यामुळे ऊंझा जोडणीला अवैज्ञानिक किंवा अतार्किक मानण्याचे कारण नाही. फक्त आम्ही ऊंझा जोडणीचा स्वीकार केला आहे अशी तळटीप द्यावी म्हणजे प्रमाण लेखन वाचनाची सवय असलेली मंडळी तिकडे फिरकणार नाहीत आणि लेखकाला टीकेचा सामना करावा लागणार नाही. "ऊंझा" हा शब्ददेखील माहीत नसलेली असंख्य मराठी माणसे कळत - नकळत त्या पद्धतीने लिखाण करत आहेत. त्यांना २ गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील.
१) दुसरा ऊ आणि पहिला इ कुठेही वापरता येणार नाही. अगदी "आणि" हा शब्ददेखील "आणी" असा लिहावा लागेल.
२) शुद्धलेखनाचे इतर सर्व नियम जसेच्या तसे पाळावे लागतील. ऊंझा परिषदेने देखील ही गोष्ट मान्य केली होती.
http://www.maparishad.com/bhaji/diwali2007/shuddhalekhan/unzajodani
सावरकरांनी देवनागरी लिपीत सुधारणा सुचवून अ ची बाराखडी अशी लिहावी असे म्हटले होते.
अ आ अि अी अु अू अे अै अृ अॄ
त्या सूचनेचा कोणीही स्वीकार केला नाही. विनोबा भावे यांनी सर्व भारतीय भाषांनी एकाच लिपीचा स्वीकार करावा असा आग्रह धरला होता, त्याकडेही कुणी लक्ष दिले नाही. अरूण फडके यांनी मांडलेले सुलभीकरणाबाबतचे विचार वाचण्याची देखील तसदी कोणी घेत नाही.
https://www.arunphadake.com/2011/01/01/shuddhalekhanachesulabhikaran/
ऊंझा जोडणीचे मात्र काही प्रमाणात स्वागत / समर्थन होताना दिसले.
http://mr.upakram.org/node/1263
सुलभीकरणाचा एक प्रयत्न म्हणून याचे स्थान महत्त्वाचे आहे.
या चर्चेत आपण पाहिले की हल्ली
या चर्चेत आपण पाहिले की हल्ली "युनियन चा", "देण्या साठी", "लिहिण्या साठी" असे हिंदीसारखे शब्द तोडून लिहिण्याची फॅशन आली आहे. लिब्रे ऑफिसच्या रायटरमध्ये आपण जो मजकूर टाईप केला आहे किंवा कुठून कॉपी पेस्ट केला आहे, त्यात जर असे शब्द असले तर त्यातील स्पेस काढावी लागेल. त्यासाठी फाईंड - रिप्लेस हा पर्याय वापरता येईल. पण ४-५ वेळा असे शब्द शोधून बदलण्यात खूप वेळ जाईल. हा वेळ वाचविण्यासाठी मॅक्रो बनविता येईल. त्यामुळे एका मिनिटात सर्व काम होईल. त्यासाठी Tools - Macro - Organize Macro - Basic अशा मार्गाने जावे लागेल या चित्रात दाखविल्याप्रमाणे. त्यानंतर Edit बटणावर क्लिक करून या पानावर दिलेला कोड कॉपी - पेस्ट करावा लागेल. आता ReplaceList मॅक्रो निवडून Run बटनावर क्लिक करून प्रत्ययाच्या आधी आलेली स्पेस काढून टाकू शकतो. मजकूर जर बराच मोठा असेल तर अशी काही युक्ती करावी लागेल शुद्धलेखन तपासण्याचा वेळ वाचविण्यासाठी.
एका बॅनरवाल्याने "३र्यांदा
एका बॅनरवाल्याने "३र्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल अभिनंदन " अशी पाटी लावली आहे. "तिसऱ्यांदा" हा शब्द "तीनर्यांदा" (तो देखील आकड्यात) लिहावा लागतो हे पाहून मला धक्का बसला. त्याहून मोठा धक्का बसला जेव्हा मी हा शब्द स्पेल चेक करून पाहिला. कारण त्यात " तिसरा / तिसऱ्या" हा शब्द असला तरी "तिसऱ्यांदा" हा शब्दच नाही!
पहिल्यांदा सगळ्या शब्दांची यादी केली आणि स्पेल चेक केला.
पहिल्यांदा
दुसऱ्यांदा
तिसऱ्यांदा
चौथ्यांदा
पाचव्यांदा
सहाव्यांदा
सातव्यांदा
आठव्यांदा
नवव्यांदा
दहाव्यांदा
अकराव्यांदा
बाराव्यांदा
तेराव्यांदा
चौदाव्यांदा
पंधराव्यांदा
सोळाव्यांदा
सतराव्यांदा
अठराव्यांदा
यात हे लक्षात आले की फक्त चारच शब्द नव्याने जमा करावे लागतील.
दुसऱ्यांदा
तिसऱ्यांदा
चौथ्यांदा
नवव्यांदा
बाकी शब्दांसाठी खाली दिलेला एकच रूल पुरेसा आहे.
SFX q 0 व्यांदा .
या रूलचा अर्थ असा आहे की "पाच" + "व्यांदा" असा "पाचव्यांदा" शब्द बनेल. पण २, ३, ४ आणि ९ या आकड्यांसाठी हा रूल चालणार नाही. कोणी जर "तीनव्यांदा" असे टाईप केले तर स्पेलचेक तो शब्द चुकीचा आहे असे सांगणार नाही कारण तीन शब्दाला "q" टॅग लागलेला आहे. पण त्या बॅनरमध्ये पाहिल्याप्रमाणे अगदी टोकाचे लेखन करणारे देखील "तीनव्यांदा" असे टाईप करत नाहीत किंवा बोलतानादेखील तसे बोलत नाहीत.
एकोणीस पासून पुढे अठ्ठेचाळीस पर्यंतच्या शब्दांसाठी "q" या सफिक्स रूलमध्ये एक रूल अॅड केला.
SFX q ीस िसाव्यांदा ीस
यामुळे अठ्ठेचाळिसाव्यांदा हा शब्द बनू शकेल. त्यापुढील शब्द म्हणजे उदाहरणार्थ बासष्टव्यांदा, त्रेसष्टव्यांदा वगैरे वापरात नसल्यामुळे त्यांचा विचार केला नाही.
देवनागरी चंद्रबिंदू ँ
देवनागरी चंद्रबिंदू ँ (युनिकोड : 0901) मराठीत अजिबात वापरला जात नाही. मात्र इंग्रजी शब्द मराठीत लिहिताना त्याचा उपयोग होतो. उदा. बँक, बाँब, पँट
हे शब्द परसवर्ण पद्धतीने देखील लिहिता येतात. उदा. पँट पॅण्ट पॅन्ट
पण स्पेलचेकच्या डेटाबेसमध्ये फक्त चंद्रबिंदू वापरून शब्द जमा केले गेले आहेत. त्यामुळे पहिला शब्द बरोबर दाखविला जात असून दुसर्या आणि तिसर्या शब्दाला पहिल्या शब्दाची सुचवणी येत आहे. इंग्रजी शब्द मूळ उच्चारानुसार लिहावा असा नियम आहे पण त्याचा मूळ उच्चार काय हाच वादाचा मुद्दा होऊ शकतो. म्हणून हे तीनही शब्द बरोबर म्हणून समजले जातील अशी व्यवस्था हंस्पेलच्या नियमात थोडा बदल करून केली.
ICONVॅ म् ँ
ICONVॅ न् ँ
ICONV ॅण् ँ
मराठीत नसलेला पण इंग्रजी शब्द लिहिताना लागणारा स्वर म्हणजे ◌ॅ (U+0945) आणि ॲ (U+0972) उदा. कॅमेरा, ग्रॅम, टोमॅटो, ॲपल
अवांतरः
युनिकोड हे अत्यंत विचारपूर्वक आणि काटेकोरपणे बनविलेले मानक आहे यात शंकाच नाही. पण मराठीच्या "र्य" आणि "र्ह" चा युनिकोडमध्ये समावेश न करून त्यांनी मराठीवर फार मोठा अन्याय केला आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की मी ज्या ज्या मराठी माणसांबरोबर या विषयावर बोलायचा प्रयत्न केला त्या सर्वांनी माझी ही अपेक्षा कशी अवास्तव / अनावश्यक आहे हे अगदी ठासून सांगीतले!
LLB हा शब्द सोप्या पद्धतीने
LLB हा शब्द सोप्या पद्धतीने एलेल्बी / एल्एल्बी असा लिहिता येतो. पण ते दोन्ही शब्द चुकीचे आहेत. एलएलबी किंवा एल्एल्बी असे पायमोडके लिहिले पाहिजे. हलन्त "एल्" काढायचे असेल तर ते काही इनपुट मेथडमध्ये फार कठीण आहे. मी युबंटू मधील आयबसमध्ये उपलब्ध असलेला गमभन की-बोर्ड वापरतो. लिब्रे ऑफिसच्या रायटरमध्ये हा शब्द अशा पद्धतीने लिहिता येतो.
el(control + shift + u 200c)(space)el(control + shift + u 200c)(space)bI
el टाईप केले की "एल्" असे उमटते. त्यानंतर की-बोर्ड बदलून इंग्रजी करतो आणि control + shift + u असे टाईप करतो. त्यानंतर जॉईनरचा संकेतांक 200c टाईप करून स्पेस देतो. याचा अर्थ त्या "ल" चा पाय आता कायमचा मोडला गेला आहे. त्यापुढे "बी" टाईप केले तरी "ल्बी" असे जोडाक्षर तयार होणार नाही. ही ट्रिक विंडोज / लिनक्सच्या कोणत्याही इनपुट मेथडमध्ये वापरता येते. एक शब्द टाईप करताना दोन वेळा की-बोर्ड बदलून युनिकोड संकेतांक वापरणे माझ्या जीवावर आले आहे. सुदैवाने पाय मोडके अक्षर काढण्याची वेळ फार वेळा येत नाही, पण याला दुसरा काही उपाय आहे का?
The full form of LLB is
The full form of LLB is Bachelor of Legislative Law. In Latin, LLB stands for Legum Baccalaureus. The abbreviation LLB is derived from Legum Baccalaureus.
माझ्या मते LLB हे एलएलबी असे लिहायला हवे, एल्एल्बी असे नाही.
तुमचे म्हणणे काही प्रमाणात
तुमचे म्हणणे काही प्रमाणात बरोबर आहे. अरुण फडके यांच्या मते तो शब्द असा हवा...
एल्एल. बी.
शुद्धलेखनाचे इतर नियम - भाग ७ या व्हिडीओत अरुण फडके यांनी ही गोष्ट स्पष्ट केली आहे.
https://www.youtube.com/watch?v=zFSgD14Itr8
(The double 'L' in LLB stands for the plural "laws.")
इंग्रजी आद्याक्षरे शब्दाच्या आत आली तर त्यांचा पाय मोडावा लागतो. मात्र शब्दाचे शेवटचे अक्षर असेल तर ते पूर्ण लिहावे.
फडके यांच्या मते:
बी. एस्सी. असे लिहू नये.
बी. एससी. असे देखील लिहू नये.
बी. एस. सी. हे देखील चूक
बी. एस्सी. हे मात्र बरोबर.
एस्व्हीसी बँक (शामराव विठ्ठल को-ऑपरेटिव्ह) या शब्दातील एस हा पाय मोडका लिहिला जातो. (बँकेच्या अधिकृत बोर्डावर आणि जाहिरातीत देखील) स्पेलचेकच्या डेटाबेसमध्ये मी पाय मोडके आणि अखंड अशी दोन्ही आद्याक्षरे घेतली आहेत त्यामुळे तुम्ही एसव्हीसी बँक असे लिहिले तरी त्या शब्दाखाली लाल रेघ येत नाही. एस. टी. हा शब्द एकत्र लिहायचा झाला तर एस्टी असा लिहावा. एस्टी लिहू नये. (हा त्या व्हिडीओचा मी काढलेला निष्कर्ष आहे. माझे मराठी इयत्ता दहावीनंतर "सुटलेले” आहे!)
माझा मुद्दा एलएलबी या शब्दाविषयी किंवा इंग्रजी आद्याक्षरांविषयी नसून पायमोडके अक्षर काढण्याची युनिकोडमधील सर्वात सोपी इनपुट मेथड कोणती असा होता.
मी PramukhIME हे अँड्रॉईड ॲप
मी PramukhIME हे अँड्रॉईड ॲप वापरतो. त्यामधे
एल^^एल^^बी असं टाईप केलं की एल्एल्बी असं लिहिलं जातं.
अवांतर: S.T. म्हणजे State
अवांतर: S.T. म्हणजे State transport, त्यामुळे एस. टी. किंवा एसटी असा लिहिला पाहिजे.
मी देखील प्रमुख भक्त असून
१) प्रमुखची अँन्ड्रॉइडची लिंक दिल्याबद्दल धन्यवाद. पण माझ्या फोनवर काही कारणाने ते अॅप इन्स्टॉल झाले नाही.
२) "एस. टी. किंवा एसटी असा लिहिला पाहिजे." हा मुद्दा समजला. पण पाय मोडके अक्षर सोप्या पद्धतीने कसे काढायचे हा प्रश्न उरतोच.
मी देखील प्रमुख भक्त असून विंडोजवर तेच वापरतो. त्यात दोन डॅश देऊन नॉन जॉईनर टाकता येतो. अधिक माहिती याच धाग्यात १८ एप्रील २०२१ च्या पोस्टमध्ये मिळू शकेल. पण युबंटू या प्रणालीत प्रमुख चालत नाही. तिथे आयबसमध्ये उपलब्ध असणारे गमभन वापरतो. त्यात एल्एल्बी हा शब्द लिहिण्याकरता शिफ्ट आणि स्पेस द्यावी लागते असे दिसते.
el(shift + space)(.h)el(shift + space)(.h)bI
.h म्हणजे हलन्त तो ल ला जोडण्यासाठी त्या दोघांमध्ये नॉन जॉईनर टाकावा लागतो. नॉन जॉइनरसाठी shift + space ही सोपी युक्ती आहे. युनिकोडचा संकेतांक लक्षात ठेवायची गरज नाही!
सुनील यांच्या प्रतिसादात
सुनील यांच्या प्रतिसादात त्यांनी ज्या पद्धतीने एल्एल्बी असं लिहिलं (एल^^एल^^बी) तीच पद्धत बरहाच्या इन्स्क्रिप्ट की-बोर्ड मध्ये देखील वापरता येते. पण जर बरहाचा फोनेटिक की-बोर्ड वापरत असाल तर पाय मोडके अक्षर काढण्याची काहीच सोय नाही. इतकेच नाही तर थेट युनिकोड संकेतांक वापरून एखादे अक्षर टाईप करण्याची देखील सोय नाही. थोडक्यात बराहमध्ये फोनेटिक पद्धतीने टाईप करणार्यांना काही वेळा तरी की-बोर्ड बदलावाच लागतो किंवा कॉपी-पेस्टचा आधार घ्यावा लागतो.
ही माझी ऐकीव माहिती आहे. जाणकारांनी सुधारणा करावी. मी बराह वापरत नाही कारण ते फुकट मिळत नाही. "फ्क्त दोन् हजार" माझ्यासाठी दोऽन हजाऽऽर रुपऽऽऽये इतके मोठे आहेत. शिवाय बराहचा सेट-अप प्रमुखपेक्षा मोठा असल्यामुळे त्याला मेमरी देखील जास्ती लागते. आणि ओपन सोर्स सॉफ्टवेअर नसल्यामुळे त्यात काही बदल / सुधारणा करता येत नाहीत.
इतर कुठून मजकूर टाईप करून
इतर कुठून मजकूर टाईप करून लिब्रे ऑफिसच्या रायटरमध्ये आणला असेल तर राईट क्लिकवरील Paste Special - Unformatted Text हा पर्याय वापरू. आता Tools - Autocorrect – Apply हा पर्याय वापरून घेऊ आणि मग लाल अंडरलाईन असलेल्या शब्दांचा स्पेल चेक करून घेऊ.
ही पहिली पायरी पूर्ण झाली की फॉर्मेटिंग चालू. सर्वप्रथम F11 वापरू. त्यात पहिलाच आयकॉन Paragraph Style चा असून Default Paragraph Style या पर्यायावर राईट क्लिक करून new… हा पर्याय निवडला. स्टाईलचे नाव मुद्दामच मराठीत लिहिले म्हणजे ते इतरांपेक्षा वेगळे दिसेल. आता पुढील पायऱ्या अशा आहेत...
Step 1
Right click on Default Paragraph Style and choose New...
Step 2
Choose a name for your custom style
Step 3
Alignment Tab - Justify
Step 4
Text Flo Tab - Hyphenation - Automatically - 3 characters at line end / Deselect Page
Step 5
Font Tab - Shobhika Regular / Style - Regular / Size - 11 pt
शोभिका हा फाँट जिटहबवर उपलब्ध आहे.
आपल्याला हवी तशी स्टाईल बनवून झाली की मग एक पॅराग्राफ सिलेक्ट केला किंवा सर्व मजकूर सिलेक्ट करण्यासाठी Control + a वापरला. आता नव्यानेच बनविलेल्या स्टाईलच्या नावावर डबल क्लिक केली की काम झाले. फाईल नेहमीप्रमाणे सेव्ह केली. प्रिंट करण्यासाठी file - Export as PDF हा पर्याय निवडला. त्यात हे दोन पर्याय निवडले. १) Hybrid PDF (embed ODF file) २) Archival (PDF/A, ISO 19005) पहिल्या पर्यायामुळे पीडीएफ फाईल मध्ये काही बदल करायचे झाल्यास ते शक्य होईल आणि दुसर्या पर्यायामुळे शोभिका फाँट कोणत्याही प्रिंटरवर नीट प्रींट होईल.
स्टाईल न वापरता टूल बारवरील जुने-पुराणे आयकॉन वापरले तरी चालेल. पण लिब्रे ऑफिस नेहमी वापरणारे स्टाईलचाच आग्रह धरतात आणि तो आग्रह रास्त आहे!
Pages