बांबूकला शिबीर : एक सुंदर अनुभव

Submitted by मनिम्याऊ on 5 June, 2024 - 10:38

नागपुरात बालजगत या संस्थेतर्फे दरवर्षी बाळ-गोपाळांसाठी विविध उन्हाळी शिबिरांचे आयोजन केले जाते. यात अडीच वर्षांच्या बाळांपासून ते १२-१३ वर्षांच्या किशोरांसाठी अनेकविध उपक्रम असतात. यात पोहणे, कराटे, बास्केटबॉल अशा शारीरिक खेळांबरोबरच विविध हस्तकला, गायन-वादन , शास्त्रीय नृत्य तसेच इंग्लिश व संस्कृत भाषेचे वर्ग घेतले जातात. या व्यतिरिक्त बुद्धिबळ, नाट्यकला, रांगोळी,बाल -संस्कारवर्ग इ. अनेक शिबिरे राबवली जातात.
नागपूर शहराच्या मध्यवर्ती भागात सुमारे २ एकर जागेवर वसलेल्या या निसर्गसुंदर 'बालजगत' मध्ये नावाप्रमाणेच बालगोपाळांचा सतत राबता असतो. मुलांना इथे कुठलेही बंधन नाही. मुक्तपणे खेळा, घरून आणलेला खाऊ खा. इथे मोठमोठी अनेक झाडे आहेत. त्यांच्या खाली मंडपम नावाच्या छोट्या छोट्या कुट्या बांधलेल्या आहेत. त्यात विविध वर्ग चालू असतात. शिवाय २ जलतरण तलाव आहेत. १ लहान तर एक मोठे मुक्त रंगमंच आहे. एक कृत्रिम टेकडी तयार करुन त्याखाली बोगदा व त्यासमोर छान तळे आणि बगीचा जोपासला आहे. मुलांनी हवे तिथे खेळायचे. बालजगतचे स्वयंसेवक आज्या, मावश्या, काका-मामा सर्वांवर लक्ष ठेवून असतात. आमच्या पिढीसाठी नागपुरात उन्हाळी सुट्ट्या म्हणजे बालजगत असेच समीकरण होते. आता आमची मुलेसुद्धा तेव्हढ्याच आवडीने बालजगतला आपले म्हणत आहेत.

माझी मुलगी विजयालक्ष्मी, दरवर्षी उत्साहाने वेगवेगळ्या शिबिरांमध्ये भाग घेऊन नवनवीन कलाप्रकार शिकते. यावर्षी तिला कराटे व फोनिक्सच्या वर्गाव्यतिरिक्त 'बांबू-कला' चे शिबीर लावले होते. रोज सकाळी १ तास असे १५ दिवस जाऊन तिने सुंदर सुंदर वस्तू या सुट्टीत बनवल्या आहेत. तशी तिला मुळातच आर्ट आणि क्राफ्ट ची आवड आहे आणि हे शिबीर केल्यावर तिला आणखी नव्यानव्या कल्पना मिळाल्या.

तिने तयार केलेल्या काही कलाकृती येथे देते. शिबिरात फक्त मूळ वस्तू बनवायला शिकवली आहे. बाकी सजावट वगैरे विजयलक्ष्मीने आपल्या मनाने केली आहे.
१. पेन स्टॅन्ड
Penstand1.jpeg.jpg२. वॉल हँगिंग
WH.jpeg.jpg३. शेतघर : यात झोपडी आणि कुंपण तयार करायला शिकवले. बाकी बैलगाडी हिनेच तयार केली. कार्डबोर्ड वर फेविकॉल लावून त्यावर रांगोळी पसरून शेत बनवले, त्यात फिशटॅन्क साठी आणलेली शोभेची झाडे लावली. आणि एक बाहुली उभी केली. बाहुलीचे नाव ख़ुशी. त्यामुळे हे तयार झाले खुशीचे घर.
Khushihouse1.jpeg.jpg
खुशीचे घर.. रात्री
Khushinight1.jpeg.jpg
.
४. षट्कोनी घर
house1.jpg
या घरात तिने बगीचा, घरामागे तळे, अंगणात बसायला बाकडे व झुला केला आणि वर गच्चीत खाट आणि इटुकला टि-टेबल सेट ठेवला.
tea table.jpg
.
यात सजावटीसाठी वापरलेली झाडे म्हणजे भोकरांचे देठ आहेत. लोणच्यासाठी भोकरे आणली असता त्यांची देठे रंगवून तिने एका रिकाम्या झालेल्या फेविकॉलच्या बाटलीचा सुंदर फ्लॉवरपॉट तयार केला होता.
Bhokar3.jpg
दिवेलागण झाल्यावर षट्कोनी घर
housenight1.jpg
.
५. एक बंगला था न्यारा..
atharva31.jpg
.
आमच्या शेजारचे घर.. " 'अथर्व' बंगला
आता ते पाडून तिथे उंच इमारत बांधणे सुरु आहे. त्या जुन्या बंगल्याच्या आठवणीनिमित्त त्या घराची तंतोतंत प्रतिकृती तयार केली. गार्डन, अंगणातला झोपाळा, कारचे शेड सगळे होते तसेच बनवले. अगदी बाल्कनीतला झुला देखील तसाच बसवला.
atharv_11.jpg
मागची बाजू
back1.jpg
.
दिव्यांची रोषणाई केली
रात्री उजळून निघालेला 'अथर्व' बंगला
atharvanight1.jpeg.jpg
.
अशा प्रकारे आमची उन्हाळ्याची सुट्टी सत्कारणी लागली.. हि तर फक्त एक मज्जा.. आणखी बऱ्याच गमतीजमती केल्या सुट्ट्यांमध्ये ..

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्तच! विजयालक्ष्मीच्या हातात कला आहेच जोडीला तिला पेशन्सही आहे. किती बारकाईने सर्व केले आहे! भोकरांच्या देठांना रंगवून केलेली सजावट तर भारीच!

फारच सुंदर! विजयालक्ष्मी हरहुन्नरी आहे हे तुमच्या पोस्ट्सवरून लक्षात येतं. तिला खूप शुभेच्छा.
बांबूच्या कामट्या बालजगतमधली मोठी माणसं करून देतात का?
बालजगतचं वर्णनही छान. पुण्यात गरवारे बालभवन आहे, त्याची आठवण झाली. तिथेही वर्षभर आणि विशेषतः सुट्ट्यांमध्ये मुलांसाठी विविध उपक्रम चालू असतात.

धन्यवाद अश्विनी, वावे आणि स्वाती

@वावे, बांबूच्या कामट्या बांबू कला शिबिराचे प्रशिक्षक स्वतः करून देतात. मुलांना चाकू हाताळायला मनाई आहे.
बालभवन बद्दल माहीत न्हवत. आता सुट्टी नंतर पुण्याला परत गेले की चौकशी करते.

एकसे एक बढकर बनवली आहेत घर विजयालक्ष्मीने. अप्रतीम, सुन्दर, कल्पकतापूर्ण कलाकृती, विजयालक्ष्मी. असेच छान छान करत रहा बेटा.

अरे किती भारी आहे हे.. त्या घरांमध्ये लाईट वगैरे लाऊन अगदी सुंदरच.. आणि अगदी प्रोफेशनल.. या वस्तूंचा स्टॉल लावला तर हातोहात खपतील सर्व कलाकृती Happy

किती सुंदर केलंय हे!!
आणि तो बंगला आठवण म्हणून अशा प्रकारे जपणं हे खूप टचिंग वाटलं मला. खूप छान!

अरे व्वा, भारीच आहे.
आणि मोठ्या चिकाटीचे काम आहे.

रोषणाई देखील सुंदर दिसते आहे.
विजयालक्ष्मी चांगली प्रकाश योजनाकार आहे.
अभिनंदन आणि शुभेच्छा.