श्रोडिंगरची मांजर, एनटॅन्गल्मेंट आणि भारतीय मतपेटी

Submitted by चामुंडराय on 28 May, 2024 - 18:00

क्वांटम फिजिक्समध्ये श्रोडिंगरची मांजर हा एक अतिशय प्रसिद्ध असा वैचारिक प्रयोग आहे. तुम्ही समजा एखाद्या मांजरीला एका बॉक्समध्ये बंद केले आणि त्यामध्ये जहाल विष यादृच्छिकपणे (randomly) सोडले जाईल अशी व्यवस्था केली तर बॉक्स उघडे पर्यंत ती मांजर जिवंत आहे की मृत हे कळणार नाही. म्हणजे जोपर्यंत आपण बॉक्स उघडत नाही आणि मांजरीचे निरीक्षण करत नाही तोपर्यंत मांजर एकाच वेळी मृत आणि जिवंत आहे. क्वांटम फिजिक्समध्ये ह्या अवस्थेला सुपर पोझिशन असे म्हणतात. (Superposition is the ability of a quantum system to be in multiple states at the same time until it is measured)

भारतीय मतपेटीमध्ये सध्या राजकीय भविष्य दडलेले असल्याने आत्ताच्या सरकारची आणि विरोधकांची स्थिती श्रोडिंगरच्या मांजरीसारखी आहे. दोन्ही बाजूंकडून विजयाचे दावे केले जात आहेत म्हणजे दोन्ही बाजू एकाच वेळी विजयी आणि पराभूत आहेत. मत पेटी उघडल्यावरच कोण जिंकले आणि कोण पराभूत झाले आहे हे उमगणार आहे म्हणजे भारतीयांच्या भवितव्याची मांजर जिवंत की मृत हे कळणार आहे.

क्वांटम फिजिक्समध्ये Entanglement ची संकल्पना आहे. (Quantum entanglement is when two particles link together in a certain way no matter how far apart they are in space) दोन एनटॅन्गल्ड पार्टीकल्स भौतिकदृष्ट्या कितीही दूर असले तरी एका पार्टीकलच्या निरीक्षणातून दुसऱ्या पार्टीकलची परिस्थिती समजते आणि एका पार्टीकलमध्ये काही बदल केला तर तक्षणी दुसऱ्या पार्टीकलमध्ये बरोबर विरोधी बदल होतो. मत मोजणी करताना एक उमेदवार पुढे असेल तर त्याचा विरोधक उमेदवार (हिंदीत निकटतम प्रतिद्वंद्वी) मागे पडतो आहे हे कळणार आहे किंवा दुसरा पुढे असेल तर पहिला मागे आहे हे समजणार आहे. एक जिंकला तर तक्षणी दुसरा पराभूत झाला आहे हे कळणार आहे. अशा रीतीने भारतीय मतपेटीत सध्या सद्यकालीन सरकार आणि विरोधक Entangled अवस्थेत आहेत.

नेहेमीच्या क्लासिकल फिजिक्स आणि क्वांटम फिजिक्स मध्ये तीन प्रकारचे सिद्धांत* आहेत.
आईन्स्टाईनची थेअरी ऑफ रिलेटिव्हीटी
हायझेनबर्गचे अन्सर्टन्टी प्रिन्सिपल
आणि
गोडलचा इन्कम्प्लिटनेस थेअरम्

हे सिद्धांत मतपेटीला कसे लागू होतात? मत मोजणीनंतर जो कोणी उमेदवार विजयी होईल त्याला तुलनात्मक दृष्ट्या (relatively) इतरांपेक्षा जास्त मते मिळणार आहेत. जो पर्यंत मतपेटी उघडून मत मोजणी होत नाही तो पर्यंत कोण जिंकणार आणि कोण हरणार ह्या बद्दल अनिश्चितता (uncertainty) असणार आहे. विजयी उमेदवारावर त्याचे विरोधक EVM घोटाळा, मतदार यादी घोटाळा, बनावट मतदाते इत्यादी आरोप करून त्याला यशाचा निर्भेळ आनंद मिळू देणार नाहीत आणि जर एखाद्या पक्षाला बहुमताजवळ जाऊन ही पूर्ण बहुमत नसेल तर अपूर्णत्वेची जाणीव होईल ( incompleteness).

सतरंज्या उचलणारे आणि एकमेकांचे डोके फोडणारे विरोधी कार्यकर्ते एकीकडे तर एकमेकांची गळाभेट घेणारे त्यांचे व्यासपीठावरील विरोधी नेते दुसरीकडे, हे बघितल्यावर माझ्या सारख्या सामान्य नागरिकाला राजकारण हे क्वांटम फिजिक्स सारखे दुर्बोध आणि आकलनाच्या पलीकडले न वाटले तरच नवल. आता चार तारखेला मतपेटीतून कोणाची मांजर जिवंत आणि कोणाची मृत निघते हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. ह्या खरडीचे कवित्व तेव्हढेच.

* शंभर सव्वाशे वर्षांपूवी शास्त्रज्ञ म्हणत असत की पुढील १०० वर्षांत विज्ञानाला विश्वासंबंधी सर्वकाही कळेल. परंतु क्वांटम फिजिक्सच्या शोधानंतर अतिशय विचित्र, अनाकलनीय, अतार्किक, गूढ गोष्टी समोर येऊ लागल्या त्यातून हे वरील सिद्धांत तयार झाले. निश्चित माहिती हाती लागण्याऐवजी अनिश्चीततेत भर पडली.

आमच्या डोंबोलीच्या यू-ट्युबर गुरुदेवांच्या मते "माया, माया" म्हणतात ती हीच.
सब माया हैं ।
जय गुरुदेव _/\_

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे हे, मस्त जमले आहे हे. Proud

अनिश्चित्ता सिद्धांता प्रमाणे दोन related पैरामीटर एकाच वेळी अचूक पणे मोजता येत नाही. एक कमीतकमी चूक मोजले तर दुसऱ्याची तेवढीच अनिश्चितता वाढते.

जसे किती काम केले आणि किती भ्रष्टाचार केला हे दोन पैरामीटर्स: किती भ्रष्टाचार केला हे पहायला गेले तर काय व किती काम केले यातील दाव्याची हवा निघु लागते.
किती काम केले इकडे लक्ष केंद्रित केले तर भ्रष्टाचाराकडे तेवढेच दुर्लक्ष करावे लागते.

Lol वाह! डेमोक्रॅटिक रिलॅटिव्हीटी.

हे अजून जरा...

लोकशाही ही स्थिर आहे. सर्वच पार्टीसाठी ती जिंकलेलीच असते.

जिंकलेल्या पार्टीचे गुरुत्वाकर्षण वाढल्याने छोटे मोठे अपक्ष लघुग्रह तिकडे आकर्षित होऊन पार्टीचे वस्तुमान वाढल्याने गुरुत्वाकर्षण अजूनच वाढते. कधी कधी तर एखादा अख्खा छोटा पक्षच तिकडे आकर्षित होतो. पण जरी गुरुत्वाकर्षण वाढले तरी इथे टाईम डायलेशनचा नियम वेगळा आहे. गुरुत्वाकर्षण वाढल्याने काळ संथ व्हायला हवा. पण इथे मात्र टाईम डायलेशन झाल्याने हरलेल्या पार्टीसाठी पुढील पाच वर्षे खूप संथ होतात तर जिंकलेल्या पार्टीसाठी जलद होतात.

हे जबरदस्त चपखल आहे.

फक्त आपल्या राजकारण्यांनी सुपर क्वांटम प्रिन्सिपल शोधलंय. म्हणजे निकाल लागण्यापूर्वी ज्या ज्या पक्ष्यांच्या विजयाच्या शक्यता असतात त्याव्यतिरिक्त नव्या शक्यता ते बॉक्स उघडल्यावरही निर्माण करू शकतात जेणेकरून मेलेलं मांजरही जिवंत होऊन बागडू लागेल.

जे निकाल लागण्यापूर्वी ज्या ज्या पक्ष्यांच्या विजयाच्या शक्यता असतात त्याव्यतिरिक्त नव्या शक्यता ते बॉक्स उघडल्यावरही निर्माण करू शकतात
>>>> Biggrin Biggrin मामी आपले नेते क्वांटम फिजिसिस्ट लोकांपेक्षा कमी आहेत का?

@चामुंडराय >>> आवडले तुमचे श्रोडिंगरचे मांजर ...... एवढ्या सोप्या शब्दात हा सिद्धांत कोणी सांगितला नसेल.

अनेक श्र्योडिंगरी मांजरांचे Wavefunction collapse झालेले पाहण्यास उत्सुक आहे. ४ जूनपर्यंत वाट बघणे अनिवार्य आहे.

अमितव, अस्मिता., कुमार१, देवकी, anjali_kool, Sparkle on, कमन, हरचंद पालव - प्रसंशात्मक प्रतिक्रिये बद्दल आभार
गुंता - काम आणि भ्रष्टाचार हे अनिश्चित्ता सिद्धांताचे दोन पॅरामीटर्स आहेत हि आयडिया भारी आहे.
अतुल. - भौतिक शास्त्रात गुरुत्वाकर्षण तर राजकारणात पॉवरात्वाकर्षण महत्वाचे आणि त्याला कांचनात्वाकर्षणाची जोड असते.
फार्स विथ द डिफरंस - एक डॉक्युमेंटरी बघताना Quantum Physics आणि भारतीय राजकारणाची सद्य स्थिती यातील साम्य जाणवले आणि हा विषय सुचला.
मामी - >>> मेलेलं मांजरही जिवंत होऊन बागडू लागेल. >>> हा हा, हे भारी आहे. भारतीय राजकारणी हे देखील करू शकतील.
MazeMan >>> आवडले तुमचे श्रोडिंगरचे मांजर >>> धन्यवाद. खरंतर राजकारणी मंडळींना श्रोडिंगरचे बोके म्हणायला पाहिजे. Happy
अनन्त्_यात्री - मतदार इफेक्ट मुळे बऱ्याच मंडळींचे Wavefunction collapse होईल.