अमेरिकेत रिटायरमेंट १): घर डाऊनसाईझ करावे की नाही

Submitted by sneha1 on 21 May, 2024 - 22:47

अमेरिकेत रिटायरमेंट असा वेगळा धागा सापडला नाही. आणि चर्चा करणे सोपे व्हावे म्हणून आर्थिक , तब्येत असे वेगळे धागे काढते आहे.

तर घर डाऊनसाईझ करावे की नाही का प्रश्न. घर मोठे असेल तर सांभाळणे जड जाते. तुम्ही राहता तेथे हवामान चांगले नसेल तर म्हातारपणी त्रास होतो, जसे बर्फ काढणे वगैरे. मोठे घर विकून दुसरे लहान घेतले तर आर्थिक फायदा होतो. त्यातही नवीन घर घेणे जमले तर त्याच्या दुरुस्तीचा सारखा त्रास होत नाही.
पण दुसरी बाजू. तुम्ही जिथे राहता तेथे तुमच्या ओळखी झाल्या असतात. नवीन ठिकाणी कदाचित नवे संबंध जुळायला वेळ लागू शकतो. घरावरचे कर्ज फिटलेले असू शकते.
असा खूप गोष्टींचा विचार करून निर्णय घ्यावा लागतो. क्राईम किती आहे, किती डॉक्टर्स मेडीकेअर घेतात हे पण बघावे लागेल कदाचित.
तर ह्या विषयावर मायबोलीकरांची मते जाणून घ्यायला आवडेल. चर्चा होईल आणि नवीन गोष्टी समजतील.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घर किती मोठे असायला हवे? प्रश्न व्यक्तीनिष्ठ आहे आणि सर्वांसाठी एकच उत्तर नसणार आहे.

मोठ्या घराची देखभाल करणे खर्चिक आहे. घराच्या टॅक्सचा आकडा, विज बिल (हिवाळ्यांत heating, उन्हाळ्यात थंड करणे), विम्याचे आकडे मोठे असतील. काहीच वापर नसेल तरी साफ- सफाई किंवा गरजेनुसार दुरुस्तीचे (रंगरंगोटी, शिंगल/ कौले बदलणे ) कामे करावीच लागणार आहेत. आमच्याकडे उन्हाळ्यांत चार महिने लॉन स्वच्छ ठेवणे आणि हिवाळ्यांत जवळपास सहा महिने स्नो/ बर्फ काढत रहाणे हे दोन कष्टाचे/ खर्चिक काम आहे. एक दोन दिवसांत ३० ते ५० सेमी स्नो काढून आपला परिसर स्वच्छ मोकळा ठेवणे मोठे आव्हान असते. हा झाला मनस्ताप

पर्यावरणाबद्दल गंभिर असाल तर सर्व काळांत लहान घर हा एक उत्तम पर्याय आहे. कमीत कमी गरजा ठेवायच्या. Happy

आता मोठ्या घराचे फायदे काय आहेत? लोकांचे येणे जाणे सरु रहाते, प्रशस्त घर असल्यावर त्यांनाही थोडा मोकळे पणा मिळतो. कधी काळी मुले/ नातवंडे / मित्र किंवा इतर पाहुणे मंडळी आल्यावर त्यांना कमी तडजोडी कराव्या लागतात. ते सतत येत रहावेत अशी पण गरज आहे. या वयांत बोलायला लोक हवेतच. तेव्हढेच तुम्ही पण गुंतलेले / रहातात. घर मोठे असेल तर हिवाळ्यांत घरांतच चालण्याचा व्यायाम करता येतो. अंगणात ( किंवा घरांतही) बगिचा असल्यास वेळ कसा जातो हे विचारायलाच नको. हा सर्व आनंद पैशांत मोजता येत नाही. Happy

अमेरिकेत ही स्पेसिफिक रिक्वायरमेंट असेल तर पास.

अन्यत्र कुठेही रिटायरमेंट साठी खालील ऑप्शन्स असावेत असे वाटते.
१. मुलं नातवंडं सोबत राहणार असतील , एकाच घरात राहणार असतील तर मोठे घर असायला हरकत नाही.
२. आपले छंद, आवडी निवडी जोपासणारे वातावरण आजूबाजूला मिळेल अशा ठिकाणी रिटायरमेंट साठी शिफ्ट व्हावे.
३. निवृत्तीनंतर आर्थिक स्त्रोत मर्यादीत असल्याने उगीच महागड्या शहरात राहून कर, मेन्टेनन्स यावरचा नाहक खर्च कमी करता आला तर पहावा.
शक्य असेल तर जवळपासच्या एखाद्या गावात स्वस्तात किमान गरजा भागवेल असे टुमदार छोटेखानी घर बांधावे. वयानुसार छोट्या घरांचा मेन्टेनन्स जमेल इतपतच ते असावे. टायनी होम्स म्हणून सर्च दिला तर अशा घरांचे डिझाईन्स मिळतात.
४. माझा प्लान स्वस्तात मिळेल तितकी शेतजमीन घेऊन मातीचे घर बांधून राहण्याचा असेल. कुत्री , दुभती जनावरं आणि भाजीपाला एव्हढी लागवड करता येईल ज्यामुळे सतत बिझी राहून तब्येत राखली जाईल. गरज पडल्यास मदतनीस सुद्धा नेमता येईल.