मद्यपानाचे वैद्यकीय निदान

Submitted by कुमार१ on 23 May, 2024 - 06:05
screenshot

माननीय प्रशासक,
सदर विषय संवेदनशील झालेला असल्याने हा लेख अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचावा असे वाटते. म्हणून तो ललित विभागात लिहीला आहे. आपण त्यास अनुमती द्यावी ही विनंती.
अग्रिम धन्यवाद !
***************************************************************************************************************************************
मद्यपान - एक बहुचर्चित आणि ज्वलंत विषय !!
समाजात विविध कारणांसाठी मद्यपान करणारी भरपूर माणसे आहेत. उत्सुकता, आवड, चैन, व्यसन आणि मानसिक असंतुलन अशा अनेकविध कारणांमुळे माणसे मद्यपान करतात. जोपर्यंत मद्यपि ही कृती त्यांच्या घरी शांततेत किंवा सार्वजनिक परवाना असलेल्या ठिकाणी स्वपरवान्यासह करीत असतात तोपर्यंत ते कायदेशीर ठरते.

शांतपणे मद्यपानाचा आस्वाद आणि आनंद घेऊन एखाद्याने कुठलीही कौटुंबिक अथवा सार्वजनिक समस्या निर्माण केली नाही तर अन्य समाज व कायदा यांना त्यात लक्ष घालण्याची गरज नसते. परंतु बेफाम मद्यपान करून सार्वजनिक गोंधळ घालणे, रस्त्यावर वाहन चालवणे किंवा अन्य आक्षेपार्ह कृत्य करणे अर्थातच बेकायदेशीर आणि समाजविघातक आहे. मद्यधुंद अवस्थेत स्वयंचलित वाहन चालवल्याने रस्त्यावरील अपघात होण्याची शक्यता कित्येक पटीने वाढते. अशा कितीतरी प्रसंगांत संबंधित वाहनचालक निष्पाप पादचाऱ्यांच्या किंवा अन्य वाहनचालकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले आहेत. अशा घटना वारंवार घडताना दिसतात. नुकत्याच घडलेल्या अशा एका गंभीर घटनेने संपूर्ण राज्यभर जनक्षोभाची लाट उसळलेली आहे.

हा विषय अर्थातच व्यापक असून त्याला वैद्यकीय, न्यायिक आणि सामाजिक पैलू आहेत. वैद्यकीय दृष्टीने पाहता सर्वात महत्त्वाचा प्राथमिक प्रश्न हा असतो की,
एखाद्या बेधुंद संशयित व्यक्तीने खरोखरीच मद्यपान केलेले आहे काय?

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी डॉक्टर संबंधित माणसाची तीन टप्प्यांमध्ये तपासणी करतात :
1. संबंधिताची मद्यपानाची कबुली
2. शारीरिक तपासणी आणि
3. प्रयोगशाळा चाचण्या

आता हे मुद्दे विस्ताराने पाहू.
१. मद्यपानाची कबुली : जेव्हा संशयित मद्यपी डॉक्टरांकडे आणला जातो तेव्हा सर्वप्रथम डॉक्टर त्याला ‘बोलते’ करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्याच्याकडून कबुलीजवाब घ्यायचा प्रयत्न अर्थातच केला जातो. समजा, त्याने जबाब देण्यास नकार दिला किंवा तो अर्धबेशुद्ध अवस्थेत असेल, तर त्याच्या बरोबरीच्या माणसांकडून माहिती मिळवली जाते. त्यामध्ये कोणत्या प्रकारचे, प्रतीचे (देशी/ विदेशी/हातभट्टी, इ.) आणि किती मद्यपान केले आहे हे मुद्दे महत्त्वाचे ठरतात.

2. शारीरिक तपासणी : मद्यप्याच्या जवळ जाताच त्याच्या श्वासाला मद्याचा वास येतो आहे का ते प्रथम पाहिले जाते. त्यानंतर त्याच्या एकंदरीत अवस्थेनुसार डॉक्टर त्याची शुद्धीची पातळी, सामान्य प्रश्नांना दिलेली उत्तरे आणि एकंदरीत देहबोलीचे निरीक्षण करतात.
आतापर्यंतच्या विचारपूस आणि निरीक्षणातून बऱ्याचदा बराचसा अंदाज येतो. अर्थात मद्यपीच्या हातून जर फौजदारी गुन्हा घडला असेल तर मद्यपानाचे निदान पुराव्यासह सिद्ध होणे अत्यावश्यक असते. त्या दृष्टीने प्रयोगशाळा चाचण्यांना महत्त्व आहे. अशा रासायनिक चाचण्यांची माहिती, उपयुक्तता आणि मर्यादा यांचा आढावा आता घेतो.
प्रत्यक्ष चाचण्यांकडे वळण्यापूर्वी ethyl अल्कोहोलच्या शरीरातील चयापचय आणि उत्सर्जनासंबंधी काही मूलभूत माहिती घेऊ.

अल्कोहोलचा शरीरप्रवास
अल्कोहोल पचनसंस्थेत गेल्यानंतर लहान आतड्याच्या सुरुवातीच्याच भागातून त्याचे वेगाने शोषण होते. सुमारे 30 ते 90 मिनिटांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होते. (अल्कोहोलच्या रक्तपातळीचा उच्चबिंदू मद्यपान पूर्ण संपल्यानंतर सुमारे 30 मिनिटांपासून तीन तासांपर्यंत असू शकतो. मद्यपान रिकाम्या पोटी केले असता तो लवकर येतो हे उघड आहे आणि मद्यपानाच्या आणि अन्न खाण्याच्या प्रमाणानुसार तो उशिराने येतो). अल्कोहोल रक्तप्रवाहात गेल्यानंतर पुढील चयापचयासाठी यकृतात ( 90%) पोहोचते. तिथे काही एंझाइम यंत्रणांच्या मदतीने त्याचे acetaldehyde >> acetic acid मध्ये रुपांतर आणि अंतिमतः कार्बन डाय ऑक्साईड आणि पाण्यात रूपांतर होते. प्रौढांच्या तुलनेत मुलांमध्ये या चयापचयाची गती काहीशी अधिक राहते. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या रक्त-अल्कोहोलपातळीचा उच्चबिंदू अधिक असतो; स्त्रियांमधील मेदाचे प्रमाण जास्त असल्याचा हा परिणाम.

अल्कोहोलचे उत्सर्जन मूलतः लघवीतूनच होते. त्याच्या जोडीने ते श्वास, घाम आणि शौचामार्फतही थोड्या प्रमाणात होते. श्वासातून बाहेर पडणाऱ्या आणि रक्तात असणाऱ्या अल्कोहोल प्रमाणाचे गुणोत्तर सरासरी 2100 असते (म्हणजे 1 mL रक्तामध्ये जेवढे अल्कोहोल असते तेवढेच अल्कोहोल 2100 mL श्वासात असते). तर लघवीतील आणि रक्तातील अल्कोहोलचे गुणोत्तर 1.4 असते. मद्यपानानंतर एक तासाने लघवीतील अल्कोहोलचे प्रमाण उच्च बिंदूवर असते.

प्रयोगशाळा चाचण्या
विविध प्रकारच्या चाळण्या उपलब्ध असून त्यासाठी श्वास, रक्त, लघवी आणि थुंकीचे नमुने उपयुक्त असतात.

श्वास चाचणी
यासाठी दोन प्रकारची उपकरणे असतात. त्यापैकी सर्वात सुटसुटीत म्हणजे हातात मावणारा श्वासमापक. हा चाळणी चाचणीसाठी वापरला जातो. रस्त्यावर बेफाम वाहनचालकांची पोलिसांच्याद्वारे तपासणी केली जाते तेव्हा याचा उपयोग केला जातो. खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे संशयित व्यक्ती त्या उपकरणाच्या वरील भागातून तोंडाने जोरात श्वास सोडते. या पद्धतीने श्वासाचे दोन नमुने तपासले जातात. त्यानंतर उपकरणाच्या स्क्रीनवर अल्कोहोलचे अंदाजे प्रमाण एक मिनिटभरात ++/+ /- या स्वरूपात दर्शवले जाते. दोन नमुन्यांच्या रीडिंगमध्ये जर 15 टक्क्याहून अधिक फरक आला तर एरर दर्शवली जाते आणि चाचणी विश्वासार्ह नसते
alco  br1.jpg

शास्त्रशुद्ध श्वासमापक चाचणी अशी असते :
1. सभोवतालच्या हवेची मोजणी ब्लँक चेक म्हणून करतात.
2. त्यानंतर प्रमाणित अल्कोहोल (35 μg/100 mL air) यंत्रावर तपासले जाते. अशा प्रकारे उपकरण प्रमाणित होते. (35 μg/100 mL air : हे प्रमाण देशानुसार बदलेल).

3. त्यानंतर संशयीताचा पहिला श्वास मोजला जातो
4. त्यानंतर पुन्हा एकदा भोवतालच्या हवेचे मापन होते

5. त्यानंतर दुसरा श्वास मोजला जातो
6. सर्वात शेवटी पुन्हा एकदा हवा आणि प्रमाणित अल्कोहोल मोजले जाते.

ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यास संबंधित व्यक्तीला पोलीस स्थानकात नेऊन तिथे पुढची वरच्या दर्जाची चाचणी केली जाते, जी न्यायालयीन पुराव्यासाठी अधिकृत असते.
या चाचणीमध्ये खालील चित्रात दाखवल्यानुसार संबंधित व्यक्ती तोंडात धरलेल्या पाईपद्वारा श्वसन करत राहते.

alc br 2.jpg
संबंधित उपकरण fuel अथवा इन्फ्रारेड सेलच्या तत्वावर काम करते. व्यक्तीने सोडलेल्या श्वासाचे सलग पृथक्करण केल्यानंतर अल्कोहोलच्या प्रमाणाचा आलेख सुमारे 10 मिनिटांत मिळतो.
alc 3.jpg

या चाचण्या करण्यास अतिशय सोप्या असल्या तरी त्यांच्या निष्कर्षाबाबत बऱ्याच मर्यादा लक्षात घ्याव्या लागतील :
1. वेळमर्यादा : एखाद्या व्यक्तीने चाचणी करण्यापूर्वी काही मोजक्या तासांपूर्वीच मद्यपान केलेले असल्यास चाचणी वैध ठरते.

2. तोंडातील इतर घटक : मद्यपानानंतर जर काही सुगंधी रसायनांनी गुळण्या केल्या किंवा श्वास दुर्गंधीनाशकाचा वापर केला अथवा अल्कोहोलयुक्त औषध घेतले असल्यास त्याचा निष्कर्षावर परिणाम होतो.

3. उपकरणीय घटक : संबंधित उपकरणाचे प्रमाणीकरण आणि नित्यनेमाने देखभाल करणे आवश्यक असते. तसेच उपकरणाची बॅटरी आणि sensor यांचेही काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. अल्कोहोलच्या एका विशिष्ट कमाल मर्यादेपर्यंतच या चाचणीने शोध घेता येतो. तसेच ही चाचणी करणाऱ्या तंत्रज्ञाचे कौशल्यही विचारात घ्यावे लागते.

4. वातावरणीय घटक : बाह्य तापमान, आर्द्रता, तसेच त्या व्यक्तीची श्वसन पद्धत ( मुद्दामून श्वास रोखून धरणे किंवा बळेबळे दीर्घश्वसन करणे) यांचाही निष्कर्षावर परिणाम होतो.

5. आरोग्य घटक : अल्कोहोलच्या चयापचय-गतीतील व्यक्तीभिन्नता, शरीराचे तापमान, फुफ्फुसक्षमता आणि श्वसनाचा व्हॉल्युम हे घटकही निष्कर्षावर परिणाम करतात. तसेच त्या व्यक्तीला जठराम्लतेचा (reflux) अथवा तीव्र मधुमेहाचा त्रास असल्यास त्याचाही विपरीत परिणाम होतो. अनियंत्रित मधुमेहामध्ये श्वसनातून ऍसिटोन बाहेर टाकले जाते.

6. कायदेशीर आव्हान : या चाचणीची अचूकता, विश्वासार्हता आणि शास्त्रशुद्ध नोंदणी यांवर न्यायालयात बचाव पक्षाकडून हरकतीचे मुद्दे येऊ शकतात, नव्हे, येतातच !

रक्तचाचणी
ही प्रत्यक्ष मद्यपानानंतर शक्य तितक्या लवकर करतात. साधारणपणे एक पेग ‘हार्ड’ मदयपानानंतर एक तासाच्या आत रक्त घेणे आवश्यक (a detection window of approximately 1 h per drink consumed). यासाठी व्यक्तीच्या शिरेतून रक्त काढले जाते. ते काढण्यापूर्वी एक महत्त्वाची खबरदारी घ्यावी लागते. ज्या जागी इंजेक्शनची सुई टोचतात तिथे जंतुनाशक म्हणून कुठल्याही अल्कोहोलयुक्त द्रावणाचा वापर करायचा नसतो. (काही अन्य पर्याय वापरतात). रक्त काढून झाल्यावर तो नमुना व्यवस्थित सीलबंद करतात. आता तो प्रयोगशाळेत पाठवल्यानंतर 4 तासांच्या आत त्याची तपासणी करणे आवश्यक असते.
या चाचणीतून आपल्याला रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण नेमके समजते. त्यामुळे ही चाचणी वैद्यकीय आणि न्यायवैद्यकीय प्रकरणांत प्रमाण-चाचणी म्हणून प्रस्थापित झालेली आहे. या चाचणीचा निष्कर्ष आणि संबंधित व्यक्तीची एकंदरीत अवस्था व निर्णयक्षमता यांची व्यवस्थित सांगड घालता येते.
गुन्हेगारी प्रकरणांमध्ये ही अत्यंत महत्त्वाची चाचणी न्यायवैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये केली जाते आणि तिथे ती अत्याधुनिक गॅस क्रोमॅटोग्राफी किंवा त्याहून आधुनिक GC-MS या पद्धतीने केली जाते. या उपकरणांचे प्रमाणीकरण आणि देखभाल अत्यंत काळजीपूर्वक करावी लागते. तसेच ती हाताळायला उत्कृष्ट प्रशिक्षित तंत्रज्ञ नेमले जातात.

लघवीची चाचणी
लघवीमध्ये उतरणारे अल्कोहोल हे विविध रूपांमध्ये असते - चयापचय न झालेले अल्कोहोल आणि चयापचयादरम्यान निर्माण झालेली अल्कोहोल-संयुगे. लघवीतील प्रत्यक्ष अल्कोहोलची मोजणी तांत्रिकदृष्ट्या विश्वासार्ह नसते आणि कटकटीची असते. तसेच ते उशिराने उत्सर्जित होत असल्यामुळे त्याची रक्तातील अल्कोहोल पातळीशी सांगड घालणे कठीण जाते. त्यामुळे त्याच्या काही संयुगांवर आधारित चाचण्या केल्या जातात.
अल्कोहोलच्या चयापचयातून ethyl glucuronide (EtG) या नावाचे एक संयुग तयार होते आणि ते लघवीत उत्सर्जित होते. जर एखाद्याने बेसुमार मद्यपान केलेले असेल तर लघवीतील हा घटक त्या घटनेनंतर 5 दिवसांपर्यंत शोधता येतो. कमी प्रमाणात मद्यपान केले असल्यासही या चाचणीतून ते उघड होते. या चाचणीचा उपयोग अधिकतर रुग्णांच्या बाबतीत केला जातो. मात्र गुन्हेगारीच्या प्रकरणांमध्ये या चाचणीचा पुरावा म्हणून विचार अद्याप बाल्यावस्थेत आहे.

( रच्याकने,
EtG हे संयुग संबंधित व्यक्तीच्या केसांमध्येही जाऊन बसते आणि ते चाचणीने शोधता येते. मद्यपानाच्या कित्येक महिन्यांनानंतर देखील हा दीर्घकाळ टिकणारा पुरावा ठरतो आणि त्यात खोटेपणा करणे अवघड असते).

महत्त्वाची टीप :
१. वर उल्लेख केलेल्या आणि अन्य काही चाचण्यांची अल्कोहोल शोधण्याची आणि मोजण्याची संवेदनक्षमता भिन्न असते. कुठलीही चाचणी 100% उत्कृष्ट (ideal) म्हणता येत नाही. या चाचण्यांचे निष्कर्ष व्यक्तीच्या वय, लिंग, वजन, मद्यपानाची सवय, वारंवारिता आणि अवलंबित्व या घटकांवर अवलंबून असतात. तसेच त्या व्यक्तीच्या दीर्घकालीन आजारांचा आणि औषधोपचारांचाही या निष्कर्षांवर प्रभाव पडतो. मद्यपिच्या डॉक्टरांनी केलेल्या शारीरिक तपासणीला पूरक मदत म्हणूनच चाचण्यांचा विचार केला जातो.

२. या चाचण्यांमधून अल्कोहोलचे निदर्शनास आलेले प्रमाण आणि रस्त्यावर वाहन चालवण्याच्या अल्कोहोल-प्रमाणमर्यादेच्या कायद्यांमध्ये देशांनुसार भिन्नता आहे. तसेच खाजगी आणि सार्वजनिक वाहनचालकांसाठी काही देशांमध्ये वेगळे नियम असून सार्वजनिक वाहनचालकांना कामादरम्यान मद्यपनाची अजिबात परवानगी नाही, तर खाजगी वाहनचालकांना अल्कोहोलच्या अल्पमर्यादेपर्यंत परवानगी आहे. ते सर्व तांत्रिक तपशील या लेखाच्या कक्षेबाहेर आहेत.
****************************************************************************************************
संदर्भ :
1. https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC1124861/#:~:text=As%20the%2....
२.
https://watermark.silverchair.com/labmed30-0530.pdf?token=AQECAHi208BE49...

३. विविध वैद्यकीय पाठ्यपुस्तके
. . . . . . . .
चित्रसौजन्य : BMJ

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

योग्य वेळी आलेला लेख !

एक कुतूहल आहे -

रक्तवारुणी 'सोबत' चीझ खाल्ले असता मद्याचा अंमल कमी होतो आणि अधिक काळ राहतो हे नक्की माहित आहे. पण मद्यपाना 'नंतर' आणि चाचणी 'पूर्वी' मेदयुक्त पदार्थ भरभर खाल्ले तर रक्तातली मद्य पातळी चाचणीत कमी येते हे खरे का ?

1. ऑनलाईन मिळणारे डिटेक्टर >>> या बद्दल काही माहिती किंवा अनुभव नाही.
***********
2. मद्यपाना 'नंतर' आणि चाचणी 'पूर्वी' मेदयुक्त पदार्थ भरभर खाल्ले तर
>>>
मेद पदार्थ भरपूर खाल्ल्यास जठरातील अल्कोहोल पुढे आतड्यांमध्ये सरकण्याचा वेग कमी होतो हे बरोबर. त्यामुळे उपाशीपोटी फक्त अल्कोहोल पिणाऱ्याच्या तुलनेत वरील प्रकारात रक्तातील उच्चबिंदू काहीसा कमी आणि जरा उशिराने येईल. पण . . .
या प्रकारात पुन्हा एकदा व्यक्तिभिन्नता आहे. मद्याचे प्रमाण आणि दर्जा, व्यक्तिगत चयापचयाची क्षमता, मेद पदार्थाचा प्रकार आणि प्रमाण यासारख्या विभिन्न घटकांमुळे वरील परिणामामध्ये फरक दिसून येतील.

चांगला लेख. डीयुआय करुच नये. पण एक कायद्याच्या दृष्टीने प्रश्न म्हणून,
भारतात वाहन चालवण्यास रक्तातील मद्यपातळी किती प्रमाणात चालते? कॅनडात आमच्या राज्यांत वाहनचानलाचा पूर्ण परवाना असेल तर ०.०८% पर्यंत चालते. ( ८० मिगॅ/ १०० मिली). अर्थात परत एकदा असं कधीही करू नयेच.

योग्य वेळी आलेला माहितीपूर्ण लेख ! +१
एका वेळेस खूप दारू प्यायली तर हृदयावर परिणाम होतो का?

एका वेळेस खूप दारू प्यायली तर हृदयावर परिणाम होतो का?
>>> होय, काही जणांमध्ये होऊ शकतो.
अल्कोहोलच्या एकदम झालेल्या खूप डोसमुळे हृदयाच्या स्नायूंवर विपरीत परिणाम होतो आणि त्यामुळे हृदयतालबिघाड निर्माण होतात. या प्रकाराला ‘हॉलिडे हार्ट सिंड्रोम’ असे मजेशीर नाव आहे.

ज्यांना हा सिंड्रोम होतो त्यांच्यात बहुतेक वेळा पूर्वी कुठलाही हृदयविकार नसतो. अशा लोकांनी काही दिवस मद्यपानापासून पूर्ण दूर राहिले तर हा बिघाड आपोआप नाहीसा होतो ( 90% लोकांत).

तिथे काही एंझाइम यंत्रणांच्या मदतीने त्याचे acetaldehyde >> acetic acid मध्ये रुपांतर>>>>
यात एक केमिस्ट्री चा भाग म्हणजे, अल्कोहोल चे पहिल्या स्टेप मध्ये ऑक्सिडेशन होऊन आल्डिहाइड ( इथाईल अल्कोहोल चे असिटाल्डिहाइड ) तयार होते आणि आल्डिहाइड चे परत ऑक्सिडेशन होऊन ऍसिड ( असिटाल्डिहाइड चे असिटीक ऍसिड ) तयार होते. या दोन्ही री ऍक्शन चा वेग व्यक्तिपरत्वे ( एंझाइम कॉन्सन्ट्रेशन ) बदलत असतो.
दुसऱ्या दिवशी येणार हँग ओव्हर हा शरीरात असिटाल्डिहाइड किती आहे त्यावर अवलंबून असतो. ज्याची बॉडी असिटाल्डिहाइड चे असेटिक ऍसिड मध्ये रूपांतर फास्ट करते त्याला हँग ओव्हर जाणवत नाही किंवा ज्या व्यक्तीचा अल्कोहोल चा इन टेक त्याच्या शरीरातील असिटाल्डिहाइड चे असेटिक ऍसिड मध्ये रूपांतर करायच्या वेगा पेक्षा कमी आहे, त्याला देखील हँग ओव्हर चा त्रास जाणवत नाही.

दुसरा अजून एक भाग म्हणजे, मिथेनॉल शरीरात गेले कि त्याचे फॉर्मलडिहाइड आणि फॉर्मिक ऍसिड बनते. फॉर्माल्डिहाइड चे अतिशय कमी प्रमाण देखील शरीराला टॉक्सिक असते आणि खूप कमी वेळात रेटिना खराब करते, त्यामुळे कायमस्वरूपी अंधत्व येते आणि मृत्यू देखील होऊ शकतो. ( देशी दारू मुळे होणाऱ्या मृत्यू मध्ये हेच मिथेनॉल कारणीभूत ठरते. उदा. व्होल्टाम दुर्घटना ). गंमत म्हणजे मिथेनॉल विषबाधेवर उपचार म्हणून इथेनॉल वापरले जाते.

गंमत म्हणजे मिथेनॉल विषबाधेवर उपचार म्हणून इथेनॉल
>>>
होय, या मागचे विज्ञान रंजक असून वैद्यकीय अभ्यासात ते नेहमी चर्चिले जाते.
इथेनॉल व मिथेनॉल या दोघांवरही अल्कोहोल डिहाइड्रोजनेज हेच एन्झाईम कार्यरत होते. परंतु या एन्झाईमची इथेनॉलशी असलेली जवळीक मिथेनॉलपेक्षा 15 पट अधिक आहे. त्यामुळे मिथेनॉल विषबाधेच्या उपचारांमध्ये याचा समावेश केला जातो. परंतु जर का रुग्णाला दृष्टीचा त्रास होऊ लागला तर तातडीने Hemodialysis करणे आवश्यक असते.
….
निपा, आठ दिवसांपूर्वी तुम्हाला संपर्क केला होता (स्पॅमसह) मेल पाहिलीत का ?

निपा, आठ दिवसांपूर्वी तुम्हाला संपर्क केला होता (स्पॅमसह) मेल पाहिलीत का ? >> डॉ. साहेब, मेल आलेली नाहीय. मी पण पाठवून बघतो तूम्हाला संपर्कातून मेल.

छान लेख आणि माहितीपूर्ण प्रतिसाद, कुमार आणि निपा.
एका मित्राच्या जास्त मद्यपानानंतर तिसऱ्या दिवशी सकाळी (३६ तासांनंतर) दुसऱ्या काही कारणास्तव ईसीजी काढला तेव्हा ड्युटी डॉक्टरने ईसीजी पाहून काल जास्तच ड्रिंक्स घेतले म्हणुन ऐकवले होते.

* ड्युटी डॉक्टरने ईसीजी पाहून
>>> वरील सिंड्रोमचे उदाहरण म्हणायला हरकत नाही.

निपा,
मेल मिळाली व तुम्ही दिलेल्या पत्त्यावर उत्तर दिले.

रक्ताचे नमुने घेतात तसे श्वासाचे नमुने फुग्यात भरून घेतले तर?
----------------
दारूच्या अंमलाखाली गाडी चालवून अपघात केल्यास होणारी शिक्षा दारू न पिता झालेल्या अपघातापेक्षा जास्ती असते म्हणून हा सर्व खटाटोप. दोन्हींसाठी एकच शिक्षा ठेवावी.

श्वासाचे नमुने फुग्यात
>>> श्वास गोळा करण्यासाठी विविध प्रकारची उपकरणे (Tedlar Bags, Canisters, इ. ) असून नंतर त्या श्वासाचे पृथक्करण करण्याचे breath metabolomics हे विज्ञान अलीकडे विकसित होत आहे.

सध्या तरी त्याचा उपयोग वैद्यकीय आणि संशोधन कार्यामध्ये केला जाईल.
या प्रकारातील प्रमाणीकरण अवघड असते. त्यामुळे न्यायवैद्यकीय प्रकरणांमध्ये त्याचा विचार सध्या तरी होणे अवघड वाटते.
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC5563344/

डॉ कुमार, छान माहितपुर्ण लेख.

SRD, ( जरी डॉक्टरांच्या पुढील प्रतिसादात कळले की ही गोष्ट सध्या तरी feasible नाही), तरी तुमची श्वास फुग्यात भरून ठेवण्याची कल्पना आवडली. पुढे न्यायालयीन प्रक्रियेत उपयोग होऊ शकतो.

पुण्याच्या घटनेत दारु प्यायलेले सापडू नये म्हणून त्याला पिझ्झा खाऊ घातला असे ऐकले. पिझ्झा आणि दारूच्या चाचणीचा काय संबंध आहे?

पिझ्झामध्ये संपृक्त मेद मोठ्या प्रमाणात असतात. वर या प्रतिसादामध्ये (Submitted by कुमार१ on 23 May, 2024 - 17:16) मेद पदार्थ खाणे आणि अल्कोहोलच्या रक्तातील पातळीचा उच्चबिंदू याचे स्पष्टीकरण दिलेले आहे.

अर्थात प्रस्तुत घटनेमध्ये संबंधिताने किती वाजता अल्कोहोल घेतले होते, किती वाजता पिझ्झा दिला होता इत्यादी गोष्टी आपल्याला खात्रीने माहित नसल्याने त्यावर थेट प्रतिक्रिया देणे बरोबर नाही.

सर्व प्रतिसादकांना धन्यवाद !
*****************************************

मेद पदार्थांचा मुद्दा सध्याच्या घटनेत उत्सुकतेचा बनल्यामुळे त्याचे अधिक स्पष्टीकरण देतो.

जेव्हा आपण भरपूर मेद असलेले पदार्थ खातो आणि ते जठरात पोहोचतात तेव्हा पचनसंस्थेतून CCK हे हार्मोन स्रवते आणि त्याचा गुणधर्म म्हणजे, जठरातील अन्न पुढे आतड्यांमध्ये पाठविण्याचा वेग (gastric emptying) कमी करणे. आता याचा मद्यपानाशी संबंध असा येईल :
मद्यपानास सुरुवात करण्यापूर्वीच बऱ्यापैकी मेद खाणे आणि मद्यपान चालू असताना देखील मेदपदार्थांचे बकाणे भरत राहणे या दोन्ही कृती केल्या तर आपल्याला वरील हार्मोनचा परिणाम हा सर्वोत्तम जाणवेल.

या उलट, दर्दी पिणाऱ्या व्यक्तीने उपाशीपोटीच मद्यप्राशन चालू केले आणि शक्यतो कुठलेच खाण्याचे बकाणे भरले नाहीत तर त्याच्या बाबतीत अल्कोहोलचे शोषण भराभर होईल आणि रक्तपातळीही लवकर उच्चबिंदूस पोचेल.

पातळी आधीच वर/ उच्चबिंदूस गेलेली असेल आणि प्रत्यक्ष मद्यपान सुरू केल्यानंतर काही तासांनी आपण खूप मेद देणार असू तर त्या दोन गोष्टींचा विशेष संबंध राहणार नाही.

टेस्टींग सोपं व्हावं म्हणून ड्राइविंग लायसन देतानाच एक श्वासाचे सांपल ( म्हणजे अगदी आदर्श स्थिती) घेऊन त्याचा आलेख जोडून ठेवायचा. त्यांच्याशी नंतरची सांपल ताडून पाहता येईल.

त्याची आवश्यकता नाही वाटत.
प्रत्यक्ष श्वासमापक चाचणी अशी असते :
1. सभोवतालच्या हवेची मोजणी ब्लँक चेक म्हणून होते .
2. त्यानंतर प्रमाणित अल्कोहोल (35 μg/100 mL air)* यंत्रावर तपासले जाते. अशा प्रकारे उपकरण प्रमाणित होते.
3. त्यानंतर संशयीताचा पहिला श्वास मोजला जातो
4. त्यानंतर पुन्हा एकदा भोवतालच्या हवेचे मापन होते
5. त्यानंतर दुसरा श्वास मोजला जातो
6. सर्वात शेवटी पुन्हा एकदा हवा आणि प्रमाणित अल्कोहोल मोजले जाते.

तरुणपणी एखाद्याचा श्वासआलेख घेतला तर पुढे आयुष्यभर तो अगदी तसाच राहण्याची खात्री नाही. विविध प्रकारच्या सवयी, व्यसने आजार, औषधे याच्यामुळे मूलभूत श्वासामध्ये सुद्धा फरक पडेल.
म्हणूनच प्रत्येक तपासणीच्या वेळेलाच वरील पद्धत अवलंबलतात.

* (35 μg/100 mL air : हे देशानुसार बदलेल).

मुळातच श्वास चाचणीवर फार लक्ष केंद्रित नाही करता येणार कारण, शरीरातील बिघाड, रसायन-औद्योगिक वातावरणातील व्यवसाय, पर्यावरण इत्यादी अनेक घटकांमुळे श्वासांमध्ये खालील प्रकारची रसायने येतात :

Acetone, Methanol, Isopropanol, Ethyl Acetate, Toluene, Methyl Ethyl Ketone, Tert-Butanol, इ.

ही रसायने या चाचणीमध्ये अडथळा निर्माण करून false-पॉझिटिव्ह निकाल येण्याची शक्यता वाढते.
अंतिमतः रक्तचाचणीच निर्णायक राहील.

Pages

Back to top