[ नमस्कार श्रोतेहो. आजच्या एपिसोडमध्ये आपण एका किळसवाण्या लेखकाची मुलाखत पाहणार आहोत. जर तुम्ही आत्तापर्यंत आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताही करू नका. त्याचा काही उपयोग होणार नाहीये. काय तुमच्या एका सबस्क्रिप्शननं मी ताजा होणार नाहीये. बरं का. ]
प्रश्न : सर, हे जे भंगारछाप लाईफ चाललेलं आहे तुमचं, त्याबद्दल काय सांगाल आमच्या श्रोत्यांना?
उत्तर : तुम्ही आणि तुमचे श्रोते यांच्याशी मला काही देणं-घेणं नाहीये.
प्रश्न: तुमच्या बोलण्यातून निराशा टपकते. हे बरोबर आहे का?
उत्तर : होय. तुमचं निरीक्षण योग्य आहे आणि त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. मी निराश आहे. आणि मला लोकांनापण निराश करायचं आहे. ते मला आवडतं. माझं लाईफमिशन आहे ते. मी जे जगतोय ते होपलेस आहे. आणि लोकं जे जगतायत तेपण होपलेसच आहे. माझं लिखाण वाचून लोकांनी परागंदा व्हावं, देशोधडीला लागावं असं मला वाटतं.
प्रश्न : प्रेमाबद्दल तुम्हाला काय वाटतं?
उत्तर : प्रेम बीम काही माहित नाही मला. आणि नकोच आहे ते. अधूनमधून थोडा वेळ ठीक असतं. पण चोवीस तास प्रेम कोण सहन करणार? आणि कुणी मला झोपेतून उठल्यावर बघावं हे मला सहन होण्यासारखं नाही.
प्रश्न : तुमच्या संघर्षाबद्दल सांगा.
उत्तर : मी मिडलक्लास मनुष्य. मी कसला शाटाचा संघर्ष करणार ? मनातल्या मनात लढतो फारतर. आणि कशासाठी करायचा संघर्ष? तेवढं कशाबद्दल स्ट्रॉंगली काय वाटत नाही. पुस्तकांबद्दल वाटतं. पण तो सवयीचा भाग. दुसऱ्या कुणाला तसंच वाटावं यासाठी झगडायची गरज नाही.
प्रश्न : सगळ्यांनी असंच म्हटल्यावर कसं चालणार?
उत्तर : सगळ्यांनी असंच म्हणावं असं मी म्हटलेलं नाही. मी मला काय वाटतं ते सांगितलं.
प्रश्न: तुम्ही फोपशे आहात.
उत्तर : असेन. काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला?
प्रश्न: तुमचा असा हाडांचा सापळा कशामुळे झालेला आहे? काय खातपित नाही का?
उत्तर: माझं शरीर पहिल्यापासून हे असंच आहे. यापेक्षा वेगळं शरीर कुठून आणायचं मला माहित नाही. आणि आजपासून साठ सत्तर वर्षांनी आपल्या दोघांच्याही हाडांचे सापळे पंचतत्वात विलीन होऊन जाणार आहेत. त्यामुळे त्याबद्दल चर्चा करण्यात फार अर्थ नाही.
प्रश्न : या शहराबद्दल काय वाटतं तुम्हाला?
उत्तर : मी गावं परक्यासारखी बघितली. शहरंही तशीच बघितली. हे शहरही तसंच बघतो. संपूर्ण शहराबद्दल अशी काही ॲटॅचमेंट वाटत नाही. एखाद्या व्यक्तीबद्दल वाटू शकते. समष्टीबद्दल नाही.
प्रश्न: तुम्ही कुठल्यातरी भ्रामक बुडबुड्यात जगताय, असं नाही का वाटत तुम्हाला?
उत्तर : वाचून वाचून काय होणार दुसरं?
प्रश्न: तुमची पात्रं सारखी सारखी बारमध्ये का जाऊन बसतात?
उत्तर : मला दारू या क्षेत्रातला बऱ्यापैकी अनुभव आहे. त्यामुळे ते तसं होत असावं. आणि मी माझ्या पात्रांवर काही कंट्रोल ठेवत नाही. ती त्यांना हवं तसं उधळतात.
प्रश्न: तुम्ही मानसिक कोंडमारा विकून वाचकांची सहानुभूती मिळवता, हा आरोप खरा आहे का?
उत्तर : माझ्या आधीच्या काही मराठी लेखिकांनी जसा हा आरोप फेटाळून लावलाय, त्यांच्या डबल वेगाने मी हा आरोप फेटाळून लावतो.
प्रश्न : तुमच्यापुढचा डिलेमा काय आहे?
उत्तर: जॉब करावा की फक्त लिहित आणि वाचतच बसावं, हा मुख्य डिलेमा आहे. किंवा मग जॉब वगैरे सगळं सोडून पळूनच जावं दुसऱ्या एखाद्या राज्यात, की मग इथेच एखाद्या ढाब्यावर नाव बदलून काम करावं ? की ट्रेनमध्ये लोकाईंचं मनोरंजन करत गुजारा करावा, हा ही डिलेमा आहे. संन्यासाचे झटके यायचे पूर्वी. पण ते काही झेपणारं नाही, हे कळलं नंतर. तर मग हे सुखासीन मध्यमवर्गीय जिणं टिकवून ठेवत त्यातील किडुकमिडुक गोष्टी उत्तुंग थापांमध्ये कशा परावर्तित कराव्यात, हा ही एक डिलेमा असतो अधूनमधून.
प्रश्न: तुम्हाला काय पाहिजे?
उत्तर : रिकग्निशन. माझ्या लिखाणाबद्दल चांगलं बोललं गेलं पाहिजे. सदैव चांगलंच बोललं गेलं पाहिजे. हेच मला पाहिजे. बाकी काहीही मला फुलफिलमेंट देऊ शकत नाही.
प्रश्न: कशाचा तिरस्कार वाटतो?
उत्तर: जॉब. गर्दी-गोंगाट. धार्मिक उन्माद. कौटुंबिक उमाळे. लहान बाळांचं रडणं. थिएटरमध्ये सहकुटुंब येऊन अनावश्यक आवाज निर्माण करणं. पंगतीत जेवणं. सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होणं. कुणी अतिवैयक्तिक विचारपूस करणं. सणावारांचा, शुभेच्छांचा, उथळ बोलणाऱ्यांचा.
प्रश्न: निगेटिव्ह ट्रेट्स काय आहेत तुमचे?
उत्तर: सगळं निगेटिव्हच आहे. इतका वेळ काय बोलतोय मग मी? आणि काय हो, सगळे प्रश्न लिहूनच आणलेत की काय तुम्ही? होमवर्क करत चला जरा. की आले असेच उठून?
प्रश्न: सेक्स कडे बघण्याची तुमची नजर कशी आहे?
उत्तर : पुरेशी विकृत आहे. थोडीफार घाबरलेलीही असेल.
प्रश्न: विकृत म्हणजे? थोडासा अधिक उजेड टाकाल का?
उत्तर: नाही. तो उजेड तुम्हाला झेपेल असं वाटत नाही.
प्रश्न: तुम्ही समलैंगिकतेबद्दल लिहिता. तुम्हीही त्यापैकी आहात काय? तसे असल्यास मलाही तुमच्यापासून धोका संभवतो काय?
उत्तर: हे सगळे गैरसमज आहेत. मनुष्य समलिंगी असला की दिसेल त्याच्यावर झडप घालत नाही. तसं नसतं ते. हजारांत कधी एखादा क्लिक होतो. त्यानंतरही बरीच नियोजनं असतात. फ्लर्टींगचे दीर्घ खेळ असतात. खेळावे लागतात. आश्चर्य, हेटाळणी, कन्फेशन, रोमान्स, जेलसी, काळजी, छळवाद आणि हळूहळू स्वीकार, असं बरंच काही असतं ह्यातही.
बाकी, बायकांना काय, कुणीही पुरुष आवडू शकतो, किंवा समजा त्या आवडून आणि नंतर चालवूनही घेतात. आणि नंतर सगळ्या गावाला सांगत बसू शकतात. पण पुरूषाला जेव्हा एखादा पुरूष आवडतो, तेव्हा ती ऑलटुगेदर वेगळी गोष्ट असते. त्यासाठी मानसिक पातळीवर एक छुपं द्वंद्वयुद्ध चाललेलं असतं दोन्ही बाजूंनी. त्यात एखाद्या केसमध्ये कधी सरंडर व्हावंसं वाटू शकतं. तर दुसऱ्या एखाद्या केसमध्ये शांतपणे सरंडरची वाट बघत बसावं लागू शकतं. मानवी रिलेशनशिपमधली सगळी राजकारणं मात्र यातही असतात.
पण तुम्ही काही काळजी करू नका. तुम्हाला स्त्री-पुरुष किंवा इतर कुठल्याही प्राणीमात्रांपासून कसलाही धोका नाही.
प्रश्न: तुमच्या वैचारिक बांधिलकीबद्दल सांगा.
उत्तर: ती आपापल्या जागी असते. मी काही चोवीस तास विचारसरणी घेऊन चावत फिरत नाही. म्हणजे समजा मी बाथरूममध्ये उघडाबंब आंघोळ करत असतो सकाळी. त्या क्षणी कुणी येऊन माझी विचारसरणी विचारायला लागला, तर मी त्याला पुढच्या दारात जायला सांगू शकेन.
प्रश्न: तुम्ही जो रडण्याचा सिद्धांत मांडलाय, त्याबद्दल आमच्या श्रोत्यांना सांगा. थोडक्यात सांगा. लांबड लावू नका प्लीज.
उत्तर: माणसानं भरपूर रडलं पाहिजे. रडून झाल्यावर ट्रान्सफॉर्म होतो माणूस. जगजीवन वेगळं वाटायला लागतं. अश्रू सगळं स्वच्छ धुवून टाकतात. शरणागती, कन्फेशन जे काही आहे ते. आपण स्रोताच्या निकट जातो. इन-ट्यून होतो. ताण सैलावतो. गोष्टी जरा क्लिअर होतात. त्यामुळं भरपूर रडावं. रडू येत नसेल तर आठवून आठवून रडावं. त्यासारखी थेरपी नाही. रडणं आतल्या आत दाबून ठेवणारे सायको होत जातात.
प्रश्न: थोडंसं रडून दाखवणार का आमच्या श्रोत्यांना ?
उत्तर: नाही.
प्रश्न: का हो? किमान एक हुंदका तरी ?
उत्तर : नाही. रडण्यासाठी एकांत आवश्यक असतो. कॅमेऱ्यात बघून रडण्याची सिद्धी मला अवगत नाही. मी काही प्रधानप्रचारक नाही.
प्रश्न : तुम्ही जगाकडे कसं बघता?
उत्तर: इच्छा तर आहे की जसं आहे तसं बघावं. पण मानसिक कंडीशनमध्ये अडकल्यामुळे नीट बघू शकत नाही. असं काहीतरी आहे की जे मी आत्ता बघू शकत नाहीये. जे दिसतंय तो एक डिस्टॉर्टेड व्ह्यू आहे. जगाकडे बघायला आधी मला स्वतःलाच जगातून अलग होता यायला पाहिजे. म्हणजे असं बघा की..
[ इथे या बिंदूवर लेखकाने गांजासदृश पुडी काढून तल्लीनतेने सिगारेट रोल करायला सुरुवात केल्यामुळे मुलाखतीत तात्पुरता व्यत्यय निर्माण झाला आहे. तसदीबद्दल क्षमस्व आहोत. ]
ही भन्नाट मुलाखात आवडली आहे,
ही भन्नाट मुलाखात आवडली आहे, गोळी लावून झाल्यावर पुढे चालू होणार आहेका? येउद्या अजून.
आवडली!
आवडली!
>>>>>>
>>>>>>
. . . . म्हणजे ही मुलाखत गोळी लावूनच सुरु केलेली नव्हती ? ?
धमाल लिहिले आहे.
धमाल लिहिले आहे.
लेखक कशाविषयीच काहीच न वाटणारे 'अवधूत/ मस्तान' वाटले. चौकटीबाहेरच्या सार्काझमला धडक देता आल्याबद्दल अभिनंदन आणि कौतुक.
>>>>>>
मी काही चोवीस तास विचारसरणी घेऊन चावत फिरत नाही.
मी काही प्रधानप्रचारक नाही.
पण चोवीस तास प्रेम कोण सहन करणार?
माझं लिखाण वाचून लोकांनी परागंदा व्हावं, देशोधडीला लागावं असं मला वाटतं.
त्यांच्या डबल वेगाने मी हा आरोप फेटाळून लावतो.
त्यातील किडुकमिडुक गोष्टी उत्तुंग थापांमध्ये कशा परावर्तित कराव्यात,
पुरेशी विकृत आहे.
तुम्हाला स्त्री-पुरुष किंवा इतर कुठल्याही प्राणीमात्रांपासून कसलाही धोका नाही.
>>>> ह्याला विशेष हसू आलं.
धमाल
धमाल
भारी लिहिलंय
भारी लिहिलंय
धमाल
धमाल
भारी लिहिलंय !
भारी लिहिलंय !