त्या तरुतळी

Submitted by अनन्त्_यात्री on 14 May, 2024 - 01:59

अशोकाच्या पारावर
सीतामाय उसासते
सोनमृगाच्या मोहाला
मनोमन धि:कारते

शमीवृक्षाचा विस्तार
शस्त्र पार्थाचे झाकतो
प्रत्यंचेला स्पर्शण्यास
शर अधीरसा होतो

वृद्ध बोधिवृक्षातळी
गौतम नि:संग बसे
बोधरवि उगवता
दिव्यप्रभा फाकतसे

अजानवृक्षाच्या तळी
ज्ञानयोगी अविचल
अभावाच्या कर्दमीही
प्रतिभेचा परिमळ

नांदुरकीची डहाळी
आज कशाने हलते?
अणूहुनी सूक्ष्म कोणी
सारे आकाश व्यापते!

Group content visibility: 
Use group defaults

अरे एका झाडाने किती प्रतिभावान जोडले गेलेत!
आणि एक न्यूटनचं झाड पण वाढवता येईल! Happy

सुंदर कल्पना! शेवटचं कडवं नाही कळलं.

मला पण अमितवने सुचवले तेच सुचलेले. तर आता लोकाग्रहास्तव एक कडवं घालाच, न्यूटनच्या सफरचंदाच्या झाडाचं!

ते तुकाराम असावं.
नांदुरकीखाली बसुन तुकाराम महाराजांनी अभंग लिहिले, आणि ते झाड बीजेला हलतं असा समज आहे.

न्यूटनबाबासाठी Happy Happy

आज्ञा पडत्या फळाची
तरुतळाशी बसून
कुणी ऐके, त्याची प्रज्ञा
देई शास्त्रा संजीवन

संत ज्ञानेश्वरांनी हातात घेतलेली काठी अजानवृक्षाची आहे. जेव्हा त्यांनी समाधी घेतली त्यावेळी या बाजूला ठेवलेल्या काठीपासून आळंदीला समाधीस्थळाजवळील अजानवृक्ष वाढला.
--------
कविता अप्रतिम आहे, अनंतयात्री. Happy बहुतेक पूर्णपणे कळली आहे. आत्मशोधाच्या मार्गावरील मोठ्या घटनेची साक्षीदार असलेली 'सोयरी वृक्षवल्ली' आहे.

अशी आख्यायिका आहे की संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतल्यानंतर त्यांच्या कंठाला अजान वृक्षाची मुळी लागली. ते संत एकनाथांच्या स्वप्नात गेले व म्हणाले आळंदीला येऊन ही मुळी काढावी यावेळी एकनाथांच्या ही कंठ दुखू लागला होता. एकनाथ आळंदीला गेले आणि त्यांनी ती मुळी काढली.

दुसरा अर्थ असाही काढला जातो की मूळ ज्ञानेश्वरीत ज्ञानदेवांच्या नावाने काही ओव्या घुसडल्या गेल्या अशा ओव्या म्हणजे अजान वृक्षाच्या मुळ्या त्या काढून ज्ञानेश्वरी मूळ शुध्द स्वरूपात आणावी.

नामदेवानी नाही, संत एकनाथ गेले होते मुळी काढायला.
नाथ पार आहे आळंदीच्या मंदिरात.
Practical दर्शनासाठी आळंदीला यावे. किल्ली guide म्हणून काम करेल. Happy