२०१८ साली केलेल्या महाबळेश्वरच्या ट्रिपमध्ये देवराई आर्ट व्हिलेजला भेट दिली होती त्याचा वृत्तांत. (सर्व माहिती २०१८ सालची आहे.)
व्हिलेज जरी नाव असेल तरी ते व्हिलेज वगैरे नाहीये. हे एका एनजीओ चं नाव आहे.
मंदाकिनी माथूर या ग्वाल्हेर मधून येऊन गेली १० वर्षं पाचगणीत ही संस्था चालवत आहेत. छत्तिसगड आणि गडचिरोली सारख्या नक्षलवादी भागातील आदीवासी मुलांच्यातून आर्टिस्ट शोधून त्यांना इथे आणून, एका वेगळ्या कलेचं शिक्षण देऊन त्यांना आपल्या पायावर उभं करण्यास ही संस्था मदत करते. ही कला आहे ढोकरा आर्ट म्हणजे ओतीव पितळेच्या वस्तू घडवणे.
मुख्य बंगल्यात एक म्युझियम कम विक्रीकेंद्र आहे. आम्ही गेलो तेव्हा दुपारची वेळ होती आणि बाकी कोणीच भेट द्यायला आले नव्हते. केंद्रात एक लहान पण चुणचुणीत मुलगी होती तिने आम्हाला सर्व माहिती दिली. अक्षरशः आवाक होण्यासारखे एक से एक प्रकार होते तिथे.
दगड / लाकूड / माती + धातू असं फ्युजन करून अतिशय सुरेख वस्तू बनवल्या आहेत. काही तर मूळच्या नैसर्गिक वस्तू जशा मिळाल्या तश्याच्या तश्या धातूच्या ठश्यात घालून अमर करून टाकल्या आहेत.
काही फोटो खाली देत आहे.
ही धातु+दगड यातून जन्मलेली देवता.
फोटो १
खर्याखुर्या शेंगा घेऊन त्यावर मातीचं लिंपण करून त्यात धातू ओतून मग भट्टीतून जाळल्यावर मूळ वस्तूचा जशाच्या तसा ठसा उमटला आहे. अजून काही शेवग्याच्या शेंगा होत्या पण फोटो काढणं राहून गेलं.
फोटो २
हे एक आणखी वेगळंच भन्नाट प्रकरण. रानात मिळालेली माकडाची कवटी आणि रस्त्यावर सापडलेला गाडीखाली चिरडून मेलेला बेडुक घेऊन त्यांनाही ठशात गोठवून ठेवलं:
फोटो ३
दगडाचे पेपरवेट आणि कासवं :
फोटो ४
दगडातून आकार शोधून बनवलेले प्राणी - गायी, हरणं वगैरे. त्यांची देहबोली किती तंतोतंत अस्सल उमटलीये. लहानपणापासून आजूबाजूला प्राणी बघतच वाढलेल्या कलाकारांनी हे प्राणी किती उत्तमरित्या वाचले आहेत त्याची ही पावतीच :
फोटो ५
फोटो ६
फोटो ७
या इतर काही कलाकृती :
फोटो ८
हा छोटासा हौद किती सुंदर आहे. त्यात पाणी भरून फुलं सोडली की तळ्याकाठी ध्यानस्त असलेला ऋषी किती मस्त दिसेल ना?
फोटो ९
फोटो १०
झाडावरचा पक्षी + त्याच्या दोन बाजूच्या २ घंटा एका छोट्याश्या टोकावर तोल साधून राहिल्यात. या उचलता येतात. फारच कौशल्याचं काम.
फोटो ११
फोटो १२
खरंखुरं शिंग वापरून केलेली कलाकृती :
फोटो १३
हे दुधी वाळवून, पोखरून त्यावर जळक्या काडीनं नक्षी कोरून बनवलेले दिवे :
फोटो १४
फोटो १५
किंमती जास्त वाटल्या तरी एकदा त्यांच्या वर्कशॉपला भेट देऊन एकेका कलाकृतीमागची कला, श्रम आणि वेळ लक्षात घेतलं तर मग किमती पटतात. विक्रीकेंद्रा शेजारी असलेल्या पायर्या अन पायवाट घेऊन जरा खालच्या पातळीवर उतरून गेल्यावर तिथे एका मोठ्या झाडाखाली अनेक आदीवासी आर्टिस्टस कामात मग्न असलेले दिसतील.
केंद्राशेजारचा मोर आणि दगडावरची नक्षी :
फोटो १६
पायवाटेनं खाली जाताना :
फोटो १७
देवराई अनेक ठिकाणच्या प्रदर्शनांतून भाग घेते. काळा घोडा फेस्टिवलमध्येही नेहमी भाग घेते. शिवाय पुण्यामुंबईच्या काही दुकानांतून त्यांच्या कलाकृती विकायला ठेवल्या आहेत. कोणाला ही कला शिकायची असेल तर त्यांचे कोर्सेस आहेत. शिक्षक म्हणजे ही आदिवासी मुलंमुलीच असतात.
या कलाकारांतले काही छत्तीसगडचे तर काही मुली गडचिरोलीच्या होत्या. एक मुलगा गेली पाच वर्षं इथेच रहात आहे. हे मुलं मुली जवळपासच्या गावांतून भाड्यानं रहातात आणि दिवसभर इथे केंद्रात येऊन कलाकृती घडवतात. सगळे मस्त गप्पा मारत एकीकडे हात चालवत होते. एकानं वाळलेल्या पानाचा ठसा नुकताच भाजून काढला होता तो दाखवला. खरंखुरं अर्धवट तुटलेलं पान पण फक्त पितळेचं.
फोटो १८
एकजण एका ऑर्डरकरता एका पुतळ्याच्या फोटोवरून तसाच्या तसा ३-डी पुतळा मेणात घडवत होता. २-डी वरून ३-डी ... सोपं काम नाहीये. या कलाकृतीचा फोटो घ्यायचा राहिला.
काही मुली मातीच्या भाजलेल्या कपांवर मेणानं बारीक नक्षी काढत होत्या. मेणाचं काम झालं की मग त्यावर मातीचा एक पूर्ण कप झाकणारा थर दिला जातो. हे काम दोन मुली करत होत्या. या मातीच्या थरावर भुसा घातलेल्या मातीचा अजून एक थर दिला जातो आणि मग भट्टीत भाजतात. या दोन्ही थरांना एक भोक ठेवतात - हा आउटलेट. मेणामुळे पहिल्या मातीच्या थरावर नक्षी उमटलेली असते. भट्टीत भाजल्यावर आतलं मेण वितळून आउटलेटमधून बाहेर येतं. मग त्यात धातूचा वितळलेला रस ओततात आणि पुन्हा भाजतात. शेवटी वरचे दोन मातीचे थर काढून आतला माती+धातूची नक्षी वाला कप तयार होतो. अशी ढोबळ क्रिया आहे. या व्हिडिओत तुम्हाला अधिक व्यवस्थित कल्पना येईल : https://www.youtube.com/watch?v=ffg07yxr_Vs
जो मुलगा छत्तीसगडवरून येऊन तिथे गेली पाच वर्षं रहात होता, त्याला दर महिन्याला साडेसात हजार रुपये पगार मिळत होता. संस्थेत रहाण्याची वगैरे सोय नाही. ही मुलं शेजारच्या गावांत खोली घेऊन किंवा कोणाकडे राहतात. असं बाहेर राहून, खाऊन हातात कितीसे उरत असतील? असा विचार मनात आला. साडेसात हजार कमी वाटले.
शिवाय आणखी एक गोष्ट जरा खटकली ती म्हणजे या कलाकारांची नावं कुठेच पुढे येत नाहीत. ते ज्या वस्तू निर्माण करतात त्या एनजीओच्या नावानं विकल्या जातात. मग हे पुढे कसे येणार? स्वतंत्र नाव कसं कमावणार ? या प्रश्नांची काही समर्पक उत्तरं असतीलही पण ती जोवर मिळत नाहीत तोवर हे प्रश्न मनात राहतील.
यात फार रुची नाही पण कौतुक
लेख छान आहे.
यात फार रुची नाही पण कौतुक आहे
घर सजावटीच्या कलाकृती आणि दिवे आवडले.
किंमती जास्त असणे आणि वाटणे स्वाभाविक आहे
कलाकृती लाखात विकतात , आणि
कलाकृती लाखात विकतात , आणि कलाकाराला 7500? तेही महिना? भयानक आहे
लेख व चित्रे छान !
लेख व चित्रे छान !
छान परिचय.
छान परिचय.
७५००/- प्रतीमहिना खुपचं कमी आहेत
मुलांची राहण्याखाण्याची तरी सोय केलेली असेल संस्थेने अस वाटलं अगोदर.
छान माहिती.
छान माहिती.
कलाकृती लाखात विकत असले तरी दर महिन्यात किती अशा कलाकृती विकल्या जातात हेही पाहिले पाहिजे.
हे कलाकार पुढे स्वतंत्र धन्दा करु शकतात. व्हाट्सपच्या, इन्स्टाच्या माध्यमातुन, अर्बन हाट, नॅशनल एक्ष्पो वगैरे माध्यमातुन विकु शकतात. १०० रात एखाद दुसरा धडपडा असतो जो शुन्यातुन धंदा ऊभा करतो.
नैसर्गिक वस्तूंचा धातूच्या
नैसर्गिक वस्तूंचा धातूच्या ठश्यात घालून केलेला सुंदर कायापालट देखणा आहे.
ढोकरा आणि गोंड आर्ट फार पसंत आहेत. Their subjects & objects beautifully mimic mother nature. Love them !
छान वृत्तांत. कलाकृती सुंदर
छान वृत्तांत. कलाकृती सुंदर आहेत!
साडेसात हजार पगार फारच किरकोळ आहे खरंच.
छान परिचय.
छान परिचय.
मस्त दिसतायत वस्तू.
मस्त दिसतायत वस्तू.
परिचय आवडला. सुंदर आहेत वस्तू
परिचय आवडला. सुंदर आहेत वस्तू.
सुंदर वस्तू आहेत. आवडला परिचय
सुंदर वस्तू आहेत. आवडला परिचय. परत कधी त्या बाजूला गेले तर नक्की जाऊन येईन.
कलाकारांना याहून जास्त मोबदला मिळायला हवा असं वाटतं.
छान माहिती.
छान माहिती.
छान माहिती..
छान माहिती..
लेख आणि फोटो दोन्हीही छान..!