जीवनाचे मैदान

Submitted by निमिष_सोनार on 13 May, 2024 - 02:17

तुम्ही ज्या जगात जन्माला आलात, ते जग प्रचंड मोठे क्रीडांगण किंवा मैदान आहे. येथील खेळ खेळणे सोपे नाही. हा खेळ कधी जीवघेण्या स्पर्धेत परावर्तित होतो ते समजत नाही. या मैदानातून आपली मरेपर्यंत सुटका नसते. या क्रीडांगणात सर्व प्रकारचे लोक खेळ खेळत असतात. त्यात आपले कुटुंबीय, मित्र, सहकारी, समाजातील लोक व इतर ओळखीचे आणि अनोळखी लोक सामील आहेत. शत्रू हा शब्द वेगळा वापरला नाही कारण की या सर्व लोकांमध्येच शत्रू दडलेले असतात. कधीकधी ते शत्रू उघडपणे दिसून येतात तर, कधी कधी गुप्तपणे आपल्या आजूबाजूला वावरत असतात. गुप्त शत्रू कौशल्याने ओळखणे हे फार महत्वाचे असते.

तुम्ही नियमानुसार खेळत असलात, तरीही सर्वच लोक नियमानुसार खेळतील असे नाही. तुमचा प्रतिस्पर्धी तुमच्याविरुद्ध चाली खेळत असतो आणि तुम्ही सभ्य गृहस्थासारखे व्यक्तिगत राग लोभ न ठेवता मैदानातील खेळाचे नियम पाळत असतात. तेव्हा तुमचा घात होतो.

मैदानातील खेळांच्या नियमासारखेच जीवन जगण्याचे विविध नियम, तत्वे आणि सुविचारांचा जीवन जगताना तुमच्यावर मारा केला जातो. ते नियम पाळले नाहीत तर असे होईल तसे होईल अशी शपथ घातली जाते. भीती घातली जाते. बहुतेक वेळेस असे आढळून आले आहे की, विविध सुविचारांची आणि विशिष्ठ तत्त्वांची तुम्हाला भीती घालणारे लोकच मुळात हे नियम स्वतः पाळत नसतात. "लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाषाण!" अशी त्यांची स्थिती असते. "बोले तैसा चाले, त्यांची वंदवी पाऊले!" हेच खरे. पण बोलतात त्याप्रमाणे चालणारे लोक फार कमी आढळतात.

पण म्हणून तुमची चूक नसताना हा मैदानातील खेळ अर्ध्यावर सोडून देण्यात आणि माघार घेण्यात व तत्त्वाला चिकटून राहण्यात काहीच अर्थ नाही. कारण तुम्ही माघार घ्यावी हेच तर अशा व्यक्तींना हवे असते. त्यांना जिंकायचे असते म्हणून ते तुम्हाला हरवायला निघतात. म्हणून ते तुम्हाला मैदानाच्या बाहेर ढकलतात. कारण त्यांना माहिती आहे की तुम्ही मैदानात जोपर्यंत आहात, तोपर्यंत ते जिंकू शकणार नाहीत. तुमच्या गुणांचा, ताकदीचा आणि शक्तीचा त्यांना अंदाज आलेला असतो. म्हणून तुमच्यावर आरोप करुन तुमचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होतो.

आणि म्हणूनच जेव्हा सर्व उपाय खुंटतात तेव्हा तुम्हाला मैदानातून बाहेर पाठवण्याची इच्छा बाळगणाऱ्या व्यक्तींना मैदानातच सर्वांसमोर धूळ चारा, नेस्तनाबूत करा. त्यांना घाबरू नका. मैदानात अटळ रहा!

आनेरे द बल्झाक म्हणतो की, "जगात तत्वे अशी काही नसतातच. असतात त्या केवळ घटना! चांगले किंवा वाईट असे काही नसते. असतात ते केवळ विशिष्ट परिस्थितीचे परिणाम! सगळे काही आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असते!"

चाणक्याने सुद्धा लिहून ठेवले आहे की, "सरळ झाडेच सर्वात आधी कापली जातात. त्यामुळे प्रत्येक परिस्थितीत साधे आणि सरळ राहणे चांगले नाही"

श्रीविष्णूच्या राम अवतारात नियमांमध्ये राहून आणि नियम पाळून कसे जगायचे हे त्यांनी शिकवले. परंतु ते युग त्रेतायुग होते. त्यानंतर द्वापार युगामध्ये श्रीविष्णूंनी कृष्णाचा अवतार घेतला तेव्हा नियम मोडले, वाकवले, प्रसंगी कूटनिती वापरली आणि इतरांना नियमात राहण्यास शिकवले. म्हणजे ज्या त्या युगानुसार वागणूक बदलली पाहिजे. काळानुसार स्वतःला बदलले पाहिजे.

आजच्या कलियुगात हरिश्चंद्र बनून रहाणे योग्य नाही. हरिश्चंद्रला गेलेले सगळे परत मिळाले होते परंतु आजच्या कलियुगात एखाद्या सत्यवादी व्यक्तीला असे गेलेले पुन्हा परत मिळणार नाही. उलट उरले सुरले पण लोक ओरबाडून घेतील.

आजच्या युगात दानशूर कर्ण बनणे सुद्धा शक्य नाही. आणि कुणी तसा दावा करत असला तरी तो तसा दानशूर नसतो. आजकाल बरेचदा प्रसिद्धीसाठी दानधर्म केला जातो. काही लोक आज असेही आहेत की, ते दान आणि मदत करतात पण ते नेहमीच गुप्त ठेवतात. त्यांनीही सावध राहायला हवे नाही तर, "घेणाऱ्याने देणाऱ्याचे हातच मागावे" अशी परिस्थिती निर्माण होते.

आजच्या कलियुगात कायम चांगले वागून व्यक्ती स्वतःची फसगत करून घेतो, कारण भेटणारा प्रत्येक व्यक्ती चांगला असेलच असे नाही. कुठे चांगले वागायचे आणि कुठे नाही हे समजलेच पाहिजे. ते नाही समजले तर तुम्ही व्यवहारशून्य आणि बावळट व्यक्ती आहात.

जया किशोरी एका मुलाखतीत म्हणतात की, "एकदा तुमच्यासोबत वाईट घडले आणि कुणी तुमचा गैरफायदा घेतला तर मी समजू शकते की तुमची चूक नाही, कारण तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल माहित नव्हते आणि तुम्ही बेसावध होतात. पण दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा त्याच व्यक्तीने पुन्हा किंवा इतर व्यक्तीने त्याच पद्धतीने तुम्हाला फसवले तर चूक समोरच्या व्यक्तीची नाही, तुमची आहे, कारण तुम्ही तुमची वागणूक बदलली नाही. तुम्ही चांगले वागणे सोडले नाही. या मी चांगला आहे. माझा फायदा घ्या. मला फसवा. मी तुम्हाला काहीच बोलणार नाही, कारण मी चांगला आहे. माझा अपमान करा. मी चूप बसेन कारण इतरांना उलट बोलणे माझ्या तत्वात बसत नाही. याला चांगुलपणा नाही म्हणत! याला मूर्खपणा म्हणतात! कुणाला केव्हा त्याची आणि आपली लायकी दाखवायची हे ज्याला आहे तो खऱ्या अर्थाने चांगला व्यक्ती. आपल्यावर अन्याय होतोय हे लक्षात आल्यावर जो त्याचा प्रतिकार करतो तो चांगला. जो अन्याय सहन करत राहतो, कुणी काहीही बोलले तरी ऐकून घेतो, तो चांगला माणूस नाही तर मूर्ख माणूस असतो!"

म्हणून जगातील या भव्य क्रीडांगणावर थोड्याशा जागेवर आपले अधिकार आणि सत्ता प्राप्त करा आणि जमेल तेवढे नियंत्रण स्थापित करा. तुमचे अनुयायी बनवा. तुम्हाला कायम साथ देतील असे मित्र बनवा. तुमचे हेर सर्व जागी प्रस्थापित करा. वेळप्रसंगी त्यांची मदत घ्या आणि त्यांना मदत करा. संत तुकाराम महाराजांचे वचन लक्षात ठेवा, "एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ!"

शिवाजी महाराजांच्या चरित्रावरून आपल्याला एक शिकवण मिळते की, "राज्य छोटं असेल तर चालेल परंतु ते स्वतःच असावं. त्यामुळे स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण करा, म्हणजे जग तुमचा आदर करेल!"

भावनांवर ताबा ठेवण्याची क्षमता हा सत्तेचा पाया रचण्यासाठी आवश्यक असलेला महत्त्वाचा गुण आहे. तसेच सहनशीलता ही सुद्धा महत्त्वाची आहे. वेळ प्रसंगी चांगली वागणूक तुम्हाला सोडावी लागेल, कठोर व्हावे लागेल.

प्रेरणादायी वक्ते संदीप महेश्वरी म्हणतात की, "तुम्ही मानसिकरित्या मजबूत नसलात तर बाहेरचे लोक तर सोडा, तुमच्या घरचे लोकच तुम्हाला सोडणार नाहीत, तुमचा गैरफायदा घेतील!"

तुम्ही कितीही चांगले वागलात तरी लोक तुम्हाला चांगले म्हणणार नाहीत. तुम्ही अपेक्षा पूर्ण करत गेलात तर त्याबद्दल तुम्हाला चांगले म्हणण्याऐवजी आणखी अपेक्षा वाढत जातील. तुम्ही कितीही समजावून सांगा, लोक त्यांना त्यातून जे घ्यायचे तेच घेतील. जीवनात कधीही लोकांना खुश करण्यासाठी जगू नका. लोकांना खुश करायचे म्हणून कोणतेही कार्य करु नका. कारण लोक कधीही खुश होणार नाहीत. ते तुमच्या वागणुकीचा आणि बोलण्याचा त्यांच्या प्रवृत्तीनुसार अर्थ काढतील आणि तुम्ही मात्र आपण इतके चांगले करतो तरी आपले कुठे चुकले हेच शोधत आयुष्यभर कुढत बसाल!

काही वेळा विशिष्ट प्रकारच्या लोकांपासून लांब रहाणे चांगले. दोन्ही बाजूंनी बोलणाऱ्या दुटप्पी माणसांपासून लांब रहा. कारण असे लोक पायी चालू देत नाहीत आणि घोड्यावरही बसू देत नाहीत. एकत्र जमल्यावर जे लोक तिथे उपस्थित नसलेल्या तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलण्यात आनंद मानतात अशा लोकांशी संबंध ठेऊ नका. तुमची रहस्य, कमजोरी, मिळकत, अपयश, भविष्यातील प्लॅन हे कुणालाही सांगत बसू नका, कारण त्याचा वापर तुमच्याविरुद्ध होईल! तुम्हाला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी होईल.

कुणी तुमच्याशी तुसडेपणाने वागले तर त्यातून त्या व्यक्तीचे चरित्र आणि विचार करण्याची पद्धती उघड होते, तुमची नाही! त्यामुळे स्वतःला दोष न देता, प्रसंगी त्या व्यक्तीला जशास तशी वागणूक आणि उत्तर देण्याची तयारी ठेवा. स्वतःला कमी लेखू नका. स्वतःला दोष देऊ नका. तुम्हाला जर मनापासून माहीत असेल की, तुम्ही प्रगतीच्या योग्य मार्गावर आहात, तर लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. लोकांच्या म्हणण्यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. तुमच्या प्रगतीमुळे नाखुश होऊन तुमच्यावर द्वेषापोटी केलेल्या टीकेमुळे नाराज होऊ नका व स्वतःला कमी लेखू नका. पुढे चालत राहा. लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायला शिका. अशा वेळेस तेव्हा बहिरे व्हायला शिका! चांगल्या भावनेने केलेल्या सकारात्मक टीकेला मात्र स्वीकारा कारण त्यात आपुलकी असते आणि चुकलेले बरोबर कसे करावे याच्या मार्गदर्शक सूचनासुद्धा असतात, त्यापैकी पटतील त्या स्वीकारा आणि पुढे चला.

कुणीतरी म्हटलेच आहे की, "हे माणसा, तू स्वतःमधील गुणांकडे लक्ष दे, कारण तुमच्यातील दोष काढायला लोक आहेतच ना. पाऊले ठेवायचे असतील तर पुढे ठेव, कारण मागे खेचायला लोक आहेतच ना. स्वप्न बघायचीस तर सर्वोच्च बघ, कारण तुम्हाला खाली खेचायला तर लोक आहेतच ना. प्रेम करायचेच आहे तर स्वतःवर आणि परमात्म्यावर कर, कारण द्वेष करायला तर लोक आहेतच ना!"

लोकांचं काम जर तुम्ही करायला लागले, तर लोकांना काय काम उरेल? लोक काय विचार करतील हा विचार सुद्धा तुम्हीच केला तर लोकांना विचार करायला काही उरणार नाही. यातील अतिशयोक्ती आणि विनोदाचा भाग जरी सोडला तरी, यात दम तर नक्कीच आहे!

स्वतःच्या प्रगतीत इतके व्यस्त रहा की मुळात कुणाचा द्वेष करण्याचा विचारही तुमच्या मनाला शिवणार नाही. दुसऱ्याचे विनाकारण वाईट चिंतू नका. जो चांगला आहे त्याच्याशी चांगले वागा. परंतु दुसरा तुमच्या वाटेत विनाकारण आडवा येत असेल तर त्याला आडवा पडल्याशिवाय राहू नका. कारण तो उठून उभा राहीपर्यंत तुम्ही बरेच दूर गेलेले असाल! तुमच्या मार्गावर तुम्हाला कायम साथ देत राहणाऱ्या लोकांना सोबत घ्यायला विसरू नका! कारण तुम्ही एकटे जिंकू शकणार नाहीत तर तुमची टीम तुम्हाला जीवनाच्या मैदानावरील खेळ जिंकून देईल!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

निमिष_सोनार
सरळ साध्या सोप्या शब्दात तुम्ही जे लिहिले आहे त्याला तोड नाही. मायबोलीवर क्वचितच असे लिखाण वाचायला मिळते. अर्थात मी सगळ्याच विचारांशी सहमत आहे अशातला भाग नाही. माझ्या दृष्टीने जग आणि आयुष्य ही एक प्रचंड विनोदी सीरिअल आहे. वजन मारणारे वाणी, खराब भाजी, फाटक्या नोटा सफाईने पदरात टाकणारे, असे अजूनही. ते जे काय करत असतात ते बघितले कि मला अतोनात हसू येते. मी कधी दुकानदाराने दिकेली मोड तपासून घेत नाही. घे रे बाबा तुला जेव्हढे फसवून घ्यायचे आहे तेव्हढे घे. पण खुश रहा.
शेवटी त्या महान आत्म्याने म्हटले आहे ना, "देवा, त्यांना क्षमा कर. ते जे काय करत आहेत ते त्यांचे त्यांनाच माहित नाही."

हा पण लेख सुंदर झालाय! अल्मोस्ट प्रत्येक वाक्याला / परिच्छेदाला अगदी अगदी असं झालं!
काही वेळा विशिष्ट प्रकारच्या लोकांपासून लांब रहाणे , कुणी तुमच्याशी तुसडेपणाने वागले तर .. वगैरे पॅरा parfekt आहेत. accept and go with the flow. follow your own light.

आज हा दुसरा छान लेख वाचला.
आज मायबोलीवर जीवन विषयक तत्वज्ञान ओसंडून वाहत आहेत..
सगळेच मुद्दे योग्य आहेत. कमी अधिक प्रमाणात पटले