डेडलॉक

Submitted by पॅडी on 29 April, 2024 - 07:00

डेडलॉक

दिवसातला हा त्याचा पाचवा फोन !
‘पण तू नक्की येशील ना माझ्या बरोबर?’, नेहमीप्रमाणे त्याने पुन्हा शंका काढली.
मी हो म्हणालो.
‘ तुला केव्हा वेळ मिळेल? कधी जाऊ यात?’ त्याचा प्रतिप्रश्न.
‘आता जरा घाईत आहे. थोडी सवड झाली की कळवतो, करतो तुला फोन.’
‘बाय द वे ; नेमकी कसली खरेदी करणार आहोत आपण?’, मी सहज म्हणून विचारले.
‘आपण जाऊ तेव्हा कळेलच तुला.’, मोघम उत्तर देत त्याने फोन ठेवला.

पुढचा संपूर्ण आठवडा ऑफिसच्या कामात चांगलाच गढून गेले होतो. तो तेवढा नियमितपणे फोन करायचा. आपले शॉपिंगला जायचे ठरले असल्याची आठवण करून द्यायचा, कधी जाणार आहोत हे विचारायचा आणि प्रत्येक वेळी मी आणखी एक-दोन दिवसांची मुदत मागून, वेळ मारून न्यायचो.

मला त्याच्याबरोबर शॉपिंगला जायचे नव्हते अशातला भाग नव्हता. खरे तर ; आमच्या एवढ्या वर्षांच्या मैत्रामध्ये त्याने या अगोदर कुठली लहानमोठी गृहोपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी मला सोबत नेल्याचे स्मरत नव्हते. कदाचित त्यामुळे माझ्याकडून थोडी चालढकल होत असावी. शिवाय कामाचा व्याप हे ही एक कारण होतेच.

‘अरे, काय ड्रग्जब्रिग्ज खरेदी करायचेत की AK 47..?’ त्याचा पुन्हा फोन आला तेव्हा मी उपरोधिक स्वरात विचारणा केली.
‘कधी जायचं आपण ?’, तो एवढाच बोलला.
‘यार, तू काय कुक्कुलं बाळ आहेस का आता की, तुला शॉपिंगसाठी कुणाची ना कुणाची सोबत लागते?’
माझ्या मिश्किलपणाकडे साफ दुर्लक्ष करून त्याने अजिजीच्या स्वरात विचारले, ‘पुढच्या आठवड्यात जाऊ यात ?’
त्याचा गंभीर सूर पाहता, मग मी ही प्रकरण जास्त लांबवले नाही. लगोलग होकार भरून, तेवढ्यापुरती स्वत:ची सुटका करून घेतली.

एका नवीन क्लायंटमुळे नेहमीचं शेड्यूल बिघडलं. वर्कलोड वाढला आणि कामाच्या रगाड्यात मित्राला दिलेले वचन मी पुन्हा एकदा साफ विसरलो.

दोनेक दिवसांनी त्याचा पुन्हा फोन आला. नेहमीप्रमाणे हवापाण्याच्या, इकडच्यातिकडच्या गप्पा झाल्या. आणि जेव्हा दोन शब्दामधील सुदीर्घ पॉज वाढायला लागले, तेव्हा मी घाईघाईत ‘शॉपिंग’ चे विसरल्याचे सांगून टाकले आणि चटकन त्याची माफी मागीतली. वरून – इतक्यांत तुझा कॉल नाही म्हणताना तुझी खरेदी झाली असावी बहुदा असा मी अंदाज बांधला, वगैरे बोलून मनाला कुरतडणारी खंत जरा कमी करायचा प्रयत्न केला.
‘येत्या रविवारी जाऊ यात का रे ?,’ त्याच्या शब्दातले आर्जव चटकन जाणवले.
‘सॉरी ; पण येत्या वीकेंडला एका नव्या पार्टीबरोबर बोलणी ठरलीयत.’ मी अपराधीपणाने बोललो.
‘ठिकाय, तुला सवड मिळेल तेव्हा कॉल कर, मी लगेच येऊन जाईल.’, म्हणून त्याने फोन ठेवला.

अन् मी स्वत:वर प्रचंड चिडलो!

हा काय हेकेखोरपणा चालवलाय ह्याने? मित्र झाला म्हणून पुढच्या व्यक्तीला इतके छळायचे? अरे, तुला जे काही खरेदी करायचेय ते जर एवढेच अर्जेंट असते तर तू केव्हानाच खरेदी केले असतेस.

माझा जळफळाट वाढत चालला होता..

अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजांपलीकडे ढुंकूनही न पहाणारा हा एक अति सामान्य इसम, असे काय मौल्यवान खरेदी करू पाहतोय ज्यासाठी त्याला माझीच सोबत हवीय ? त्यावर कळस असा की, नेमके काय खरेदी करायला जायचेय हे देखील अजून गुलदस्त्यातच ठेवलेय बहादराने.

असाच आणखी एक आठवडा लोटला. अन् त्याच्या क्रेज़ी फोन कॉल्स आणि शॉपिंग रिक्वेस्टकडे मी पद्धतशीरपणे कानाडोळा केला.

एका रविवारी मस्तपैकी लोळत पडलेलो , तर स्वारी दत्त म्हणून हजर!

‘आज तू मोकळा दिसतोस’, माझ्या पुढ्यातल्या अस्ताव्यस्त पसार्‍यातून कशीबशी वाट काढून खुर्चीत टेकत, तो कसंनुसं हसला.
मी होकारार्थी मान हलवली व म्हणालो, ‘चल, आज एकदाची तुझी शॉपिंग उरकूनच टाकू. नेमकं काय घ्यायचंय काय आपल्याला?’
‘कुलूप –‘, तो अस्पष्टपणे बुदबुदला.
‘का ऽ य..?’, मी जवळजवळ किंचाळलोच ! ‘वेडा झालायस तू ? डोकं फिरलंय तुझं ? पत्र्याचं एक फडतूस कुलूप खरेदी करायला तुला माझीच सोबत हवीय? अन् ह्या - ह्या मौल्यवान खरेदीसाठी थांबलो आहोत आपण इतके दिवस?’ शब्दागणिक माझा आवाज वाढत चालला होता...

मला हातांनी मधेच थोपवत तो जवळजवळ रडवेल्या स्वरात म्हणाला, ‘तुला तर चांगलेच माहीताय की ; लहानपणापासून मी एकत्र कुटुंबात वाढलो. आमच्या घरात चुलते-काके, आजी-आजोबा अन् चिलीपिली मिळून खंडी-दीड खंडी लोक राहायचे. त्यामुळे राहत्या घराला कुलूप घातलेले कधी बघितलेच नाही. नव्हे, कुलूप ही जिन्नस कशी असते, कशी दिसते तेही कधी समजले नाही.

पुढे चुलत्या-काक्यांनी वेगळ्या चुली मांडल्या. हळूहळू सारी समीकरणं बदलत गेली...पण तरीही ह्या सूक्ष्म बदलाची झळ मला पोचलीच नाही. किंवा कालपर्यंत ह्या सामाजिक स्थित्यंतराचा माझ्यावर प्रतिकूल परिणाम झाला नाही.

मात्र; मागच्या पावसाळ्यात बाबा गेले आणि महिन्याभरापूर्वी आईला देवाचे बोलवणे आले. तेव्हा पहिल्यांदा मला प्रश्न पडला की, आपला एक शाळकरी मुलगा अन् आम्ही नोकरदार नवरा बायको घरातून बाहेर पडल्यावर, आता घर कोणाच्या भरवशावर उघडे टाकायचे?
मला सांग; ज्या व्यवहारशून्य माणसाने कुलूप कसे असते हे बापजन्मात पाहीलेले नाही, त्याला ते नेमके कुठल्या दुकानात मिळते, हे तरी कसे ठाऊक असणाराय? अन् म्हणूनच; चार चौघात स्वत:चे हसे करून घेण्यापेक्षा, हा जटिल प्रश्न सोडवण्यासाठी इतके दिवस मी तुला आग्रह करतोय, त्यात माझे काय चुकले..?’

महत्प्रयासाने त्याच्या नजरेला नजर भिडवायचे टाळून, बधिर देहामनाने मी बाहेर आलो. प्राईम लोकेशनवर असलेला, आपला फुल्ली फर्निश्ड , वन पॉइंट फाइव्ह बीएचके फ्लैट नीट बंद करून , चाबी खिशात टाकताना मनात विचार आला : अमरवेलीसारखी ही “न्यूक्लिअर फॅमिली” ची; बिनबोभाट फोफावत चाललेली संकुचित वृत्ती , आमच्या सामूहिक दिवाळखोरीचे द्योतक म्हणायची का?

आणि मुख्य म्हणजे, ह्या जगावेगळ्या डेडलॉकवर तोडगा काढायला, कुठली किल्ली वापरायची ?
***

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान कथा..!

माझा थोडासा अनुभव - सासूबाई नेहमी घरात असत.. मी बाहेर कुठेही गेले तरी घराची चावी कधीच माझ्या पर्समध्ये नसायची.. कारण मला माहित होतं.. घराचं दार उघडायला घरात माणूस आहे... जवळ - जवळ १२ वर्ष तरी घराची चावी कुलूपाला लावायची वेळ आली नव्हती माझ्यावर..!.. त्या वारल्या आणि मला पर्समध्ये चावी बाळगावी लागली. आताही घरातून निघताना दहावेळा चेक करते चावी आहे का पर्समध्ये..! दोन तीन वेळा चावी हरवून सुद्धा झाली.

रूपाली ताई - आपण नमूद केलेला अनुभव हा जवळ जवळ सार्वत्रिक झालाय हल्ली.. आणि त्या जाणिवेतूनच ही कथा लिहून झाली.. !
प्रतिसादासाठी खूप खूप आभार..!!

डेडलॉक - अशी परिस्थिती की जेव्हा system अडकते.. एका प्रोसेस लां पुढे जायला जे हवंय ते दुसऱ्या प्रोसेस कडे असतं आणि त्याच वेळी दुसरीला पुढे जायला जे हवंय ते पहीलिकडे असतं...

है कथेला डेडलॉक हे नाव का दिलं असावं? ह्यात काहीच डेडलॉक दिसत नाहीये...

There is a key maker in Bhandup I have his name on speed dial . But double check everytime I step out for house keys. Only two trips outside to walk dog but the thought of being locked out is scary esp for senior citizens

छान कथा.

‘मी कधीच घराला कुलूप लावलं नाही. (नोकरीत असून)’ असं आमच्या साबा नेहमी म्हणायच्या. आता मला मात्र दिवसातून चार वेळा तरी ते लावावं लागतं. बाकी कुलूप आमच्या घरातला कायम वादाचा मुद्दा. किल्ली घरातच राहण्याच्या भीतीने मी कधीच latch बसवलं नाही. कायम परंपरागत कुलूप वापरते.

Also there is danger of seniors dropping keys in the space between lift and lift door. So when exiting I hold the keys in hand but in bag itself. My hands are weak and I have butterfingers!!

छन्दिफन्दि - ह्या कथेची शेवटची ओळ वाचल्यानंतर तुमचं शंकनिरसन होईल बहुदा. Or may be I could have titled the short story as : " DeadLock & The Missing Key..." Happy

सर्व रसिक वाचकांचे मन:पूर्वक आभार !

तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रियाही अफलातून आहेत .

Basically this anecdote is symbolic representation of disintegration ( decay?) of joint family system...!

पुन्हा एकदा सर्वांचे शत शत आभार...