घर घेतल्यावर थोड्याच काळात आम्हाला जाणवलं होतं की ही खरं तर एक हॉंटेड (छोटीशी) मॅन्शन आहे. चांगलं नवं कोरं घर घेतलं होतं, पण बिल्डरचा बुढाबाबा सेल्समॅन, थरथरत्या हातातला मिणमिणत्या वातीचा कंदील डचमळत वगैरे 'क्या बताऊँ बाबू! आजसे पचीस साल पहले यहाँ एक कोलीवाड़ा हुआ करता था. खेतीबाड़ीके और फिर बादमें मकान बनवानेकी लालचमें सारे कोलियोंको जमीनमें गाड़ दिया गया. तभीसे अमावसकी रातको कईं बार वे कोली जमीनसे ऊपर आनेकी कोशिश करते रहते हैं.' असलं काही बोलला नाही तेव्हा. गोरा असल्यामुळे त्याला कदाचित माझ्याएवढं चांगलं हिंदी येत नसेल.
पण मुद्दा काय, की रहायला लागल्यावर थोड्या दिवसांतच आमच्या लक्षात आलं होतं की ह्या वास्तूमध्ये पूर्वी कोणे एके काळी एक चांगला नांदता गाजता कोळीवाडा असावा. घर बांधायच्या वेळी ते कोळी सोयीस्कररित्या भूमीगत झाले असतीलही; पण नंतर लवकरच पुन्हा आपल्या जागेवर कबजा करायला परत येऊ लागले होते. आमच्याएवढी मोठी घबाडं त्यांच्या नाजूक जाळ्यांमध्ये गावणार नसली, तरी त्या नजरेला अदृश्य पण त्वचेला तापदायक जाळ्यांचा, तळघरामध्ये ठिकठिकाणी स्पर्श जाणवू लागला. आम्हीही अटीतटीने असल्या ऐऱ्यागैऱ्या हक्क सांगू बघणाऱ्या उपऱ्यांविरुध्द रीतसर युद्ध घोषित केलं.
सगळ्यात पहिला सोपा उपाय म्हणून घरामध्ये कोळीगीतांवर बंदी आणली. पण आमच्या कोळ्यांना संगीतात फार गम्य नसावं. त्यांच्या संख्येवर आणि उच्छादावर काही ढिम्म परिणाम नाही झाला. कित्येक वर्षांची आमची डोकेदुखी मात्र छूमंतर केल्यासारखी अदृश्य झाली. किटलेले कानही थोडे स्वच्छ झाले. आमच्या घरामध्ये 'तांडव' हा एकमेव नृत्यप्रकार सगळ्यांनाच जमत असल्याने, कोळीनृत्यांवर वेगळी बंदी आणण्याची गरज भासली नाही. कोळी आपसात करतही असतील कोळीनृत्ये, पण ते स्वतःच गेले की त्यांची नृत्येही आपोआप बंद होतील असा माझा कयास होता.
लढाईची पुढची आघाडी म्हणून 'अखिल कीटकनाशक, जंतुनाशक, किटाणूनाशक म्हणून ९९.९३ प्रतिशत यशस्वी' अशी जाहिरात असलेल्या एका द्रवाचे अगदी तळघर भरून फवारे सोडले. त्यामुळे आमची (दुखणं) थांबलेली डोकी पुन्हा फुटेस्तोवर दुखू लागली आणि पुढचे चार दिवस तळघरात पाऊल टाकणं अशक्य झालं. पाचव्या दिवशी रणांगणावर धारातिर्थी गेलेल्या कोळीसमुदायाची विजयी मुद्रेने पहाणी करण्यासाठी पुन्हा खाली आलो तर काय - एकतर आमच्याकडचे कोळी त्या मृत्युंजय ०.०७ प्रतिशत गटातील असावेत, किंवा 'हानी होवो कितीही भयंकर, पिढ्या पिढ्या हे चालो संगर' च्या उन्मादातली त्यांची पुढची पिढी असेल - पण तळघरात पुन्हा गजबजता कोळीबाजार भरलेलाच होता.
आता अंतर्गत गृहकलह सुरु झाला. 'नाही एवढं जमत तुला, तर बोलवूया ना एखाद्या व्यावसायिक टर्मिनेटरला.' टर्मिनेटर? भेदरून माझ्या डोळ्यासमोर एकदम 'आईल बी बा s क' धमकावणारा हट्टाकट्टा श्वार्ट्झनेगर तरळला. 'एक्सटर्मिनेटर म्हणायचंय का तुला?' एवढं बोलायचं धाडस मी कसंबसं दाखवलं. 'शी: बाबा; तुझं एक भलतंच काहीतरी! एक्स काय उपयोगाचा? अजून त्या व्यवसायात काम करत असलेलाच कोणीतरी नको का बोलवायला?' ह्यावर मी नाद सोडला, आणि होम ॲडव्हायझर साईटवर चांगले रिव्ह्यूज असलेल्या एका एक्सटर्मिनेशन कंपनीला फोन केला. पांढऱ्या शुभ्र पार्श्वभूमीवर निरनिराळ्या गोंडस कीटकांची अंगप्रत्यंग दाखवणारी मोठाली चित्रं रंगवलेली एक व्हॅन एक दिवस दारात उभी राहिली. आतमधून उतरलेल्या सूटबूटवाल्या व्यावसायिक कीटकनाशकाने प्रथम आमचे तळघर इन्स्पेक्टर क्लूसॉच्या बारकाईने वेळोवेळी 'हा:!' किंवा 'आs:हां' असे उद्गार काढत तपासून पहिले. नंतर जाहीर केले, की कोळी बहुधा घराभोवतीच्या जमिनीमध्ये असावेत आणि तेथून ते फाऊंडेशनच्या कडांमधून आत येत असावेत. मग आमचा मोर्चा घराबाहेर गेला. हातातल्या एका काठीने घराभोवती बऱ्याच ठिकाणी ठाकठूक केल्यावर त्याने सांगितले की हो, त्याच्या आधीच्या तर्काप्रमाणेच ह्या जमिनीत कोळी आहेत आणि ते बाजूच्या फटींमधून घरात शिरतात. त्यामुळे त्यांच्या विनाशासाठी घराभोवती काही फवारे मारले पाहिजेत. त्याच्या सुटाबुटाचा आणि एवढ्या सुंदर रंगवलेल्या व्हॅनचा खर्चही भरून निघण्यासाठी (हे तो नाही म्हणाला; माझा अंदाज) त्यांची फी थोडी जास्त आहे, पण व्यावसायिक म्हटल्यावर तेवढं अपेक्षितच आहे ना! ही फी मासिक हप्त्यांमध्ये विनाशुल्क - म्हणजे विना आणखी जास्त शुल्क - द्यायचीही सोय आहे. दर तीन महिन्यांनी घराभोवती वर्षभर हे अंगारेधुपारे केल्यानंतर सुद्धा नूतन वर्षाभिनंदनासाठी असंख्य श्री व सौ कोळी, आपापल्या बाबा आणि बेबी कोळ्यांसहपरिवार तळघरात उपस्थित होतेच. ह्यावर करता येण्यासारखी एकच गोष्ट मी तत्काळ केली - व्यावसायिक नाशकाचे मासिक हप्ते थांबवले.
आता कोळीजमात आणि आम्ही ह्यांच्यामध्ये तळघराच्या वापराबद्दल काही तहाची कलमे मान्य झाली आहेत. आम्हाला तळघर वापरायचे झाल्यास आम्ही रीतसर दोन दिवस आधी सूचना देऊन त्यांना आपली जाळी मागे ओढून, नजरेआड राहण्याची सशस्त्र विनंती करतो. सूचनाप्रसंगी झाडू अथवा व्हॅक्यूम क्लीनर ह्या आयुधांचा वापर शस्त्रसंधीच्या करारामध्ये समाविष्ट आहे. मात्र, सलग एक आठवड्यापेक्षा जास्त काळ आम्हीही तळघराचा वापर करुन त्यांच्या हलाखीत भर घालणार नाही, अन्यथा पुन्हा युद्धास तोंड लागेल असे तहामध्ये चक्क लिहिलेले आहे.
कुणी कुत्री पाळतात, कुणी मांजरं - मग कोळी पाळण्यातच काय मोठं वेगळं? अंधारात तळघरामध्ये गेल्यावर 'तशी एरवी बरी आहेत म्हणून तर राहू देतो ना ह्यांना' अशी कुजबुज माझ्याही कानी आली आहे. हिला आपलं वाटतं त्यांच्या जाळ्यात माझे कान गुरफटले आहेत. त्यांचं बोलणं मला आजकाल समजायला लागलंय सांगितलं नाही मी तिला अजून!
हा हा हा..... भारी जमलंय
हा हा हा..... भारी जमलंय
मस्तच!
मस्तच!
माझा नवरा त्याच्या बदलीच्या ठिकाणी काही वर्षे एकटाच रहायचा. तेव्हा एकदा मी तिथे राहायला गेले तर छता पासून डोक्यापर्यंत येतील अशी कोळ्यांची माया वर लटकत होती. मग मी स्वतः त्यानां काढण्या ऐवजी त्यांचे फोटो काढून नवऱ्याच्या आळशीपणाचे पुरावे म्हणून जपून ठेवले होते.
(अर्थात नंतर बाईकडून घर स्वच्छ करून घेतलं. पण तिथे खरंच आठेक दिवसात तेवढीच जाळी तयार व्हायची.)
खूप मस्त!!! हहपुवा.
खूप मस्त!!! हहपुवा.
मेनका मासिकातील, 'एका
मेनका मासिकातील, 'एका कोळियाने' ही शंना नवरे यांची कथा अचानक आठवली आणि भूतकाळाचा सुगंध आला, इतकं तीव्रतेने नॉस्टॅल्जिक वाटले की ज्याचे नाव ते. लहानपणी मेनका, माहेर, दक्षता, शतायुषी, धनुर्धारी आणि अनंत मासिकांचा अक्षरक्षः रतीब असायचा आणि किती खादाडपणा, सर्व वाचून फस्त होइ.
एका खेळियाने रंजक केलीय ही
एका खेळियाने रंजक केलीय ही खेळी ..! मस्त !!
द ओल्ड मॅन अँड द सी या
द ओल्ड मॅन अँड द सी या अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या अत्यंत गाजलेल्या कलाकृतीचा अनुवाद - एका कोळीयाने ही छोटी कादंबरी वाचलेली लहान असताना -
गाधा माश्याची चित्त थरारक शिकार आहे त्यात. .. तीच आठवली शीर्षक पाहताना.
सही.
सही.
छान लिहिलं आहे.
छान लिहिलं आहे.
त्या कोळ्यांना खायला काय मिळतं पण इतकं? खायला मिळत असेल म्हणून संख्या वाढत असेल.
मस्त!
मस्त!
अवांतर - आम्ही या गावात रहायला आलो तेव्हा एकंदरीतच गावात भरपूर कोळी होते, साहाजिकच थंडीत घरात घुसखोरी करत. मात्र गेल्या ७-८ वर्षांत त्यांचे प्रमाण हळूहळू कमी होत गेले. सुरवातीला त्यांचे नसणे जाणवले तेव्हा बरेही वाटले पण नंतर लक्षात आले की एकतर संख्या खरोखरच कमी झालेय आणि दुसरे म्हणजे हिवाळा कडक नसल्याने घुसखोरीची गरज नाही. आता बागेत कोळी दिसला की छान वाटणे असा उलटा प्रकार झालाय.
लेखकाला लिहायला कुठलाही विषय
लेखकाला लिहायला कुठलाही विषय पुरतो ... हे या कथेतून दिसून येतं. खूप छान लिखाण. आपले कोळीपुराण ऐकून माझ्या घरातील कोळी बांधवाची आठवण झाली..सहजीवण म्हणतात ते यालाच.
काय मस्त विनोदी लिहीलय!! परत
काय मस्त विनोदी लिहीलय!! परत वाचले. खूप हसले.
मस्त लिहिले आहे.
मस्त लिहिले आहे.