“हे सिगरेट विझवल्याचे डाग आहेत तर...” खिडकीबाहेरच्या त्या काळसर डागांकडे पाहत रॉबिन मनातल्या मनात म्हणाला.
कदाचित आशुतोषला सिगरेटचे व्यसन असावे आणी त्यानेच खोलीत सिगरेट पिऊन खिडकीच्या बाहेरच्या भिंतीवर सिगरेट पिऊन विझवली असेल. रॉबिन स्वतः सिगारेट पीत असल्याने त्यानेदेखील अशाप्रकारे भिंतीवर कित्येकवेळा सिगरेट विझवली होती. त्यामुळे ते डाग कसले असतील हे रॉबिनच्या लक्षात आले. मगाशी वाड्याच्या खालील भागात जमिनीची तपासणी करताना जे सिगरेटचे थोटूक सापडलं होतं ते आशुतोषनेच वरून खाली टाकलेलं असावं. पहिल्यांदा रॉबिनला वाटलं होतं कि गेस्टरूम मध्ये कोणीतरी सिगरेट पिली असेल आणी सिगरेट विझवून थोटूक बाहेर फेकलं असेल. गेस्टरूमच्या अगदी वरच आशुतोषची रूम होती. आशुतोषच्या खिडकीबाहेरील काळसर डागांवरून त्यानेच सिगारेट विझवून राहिलेले थोटूक बाहेर फेकले असल्याचं स्पष्ट होत होतं.
हळुवारपणे खिडकी लावून रॉबिनने आशुतोषकडे पाहिलं. आशुतोष अजूनही कपाळावर आठ्यांच जाळ ठेवून बसला होता. चेहऱ्यावर कंटाळवाणे भाव आणल्याच नाटक करत आणी आपणास काहीही मिळालं नाही अशा अविर्भावात रॉबिन दरवाजाजवळ आला. अजून काही बघण्यासारखे उरलेले नसल्याने रॉबिन आशुतोषच्या रूम मधून बाहेर पडला आणी जिना उतरून खालच्या भागात आला. वाड्यात अजूनही कोणीच आलेलं न्हवत. नंदिनी स्वयंपाक घरात भांडी घासत असल्याचं बाहेरून दिसलं. स्वयंपाकघराजवळ रॉबिनने नंदिनीला सांगितलं कि मी आता निघतोय. नंदिनीने परत एकदा चहा घेण्याविषयी सुचवलं पण त्या आग्रहाला नम्रपणे नकार देऊन रॉबिन वाड्याबाहेर आला. आपल्या दुचाकीजवळ जात तो विचार करू लागला.
देशमुखांशी सकाळी बोलल्याप्रमाणे वाड्याच्या परिसरात कोणती गोष्ट जसं कि खुनाच हत्यार पुरून ठेवल्याच्या खुणा दिसल्या न्हवत्या. पण काही गोष्टी नक्कीच लक्षात घेण्याजोग्या होत्या. वाड्याचा डावीकडचा भाग जिथे आबांच्या आणी मालतीबाईच्या खोलीबाहेरील खिडकी होती. तिथे त्या खिडकीमार्गे कोणीही हळूच आतमध्ये जाऊ शकत होतं कारण खिडकीला गज न्हाव्तेच. न जाणो खुन्याने त्याचं मार्गाने आत जाऊन मालतीबाईवर हल्ला केला असेल. पण तसं असेल तर मालतीबाई यांनी आरडाओरडा का नाही केला, यासाठी का कि खून करणारी व्यक्ती मालतीबाईच्या जवळची ओळखीची होती आणी मालतीबाई यांच्याशी बोलताबोलता खिडकीतून त्या व्यक्तीने काहीतरी टोचवलं असेल आणी मागच्या मागे पलायन करून मुख्य दरवाजातून हळूच कोणाला चाहूल न लागता निसटली असेल. वाड्याच दार असंही रात्र होइपर्यंत उघडंच असायचं, तिथूनच एकमेव रस्ता आहे जिथून पलायन करता येईल. तसं असेल आजूबाजूला नक्कीच कोणीतरी त्या व्यक्तीला गुपचुप पळून जाताना पाहिलं असेल. आणी तसं असल्यास आजूबाजूला काही अंतरावर असणाऱ्या घरामध्ये चौकशी करण गरजेचं आहे न जाणो कोणी काहीतरी पहिल असेल जे खुन्याच्या जवळ जाण्यास उपयुक्त ठरेल.
अजून एक गोष्ट रॉबिनला खात होती ती आशुतोषच्या खोलीत त्याच्या कपाटाच्या खालच्या भागात कपड्यांमध्ये ठेवलेला दोरखंड ज्याला मधेच गाठी मारलेल्या होत्या. कशाकरिता तो दोरखंड त्याने कपाटात ठेवलेला असेल आणी तो लपवण्याची कोणतीही तसदी त्याने घेतलेली न्हवती. पण तूर्तास त्या दोरखंडाचा विचार बाजूला ठेवून रॉबिनने आसपासच्या घरांमध्ये चौकशी करण्याचं ठरवलं ज्यामुळे खुन्याविषयी काही धागादोरा हाती लागेल.
रॉबिनने दुचाकी चालू केली देसाई वाड्याच्या बाजूला काही अंतरावर जे कोणी लोकं राहत होते तिथे जाऊन लोकांकडे जाऊन त्यांनी खून झालेल्या दिवशी काही पाहिलं का याची चौकशी चालू केली. आसपास राहणारे लोक आपल्या कामाशी काम ठेवणारे होते काही घरे हि वयोवृद्ध जोडप्यांची होती ज्यांची दृष्टी वयोमानानुसार अंधुक झालेली होती. त्यामुळे खून झाला त्या दिवशी आसपास कोणाला संशयास्पद हालचाली जाणवल्या नाहीत कि कोणी व्यक्ती दिसली नाही. आपल्या म्हातारपणाचे दिवस घालवत ती लोकं आरामात राहत होती. तिथल्या आसपास च्या सगळ्या भागातल्या घरांमध्ये जाऊन त्याने चौकशी केली या सगळ्यात संध्याकाळ उलटून गेली आणी रात्र पडू लागली. आसपासच्या सगळ्या लोकांकडे चौकशी करून झाल्यामुळे आणी हाती काहीही न लागल्याने रॉबिनने परतीचा रस्ता धरला. दुचाकीवरून परतत असताना काही ठिकाणी थांबून त्याने आसपासच्या दुकानांमध्ये सुद्धा विचारपूस केली पण कोणाला काहीच सांगता आले नाही. आता चांगलाच अंधार पडला होता. रस्त्यावर जास्त माणसं न्हवती.
दुचाकीवरून पुढे आल्यावर अचानक रॉबिनला आठवलं कि इथेच जवळ डॉक्टर पाटील याचं घर आहे. त्यांचाशी आधीपण तो बोलला होता पण एकदा घरी जाऊन त्यांच्याशी बोलावं असं त्याला वाटलं. त्यामुळे थोडं पुढे जाऊन रॉबिनने डॉक्टर पाटलांच्या घराजवळ आपली दुचाकी थांबवली. आसपास अंधार पसरला होता आणी रस्त्यावरचे दिवे खराब असल्यामुळे लागलेले न्हवते. डॉक्टर पाटलांच घर हे एक बैठे घर होतं. त्या बैठ्या घराला चीटकुनच बाजूला पाटील डॉक्टरांचा दवाखाना होता. रॉबिन दुचाकीवरून खाली उतरला. पाटलांच्या घरातले दिवे बंद होते फक्त मागच्या खोलीत एक दिवा लागलेला दिसत होता. रॉबिन चालत चालत पाटलांच्या मुख्य दरवाजाजवळ आला.
रॉबिनने दारावर टकटक केली. आतून काहीच प्रतिसाद आला नाही. रॉबिन थोडावेळ शांत उभा राहिला आणी आतमधला कानोसा घेऊ लागला पण त्याला कसलाही आवाज ऐकू आला नाही. आजूबाजूला चांगलाच अंधार पडलेला होता रातकिड्यांची किरकिर ऐकू येत होती. रॉबिनने परत एकदा जोरात दारावर टकटक केलं. थोड्या वेळाने.. कोण आहे...? असा डॉक्टरांचा आतून कातर आवाज आला.
“डॉक्टर, मी गुप्तहेर रॉबिन आहे, दरवाजा उघडा” रॉबिनने उत्तरं दिलं. त्यावर आतून कसलाही प्रतिसाद आला नाही. रॉबिनला जरा आश्चर्य वाटलं कि डॉक्टर पाटील दरवाजा उघडायला वेळ का लावत आहेत. रॉबिन तसाच उभा राहिला. काही वेळाने आतून डॉक्टर पाटलांनी दरवाजा अर्धवट उघडत बाहेर डोकावून पाहिलं. त्यांचा कपाळावर घामाचे बिंदु जमा झालेले होते.
“ अ..गुप्तहेर..र..रॉबिन.. एवढ्या रात्री इथे “ एवढचं कसबस ते बोलले.
त्यांचाकडे एक जळजळीत कटाक्ष टाकत रॉबिन म्हणाला – “ हो गुप्तहेर आहे म्हणूनच एवढ्या रात्री आलोय” त्याचा या वाक्यावर डॉक्टर पाटलांनी काहीही न बोलता आवंढा गिळला.
“ आता मला आतमध्ये येऊ देणार आहात कि इथे बाहेर उभ राहूनच बोलणार आहात” रॉबिन शक्य तितकं शांत आवाज ठेवून म्हणाला.
“ अ..क..काय.. डॉक्टर पाटील रॉबिनच म्हणण काहीच न समजल्यासारख बोलले. पाटलांच्या अशा वागण्यावर मात्र रॉबिन संतापला. आणी त्याने हातानेच दरवाजावर जोर देऊन पाटलांना बर्यापैकी ढकलतच दरवाजा ढकलला. आणी घरात प्रवेश केला.
“ अहो ..अहो.. क..काय करताय असं का आतमध्ये घुसताय” पाटील डॉक्टर पडता पडता स्वतःला सावरत म्हणाले आणी दरवाजापासून जरा दूर फेकले गेले. पण त्यांचा या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत रॉबिनने आतमध्ये प्रवेश मिळवला आणी घराच्या आतल्या भागाचं निरीक्षण करू लागला. हॉल मध्ये रॉबिन उभा होता तिथे बसायला सोफा, टेबल, खुर्च्या असं सगळं साहित्य होतं. डाव्या भिंतीजवळ एक छोटंसं शेल्फ होतं ज्याला काचेचं दार होतं. त्यामध्ये वर्तमानपत्र आणी काही वैद्यकीय प्रकारातील मासिक होती. डॉक्टर पाटलांच्या घराकडे पाहून ते एक सधन व्यक्ती असल्याचं जाणवत होतं आणी तसंही डॉक्टर असल्याकारणाने तेवढी सुबत्ता असणं साहजिकच होतं.
“ दार उघडायला एवढा उशीर का केलात डॉक्टर “ आजूबाजूला निरीक्षण करणारी आपली नजर न हटवता रॉबिनने पाटलांना प्रश्न केला.
“ ते...मी..झोपलो होतो....” पाटील थोडंस चाचरत म्हणाले. त्यांची मान खाली होती आणी रॉबिनकडे पाहण्याचं धाडस देखील त्यांना होतं न्हवत.
“ अच्छा..घरात तुम्ही एकटेच राहता वाटत” रॉबिन जवळच्या शेल्फ जवळ जात म्हणाला.
“ अ..हो .. मी एकटाच राहतो” पाटील उत्तरले. अजूनही त्यांचा आवाजात म्हणवा तसा जोर न्हवता.
“ लग्न वेगेरे केलं नाही कि काय तुम्ही...म्हणजे वय पाहता तुम्हाला एव्हाना मुलं असायला हवी होती” असं विचारत रॉबिनने काचेच शेल्फच दार हळूच सरकवल आणी आतील मासिक बाहेर काढली. आणी एका पाठोपाठ ती मासिक चाळू लागला.
“ नाही..लग्नासाठी कधी वेळच नाही मिळाला. आणी तसही मला एकट राहायला आवडत” पाटील रॉबिन काय पाहतोय तिकडे पाहत म्हणाले. रॉबिन त्याचा हातातली एक एक मासिक चाळत होता. त्यातील एक मासिक त्याने व्यवस्थित आतमध्ये उघडून पहिले. नामांकित डॉक्टर लोकांचे विविध विषयावरचे लेख आणी प्रबंध त्यामध्ये होते. त्यातले एक-दोन प्रबंध आणी लेखांवर रॉबिनने सहज नजर फिरवली.
“ अरे वाहः खूपच छान माहिती आहे हि ” रॉबिनने मुद्दाम वातावरण हलक करण्याचा प्रयत्न केला.
“ हो.. माझा कामासाठी महत्वाचे आहे ते... पण मला एक सांगा एवढ्या रात्री तुम्ही मला भेटायला कशासाठी आलात” असं म्हणत पाटील रॉबिनच्या चेहऱ्याकडे उतावळ्या नजरेने पाहू लागले.
“ असंच सहज वाटलं तुम्हला भेटावा, तुमचं घर पाहिलं नाही ना कधी” हातातली मासिकं बाजूला ठेवत रॉबिन पाटलांकडे रोखत म्हणाला. रॉबिनच्या नजरेला नजर देण्याचं धाडस पाटलांमध्ये न्हवत.
त्यामुळे बाजूला वळत सोफ्याच्या जवळ जात डॉक्टर पाटील म्हणाले “ म्हणजे काही विशेष कारण आहे का.. खुन्यासंदर्भात काही धागादोरा हाती लागलाय का तुमच्या?”
“ तूर्तास तरी काही नाही, काही कळत नाहीये हो डॉक्टर... कसं शोधावं आणी कुठे शोधावं. तो वाडा एकतर एवढ्या लांब. आसपास कोणी काही पाहिलं असल्याचं सांगत नाही कि कसला सुगावा नाही “ मुद्दाम त्रागा करत रॉबिन वैताग आल्यासारखी अक्टिंग करत म्हणाला.
“ ओह्ह ...” एवढ बोलून पाटील जमिनीकडे पाहत म्हणाले.
“ मला पाणी द्याल का? “ रॉबिनने डॉक्टर पाटील यांना विचारलं.
“ अ..आत्ता आणतो असं म्हणत डॉक्टर पाटील आतमध्ये स्वयंपाक घरात वळले.
रॉबिन सोफ्याजवळच्या टेबलाजवळ असणार्या खुर्चीत येऊन बसला. जरा मागे टेकून बसणार तेवढ्यात त्याला टेबलाच्या पृष्ठभागावर पाण्याचं एक वर्तुळ दिसलं. जणू काही कोणीतरी ग्लास ठेवला असावा. ते पाण्याचं वर्तुळ एकदम ताज असल्यासारखं होतं. त्या पाण्याचा वर्तुळाला बोटाने स्पर्श करत रॉबिनने ते नक्कीच पाणी आहे कि आणखी कोणता द्रव पदार्थ हे पाहण्यासाठी त्याचा नाकाने वास घेतला. पण ते पाणीच होता. कोणासाठी पाणी ठेवलं असेल इथे पाटील डॉक्टरांनी कि स्वतःच पाटील डॉक्टरांनी पाणी पिऊन ग्लास इथे ठेवला असेल. पण पाटील तर म्हणाले कि मी झोपलो होतो म्हणून म्हणजे मग ते मागे बेडरूम मध्ये असतील. मग इथे पाण्यचा ग्लास कोणी ठेवला असेल?. रॉबिन विचार करतच होता तेवढ्यात पाटील हातात काचेचा पाण्याचा ग्लास घेऊन आले. त्यांचा हातातून पाण्याचा ग्लास घेऊन रॉबिनने थोडसं पाणी पिलं आणी टेबलावर तो ग्लास ठेवून दिला. पाटील समोर हात बांधून उभे होते.
“तुमचं घर तसं बरंच मोठं आहे पाटील” रॉबिन म्हणाला.
“ हो खूप आधी बांधलं होतं, आणी माझं क्लिनिक सुद्धा बाजूला असल्याने जवळच घर असलेलं बऱ पडते.” पाटील हातांचा चाळा करत उत्तरले.
“ क्लिनिक घराला लागुनच आहे का तुमचं? आणी तिथे जाण्यासाठी दरवाजा घरातूनच का? रॉबिनने विचारलं.
“ नाही. क्लिनिक मध्ये येण्यासाठी पेशंट लोकांसाठी दुसरा दरवाजा आहे बाहेर... एक दरवाजा घरात आहे जो क्लिनिकमध्ये जातो, तो मी वापरतो” पाटलांनी माहिती दिली आणी खाली पाहू लागले.
आपण घरात आल्यापासून पाटील डॉक्टर असं विचित्र वर्तन करत असल्याचं पाहून रॉबिनचा त्यांचावरचा संशय नक्कीच बळावला होता. पण आपल्या चेहऱ्यावर तसं न दाखवता रॉबिन शांतपणे बसून होता. टेबलावर त्याने मगाशी अर्धा पिऊन ठेवलेला ग्लास परत उचलला आणी राहिलेलं पाणी पिऊन टाकलं आणी टेबलावर पाहिलं त्याच्या ग्लास ठेवण्यामुळे टेबलावर अगदी तसचं ठळक पाण्यच वर्तुळ तयार झालेलं होतं. जसं त्याने थोड्या वेळापूर्वी टेबलावर दुसऱ्या बाजूला पाहिलं होतं. ते पाहून त्याच्या चेहऱ्यावर हलकंच स्मित झळकलं.
“ खरतरं तुमचं सगळं घर पाहण्याचा विचार आहे.” रॉबिन खुर्चीवर उठत म्हणाला.
“ आत्ता..एवढ्या रात्री ...सकाळी या न.. सकाळी पहा....” कपाळावरचा घाम पुसत पाटील अजीजीने म्हणाले.
“ आत्ता काय अडचण आहे “ रॉबिनला माहित होतंच कि पाटील नकार देणार तरी नकली आश्चर्य व्यक्त करत त्याने विचारलं.
“ आत्ता मला झोपं लागलीय आणि उद्या मला लवकर उठायचय, पेशंट येणारेत उद्या बरेच” पाटील आळस देण्याचं नाटक करत म्हणाले.
त्यांची हि नाटक पाहता रॉबिनच्या एक गोष्ट मात्र लक्षात आलेली होती. डॉक्टर पाटील नक्कीच काहीतरी लपवत आहेत. पाटलांना नक्कीच कोणीतरी भेटायला येणार आहे असं दिसतंय किंवा कोणीतरी पाटील डॉक्टर यांना नुकतंच भेटून गेलंय. त्यामुळेच पाटलांनी त्या व्यक्तीला पाण्याचा ग्लास देऊ केला असेल त्या व्यक्तीने पाणी पिऊन ग्लास टेबलावर ठेवल्याने पाण्याचा ग्लासच्या खुणा उमटल्या होत्या. रॉबिनने शांतपणे आपल्या हनुवटीवर बोट ठेवून काहीतरी विचार केला. आणी थोड्या वेळात तो म्हणाला “ ठीक आहे डॉक्टर आता उशीर झालाय नंतर कधीतरी येईन भेटायला” असं म्हणून तो झटकन दरवाजाजवळ जाऊ लागला. पाटील लगोलग त्याचा पाठोपाठ आले. बाहेर पडून रॉबिनने पाटलांना निरोप दिला तेव्हा पाटील दरवाजातच उभे होते आणी रॉबिन कधी एकदा जातोय याची वाट पाहत दरवाजा लावण्याचा तयारीत होते.
रॉबिन आपल्या दुचाकीजवळ जात मिश्कील हसत होता. बाहेर खूपच अंधार पडलेला होता. रातकिड्यांची किरकिर पण खूप वाढलेली होती. रॉबिनने दुचाकी चालू केली आणी पाटलांच्या घराकडे नजर टाकली. तेव्हा पाटलांनी नुकतंच दार लावून घेतलेलं त्याला दिसलं. गाडी चालू करून रॉबिनने थोडी पुढे आणली आणी एका गल्लीच्या पुढे आडोशाला उभी केली. रॉबिनला दाट संशय होता कि डॉक्टर पाटील हे काहीतरी लपवतायत त्यामुळे घरातून बाहेर पडून थोडं पुढे येऊन रॉबिनने दुचाकी आडोशाला लावली होती आणी परत पायी डॉक्टर पाटलांच्या घराकडे पाळत ठेवायला चालला होता. पाटील यांना भेटायला नक्कीच कोणीतरी आलेले असावे असं त्याला वाटून गेलं. त्यामुळेच त्यांचा घरावर पाळत ठेवावी असं त्याला वाटून गेलं. थोड्या वेळातच पाटील डॉक्टरांच्या घरासमोर एका बंद दुकानाच्या बाजूंला असलेल्या झाडींमध्ये रॉबिन उभा राहिला. इथून डॉक्टर पाटलांच घर आणि बाजूचं क्लिनिक स्पष्ट दिसतं होतं. डॉक्टर पाटलांच्या घरात त्याने सहजच भेट दिलेली होती तेव्हा त्याला माहित न्हवत कि कोणीतरी आधीच डॉक्टर पाटलांना भेटायला आलेलं आहे. त्यामुळेच डॉक्टर पाटलांनी लवकर दरवाजा उघडला नाही कारण जी कोणी व्यक्ती आत आलेली होती तिला आतमध्ये लपवायला त्यांना वेळ लागला. डॉक्टर पाटलांचा घाबरा झालेला चेहरा आणी रॉबिन आल्यामुळे उडालेली त्यांची तारांबळ, टेबलावरच्या पाण्याचा ग्लासच्या ताजा खुणा, जे पाणी पाटलांनी भेटायला आलेल्या व्यक्तीला दिलं असेल त्यामुळे रॉबिनचा डॉक्टर पाटलांवर संशय जास्तच दृढ झाला. आपला संशय खरा आहे कि नाही हे बघण्यासाठीच झाडीमध्ये आपल्याला व्यवस्थित लपवून रॉबिन डोळे उघडे ठेवून पाटलांच्या घराकडे नजर देऊन उभा होता.
रॉबिन पाटलांच्या घरातून निघून जाताच काही वेळाने ती व्यक्ती बाहेर पडेल कारण लगेचच बाहेर जाण्याचा धोका ती व्यक्ती घेणार नाही थोडी जास्त काळोखी रात्र होण्याची वाट पाहिलं असा रॉबिनचा कयास होता. हाताची घडी घालून रॉबिन पाटलांच्या घराकडे पापणी सुद्धा न लवता पाहत होता. कारण ती व्यक्ती कोण आहे हे कळणे खूप गरजेचे होते? अशा गुपचूप प्रकारे येऊन पाटलांना भेटायचे कारण काय असावे? मुख्य म्हणजे मालतीबाई यांचा खुनाशी त्या व्यक्तीचा काही संबंध असावा का? या सारख्या प्रश्नाची उत्तरं देखील त्याला मिळणार होती. रात्र अजूनच गडद झालेली होती रस्त्यावर चिटपाखरूदेखील न्हवत. रातकिड्यांची किरकिर जास्तच वाढलेली होती. दूरवर काही कुत्री जोरजोरात भुंकत होती. डॉक्टर पाटलांच्या घराजवळ अंधार असल्याने जास्त स्पष्ट दिसत न्हवते त्यामुळे घराजवळ जाऊन तिथे उभं राहिल्याने स्पष्ट दिसणार होतं. पण पाटलांच्या घराजवळ लपून पाहता येईल अशी आडोशाची जागा अथवा झाडी न्हवती. आणी तसही लांबून पाटलांचं घर आणी क्लिनिक यांची दोन्ही प्रवेशद्वार इथून दिसतं होती. त्यामुळे इथूनच पाहण्याचा निर्णय रॉबिनने घेतला होता. वाट पाहता पाहता जवळपास अर्ध्या तासाचा काळ लोटला. अजूनही त्या व्यक्तीचा काही पत्ता न्हवता. खरंच ती व्यक्ती आत असेल ना कि आपला तर्क चुकला आहे असे विचार रॉबिनच्या मनात घोळू लागले. हातावर हात चोळत रॉबिन उभा होता.
एवढ्यात.. त्याची नजर समोर डॉक्टर पाटलांच्या क्लिनिकच्या दरवाजावर गेली. दरवाजातून एक व्यक्ती हळूच बाहेर पडलेली रॉबिनने पहिली तसं रॉबिन जरासा खाली वाकला म्हणजे आपला तर्क बरोबर होता तर इतका वेळ ती व्यक्ती पाटलांच्या घरातच क्लिनिक मध्ये लपून बसलेली असावी. रॉबिन झाडीमध्ये लपून श्वास रोखून पाहू लागला. क्लिनिकचा दरवाजा बंद झाला. त्या व्यक्तीने आपल्या अंगाभोवती भोवती मोठी चादर किंवा शाल लपेटलेली होती त्यामुळे त्या व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसतं न्हवता आणी लांबून ती व्यक्ती कोण असावी याबाबत अंदाज देखील येत न्हवता. क्लिनिकचा दरवाजा बंद झाल्याक्षणी झटक्यात त्या व्यक्तीने क्लिनिकच्या बाजूने वळून पाटलांच्या घराला वळसा घातला आणी घरच्या मागच्या बाजूला गेली जिथे काळोख होता. ती व्यक्ती तिकडे वळल्याक्षणी रॉबिन चपळाईने पण सावधगिरीने झाडीतून बाहेर आला आणी आडमार्गाने त्या व्यक्तीच्या मागे झपाट्याने जाऊ लागला. इकडे तिकडे पाहत झपाझप पावले टाकत ती व्यक्ती पाटलांच्या घरामागे जाऊन मागच्या रस्त्याने दुसर्या अंधार्या गल्लीतून जाऊ लागली. रॉबिन देखील हळूहळू त्या व्यक्तीचा माग घेत पाठलाग करत पुढे जाऊ लागला. आजूबाजूला पूर्ण शांतता होती. पुढे जाऊन एका मोक्याचा क्षणी झडप घालून त्या व्यक्तीला पकडायचा डाव रॉबिनने आखला.
गल्ली संपून आडमार्गाने जाण्याचा रस्त्यावर ती व्यक्ती आली, तो रस्ता त्या व्यक्तीचा सवयीचा असल्याप्रमाणे ती व्यक्ती झपाझप पावले टाकत पुढे जात होती. रॉबिन मात्र दगडधोंड्यांवर आदळत आडमार्गावरील काटेरी झुडूपांमध्ये अडकत कसाबसा वेग राखून चालला होता. पटकन धावत पुढे जाऊन त्या व्यक्तीला जमिनीवर आडवे पडायचा विचार रॉबिनने केला आणी त्या नादातच घात झाला. वेगात पाठलाग करण्याचा नादात एका काटेरी झाडीमध्ये रॉबिनची प्यांट अडकली. काटेरी झाडांनी त्याची प्यांट ओढली गेली आणी त्याचा तोल गेला. तोल जाऊन रॉबिन बाजूला एका दगडांच्या राशीवर जाऊन पडणारच होता पण तरी सावध असल्याने दगड चुकवत दोन्ही हात दगडांच्या राशीवर टेकवत हुलकावणी देऊन बाजूला रस्त्याचा एका उतरंडीला जाऊन पाठीवर आडवा पडला. दगडांवर आपटून होणारा कपाळमोक्ष रॉबिनने चुकवला होता पण त्या नादात दगडांची राशी कलंडली आणी त्यावरचे २ गोलाकार दगड उताराकडे गडगडत रस्त्याकडे गेले. त्याचा आवाज झाला आणी पुढे जाणाऱ्या त्या गूढ व्यक्तीला तो आवाज आला. त्या व्यक्तीने मागे वळून पहिले तर दोन दगड रस्त्यावर गडगडलेले दिसले. रॉबिन रस्त्याचा बाजूला उताराला जिथे थोडीफार झाडी होती तिथे आडवा पडल्याने आणी अंधार असल्यामुळे त्या व्यक्तीचा नजरेस रॉबिन काही दिसला नाही. पण कोणीतरी आजूबाजूला असणार या भीतीने त्या गूढ व्यक्तीने पळत जाण्यास सुरुवात केली. रॉबिनची पाठ चांगलीच शेकली होती, त्याला पटकन उठता येईना. थोड्यावेळाने कसबस उठत कपडे झटकत त्याने आजूबाजूला पहिले. ती व्यक्ती अंधाराचा फायदा घेऊन पसार झालेली होती.
“ शीट..हातचं सावज असं निसटून गेल्याने त्याला प्रचंड राग आला होता.” हाताने पाठ चोळत सामोर पहिले. पुढे दूरवर २-३ लुकलुकते दिवे असलेली घरे त्याला दिसली. त्या भागाकडेच ती व्यक्ती गेल्याचं त्याच्या ध्यानात आलं. लुकलुकणारे ते दिवे हे देसाई वाडा आणी त्याचा पुढची काही घरे इथले दिसत होते. आता परत पाठलाग करण्यात किंवा पुढे जाण्यात काही अर्थच उरलेला न्हवता. त्यामुळे आपली दुखरी पाठ चोळतच रॉबिन आपल्या दुचाकी लावलेल्या जागेकडे जाण्यासाठी वळला.
क्रमश:
चांगला सस्पेन्स राखला आहे!
चांगला सस्पेन्स राखला आहे!
छान चालली आहे कथा.
छान चालली आहे कथा.
अवांतर- तुमचे नाव बघून जुने चांदोबा आठवले.
रॉबिन जरा स्लो दिसतोय. ६ भाग
रॉबिन जरा स्लो दिसतोय. ६ भाग झाले पण एकही क्लु हाती लागलेला नाही….