रिसेप्शन
मी ऑफिसातून घरी परत आलो होतो. बायकोनं केलेल्या चहाचे घुटके घेत टीव्हीवरच्या बातम्या बघत होतो.
“भागो, हे बघ. वाघमारेंच्या मुलीच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका. मिस्टर आणि मिसेस वाघमारेंनी स्वतः येऊन आग्रहाने आमंत्रण दिले आहे.”
मी आमंत्रण पत्रिका उलट सुलट करून वाचली. ह्या महिन्यात मला बनियनची जोडी विकत घ्यायची होती. आता ते शक्य होणार नव्हते.
“हे वाघमारे म्हणजे...”
“आधीच सांगते. माझे कोणी वाघमारे नावाचे नातेवाईक नाहीत.“ बायकोनं पदर झटकला. “आमच्यात अशी आडनावे नसतात.”
“माझेही वाघमारे नावाचे कोणी नातेवाईक नाहीत.”
असं तुझे माझे बऱ्याच वेळ झाल्यावर आमच्या दोघांचे एकमत झाले कि ह्या वाघमाऱ्यांचा आणि आपला काही संबंध नाही. म्हणजे लग्नाला जायची काही गरज नव्हती.
ज्या दिवशी चि. सौ. कां. सुनंदा वाघमारेचा विवाह संपन्न होणार होता त्या दिवशी सकाळी सकाळी दिनकररावांचा फोन! तुम्ही विचाराल कि आता हे दिनकरराव कोण? खर सांगतो, मलाही माहित नाही.
“अरे भागो, ओळखलस का? मी दिनू.”
“आयला दिन्या लेका. किती दिवसांनी फोन करतो आहेस. आज बरी आठवण झाली. बोल.”
“अरे वाघमारेच्या सुनंदाचे लग्न आहे. लक्षात आहे ना. तू डायरेक्ट कार्यालयावरच ये. काय?”
त्याला हो करून फोन बंद केला.
“कुणाचा फोन होता?”
“कोणी मिस्टरी दिनू होता.”
“अरे जरा नीट बोल ना. यू मीन मिस्टर दिनू. दिनकरराव म्हणजे माझे लांबचे नातेवाईक आहेत. मी नव्हती का तुला लग्नात ओळख करून दिली होती?”
“लग्नात? कुणाच्या लग्नात?”
“कुणाच्या काय? एव्हढ्यात विसरलास? आपल्या लग्नात.”
“आपले लग्न” किती वर्षांपूर्वी झाले? हेही आता मी विसरलो आहे.
“हा हा आठवलं. ओ तो दिनू होय. खरच गं खरच.”
“काय म्हणत होते?”
“वाघमारेच्या लग्नात येणार ना असं विचारत होता.”
बायको विचारात पडली.
“भागो, मला वाटतं आपण लग्नाला जायला पाहिजे. काय माहित वाघमारे आपले दूरचे नात्यातले असतील. तिथं गेलो कि आपल्याला आठवेल. असं समाजापासून फटकून वागणेही बरोबर नाही. आपली सुलूही आता लग्नाची झाली आहे.”
सुलू म्हणजे माझी मुलगी. सध्या बंगळूरला ट्रेनिंग करते आहे. बीई कांप्यूटर केले आहे. सुस्वरूप आहे. कोणी चांगला मुलगा नजरेत असेल तर सांगा प्लीज.
संध्याकाळी मी टीवी बघत बसलो होतो. संध्याकाळचे पाच वाजले असावेत.
“भागो आटप. आपल्याला जायचय ना.”
मला वाटत होत कि बायको विसरली असेल, पण नाही. आठवणीची पक्की आहे. शिवाय आमच्या सुलूच्या लग्नाचाही सवाल होताच. समाजापासून फटकून कसं चालेल?
सुलू बघता बघता लग्नाची झाली.
माझ्या डोळ्यासमोर भयानक दृश्य आले.
सुलू आणि तिचा नवरा सजधजके सोफ्यावर बसले आहेत. मी अस्वस्थपणे येरझारा मारत आहे. बायको उदास, केटरिंगवाले टेबल सजवून उभे आहेत. सिताफळरबडीचा बेत आहे. पण आख्ख्या कार्यालयात एकही गेस्ट आलेला नाही. त्या नट्टाफट्टा करून सेंट मारून एकमेकांची सटल उणीदुणी काढणाऱ्या ललना!
“ही साडी कुठून आणलीस ग.”
“अग आमच्या इकडे किनई एक जण साड्या घेउन्येतो. आम्ही किनई त्याच्या कडूनच घेतो.” दुकानाचे नाव सांगितले तर ही जाऊन किंमत काढून येईल.
“ही टेंपल बॉर्डर भारी दिसतेय. अंगभर आहे का?”
“ही जर पण खरी दिसतेय.”
स्त्रियांचा शब्दकोश अलग असतो. “खरी” ह्या शब्दालाही खरा आणि खोटा असे दोन अर्थ असतात.
पुरुषही काही कमी नसतात बरका.
“होहो, मॉडेल कॉलनीत घेतला आहे. थ्री बेडरूम... हो थोडा कॉस्टली आहे, पण काय असतं ना कि...”
“सुझुकीच्या खूप कंप्लेंट आहेत म्हणे. म्हणून मग एमजीच घेतली...”
“युरोप झालं, अमेरिका तर दोनदा झाली. ह्या वर्षी म जपानला जाऊन आलो...”
.
.
.
असं बरच काही.
अन ती शिवणापाणी खेळणारी मुलं.
कोणी कोणी म्हणून आलं नव्हतं.
सुलू कंटाळून गेली होती.
“बाबा, आम्ही देवालातरी जाऊन येतो. बसून बसून कंटाळा आला आहे.”
“अग असं नको करू. लोक येतील त्यांना काय वाटेल?”
“कोणीही येणार नाहीयेत. तुम्ही वाघामारेंचे लग्न अटेंड केले नाहीत ना...”
“तरी मी ह्याना सांगत होते...“
नाही नाही असं व्हायला नाही पाहिजे.
टीव्ही वर वाद विवाद रंगात आला होता.
“एकनाथनं असं करायला नको होतं...”
हिंदुत्व, समाजवाद, रेवडी, अडाणी-अंबानी, चुनावीबांडू, लीब्रांडू अशी शब्दांची फेका फेक चालू होती. ही मज्जा सोडून लग्नाला जायचे अगदी जिवावर आले होते. पण काय करणार? इलाज नव्हता. सुलूचं लग्न व्हायचं होतं ना.
कुठलेही आढेवेढे न घेता, वळणे आणि शॉर्टकट न घेता चला कार्यालयात. तिथला सीन बघुया.
“या या. अस इकडून या. बसा आरामात. मंडळी येताहेत. चहा सरबत काही? त्या तिकडे व्यवस्था केली आहे. नंतर मग स्नॅक्स आहेतच. सावकाश होऊ द्या.”
आम्हाला बसवून ते सद्गृहस्थ निघून गेले.
“मला वाटत हे सुनंदाचे मामा असावेत.”
मी एकदा सुनंदाकडे निरखून बघितले. चेहऱ्यावर जबरदस्त क्रीम थापले होते. म्हणजे गवंडी जसे...
उसके चेहरेकी चिकनाहटसे नजर फिसल रही थी. त्यामुळे सुनंदा ओळखीची असती तरी ओळखता आली नसती.
“मेकअप किती सुरेख केला आहे नाही? विचारायला पाहिजे.”
नवरा मुलगा बिचारा बापुडा दीनवाणा बसला होता.
“नवरामुलगा किती शांत आणि तेजस्वी दिसतो आहे.”
“कुणी ओळखीचे दिसतंय का?”
“अजून तरी कोणी नाही.”
एका सहा सात वर्षांच्या मुलाला घेऊन एक जण आमच्या दिशेने येत होता.
“बेटा, हे काका.”
“हाय काका!”
“अरे तसं नाही. मी काय सांगितलेंय?”
मुलाने वाकून पायाला स्पर्श केला..
“नमस्कार करतोय काका.”
“आयुष्मान भव.” मी गहिवरून आशीर्वाद दिला.
“काका आयुष्मान नाही वरूण म्हणा.”
“वरू, मस्करी नाही. मस्करी नाही करायची.”
“केव्हढा मोठा झाला आहे. मी बघितला तेव्हा हा इवलासा होता. अगदी तुमच्या वळणावर गेला आहे.”
“सगळे म्हणतात कि त्याच्या आईच्या वळणावर गेला आहे. ती तिकडे मैत्रिणींच्या गराड्यात फसली आहे. मी म्हटलं कि तेव्हढ्यात आपल्याशी दोन शब्द बोलावेत. बाकी तब्येत वगैरे?”
“तब्येत एकदम फसक्लास. डॉक्टर म्हणतात थोडी बीपीची काळजी घ्या. मीठ कमी करा.”
“कोण? अॅलोपाथीवाला असणार. तुम्ही कोल्हापूरला आलात कि मी... आलो आलो. बायको बोलावते आहे. मग भेटू. तब्येतीची काळजी घ्या. बीपी शरीर... अग आलोकी.”
“बाय अंकल.”
मी त्याच्या बायकोचे आभार मानले.
असे कित्येक ओळख काढून भेटून गेले. त्यांच्या पैकी एकालाही मी ओळखत नव्हतो. माहौल असा होता कि पोटूस बायडेन जरी येऊन माझ्याशी दोन गप्पा मारून गेला असता तरी मला आश्चर्य वाटले नसते.
“बस झालं. भागो आपण सुनंदाला भेटून घरी परतूया.”
आता खरी कसोटी होती. मी मनोमन ठरवले कि प्ले बाय इअर.
प्ले बाय इअर म्हणजे To do by guessing, intuition, or trial and error; to react to events as they occur. हाऊ ट्रू!
आम्ही दोघं जोडीने स्टेजवर गेलो.
“हॅलो सुनंदा. ओळखलस का?”
“हे काय काका. असं कसं बोलता? ओळख कशी विसरेन बरं? अरु, मी सांगत होते ना ते हे काका. माझ्यासाठी गोळ्या चॉकलेट आणायचे. काकू कशा आहात?”
गोळ्या चॉकलेट? कुछ भी. आयला ही सुनंदा पण तय्यार दिसतेय.
सुनंदाच्या हातात पाकीट ठेवले.
“चि. सौ. कां. सुनंदास ...सप्रेम... फ्रॉम मिसेस अंड मिस्टर भागो पाटील यांजकडून. विवाहाच्या अनेक शुभेच्छा! नांदा सौख्यभरे...”
सगळं कसं जिथल्या तिथं.
हल्ली जी-मेल मध्ये कसं असतं तसं. सगळी वाक्ये तयार असतात, आपली वाट बघत. आपण फक्त क्लिक करायचं.
क्लिक... क्लिक? असं म्हणताय होय. क्लिक. चलतो आता. घरीच या एकदा वेळ काढून क्लिक...
“हे कशाला काका?” असं म्हणून तिने पाकीट बाजूला ठेवले. पाकीट उघडल्यावर ही काय म्हणेल? आपलं चुकलच. खाली नाव नको होतं लिहायला.
सुनंदा आणि बायको त्या दोघी एकमेकांशी भिडल्यावर मी नवऱ्या मुलाकडे मोर्चा वळवला.
“आमची सुनंदा गोड मुलगी आहे. यू आर लकी.”
“हो हो अगदी अगदी. तुम्ही कुठे असता?”
“मी इथे डायरेक्टर ऑफ शुगरच्या ऑफिसमध्ये असतो. असिस्टंट डायरेक्टर आहे. सेन्ट्रल बिल्डींग.”
“ओ हो म्हणजे ते आपले फलटणचे...”
“हो. ते डायरेक्टर आहेत.”
एक फोटो सेशन झाले.
जाताना सुनंदाच्या आई बाबांचा निरोप घेतला. आवंढा गिळून ते म्हणाले,
“थॅंक्यू, तुम्ही याल अशी अपेक्षा नव्हती. पण वेळ काढून आलात. बरं वाटलं.”
“अहो तुमच्याकडच्या कार्याला जायलाच पाहिजे. आणि त्या निमित्ताने नातेवाईकांच्या भेटी गाठी होतात. बाकी समारंभ चांगला झाला. मुलीचे लग्न म्हणजे... एक कर्तव्य... बरं येउ आता? क्लिक!”
मला अनेक प्रश्न पडले आहेत.
ही सुनंदा कोण?
तो आयुष्मान सॉरी वरुण आणि त्याचे बाबा ते कोण?
तो उपरा म्हातारा जो निव्वळ जेवण्यासाठी आला होता. तो कुणाच्याच बाजूचा नव्हता. तो कोण?
माझ्या बायकोची ती जिवाभावाची मैत्रीण जिला माझी बायको आयुष्यात कधी भेटली नव्हती ती कोण?
असे अनेक प्रश्न. पण त्यांच्या बद्दल बोलायचे आम्ही कटाक्षाने टाळले.
परतताना बायको म्हणाली, “कार्यालय चांगले प्रशस्त होते नाही? लक्षात ठेवायला पाहिजे. हल्ली म्हणे एकेक वर्स आधी बुकिंग करावे लागते.”
हल्ली म्हणजे सगळच कठीण झालं आहे.
रिसेप्शन
Submitted by केशवकूल on 11 April, 2024 - 22:32
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूपच छान मजा आली
खूपच छान
मजा आली
खल्लास!
खल्लास!
सुलूचे लग्न कसे होतेय ते कळवा रच्याकने!
छान, खुसखुशीत
छान, खुसखुशीत
निमंत्रण नव्हते तरी या लग्नास
निमंत्रण नव्हते तरी या लग्नास हजेरी लावली आणि धमाल केली. .! केशव जी , अगदी कु ऽ ल लिहलेय!!
(No subject)
मस्त....अगदी खरं
मस्त....अगदी खरं
मस्त रंगवली.
मस्त रंगवली.
निमंत्रण नव्हते तरी या लग्नास
निमंत्रण नव्हते तरी या लग्नास हजेरी लावली आणि धमाल केली.>>>
अरे निमंत्रण होते ना. सुनंदाच्या आई बाबांनी येऊन आग्रहाचे निमंत्रण दिले होते. मी कथेच्या सुरवातीलाच लिहिले आहे. तो म्हातारा मात्र निमंत्रणा शिवाय आला होता. सिझन just सुरु झाला होता. तो सीझनमध्ये सगळीकडे जाणार होता. त्याची कथाही रंजक आहे. ती नंतर कधीतरी.
ह्या चे आणखी भाग येऊ द्या.
ह्या चे आणखी भाग येऊ द्या.
सुलु चं लग्न, आणि त्यांना ओळख आठवली का सुनंदा कोण होती वगैरे असं
छान plot आहे
:khokho:
ह्याची ह्या थीमची बरीच
ह्याची ह्या थीमची बरीच वेरिएशन्स आहेत. उदा. फेसबुकचे "लाइक्स." अत्यंत नेहमीचा आणि महा कंटाळवाणा प्रकार म्हणजे ...
आपण कुठल्यातरी नातेवाईकाकडे /मित्राकडे काही छोट्या मोठ्या कामासाठी जातो. त्याची बायको छान कांदापोहे करते वर चहा. आपण मनात विचार करतो व्वा आजचा दिवस सार्थकी लागला. पण नाही हा मित्र नुकताच गोव्याला/केरळला/ तिकडे काश्मीरला जाऊन आलेला असतो. ते तिकडे मजा करतात. करा कि आपली काही ना नाही. पण त्या ट्रीपच आल्बम भावत्या "आखो देखा हाल" सह दाखवून आपले हालहाल का करतात? आणि हे सगळ केवळ एक प्लेट पोहे आणि चहा च्या बदल्यात. नाही पुराता भाई.
अजून एक बेबी शॉवर किंवा तत्सम समारंभाचे आल्बम. ओके. नाही सांगत. तुम्हाला माहित आहे तर.
हे आहे समाजाचे आपल्यावरचे प्रेशर. झेलायचे, सेफ्टी वाल्व न उडवता.
मस्त लिहिली आहे कथा..
मस्त लिहिली आहे कथा..
मिश्किल संवाद आवडले.
हे माझ्याबरोबर मराठी
हे माझ्याबरोबर मराठी मंडळाच्या कार्यक्रमात झाले आहे.
एकजण येऊन अगदी गळ्यात पडली. कित्ती दिवसांनी भेटलो, कशी आहेस करत. एकमेकींच्या मुलांची चौकशी केली, काय करते आता ई. झालं.
पण शप्पथ, मला तिचं नाव आणि आधी कधी भेटली हे वर्ष झालं तरी आठवत नाहीये. नंतर भेटलीपण नाही.
चांगल्या ५-१० मिनिट गप्पा मारल्या आणि नंतर नवरा आणि मुलगा अतीव आदराने बघत होते की, ती कोण आठवत नसताना इतकं बोलू कसं शकते.
मस्त.
मस्त.
chioo
chioo
खरच कि बसल्या बसल्या ...
विश्वास नाही बसत. मी अशी एक कथा लिहिली आहे म्हणा. (क्रॉसओव्हर आणि परत माघारी)
तरी पण...
चला कथा वर आहे तोपर्यंत आभार
चला कथा वर आहे तोपर्यंत आभार मानून घेतो.
Abuva>> तुम्ही लोकांनी मदत केलीत तर सुलूचे लग्न होऊन जाईल. पण मुलगा अमेरिकेतला असेल तर उत्तम . म्हणजे मग माझी बायको त्य दुकानात जाऊन
"अहो, पुरण पोळ्या अमेरिकेत पाठवायच्या आहेत. जावई बापूंना फार आवडतात ना. म काय करणार?"असं उच्च आवाजात सांगू शकेल.
"तुम्ही आधी सांगितलत तर आम्ही थोड्या कडक भाजून देऊ,"
किल्ली >> पुढचे भाग? स्फुरले तर लिहिणार,
माबो वाचक, वावे, MazeMan, मानव, मेघना, रूपाली विशे - पाटील आपणा सर्वांचे आभार.
आणि इतरही "मूकवाचकांचे" (ह्या शब्दासाठी सरांचे आभार) आभार.
मस्त!
मस्त!
नायकाला समांतर विश्वातुन
नायकाला समांतर विश्वातुन पत्रिका आली का??
बाकी सगळे संवाद मस्त…..मजा आली वाचताना.. तो कोण म्हातारा लग्नात दिसला नाही, नायकाच्या प्रश्मान दिसला..
हे हे, मस्त. जमलीय
हे हे, मस्त. जमलीय
नायकाला समांतर विश्वातुन
नायकाला समांतर विश्वातुन पत्रिका आली का??>> हा अॅंगल माझ्या लक्ष्शात आलाच नव्हता. मस्त कल्पना . आभार . दुसरीकडे कुठेतरी वापरीन जर तुमचा कॉपीराईट नसेल तर. असला तर परवानगी घेऊन. नाही परवानगी दिलीत तरी वापरेन!
कथा आवडली.
कथा आवडली.
पण मलाही प्रश्न पडलाय की ती पत्रिका, तो फोन
कसं काय बुवा भागो ला माहीत नाही कुणाचे ते??
>>>> अरे निमंत्रण होते ना....
>>>> अरे निमंत्रण होते ना....
केशवकूल - निमंत्रण सौ व श्री भागो पाटील ह्यांना होते... मला नव्हते तरी मी जबरदस्ती मंडपात घुसून मजा केली, असे सुचवायचे होते....!! बाकी भन्नाट अनुभव..
पॅडी My mistake.
पॅडी
My mistake.
>>>>नायकाला समांतर विश्वातुन
>>>>नायकाला समांतर विश्वातुन पत्रिका आली का??
हे केकु साठी स्पेशल
वाचायला मजा आली
manya साधना
manya साधना
खरच मला पण वाटायला लागलं आहे. मी खूप निश्चय केला होता कि आता त्या बाजूला जायचे नाही. पण हे समांतर मला सोडत नाहीये,असे वाटतंय.
कसलं भारी लिहिलंय. मजा आली
कसलं भारी लिहिलंय. मजा आली
'पोटूस बायडेन' ला खूप हसले.
भारी लिहिलंय केशव कुल...
भारी लिहिलंय केशव कुल...
मला आधी वाटले की आहेर मिळावा म्हणून अशाच रँडम पत्रिका वाटल्या...
अक्षय कुमारच्या एका पिक्चरमध्ये असा सीन होता..
हे समांतरच आहे हो…
हे समांतरच आहे हो… किमानपेक्षी दिनु तरी भेटायला हवा होता.
हो हो आता तर माझी खात्रीच
हो हो आता तर माझी खात्रीच पटली. कुठल्या तरी AI लॅब मधून पळाल्या आहेत. हा त्यांचाच चहाटळपणा आहे.
दिनू नाही पण त्याच्या सासूबाई राधाबाई क्षणभर दिसल्या असं बायको म्हणाली.
छान संवाद...
छान संवाद...
एखादं निखळ माणूसपण जपणारं मैत्र आपण सगळे शोधत असतो कुणाला मिळतं कुणाला नाही... मिळालं तर एकलकोंडेपणा दूर होतो. आनंद सिनेमातले हे सीन्स आठवले...
https://youtu.be/1USJD-ae6mI?si=EP4hq2H1oxmivlhS
Pages