तो शुभ्र नभाचा तुकडा

Submitted by द्वैत on 1 April, 2024 - 11:11

तो शुभ्र नभाचा तुकडा कोसळला शिखरावरती
पाण्यात किनारे बुडता दुःखाला आली भरती

अश्रूंचा गंध फुलांना देऊन निघाला वारा
ओंजळीत ओल्या उरला धगधगता एक निखारा

घंटांचा नाद घुमेना पांगल्या दिव्यांच्या ओळी
हुंदका तमाच्या पोटी अंकुरतो नसत्या वेळी

चाहूल कुणाची येते नको वळून पाहू मागे
विजनाच्या वाटेवरती घर नक्षत्रांचे जागे

द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच

ओ हो....

सुंदर!

कवितेचे शीर्षक वाचून मनात "ये चांदसा रोशन चेहरा" या चालीत म्हटले.
सगळी कविता त्या चालीवर गाता येईल.

मस्त. ग्रेसांची आठवण करून दिली.

शीर्षकात चुकून नभीचा तुकडा वाचलं. मेडिकल स्टुडंटची कविता आहे कि आर के प्रॉडक्शनच्या आगामी सिनेमासाठी लिहीलेय या उत्सुकतेने पाहिली.

सुरेख कविता. अधुनमधून एखाद्या शांत दुपारी मी तुमच्या जुन्या कविताही पुन्हापुन्हा वाचते. तुम्ही आणि अनंतयात्री यांनी तुमची निर्मितीप्रक्रिया कुमारसरांच्या 'मराठी : लेखन घडते कसे' या उपक्रमात लिहावी अशी इच्छा होती. Happy