काटेभेंडीचं दबदबीत!

Submitted by kulu on 10 September, 2018 - 04:30

आज पर्थात काटेरी भेंड्या मिळाल्या, कधी नव्हे ते, म्हणुन पटकन रस्सा करावा हा विचार आला. हा प्रकार मला माझ्या आईने शिकवला आहे. मायबोली वर आधी कुणी टाकलीय का ही रेसिपि हे बघत होतो पण मिळाली नाही म्हणुन इथे देतो. भरपुर वेळ हातात असताना करायचा हा पदार्थ आहे, आमच्या घरी देखिल फक्त रविवारी सकाळीच हा प्रकार केला जातो!

साहित्यः
काटेरी जाड भेंड्या १२, १३, १४, १५.........इन्फिनिटी!
भरपुर कोथिंबीर
अन्दाजाने कान्दा (मी १५ भेंड्यांसाठी अर्धा कान्दा घेतला)
अन्दाजाने टोमॅटो (मी १५ भेंड्यांसाठी अर्धा टोमॅटो घेतला)
आलं, लसूण अंदाजानेच
ओल्या नारळाचा कीस (मी अर्धी वाटी घेतला)
२ मिरच्या
२ चमचे कांदा लसुण तिखट (कोल्हापुरी)
आमसुल

कृती
आधी हात धुवुन घ्या, कसल्या कसल्या कीबोर्ड वर टाईप करुन येऊन तसल्याच हाताने भेंडी हातात घेतली तर ती चिडते. मग भेंड्या धुवु नका, त्या कोरड्या कापडाने प्रेमाने पुसुन घ्या. प्रेमाने पुसा, रागाने जोराजोरात पुसल्यास भेंडी चा काटा घुसला तर इथे प्रतिसादात येऊन माझ्या माथ्यावर त्याचे खापर फोडाल! आता ते कापड बाजुला ठेवा आणि भेंडीची साले काढुन भेंडीची कणसे दाण्यांसकट वेगळी करा. आणि मग डस्ट्बिन मध्ये टाका. साले टाका म्हणजे, नाहीतर कणसे टाकाल. आणि आता गॅस चालु करा, जो गॅस चालुय त्याच गॅस वर एक तवा ठेवुन द्या. मग टीव्ही चे चॅनेल बदलुन या, तोवर तवा तापेल.... बरोबर गॅस वर ठेवला असेल तर. मग तव्यात ती भेंडीची कणसे टाका, हलकेच परता, देव तुमच्याबरोबर असेल तर दाणे कणसातुन वेगळे होणार नाहीत, ते वेगळे झाले तर सगळं तसंच टाकुन गन्गोत्रीला जाउन डुबकी मारुन या. कणसे करपु द्यायची नाहीत नाहीतर कोळश्यचा रस्सा करावा लागेल. ४-५ मिनिटानी गॅस बंद करा, तवा उघडा ठेवा लगेच झाकु नका. झुरळ पाल कुत्री मांजरी कुणीही त्या तव्यात पडणार नाही गरम वस्तुजवळ जाऊ नये एवढी अक्कल असते त्यांना उपजत!

आता ते गार होईपर्यंत मसाला करायचा. तर कोथिंबीर (चवीनुसार, मला आवडते म्हणुन मी बरीच घालतो), आले, लसूण, नाराळाचा कीस, मिरच्या हे मिक्सर मध्ये बारीक वाटुन घ्या. घरी असताना आई मला हे खलबत्त्यात वाटायला लावते, त्याने "वेगळीच चव" येते. तेवढा पेशन्स असेल तर ते करा हो नक्की! मग परत गॅस चालु करा, वेगळा गॅस, नाहीतर पुन्हा कणसे भाजलेला गॅस चालु कराल आणि पुन्हा कोळसा! त्या गॅस वर कढईला बसवा. मगापासुन एकच चॅनेल चालु आहे ते बदलुन या टीव्ही चे परत. तापलेल्या कढईत जरा तेल सोडा. डाएट कॉन्शस असाल तरी जरा सढळ हाताने सोडा, नंतर खाताना कमी खा! (कमी खावं, खरं चवीनं आणि चवीचं खावं असं आई म्हणते) उगाच डाएट च्या नावाखाली कायतरी कमी तेल घातलं आणि रस्सा चांगला झाला नाही तर तुमच्यावर नाव! तापलेल्या तेलात कांदा घाला. कसा म्हणुन काय विचारताय? चिरुन मग घाला नाहीतर आर्धा कांदा भसकन् घालाल तसाच्या तसा. तो लालसर झाला कि त्यात टोमॅटो घाला. हो, टोमॅटो पण कापुनच घाला अणि एखादी फोड खाऊन बघा की तो कडु आहे का ते! आता त्यात लाल कांदा लसुण तिखट घाला. त्या तिखटाचं तेल सुटलं कि त्यात ती कणसे घाला भाजलेली. जरा बसा दोन तीन मिनिटं, दमल्याचा आव आणुन. आर्धा कांदा आणि आर्धा टोमॅटो कापुन हात दुखले असतील नाही तुमचे? उठा आता, बसायला संगितलेलं झोपायला नव्हे! आता त्यात आमसुल घाला, ते नसेल तर चिंच घाला, ती नसेल तर लिम्बुचा रस, तो नसेल तर एडिबल सायट्रीक अ‍ॅसिड घाला आणि तेही नसेल तर पृथ्वीवर या पटकन कारण तुम्ही मंगळावर गेलेले आहात राहायला! वाटण घाला मग त्यात आणि चांगलं ढवळुन त्यावर झाकण घाला आणि रामभरोसे सोडुन द्या रस्श्याला! १५ मिनिटात वगैरे रस्सा तयार होईल, मग झाकण काढा आणि रस्श्यावर चिरलेली कोथिंबीर फेका जराशी, नेम धरुन जोरात फेकु नका लांबुन, नाहीतर गरम रस्सा अंगावर येईल आणि परत माझ्या नावाने खडी फोडाल! आता परत झाकण ठेवा आणि गॅस बंद करा. दोन मिनिटे वाफेवर कोथिंबिरीचा स्वाद त्या रस्श्यात उतरु द्या!

गरम गरम भाताबरोबर किंवा भाकरी बरोबर हा रस्सा खा आणि माझी आठवण काढा!

Webp.net-compress-image_0.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

कुल्या किती भारी केल्येस रेसिपी Happy
मी भेंडीची पातळ भाजी आयुष्यात फक्त एकदाच बनवली होती ती पण ओगले आज्जींच्या पद्धतीने. बाकी खाल्ली पण मोजक्याच वेळेला आहे. पण तु केलेली मस्तच दिस्तेय एकदम.

भेंडी शब्द वाचुन रेसिपी उघडणारच नव्हते..पण कुलु असा शब्द पुढे होता म्हणुन उघडली..
मस्त लिहिलय :-)>>>1111
Masta recipe, karun baghte lockdown samplyavar, sadhya govyat ahe ithe asha bhendya khup miltat! Bhendichi chingu wali bhaji karte..ata hi nakkich karte! Happy

आज आमच्या मावस सासूबाई खास घेऊन आल्या आहेत कोल्हापूर हून. भाजी झाल्यावर लोकांनी फोटो काढण्या इतका वेळ दिला तर फोटो टाकेन.या भाजीची कणसं सोलून टोमॅटो फोडणी ची आमटी ही साबांची स्पेशालिटी होती.आजही मावस साबा टाकतील भाजी.
IMG_20220501_092251.jpg

हो ना Happy
ही आमटी.
कृती
काटेभेंडी जर कोवळ्या असतील तर नुसत्या चिरून, वाढलेल्या असतील तर सालं काढून आतलं कणीस आणि खूप निबर असतील तर नुसते कणसातले दाणे घेतले.हे नुसत्या तेलावर खमंग परतले 5-10 मिनिट.बाजूला दुसऱ्या भांड्यात तेल मोहरी जिरे(मोहरी टाकल्यावर 3 मिनिटांनी जिरे) हिंग हळद फोडणी करून त्यात चिरलेले टोमॅटो, कांदा लसूण मसाला मीठ टाकून मऊ होईपर्यंत परतले.मग त्यात अडीच मग पाणी घालून खळखळून उकळले.मग बाजूला नुसत्या तेलात परतलेली भेंडी यात टाकून परत 5 ते 10 मिनिट उकळून मसाल्याची चव मुरू दिली.
आता पोळ्या आणि भाताबरोबर खाऊ.
Screenshot_2022-05-01-11-26-14-298_com.miui_.gallery.jpg

अंबाबाईमंदिराबाहेर कपिल तीर्थ मंडई मध्ये खरीखरी काटे भेंडी मिळाली आहे, त्यामुळे फोटो टाकून शंका दूर करते.
ओळखण्याची खूण: नेहमीच्या भेंडीपेक्षा जाड, बुटकी, देठ जाड, रंग फिका आणि बाहेरचं साल जाड.ही काढूनच आतल्या कणसांची रस्सा भाजी बनवावी लागते.
IMG_20240330_141525.jpg

मस्त रेसिपी
काटेभेंडीचा फोटो पाहिला आणि जिला मी पूर्ण वाढ न झालेली भेंडी समजत होतो तीच होय.

आणि ही काटे भेंडी आमटी.चिंच गूळ काही जणांना आवडत नसल्यानं स्कीप मारलाय. तिखट टाटा मोटर्स गृहिणी चा कांदा लसूण मसाला.घरी आधी बनवायचो पण गेल्या काही वर्षांत कंटाळा करतोय.
IMG_20240331_202346.jpg

अर्रे हे मिसलं होतं. भारी लिहिलं आहेस कुलू. करून खाणे होणार नाही पण वाचताना धमाल आली.

काही शंका Wink
१. ज्या गॅसवर तवा ठेऊन भेंडी परतली त्याच गॅसवर दुसर्‍या भांड्यात उरलेली कृती केली तर दबदबीत बनणार नाही का? दुसरा गॅस वापरणे सक्तीचे आहे का?
२. ही त्रेतायुगातील पाकृ आहे का? म्हणजे तेलावर कांदा, टोमॅटो, वाटण असे परतून झाकण लाऊन १५ मिनीटे रामभरोसे ठेऊन द्यायचे - बहुतेक गॅस चालू ठेऊनच. पाणी काही घालायचं नाहीये. मग ज्याच्यावर भरोसा ठेउन दबदबीत करतोय त्या रामाने अधुनमधून येऊन भाजी परतणे गरजेचे आहे, जे फक्त त्रेतायुगात शक्य होते.

ऐसे काटे भींडी - हे भारी होते.

टाटा मोटर्स मसाले कधीपासून बनवायला लागले? Uhoh

टाटा मोटर्स गृहिणी उद्योग(एम्प्लॉयीज च्या बायका) हे गेली अनेक वर्षं खूप चांगल्या प्रतीचा दिवाळी फराळ, चटण्या,मसाले, नमकीन,भाजीच्या खण वाल्या पिशव्या, ऍप्रन बनवतात. त्यांचे erc जवळ कॅम्पस मध्ये कायम स्वरूपी स्टोअर आहे.आणि ठराविक दिवशी कँटीन मधून त्यांची प्रॉडक्ट घेता येतात, आधी ऑर्डर करून.

छान आहे रेसिपी. सातारा भागात जून भेंड्यांच्या दाण्यांचा (बियांचा) रस्सा केला जातो. त्यात फक्त दाणे घेतात.

त्यांचे erc जवळ कॅम्पस मध्ये कायम स्वरूपी स्टोअर आहे.आणि ठराविक दिवशी कँटीन मधून त्यांची प्रॉडक्ट घेता येतात >>> ओह, हे माहित नव्हते. त्यांची ही साईटही सापडली ऑनलाईन ऑर्डर करायला. भारी उपक्रम आहे हा.

मस्त रेसिपी. आणि माधव, धन्यवाद लिंक दिली त्याबद्दल. अनुचा प्रतिसाद वाचून विचार करत होते की कधी जाता येईल.. आता बहुतेक सोपे होईल.

त्यांचे दिवाळीचे ऑर्डर्स सुरू होतील आता ऑनलाईन. फराळ बॉक्स असतो मोठा आणि छोटा २ प्रकारात. मी मागच्या वर्षी छोटा बॉक्स मागवला होता, छान होती टेस्ट..

Pages