'गोदावरी'
(काही स्पॉईलर्स आहेत. तर हा सिनेमा बघितला नसल्यास पुढे वाचू नये, हा विनंतीवजा डिस्क्लेमर.)
नाशिकमधल्या गोदावरीच्या घाट परिसराची ही गोष्ट. त्या घाटावर देशमुख कुटुंबियांच्या मालकीची काही जागा आहे. त्या जागेवर छोटे छोटे दुकानदार व्यवसाय करतात. त्यांच्याकडून भाडं गोळा करण्याचं काम निशिकांत देशमुख (जितेंद्र जोशी) करत असतो. नारोशंकर देशमुख (विक्रम गोखले) हे त्याचे आजोबा. त्यांनी त्यांच्या काळात भाडेकरूंना अडीअडचणीला सांभाळलेलं असतं. पण आता काळ बदललाय. तिथल्या सगळ्यांच्याच रोजच्या जगण्यांतले संघर्ष, ताणेबाणे वाढलेलेयत. मालक-भाडेकरू हे संबंध रोकड्या व्यावहारिक पातळीवर आलेले आहेत.
त्यात निशीशेठ बऱ्यापैकी शॉर्ट टेंपर्ड आहे. त्याचे घरच्यांशी संबंध ताणलेले आहेत. तो एकटाच वेगळा राहत असतो.
सगळ्यालाच नकार देऊन बसलेल्या, एकलकोंड्या निशीचं आतल्या आत कुरतडत जगणं चाललेलंय. राहता परिसर, खिळखिळे वाडवडिलार्जित वाडे, अरूंद बोळं ह्यात जगणं रूतून बसलंय असं त्याला वाटतंय.
निशीशेठचे दिवस स्वतःचं फ्रस्ट्रेशन जगावर काढण्यात गेलेलेयत. रोज संपर्कातल्या, आजूबाजूच्या लोकांचं त्याला काय दिसत नाही. घाटावर येऊन बसणाऱ्या त्या वेडसर फुगेवाल्या माणसावर काय भीषण दुर्दैव ओढवलेलं असतं, हे निशी सोडून तिथल्या सगळ्यांना माहितीय. कारण ह्याला कशाचंच काय पडलेलं नाय. त्याच्या विलगतेचं चित्रण भेदक आहे.
एका बिल्डरचा डोळा आहे परिसरावर. त्याला तिथं 'रिव्हर डान्स' नावाचा प्रोजेक्ट उभा करायचाय. पण तिथल्या लोकांचं काय ? त्यांना तिथून जायला कसं सांगायचं, असं कसं जायला सांगायचं, हा प्रश्न आहे.
केशव (प्रियदर्शन जाधव) खोल ॲक्टर आहे. परंपरा म्हणजे काय? निशीची लहानगी छोकरी केशवला विचारते.
त्यावर केशव म्हणतोय की, परंपरा ही गोदावरीसारखीच असते. म्हणजे गोदावरीच्या उगमस्थानी ब्रह्मगिरीला समजा आपण एखादं फूल सोडलं तर ते कसं वाहत वाहत तिच्यासोबत पुढं पुढं जात राहतं, परंपरा पण तशीच असते. आजोबांकडून वडिलांकडे, वडिलांकडून आपल्याकडे, आपल्याकडून आपल्या मुलांकडे वाहत जाते.
संजय मोने निशिकांतच्या वडिलांच्या भूमिकेत आहेत. बाप-लेकाचं बोलणं-भाषण फार पूर्वीच बंद होऊन गेलेलंय.
पण निशीच्या आजाराचं कळल्यावर व्हल्नरेबल मनस्थितीत संजय मोने घाटावर जाऊन बसतात, तेव्हा त्यांच्यातला 'बाप' पहिल्यांदा जाणवतो. अशावेळी नदी बरी असते आधाराला. तिथून मग ते लायब्ररीत जातात. आणि नादिया हाशिमीच्या 'हाऊस विदाऊट विंडोज' या पुस्तकात डोकं घालून बसतात. ते एकप्रकारे एस्केप शोधत असावेत. आणि एस्केपसाठी पुस्तकांइतकी दुसरी चांगली गोष्ट नाही.
सुख दुःख, नैराश्य, संताप, समजूत, हतबलता, ओक्साबोक्शी-रडू, जिंदादिली, दोस्ती, शहाणीव या सगळ्यांच्या पार्श्वभूमीला नदीचा घाट दिसत असतो. तो घाट आणि गोदावरीचा प्रवाह त्यांच्या एकूणच जगण्याचा साक्षी असावा.
एक प्रसंग आहे.
निशिकांत घाटावर बसलाय.
त्याच्यासमोर एक साधू नदीत डुबक्या मारतोय.
निशी त्याला त्राग्यानं म्हणतोय, 'मत पिओ ये पानी. गंदा हो गया है.'
साधू पोचलेला आहे. तो पाणी ओंजळीत धरून त्याच्यापुढे येतो आणि म्हणतो, "ये गोदामय्या है बाबू. मय्या मैली हो सकती है, गंदी थोडी न होती है. ये तुम्हारा गुस्सा है ना, वो सही है; लेकीन उसे उन लोगों पर खर्चा करो जो मय्या को गंदा बना रहे है. जिनको गोदामय्या पे श्रद्धा है, उनपर थोडी ना गुस्सा करोगे?
जो नदी से दूर जा चुके है, उन्हेही न पास बुलाओगे? या जो नदी के पास उन्हे दूर ढकेलोगे? बुझे की नय?"
हा सीन एकदम हॉंटींग आहे.! लख्ख कायतरी लक्षात आणून देणारा. मी तसा कोरडाठक्क अश्रद्ध माणूस..! पण त्या साधूनं मला एकदम मानगूट पकडून गदागदा हलवल्यासारखं वाटलं..!
निशी त्या प्रसंगानंतर बदलून गेलेला दिसतो. माणसात आलाय जरा आता. घरच्यांशी दारच्यांशी नीट वागताना दिसतोय. बाकी, वडिलांशी एवढं तोडून वागायला नको होतं, हे माणसाला जाणवतच असावं कधी ना कधी.
प्रदीर्घ अबोल्यानंतर बाप लेकात शेवटी एक संवाद होतो, तो ऐकण्यासारखा आहे. बापाचं वाचन डोकावतं त्याच्या बोलण्यातून.
आणि नीना कुळकर्णी ह्या साक्षात मातृ-तत्वच आहेत म्हणजे. जगन्माता..! त्यांचा तो हातखंडाच आहे म्हणजे. आणि वावर ही असा एकदम पोक्त असतो.
मग निशी निरवानिरव करतो तो सीन. आपल्यामागं कुटुंबाच्या निर्वाहाचं काही नियोजन करून ठेवलंय. बायकोला त्या 'रिव्हर डान्स प्रोजेक्ट'ची कागदपत्रं देतो. आणि म्हणतो, "आईनं विरोध केला तर सांग माझी शेवटची इच्छा होती. ती नकार देणार नाही. आणि नाहीच जमलं तर फाडून फेकून दे. पण निर्णय मात्र तूच घे."
बायको आसवांचा समुद्र पापण्यांआड ढकलत विचारते, "अजून काही राह्यलंय?"
तो फक्त एकच शब्द उच्चारतो, "सॉरी."
कहर इमोशनल सीन आहे हा. फार उच्च..! अभिनयाची हद्द..! निशीची बायको (गौरी नलावडे) ही एक ताकदीची अभिनेत्री आहे. या सीनमध्ये ती निशीपेक्षा काकणभर जास्तच वाटते.
नदीकाठचे लांबरुंद काळ्याशार दगडांचे मजबूत विस्तीर्ण घाट. बसायला वावरायला शांत ऐसपैस जागा. ज्या कुणी पूर्वजांनी हे घाट बांधले असतील ते निश्चितच शहाणे लोक असणार.
अंत्य विधी. श्राद्ध कर्मं. साधू संन्यासी. देवळं. घाटाच्या पायऱ्यांवर वाळत घातलेल्या साड्या. शांतता शोधायला आलेली माणसं. एक वेगळीच दुनिया नांदत असते घाटावर.
तर म्हणून घराच्या खिडकीतून कायम गोदावरी, तिचा घाट दिसत राहणं हे सुख आहे. जेव्हा तिथं हा 'रिव्हर डान्स प्रोजेक्ट' होईल, ह्या जुन्या जर्जर इमारती नष्ट होतील; तेव्हा त्यातले लोक कुठे जातील? आणि ज्यांना तिथं राहता येईल त्यांना आपल्या घरांच्या खिडकीतून गोदावरी दिसेल का? दिसायला हवी. असं हे परंपरा- आधुनिकता, श्रद्धा- अश्रद्धा यांचं घर्षण.
सिनेमा संपतेवळी, राहुल देशपांडेचं, 'खळखळ खळखळ गोदा..' हे एक गाणं येतं. जबरदस्त आहे..! शोधून चार-पाच वेळा सलग ऐकलं, तेव्हा कुठे जरा ऐकल्यासारखं वाटलं. जितेंद्र जोशीची ही कविता. नदीबद्दल अपरंपार माया, कृतज्ञता असल्याशिवाय अशी अर्थवत्ता असलेली कविता येऊ शकत नाही. 'पंखश्लोक' असा शब्द वापरतो हा माणूस..! हा शब्द सुचतोच कसा यार..!
तुझ्या प्रवाहाचं मी ही झालो पाणी
तुच दिला नाद तुझीच झालो गाणी
स्पर्श तुझा गार निळा निळा शार
तुझी आठवण मला जुनी फार
खळखळ खळखळ गोदा
निघालीस तू.. पुढल्या या गावा
पैलतीरीनंतरही तुझा नाद यावा
तुझ्या वाहण्याला कधी अंत नाही
कसे समजावू मी ही संत नाही
जगी वर्दळ तुझ्या तीरावर
ज्याच्या जगण्या उसंत नाही
माझी होडी छोटी, तिची झेप मोठी
पंख श्लोक माझे, आले तिच्या ओठी
खळखळ खळखळ गोदा
निघालीस तू.. पुढल्या या गावा
पैलतीरीनंतरही तुझा नाद यावा
मी हे आयुष्य जगलेलं आहे.
खूप छान लिहिले आहे. सिनेमा बघितलेला असल्याने पोचलं अगदी. सगळ्यांचीच कामं छान झाली आहेत. शेवट मात्र तसाच सोडून दिल्यासारखा वाटला होता.
प्रियदर्शनसाठी आणि नीनासाठी, अनुमोदन.
नदीबद्दल अपरंपार माया, कृतज्ञता असल्याशिवाय अशी अर्थवत्ता असलेली कविता येऊ शकत नाही.
>>>> गोदेकाठीच लहानाची मोठी झाले आहे, त्यामुळे प्रचंड भिडली होती. अशी माणसं, असे वाडे, असे बदल सगळं बघितलं/पचवलं आहे. आत्मियता पोचली. काय बोलू.....
छान लिहिलंय.. नेहमीप्रमाणेच
छान लिहिलंय.. नेहमीप्रमाणेच
छान लिहीले आहे .
छान लिहीले आहे .
कुठे बघितला हा सिनेमा ?
छान लिहिलं आहे!
छान लिहिलं आहे!
कमाल लिहिले आहे. फारच सुंदर
कमाल लिहिले आहे. फारच सुंदर चित्रपट आहे हा. "कोजागिरीच्या चंद्र" हे गाणे ही सुंदर आहे.
जाई, jiocinema वर हा पाहता
जाई, jiocinema वर हा पाहता येईल फ्री. मी नाशिक चीच असल्याने आणि लहानपणापासून गोदा तीरी जाणं असल्यामुळे जास्त relate झाला.
प्रतिसादांबद्दल धन्यवाद.
प्रतिसादांबद्दल धन्यवाद.
अस्मिता,
गोदेकाठचं नांदेड !
जाई,
मी JioCinema वर पाहिला.
हो
'अय्या, तुम्ही कसं ओळखलं' म्हणू का ? नदीकाठची आहे पण...
पुलेशु
'तुम्ही कसं ओळखलं' म्हणू का ?
'तुम्ही कसं ओळखलं' म्हणू का ?'>>
'गोदातटीचे कैलासलेणे' जे की, वंदनीय नरहर कुरुंदकर गुरूजी, यांचा प्रभाव पडलेलाय फार पूर्वीच आयुष्यावर, आणि तो काय आता उतरण्यासारखा नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल लिहिल्या गेलेल्या कमेंट्स कडे जातं लक्ष. आणि मग पटते बुवा ओळख..! लक्षातही राहते.
(तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे वगैरे )
कल्पना होतीच, नदीकाठी
कल्पना होतीच, तरीही आवडलं.
मस्त परिचय.
मस्त परिचय.
चित्रपट पाहण्याची इच्छा निर्माण झाली.
छान परिक्षण.
छान परिक्षण.
चित्रपट पाहिला नाही पण पाहावसा वाटतोय आता.
छान लिहिलं आहे.
छान लिहिलं आहे.
चित्रपट पाहिलाय.
त्यामुळे relate झाला चांगलाच.
धन्यवाद सान्वी आणि संप्रति
धन्यवाद सान्वी आणि संप्रति
खूप छान लिहिलय, बघायचाय हा
खूप छान लिहिलय, बघायचाय हा चित्रपट
खूप छान लिहिलंय!
खूप छान लिहिलंय!
कालच पाहिला. अभिनय सगळ्यांचेच
कालच पाहिला. अभिनय सगळ्यांचेच सुंदर आहेत. पण त्यापलीकडे सिनेमा काही विशेष वाटला नाही. नक्की काय सांगायचंय तेच कळलं नाही ...
१. नदिची ओढ म्हणावी तर तसं काही खास जाणंवलं नाही.
२. बापलेकामधला संघर्ष म्हणावा तर तो जाणवतो पण तो मध्यवर्ती नाही
३. नायकाची घुसमट म्हणावी तर त्याने सांगितलेली कारणे अगदीच फुसकी आहेत
अनेक न पटणार्या (सिनेमाच्या अनुषंगाने) गोष्टीही आहेत
१. ज्या कारणाने बाप-लेकात भांडण होते त्या कारणाने वडलांनी घर सोडायला हवे होते, मुलाने नाही. वडलांना मालमत्तेवरचा हक्क पटत नसतो.
२. नायकात आणि त्याच्या बायकोत सगळे आलबेल असताना, भांडणानंतर ती नवर्याबरोबर का जात नाही याचं स्पष्टीकरण कुठेच आलेलं नाही त्यामुळे ते सगळ्या सिनेमाभर खटकत राहते.
३. भांडण झाल्यावर वरच्या माळ्यावरची खोली का बंद करून ठेवावी?
४. शेवटच्या प्रसंगात ती आतषबाजी तर खूपच खटकली - घरात नुकताच एक मृत्यू झालाय, दुसरा होऊ घातलाय त्या घरात आतषबाजी होणं विचीत्रच वाटलं.
५. ज्या परंपरा या शब्दाचा उल्लेख ठळकपणे झालाय, तशी कुठलीच समान परंपरा तीन पिढ्यात नाहीये.
काही काही प्रसंग सुटे बघितले तर खूप गहिरे आहेत - नायकाचे मित्राला 'तूच माझं पिंडदान कर' सांगणे, फुगेवाल्याला क्लोजर मिळणे, नायक आणि त्याच्या बायकोतला तो निरवानिरवीचा प्रसंग, साधूचे सांगणे असे अनेक प्रसंग आहेत. पण ते नुसतेच प्रसंग वाटले - सिनेमा बघितल्याचे समाधान नाही मिळाले.
माधव तुमचा ५वा मुद्दा. पिफात
माधव तुमचा ५वा मुद्दा. पिफात बघितला तेव्हापासून हा विचार करतोय. आणि जितका विचार करतोय तितका या 'परंपरे'बद्दलचा गोंधळ समोर येतोय. याबद्दल आणखी लिहितो, जमेल तसं सावकाश.
संप्रति, छान लिहिलंय (हे मी सिनेमा बघितल्यानंतर भारावून गेल्याची अवस्था संपल्यानंतर म्हणतोय). जरा आणखी डिटेल लिहिलेलं आवडलं असतं.
माधव म्हणतात तसं- हे सारं प्रथमदर्शनी फार भारी आहे. अभिनय, छायालेखन, गाणी आणि इतर सार्या गोष्टी. पण कुठेतरी आत्म्याशी तडजोड आहे. 'तत्त्व' असं काही नाही. चिरंतनवालं काहीतरी, जपून ठेवावं असं मिळालं नाही. लाँग लास्टिंग इंपॅक्ट- असं काही सापडत नाही. जीवाला भिडलेलं काहीतरी- असं बिरूद द्यावं वाटत नाही.
मात्र, या सिनेम्याच्या निमित्ताने माझ्याच या गावचे शेकडो वेळेला पालथे घातलेले गोदाकाठ, मंदिरं, पायर्या, पाणी आणि घाट खास सहेतुक जाऊन, फिरून पुन्हा एकदा वेगळ्या नजरेने बघितले, अनुभवले- हे या सिनेम्याचं ऋण.
माधव.. thanks हे
माधव.. thanks हे लिहिल्याबद्दल.
मला अगदीच fomo झाले होते कौतुक वाचून.
मी मध्यंतरी मराठी चिकवा वर लिहिले पण होते की सिनेमा संपल्यावर मला आणि +१ ला आम्ही हे काय बघितले? असे फिलिंग आले.
अनेक गोष्टी पटल्या नाहीत आणि लॉजिकल पण वाटल्या नाहीत. पण माधव यांनी उल्लेख केलेले काही खास गहिरे प्रसंग मात्र खरोखर टडोपा आहेत.
अजून एक म्हणजे मला तो साधू जे काही बोलला ते अजिबात ओ का ठो कळलं नाही. त्यामुळे त्यानंतर निशी च बदलणं सुद्धा !!
साजिरा, चित्रपटातल्या
साजिरा, चित्रपटातल्या परंपरेशी संबंधीत वाचायला नक्की आवडेल. सिनेमा प्रदर्शित होतानाच्या मागेपुढे एक लेख वाचला होता - त्यात नदी आणि परंपरा यांच्यातले साम्य सांगितले होते (दोन्ही प्रवाही असल्या पाहिजेत - असे काहिसे) त्यामुळे तो एक अँगल डोक्यात होता सिनेमा बघताना. पण परंपरा अशी काही सापडलीच नाही मला.
पियू, निशी साधूमुळे नाही तर त्याच्या आजाराच्या निदानामुळे बदलतो असं मला वाटलं.
चित्रपट पाहिला नाही पण लेख
चित्रपट पाहिला नाही! पण लेख वाचल्यावर चित्रपट खूप प्रभाव करणारा असावा असं मत तयार झाला होतं! पण पुढील काही प्रतिसाद वाचल्यावर मनात एक वेगळाच विचार आला.
आजकाल झाले आहे काय; तंत्रामध्ये किंवा तांत्रिक बाजू खूप परिपूर्ण झाल्या आहेत. म्हणजे लेखन , अभिनय , पटकथा , सादरीकरण , कविता, शब्द सगळं अतिशय देखणं असतं . पण हे सगळं वरवरचं आणि पोकळ भासतं . उत्कृष्ट काहीतरी करायला म्हणून निघालेले लोक, उत्कृष्ट शब्द, उत्कृष्ट प्रसंग ,एकमेकांसमोर नुसतेच ठेवले आहेत असं वाटंत रहातं . त्यांना एकत्र घेऊन जाणारं मुख्य सूत्र सर्व कलाक्षेत्रामध्ये हरवल्यासारखं वाटतं ! गाभा रिक्त वाटतो ! त्यामुळे प्रभाव दूर पल्ल्याचा नसतो ! घेण्यसारखं, सांगण्यासारखं, जपण्यासारखं हाताला काही लागत नाही हे सत्य आहे.
कदाचित माझे विचार एककल्ली असतीलही ...
पशुपत, आता दोन्ही बाजू
पशुपत, आता दोन्ही बाजू वाचल्याच आहेत तर एकदा बॅलन्स माईंडने सिनेमा बघा. आणि तुमचे पण चार आणे प्रतिसादात जोडा. कारण चित्रपट न आवडणाऱ्या गटाला जे वाटले ते तुम्हाला अगदी परफेक्ट कळले आहे असे वाटते तुमची कमेंट वाचून.
चांगले लिहिले आहे परीक्षण.
चांगले लिहिले आहे परीक्षण. निशीचे चिडणे जो माणूस गोदावरी काठी राहिला आहे त्याला ते जास्त relate होइल..निशिला नाशिक सोडायचे होते.
पुण्याला जायचे होते. नाशिकच्या बऱ्याच होतकरू तरुण मुलं हाच विचार करतात. नवे घर हवे आहे. आई बाबा सांगत होते ते मी ऐकत राहिलो हि त्याची तक्रार आहे. त्याचे बाबा एका शब्दात त्याला सांगतात की तू नाही म्हणायचे होते नव्हते ऐकायचे.
निशी जगापासून अलिप्त आहे. त्याला मरण दिसले तेव्हा सगळे भवताल जाणवले. तो जितका सगळ्या पासून दूर जातो तसे सगळे त्याच्या जवळ येत आहे.
जसे की प्रोजेक्टचे नाव भागीरथी ठेवा असे सुचवल्यावर पुन्हा नदी चेच नाव सुचवले असे बिल्डर म्हणतो.
वरील परीक्षणात काही बदल हवेत रिव्हर डान्स नाही रिव्हर साईड असे काहीसे नाव आहे प्रोजेक्ट चे.
केशव नाही कासव आहे त्याचा मित्र.
ह्या सिनेमात पात्रांची नावे पण कशी चपखल आहेत.
निशिकांत, नारोशंकर, सरिता, गौतमी, भागीरथी आणि जगाशी जुळवून राहणारा कासव.
एक गोष्ट मात्र ह्या सिनेमात खटकली. आम्ही नाशिककर गोदावरीला गंगा म्हणतो. कदाचित सगळ्यांना समजावे म्हणून सगळी पात्रे गोदा किंवा गोदावरी असे म्हणताना दाखवली आहेत.