अमेयच्या वर्गात एक नवीन मुलगा आलाय - सचिन. चांगली गट्टी जमल्येय त्याच्याशी. परदेशात कुठेतरी होता म्हणे, नुकतीच त्याच्या बाबांची बदली झाली; आणि ह्या वर्षापासून अमेयच्या शाळेत येतोय. वर्गाबाहेर, आणि क्वचित वर्गात सुद्धा, अखंड गप्पा चालू असतात दोघांच्या. गप्पा म्हणजे, तशा एकतर्फीच - सचिन परदेशातल्या कायकाय गंमतीच्या गोष्टी सांगत असतो, आणि अमेय कान देऊन ऐकत असतो. ऐकतो, आणि विचार करतो. नेहमीसारखाच, खोल खोल. गोलगोल फिरत असावं आणि थांबताच येऊ नये असा.
आता परवाच सचिन सांगत होता, त्याच्या आधीच्या शाळेत एकदा काय धमाल झालेली... एक दिवस म्हणे कोणीतरी मुलगा शाळेत बंदूक घेऊन आला, खेळातली नव्हे - खरी! प्रत्यक्ष बंदूक! खोटं वाटतं ना, अशी कशी खरी बंदूक मिळेल शाळेतल्या मुलाला! पण तिकडे असतं म्हणे तसं. मग काय, कसं कुणास ठाऊक, पण टीचरला कळलं - काय विचारू नका! सगळ्या मुलांना एका हॉलमध्ये जमवलं, पोलीस आले, त्या पोराला पकडून घेऊन गेले, त्याला शाळेतून काढून टाकलं... काय नी काय!
अमेय डोळे विस्फारून, आ वासून ऐकतच रहातो. हा सचिन खरं सांगत असेल सगळं? शाळेतली मुलं कशी बंदूक मिळवतील, आणि वरती शाळेत घेऊन जातील! काहीतरीच! पण मोठी माणसं? त्यांच्याकडे असतील बुवा बंदुका. आई घरी नसतांना एकदा अमेयनी टीव्ही वर एक इंग्लिश सिनेमा बघितला होता. त्यात एक हॅट घातलेला माणूस काय फटाफट गोळ्या झाडत होता, अशी मुंग्यांसारखी माणसं मारत होता! तिथे सुद्धा मेघा रडायला लागली, तिला बंदुकीच्या आवाजाची भिती वाटली, म्हणून लगेच चॅनेल बदलायलाच लागलं. किती सांगितलं तिला, हे खोटं आहे ग बाई - नुसता ठो ठो आवाज, आणि ते काय खरं रक्त नसतं, केचप का कायतरी असतं - पण तिची समजूतच पटेना. शेवटी तिनी आईकडे चुगली केलीच, नसत्या कटकटी!
केचपवरून एकदम आठवलं गेल्या वर्षी आई-बाबा त्याला वाढदिवसाला मॉलमधल्या मॅक्डोनाल्डमध्ये घेऊन गेले होते. अमेयला खूपच आवडलं होतं ते. काय मस्त फ्राईज होत्या - थोड्याशा केचपला लावून... एकदम टॉप! सचिन म्हणतो त्यांच्याइथे पण मॉल्स असतात, आणखी मोठ्या असतात - ते आलंच म्हणा, परदेशातली प्रत्येक गोष्ट नेहमीच इथल्यापेक्षा मोठी आणि छान असते सचिनच्या गोष्टींमध्ये! तीन-तीन चार-चार मजली मॉल्स, सगळीकडे एस्केलेटर्स आणि लिफ्ट, केवढी मोठमोठाली दुकानं, छान कपडे घातलेले, हातात शॉपिंगच्या बॅगा घेऊन फिरणारे, आईस्क्रीम खात असलेले लोक, प्ले-ग्राउंड मध्ये खेळणारी मुलं ... अमेयला सगळं दिसायला लागतं डोळ्यासमोर... केवढे धप्प गोरे आहेत नाही हे लोक? काळे पण आहेत म्हणा, अगदी राक्षसांसारखे काळे... आपण कुठे बघितलेत असे लोक, आणि कधी?
अमेयचं लक्ष एकदम दुसऱ्या मजल्यावरच्या दुकानातून बाहेर येत असलेल्या एका माणसाकडे जातं. घाणेरडे जुनाट कपडे घातलेला, गबाळ्यासारखी दाढी वाढलेला तो माणूस जोरजोरात काहीतरी बडबडत येतो आहे. बाजूचे लोक घाईघाईने त्याच्यापासून दूर जात, त्याला वाट करून देताहेत; आई-बाबा आपापल्या मुलांचा हात गच्च धरून, त्यांना जवळ ओढताहेत. बापरे! त्या माणसानी बाहेर आल्यावर लगेच खिशातून बंदूक काढली आणि मूर्खासारखा त्या गर्दीत ठो-ठो गोळ्या झाडतो आहे - खऱ्या गोळ्या, काही लोक थाड्कन खाली पडताहेत, आरडाओरडा, लोक धावत दुकानांमध्ये शिरताहेत, मुलांना हाताच्या मिठीत लपवताहेत, पोटाशी धरून धावताहेत... नुसता गोंधळ. तो माणूस एस्केलेटरवरून खाली जायला निघाला आहे, त्याच्या पुढचे लोक धावत उड्या मारत तिथून बाहेर पडायला बघताहेत... पण काहींना गोळ्या लागतातच. शी:, हे रक्त काय केचपसारखं नाही दिसत ... आरडाओरडा, ढकलाढकली, गोंधळ. एक लहान मुलगा, चार-पाच वर्षाचा असेल, एस्केलेटरवरून धावतांना पाय अडकून गडगडत खाली पडला, रडतोय... अमेयला त्या माणसाचा चेहरा अगदी जवळून दिसतो आहे, त्याच्या डोळ्यातला खुनशीपणा, त्याची लहान मुलावर रोखलेली बंदूक! असह्य होऊन अमेय खूप जोरात ओरडतो, घामाघूम होऊन, तिथून पळायला लागतो...
सचिनच्या आवाजानी अमेय एकदम भानावर येतो. ' ए, कुठे निघालास धावत? तू कधी कधी खूप विअर्ड वागतोस हं' सचिन म्हणतोय. अमेयला एकाएकी थंडगार शांत वाटतं. विअर्ड म्हणजे काय माहिती नाही, बहुतेक ‘वेडपट’ असणार. हे बरंच बरं, इतर मुलं एकेक बोलतात त्यापेक्षा. आणि आत्ता जे डोळ्यासमोर बघितलं त्यापेक्षा तर कितीतरी पटींनी बरं - कोण कुठले लोक कोणास ठाऊक, पण अमेयच्या डोळ्यासमोरून त्या लहान मुलाचा भेदरलेला रडका चेहरा जात नाही. कसाबसा तो सचिनचं बोलणं ऐकत, त्याच्याबरोबर चालायला लागतो.
विचिटा ह्या एका अमेरिकन गावात स्थानिक टीव्हीवर रात्रीच्या बातम्या –
'… and now, a new and bizarre twist in the shooting rampage at the local mall earlier today: The accused mass murderer has confessed to being startled by a small boy running across the escalator bank. He described the boy as a dark haired, skinny, ‘Asian-looking’ kid, screaming hysterically and crossing the escalators. No witnesses interviewed by the police recall seeing a boy of that description. However, this confession appears to corroborate the earlier police report that the accused had suddenly appeared distracted and confused for a few moments, allowing them to overpower him and take into the custody.’
क्रमशः
वाचतोय!
वाचतोय!
भारीच!
भारीच!
बापरे, साधारण अंदाज येतोय
बापरे, साधारण अंदाज येतोय कथेचा.
मस्त धागा गुंफला जातोय.
मस्त धागा गुंफला जातोय.
छान चालू आहे!
छान चालू आहे!
भारीच!
भारीच!
छानच हा भाग.
छानच हा भाग.
घटनांची मालिका तर सुरू झालीय, आता पुढे कथा कशी वळण घेतेय याची उत्सुकता आहे.
एके ठिकाणी सचिन चा समीर झालाय
एके ठिकाणी सचिन चा समीर झालाय. बाकी कथा छान चालू आहे.
इंट्रेस्टींग आहे. आवडले
इंट्रेस्टींग आहे. आवडले तिन्ही भाग!
सर्व प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
सर्व प्रतिसादाबद्दल धन्यवाद! एक नावाची चूक दुरुस्त केली आहे. :p
बापरे!!
बापरे!!