मराठी लेखन (बि)घडते कसे

Submitted by हरचंद पालव on 13 March, 2024 - 23:54

घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला |
उठि लवकरि वनमाळी उदयाचळी मित्र आला ||

कुठल्याही लेखनाची सुरुवात सुविचार किंवा काव्याच्या ओळींनी केल्यास निबंधाला अधिक गुण मिळतात असं आमचे दामले मास्तर सांगत. त्यामुळे ती सवय अजूनही चालूच आहे. कवितेचा संबंध खालील सबंध लिखाणाशी असावा की नसावा यावर काही उद्बोधक चर्चा त्यावेळी झालेली आठवत नाही. त्यावेळचं इतकंच आठवतं की 'उठि लवकरि वनमाळी उदया' यानंतर यति, ज्याला आपण बोलीभाषेत 'पॉज' म्हणतो, येत असल्यामुळे मला हा 'चळीमित्र' कोण ते काही कळलं नव्हतं. नंतर पंडितराव नगरकरांनी गायलेलं ते गीत ऐकताना त्यांनी 'वनमाळी......... (मला अवग्रह टंकता येत नाही, कृपया समजून घ्या)... वनमाळी..' - हे दोनदा घेऊन 'उदया'वरचा यति परवावर... आपलं हे... वनमाळीवर ढकलला आहे आणि उदयाचळीतला यतिभंग टाळला आहे हे लक्षात आलं. हे लिहिता लिहिता ''यति' हा शब्द मी यतिभंगाच्या संदर्भातच वाचला असून कधी सुटा वाचलेला नाही; त्यामुळे मराठीत यति हा तो आहे की ही ती आहे हेही मला माहीत नाही' हेही लक्षात आलं आणि ते माझ्या तरुणपणीच खुलासलं जावं म्हणून दशकानुदशके अज्ञात अशा/अश्या ह्या यतिसाठी माझा ययाति करून घ्यावा की काय हेही मला कळेना (कितव्यांदा आलं हो हे 'हेही'? पुन्हा आलं तर ते 'तेही' असं वाचा. तेही अनेकदा आल्यास मग हहाहुहूहिही - काहीही चालेल.).

अशा प्रकारे सुरुवातीच्या बिगिनिंगलाच अवांतर करून मी नमनाला घडाभर तेल-ऑईल वापरून घेतलं आहे. हा तेल-ऑईल पदार्थ काही विशिष्ट पदार्थांच्या यादीत सापडतो. देशात दक्षिणेत असताना 'कारा भात, केसरी भात, चाउचाउ भात' अश्या पदार्थांच्या खाली 'राईस भात' (स्पेलिंग करताना राईस बाथ = स्नानोदन) आणि विदेशात 'कॅफे लाटे, कॅफे मोका, फ्लॅट व्हाईट' वगैरेंच्या यादीत 'चाय टी' हे दोन्ही पदार्थ याचि डोळां पाहिल्याने तो उपरिनिर्दिष्ट तेल-ऑईल हा पदार्थ देश-विदेशात खपायला हरकत नाही असा माझा कयास आहे. त्यामुळे वेगवेगळ्या देशांतून माबवास्वाद घेणार्‍या (काय म्हणता? माबवास्वादला अडखळलात? ओ पुढे अ/इ/उ वगैरेंपैकी कुठला स्वर आल्यास त्या 'ओ'चा अव् होतो.) मंडळींना हे तेल-ऑईल पचायला अवघड न जावे. अश्याप्रकारे अवांतरात अवांतर करून (= "पराग अवांतर"? साडी में साडी सारखं? की महदवांतर (महत् + अवांतर. इथे महाअवांतर असं चुकीचं लिहिण्याचा मोह होत होता, पण मग तो शब्द वाचकांना लगेच कळला असता. समजावून सांगायला नसता लागला.)? देवों के देव महादेव प्रमाणे?) त्याची कबुली स्वतःच दिल्याने मी आता विषयाला धरून (हे धरणे हे गचांडी धरणे या अर्थी धरणे आहे) अनवांतरित लिहायला मोकळा. ते लिहिताना पुन्हा स्वभावाला धरून (हे धरणे हे गणितात हातचा धरतात त्या अर्थी धरणे आहे) अनवांतरितेतर विषयांना मी हात घालू शकतो हे जाता जाता सांगतो. अश्या महत्त्वाच्या गोष्टी जाता जाताच सांगायच्या असतात. ह्या परिच्छेदात आणखी कंस वापरले तर मात्र कंस मामा मला आपटून मारायचा प्रयत्न करेल (आठवा - 'आठवा पुत्र' ... छ्या! आता मेलो.).

तर सांगायची गोष्ट म्हणजे ह्या धाग्याचं प्रयोजन होतं ते कुमार यांच्या 'मराठी लेखन घडते कसे' या उपक्रमाची घोषणा. आता तो उपक्रम बंद पडल्यावर अनेकांच्या त्यावरच्या पोष्टी वाचून फोमो येऊन या धाग्याचा इमेलमध्ये तयार असलेला प्रोमो लोक कोमोत... आपलं... कोमात जायच्या आत आपण रोमातून बाहेर पडून जोमात एक्स्पांडावा असा थोडक्यात विचार मी केला. त्यांच्या प्रश्नावलीला मुद्देसूद उत्तरं न देता इतरांप्रमाणे लिहिणं ठेवलं तरच मला काहीतरी अघळपघळ लिहिता येईल हे नक्की.

माझी लेखनाची कारकीर्द ही प्रदीर्घ आणि देदीप्यमान नसल्यामुळे सार्वजनिक लिहायला कधी सुरुवात केली हे आठवणं फारच सोपं गेलं. म्हणजे शाळेत असताना 'ह्या मुलाने काय प्रताप केले आहेत पहा' म्हणून माझ्या उत्तरपत्रिकेचं सार्वजनिक वाचन - असा प्रकार सुदैवाने माझ्या वाट्यास आला नाही. काही नवीन सुचण्यापेक्षा इतरांनी लिहिलेल्या मजकुरावरच मी पहिल्यापासून भिस्त ठेवून गुजारा केला आहे. हे मी परीक्षेबद्दल बोलत नसून विडंबनांबद्दल बोलतो आहे. प्राथमिक विद्यालयात आमच्या एका शिक्षिकेने 'जय देव जय देव जय गणितमूर्ती' अशी गणितावर आरती लिहिली होती व ती आम्हा सर्वांकडून त्या म्हणून घेत. त्यावरून मी काही शब्द बदलून 'जय शाळामूर्ती' अशी आरती लिहिली होती. शाळेबद्दल एवढं चांगलं लिहिलं होतं की तो आमच्या बाईंना अगदी टडोपा प्रसंग होता. मग त्यांनी माझ्या कडव्यांमधले मीटरगेज सोडून खडखडाट करत जाणारे शब्द बदलून त्या आरतीला खूप सुस्थितीत आणून ठेवलं. लांबी, रुंदी, उंची यांप्रमाणेच काव्यालाही मीटर लागतो हा उलगडा तेव्हा मला झाला आणि ह्या चौथ्या मितीत जरा जपूनच प्रवेश करावा असा मी कानाला खडा लावला.

माझ्या वेगवेगळ्या गुणांचा सुगावा मला लागवून देण्यात माझ्या माध्यमिक शाळेचा सिंहाचा वाटा आहे. ते गुण नीट वापरण्यापेक्षा मी उधळलेच जास्त. पण तरी भाषा आणि संगीत ह्या माझ्या आवडींचा स्रोत हा त्या काळातला आहे. आमच्या शाळेत एकदा एक लेखनशिबीर (की अभिव्यक्ती शिबीर? नक्की आठवत नाही.) झालं होतं. त्यात आमच्या एक शिक्षिकेने 'प्रतिभेच्या प्रांतातील प्रवास' ह्या पुस्तकाची ओळख करून दिली होती. मग आमचे काही भाषिक खेळ घेतले होते. त्यातले बाकीचे खेळ आठवत नाहीत, पण एक आठवतो आहे. त्यांनी असं सांगितलं की वर्गात प्रत्येकाने कुठल्याही अक्षरावर अनुप्रास साधत एक संपूर्ण अर्थपूर्ण वाक्य लिहायचं. प्रत्येक शब्द त्याच अक्षरावरून सुरु व्हायला हवा, दुसरं अक्षर नको. शिवाय 'काकीने काकाच्या कामाचे कोरे कागद' वगैरे चोथा झालेली वाक्यं कटाप. इथे मला असे खेळ खेळायचा छंद जडला. पुढे मी एक छोटीशी कथा लिहिली आणि आमच्या शाळेच्या त्रैमासिकात दिली. ते माझं छापून आलेलं पहिलं लिखाण. याच दरम्यान माझं विडंबनं करणं चालूच होतं. एखादवेळेस ते विडंबन मीटरमध्ये आणि गेयही असल्यामुळे आमचे शिक्षक 'आचरट कार्ट्या' वगैरे न म्हणता मला सगळ्यांसमोर ते क्वचित प्रसंगी गाऊन सादर करायला लावत ('गाऊन दांडीवर वाळत टाकलाय' हा जुना विनोद साडेपंच्याहत्तरशे बत्त्याण्णव्यांदा करणार्‍यांना पाताळविजयममधल्या राक्षसाचा ऑटोमॅटिक ग्राईंडर गिफ्ट देणेत येईल.). त्यामुळे माझा हुरूप वाढला (हा हुरूप नावाचा पदार्थ शुक्लप्रतिपच्चंद्रलेखेप्रमाणे कायम वर्धिष्णूच असतो का हो? 'माझा हुरूप कमी झाला' असं सहसा कुठे वाचायला मिळत नाही. शाळेत असताना हे विचारायचं राहून गेलं. आता खाली प्रतिसादांत लगेच याची उदाहरणं येतील. माबोचं हे एक बरं आहे. तुम्ही शाळेत काही शिकला नसाल तरी हरकत नाही. इथे शाळा घेतली जाऊ शकते. बरं आता हा कंस थांबवतो.).

अभियांत्रिकी महाविद्यालयात गेल्यावर तर 'टवाळा आवडे अभ्यास सोडून बाकी काहीही' अशी माझी अवस्था झाली. अभ्यासात मागे पडलो असं नाही, पण इतर गोष्टी बर्‍याच केल्या. आता इथे 'महाविद्यालय' आणि 'इतर गोष्टी' एकत्र वाचून तुम्हाला काही ठोकळेबाज आणि ठराविक विचार डोक्यात आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. पहिल्या वर्षी मी आमच्या बोटक्लबविषयी एक लेख आमच्या वार्षिक मासिकात (...! अ‍ॅन्युअल मॅगझिनमध्ये हो) लिहिला. आता मुळात बोटक्लब हा आमच्या कालेजातील सर्वांसाठीच जिव्हाळ्याचा विषय असल्याने, आणि त्यासाठी बोट चालवण्याचा विषयही माहिती असण्याचं कारण नसल्याने (थोडक्यात, तो बोटी सोडून 'इतर गोष्टीं'साठीच प्रसिद्ध असल्याने), अनेकांना तो वाचताना 'अगदी अगदी' झालं असावं. कारण तो एक छोटा पाऊण पानी लेख वाचून मला चक्क कलामंडळातल्या लोकांनी भेटायला बोलावलं. तिथे सहसा ऑडिशन किंवा ओळख या दोनच मार्गांनी प्रवेश असे. तिकडे गेल्यावर ती कलामंडळी म्हणाली की आपण पुरुषोत्तम करंडकासाठी तयारी करत आहोत. त्यासाठी एकांकिका पाहिजे आहे. तर असं करूयात की सगळ्यांनीच पुढच्या वेळेला येताना एकेक विषयावर काहीतरी लिहून आणा - संवाद जमले तर संवाद, नाहीतर कथा किंवा नुसती संकल्पना तरी आणाच. माझी ती पहिलीच वेळ होती. काहीच अनुभव नव्हता. संहिता लिहिणं म्हणजे काय असतं, ती किती मोठी असते याची कल्पना नसल्याने मी अज्ञानात सुखी होतो. मी तेव्हा एक छोटी एकांकिका लिहून आणली. नंतर एकत्र वाचन होतं, तेव्हा ती कलामंडळींना आणि माझी एकांकिका सादर करायची असं ठरलं. मग एका माजी विद्यार्थ्याने येऊन दिग्दर्शन केलं आणि त्याने ती संहिता आणखी मोठी करून लिहिली. त्यात बरेच बदल केले. पण स्पर्धेत विद्यार्थी लेखक म्हणून माझंच नाव लिहिलं. नंतर सराव करताना माझ्या लक्षात आलं की नेपथ्य , प्रकाश इत्यादी लावणे, नाटक सादर करणे, आणि पुन्हा लावलेलं सगलं काढून जैसे थे स्थितीत आणणे ह्या सगळ्याला मिळून एका तासाचं बंधन होतं. ह्या स्पर्धेत रंगमंचावरचे आणि पाठचे - ध्वनिसंयोजन, नेपथ्य वगैरे करणारे मिळून एकूण १६च जण भाग घेऊ शकतात. माझ्या नाटकात १५ पात्रं होती! नाटकातली पात्रं कमी करावीत तर सगळ्यांनाच मंचावर यायची हौस होती - मलाही (मी एक छोटं पात्र साकारलं होतं... साकारलं कसलं डोंबल! कसाबसा उभा राहिलो होतो). मग १६-१५ समस्येवर काही तोडगे निघाले -
१. मंचावरची मंडळीच तोंडं रंगवण्यापूर्वी नेपथ्य रचून ठेवतील. नेपथ्य जेवढ्यास तेवढंच असेल.
२. प्रकाशयोजनेसाठी २ जण लागणारच होते - एक जण मंचावरचे लटकणारे दिवे हे तिथल्या लाकडी घोड्यावर चढून योग्य प्रकारे लावायला आणि दुसरा वरती प्रकाशखोलीत बसून प्रकाशांचे झोत नियंत्रित करायला. त्यातला घोडेस्वारी करणारा एक छोटं पात्र साकारेल. नाटकाच्या शेवटी त्याचं पात्र मंचावर मरून पडेल. त्यामुळे पडदा पडला की हा मरून झोपी झालेला जागा होऊन पुन्हा घोड्यावर चढेल आणि आधी लावलेले फिल्टर्स काढेल आणि त्या दिव्यांच्या हंड्यांची तोंडं इतस्ततः फिरवून पुढच्या स्पर्धक संघाचं काम अवघड करून ठेवायचा शिरस्ताही पार पाडेल.
३. ध्वनीसाठी पिटात बसायला कुणी शिल्लकच नाही राहिलं. त्यामुळे ध्वनीसंयोजनाची झंझट नको. (नाटकात 'पलिकडून आवाज आले' असं म्हणून कंसात लिहिलेलं जे काही होतं ते आम्हीच लोकांनी विंगेत बसून आवाजी सादर केलं होतं. एरवी स्टुडिओत जाऊन ध्वनिमुद्रण करून ते त्या त्या ठिकाणी ऐकवलं गेलं असतं.)

हे वरचे तोडगे ऐकून आमचा दिग्दर्शक म्हणाला की अरे हे नाटक प्रायोगिक वाटतंय. त्याच्या सरावाला सर्व १५ जण एकत्र एकावेळी जमणं हे अवघडच झालं. प्रत्येक सरावाला दिग्दर्शकच ४-५ जणांचे संवाद समोरून म्हणत असे. शिवाय ते ४-५ जण दर वेळी वेगवेगळे असल्याने त्याचीही परीक्षाच होती. आमची रंगीत तालीम तर इतकी बेरंगी झाली, की आमच्यातल्या एकाने चिडून जाऊन भिंतीवर हात आपटला व तो फ्रॅक्चर झाला. आम्हाला दु:ख 'बिचार्‍याचा हात मोडला' यापेक्षा 'वरच्या तोडगा क्रमांक एकमधला नेपथ्यास हातभार लावणारा एक हात कमी झाला' याचं जास्त होतं. त्याने तर मुख्य प्रयोग गळ्यात अडकवलेल्या प्लास्टरमधल्या हाताने केला. शेवटी व्हायचं तेच झालं. पुरेश्या सरावाअभावी आमचं नाटक जोरदार आपटलं. अगदी वाईट प्रयोग झाला. अंतिम फेरीसाठीच्या नऊ संघात आम्ही नव्हतो, तरीही काय आश्चर्य! मला ह्या संहितेसाठी सर्वोत्कृष्ट विद्यार्थी लेखक म्हणून त्या वर्षीचा अनंत नारायण करंडक मिळाला. त्यानंतर त्याच वर्षी मनोहर नावाचं बंद पडलेलं मासिक पुन्हा सुरू होणार होतं. किर्लोस्कर, स्त्री, मनोहर या तीन मासिकांचा एकत्र 'किस्त्रीम' नावाचा दिवाळी अंक तेवढा चालू होता, पण मनोहर बंद पडलं होतं. ते पुन्हा सुरू करताना पहिल्या अंकासाठी त्यांनी माझी संहिता मागितली आणि ती प्रसिद्धही केली. माझ्याकडच्या तो अंक आता शोधायला हवा. माझ्या लेखनाचा प्रभाव म्हणून की काय, मनोहर त्यानंतर पुन्हा बंद पडलं. पण मी त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं. जणू 'मी आता लेखकच झालो' असा माझा गैरसमज झाला. बरं लेखक झालो आहे, तर मी त्यानंतर काही जोरदार लिखाण केलं असेल म्हणावं तर तेही नाही. पुढच्या दोन वर्षी मी नाटकात काही संवाद आणि कविता पाडून दिल्या होत्या इतपतच.

पदवीनंतर मी नोकरीला लागलो आणि अर्थात तिथे मला रिकामा वेळ बराच मिळायला लागला. त्याचा सदुपयोग म्हणा - मी हपिसात बसून ब्लॉग लिहिणं चालू केलं. बरहाचा शोध तोपर्यंत लागला होता. त्या ब्लॉगवर मी माझी लहानपणीची कथा होती ती आणि पाठोपाठ त्याचे २ सिक्वल लिहिले. साधारण वर्षभरात मला 'मिसळपाव' नावाचं संकेतस्थळ आहे हे उमगलं आणि माझं ब्लॉगवरचं लिखाण मी तिकडे चिकटवू लागलो. त्यात माझ्या त्या सिक्वलग्रस्त कथाही होत्या. थोड्या दिवसांनी त्या व्हायरल झाल्याचं मला कळलं. म्हणजे त्याचं झालं असं की एका मल्याळी मित्राने 'हे काहीतरी मराठी आहे, बघ' असं म्हणून एक ढकलपत्र (फॉर्वर्डेड इमेल) मला धाडलं. पाहतो, तर कुणीतरी माझ्याच त्या तीन कथा एकत्र करून आणि खालचं माझं नाव खोडून पाठवल्या होत्या. पुढे मला असे आणखी इमेल्स यायला लागले. मी त्यातली वाक्यं गूगल करून पाहिली, तर त्याच्या शेकडो प्रती लोकांनी आपापल्या ऑर्कुट, फेसबुक, ब्लॉग इत्यादी ठिकाणी ठेवलेल्या दिसल्या. काही ठिकाणी लोकांनी स्वतःचं नावही खाली लिहिलं होतं. तेव्हा जमेल तितक्या लोकांना त्या कथा काढून टाकायची वा माझ्या मूळ पोस्टची लिंक देण्याची विनंती करण्यात वेळ वाया घालवला. नंतर मी वैतागलो आणि मिसळपाववरून माझ्या त्या कथा काढून टाकल्या आणि ब्लॉग फक्त निमंत्रितांसाठी उघडा ठेवला.

मी माझ्या नोकरीचा राजिनामा देऊन जेव्हा पदव्युत्तर शिक्षणाकरिता बंगळूरास गेलो, तेव्हा साहजिकच आमच्या संस्थेत असलेल्या मराठी मंडळात सामील झालो. तिथे गुण उधळायला लायसन्स आयतं मिळाल्यामुळे पुन्हा एकदा एकांकिका लेखनाकडे वळलो. तिथल्या २ वर्षांत २ एकांकिका हा लेखन-रेट होता माझा. त्याशिवाय शेवटच्या वर्षाला असताना माझी जुनी बक्षीसप्राप्त एकांकिका मी काही मित्रांच्या साहाय्याने हिंदीत भाषांतरित केली. ते करताना त्यातले मूळ मराठी विनोद वाजेनात तेव्हा आम्ही उगाच नको ते विनोद त्यात घुसडले आणि ती खूप मोठी चूक होती. त्या एकांकिकेचा हिंदी प्रयोग आम्ही संस्थेत केला, तो प्रयोग चांगला झाला. संस्थेच्याच दुसऱ्या काही आजीमाजी विद्यार्थ्यांनी मिळून एक स्वतःचं वेगळं नाट्यमंडळ स्थापलं होतं. त्यांनी त्या हिंदी एकांकिकेचे बाहेर तिकीट लावून प्रयोग करू म्हणून सुचवलं आणि माझी परवानगी घेतली. मला त्याचा मोबदलाही दिला. मोबदला मिळतोय म्हटल्यावर मी कशाला नाही म्हणतोय! त्या प्रयोगात आम्ही घुसडलेले विनोद आणखी बीभत्स पद्धतीने सादर केले गेले. त्याचे तीन व्यावसायिक प्रयोग झाले. पैकी एका प्रयोगाला संस्थेचेच बरेचसे विद्यार्थी बघायला आल्यामुळे तो हाऊसफुल झाला व बऱ्याच शिट्ट्या-टाळ्या आल्या. त्या नाटकाला नसून त्या प्रेक्षकांच्या ओळखीच्या लोकांना होत्या हे पिटात बसलेल्या मला कळत होतं. बाकीचे दोन्ही प्रयोग जोरदार आपटले. तोपर्यंत मी पदव्युत्तर शिक्षण संपवून पुन्हा नोकरी करू लागलो होतो. माझ्या हापिसातले दोन जण बिचारे माझं कौतुक म्हणून तिकीट काढून आले होते. त्यांना प्रयोग झाल्यावर तोंड दाखवायची मला लाज वाटत होती.

त्यानंतर मी संहिता लेखन पूर्ण बंद केलं. वर्षाकाठी २-३ लेख ब्लॉगवर लिहिणं चालू होतं. ह्या काळात माझ्या वाचनात काही बदल आपोआप झाले होते. माझा ओढा हा पॉप्युलर सायन्सकडे वळला होता आणि तश्याच गोष्टी आपल्या भाषेत सांगायला मजा येईल म्हणून मी विज्ञानविषयक लेख माझ्या ब्लॉगवर लिहू लागलो. ते आवडल्याचं काहींनी कळवलं होतं. मी ब्लॉगला कुलूप लावण्यापूर्वी असंच लेखन करणार्‍या काही लोकांशी ब्लॉगौळख झाली होती. ते अजूनही ई-संपर्कात होते आणि एकमेकांचे लेख वाचून त्यांची समीक्षा करत असू. आम्ही एक समानशीलेषु गटच बनवला. संशोधनाकडे ओढ असल्यामुळे त्यात पीएच्डी करायला मग परदेशात आलो. ते चालू असताना, माझ्या एका गणिती मित्राने एक प्रकल्प करायचा ठरवला. आमचा जो गट होता, त्यात गणित, विज्ञान, अभियांत्रिकी, भूगोल, भाषा असे वेगवेगळ्या विषयातले मराठीत लिहिणारे तज्ज्ञ होते (इथे मी लबाडी करून त्यांच्याबरोबरही स्वतःलाही तज्ज्ञ म्हटलं आहे पहा). मित्राची कल्पना अशी, की आम्ही दर महिन्याला एक लेख लिहायचा आणि त्याच्या प्रती महाराष्ट्रात गावागावात माध्यमिक शाळांत पोहोचवायच्या. तो पूर्वी अनेक खेड्यात गणित आणि विज्ञान कार्यशाळा घेत असे त्यामुळे त्याच्या बऱ्याच ओळखी होत्या. त्या लेखांच्या माध्यमातून गावातील मुलांना वेगवेगळ्या क्षेत्रात होत असलेल्या आधुनिक संशोधनाची आणि व्यावसायिक कामाची ओळख व्हावी हा उद्देश होता. हा प्रकल्प हे आमच्यापुरतं तरी एक शिवधनुष्यच होतं आणि ते त्या मित्राच्याच जोरावर बहुधा तोललं गेलं. त्या उपक्रमासाठी मी ४ लेख लिहिले. अन्य काही लेखांचं मुद्रितशोधन केलं. हा प्रकल्प साधारण दीड वर्ष चालला. तेच लेख थोडे बदल करून लोकसत्तेत छापण्याबाबत बोलणीही झाली आणि संपादकांकडून होकार आला होता. परंतु काही कारणामुळे (इथे मनातल्या मनात तुम्ही 'अपरिहार्य' म्हणालात ना?) ते होऊ शकलं नाही. पण ह्या लेखनामुळे काही ओळखी वाढल्या आणि मला मराठी विश्वकोशात नोंदी लिहिण्यासाठी विचारणा झाली. आतापर्यंत मी लिहिलेल्या दोन नोंदी विश्वकोशावर प्रसिद्ध झाल्या आहेत. सध्या एकूणच लेखन मंदावल्यामुळे नोंदी लिहिण्यातही आळशीपणा झाला आहे.

मिपाच्या मानाने मला माबोचा शोध बराच उशीरा लागला. माझ्या आतापर्यंतच्या लेखनाकडे पाहिलं (अरेच्चा! 'मागे वळून' हे ठोकळेबाज शब्द राहिलेच), तर लक्षात येतं की माझं बरंचसं लिखाण हे स्वयंभू नसून कुठल्यातरी इतर वाचनावर आधारित आहे. आताशा तर फारसं नवीन काही लिहायला लेखणी किंवा कळपाट सरसावत नाही. मग मायबोलीवर स्वतःचं लेखन कमी असतानाही दुसर्‍यांचं लेखन वाचून 'माझी भूमिका ही आस्वादकाची आहे' अश्या फुशारक्या मारत फिरतो. जमेल तिथे प्रतिसाद लिहीत बसतो. इथे कवितांना प्रतिसाद कमी मिळतात ही (मी स्वतः कवी नसूनही) माझी एक खंत आहे. त्यामुळे मी जमेल तसं कविता वाचतो व काही ना काही प्रतिसाद तिथे द्यायचा प्रयत्न करतो. गेली काही वर्षं मला लिहायला विषयच सुचत नव्हते. आता विषय डोक्यात घोळत आहेत, पण तेवढं मोठं लिहायला, डोक्यातले विचार सुसूत्रतेत आणायला, आणि बोटांनी टंकून ते मांडायला उसंत मिळत नाहीये. दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाहीत त्यातली गत. हा धागा लिहायलाही मी फारच वेळ घेतला. त्यामुळे माझी ओळख ही स्वतंत्र लिखाण करणार्‍यापेक्षा 'प्रतिसाद लेखक' म्हणूनच जास्त आहे. पण प्रतिसादांमुळे माझी ओळख झाल्यामुळे माझ्या काहीही न लिहिलेल्या 'चित्रावरून लिखाण' सारख्या धाग्यालाही अनेक जण प्रेमाने प्रतिसाद देतात, त्यामुळे मी माबोकरांचा ऋणी आहे. ह्यामुळेच पुढेमागे मी पुन्हा जरा व्यवस्थित लेखन करायला उद्युक्त होईन की काय अशी धास्ती मला वाटते. आता ऋणनिर्देश आलाच आहे, तर मी कुणाकुणाचे आभार मानू हे माझं मलाच कळेनासं झालं आहे. सर्वांच्या ऋणाच्या ओझ्याने वाकल्यासारखं होतं आणि मग त्यातून पुन्हा अ-वाक होऊन उभं राहणं सोपं नाही. निबंधाच्या शेवटाकडे आल्यावर क्लोझिंग स्टेटमेंट काय करावं हे न उमगल्यामुळे पुन्हा एकदा दामले मास्तरांच्या शिकवणीला जागून "हर्पा म्हणे आता | राहिलो प्रतिसादापुरता ||" या दोन ओळी लिहितो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद!

Group content visibility: 
Use group defaults

झकास हो ! अगदी हपासच !!

दोन नोंदी विश्वकोशावर प्रसिद्ध झाल्या आहेत. >>> हार्दिक अभिनंदन !
अभिमानास्पद !

हपा>>> खुमासदार लिखाण…

विश्वकोशात नोंदी प्रसिद्ध म्हणजे तुम्ही यष्ट्याब्लिश्ड झालात की राव…

हर्पा तुम्ही लिहिलेल्या दणदणीत धाग्यांच्या प्रतीक्षेत? सगळे प्रतिसाद एकत्र करून धागा काढा आणि त्याला नाव द्या misc posts Happy
..
मस्त
खुशखुशीत लिखाण (बिघडते शीर्षक आहे म्हणून शु ले चुकवले आहे )

खुमासदार!!!
सर्वांच्या ऋणाच्या ओझ्याने वाकल्यासारखं होतं आणि मग त्यातून पुन्हा अ-वाक होऊन उभं राहणं सोपं नाही.>> हहपुवा.

खूपच सुंदर, ह.पा.
आणि किती विनयी, नम्र स्वभाव!
Lol
अगदी छान खुमासदार मनोगत !
लिहीत राहा.... !!
नाट्य लेखन चालू करा पाहू पुन्हा...!! Happy

लेखनातून लिहिणार्‍याचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व थोडेतरी डोकावते (मला तरी तसे वाटते). “हरचंद पालव” या आयडी मागे एक हुषार, तिक्ष्ण विनोदबुद्धी आणि उत्तम निरीक्षणशक्ती असलेली व्यक्तीच असणार हा समज दृढ करणारा लेख.

From the start to the end of this write up, had a broad smile on my face, totally out of place for the tough unhappy day I am having. Can’t thank you enough, loads of good wishes for regular and frequent writing !

अरे व्वा, मस्तच आणि वाचणे मस्टच Happy
चाय-टी सारखे नान-ब्रेड हे अजून एक.

शीर्षक वाचून "आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना" आठवले.

tongue-in-cheek लेखनाचं उत्तम उदाहरण म्हणावं का? सगळा लेख अगदी लक्षपूर्वक वाचावा लागला. विनोदाची सूक्ष्म पखरण का काय ती केली आहे. एकांकिका संहिता प्रकरण, विश्वकोश नोंदी .. वा वा!

तुमच्या दात आणि चण्यांची वरचेवर एकमेकांशी भेट होत राहावी यासाठी शुभेच्छा!

मभागौदि निमित्त लेख आणि शेवटी फक्त जय हिंद? जय महाराष्ट्र का नाही?

Lol
>>> 'उदया'वरचा यति परवावर Proud

विश्वकोशात नोंदी म्हणजे भारीच की! Happy
संहिता लेखनाचे प्रयोग आणि त्यांचं पोस्टमॉर्टमही मस्त!

लेखकू आणि प्रतिसादकू दोन्हीही सारखेच महत्त्वाचे असतात बरं का.
'बडी़ मुश्किल से होता है चमन में दीदावर पैदा'! Happy

मुद्देमालापेक्षा कंसांतला माल जास्त म्हणून हा लेख मालकंसात आहे असं म्हणावं का? Proud
भरत, 'जय महाराष्ट्र' न लिहिल्याबद्दल याला कंसांत प्रायश्चित्ताची सजा फर्मावावी का? Proud

अरे मस्त लिहिलं आहेस. एकेक वाक्य लिहुन त्यातील एकेका शब्दांवर खेळीमिळीने बागडत पुढे जायची तुझी शैली हे तुझ्या लिहिणं आणि गाणं या आवडींचा संगम आहे. (हे पहिलं वाक्य जरा अतीच स्तुती असलेलं टाकलं की खाली काही लिहायला मोकळा. आमच्या पण मास्तरांनी कवितेने सुरुवात करायला सांगितलेलं. पण अशी करायची वेळ आली ही हमखास बहु असोत सुंदर संपन्न की महा... असं काही आठवतं. त्यात भरतच्या जय महाराष्ट्रचा हात असावा... आता यावर.. महाराष्ट्रात हात चालत नाही (हे लक्ष्याच्या आवाजात वाचावे) घड्याळ धनुष्य.... असं सगळं हात दाखवुन अवलक्षण नको. ) (बरं कंसमामा जमलेत का? अनु असेल तर सगळे कंस पूर्ण केलेत). तर काय सांगत होतो... ख्याल गायक कसा पुढेपुढे जाताना नवा स्वर लावला की त्याच्या ज्या काही शक्य अशक्य व्हरायटी असतील. मागुन पुढे, पुढुन मागे, लपाछपी, घसरगुंडी, झोपाळा असं सगळं करुन झालं की मग पुढे जातो. तसा घोळवुन घोळवुन निवांत लेख आहे हा, गप्पा मारल्या सारखा.
बर्‍याच गोष्टींवर वाचताना हसु आलं. प्रसन्न वाटलं वाचुन.

हर्पा यांच्या नवनवोन्मेषालीनी प्रतिभेबद्दल काय लिहावे ? त्यांनी चक्क 'जुनून' ( राहूल रॉय => वाघ ) सिनेमाची ष्टोरी शुद्ध संस्कृत मध्ये लिहिली होती ! मस्त लेख !

हपा,
मला हा लेख वाचायला खूप कष्ट घ्यावे लागले. आधी वाचताना खुसखुसीत प्रतिसाद द्यायचे मनात होते.
पण जसजसा पुढे पुढे वाचत गेलो { आणि थबकत गेलो [इथेही कंस मोठा करायचा विचार आहे ( कंस, सूक्ष्म विनोद यामुळे काहीही सुटून गेले तर समजणार नाही ही साधार भीती वाटली ) कारण कंसात कंस हे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला अंगवळणी पडलेलं असतं ] , थबकण्याचे कारण म्हणजे लाग्रांजिएन स्टँडर्ड मॉडेलचा फॉर्म्युला शिकताना नीट नाही ऐकला तर वर्ष गेलं ही जी भीती दाटली तसंच काहीसं काळजात धकधकलं <कंस पूर्ण>} तस तसं हे काही तरी बूलिएन पायथॅगोरिअन ट्रिपल प्रॉब्लेम सारखं रूबाबदार आणि वजनदार आहे हे जाणवलं ( थोडक्यात माझ्यासारख्या ढ विद्यार्थ्याला एटीकेटीसहीत मेहनत घ्यावी लागणार हे ध्यानात आलं).

भरत यांच्या प्रतिसादात अचूक वर्णन आहे.
हपा अनेकांकडे प्रतिभा असते. काही जण पोट भरण्यासाठी म्हणून असं फिल्ड निवडतात ज्यामुळे तिला न्याय देता येत नाही. तुमच्या ठायी अ‍ॅकेडेमिक बरोबरच अन्य बर्‍याच प्रकारच्या प्रतिभा आहेत. तुम्ही खूप दर्जेदार लिहू शकाल. अर्थात तितका वेळ तुम्हाला मिळावा ही प्रार्थना स्वतःकडे करतो. Wink

मला आता हरचंद पालव यांचा वैयक्तिक सखाराम गटणे झाल्याचे फिलिंग येत आहे. स्वाती आंबोळे यांच्या या पदाचा राजीनामा द्यावा लागला तरी बेहत्तर. ( त्या टीपापा नामक कुठल्या डाकूंच्या गुहेत राहतात, तिथल्या त्या सरदारीण आहेत या भीतीने तसे लिहीले गेले असेल).

अभियांत्रिकी, बोट क्लब वाचून फारच नॉस्टॅल्जिक केलं. त्यात पुरूषोत्तम करंडक ! ( इथे लेखकास बाजूला सारून दोन पानं स्वतःबद्दल लिहायचा मोह झाला आहे). पुरूषोत्तमला अभियांत्रिकी, बी जे वैद्यकीय महाविद्यालय आणि एस एन डी टी होम सायन्स यात स्पर्धा असायची. त्या वेळी आर्ट्स कॉलेजेस यात का नाहीत असा प्रश्न पडायचा. होम सायन्स हे बहुधा आर्क्टिकेट आणि स्थापत्य यांच्यात दुवा साधणारे असेल असे वाटायचं.

मला तुमचा ब्लॉग, एकांकिका सगळेच वाचायला आवडेल.

मस्त खुसखुशीत लेख....

छान लिहिले मनोगत
किती गुण असती अवगत I
प्रतिसादातून भाषामृत
पाजतसे सर्वांना II

जणू पाणिनीचा भ्राता
"कोट्या"तून करे वार्ता I
हर्पा नसे राहिला आता
फक्त प्रतिसादापुरता II

भारी लिव्हलय Proud
लिखाणाचा प्रवास सुद्धा मस्त.
कुठल्या कथा शेकडो जागी चोरीला गेल्या.. इथे शेअर करा की.. (हे कथा चोरीला जाणे मला खूप भारी वाटते.)
आणि ब्लॉगची लिंक सुद्धा द्या..

हर्पाचा लेख म्हणून पटकन उघडला खरा पण स्कॅन करताना जाणवले की एकेक शब्द व वाक्य नीट वाचायचा हा लेख आहे. पुलंच्या भाषेत "येता जाता तोंडात टाकायला बरा" टाइप पदार्थ नव्हे. तेव्हा सध्या फक्त रूमाल.

लेखातील उदयाचा यति परवावर व प्रतिक्रियांमधला मालकंस यावर एक लोल सध्या फक्त Happy

ह पा द ग्रेट....
छान लेखन प्रवास आणि त्याचा तटस्थपणे घेतलेला मागोवा ( एक पंची केलेला पंचनामा. ) Happy
तुम्ही उत्तम लेखक आहात, हे मी कशाला सांगायला हवे ?

अतिशय सुंदर लेखन आहे, एकही शब्द नजरेतून सुटू दिला नाही. तुमचे विनोद नेहमीच दर्जेदार असतात. या लेखातील मराठी भाषा जुन्या पद्धतीची प्रमाण मराठी वाटली. चि.वि जोशींच्या लेखनासारखी शैली आहे. ते माझे अत्यंत आवडते लेखक आहेत म्हणून नॉस्टॅल्जिक वाटले. Happy

तुमचं भाषातज्ज्ञ असणं आणि तुम्ही ज्या अभ्यासपूर्ण पद्धतीने व चांगल्या भाषेत समजवता ते माझ्यासाठी अत्यंत मोलाचं मार्गदर्शन ठरलं आहे. त्यासाठी मला तुमचा अतीव आदर वाटतो. तुमच्याकडून (आणि भरत, कारवी, सीमंतिनी, स्वाती आंबोळे, स्वाती2, कुमारसर, आचार्य अजूनही काही) खूप शिकायला मिळाले/मिळते आहे. माबो खरोखरच बिनभिंतीची शाळा आहे. प्रतिसाद असो-लेख असो वाचल्या जातोच.
स्वतंत्र लेखनासाठी शुभेच्छा. Happy

वाह एकांकिका, ब्लॉग, कविता(विडंबने), मिपा वगैरे बरच लिखाण आहे तुमचं हपा. सिद्धहस्त लेखक आहात की. छान आढावा घेतलेला आहे. आवडला.

सर्वांचे मनःपूर्वक आभार!

झकास हो ! अगदी हपासच !! >> कुमार सर! ही कोटी तुमच्याकडून आल्यामुळे आणखी भारी वाटली.

किल्ली, हो, आता प्रतिसादांवरूनच काढला तर धागा काढता येईल असाच विचार करत होतो. Happy

आणि किती विनयी, नम्र स्वभाव! >> आं गो Lol Lol

अनिंद्य, तुम्हाला दिवसभराच्या गडबडीत ह्या लेखाने स्मितहास्य आणलं हे वाचून मी थोडा भावूक झालो.

शीर्षक वाचून "आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना" आठवले >> कर्रेक्ट, चामुंडराय! शिवाय तुमचं नान-ब्रेडबाबत निरीक्षणही पर्फेक्ट.

tongue-in-cheek >> भरत, हे मला गूगल करायला लागलं. <<जय महाराष्ट्र का नाही?>> माफी असावी _/\_

हा लेख मालकंसात आहे >> जबरदस्त, स्वाती! शिवाय पुढच्या वाक्यातलं 'कंसांत प्रायश्चित्त' कळायला मला दोनदा वाचावं लागलं. पहिल्यांदा मेंदूने 'सा'वरचा अनुस्वार वाचला नव्हता. प्रायश्चित्त कुबूल है!

अमित आणि रआ यांनी प्रतिसादांत यशस्वीपणे सर्वकंसमर्दन केलेलं आहे; ते किती अवघड काम आहे हे मला माहीत आहे. माझ्या लिखाणाची तुलना ख्याल गायकीशी - हे इंटरेस्टिंग आहे. ते वाचून माझं मलाच भारी वाटायला लागलं तेव्हा लगेचच ती ऐकली तर त्यावर विकटहास्यद्वयीची प्रतिक्रिया काय असेल ती इमॅजिन झाली आणि मी गप्प झालो.

अर्थात तितका वेळ तुम्हाला मिळावा ही प्रार्थना स्वतःकडे करतो. >> हाहा. कभी कभी भगवान को लगता है की आपुनिच रघु आचार्य है!
<<होम सायन्स हे बहुधा आर्क्टिकेट आणि स्थापत्य यांच्यात दुवा साधणारे असेल असे वाटायचं.>> लोल.
<<इथे लेखकास बाजूला सारून दोन पानं स्वतःबद्दल लिहायचा मोह झाला आहे>> ह्या नॉस्टॅल्जियातून का होईना, तुम्ही तुमचे अनुभव लिहिलेत तर वाचायला फारच आवडेल.
बाकी तुमचे 'लाग्रांजिएन स्टँडर्ड मॉडेल' आणि 'बूलिएन पायथॅगोरिअन ट्रिपल प्रॉब्लेम' हे अजून गूगल करायचे बाकी आहेत. नावं वाचून जरा मी बिचकलो. तूर्तास अ‍ॅकॅडमिक असलो तरी एकाच वझ्याचा बैल आहे मी. बाकी विषयात गती नाही. तुम्ही पुढे कंस वापर्ल्याने काय म्हणायचं आहे ते कळलं.

ऋतुराज, या शीघ्रओवीबद्दल दंडवत!

अस्मिता, <<चि.वि जोशींच्या लेखनासारखी शैली आहे>> हे वाचल्यावर मला जाणीव झाली. चिंवि जिश्यांशी तुलना नाही, पण भाषा साधारण तशी वाटते आहे खरी. बाकी मी भाषातज्ज्ञ नाही, भाषाप्रेमी म्हणता येईल. बाकी आदर हा 'सेम टु यू ऑल'.

याखेरीज MazeMan , SharmilaR , समाधानी, उबो, अवल, ऋन्मेऽऽष, फारएण्ड, vijaykulkarni , दत्तात्रय साळुंके, आणि सामो या सर्वांचेही आभार. सर्वांच्या हुकुमानुसार आणखी लिहिण्याचा प्रयत्न करेन. ब्लॉग लिंक वगैरे यथावकाश देईनच.

हे आणि स्वाती चा लेख वाचून, "खेळ मांडीयेला वाळवंटी घाई" आठवलं.
(माझं अतिशय आवडतं गीत आहे हे )

इथे बरेच जण दर्जेदार लिखाण करणारे आणि त्यावर उत्तमोत्तम प्रतिसाद लिहिणारे आहेत, त्या सर्वांचे आभार,

अजून मी हा लेख वाचायचा म्हणून बाकी ठेवलाय. पण सुरूवात केली होती तेव्हाच जाणवलं, की हाताशी वेळ असल्याशिवाय नकोच. प्रतिसादही सवडीने वाचेन. पण नक्की भारी असणार याची खात्री आहे.

मी पण लेख वाचायला घेतला नी मग लगेच निवांत वाचायला हवा म्हणून ठेवला.

तुमचे प्रतिसाद कायमच वाचनीय असतात. लेख पण सुंदर झाला आहे.

कृपया लिहित रहा.

पुलेशु.

अवग्रह टंकता येणे दूर राहीले अवग्रह म्हणजे नक्की काय ते ही आठवत नसणारा मी.
जमेल तसा वाचून काढला लेख.

बाकी
तुमचे प्रतिसाद कायमच वाचनीय असतात. लेख पण सुंदर झाला आहे. >> +१

ओह ते एक राहिलंच.

अवग्रह (ऽ) अ~ असा लिहायचा. Happy
दोन्ही keys एकत्र नव्हेत, अ नंतर (मात्रा दिल्यासारखी) लगेच ~.

Pages