चित्रावरून लिखाण - चेहेरा

Submitted by Abuva on 4 March, 2024 - 09:23
मास्क

घरी आलो. रूममध्ये आलो. नेहमीच्या सवयीनं खिडकी उघडली. गरम वाऱ्याचा झोत आत आला. शेजारच्या बागेत अजून लहान मुलांची गर्दी झाली नव्हती. लवकर आलो होतो आज. हात खिशाकडे गेला. विमानाचं तिकीट होतं. रात्रीचं. परतीचं.

मान वर केल्यावर, बागेतल्या झाडांच्या निळंशार निरभ्र आकाश दिसत होतं. मला या निळाईची अजून सवय झाली नाहीये. खोल, खूप दूर वाटतं हे आकाश. आपल्याकडच्या आकाशात पांढरे का होईना ढग तरंगत असतात. त्या कापसासारख्या ढगांनी आकाशाला आपलेपणा येतो. ते अनंत अवकाश न रहाता, हा असा वरती केला तर हाती लागेल असं वाटतं. त्या ढगांत आपली बुब्बुळं गुंडाळावीत, अन खुषाल स्वप्नं पहावीत. स्वप्नं. हं..
त्याच स्वप्नांपाठी इथे आलो होतो ना? स्वप्न, सत्य आणि बरंच काही.
रोकडं सत्य. पदरात असलेल्या तीन मुली, एक आजारी बायको.
स्वप्न? किती सांगू..
आणि भ्रम. हो, भ्रम की आपण प्रोग्रामर आहोत. पांढऱ्या ढगासारखा भ्रम. भंपक, पोकळ, फोल.

अकौंट्समध्ये काम करता करता संधी मिळाली म्हणून गेलो इ.डी.पी.मधे. त्याला बरीच वर्षं झाली. निमसरकारी नोकरी होती. एकच सरकारीची कंपनी होती या उद्योगात. निश्चिंत होतो. तीन मुलींचा, त्यांच्या भविष्याचा विचार होता. पण काळजी नव्हती. ते चित्र बदललं बायकोच्या आजारपणात. खर्च झाला. मनस्ताप झाला. मुलींच्या शिक्षणावर परिणाम झाला. मोठीनं सायन्स घ्यायच्या ऐवजी होमसायन्स घेतलं. मग जाणवायला लागलं.

हा रत्नाकर माझ्या हाताखाली म्हणून लागला होता. पण ते बरच नंतर. पहिल्यांदा मी ई.डी.पी.चं ट्रेनिंग घेतलं. मग टेस्टिंग केलं. थोडीथोडी कंपनीच्या प्रोग्रामरना मदत करू लागलो. मग एखाद-दुसरा बॅच जॉब लिहीला. मग मलाच वाटायला लागलं की मी प्रोग्रामर झालो. मग पुढची दहा-बारा वर्षं अशा रत्नाकर सारख्या प्रोग्रामर्स कडून काम करवून घेण्यात गेले. यात नवीन गोष्टी शिकायच्याच राहिल्या. पण मला कोण विचारणार आमच्या कंपनीत? मीच सिनीअर होतो.

हवा बदलली आहे. ही संध्याकाळी समुद्रावरून येणारी हवा सुरू झाली. अजून होती गरम, दमट आहे. इथनं समुद्र दिसत नाही. पण ऑफिसच्या चौदाव्या मजल्यावरून छान दर्शन होतं, आणि सनसेट? आहाहा. एका बाजूला समुद्राची निळाई, दुसऱ्या बाजूला डोंगरांची! किती आनंद झाला होता. पण डोंगरावर जायचं राहिलंच. समुद्रावर तरी किती, एकदा गेलो. आता काय...

रत्नाकरनं सांगितलं म्हणून हे धाडस केलं खरं. त्याला घरच्या परिस्थितीची जाणीव होती. ही रत्नाकरसारखी यंग मुलं आमच्याकडे आली, तयार झाली, आणि बघताबघता या नव्या आयटी कंपन्यांत लागली. यांचं विश्व बदललं. जगभर प्रोजेक्टवर जाऊ लागली. बख्खळ पैसा कमावू लागली. आम्ही मागे राहिलो. सरकारी कंपन्यातल्या भोंगळ कारभारात बळी पडलो. आज समजतंय. मोठी किंमत देऊन.

गरम होतय. चला, पॅकिंग करायचंय. कॉलर वर केली टाय काढण्यासाठी. डोक्यातून टाय काढायची आता सवय झाली होती. म्हणजे गाठ सोडावी लागत नाही. हसू आलं. हसू नाही तर काय करू? आता कशाला डोक्यावरून काढायचा? टायची गाठ आता सोडली तर काय फरक पडणार आहे? पुन्हा थोडीच घालायचाय! तसाच ओढला. गाठ सुटली. हातातून ओघळला आणि खाली पडला. चला, एक मुखवटा गळला.

रत्नाकरनं आकडे सांगितले, भुरळलो. बायकोशी बोललो. ती नाहीच म्हणत होती. म्हणाली हे वय नाही ती रिस्क घ्यायचं. पण मुलींनी तिची समजूत काढली. त्यांना नव्या जमान्याचा वारा लागला होता. हो-नाही करत सगळे तयार झाले. शेवटी प्रश्न पैशांचा होता! सगळी सोंगं आणता येतात, पण पैशाचं? आपल्यामुळे ही सगळी फरपट आहे, असा विचार घेऊन बायको आणखी खंगली. पण मोठी मुलगी, बडकी, धीराची. तिनं चंगच बांधला. मी बघते म्हणाली. म्हणून इथे तरी आलो. आता वाटतं..

कधी जुळलंच नाही. मेनफ्रेम नावालाच तो होता. खूप वेगळं होतं सगळं. आणि... आणि मी प्रोग्रामर नव्हतो. मला भिती होतीच. माझ्या कुडबुड्या ज्ञानाचं पितळ उघडं पडलं. पहिल्यांदा सगळ्यांनी वयाचा, पांढऱ्या केसांचा आणि अनुभवाचा आदर केला. पण सरकारी कामं वेगळी अन हा धबडशा वेगळा. यांचा वेष वेगळा, वेग वेगळा, आवेश वेगळाच. सगळी तरूण पोरं. त्यांच्या डोळ्यातली चमक पाहून घाबरायला व्हायचं. कस्टमरचं इंग्लिश तर अजूनही मला कळत नाहीत. काय झालं हे...

घरी.. घरी कळवलं पाहिजे. कितीही वाईट वाटलं तरी. कसं सांगू? कसं कळवू? कुठल्या तोंडानं सांगू? बडकीला काय वाटेल? तिनंच उभारी धरली म्हणून मी इथे आलो. तिला अपेक्षा होती लाखांची. पण मी परत जातोय लाखोली ऐकून. भाग्यवान, मंझली, छुटकी... हं...

सकाळी ऑफिसला पोहोचलो नेहमीसारखा. लंच टाईमला बघितलं तर स्टेटमेंटचा रन लागणार होता. बराच प्रयत्न करून हा एक प्रोग्राम मी बदलला होता. यावरच भिस्त होती. तासाभरात फोन आला, बोलावलंय. कस्टमरच्या मॅनेजरनं बोलावलं होतं. आत पाऊल टाकलं तर रत्नाकर तिथे होता. समोर तीनचार फूट उंचीचा स्टेटमेंटचा ढीग होता. पण वातावरण बघूनच लक्षात आलं. भितीनं घसा कोरडा पडला होता. त्यानं स्टेटमेंट बघायला सांगितलं. बघितलं तर बरं होतं. मी बावचळलो. आणि मग कस्टमर मॅनेजर चवताळला. त्याचं बरोबर होतं. क्रेडीट कार्डचा संपूर्ण नंबर प्रिंट झाला होता! मास्किंग फेल गेलं होतं. ऑटोमेटेड सिस्टीममुळे प्रिंट झालेली स्टेटमेंट एन्व्हलपमध्ये गेली होती. प्रिंटर बिघडला म्हणून बघायला गेले तेव्हा लक्षात आलं. नशीब माझं. सगळी स्टेटमेंट पोस्टात पडली असती तर बॅंकेवर लाखो डॉलर्सची आफत आली असती. सगळा खर्च, गेलेला वेळ, चुकलेली वेळ... कस्टमरनं माझं कॉन्ट्रॅक्ट तडक टर्मिनेट करायला सांगितलं.

रत्नाकर काय बोलणार होता यावर? पण त्याच्या केबिनमधे आल्यावर मात्र बोलला. मोजकंच पण शेलकं. त्याच्यवरच जास्त शेकलं होतं हे. पण मला माहीतेय की मीच उणा पडलोय. त्यानं सेक्रेटरीला बोलावून तिकीट काढायला सांगितलं. मी विचार केला. काय करू वीकेंड पर्यंत थांबून. आजच निघावं हे बरं. त्याच्या पथ्यावर पडलं.

ऑफिसमध्ये सामान आवरलं. होतं काय? थातुरमातूर हॅंडोव्हर दिला. एकदाच खिडकीतून बाहेर नजर टाकली. डोंगर अजूनही निळा होता. समुद्राला मात्र धुरकट हवेचा वेढा पडला होता.

माझा पडलेला चेहरा, तो मात्र बरोबर घेऊन आलोय.

(सलाम: छंदिफंदि, सामो)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

ओह
समजली. वाईट झालं त्याचं..
छान लिखाण

सुंदर लिहलीयेत!
आवडली.
उपक्रमात सामील झाल्याबद्दल धन्यवाद!

कथा आवडली.
त्यावरून अच्युत गोडबोलें ची आठवण झाली. त्यांनाही प्रोग्रम्मिंग येत नव्हतं. अतिशय frustrating होतं ते. त्या काळात ते पिण्याच्या आहारीही गेले होते...
पण नंतर आले हळू हळू त्या संगळ्यातून बाहेर....

.