थरांवर थर

Submitted by SharmilaR on 20 February, 2024 - 01:57

(अन्यत्र पूर्वप्रकाशित)

थरांवर थर

सुमा रिक्षेतून उतरली, तेव्हा रात्रीचे आठ वाजून गेले होते. कशी बशी रिक्षेतून तिने तिची अवजड लोखंडी ट्रंक एकटीनेच खाली काढली. थंडीचे दिवस होते, तरी एवढा वेळ सायकल रिक्शा चालवल्याने, घामाघूम झालेला रिक्षेवाला घाम पुसत होता. तिने दुसरी छोटी बॅग काढून ट्रंकेवर ठेवली. पर्स मधून पैसे काढून त्याला दिले, अन् त्याने रिक्शा वळवली, तशी ती कुंपणाचं लाकडी फाटक उघडायला वळली.

फाटक उघडतांना तिचं लक्ष आता घराकडे गेलं. सगळी कडे अंधार होता. रस्त्यावरच्या दिव्याच्या प्रकाशात दिसलं, घराच्या दाराला कुलूप होतं.

‘आत्ता ह्या वेळी दाराला कुलूप? गेल्यात कुठे दोघीही.. ? एरवी कधी फारसं घराला कुलूप नसतं. संध्याकाळ नंतर तर नाहीच नाही. दिवेलागणीला घर उघडं असलंच पाहिजे असा दंडकच आहे आईचा. आणी नंतर रात्रीचं तर, कुठे जायचा प्रश्नच येत नाही.’

सुमा प्रवासाने अन् एवढ्या दहा दिवसांच्या दगदगीने दमलेली होती. निवांत झोपायचं होतं तिला घरी, तर हे कुलूप! सामान तिथेच ठेवून, तशीच ती समोरच्या घरी गेली. दारातूनच तिने काकूंना आवाज दिला.

“अगं बाई सुमा..? तू आज आलीस..? तुझी आई तर म्हणाली होती, की तू उद्या येणार.. म्हणून त्या दोघी मावशीकडे रहायला गेल्यात आज..” काकू तिला बघून म्हणाल्या.

“नाही काकू. दहा दिवस म्हणजे, आज सकाळी संपला कॅम्प. मग नाश्ता करून निघालो आम्ही..” सुमा म्हणाली. ती कॉलेज च्या एन.सी.सी. कॅम्प हुन परतत होती. ह्या वर्षी देवळालीला होता कॅम्प. त्यामुळे तेथून सकाळी निघल्यानंतर इथे ट्रेन पोचायला रात्र झालीच.

“हो का? आईला वाटलं असेल, कॅम्प आज रात्री संपून तू उद्या येणार म्हणून.. म्हणाल्या.., दोघीच आहोत तर आज शकूकडे रहायला जातो.. ” काकू म्हणाल्या.

‘म्हणजे एरवी अशा किती जणी असतो घरात..? तिघीच नं..? भाऊ तर फक्त शनिवारी येतात मूर्तीजापूर हुन.. आणी सोमवारी जातात परत कामावर..’. सुमाच्या मनात आलं.

काही नं सुचून, सुमा तशीच दारात उभी राहिली. ‘एवढे दिवस होते नं, मोकळे त्यांना.. मी नसतांना.. अगदी शेवटच्या दिवशी.., आजच जायला हवं होतं तिकडे राहायला..? धनुताई उद्या घरी येणार असती, तर झालं असतं असं..?’ तिच्या मनातल्या कडवट थरात, आणखी एका थराची भर पडली.

“बरं, मग सामान ठेवू का, काकू इथे..? मी पण जाते मावशीकडे..”

“अगं, एवढ्या रात्रीची कशी जाणार तू एकटी..? कुठे बस करता एकटी दुकटी थांबणार आहेस तू..? आज रहा इथेच आता. ये.. घरात ये, तुझं सामान घेऊन..” त्या दारातून बाजूला होत म्हणाल्या. तेवढ्यात अंजुताई, जयूताई, प्रदीपदादा सगळेच आलेच बाहेर.. आत जेवणं सुरू असावीत त्यांची.

मग प्रदीपदादाने तिला तिची ती अवजड पेटी आत आणायला मदत केली. एन.सी.सी. कॅम्पला अशी पत्र्याची काळी मोठी ट्रंक नेणं कंपलसरी होतं. त्यात सामानही होतं तसच भरपूर. कडक इस्तरी चे दोन खाकी ड्रेस.., कॅप्स.., बेल्ट.., दोन पांढरे शुभ्र ड्रेस.., एन.सी.सी. चे अवजड शूज.., एक दोन सिविल ड्रेसेस.., शिवाय सतरंजी.., पांघरूण.., ताट वाटी पेला चमचा.. आणी रोज लागणाऱ्या काय काय वस्तू.. दहा दिवसांकरिता लागणारा सगळा संसारच होता जणू..

हात पाय धुवून, मग तीही जेवायला बसली सगळ्यांबरोबर.. आज पर्यंत, अशी कधी शेजारी रहाण्याची आणी जेवणाची वेळ आलीच नव्हती.. अगदी हे रोजच्याच संबंधातलं कुटुंब असलं तरीही... ती रोजच संध्याकाळी गप्पा मारत बसायची, समोरच्या पायऱ्यांवर.. ह्या सगळ्यांबरोबर.. पण आज तिला अवघड वाटू नये, म्हणून सगळे जरा जास्तच आस्थेने तिची विचारपूस करत होते.

जेवणं झाल्यावर जरा इकडचं तिकडचं बोलून, ती अंजुताई, जयूताई बरोबर माजघरात बिछान्यावर पडली. डोळे बंद केले तसा मनातला कडवटपणा उफाळून आला..

‘एकतर मी आज येणार हे आईला माहीत असायला हवं होतं.. आणी झाला असेल, तिचा दिवसातला गोंधळ.. पण माझ्या जागी धनुताई असती तर..? उद्या धनू येणार.. उद्या धनू येणार असं दिवसभरात कितीदा तरी पुटपुटत, तिच्या वाटेकडे अगदी डोळे लावून बसली असती आई...
मागे नाही का.. धनुताईला महिनाभर नागपूरला काकांकडे राहायला पाठवायला लागलं, तर आईच्या डोळ्यातलं पाणी खळत नव्हतं.. ती गेल्यावर, अगदी रोजच तिच्या पत्राची वाट पहात उभी असायची दारात. तरी बरं.., गेली होती धनुताई, ते तिच्याच कामा करता.. काका म्हणाले होते, तिची दहावीची तयारी मी नीट करून घेतो.. म्हणजे यंदा तरी ती पास होईल.. लग्ना करता किमान तेवढं शिक्षण तर हवच मुलींना..
पहिली बेटी, धनाची पेटी.. म्हणत चांगलंच स्वागत झालं होतं म्हणे, धनुताईच्या जन्माचं.. म्हणून तिचं नाव पण धनश्री ठेवलं होतं. अशक्त असली, तरी सुंदर आहे धनुताई दिसायला.. गोरीपान.. सरळ सुंदर नाक डोळे.. लांबसडक केस..

माझ्यात मात्र तिचं काहीच नाही उतरलं? कुणाकडून आला, माझा हा काळाकुट्ट रंग.. अन् हे असे तोकडे कुरळे केस..? सगळंच कसं नकोसं माझ्यातलं.. माझ्या जन्मासकट..? धनुताईच्या जन्मानंतर चार वर्षे उलटून गेली होती.. सगळे मुलाच्या जन्माची वाट पहात होते.. आणी मी आले.. मुलगी! नको असतांना झालेली.. त्यात रूप नाही.. शिवाय म्हणे, मी प्रचंड रडकी.. आकाश पाताळ एक करायचे म्हणे, मी तेव्हा रडून.. रडून.. माझ्याकडे दुर्लक्ष तेव्हापासूनच होतं..?

मनात असे थर केव्हा पासून चढत गेलेत..? किमान लहानपणी तर, हट्टीपणा म्हणजे काय हे कळत नसेल.. पण लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न कायमच करावा लागला.. सतत धनुताईचं कौतुक.. आणी ही मात्र खूप हट्टी.. असं माझ्याबद्दल म्हणत जाणं.. मी सुंदर नाही हा.. की मी सशक्त आहे हा.. माझा अपराध..? मांजरी सारखी.. कुठूनही टाकलं तरी चार पायांवर उभीच राहणारी मी.....

कितीतरी प्रसंग.. दर वेळी मनात थर साचत जाणं..

एक प्रसंग तर, मनात अगदी घट्ट रूतून बसलाय.. जेव्हा तो घडला, तेव्हा काही वाटलं नव्हतं.., कारण काय घडतंय, हेच कळत नव्हतं.. हे घडणार.. ते महित असायला पाहिजे.. हेही महित नव्हत. पण जरा मोठी झाल्यावर मात्र त्याचं गांभीर्य कळलं.. जो संवाद इतर मुलींना सहज.. हक्क म्हणून मिळतो.. तोही मला नाकारला गेला..?’

जेमतेम बारा वर्षांची होत होती सुमा तेव्हा. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या.. सकाळच्या वेळी ती फाटकाबाहेर रस्त्यावर, मैत्रिणी बरोबर खेळत होती. धनुताई रोजच्या प्रमाणे मागच्या अंगणात कपडे धुवायला गेली.

“सुमा.. सुमा..” थोड्या वेळाने धनुताईचा आवाज आला. ती आणी आई दारात उभं राहून तिला बोलवत होत्या.
“टाइमप्लीज..” म्हणत खेळणं सोडून ती आत गेली.

आईने तिला सरळ न्हाणी घरातच नेलं.. तिला तो पर्यंत काही जाणवलंच नव्हतं.. आईने मग तिला कपडा दिला.. घडी कशी घ्यायची ते सांगितलं..
“कशी बहयाड आहे ही..? मला वाटलं, एवढी वाचते बिचते.. तर हिला महित असेल सगळं..” ती एका कोपऱ्यात बसल्यावर आई म्हणाली.

तिने असं कधी काही वाचलं नव्हतं. घरात पुस्तकं होतीच कुठे वाचायला..? वाचायचं ते कधी भाऊंनी त्यांच्या सोईने वाचनालयातून आणलेलं एखादं पुस्तक.. नाही तर शेजार पाजारहुन मिळवलेल्या कादंबऱ्या.. त्यात असं काही नव्हत.. ती अजूनही धक्क्यात होती..

खूप पूर्वी आई आणी धनुताई काहीतरी कुबुजायच्या.. आई धनुताईला घेऊन खूपदा न्हाणीघरात जायची.. ते आठवलं.. पण त्याचा असा काही संबंध असेल .. हे माहीतच नव्हतं..

मनावर खूपच जाड थर बसला होता..

‘लहानपणी सगळे चिडवायचे हिला कोळशाच्या खाणीतून उचलून आणलंय म्हणून.. खरंच वाटायचं ते तेव्हा.. किती रडू यायचं मग आतल्या आत..
आता जरा मोठी झाल्यावर, खूपदा वाटतं, ती डीएनए की काय टेस्ट आहे नं, ती करून घ्यावी.. म्हणजे मी या घरातली रक्ताची मुलगी आहे की नाही ते तरी कळेल.. नाही म्हंटल्यावर, आनंदच होईल.. मी इथली कुणाचीच नसताना मला सांभाळलं, ह्या बद्दल कृतज्ञताच वाटेल उलट सगळ्याबद्दल.. मग असे मनावरचे थर बसणं बंद होईल..’

विचारांच्या नादात केव्हा झोप लागली, ते सुमाला कळलंच नाही.

सकाळी जाग आली तेव्हा, सूर्य चांगलाच वर आला होता. घरातली सगळी मंडळी आपापल्या कामाला लागली होती.. तिला खूपच कानकोंड्या सारखं झालं.

“अगं, एवढं काय..? तू दमली होतीस खूप.. म्हणून झोपू दिलं तुला..” तिला चहा देत प्रेमाने जयूताई म्हणाली.

कालच कॅम्प वरून आल्यामुळे, सुमाला आज कॉलेजला सुट्टी होती,.. भराभर आवरून, छोटी बॅग घेऊन ती तयार झाली. काकूंनी आग्रहाने तिला गरम पोळी भाजी खायला लावलीच.

“मी जाते काकू आता मावशीकडे..” त्यांना सांगून सुमा बस स्टॉप कडे वळली.

मावशीकडे तिला बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं..

“अगं, तू इकडे कशी काय..? अन् सामान कुठे आहे तुझं..?” आईने विचारलं.
“कालच आले मी.. जाण्याच्या दिवसापासून येण्याच्या दिवसापर्यंत दहा दिवस धरतात.. काल रात्री जोशीकाकूं कडे राहिले मी.. खूप उशीर झाला होता..” सुमाने सांगितलं.

“बरं केलं गं.. रात्री नाही आलीस ते.. बस स्टॉप पासून इथे येण्याचा रस्ता केवढा एकटा आहे..” मावशी म्हणाली.

त्या चौघीच होत्या आता घरात. काका ऑफिसला, अन् मुलं शाळेत गेली होती. मग दिवसभर जेवणं.. गप्पा.. ह्यात वेळ गेला... सुमाला आवडायचं मावशीकडे. ‘सगळ्या विषयांची माहिती असते मावशीला..’

संध्याकाळी मुलं.. काका घरी आले तसं परत कॅम्प बद्दल सांगून झालं. काका पण आवर्जून सगळं विचारत होते. संध्याकाळचा चहा झाला, तशी आई आणी धनुताई तयार झाल्या.

“निघतो गं.. आता आम्ही..” आई मावशीला म्हणाली.

“तुम्ही दोघी जा घरी. मी आज इथेच राहते..” सुमा आईला म्हणाली.

“अगं पण.. एवढ्या प्रवासाने दमली असशील.. आता तिघी जाऊ बरोबरच..” आई म्हणाली.

“नको. काल दमले होते मी.. मी उद्या कॉलेजला इथूनच जाईन. जवळ पडतं इथून कॉलेज. मग संध्याकाळीच घरी येईन.” सुमा म्हणाली.

आई आणी ताई जायला निघाल्या. आईच्या मनात पण एका थराची भर पडली होती..
*****************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान आहे कथा...
सुमाच्या भावना पोचल्या.

छान आहे कथा..
हा वर्णभेद रीलेट झाला..
एका दूरच्या बहिणीसोबत होत होते..नशीबाने वाचली. लिहेन तो किस्सा कधीतरी.. लिहिणे गरजेचे असे वाटते.

धन्यवाद रुपाली, सच्चा, ऋन्मेष, कुमार.

प्रत्येकाच्या मनात थरांचा गुंतवळ (जी. ए.)>> जी. ए. च्या काही कथा अतिशय अवघड आहेत कळायला... पण वाचल्यात.

एका दूरच्या बहिणीसोबत होत होते..नशीबाने वाचली. लिहेन तो किस्सा कधीतरी.. लिहिणे गरजेचे असे वाटते.>> वाचायला नक्कीच आवडेल.

छान लिहिलं आहे
कुणाच्या वागण्याने जे वाटतं आणि नेहमीच मनात दडून राहतं त्याचं काही होऊ शकत नाही.
मोकळेपणाने कधी काही गोष्टी बोलता आल्या असत्या तर किती बरं झालं असतं

परक्यांकडून आपलेपणा, पण आपल्यांकडून मात्र सातत्याने परकेपणा, यापरतं मोठं दुर्दैव ते काय? मनाला घट्टे पडावे अशी वेदना,
छान मांडली आहे.

कुणाच्या वागण्याने जे वाटतं आणि नेहमीच मनात दडून राहतं त्याचं काही होऊ शकत नाही.>>> खरं आहे. कथा (व्यथा) पोचली.

परक्यांकडून आपलेपणा, पण आपल्यांकडून मात्र सातत्याने परकेपणा, यापरतं मोठं दुर्दैव ते काय? मनाला घट्टे पडावे अशी वेदना,
छान मांडली आहे.>> अनुमोदन. एक घाव दोन तुकडेच करुन टाकणार्‍या आया पण असतत. पोर बिचारं समजुन घेत घेत म्हातारं होउन जातं. मग गप्प बसायचं अन काय.

धन्यवाद सर्वांचे.
ही कथा लिहून झाली, तेव्हा प्रतिक्रियांबद्दल मी जरा साशंकच होते. कारण त्यातलं नातं.
ज्यांच्याकडे ती कथा पाठवली, त्यांचाही प्रथम नकार आला. (काही दिवसांनी त्यांनीच परत फोन करून ही कथा प्रसिद्ध करण्याची परवानगी मागितली.)
काही काही नाती अशी असतात नं.. (म्हणजे पवित्र.. गोड..वैगेरे....) , की त्यांना धक्का लावलेला फारसा कुणाला आवडत नाही. आई मुलीचं नातं असंच एक.
हे नातं बिघडायला एक तर आई तरी सिंड्रेलाची आई असावी लागते, नाही तर मग मुलगी तरी आगाऊं.. उद्धट../ परजाती/धर्मात लग्न करून गेलेली असावी लागते.
मध्यमवर्गीय घरात साहस आई-मुलगी-बहीण-मावशी ही नाती गोडच गोड असतात.

मानवी स्वभावाच्या गुंत्यांचे छान वर्णन केलेले आहे. थर असतात आणि अशीच पुटे चढत जातात. >> खरंय सामो. आणी नंतर ती काढणं अवघड असतं.

मोकळेपणाने कधी काही गोष्टी बोलता आल्या असत्या तर किती बरं झालं असतं >> किल्ली, जेव्हा प्रतिसादाची खात्री नसते, तेव्हा बोलणे खुंटतेच.

परक्यांकडून आपलेपणा, पण आपल्यांकडून मात्र सातत्याने परकेपणा, यापरतं मोठं दुर्दैव ते काय?>> हो ना. आणि एकवेळ परक्यांनी आपलेपणा नाही दाखवला तरी चालेल, पण आपल्यांकडून आलेला परकेपणा खूप टोचत रहातो.

पोर बिचारं समजुन घेत घेत म्हातारं होउन जातं.>> खरंय अमा.

मला अचानक कुट्टी ची आठवण झाली. नक्की कोण लिहितं कुट्टीच्या गोष्टी हे आठवेना. मग तुमच्या लेखनात डोकावून आले. बरेच दिवसांत कुट्टीची काही खबरबात नाही. सुमा म्हणजे लहानपणीची कुट्टी तर नाही?

कथा पोचली.

<नाही तर मग मुलगी तरी आगाऊं.. उद्धट../ परजाती/धर्मात लग्न करून गेलेली असावी लागते.> हे कळलं नाही. उद्धट हा शब्दही सापेक्ष आहे. मुलांनी कायम आईवडिलांच्या म्हणण्याला मान तुकवावी का ? आणि परजाती धर्मात लग्न करणं चूक आहे का? केवळ परजातीत / परधर्मात लग्न केलं म्हणून मुलीचा राग करणारे पालक पाहिले आहेत. मुलीने त्यांच्याशी कसं वागायला हवं?

मी बापाकडून मुलग्यांबाबत असा भेदभाव होताना पाहिला आहे. परदेशी गेलेला / शेंडेफळ / शिक्षण नोकरीत अधिक हुशार/ आपल्यासोबत न राहणारा लाडका आणि जवळ राहून सगळं करणाराअ दोडका. अशी दोन उदाहरणं पाहिली आहेत.

परजाती धर्मात लग्न करणं चूक आहे का? केवळ परजातीत / परधर्मात लग्न केलं म्हणून मुलीचा राग करणारे पालक पाहिले आहेत.>> अजिबातच चूक नाही. मला तेच म्हणायचं आहे. पण काही आईबापानां अशा मुलींचा राग येतो.

परदेशी गेलेला / शेंडेफळ / शिक्षण नोकरीत अधिक हुशार/ आपल्यासोबत न राहणारा लाडका आणि जवळ राहून सगळं करणाराअ दोडका. अशी दोन उदाहरणं पाहिली आहेत.>> हो. अशी उदाहरणं तर अवतीभोंवती खूप आहेत.

मला मुख्यत: आई मुलीच्या (गोड नसलेल्या ) नात्यांबद्दल बोलायचं आहे.

छान कथा!
पालक आणि अपत्य यांच्यात हे असे थरा वर थर बरेचदा बघायला मिळतात, त्यातली व्यथा छान मांडली आहे.

वेळीच बोललं नाही की असे थर वाढत जातात. कथेत ती लहान तरी आहे. पण हे मोठ्यांच्यात झालेले पण पाहिलेले आहे. नाती जपणे हे एक अवघड काम आहे.

Pages

Back to top