कॉर्पोरेट पद्मिनी

Submitted by Abuva on 13 February, 2024 - 23:21
Padmini By Raja Ravi Varma -

उपसुंद आठवतोय?! त्याच्या प्राॅडक्टचा वार्षिक रिलीज होता.
हो, हा प्री-क्लाऊड काळ होता. तेंव्हा असायचे असे ठरवून केलेले रिलीजेस. आणि आमच्यासारख्या एंटरप्राइज प्राॅडक्टचे तर नक्कीच असायचे.
तसे अजून दोन महिने होते त्याला. पण सगळे कस्टमर नव्या व्हर्जनवर आणायचे तर व्यवस्थित प्लॅनिंग लागायचं. (बोअर मारतोय? साॅरी.)
तर त्यापूर्वीचा एका माइलस्टोन रिलीज या वीकेंडला होता. त्यांच्या एका स्टेटस मीटिंगला जाऊन बसलो होतो. नेहमीप्रमाणे डेव्हलपमेंट आणि टेस्टींग/क्यूए यांची खडाजंगी चालली होती. डेव्हलपर म्हणतो काम झालंय, तर क्यूए म्हणतो चालत नाही. बराच वेळ हा नन्नाचा पाढा ऐकल्यावर डेव्ह मॅनेजर खवळला.
"आम्ही कामं केली नाहीत असं म्हणताय. तुम्ही कुठे कामं केली आहेत? कुठाय या इश्यूच्या टेस्ट केसेस?"
हे म्हटल्यावर क्यूए मॅनेजर बावचळला. त्यानं समोरचा टेस्ट प्लॅन वर खाली केला. आयला, खरंच कुठे आहेत याच्या टेस्ट केसेस?
मॅनेजर झालं की असं होतं. स्वतःहून काही केलेलं नसतं. मग खोलात जाऊन प्रश्न विचारले की तंतरते.
त्याच्या चेहेऱ्यावरचे भाव पाहून पद्मिनी पुढे आली आणि शांतपणे म्हणाली,
"सर, हे जुनंच फंक्शन आहे. त्यामुळे नवीन टेस्ट केसेस नाहीत. आपण नवीन अल्गोरिदम इंम्प्लीमेंट करणार आहोत. त्यामुळे गेल्या रिलीजच्या टेस्ट केसेस आणि परफाॅर्मन्स केसेस आहेत. आम्ही चेक केलं आहे. बारापैकी दोन फंक्शनॅलिटीज चालत नाहीत आणि तीन परफाॅर्मन्स पॅरामीटर्स मीट होत नाहीएत. फंक्शनल प्राॅब्लेम्स छोटे आहेत. पण परर्फाॅर्मन्सची काळजी आहे."

तिचे शब्द, त्यांचा अर्थ, तो आश्वासक सूर, आणि देहबोली इतकी पॉझिटिव्ह होती की दोन्ही मॅनेजर्स वरमले. डेव्ह मॅनेजरचा ताव उतरला, आणि टेस्ट मॅनेजरनं सुटकेचा निश्वास सोडला. मीटिंगचा नूर बदलला. डेव्ह विरूद्ध टेस्ट असा पवित्रा जाऊन "आपली" डिलीव्हरी आहे याची पुन्हा सगळ्यांना जाणीव झाली.
एका "आपण" या शब्दानं केवढा बदल घडवला होता! तिथे पद्मिनी जर "तुम्ही करणार" असं म्हणाली असती तर अर्थ वेगळा झाला असता. आणि मीटिंगंच पर्यवसान तू-तू-मै-मै मध्ये झालं असतं.
ही माझी पद्मिनीशी कामासंदर्भात झालेली पहिली मुलाकात...

पद्मिनी? हे अर्थात आम्ही दिलेलं नामाभिधान आहे, खरं नाव नाही! आता विचारा, का? सांगतो.

तर वीसेक वर्षं माझी आई एका स्टीलवाल्या कडून भांडी, पातेली, पिंप वगैरे गृहोपयोगी वस्तू घ्यायची. असाच एकदा त्या दुकानात तिच्याबरोबर मी (अपघातानं) गेलो होतो. आता इतक्या वर्षांचा संबंध, त्यामुळे त्यानं सहजच माझी विचारपूस केली. मी आता आयटी कंपनीत साहेब आहे हे कळल्यावर त्याला किल्ली पडली. कारणही तसंच होतं.
तो म्हणाला "माझी मुलगी बी काॅम झाली आहे. तिला लावून घ्याल का?"
प्रश्न नेहेमीचाच, माझ्या सवयीचा होता. मग मी विचारलं, "सध्या काय करते?" तर दुकानात असते. मग मी म्हटलं, "चांगलं आहे की! कशाला उगाच नोकरीत अडकवता?"
उत्तर थोडं अनपेक्षित होतं. मामांनी एकदा मामींकडे बघितलं, आणि म्हणाले, "मला कॅन्सर झालाय. फार दिवस नाही राहिलेत. मुलीचं लग्न काही माझ्यासमोर होत नाही. मुलगा लहान आहे. त्याचं शिक्षण होईतोवर मामी दुकान चालवतील. पण उपचारांना झालेले खर्च मोठे आहेत. त्यामुळे..." विषयाला जरा वेगळंच वळण मिळालं. मी तडक विचारलं, "आहे का आत्ता ती?" मामांनी आवाज दिला.
एक सावळी, लहान चणीची, तरतरीत अशी मुलगी पटकन आली. तिच्या डोळ्यांत चमक होती. मी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची नीट, न बावरता व्यवस्थित उत्तरं तिनं दिली. अनेक वर्षं काऊंटरवर गिऱ्हाईकांना तोंड दिल्यानं आलेला धीटपणा, समोरच्याचे प्रश्न नीट ऐकून, समजून मग पूर्ण उत्तर देणे... मुलीचे गुण चटकन ध्यानात आले. लगेच एचआरचा नंबर तिला दिला. यथावकाश ती जाॅईनही झाली.
त्यावेळी तिची ही कथा आमच्या रिकामटेकड्या मॅनेजरांच्या ग्रुपमध्ये सांगताना ती मारवाडी असावी असं गृहीत धरून तिचं नाव पडलं पद्मिनी. (भावा, ही घटना तो पिच्चर यायच्या सुमारे पंधरा वर्षं आधीची आहे!)

त्यानंतर तिची झालेली हीच पहिली, ठळक भेट. लक्षात राहील अशी. इतकी मॅच्युरिटी या वयात फार कमी लोकांना असते. लंच टेबलवर दोन्ही मॅनेजरांशी बोललो आणि हा रिसोर्स चांगला आहे यावर आमचं एकमत झालं.

काही दिवस गेले. आता रिलीज तोंडावर आला होता. उपसुंद डेरेदाखल झाला होता. त्याच्या सवयीनुसार त्यानं डेव्ह मॅनेजरला टांगून सगळी सूत्रं हातात घेतली होती. त्यामुळे टेस्ट मॅनेजरचाही पत्ता कट झाला होता. मग या दानवाला तोंड द्यायची जबाबदारी माझ्यावर आली होती. तेही अपेक्षितच होते. बरं, हे उपसुंद महाराज स्वतःला महा(न)डेव्हलपर समजत. मग निम्मी डेव्ह जनता त्यांच्यालेखी बाद. त्यामुळे टेस्टींगची जनता म्हणजे तर काय, अगदीच तुच्छ, कःपदार्थ. खरं तर एक असंतोष असायचा फ्लोअरवर. जेव्हा सगळ्यांनी मिळून जोर लावायचा तेव्हा तेढच जास्त वाढलेली असायची. अशा वेळी माझं काम सगळ्यांना चुचकारून घेणे हे असे.

या वेळी माझ्या लक्षात आलं की बरेच डेव्हलपर पद्मिनीनं त्यांचं काम टेस्ट करावं याचा प्रयत्न करायचे. इतक्या वर्षांत मी हे पहिल्यांदा बघत होतो. धिस इज रिस्पेक्ट, प्युअर ॲन्ड सिंपल.
तिच्या कामाविषयीच्या धारणेमुळे हा रिलीज निश्चितच वेगळा, चांगला निघणार होता. फाॅर सम वन दॅट यंग, इट इज ए साइन ऑफ इम्पेंन्डिंग ग्रेटनेस.

आणखी काही दिवस उलटले. गेले चार दिवस उपसुंद थैमान घालत होता. टीमची झोप शब्दशः उडली होती. मी स्वतः रात्री बारा-एकला घरी जाऊन परत सकाळी लवकर येत होतो. पद्मिनी माझ्या घराजवळ रहात असल्यानं बरेचदा माझ्याबरोबर असायची. तिच्या वडीलांची तब्येत ढासाळत होती. घरची प्रेशर्स वाढत होती. निघण्यापूर्वी तिला सगळा स्वयंपाक करावा लागे. खरं तर वडीलांजवळ कुणी तरी रहाणं आवश्यक होतं. पण आई दुकानात, भावाची परीक्षा.. या सगळ्यात तिची कुतरओढ होत होती.

डी मायनस वन(D-1): म्हणजे रिलीज आधीचा दिवस. रेड लिस्टवर अजूनही बरेच आयटम होते. हे रिलीजमध्ये जाणं आवश्यक होतं. सकाळी निघण्यापूर्वीच मला पद्मिनीचा फोन आला. रात्रीच तिच्या वडीलांना आयसीयूमध्ये हलवले होते. ती हाॅस्पिटलमधूनच फोन करत होती.
"आज दुकान बंद ठेवतोय, सर. आई इथे आली की मी लगेच ऑफिसला येते."
"बघ कसं जमतंय. खरं तर तू तिथेच थांबायला हवं. पण..."
"हो सर, आहे लक्षात. रिलीजची जबाबदारी आहे... सर, या महिन्याचा पगार ॲडव्हान्स मिळेल का?"
"हो. ती काळजी करू नकोस. तुला कोणाबरोबर पाठवू का पैसे?"
"नको सर, मीच येते."
"ओके, नाही तर मला कळव."
या वयात तिचा धीर, तिची जबाबदारीची जाणीव लक्षणीय होती.

फायनल मीटिंग -
रेड लिस्टवरच्या आयटम्सची घासघीस चालली आहे. क्यूएवाले हटून बसले आहेत.
हळूहळू एक एक आयटम ॲम्बर लिस्टवर चाललाय. म्हणजे कमी महत्त्वाचा म्हणून जाहीर होतोय. त्याला पर्याय शोधले जाताहेत, डाॅक्यूमेंट केले जाताहेत.
रेड लिस्टवर आता एकच आयटम आहे पण सगळ्यात महत्त्वाचा आहे. उपसुंद फुगून बसलाय.

"हा आयटम क्यूएनं अडवलाय. का? हा मी सोडू शकत नाही. सगळ्या कस्टमर्सनी मागितलाय. देअर कॅन बी नो निगोशिएशन्स ऑन धिस वन", उपसुंदाचा स्फोट झाला.
या इश्यूची टेस्टर पद्मिनी होती. मी तिच्या दिशेने पाहिले. तिची खुर्ची रिकामी होती! टेस्टिंग मॅनेजर माझ्या कानात कुजबुजला, "तिला फोन आला आहे." मी चमकून त्याच्याकडे पाहिलं. त्यालाही लक्षात आलं. त्यानं टेस्ट लीडला खूण केली.
उपसुंद धगधगत होता "कोण आहे टेस्टर?"
त्याला माहीत होतं.
"कुठाय ती? आत्ता कशी नाही इथे? हा कसला बेजबाबदारपणा आहे?"
मग माझ्याकडे वळून म्हणाला, "इतका महत्त्वाचा इश्यू इतक्या ज्युनिअर टेस्टरला का दिलात तुम्ही?"
तो आणखी ओरडत राहिला असता. पण काॅन्फरन्स रूमचा दरवाजा उघडून पद्मिनी आत आली. समोर प्रोजेक्टर स्क्रीनवर तो एकच इश्यू आता दिसत होता. तिनं क्षणभरच माझ्याकडे पाहिलं. तिचे डोळे लाल दिसत होते. मी काही बोलणार इतक्यात ती म्हणाली, "साॅरी सर. ह्या इश्यूमधे आता एकच मेजर प्राॅब्लेम उरला आहे. इयर चेंजला ही फंक्शनॅलिटी चालत नाहीये. डिसेंबर लास्ट वीक आणि जानेवारी फर्स्ट वीक चुकीचे रिझल्ट्स येतात. फोरकास्टिंगसाठी पुरेसा डेटा मिळत नाही."
भडकलेल्या उपसुंदाला भान राहिले नाही. त्याचा आवाज टीपेला गेला. "डोन्ट बुलशिट मी. इयर एन्ड तीन महिने दूर आहे. व्हाय आर वी वरींग अबाउट इट नाऊ?"
पद्मिनीच्या डोळ्यांत पाणी होतं. पण आवाजावर कंट्रोल ठेवत ती म्हणाली, "इतक्या महत्त्वाच्या इश्यूची इतकी इंपाॅर्टंट टेस्ट केस फेल होत असताना आपण हा इश्यू रिलीज करू नये. कस्टमरकडे ॲक्सेप्टन्स टेस्ट फेल जातील. त्याचे परिणाम भोगावे लागतील."
उपसुंद क्षणभर हतबुद्ध झाला. एका फ्रेशर टेस्टरनं त्याला निरूत्तर केलं होतं.

मॅटर हाताबाहेर जाऊ नये म्हणीन मग मी पण आवाज चढवला. "उपसुंद साहेब, जर तुम्ही पर्सनली या फिक्सची जबाबदारी घेणार असाल तरच आम्ही हा इश्यू रिलीजमध्ये जाऊ देऊ."
उपसुंद अडचणीत सापडला होता खरा, पण त्याला हा काडीचा आधार मिळाला. उसनं अवसान आणून त्यानं ते मान्य केलं. मीटिंग इतर थातूरमातूर विषय चघळायला लागली.

मी पद्मिनीकडे पाहीलं. तिचा चेहरा रडवेला होता. मी टेस्ट मॅनेजरच्या हातात मीटिंग दिली आणि पद्मिनीला खूण करून बाहेर बोलावलं. बाहेर येताच तिचा बांध फुटला. तो फोन वडील गेल्याचा होता. अंदाज होताच. तिचं सांत्वन केलं, आणि सोबत देऊन घरी पाठवलं.

नवीन रिलीज ॲक्सेप्ट करवताना वांदे आले. वर्षाखेर आली, उलटली. सगळ्या कस्टमरकडे प्राॅब्लेम यायचा तो आलाच. एस्केलेशन्स झाली. राडा झाला.

पण तो पहायला पद्मिनी कंपनीत नव्हती. माझा, तिच्या घरच्यांच्या विरोध डावलून तिनं दुकानातच काम करणं श्रेयस्कर मानलं. तिच्या दृष्टीनं तीच वडीलांना वाहिलेली श्रद्धांजली होती.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

किती मस्त आहे पद्मिनी!! मला आवडेल हिला टीम मध्ये घ्यायला.जे काही करेल त्यात आयुष्यात यश मिळू दे तिला.

आवडली, शेवटी डोळे पाणावले.
असे समर्पित कर्मचारी फार कमी असतात.
एकच (कु)शंका , ती फक्त बीकॉम होती की तिचे काही आय टी बॅकग्राऊंड पण होते?

(तो म्हणाला "माझी मुलगी बी काॅम झाली आहे. तिला लावून घ्याल का?")

छानच कथा. ( समागम मुळे तसले काही आहे काय अपूर्व सुंदरी म्हणून असे वाटले होते) पण गोड आहे मुलगी. आय कॅन टोटली रिलेट. माझी मुलगी पण अशीच गोड व कामसू आहे. तिला तिच्या कामातले विवक्षित शिक्षण पण आहे. माझे आजारपण मध्ये तिचा फार सपोर्ट आहे. म्हणजे रादर शी इज द ओन्ली सपोर्ट. अम्हाला फॅमिली फारशी नाहीच समजा. त्यामुळे तिच्या वर पद्मिनी सारखे बर्डन पडते. तरी फार तिला मेंटल त्रास होउ नये व दग दग होउ नये ह्याची मी काळजी घेत असते. डॉ. व्हिजिट स्केन लॅब टेस्ट मी एकटी करते व तिला अपडेट देत राहते. पद्मिनीचा निर्णय आव डला.

आजच अमॅझॉन प्राय्म वर लव्ह स्टोरियां ही सिरीज रिलीज झाली आहे. माझी मुलगी त्याची क्रिएटिव्ह लीड आहे. जरूर बघा.

मस्त आहे कथा
सगळा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला..

छान लिहिलंय..
असे लोक टीममधे असणे म्हणजे आपलेच गतजन्माचे पुण्यकर्म समजायचे..

मस्तच लेख
असे लोक टीममधे असणे म्हणजे आपलेच गतजन्माचे पुण्यकर्म समजायचे..>>>>>>अगदी अगदी
अमा, खूप छान... शुभेच्छा

अरेरे! मुलीचं चांगलं करीअर घडता घडता राहिलं की. पद्मिनी नावाचा सिग्निफिकन्स लक्षात नाही आला पण. किंवा मिस केले असेल मी काहीतरी.

>>>>>आजच अमॅझॉन प्राय्म वर लव्ह स्टोरियां ही सिरीज रिलीज झाली आहे. माझी मुलगी त्याची क्रिएटिव्ह लीड आहे. जरूर बघा.
जरुर!! आणि अभिनंदन अमा.

खूप आवडली पद्मिनी.

आजच अमॅझॉन प्राय्म वर लव्ह स्टोरियां ही सिरीज रिलीज झाली आहे. माझी मुलगी त्याची क्रिएटिव्ह लीड आहे. जरूर बघा.
अभिनंदन अमा. तुमच्या लेकीला मनापासून शुभेच्छा.