हिंजवडी चावडी: कष्टमर फिड्स बॅक!!

Submitted by mi_anu on 7 February, 2024 - 03:37
Lifestyle,work,software

१- मांजर रायन
मांजर रायन भल्या पहाटे पळून घरात परत आलं आणि त्याने शूज,मोजे,मोबाईल ठेवायचा कंबरपट्टा,
हेअरबँड, कर्णयंत्र, रिस्टबँड, अंधारात लोकांना आणि गाडयाना दिसायला घातलेलं निऑन जॅकेट काढलं.(मांजराचा 3 किलोमीटर धावण्यासाठी केलेला नट्टापट्टा हा एखाद्या नववधूच्या लग्न दिवशीच्या मेकअप इतकाच असतो असं त्याच्या बायकोचं म्हणणं होतं.)
अंघोळीला गिझर चं बटन चालू करून त्याने लॅपटॉप उघडला. मेल बॉक्स मध्ये 'त्या' फोल्डर मध्ये 3 मेल्स चा अघोरी आणि भयावह संकेत नोटिफिकेशन मध्ये दिसत होता. धडधडत्या काळजाने त्याने 'आल इज वेल, आल इज वेल म्हणत ते फोल्डर उघडलं. कस्टमर फीडबॅक चा हा दिवस म्हणजे वरून धाडकन खाली नेणारी ऍडव्हेंचर पार्क राईड.फ्रिट्झ ने लिहिलं होतं:

"टीम ने काम आम्हाला पाहिजे होतं ते करून दिलं.टीम हुशार आहे.पण ते मिटिंग मध्ये जास्त बोलत नाहीत.आमच्या अपेक्षा अश्या आहेत की त्यांनी विषयातलं ज्ञान दाखवावं. भरपूर बोलावं.आम्हाला सांगावं आमचे प्रतिस्पर्धी सध्या काय करतायत आणि आम्ही त्यांचा बिझनेस ओढायला काय केलं पाहिजे.त्यांनी आम्हाला सांगितलं पाहिजे की अमक्या प्रतिस्पर्धी कंपनी ने या बाबत काय केलं.सध्या कस्टमर डिमांड काय आहे."

हे वाचून मांजर मनातल्या मनात 100 टाचण्या टोचल्या सारखं कळवळलं. आता सुहानी पर्यंत हा फीडबॅक पोहचवावा लागणार होता.लवंगी फटाक्यांची 2000 ची लड फुटताना शेवटी शेवटी कोणता आवाज कोणत्या फटाक्यांचा कळत नाही तसं झालं होतं टीम चं शेवटच्या 1 आठवड्यात.आणि इतकं काम करून आता हे असं ऐकायचं.

"कस्टमर म्हणाला की तुम्हाला कॉम्पीटिटर व्ह्यू नीट नाही.बाकी काम बीम ठीक आहे."
"म्हणजे काय? मी खाण खोदणारा अर्थ मूव्हर बनवणाऱ्या, विकणाऱ्या लोकांमध्ये उठत बसत नाही.हाताखालची मुलं अजून कॉलेजातून बाहेर पण पडली नाहीयेत.त्यांना '7झिप करून फाईल मेल करा' म्हटलं तरी फोन करून 'मॅम कॅन यु प्लिज वॉक मी थ्रू द डिटेल्स अँड स्टेप्स ऑफ द टास्क यु जस्ट असाईंड?' म्हणून 10 मिनिटं बोलतात.फ्रिट्झ रोज 150 ओळींची 2 मेल लिहितो.ती वाचावी लागतात.तो आठवड्यात 3 एक तासाच्या मिटिंग घेतो.या मिटिंग चा पूर्ण वेळ एकही शांत पॉज येऊ नये म्हणून रेडिओ जॉकी सारखी अखंड बडबड करणं कोणाला तरी शक्य आहे का?'
'फ्रिट्झ कस्टमर आहे.आपल्याला पैसे आणि बिझनेस देतो आहे.त्याला पाहिजे ते द्यावं लागेल.'
'मग त्याला म्हणावं बिझनेस ऍनालिस्ट चं बिलिंग पण दे पुढच्या वेळी.मग ही चमकदार बडबड पण मिळेल.'
'ही बडबड हे ज्ञान मिळवून त्याने दिलेल्या पैश्यात मेन कामाबरोबरच आपण करणं त्याला अपेक्षित आहे.तुझ्यासारखी सिनियर, तुला छान प्रोग्रामिंग येतं, छान प्लॅनिंग येतं.हे ज्ञान मिळवून मिटिंग मध्ये भरपूर बडबड केलीस तर अजून बिझनेस मिळेल.'

सुहानी नाकावर सुरकुत्या पाडून जागेवर गेली.आज काम काय, खाणीत ट्रक.उद्या काय डायपर, परवा काय, बूट बनवणारी कंपनी.या सर्वांचे सर्व फलाणे ढिकाणे प्रतिस्पर्धी आजच्या घडीला काय करतात याची माहिती मिळवणं कसं शक्य आहे?या वैतागाला व्हर्च्युअल नशा हे एकमेव उत्तर होतं.जागेवर बसून तिने '2023 फॅशन्स इन मेट गाला' गुगल केलं आणि कपड्याऐवजी तंबू, टोपी ऐवजी लाईट ची शेड, ओढणी ऐवजी शूलेस असं काहीबाही फॅशन केलेले सेलेब्रिटी फोटो पाहत बसली.
==============================================
सीन 2-मांजरी जिग्ना
मांजरी जिग्ना ने कस्टमर फीडबॅक मेल उघडलं.मिशाईल ने मुक्तकंठाने स्तुती केली होती.रोखून धरलेला श्वास तिने सोडला.मागच्या सहा महिन्यात मिशाईल ला अनेक कामं करून दिली होती.पण त्याचं समाधान होईना.या सहामाहीत देवाच्या कृपेने कस्टमर ला रात्री 12.45 वाजता खूप मोठी अडचण आली.आणि या अडचणीचं उत्तर म्हणजे एका एरर च्या वाक्यातलं एक वर ठिपके वालं जर्मन अक्षर काढून टाकणे इतकं सोपं होतं.ते रात्री 1 ला त्याला करून दिल्यावर तो एकदम खुश झाला.चला.यावेळी टीम ला अवार्ड देता येईल.गळ्यातल्या पेंडंट मधला अंगारा तिने चाचपला.आणि मनातल्या मनात ईशान्य दिशेला नमस्कार केला.

मिशाईल ने मेल मध्ये पुढे 'यावेळी टीम ने 3 महिन्यात काम केलं.पुढच्या वेळी टीम अजून अनुभवी झाल्याने पुढचं काम दीड महिन्यात करून द्या' असं लिहिलं होतं.जिग्ना च्या चेहऱ्यावरचं हसू थोडं कमी झालं.श्वास जरा उथळ यायला लागले.कितीही छान अनुभव असला तरी 3 महिन्याचं काम माणूस आणि पैसे वाढवल्याशिवाय दीड महिन्यात कसं होईल?आता मनाला न पटणाऱ्या बऱ्याच गोष्टी करायला लागणार होत्या.टीम ला शनिवार रविवार बोलावणं.तिने लॅपटॉप स्टँड खाली ठेवलेलं मोठं डार्क चॉकलेट खाऊन संपवून टाकलं.हे आठवडाभर थोडं थोडं खायचं होतं डायट प्लॅन नुसार.आता रोजच्या डायट ग्रुप वर खाल्लेल्या पदार्थाची यादी देताना कॅलरीची थोडी अफरातफर करावी लागणारच.
==============================================
सीन 3-मांजर विश्वास
मांजर विश्वास पायात बूट घालत होतं.तितक्यात फोनवर 'टिंग' वाजलं.पाहिलं तर वज्रेश चा संदेश होता. 'बोथ माय शितझु आर नॉट वेल, आय नीड 3 डेज लिव्ह' मांजर विश्वास ने मनात मोठा सुस्कारा सोडला.आज खरं तर वज्रेश ला चार समजुतीचे शब्द ऐकवायचे होते.ज्या कंपनीतल्या माणसाबरोबर तो काम करत होता त्याने खूप कटकट केली होती, हा सारख्या सुट्ट्या घेतो म्हणून.पण आता शितझु खराब आहेत म्हटल्यावर काय बोलणार?
तितक्यात परत 'टिंग' वाजलं.वज्रेश ने लिहिलं होतं 'माझे शितझु मला मुलांप्रमाणे आहेत.' इथे विश्वास परत गंडला.त्याला आतापर्यंत कोणत्या तरी मांडीच्या सांध्याला शितझु म्हणतात असं वाटलं होतं.आता त्याला शितझु म्हणजे कोरियन कासव असेल वाटलं.पण गुगल चे कष्ट घ्यायची आता घाईत अजिबात इच्छा नव्हती.त्याने हिंमत करून 'व्हॉट इज शितझु' विचारलं. वज्रेश ने मनातल्या मनात 'काय जुनाट खोड आहे' म्हणून त्याला 'शितझु इज माय डॉग ब्रीड' लिहिलं.('अरे मग स्पष्ट लिही की लेका कुत्री आजारी आहेत!!कुत्र्यांना कुत्रे म्हणण्यात कसली आलीय भीडभाड?' विश्वास मनातल्या मनात वैतागला.)

ऑफिसात जागेवर जाऊन विश्वास ने दुधी काचेच्या मिटिंग रूम च्या खालच्या 4 इंच साध्या काचेमध्ये नेव्ही ब्लु पॅन्ट दिसते का ते पाहिलं.
"नाहं जानामि केयूरे नाहं जानामि कुण्डले ।
नूपुरेत्वभिजानामि नित्यं पादाभिवन्दनात् ॥" ज्याप्रमाणे लक्ष्मण सीतेचे बाजूबंद, इयरिंग ओळखत नव्हता पण रोज पाद्यपूजन करत असल्याने सीतेचे नुपूर मात्र ओळखत होता.त्याप्रमाणे विश्वास त्याच्या सरांची नुसती नेव्ही ब्लु पॅन्ट बघून केबिन मध्ये कितीही लोक असले तरी सर ओळखायचा.

"सर, वज्रेश 3 दिवस येणार नाहीये.त्याचे शितझु बरे नाहीयेत."
"हे काय अतीच चालू आहे.आता आमचे नाही का शितझु दुखत, जिम मध्ये रोज स्क्वॅट मारल्यावर?पण आम्ही 3 दिवस सुट्टी नाही घेत.रोज ऑफिस ला येतो."
विश्वास हसू दाबत म्हणाला, "सर, शितझु म्हणजे कुत्र्याची ब्रीड."
"ओह, आता शितझु बितझु पण ब्रीड असतात का?आमच्या काळी डॉबरमॅन, जर्मन शेफर्ड वगैरे नावं असायची.ते जाऊदे.उद्या वज्रेश ला बोलावून सांग की इतक्या सुट्ट्या चालणार नाहीत."

हां, तर मूळ विषय वज्रेश.हा प्राणी नोकरी ला लागल्यापासून सुट्ट्याच घेत होता.आधी बहिणीचा साखरपुडा, मग बहिणीचं लग्न, मग बहिणीला सामान लावून द्यायला मदत, मग महापूर, मग महापुरात बंद पडलेले इंटरनेट, मग स्वतःला व्हायरल ताप,मग तापामुळे आलेला अशक्तपणा, मग बहिणीच्या सासऱ्यांचे जावई आजारी म्हणून धावपळीला तरुण कोणी नाही म्हणून,मग प्रवास असं करत करत पठ्ठ्याने वर्षभराच्या लिव्ह 9 महिन्यात संपवल्या. आता पुढे लिव्ह घ्यायची असेल तर एकच उपाय: वज्रेश ने स्वतःचे लग्न जमवणे आणि स्पेशल लिव्ह कोटा वापरणे.त्याच्या डोक्यात ते येत नाही तोवर त्याच्याकडून जमेल तशी कामं करून घ्यायला लागणार होती.
==============================================
सीन 4-मांजर अलिना
मांजर अलिना चेहरा धुवून,चेहऱ्याला सिरम लावून, भुवयांवर एरंडेल तेलाचा हात फिरवून,ओठाला आक्रोड आणि साखर घातलेलं स्क्रब लावून घासून गुळगुळीत करून त्यावर गाईचं तूप आणि मोरोक्कन तेल घातलेली लिपस्टिक लावून जागेवर येऊन बसली.खरं तर घरीच आंघोळ करून स्वच्छ केलेला चेहरा बंद काचेच्या गाडीतून ऑफिस ला पोहचल्यावर परत धुवायची काहीच गरज नव्हती, पण चेहरा ताजाताजा धुतल्याचा मानसिक परिणाम आणि त्यामुळे आलेलं तेज वेगळंच.मेल उघडलं तर सिल्वा ने फीडबॅकरुपी टीका टिप्पणी पाठवली होती.
"धनराज चं इंग्लिश व्याकरण चांगलं नाही.तो काय बोलतो तेच कळत नाही.खूपदा विचारावं लागतं.परवा 'आय हॅव डिड डॅट टूमॉरो' म्हणाला.आम्हाला चांगलं इंग्लिश संभाषण करू शकणारा माणूस पाहिजे"
अलिना ने नुकतेच क्लिप लावून जागेवर बसवलेले केस परत उपटले.धनराज इंग्लिश चांगलं बोलत नाही, पण त्याच्याइतका चांगला फास्ट सॉर्ट अल्गोरिदम कोणीच लिहीत नाही.आता धनराज ला बदलायचा तर खालील पर्यायी माणसं होती:
1. शुब्रोतो: उत्तम इंग्लिश, उत्तम संवादफेक. पण प्रोग्रामिंग मध्ये ठोकळा.
2. रिमा: इंग्लिश बरंच ठीक, प्रोग्रामिंग चांगलं पण मॅटरनिटी लिव्ह वर कोणत्याही दिवशी जाईल
3. बसवराज: इंग्लिश उत्तम.प्रोग्रामिंग ठीक ठाक पण याला लीडरशिप मध्ये जायचं असल्याने स्वतः प्रोग्रामिंग करणार नाही.कोणी प्रोग्रामिंग केलं तर त्याला सूचना देईल.
4. विनिता: प्रोग्रामिंग आणि इंग्लिश दोन्हीमध्ये बाद.
5. सॅम: प्रोग्रामिंग उत्तम, इंग्लिश संभाषण त्याहून उत्तम पण सध्या दुसऱ्या कंपनीत आहे.
धनराज शी बोलावं लागणारच होतं.

"अरे धनराज, काये हे?इतक्या इंग्लिश चुका कश्या करतोस?"
"पण यामागे एकदा ट्रेनिंग घेताना तुम्हीच म्हणालात ना, की टेक्नॉलॉजी ला भाषा नसते?"(धनराज ने तत्परतेने मांजर अलिना चे दात घश्यात घातले.)
"ठीक आहे.अगदी भाषा पंडित बनून टाइम्स मधलं कोडं पूर्ण सोडवा म्हणत नाहीये मी.पण समोरच्याला मुद्दा कळेल इतकी तरी चांगली स्पष्ट भाषा बोलायला नको का?आणि हे फीडबॅक मध्ये येईपर्यंत तुला कळलं नाही?"
"मला काय माहित? सिल्वा तरी खुश वाटायचा.सारखा 'वॉव' 'वॉव' म्हणत असायचा."
"अरे बाबा रे, अमेरिकन माणसं वॉव म्हणतात ती खुश म्हणून नाही.त्यांना वॉव हे 'हे काही निराळंच.हे अनपेक्षित आहे.यापुढे काय बोलणार' अश्या हेल्पलेस अर्थाने म्हणायचं असतं."
"त्याला माझं फाडफाड इंग्लिश बोलणं पाहिजे का माझं काम?"
"सध्या तरी बोलणं पाहिजेय.एक काम कर, कॉल वर बोलत असताना खाली चॅट जीपीटी उघडं ठेव.म्हणजे तुला चांगलं वाक्य सुचवलं जाईल ते वाचून बोलता येईल."
इथे मांजर अलिनाने मनात खुनशी हास्य केलं.पुढच्याच फीडबॅक ला सिल्वा 'धनराज ओके आहे.आणि आम्ही जास्तीत जास्त संभाषण मेल्स वर करतो आहे' म्हणणार चॅट जीपीटी ने सुचवलेलं इंग्लिश ऐकून ऐकून.सिल्वा वर कुत्रा सोडावा तसा चॅट जीपीटी सोडून देण्यात आला होता.आता पुढचं पुढे बघू.
==============================================
सीन 5-मांजर कबीर
मांजर कबीर ने लॅपटॉप चालू केला.त्याला 10 स्तुतीची मेल्स आली होती.'कबीर मुळे सगळं व्यवस्थित झालं.तो नसता तर खूप गोंधळ झाला असता.' यावेळी कबीर ला एखादं वार्षिक अवार्ड निश्चित होतं.

कोणे एके काळी कबीर जीव तोडून चांगलं काम करायचा.पण त्याला मिळणारे फीडबॅक 'मीट्स एकस्पेकटेशन' असे फिके फिके होते.मग एकदा सिस्टम इंजिनिअरिंग च्या भाषणात त्याने "best way to test the system robustness is to introduce disturbance' हे वाक्य ऐकलं, आणि तो बदलला.आपल्याला माहीत असलेल्या महत्वाच्या गोष्टी टीम ला न सांगता, त्यांच्या थोड्या चुका,आरडाओरडा होऊ देऊन मग पुढच्या मिटिंगमध्ये स्वतः जातीने हजर राहून सर्व चुका सुधारणं चालू केलं.आधी करायचा तेच काम.पण आधीचा कबीर सर्व अडचणी ओळखून पटापट गुपचूप आधीच सुधारून ठेवायचा.आता तो स्वतःचं महत्व स्वतः ओळखायला आणि दुसऱ्याना पटवून द्यायला शिकला होता!!!

समाप्त

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी! ह ह पु वा. Lol
सारखा वॉव म्हणणारा आता भयंकर चिडुन जाब विचारणाही असू शकतो. (कांतारा)

रच्याकने कष्टमर हा समास आहे. कष्ट करून मरावे ज्यासाठी असा तो.

150 ओळींची 2 मेल, मनातल्या मनात ईशान्य दिशेला नमस्कार, नाहं जानामि केयूरे नाहं जानामि कुण्डले, गाईचं तूप आणि मोरोक्कन तेल घातलेली लिपस्टिक लावून
.....टोटल फुटले Biggrin Biggrin

Lol
कहर लिहिता
तुमची मांजरं आवडतात

त्यांना '7झिप करून फाईल मेल करा' म्हटलं तरी फोन करून 'मॅम कॅन यु प्लिज वॉक मी थ्रू द डिटेल्स अँड स्टेप्स ऑफ द टास्क यु जस्ट असाईंड?' म्हणून 10 मिनिटं बोलतात

भयंकर होतं हे. जाम हसलो कल्पना करून...फर्ड ईग्लीश असलं की शुल्लक विचारलेली गोष्ट पण वजनदार वाटते. पण खरंच इतक्या विनयाने विचारतात का तुमचे ईंटर्न....

सॅम: प्रोग्रामिंग उत्तम, इंग्लिश संभाषण त्याहून उत्तम पण सध्या दुसऱ्या कंपनीत आहे.>>> बराच वेळ दाबून धरलेलं हसू इथे ख्याक करून बाहेर आलं!! Biggrin

आता सगळे भयंकर नजरेने माझ्याकडे बघतायत! Uhoh
लेख भयंकर आवडला हे यातच आलं!

भारी आहे!
"नाहं जानामि केयूरे >> Rofl

अनु, मी आयटीमध्ये कधी काम न केल्यानं एका दुसऱ्या ET चा फील येतो मला पण माणसं साधारण सारखीच असतात,हे कळलं, धमाल आली वाचताना!

छान
कधी सर्व्हिसेस/ कस्टमर साठी काम केलं नसल्याने रिलेट नाही झालं, पण एकूण काही प्रॉब्लेम आला की धाडकन सोल्युशन देऊन पुढचं पुढे हे सगळी कडे सारखच. पंचेस मस्त जमलेत. Proud

भारी आहे. मस्त जमलंय
आम्ही आपले जुन्या कबीर गत आधीच प्रामाणिकपणे सोल्युशन सांगून, हातचे न राखता ज्ञानदान करून आणि मग अप्रेझलला हात चोळत बसणाऱ्या कॅटेगरीत Lol
आता कुठे जरा अक्कल यायला लागली आहे.

असल्याने सीतेचे नुपूर मात्र ओळखत होता.त्याप्रमाणे विश्वास त्याच्या सरांची नुसती नेव्ही ब्लु पॅन्ट बघून >> कहर लिहितेस यार Lol

अफाट लिहिलं आहे. अगदी धमाल
आयटित नसलो तरी बऱ्याच गोष्टी रीलेट झाल्या.
सरांची नुसती नेव्ही ब्लु पॅन्ट बघून केबिन मध्ये कितीही लोक असले तरी सर ओळखायचा.>>>>>>अगदी अगदी...

मस्त लिहले आहे. ऑफीस मधली काही लोक ह्या ५ सीन मध्ये फिट बसतिल. मी स्वतः ईग्लिश न येणार्या कॅट्गिरीत आहे.
मुद्दाम ऑफीस मध्ये वाचले नाही नाहीतर सगळे माझ्या कडेच बघत राहिले असते. Happy

मला हा शितझु प्रकार गुगलचं करायला लागला. भुभू बघून मग हा शितझु (sssss) असं झालं. Lol माबो मुळे ज्ञानात भर पडते ती अशी Wink

Pages