वर्षा कथा

Submitted by सतीशगजाननकुलकर्णी on 20 April, 2023 - 01:54

वर्षा

समोरच्या बंगल्यातील लाईट्स बंद झाले आणि संकेतने दीर्घ सुस्कारा सोडला. तशी रात्र काही फार झालेली नव्हती. नुकताच पडून गेलेला पाउस आणि गार वारे यामुळे सगळीकडे सामसूम जाणवत होती. कुठूनतरी येणारे टीव्हीचे आवाज ,अंधारात विरत जाणारे दबक्या आवाजातील शब्द आणि कुठेतरी भुंकत असणारी कुत्री इतकीच काय ती जाग. त्या एकाकी बंगल्याला आता अंधाराने घेरले होते. आणि त्या अंधारात दिसत होता तो फक्त समोरच्या भिंतीवर मिणमिणारा दिवा,त्याभोवती फिरणारा रातकिडा आणि रंग उडालेले बंगल्याचे नाव “वर्षा”
संकेत आपल्या बेडरूम मध्ये आला. साक्षी शांतपणे झोपलेली होती. तिची झोप चाळवायला नको म्हणून मुद्दामच त्याने बेडरूम मधील लाईट्स लावले नाहीत. खर तर दिवस भराच्या दगदगीने तोही थकून गेला होता. पण त्याला झोपायची इच्छा होत नव्हती. अलीकडे असे हे रोज व्हायचे. दिवसभर कॉलेज मध्ये लेक्चर्स देऊन घरी यायचे आणि बोलून बोलून घसा दुखतोय हे कारण सांगून साक्षीशी जेवढ्यास तेवढे बोलायचे. तसा संकेत काही फार बोलका होता असे नाही पण एरवी निदान उत्साहाने तो साक्षीचे बोलणे ऐकत राहायचा, घरी आल्यवर काहीतरी वाचत बसायचा, दुसऱ्या दिवशीच्या लेक्चर्सची तयारी करत बसायचा. पण अलीकडे मात्र त्याच्यातील उत्साह संपला होता. एका उदासीनतेने त्याला घेरले होते.
अवघ्या चार महिन्यापूर्वी संकेतचे लग्न झाले आणि साक्षी त्याच्या आयुष्यात आली. साक्षी आयुष्यात आली का आणली ? संकेतच्या मनात विचार आला आणि तो स्वत:शीच हसला. खर तर आणली हाच शब्द योग्य आहे. एक दिवस कॉलेज मधून आल्यावर आईचा फोन आला. “ आज संध्याकाळी तू एका मुलीला बघायला येतोयस” बाबांच्या माघारी आईन वाढवल म्हणून दोन्ही भावांना कोणत्याहि गोष्टीला आईला नाही म्हणता यायचे नाही. त्या दिवशी साक्षीला बघायला संकेत गेला आणि “ नाही” म्हणायला त्याला जागाच उरली नाही. संकेतने तिला लगेच पसंत केल. साक्षीलाहि संकेत आवडला होता. कॉलेज मधील चांगल्या पगाराची नोकरी, दोन भावांची गावातच दोन घरे आणि सुसंकृत कुटुंब. तिला तरी अजुनी काय पाहिजे होत?
साक्षी आणि संकेत एकमेकाला पूरक होते आणि आनंदाने संसार करत होते. पण संकेतच मधेच गप्प होऊन कोणतातरी विचार करत राहण साक्षीला खटकायचं आणि साक्षीचा बोलघेवडा स्वभाव, उगीचच दुसऱ्या लोकांच्यात मिसळण संकेतला आवडायचं नाही.
आज संध्याकाळचा प्रसंग त्याला आठवला. कॉलेज मधून तो घरी आला होता. साक्षी घरी नव्हती. गेली असेल कुठेतरी, काहीतरी आणायला म्हणून तो तिची वाट बघत बसला. स्वत: चहा करून घेण्याचा त्याला उत्साह नव्हता आणि लग्न झाल्यानंतर त्याची सवय सुद्धा मोडली होती. इतक्यात साक्षी आली.
“ कुठ गेली होतीस? दमून आलो आहे. जरा चहा टाक लगेच”
“तुझ्यासाठी टाकते. माझा दोनदा झाला एवढ्यात”
“ का ग? कुठे गेली होतीस?
“ अरे शेजारी जरा चार लोकांना भेटून आले”
“ शेजारी? का ? कशासाठी?”
“ कांही नाही रे. नवीन ओळखी व्हायला पाहिजेत. आपण नवीन आलोय इथे राहायला”
“ उगीचच भेटायला? कुणी बोलावलं नाही काही नाही आणि विनाकारण कुठही काय जातेस? आणि नवीन काय म्हणतेस? मी दोन वर्षे इथे एकटा राहतोय माहित आहे ना तुला ?” संकेत वैतागला.
“ हो माहित आहे सगळ. तू दोन वर्षे एकटा होतास.. दादा कडे जेवायचास आणि मग पुन्हा येथे येऊन लेकचरची तयारी करायचास. कितीदा सांगतोस तेच ते. तू त्यावेळी एकटा होतास. आता आपण दोघे राहतो. आपल्या ओळखी व्हायला पाहिजेत, घरी जाणे येणे असायला पाहिजे. काही अडलं नडल एकमेकांनी मदत करायला पाहिजे. संसार म्हणून काही आहे का नाही?”
“ जाऊ दे. मला पटत नाही तुझ. कुठ जाऊन आलीस ते सांग” वैतागलेला संकेत शांत होत म्हणाला.
“ समोरच्या देशपांडे काकू, त्या देशमुख काकू आणि ती सुरेखा माने. छान आहेत सगळी.मी त्यांना बोलावलय आपल्या घरी. आणि त्यांनीहि आपल्याला.”
“ मी नाही येणार कुठ. तू जा.”
“ माणूसघाणा आहेस. लोकांच्यात मिसळायला आवडत नाही तुला. असा कसा रे तू?
“ नाहीच आवडत मला कुठ जायला. आपण बर आपल काम बर. बिनकामाची बडबड कशाला करत बसायचं?”
“ अरे हो, बर आठवल. चिटणीस काकूंच्या कडे हि जाऊन आले”
“ कोण चिटणीस काकू?”
“ ते रे हेमंत काका आणि सुमित्रा काकु समोरचा वर्षा बंगला” साक्षीने सहज सांगितले आणि हेमंतला चहा पिताना ठसका लागला.
“ अरे हळू. किती गडबड करतोस? काय झाल इतक?”

अचानक बेडरूम मधले लाईट्स लागले आणि संकेत दचकला. साक्षी त्याच्या पाठीमागे उभी होती.
“ संकेत, तू अजुनी जागा आहेस? कसला विचार करतोयस?
“ काही नाही ग.”
“ का? कांही झालय का? अलीकडे हे मी बर्याचदा बघते. झोपत नाहीस. अबोल असतोस. का?”
“ काही नाही ग. झोप तू”
“ तू झोप नाही. आपण झोपू या. चल” साक्षीने त्याला हाताला धरून उठवले. दिवे मालवले गेले. पण संकेत बराच वेळ जागा होता.

संकेतला झोप लागत नव्हती. तो अस्वस्थ होता. “ साक्षी, मी जरा जाऊन येतो.” संकेत म्हणाला. साक्षीने विचारले सुद्धा “ अरे अचानक काय झाले?कुठे निघालास?” पण त्याचे मन थाऱ्यावर नव्हते. समोरचे दृश बघून तो अस्वस्थ झाला होता. पांढऱ्या शुभ्र वस्त्रात गुंडाळून ठेवलेले प्रेत लोकांनी खांद्यावर घेतले होते. लोकांची तुरळक गर्दी.. काळीज पिळवटणारा आक्रोश.... संकेत भांबावून गेला... आणि त्या तुरळक गर्दीत सामील झाला. “राम नाम सत्य है” चा गंभीर नाद... पावसाची वाढती रिपरिप ... अचानक सुटलेला सोसाट्याचा वारा .. प्रेतयात्रा चालतच होती .. चालतच होती ...अचानक आकाशात विजा कडाडू लागल्या.... दूरवरून कुठून तरी रेल्वेचा धक धक करत अंधार चिरत जाणारा आवाज आणि शांतता भंग करत जाणारी शिटी.... सोसाट्याच्या वाऱ्याने खिडक्या एकमेकावर आदळल्या आणि त्या आवाजाने त्या भयाण स्वप्नातून संकेत जागा झाला. ......

“ आज घरी येताना मला सुमित्रा काकू भेटल्या. घरी घेऊन गेल्या मला”
“ मी तुला सांगितल होत साक्षी बिनकामाच कुणाकडे जायला मला आवडत नाही. काय नडल होत त्यांच्याकडे जायचं?” संकेत डाफरला.
“ ए हलो, मी घेऊन गेल्या होते म्हणाले. मी नव्हते गेले त्यांच्याकडे. आणि मी कुठे गेले कि इतक का चिडतोस?”

“ चिडतोय कुठ ? संकेत ओशाळून म्हणाला.
काही क्षण तशीच शांतता. संकेत स्वत:शीच विचार करत होता. ती शांतात त्याला अस्वस्थ करत होती. त्याला हे कुतूहल होत कि सुमित्रा काकू तिला स्वत: का घेऊन गेल्या होत्या.
“का घेऊन गेल्या होत्या सुमित्रा काकू?” संकेतने विचारले.
“ अरे, काल फार काही बोलणे झाले नाही म्हणून त्यांना अपराधी वाटत होत. म्हणून आज चहा घेऊन जा म्हणाल्या”
“ त्यात अपराधी काय वाटायचं? आपण त्यांच्यापेक्षा लहान आहोत.
“ नक्कीच. पण असतो एकेकाचा स्वभाव.” पुन्हा तीच शांतात आणि संकेतचे अस्वस्थ होणे.
“ पण काय म्हणाल्या त्या?”
“ जाऊ दे रे. त्याच्याकडून आल्यापासून मी तर थोडी अपसेटच आहे. कुणाच्या मागे अस काही लागू नये बघ. एकवेळ कुणी कुणाला भेटल नाही तरी चालेल. पण सगळे आपापल्या घरी सुखी असावेत”
“ का ग काकू बर्या आहेत ना?
“ संकेत कस सांगू तुला, त्यांच्या मुलीन म्हणे सहा महिन्यापूर्वी रेल्वेखाली आत्महत्या केली” संकेत काहीच बोलला नाही. चेहरा निर्विकार.
“ मी तुला काही तरी सांगते आहे संकेत आणि तुला यावर काहीच बोलावस वाटत नाही”
“ काय बोलायचं? मला माहित आहेत ते.
“ तुला हे माहित होत ?
“ हो इथ राहणाऱ्या सगळ्या लोकांना माहित आहे. तू इथ नवीन आली आहेस म्हणून तुला काही माहित नाही”
“ नवीन कसली आलीय. लग्न होऊन चार महिने झाले आपल्यला. एकदाहि आपल्या शेजारी एक घटना अशी घडली आहे तुला सांगता आल नाही”
“ कुणीतरी आत्महत्या केली अस आवर्जून सांगण्यासारख काय आहे त्यात ?
“ किती तुसडा आहेस तू संकेत. काल जेव्हा मी म्हणाले सुमित्रा काकूंच्या कडे जाऊन आले. मला त्या उदास वाटल्या तेव्हा तुला हे बोलता आल असत”
“ मुद्दामच नाही सांगितल. तू हळवी आहेस हे माहित आहे मला” साक्षी काहीच बोलली नाही. पण संकेतने शेजारी एक घटना घडली आहे आणि आपल्याला ती सांगितली नाही हि गोष्ट मात्र तिला पटली नाही. लग्न होऊन घरी आल्यवर सगळ तिला कळल पाहिजे हि तिची साधी अपेक्षा होती. पण संकेत आपल्याच विचारात होता.साक्षी तिच्या खोलीत गेली आणि संकेत तिथेच बेडवर पडून राहिला. हाताची घडी डोळ्यावर ठेऊन.

“ डिंग डॉंग”
संकेतने दार उघडल, दारात हेमंत काका आणि त्यांच्याबरोबर एक मुलगी आली होती.
“ हेमंत काका, तुम्ही ? या ना आत. आज इकड कशी वाट चुकलात?”
“ मुद्दामच आलो तुझ्याकडे. फार वेळ घेणार नाही तुझा. हि माझी मुलगी मानसी.”
“ हो. माहित आहे मला. परवा बारावी झाली ना ? पेढा खाल्ला मी”
“ होय नुकतीच बारावी झाली आणि आता तुझ्याच सिनिअर कॉलेज मध्ये फर्स्ट इअर ला प्रवेश घेतलाय. तू जरा तिच्याकडे लक्ष दे”
“ पण काका मी “
“ हो माहित आहे मला. तू आर्ट्सचा प्रोफेसर आहे. ती कॉमर्स;ला आहे. जाता येता जितक बघता येईल. तुला काही करता येईल तितक करत जा. अलीकडे वातावरण चांगल नाही म्हणून काळजी वाटते इतकच”
“ नक्की काका. आमच कॉलेज तस चांगल आहे. काळजी करू नका” हेमंत काका आणि संकेत एकमेकाशी बोलत होते आणि मानसी गालातल्या गालात हसत होती.
“ का ग मानसी, हसतीस का ?
“ का नाही असच.
“ तरी पण .
“ बाबांना मी अजुनी लहान वाटते. इतक कुणी काळजी करत का?”
“ मुली लहानच असतात आपल्या आईबापाना. आणि संकेत समोरच राहतोय. विश्वासाचा माणूस आहे. इतकी वर्षे त्याला बघतोय. जरा सांगितल तर बिघडल कुठ ? कारे संकेत ?
“ होय काका” खर म्हणजे संकेतला हे माहित होत मुल कॉलेज मध्ये अभ्यासापेक्षा कॉलेज लाईफ एन्जोय करण्यासाठी येतात. पण हेमंत काका ना हे कोण समजून सांगणार. संकेतच निरोप घेऊन काका निघून गेले, एरवी संकेतने मानसीला बघितले नव्हते अशातला भाग नाही. पण ते जाता येता. काकांच्या बरोबर ती आली आणि संकेतची आणि मानसीची खऱ्या अर्थाने ओळख झाली.
मानसी स्वभावाने बोलकी होती. मनमोकळे पणान कुणाशीही बोलायचं हा तिचा स्वभाव होता. संकेत कॉलेज मध्ये प्रोफेसर आहे म्हणून त्याच्याशी दबकून वागायचे असे औपचारिक बोलणे तिला जमले नाही. तिच्या वागण्या बोलण्यात सहजता होती. आणि संकेतही त्या सहजतेने तिच्याकडे बघायचा.
संकेत एकटा राहत असूनही मानसी त्याच्याकडे जायची. त्याची साहित्यावरची पुस्तके हातात घ्यायची आणि एका निरागस कुतूहलतेने विचारायची “ हे काय लिहिलय या पुस्तकात ?” आणि संतोषचा आवडीचा विषय असल्याने तिला तो सार काही सविस्तर सांगत बसायचा.
एकदा संकेतने तिला विचारले सुद्धा “ जर पुस्तकात इतका रस आहे तर तू स्वत: का वाचन करत नाहीस ?”
“ शी: किती बोअर काम आहे, इतकी जाडजूड पुस्तके वाचण्यापेक्षा तुमच ऐकत बसलेल चांगल” तिच्या या उत्तरावर संकेत मनापासून हसायचा.

“ मानसी, आज कॉलेज मध्ये कुठल्या मुलाशी बोलत होतीस ?” संकेतने दरडावून मानसीला विचारले.
“ केव्हा? मी बऱ्याचदा बोलते मुलांशी” मानसीने सहज सांगितले.
“ कॉलेज संपल्यावर.”
“ अय्या, तो होय. तो नरेन्द्र होता. किती स्मार्ट आहे ना. चांगला मित्र आहे माझा तो”
“ मित्र ? तुला माहित आहे मानसी. मागच्या वर्षी तो नापास झाला होता म्हणून तो तुझ्या वर्गात आहे”
“ त्याचा मैत्रीशी काय संबध ? मुल काय नापास होत नाहीत ? सगळीच काय तुमच्यासारखी हुशार असतात का सर?” मानसी हसत हसत बोलली.
“ मानसी, गोष्टी हसण्यावारी नेऊ नको. तो नापास झाला इतकच नाही. कॉलेज मधला तो व्हागेबोंड मुलगा आहे. त्याची वागणूक विशेषत: मुलींच्या बाबतीत चांगली नाही”
“ पण मला तो चांगला वाटला. वागण बोलण एकदम सभ्य माणसाच वाटलं” मानसी पुन्हा हसली.
“ मानसी उगीच हसू नकोस. त्याच्या या वाईट वागणुकीमुळे तो केव्हाही रस्टिकेट होऊ शकतो”
“ सर इतका तो असा असेल अस वाटत नाही. त्याच आणि माझ ट्युनीग ...
“ मानसी” संकेत मधेच तिला तोडत म्हणाला “ उद्यापासून तू त्याच्याशी बोलणार नाहीस. नाहीतर मी हेमंत काका ना सांगेन” संकेतने तिला दरडावून सांगितल. हेमंत काकांचे नाव घेतल्यावर मात्र ती घाबरली आणि काही न बोलता तशीच निघून गेली.

बेडवर पडल्या पडल्या संकेतला हे सगळ आठवल. अस्वस्थ होऊन तो उठला. पुन्हा टेरेस वर गेला. आजूबाजूचे वातावरण त्याला अस्वस्थ करू लागले. तोच चोहोबाजूला अंधार .. वर्षा बंगला रंग उडालेल नाव .. मिणमिणता दिवा तसाच .. आणि तोच भिरभिरणारा रातकिडा.

..... त्या दिवशी असाच अचानक पाउस पडला होता. विजांचा कडकडाट तोच. सोसाट्याचा वाराही तोच. रविवारचा दिवस होता. संध्याकाळी सातची वेळ होती. सगळी कडून अंधारून आले होते. कुठे बाहेर जाण्याची सोय नव्हती. म्हणून संकेत वाचत बसला होता. आणि अचानक लाईट्स गेले. वाचनात खंड पडला म्हणून संकेत थोडा नाराज झाला. खर तर अलीकडे लाईट्स कधी फारशा जात नसत. स्वत:शीच विचार करत तो उठला आणि अंधारात सोबत म्हणून त्याने मेणबत्ती लावली. बाहेरच्या विजांचा कडकडाट चालूच होता.
अचानक दारावर टकटक झाली. “ सर, आत येऊ?” . दारात मानसी उभी होती. त्याला यावेळी ती घरी येईल अस वाटलं नव्हत. .... बाहेर मुसळधार पाउस... केसावरून गालावरून पावसाचे निथळणारे थेंब ...अधाशीपणे तिच्या देहाला चिकटलेली साडी ... मेणबत्तीचा मिणमिणता प्रकाश .. आणि अधिकच खुलून आलेले तिचे सौंदर्य .... एका क्षणात संकेतच्या नजरेने सार काही शोषून घेतले... आणि तो दबलेल्या आवाजात म्हणाला
“ मानसी तू ?”
“ मी नेहमी प्रमाणे येत होते आणि अचानक पाउस आला आणि लाईट्स गेले” पावसामुळे आणि गार वाऱ्याने तिचे अंग थरथरत होते. मोहाची सूक्ष्म लहर संकेतच्या अंगात थरारून गेली. पण दुसर्या क्षणी त्याने मानसीला सांगितले ,
“ मानसी, तू घरी जा”
“सर पण .....एक मिनिट माझ काम होत”
“ तू घरी जा मानसी. जा “ त्याची नजर मानसी वरून हलत नव्हती.
बाहेर पाउस जोरात होता... झाडांच्या पानाची सळसळ... भिरभिरणारा रात किडा .. विजांचा कडकडाट ...दारांच्या खिडक्या एकमेकावर आदळल्या.... रेल्वेचा धक धक करत जाणारा आवाज आणि ... संकेत आपल्या विचारातून भानावर आला. पण त्याच्या मनातील अस्वस्थता काही केल्या जात नव्हती. तो टेरेस वरून बेडरूम मध्ये आला..... मनाची अस्वस्थता घालवण्यासाठी त्याने सिगरेट शिलगावली ... सिगरेटच्या धुरांची वलये.. खोलीतला अंधार भेदत होती...

“ आई ग आई ...” मानसी जोरात ओरडत होती आणि हेमंत काका तिला मारत होते. “ बोल कार्टे बोल, कोण आहे तो बोल. कोण आहे तो हरामखोर ?”
“ मानसी काही बोलत नव्हती आणि काका तिला मारतच होते. सुमित्रा काकू तिला वाचवण्याचा प्रयन्त करीत होत्या... तिचे ते जीवाच्या आकांताने ओरडणे ऐकून क्षणभर संकेतच्या मनात विचार आला आपण जावे आणि तिला वाचवावे.. पण हेमंत काकाचा राग अनिवार झाला होता... आई ग आई चा आवाज ऐकूच येत होता.
... या प्रसंगानंतर संकेतला दोन दिवसानीच हेमंत काकांच्या घरी काम करणारा रामू गडी भेटला होता. चेहरा सुजलेला .. हातपाय निळे ..त्याला बघताच संकेत थांबला आणि रामूला विचारले.
“ रामू काय झाल रे ? असा काय दिसतोयस?
“ काय सर ? तुम्हाला ऐकू नाही आल का? समोर राहताय सर तुम्ही”
“ नाही रे. काय झाल?
“ अहो दीदी न काहीतरी घोळ घातलाय आणि काकांनी मलाच मारलं”
“ घोळ? मला नाही कळल”
“ अहो त्यांना दिवस गेलेत, बिन लग्नाची पोर ती. हेमंत काकाचा राग माहिताय तुम्हाला”
“ काय सांगतोस ? पण तू ...
“ अहो काका संशयी माणूस. त्यांना वाटतय मीच काहीतरी केलय. हेमंत काकांना आला राग आणि मला बेदम मारलं आणि नोकरीवरून काढून टाकल. विनाकारण डोक्याला ताप झाला. आता गावाकडे चाललोय. .. काही तरी बघायला पाहिजे.

“ झोप तू थोडा वेळ .” खांद्यावर हात ठेऊन मानसी मागे उभी होती. तिच्या स्पर्शाने तो एकदम भानावर आला.
“ तू जागी आहेस अजून ?”
“ हो जागीच आहे. नवरा इतका अस्वस्थ असताना मी कशी काय झोपू?”
“अस्वस्थ नाही ग “
“ जाऊ दे. नको सांगूस काही. तुला बोलायचे नसते. उद्या सकाळी पुन्हा सुमित्रा काकुनी बोलावले आहे. त्या त्यांच्या गावाकडे चालल्या आहेत.. कायमच्या हा बंगला सोडून

“ ये साक्षी, संकेत सर या” सुमित्रा काकुनी शुष्क आवाजात दोघांचे स्वागत केले.
“ बसा. आता हा पसारा बघू नका.” इतक्या वर्षांचा संसार म्हणजे थोडस काहीतरी असणारच.
“होय. पण काकू खरच तुम्ही जाणार?
“ होय ग बाई. इथ लक्ष लागत नाही. मग काय करणार? सारख्या आठवणी येतात
“ पण काकू आता शहराची सवय झाली इतक्या वर्षाची.
“ होईल. गावाचीही.” कोकणात कुठेतरी सुमित्रा काकुंचे मूळ गाव होते.आणि तिथे गेल्यावर मानसीच्या आठवणी विसरल्या जातील असे त्यांना वाटत होते. कितीतरी वेळ गावाकडच्या घराच त्या कौतुक करत होत्या. आणि साक्षीही मन लाऊन सगळ ऐकत होती. साक्षीचा हाच स्वभाव काकुना आवडला होता. आणि म्हणूनच जाताना इतर कुणालाही त्यांनी साक्षीला चहाला बोलावले होते. संकेत गप्प बसून त्यांचे बोलणे ऐकत होता.
“ संकेत सर, तुम्ही बोलत नाही.? बराय ना सगळ?”
“ तुम्ही जाणार म्हणून तो गप्प आहे” सुमित्रा बाईनी संकेत कडे बघितल. आणि संकेत काहीतरी बोलायचं म्हणून म्हणाला
“ काका, कुठायत?”
“ आहेत ना. त्याचं तरी मन कुठ थाऱ्यावर आहे. सारखा विचार करीत बसता आपल्या मुलीच्या आयुष्याचा. अस का झाल म्हणून?”
काही क्षण शांतात. कुणीच काही बोलल नाही. थोड्या वेलान साक्षिन विचारलं
“ काकू, एक विचारू का?”
“ विचार कि. आता काय सांगायचं राहीलय. सगळ्यांना सगळ माहिताय.”
साक्षीने क्षणभर स्वत:शीच विचार केला आणि ती म्हणाली
“ काकू, मानसीने आत्महत्या का केली?” मानसीचा प्रश्न ऐकून संकेत दचकला. आणि काकुनाही आश्चर्य वाटले.
“ अग, तुला माहित नाही कारण?”
“ नाही. मला कस कळणार?
“ मला वाटलं सर बोलले असतील तुला .. अग बाई मानसीला दिवस गेले होते .. लग्ना आधी आपली मुलगी गरोदर असल्याच कुठल्या बापाला चालेल ... यांनी तिला बेदम मारल .. सगळ्यांच्या वर संशय घेतला .. तो रामू .. . यांना वाटलं त्याचं काहीतरी .. रागावल्यावर काही कळत का ग ? संकेत सरांच्या मदतीने कॉलेज मधील मित्र मैत्रिणी कोण त्यानाही विचारून घेतलं.. .. सुमित्रा काकू बराच वेळ बोलताच होत्या. साक्षी त्यांचे बोलण ऐकत होती आणि अस्वस्थ होऊन संकेत कपाळावरचा घाम पुसत होता.... दूरवर वाजणारी रेल्वेची शिटी त्याला अधिकच अस्वस्थ करत होती.

Group content visibility: 
Use group defaults

शेवटी मानसी नि साक्षी च्या नावांचा घोळ झाला आहे. क्रमशः आहे का ? शेवटी “ एव्हढेच दिसतेय. फ्लो चांगला जमला आहे.

क्रमश: नसावी
पूर्ण झालीय कथा
अखेरीस बाळाचा बाप कोण आणि आत्महत्येस जबाबदार कोण आहे ते सांगून

>>>>>>“ झोप तू थोडा वेळ .” खांद्यावर हात ठेऊन मानसी मागे उभी होती. तिच्या स्पर्शाने तो एकदम भानावर आला.>>>>>
इथ साक्षी असायला हवं ना.

जर हा कथेचा शेवट असेल तर दोन अर्थ निघू शकतात
१. मानसीच्या आत्महतयेप्रकरणी संकेत प्रत्यक्षपणे जबाबदार होता
२. मानसी कडून कुठे तरी चूक होत होती हे दिसत असूनही तो थांबवू शकला नाही किंवा नंतर तिला मदत करू शकला नाही ह्याच दुःख त्याला नेहमीच लागून राहिलं.

कथेच्या इतर संदर्भातून पहिली शक्यता जास्त वाटते

एकंदर कथा छान आहे, भूतकाळ आणि वर्तमान व्यवस्थीत साधलाय

पू.ले. शु.

“ तू घरी जा मानसी. जा “ त्याची नजर मानसी वरून हलत नव्हती.
इथं संकेतचा तोल ढासळला असावा असे वाटते.

सहज कुणाशीही बोलणारी, मिसळणारी साक्षी त्याच्या आयुष्यात आलेली दुसरी मुलगी, तश्या स्वभावाची पहिली मानसी. त्याचा गिल्ट त्याला साक्षीमध्ये मानसीचा आभास करवून देतोय. छान आहे कथा

खरंतर अंतर्मुख करणारी.

कुठेतरी वाचलं होतं कि स्त्रीची शारीरिक रचना किंवा संप्रेरके संरचना अशी असते कि शारीरिक संबंधासाठी स्त्रीला मानसिक पातळीवर जोडीदारासोबत जुळणे आवश्यक असते. अगदी समाजाच्या दृष्टीने व्यभिचार असला तरी स्त्री सहज अशी संबंधांसाठी तयार होऊ शकत नाही. याउलट, पुरुष आपला कार्यभाग साधण्यापुरतादेखील कनेक्ट डिस्कनेक्ट होऊ शकतो. हे कितपत खरे ते नक्की नाही. पण पाहण्यात तरी असेच येते.