कांड नवीन कथा

Submitted by सतीशगजाननकुलकर्णी on 30 January, 2024 - 05:52

कांड
आज मी ऑफिसमधून घरी येतानाच मनाशी निश्चय करूनच बाहेर पडलो. काहीही झालं तरी आज या विषयाचा सोक्षमोक्ष लावायचाच. माणसाच्या सहन शक्तीला सुद्धा काही मर्यादा असतात. माझ्या त्या संपल्या होत्या. आज मी पियाला, माझ्या बायकोला , घराबाहेर काढण्याचा निश्चय पक्का केला होता. कोणत्याही परिस्थितीत !! अशी निर्लज्ज्ज आणि नको असणारी बाई घरात ठेवायची माझी बिलकुल इच्छा नव्हती.
मी घरी आलो, माझी चाहूल लागताच शेजारच्या मोघे काकुनी दार किलकिल करून थोडस बघितलचं. नेहमीप्रमाणे त्यांना माझ्याशी बोलयचं असावं . पण मी दमून आल्यावर फारसं बोलत नाही हे त्यांना माहिती होतं. त्यांनी दार पुन्हा लाऊन घेतलं. माझ्या घराचं दार नेहमी प्रमाणे बंद होत. झोपली असेल नालायक बाई ! मी मनाशी पुटपुटलो. दरवाजावरची बेल दाबली. आणि पीयान हसतमुख पणे दार उघडलं. मी दुर्लक्ष करून आत गेलो. नेहमीप्रमाणे कसबसं तोंडावर पाणी मारून बाहेर आलो. आणि पीयान विचारल,
“ दमला असशील ना ? कॉफी करू ?
“ नको” मी तिरसटून उत्तर दिलं.
“ ठीक आहे. मग स्वयंपाक करते लवकर. जेवायला लवकरच बसू” मी काहीच उत्तर दिल नाही. काय निर्लज्ज बाई आहे हि. !! जेवायला लवकर बसू म्हणे !! साली हरामखोर. . स्वयंपाकाच्या तयारीसाठी ती आत निघून गेली. आणि मी तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत बसलो. एखाद्या सराईत बाई प्रमाणे वागत होती. हिच्या बापचं किचन आहे का ? आज या बाईला माझा हिसका दाखवणारच. कोपऱ्यात असणारी काठी मी हातात घेतली. साली ज्युडो कराटेच्या क्लासला जात होती. पण मी आहे ना घट्ट, माझं संरक्षण करायला. सावधगिरी म्हणून आठ वाजता पोलिसांना पण घरी बोलावलयं, आज हि काय बाई इथे राहत नाही.! नसती पिडा मागे लागली आहे. खरं म्हणजे माझंच चुकल. झक मारली आणि त्या दिवशी मी नाटकाला गेलो.

त्या दिवशी रविवार होता. नेहमीप्रमाणे दुपारी मनसोक्त झोपलो. संध्याकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे आपली आपण कॉफी करून घेतली, आणि सकाळीच वाचलेला पेपर पुन्हा एकदा चाळू लागलो. त्याच त्या रटाळ बातम्या वाचून कंटाळा आला होता. सहज माझी नजर कोपऱ्यातील एका नाटकाच्या जाहिरातीकडे गेली. खरं म्हणजे मी नाटक कधी फारसं बघत नाही. गेलो तर सिनेमालाच जातो. पण त्या दिवशी कंटाळा आला होता, नाट्यगृह जवळ होतं आणि मुख्य म्हणजे वेळत होत. साडेसहा वाजता नाटक सुरु होणार असं गृहीत धरलं तरीसुद्धा नऊ सव्वा नऊ वाजेपर्यंत सहज नाटक संपलं असत. येताना कुठेतरी जेवायचं आणि पुन्हा घरी येऊन डाराडूर झोप काढायची असा विचार करून मी त्या दिवशी नाटकाला गेलो.
नाटकाची तिकिटे काढली, नाट्यगृहात प्रवेश केला. सहज म्हणून नजर आजूबाजूला टाकली, कुणी ओळखीचं दिसत नाही याच समाधान वाटलं. कुणीतरी भेटत, मग औपचारिक आणि नाटकी बोलायचं हे सगल मला कधी आवडलं नाही. तसा मी माणूसघाणा होतो म्हणलं तरी चालेल. एकटेपणा आवडतो म्हणून मी लग्न सुद्धा केलं नाही. तिशी ओलांडली, आणि तिशी का पस्तीशीला येऊन पोचलो मी. पण लग्न, ते संसारात गुरफटण. नको रे बाबा.!!
नाटक सुरु झालं आणि गुंतून गेलो मी त्यात. मस्त कथानक, मस्त अभिनय. बरं झालं आलो ते मी आज नाटकाला. इंटरव्हल झाली आणि चहा घ्यावा म्हणून बाहेर आलो. इतक्यात माझ्या पाठीवर जोराची थाप पडली,
“ काय वैभ्या, किती दिवसांनी दिसतोयस !” मी नजर मागे करून बघितलं.एक तीस बत्तीस वर्षाची स्त्री मागे उभी होती. दिसायला देखणी, आणि एकदम मॉडर्न ! जीन्स पट, त्याच रंगाचा टोप आणि छान बॉपकट. एकूण सौंदर्य आव्हानात्मक होतं. पण हि बाई मला का ओळखते ? कधी बघितल सुद्धा नाही. आणि हे चार लोकांच्यात वैभ्या काय ? मूर्ख बाई !
अजुनी ओळखलं नाहीस मला ?” तिने हसून विचारलं. मी थोड निरखून तिच्याकडे बघितलं आणि चेहरा काहीसा ओळखीचा वाटू लागला. तरीही मी थोड्सं घाबरतच विचारलं,
“ तू पिया तर नाहीस ?”
“ बरोबर ! मी पियाच आहे. तुझी कॉलेज मधील मैत्रीण.” तिने बिनधास्त सांगून टाकलं आणि मी अजुनी ओकवर्ड झालो. पण मी ऑकवर्ड झालो हे पण मला आवडलं नाही. हि इतकी बिनधास्त आहे आणि मला ऑकवर्ड व्हायचं काय कारण ? खर तर पिया कॉलेज मध्ये असताना सुद्धा अशीच होती. मुलींच्यापेक्षा मुलांच्यात मिसळणारी.
“ पण तू इथं काय करते आहेस ?” मी काहीतरी बोलायचे म्हणून बोललो
“ काही नाही रे, ज्युडो कराटेच प्रात्यक्षिक करून दाखवणारं आहे लोकांना नाटक संपल्यावर. खास शो.!” ती खळखळून हसली.
“ काय विचारतोस रे वैभ्या. इथे नाटकालाच येईन ना मी ?”
“ पण तू आणि नाटक ? काहीतरी खटकतयं”
“ होय रे. मलाही आवडत नाही नाटक बघयाला. पण जाम बोअर झाले होते.दोन तीन तास जातील तेवढाच टाईम पास” घंटा वाजली आणि मला हुश्य झालं. पुन्हा तास दीड तास नाटक आणि मग घरी.

इंटरव्हल नंतर नाटक सुरु झालं पण लक्ष काही लागलं नाही. पिया आज भेटली नसती तर बरं झालं असतं असं वाटलं. या बाईन कॉलेज मध्ये असतांना मला मागणी घातली होती लग्नासाठी. होय मागणीच होती. शेवटचं वर्ष होत कॉलेजच. आणि हि एक दिवस कॉलेज संपल्यावर जवळ आली आणि डायरेक्ट विचारलं
“ वैभ्या, कॉलेज संपणार आता लवकरच. पुन्हा भेटणार कधी ते माहित नाही. तुला एक गोष्ट सांगते तू मला जाम आवडतोस. लग्न करूया का आपण ?”
“ नाही नाही “ मी पटकन बोलून गेलो आणि असं तोडून बोललो याचं वाईट वाटलं.
“ अरे दचकतोसं काय ? इतकी काही वाईट नाही मी दिसायला?”
“ तसं काही नाही. पण हे असं लग्नाच कुणी डायरेक्ट विचारत का ?”
“ काय अपेक्षा होती तुझी? पहिल्यांदा मैत्री करूया, मग ती वाढवूया, मग प्रेम करू या, मग दोन तीन वर्षांनी मी तुला किंवा तू मला प्रपोज करायचं आणि मग आपण हो तरी म्हणायचं नाहीतर नाही तरी म्हणायचं. तू हो म्हणालास तर ठीक नाही म्हणालास तर वेळ फुकट. त्यापेक्षा लग्न करून टाकू. प्रेम काय होईल कि” पियाच लॉजिक अजब होतं.
“ पिया, हे तुझ लॉजिक सोलिड आहे. पण खरं सांगतो मी अजुनी विचारच केला नाही कशाचा. पहिल्यांदा कुठेतरी नोकरी शोधेन आता, त्यात सेटल होईन आणि मग लग्न बिग्न करेन.”
“ बाप रे, किती विचार करतोस. जाऊ दे चल. नको करू. मी बघते दुसरा कुणीतरी.” आणि पिया निघून सुद्धा गेली. हा सगळा प्रसंग मला आठवत होता. मी पुढचे नाटक कसेबसे बघितले. दुसरा अंक संपला आणि घाइघाइने बाहेर पडलो. आता सरळ रिक्षा करायची आणि घर गाठायचं असा विचार केला. म्हणजे पियाने आपल्याशी बोलायलाच नको.
मी गर्दीतून बाहेर पडत होतो. इतक्यात पियाचा आवाज आलाच.
“ वैभ्या, थांब कि जरा. मी पण घरीच चालले आहे, रिक्षा करून. तू कसा जाणार आहेस”
“ माझं घर जवळच आहे. मी चालतच जाईन.” तीला टाळण्याच्या दृशीने मी मुद्दाम माझा plan बदलला.
“ ठीक आहे” बोलत बोलत आम्ही बाहेर आलो. पिया रिक्षावाल्याला विचारत होती. खरं म्हणजे मी थांबायचं काहीच कारण नव्हतं. पण केवळ दिसताना वाईट दिसेल म्हणून मी रेंगाळलो होतो. पिया राहायला लांब होती. आणि रिक्षावाले तिकडे यायला तयार नव्हते. पिया शास्त्री नगरला राहत होती. म्हणजे जवळ जवळ पाच किलोमीटर. रात्री हे रिक्षावाले नेहमी झगझग करतच असतात. पिया दुप्पट पैसे द्यायला सुद्धा तयार झाली होती. पण कुणीच यायला तयार नव्हते. शेवटी पियाने कंटाळून मला म्हणाली,
“ वैभ्या, ऐक ना. मी आजची रात्र तुझ्या कडे राहू का?” पियाने लग्नाचे मला विचारल्यावर जितका मी दचकलो नव्हतो तितका आत्ता दचकलो. हि पोरगी नको इतकी बिनधास्त होती.
“ नाही ग पिया काहीही काय बोलतेस.? माझ्या घरी कुणी नसतं. एका बाईला घरी घेऊन घरी आलोय म्हटल्यावर आपर्तमेंटमधील इतर लोक काय म्हणतील याचा विचार तरी कर जरा. त्यात मी एकटाच राहतो. अविवाहित.”
“ ते लोक बिक मला काही सांगू नकोस. शास्त्री नगरला एकट्या बाईला पाठवले चालत म्हणून सुद्धा लोक बोलतील. त्यांना गुंडाळून ठेव. आणि हे विवाहित आणि अविवाहित काय मधेच? मी पण अविवाहितच आहे. इथे आपण सोय बघतो आहोत. खरं सांगू का, पाच सहा किलोमीटर चालत सुद्धा जाईन मी. पण तीन तास बसून वैताग आला. किती बोअर होतं ते नाटक” [पियाने तिच्या मनातले बोलून दाखवले पण काही केल्या माझं मन तयार होत नव्हतं.
“ वैभ्या, एका रात्रीचा प्रश्न आहे. उद्या सकाळी मी निघून जाणार रिक्षा करून. नाही म्हणत असशील तर लवकर नाही म्हण. मी चालत तरी जाते.” पियाची अडचण मला दिसत होती. रिक्षावाले यायला तयार नवहते. तिला चालत जा म्हणणे मला योग्य वाटत नवह्त. आणि पूर्णपणे हात झटकून टाकण माझ्या स्वभावात नव्हतं. मी नाईलाज म्हणून तिला हो म्हणालो.

आम्ही दोघे चालत जाऊ लागलो. भूक सडकून लागली होती. कुठेतरी खाण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. एका हॉटेल मध्ये जेवायला गेलो. घाबरत घाबरत मी जेऊ लागलो. पिया मात्र बिनधास्त होती. आणि माझ्या डोळ्या समोर आपर्मेंट मधील लोकांचा चेहरा येत होता. घड्याळात पावणे दहा वाजले होते. पिया चवीने जेवते आहे तेच बरे आहे असं मला वाटलं. रात्री साडेदहा वाजता घरी गेलो तर उत्तम. सगळे झोपले असतीलं. सरळ लिफ्ट मध्ये घुसायच आणि वर जायचं. सकाळी पिया रिक्षा करून घरी जाईल आणि मग आपण सुटलो. या विचाराने सुद्धा मला हुश्य झालं.
सव्वा दहा वाजता आपर्तमेंट मध्ये गेलो आणि प्रवेश करताच वाचमन ने सांगितले. “ साहेब लिफ्ट बंद आहे” मी मनातल्या चडफडलो. आता तीन जिने चढून जाण्याशिवाय इलाज नव्हता. पहिला.. दुसरा ... लोक जागे होते. पण तरीसुद्धा दरवाजा कुणी उघडला नव्हता. मी तिसर्या मजल्यावर पोचलो आणि माझी चाहूल लागताच मोघेकाकुनी त्यांच्या घराचे दार उघडले
“ वैभव, अहो किती उशीर ? नेहमी तुम्ही नऊ वाजेपर्यंत घरी येत असता. आज दहा वाजले तरी आला नाहीत. काळजी वाटायला लागली” मोघे काकू नेहमी वडिलकीच्या नात्याने माझ्याशी वागत असतं. काही लागले सावरले तर बघत असतं. त्यामुळे मी सुद्धा त्यांना नेहमी आदराने वागवत असे.
“ काकू, नाटकाला गेलो होतो. म्हणून उशीर झाला”
“ असं होय. आणि या कोण ?” पिया कडे एक नजर टाकत त्यांनी विचारले.
“ हि पिया. काकू त्याचं काय झालं... “ मी सगळ सांगितल आणि काकुनी पियाकडे मायेने बघितलं. त्यांना वाटलं इतकी तरणी ताठी पोर लांब एकटीच जाण्यापेक्षा इथे आली ते चांगल झालं. खर म्हणजे, त्यांना त्यांच्या घरी तिला बोलवायचं असावं. त्या काहीतरी बोलतही होत्या पण इतक्यात काका बाहेर आले. काका म्हणजे एक नंबरचा खडूस माणूस. काकूंच्या एकदम उलट स्वभाव. बाहेर येऊन त्यांनी एकदा पियाकडे, एकदा माझ्याकडे आणि एकदा काकुंच्याकडे बघितलं. आणि ते आत निघून गेले. काकू सुद्धा आत निघून गेल्या आणि दार लाऊन घेतलं.

“ वैभव, मी कुठे झोपू?” पियाने विचारलं आणि माझं मस्तक फिरलं. पण मी काहीच बोललो नाही. सरळ बेडरूम मध्ये गेलो. एक गादी बाहेर आणून टाकली. आणि काही न बोलता आत जाऊ लागलो.
“ इतकी चिडचिड करू नकोस वैभ्या. मी सहज विचारलं तुला. आणि झोपायची वेळ आहेच ना?” तिने मिस्कीलपणे विचारलं. मी काही न बोलता आत निघून गेलो.
त्या रात्री मला झोप लागली नाही. मोघे काकुना काय वाटलं असेल? काका काय बोलत असतील ? उद्या अपार्टमेट मध्ये काय चर्चा होईल ? हा विचार करून मी अस्वस्थ होतो. पहाटे मला कधीतरी झोप लागली. घड्याळात नऊ वाजले होते. मी दचकून उठलो. आज ऑफिसला वेळ होणार बहुतेक. हॉल मध्ये पिया अजुनी झोपलीच होती. मी हाक मारून तिला उठवलं. तीही उठली. घड्याळाकडे बघितलं.
“ बाप रे. नऊ वाजले कि. मलाही वेळ होणार आता ऑफिसला जायला. उठवायचं नाहीस का?”
“ मी आताच उठलो.” मी त्रोटक उत्तर दिलं.
“ जागा बदलली त्यामुळे झोप लागली नाही. पण, वैभ्या चहा टाकू का रे ?” मी नाखुशीनेच हो म्हणालो. तिने किचन मध्ये जावं आणि चहा करून द्यावा हे मला काही पटत नव्हत. पण मी तिला द्यावा हे त्यापेक्षाही मला खटकत होत. कसा बसा चहाचा कार्यक्रम उरकून घेतला. आणि मी माझं आटपून घेतलं. ऑफिसला जाण्यसाठी मी आता तयार होतो. पियाने आटपून घेतलं कि तिला रिक्षा बघून द्यायची. कि या सगळ्यातून मुक्त.
“ पिया, चल लगेच आटप. तुला रिक्षात बसवून देतो आणि मी ऑफिसला जातो” पिया खळखळून हसली.
“ बसवून द्यायला मी काही बाळ नाही. तू जा पुढे. मी अंघोळ करते. त्या शिवाय मी बाहेर पडत नाही केव्हाच. आणि मला वेळ सुद्धा लागतो अंघोळीला. आज बहुतेक दांडी मारेन ऑफिसला. मग मी जाईन रिक्षा करून. मी कुतुप लावते. आणि किल्ली म्हातारीकडे देते”
“ म्हातारी ? मोघे काकू नावं आहे त्याचं ?” मी रागाने म्हणालो.
“ तेच रे. मोघे काकुना देते.” पिया मुळे विनाकारण ऑफिसला वेळ हे सुद्धा काही पटत नव्हत. मी हो म्हणालो. काहीतरी करून ती जाण इतकचं आज मला पाहिजे होतं, संध्याकाळी घरी आल्यवर हि ब्याद असणार नाही.

“ काय रे, कालचा दिवस कसा गेला ?” सहकारयाने विचारले. हा दर सोमवारचा ठराविक प्रश्न होता आणि दर सोमवारच ठराविक उत्तर “ काही नाही. नेहमीचचं. सकाळी पेपर, संध्याकाळी फिरलो वगैरे” पण हा प्रश्न आला आणि काय सांगाव हा खरोखर प्रश्न पडला. पण हा खूपच क्लोज होता म्हणून मला सांगण्याशिवाय इत्लाज नव्हता. मी सगळ सांगितलं आणि तो एकदम हसू लागला “ मूर्ख आहेस. दार काय लावतोस? इतकी चांगली बायको एक दिवस तरी मिळाली. ठोकायची ना तिला” गप रे. काहीही काय बोलतोस ? नसतं लचांड माग लाऊन घ्यायचं. आज ती तिच्या घरी गेली कि मी सुटलो.

“ वैभ्या, पोळ्या करून झाल्यात माझ्या. भाजी कोणती करू ते सांग.” पिया माझ्या घरी घुसली होती. आणि बायको सारखं वागत होती. मी तिच्या प्रश्नाला उत्तर दिले नाही. मला बोलायची इच्छाच नव्हती.
“ अरे तुला विचारतेय मी. काय करू” हि बाई अजुनी डोकं खाईल म्हणून मी त्रोटक उत्तर दिलं “ तुला काय करायचं ते करं”
“ असं काय तूसड बोलतोस. ? “ ती काही सेकंद थांबून म्हणाली
“ वैभ्या, ऐक ना. मी ओंनलाईन अंडा करी मागवते. तुझ्या कडे स्टफ आहे ना?” तिने डोळे मिचकावून मला विचारले. काय निर्लज्ज बाई आहे हि ! चक्क दारू पिऊया म्हणते आहे.
मी नाही म्हणालो. आणि बाहेर टेरेस वर येऊन उभा राहिलो. साली हरामखोर त्या दिवशी जाणार होती. पण गेली नाही. नालायक ..

त्या दिवशी ऑफिसमधून मी बाहेर पडलो. आणि मोघे काकूंचा फोन आला. काकूंचा फोन मला कधीच येत नाही. म्हणून जरा आश्चर्याने मी फोन घेतला.
“ वैभव, अहो दिवस भर मी तुम्हाला फोन करते आहे. पण तुमचा फोन लागत नाहीय”
“ अहो, एका मिटिंग मध्ये अडकलो होतो. तिथे रेंज येत नव्हती फोनला. पण काय झाल काकू? आवाज असा का ? बराय ना सगळ?”
“ अहो मला काय धाड भरलीय. तुमची ती बया सकाळी दोन तास बाहेर गेली. जाताना किल्ली ठेऊन गेली माझ्याकडे. पण पुन्हा घरी आली. किल्ली द्या म्हणत होती. मी तुम्हाला विचारायला फोन केला होता. पण तुमचा लागतच नव्हता. शेवटी देऊन टाकली मी तिला”
मी पुन्हा डोक्याला हात लावला. आता हा काय नवीन ताप.
“ काकू, मी घरी येतोच आहे. आल्यावर बोलू”
“ सांभाळा हं वैभव. मला तर काय या बयेच लक्षण ठीक दिसत नाही”

मी बेल दाबली. पुन्हा तेच हसमुख चेहरा. जणू काही घडलच नाही. आज सकाळी या बाईन तिच्या घरी जाणार म्हणून सांगितलं. गेली आणि परत आली. काकुंच्या कडून हक्कानं किल्ली मागून घेतली. हि बाई काय स्वत:ला माझी बायको समजायला लागली का ? मी आत पाउल टाकताच विचारलं,
“ पिया, काय चालल आहे तुझ?”
“ कुठ काय ?” पुन्हा तोच निर्लज्जपणा. डोक्याची शीर उडत होती.
“ अग, तू आज जाणार होतीस ना ? मग गेली का नाहीस?” काकुनी मला काही सांगितलं आहे याचा मी पत्ताच लागू दिला नाही. मी जरा आवाज चढवून विचारलं.
“ ते होय. मला वाटलं म्हातारीन सगळ sorry मोघे काकुनी सगळ सांगितलं असावं. अरे काय झालं, सकाळी मी घरी गेले. तर घरमालकान सांगितल आधी थकलेल भाड भर. आणि मगच घरी ये. मला सांग, तीन महीन्याच भाड थकल म्हणून कुणी घराबाहेर काढत का? पण आमचा घर मालक थोडासा डांबरट आहे” माय गोड, म्हणजे हि बया आता इथच राहणार कि काय? माझ्या छातीत धस्स झाल. पण तरीही आवाज शक्य तितका शांत ठेवत मी म्हणालो,
“ पण पिया, तुझ घर भाड का थकल? तू सर्विस करतेस आणि ती सुद्धा चांगली”
“ होय रे, मध्ये बाबाना थोडी पैशाची आवश्यकता होती. म्हणून मी बाबांना देऊन टाकले” तिने सांगितलं खर पण माझा विश्वास बसत नव्हता. मुळात तिचे बाबा जिवंत आहेत कि नाही याचीच मला खात्री नव्हती.
“ पण तुझे बाबा कुठे आहेत?”
“ आहेत ना. फक्त आम्ही वेगळे राहतो. पण त्या गोष्टी मात्र विचारू नकोस ..” मी काही विचारायच्या आधीच तिने माझे तोंड बंद केले.
“ पण मग तू आता ... “ मी पुन्हा काही बोलायच्या आत ती खळखळून हसली.

“ वैभ्या, घाबरू नकोस. तू कॉलेज मध्ये असतानाच लग्नाच विचारल होत मी. तेव्हाच हो म्हणाला असतास तर हि वेळ आलीच नसती. बघ अजुनी वेळ गेलेली नाही.. “ ती डोळे मिचकावून म्हणाली. आणि मनातल्या मनात तिला कानफाडात मारली. प्रत्यक्ष मारण्याची माझी हिंमतच नाही. ती ज्युडो फायटर आहे याचा मी विसर पडू दिला नाही.
“ अग मग तू आता काय .. “ मला काय म्हणायचं आहे ते तिला समजल. ती पुन्हा हसली
“ वैभ्या, कितीही माझ्या मनात असलं तरी तू घाबरट आहेस, लोकांना घाबरतोस हे काय माहित नाही का मला ? माझ्या मालकान घोळ घातला म्हणून मी लगेच त्याच एरीयात दुसरा flat बघून आले. फक्त एक तारखेला पगार होणार त्यावेळी मी त्याला डीपोझीट आणि आगाऊ भाडे देऊन टाकणार”
“ आज बावीस तारीख आहे. म्हणजे पिया तू अजुनी आठ दिवस इथ राहणार ?”
“ हो. त्यात काय एवढ? आठ दिवस तर असेच निघून जातात? माझी सोय झाली तुलाही घरच खायला मिळेल!” टू मच. एका बाईला आपण घरी का ठेऊन घ्यायचे?लोक काय म्हणतील? आणि मुख्य म्हणजे हे सगळ माझ्याच बुद्धीला पटत नव्हत. काही तरी करून हिला बाहेर काढायला पाहिजे असच वाटत होत. पण कस? मुळात हि बाई खर बोलते आहे यावरच माझा विश्वास बसत नव्हता. माझ्या मनातल तीन बहुतेक ओळखल असाव. ती थोडस रागावून म्हणाली
“ वैभ्या, बहुतेक तुला हि सगळी स्टोरी वाटत असेल. मी एक काम करते तुला पटत नसेल तर तू उद्या जाऊन ये माझ्या मालकाकडे आणि त्यान मला बाहेर काढल कि नाही हे विचारून घे. पाहिजे तर नवीन flat बघून घे.” तिने बोलता बोलता माझ्या मोबाईलवर लोकेशन सुद्धा पाठवून दिल.
“ तस नाही पिया. पण आपल्याला समाजाचा विचार सुद्धा करायला पाहिजे ना?” तिने माझ्याकडे तुच्छतेने पाहिले. आणि ती आत निघून गेली. ती रात्र पुन्हा मी त्याच अस्वस्थेत काढली. ती खर सांगते का खोट यापेक्षाही ती मला नको होती हे खर होत.

दुसऱ्या दिवशी मी सकाळी ऑफिस मध्ये फोन करून रजा टाकून दिली. पण पियाला त्याचा पत्ता लागू दिला नाही.. काहीही झाल नाही अशा अविर्भावात पियाशी बोललो. पण ते हि जुजबी. माझ्या बोलण्यातून कोणतीही जवळीक होणार नाही याची पूर्ण दक्षता घेतली. मुद्दामच ऑफिसच्या वेळेत बाहेर पडलो आणि पियाने जे लोकेशन दिले होते त्या लोकेशन वर जाऊन पोचलो.

“ इथ पिया देशमाने कुठे राहतात?” तेथूनच जाणाऱ्या एका माणसाला मी विचारले. त्याने तिरस्काराने माझ्याकडे बघितले. नजरेत थोडा संशय सुद्धा होता.
“ वर जाऊन चौकशी करा” म्हातारा फारच खडूस वाटला. मी पहिल्या मजल्यावर गेलो. सर्व flat चे दरवाजे बंद होते. पण एक दार थोडेसे उघडे होते. मी दारातूनच हॉल मध्ये बसेल्या एका व्यक्तीला विचारले.
“ इथे पिया देशमाने कुठे राहतात?”
“ का? तुम्हाला काय करायच्या आहेत नसत्या चौकशा? चला निघा इथून” काय माणूस आहे हा. मघाशी असाच एक खडूस म्हातारा भेटला. आता हा. हि काय खडूस माणसांचीच बिल्डींग आहे कि काय?
“ अहो, काका मी सरळ विचारतोय. तुम्ही सरळ सांगा कि”
“ मी सरळच सांगतोय तुम्हाला. तुम्हाला या चौकशा कशाला पाहिजेत? काम धंदे नाहीत वाटत?” एक ठेऊन द्यावीशी वाटली त्याला. मी पियाचा मित्र हे मला सांगायची इच्छा नव्हती दुसर काय उत्तर द्याव हे मला सुचत नव्हत. पण त्याचा आवाज चढलेला बघून त्याची बायको आतून ओरडली.
“ कुणाशी बोलताय तुम्ही? आणि चिडता कशाला?” ती बोलत बोलतच बाहेर आली.
“ घरी आलेल्या माणसाशी असं बोलतात का? त्यांना आत या बसा काही म्हणाल कि नाही?”
काकुनी समंजस पणे मला आत घेतलं. मोघे काकू सारखाच त्यांचा स्वभाव वाटला. काका मात्र खडूस मोघे काकांच्या सारखाच.
“ काय काम होत तुमच? पिया आमच्याच समोरच्या flat मध्ये भाड्याने रहायची” काकुनी प्रेमाने विचारले. आणि मी माझी सगळी कहाणी सांगितली आणि म्हणालो
“ मी खऱ्या खोट्याची शहानिशा करायला आलोय. तीन भाड दिल नाही म्हणून तुम्ही बाहेर काढल अस ती म्हणत होती. ती सांगत असताना मला काहीतरी चुकते आहे अस वाटत होत म्हणून मी निर्णय घेतला कि सरळ जाऊन घर मालकाला विचाराव”
“ आम्ही सांगायला बांधील नाही तुम्हाला. तुम्ही निघा इथून” काका वैतागले.
“ तुम्ही जरा थांबा हो. मध्ये मध्ये बोलू नका”
“ तिला आम्ही हाकलून काढल हे खर आहे, पण ती सांगते आहे हे कारण नाही. मुळात पैशासाठी आम्ही flat भाड्याने दिलाच नाही. आम्हाला सुद्धा एक मुलगी आहे.सध्या अमेरिकेत असते ती. तिची आठवण येऊन आम्ही थोडे होमसिक व्हायचो. नेहमी आम्हाला एकटे एकटे वाटायचं. कुणाची तरी कंपनी मिळावी अस नेहमी वाटायचं. म्हणून आम्ही आमची जागा भाड्याने दिली होती. पण तिने भाड का दिल नाही हि गोष्ट तिला विचारली तुम्ही?
“ तीन पैसे वडिलांना दिले म्हणाली. त्यांना आर्थिक अडचण होते म्हणत होती”
“ ती खोटे सांगते आहे.”
“ पिया, सुरवातीला चांगली वाटली म्हणून तिला आम्ही जागा दिली. पण जसजसे दिवस जाऊ लागले तसतसे आम्हाला तिचे गुण कळू लागले. रोज तिचे नवीन मित्र यायचे, हास्य विनोद चालू असायचे. रात्र रात्र भर हे सगळ चालू असायचे. तरुण मुले म्हणून आम्ही तिकडे दुर्लक्ष केले. या वयात मजा करायची नाही तर केव्हा असे वाटून आम्ही सगळ्या गोष्टी सहन करायचो. पण आम्ही मध्यमवर्गीय माणसे आहोत. हे सगळ आमच्या संस्कारात बसत नाही. अपार्टमेट मधील बाकीचे लोक सुद्धा वैतागले होते. सारख्या तकारी करायचे आमच्याकडे. आम्ही तिला समजून सांगितल. ती तेवढ्यापुरते हो म्हणायची. पुन्हा नेहमीप्रमाणे चालू. परवा मात्र हद्द झाली. एक तरुण मुलगा तिच्याकडे आला होता. रात्र भर तो घरीच होता. हे चांगल दिसत का ? दुसऱ्या दिवशी तिला विचारल तर म्हणाली माझा नातेवाईक होता. नातेवाईक असा चोरून कधी घरी येतो का ? तो जर नातेवाईक असेल तर तिने आमच्याशी ओळख करून द्यायला पाहिजे होती. हे सगळ अति होत होत. आपर्तमेंट मधील सगळे लोक एकत्र आले आणि निर्णय घेतला, भाड तर दिलच नव्हत. तीच सामान बाहेर काढल आणि तिला येऊ नको म्हणून सांगितल. मनात आलं एकटी बाई कुठे जाईल? पण आम्ही विचार केला ती जाईल तिच्या वडिलांच्या कडे.” काकुनी सगळ सांगितल आणि काकांनी माझ्याकडे बघितल. मघापेक्षा काकांचा चेहरा थोडा मवाळ वाटला. मी काही तिचा तसला मित्र नाही हे त्यांना पटल असाव.
“ मी सांगते ते कादाचित खोट वाटत असेल. तुम्ही तिच्या वडिलांना भेटा. इथच जवळ राहतात ते” काकुनी बोलता बोलता वडिलांचा पत्ता सांगितला. त्या जे काय बोलत होत्या ते मला पटल होत. कारण ते सगळ पियाच्या स्वभावाशी मिळत जुळत होत. मी त्यांचा निरोप घेऊन बाहेर पडलो. आता रजा टाकलीच आहे तर पियाच्या वडिलांना भेटून घेऊ म्हणून तिकडे जाऊ लागलो.

मी पियाच्या घरी पोचलो. घरी एक वयस्कर व्यक्ती बसली होती. हे पियाचे वडीलच असावेत तिचे वडील थकलेले वाटले. तिची आई पिया कॉलेज मध्ये असतानाच गेली होती हे मला माहित होते.
तिच्या वडिलाना मी माझी ओळख सांगितली.
“ काका, आपण पियाचे बाबा ना ?”
“ होय. मीच तिचा बाबा. या बसा” काकांनी माझ स्वागत केल. पण त्यांच्या आवाजात नैराश्य होत. पण आज मला सगळ जाणून घ्यायचं होत. या बाईन मला जीव नकोसा केला होता. माझी काही चूक नसताना.
“ बोला काय काम काढल?” मी माझी कहानी त्यांना सुद्धा सांगितली. आधीच तो विषय चांगलाच माझ्या डोक्यात गेला होता. इतक्यात हा विषय दोनदा सांगावा लागला त्यामुळे मी स्वत:वरच चिडचिडा झालो. पण इतक्यात काका कठोर शब्दात बोलू लागले,
“ अहो या पोरीन मला जीव अगदी नकोसा करून टाकलाय. लहानपणी भयंकर व्रात्य होती. बालपण म्हणून सगळ सोडून दिल. पण वयात आल्यावर हि मुलांशी हाणामारी करायला लागली. आणि तेही कोणतही कारण काढून. तिला ज्यावेळी समजून सांगायचो त्या वेळी उलट मलाच म्हणायची “ या हरामखोरांना असच पाहिजे” एकदा एका मुलाशी कुस्ती खेळली होती हि बाई. मुलीच्या जातीला शोभेत का हे ? तर मलाच म्हणाली “ मी मुलगाच व्ह्यायला पाहिजे होते” लहानपणापासून नुसता धटिंगपणा. सकाळी घरातून बाहेर पडल्यावर संध्याकाळी घरी येईतोपर्यंत काहीतरी उद्योग तिने करून ठेवलेला असायचाच. शेवटी तीच कॉलेजच शिक्षण संपल्यावर मी तिच्या लग्नाचा निर्णय घेतला. आणि एक चांगला मुलगा बघून लग्न करून दिल. ती नाहीच म्हणत होती. पण तरीसुद्धा मी जबरदस्ती केली. अजुनी चार लोकांच्याकडून तिची समजूत काढली. आणि कशी बशी तयार झाली. नवरा चांगला होता तिचा. दिसायला देखणा होता हिच्यासारखाच. पण त्याच्याशी सुद्धा पटत नव्हत तीच. सारखी भांडण व्हायची. एकदा तो काहीतरी बोलला तिला. तर काय केल असेल “ हीन थोबाडात मारली त्याच्या” अहो नवरा बायको म्हटल्यावर काहीतरी होणार, थोड दुर्लक्ष करायचं. ती ज्युडोची ताकद नवर्याला दाखवायची? नवरा दुसऱ्या दिवशी घरी आला. आणि मला सांगितल, “ काका तुम्ही चांगले आहात. पण हि पोरगी कुणासारखी झाली माहित नाही. तुमच्या मुलीला मी घटस्पोट देतोय” लग्नां नंतर सहा महिन्यात घटस्फोट. मी पण तिच्या वागण्याला कंटाळलो होतो. मी तिला सांगितल “ तू आता वेगळी राहा. आपल पटणार नाही” ती काहीही न बोलता घर सोडून निघून गेली. याही गोष्टीला सात आत वर्षे होऊन गेली. इतक्या वर्षात तिने माझी चौकशी केली नाही आणि मी तिची.” बोलता बोलता काकांचा आवाज गहिवरला होता.
काकांची दया आली. एका म्हातार्याला हि बाई एकटी टाकून राजरोस पणे पार्ट्या करत हिंडत होती. काका, तिचा घरमालक, त्याची बायको सर्व माणसे सज्जन होती. पियाच्या वागण्यातच उथळ पण होता, पुरुषीपणा होता. आणि हे मी माझ्या घरी खपवून घेणार नव्हतो. मुळात मला माणस आवडत नव्हती. आणि पिया तर मुळीच नाही. आणि मी तिला आज राहू देणार नव्हतो. मला माहिती आहे ती ज्युडो फायटर आहे. पण म्हणून काय झाल ? तिला बाहेर काढण्या इतपत माझ्या अंगी ताकद नक्कीच आहे. पण तरीही आपर्तमेंट मधल्या चार मुलांना सर्व सांगून टाकल. बरोबर आत वाजता घरी या. आणि बेल दाबा. आज हा कार्यक्रम उरकायचाच, पिया देशमाने या घरात कोणत्याही परीस्थित रहाणार नाही”

घड्याळात आठ वाजले आहेत. पिया आत स्वयंपाक करत आहे. मी पूर्ण तयारी आहे. माझ्या हातात काठी आहे. आणि दारावरची बेल वाजते आहे.

Group content visibility: 
Use group defaults

मस्तच..
कथा इथे थांबली तरी ठीक.. पण पुढे गेली तर अजून आवडेल..

भारी Lol

पण पुढे गेली तर अजून आवडेल.. >>> +१

लय भारी राव
नाटकाचा पुढला अंक येऊ दे लवकर

न्हाय मालक ! आसं अज्याबात चालायचं न्हाय ...
एकट्या बाई माणसाला बघून चार चार पोरं अंगावर घालता मंजी ?

फूडं काय झालं आमास्नी कळाय फायजी !!