वॉटरटन (अ हिडन जेम इन कॅनडा) - भाग २ (अंतिम) - प्रेक्षणीय स्थळे

Submitted by मध्यलोक on 27 January, 2024 - 23:24

भाग १ : https://www.maayboli.com/node/84575
================================================================

वॉटरटन ब्लॉगच्या पहिल्या भागात आपण क्रुझचा अनुभव घेतला, कॅनडा व अमेरिकेची इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस केली. क्रुझ वरून परत आलो ते वॉटरटन मधील इतर जागा एक्सप्लोर करण्यासाठी. पहिल्या भागात सांगितल्या प्रमाणे ब्लॉगच्या या भागात आम्ही वॉटरटनमध्ये काय बघितले हे तुमच्या सोबत शेयर करतोय.
Waterton-P2-030.JPGवॉटरटन – प्रेक्षणीय स्थळे

इंटरनॅशनल पिअर (जेट्टी) वरून गावात आलो आणि पायी फिरायला सुरुवात केली. नेटवर वाचले होते कि इथे इलेक्ट्रिक सायकल भाड्याने मिळतात. त्या कुठे मिळतील हे आम्हाला खूप शोधावे लागेल नाही, कारण गावातील एकुलत्या एक अश्या गॅस स्टेशन शेजारीच या इलेक्ट्रिक सायकल दिसल्या, पण कदाचित आमच्या नशिबात पायी फिरणे असावे म्हणून दुकान बंद होते आणि आम्ही हिरमुसल्या चेहऱ्याने पुढे चालू लागलो.
Waterton-P2-001.jpgवॉटरटन मधील एकुलते एक गॅस स्टेशन
Waterton-P2-002.jpgइलेक्ट्रिक सायकल

पण आमचे हे चेहेरे लगेच प्रसन्न होणार होते कारण गावातील सगळ्यात प्रसिद्ध अशी जागा म्हणजे "कॅमेरॉन फाँल्स" शब्दशः वॉकिंग डिस्टन्स वर होती.आम्ही चालतच इथे पोहोचलो. हा धबधबा वॉटरटन मधील सगळ्यात प्रसिद्ध धबधबा असून इथे सगळ्यात जास्त फोटोग्राफी केली जाते असे इथल्या स्थानिकांचे म्हणणे आहे.
Waterton-P2-003.jpgकॅमेरॉन फाँल्स
Waterton-P2-004.jpgमाउंटन कपल

आम्हीही इथे एक सेल्फी काढली आणि तेवढ्यात फॉल्स शेजारी असलेल्या माहिती फलकावर आम्हाला येथील अजून दोन स्थळांची माहिती मिळाली. तो बोर्ड वाचून आम्ही त्यातील एका म्हणजे वेस्टर्न कॅनडा मधील पहिल्या तेल विहीरीकडे निघालो. पण यावेळी अंतर ७ किलोमीटर असल्याने गाडीने निघालो. वळणदार रस्ते, दुतर्फा डोंगर, झाडी आणि निळे आकाश, निसर्गाचे हे दृश्य बघून सुरुवातीलाच ट्रिप सफल झाल्याचे वाटले पण हि तर ट्रिपची सुरुवात होती.
Waterton-P2-005.jpgनिसर्गरम्य रस्ता
Waterton-P2-006.jpgवेस्टर्न कॅनडा मधील पहिली तेल विहीर

कॅमेरॉन वॉटरफाँल्स पासून साधारणतः १० मिनिटांच्या ड्राईव्हने आम्ही वेस्टर्न कॅनडा मधील पहिल्या तेल विहिरी जवळ पोहोचलो. या तेल विहिरला "लाईनह्याम डिस्कवरी वेल नंबर 1" असे नाव आहे. १९०२ मध्ये इथून पहिल्यांदा तेल उत्पादन केले गेले तेव्हा इथे फक्त १०२० फुटांवर तेल सापडले होते. पण १९०८ मध्ये इथले तेल उत्पादन बंद झाले आणि पुढे १९६५ साली या जागेला राष्ट्रीय ऐतिहासिक स्मारक म्हणून घोषित करण्यात आले.सध्या या जागेवर असलेल्या वेल शाफ्टला बंद करण्यात आले आहे आणि सोबतीला माहितीसाठी इथे एक स्मृती फलक लावला आहे.
Waterton-P2-007.jpgतेल विहिर

त्यावरील माहिती वाचली आणि इथून जवळच असलेल्या "कॅमेरॉन लेक" कडे जाण्याचे ठरवले.डोनाल्ड कॅमेरॉन या ब्रिटिश आर्मी मधील कॅप्टनच्या नावावरून या तलावाला हे नाव देण्यात आले आहे. हा तलाव सुद्धा अमेरिका आणि कॅनडा असा दोन्ही देशात विभागला गेला आहे, पण आकाराने वॉटरटन लेक पेक्षा फारच छोटा आहे.आम्ही उभे होतो तो उत्तर किनारा कॅनडा मध्ये तर समोर असणारा दक्षिण किनारा अमेरिकेत होता.
Waterton-P2-008.jpgकॅमेरॉन लेक

हा तलाव फार खोल नसल्याने इथे पर्यटक मौज मजेसाठी, पोहण्यासाठी आणि मासेमारी साठी येतात.आमच्या लिस्ट मध्ये यापैकी काहीही नसल्याने आम्ही किनाऱ्यावर बसून जेवण करूया असा प्लॅन केला. तलावा शेजारी असलेल्या पिकनिक टेबलवर बसलो, सोबत आणलेले डब्बे उघडले आणि वनभोजनाचा आनंद घेतला

मग पुढे निघालो ते वॉटरटन मधील सगळ्यात सुंदर अश्या इमारतीकडे म्हणजेच "प्रिन्स ऑफ वेल्स" हॉटेलकडे.
Waterton-P2-009.jpgवॉटरटन लेक आणि टेकडीवरील “प्रिन्स ऑफ वेल्स” हॉटेल

१९२७ मध्ये ग्रेट नोर्थेन रेल्वेने किंग एडवर्ड आठवा म्हणजेच प्रिन्स ऑफ वेल्सच्या कॅनडा मधील स्वागतासाठी १२१ फूट उंच आणि ७ मजली भव्य असे हॉटेल बांधले.
Waterton-P2-010.jpg“प्रिन्स ऑफ वेल्स” हॉटेल

याचा उपयोग त्यांना प्रसिद्धी साठी करायचा होता पण एडवर्ड आठवा जेव्हा कॅनडामध्ये आला तेव्हा त्याने दुसरीकडेच मुक्काम केला आणि हॉटेल तसेच राहिले. ह्याची भव्यता,स्थापत्यशैली आणि इतिहास यामुळे १९९२ मध्ये याचेही रूपांतर राष्ट्रीय ऐतिहासिक स्मारकामध्ये करण्यात आले. हॉटेल बघण्यासाठी आत आलो तर कळले काही कारणास्तव ते बंद आहे. मग काय बाहेरूनच हॉटेल बघायचे ठरवले. फेरफटका मारत हॉटेलच्या मागच्या भागाकडे गेलो तर तिथून वॉटरटन तलावाचे विहंगम दृश्य दिसत होते. आणि सोबतीला होते हिरवे डोंगर व झाडी.
Waterton-P2-011.jpg“प्रिन्स ऑफ वेल्स” हॉटेल पासून वॉटरटन तलावाचे दिसणारे विहंगम दृश्य

हे बघून आम्हा उभयंताना शाहाजी बापूच्या डायलॉगची आठवण झाली आणि दोघांनी एका सुरात "काय झाडी, काय डोंगार, काय हाटील" असे म्हणत हास्याची उधळण केली. ते ऐकुन शेजारी असलेले विदेशी लोक पण आमच्या सोबत (का आमच्यावर ?) हसायला लागले Lol

दुपार टळून आता बराच वेळ झाली होती आणि वॉटरटन मध्ये गर्दी वाढल्याचे जाणवत होते. तेवढ्यात तलावातून गावाकडे येणारी बोट दिसली आणि त्यावर असलेली गर्दी सुद्धा, आम्ही सकाळची क्रूझ केल्याने नशीबवान ठरलो होतो. मग इथे अजून थोडा वेळ घालवला, दगडांच्या लगोऱ्या रचल्या आणि थोडीशी ट्रिक फोटोग्राफी केली.दोंघांचा एक फोटो काढला आणि आमच्या पुढील गंतव्य स्थळाकडे म्हणजे इथे असणाऱ्या "रेड रॉक कॅन्यन" कडे निघालो.
Waterton-P2-012.jpgदगडांच्या लागोऱ्या
Waterton-P2-013.jpgथोडी ट्रिक फोटोग्राफी
Waterton-P2-014.jpgआम्ही दोघे

अगदी पाच मिनिटेच ड्रायविंग झाले असेल तेव्हा एका पठारी भागात हालचाल होताना दिसली.गाडी हळू केली तर दूर एक अस्वल बेरींवर ताव मारताना दिसले.
Waterton-P2-015.jpgग्रिझली अस्वल

ते एक ग्रिझली अस्वल होते. गाडी थांबवली आणि झूम करून काही फोटो व व्हिडिओ काढले.आम्ही पहिल्यांदाच ग्रिझली अस्वल बघत होतो.आमची आजच्या दिवसाची दुसरी लॉटरी लागली होती. बराच वेळ आम्ही दुरूनच अस्वल बघत होतो. शेवटी तो आम्हाला कंटाळला असावा आणि मग तो आपल्या मार्गाने गेला आणि आम्ही आमच्या, म्हणजे रेड रॉक कॅन्यनकडे.
Waterton-P2-016.jpgरेड रॉक कॅन्यन

आर्जिलाइट (Argillite) प्रकारातील, लोह खनिजयुक्त असलेल्या लाल रंगाच्या दगडाची नदीच्या पाण्याने झीज होऊन निसर्गाने केलेला सुंदर कलाविष्कार आपल्याला इथे बघायला मिळतो. पाण्याचा प्रवाह कमी असल्याने आपल्याला ह्या दरीत उतरता येते आणि आत मध्ये फिरण्याची मजाही घेता येते. आम्हीही पाय मोकळे करण्यासाठी दरीत एक फेरफटका मारला. कॅनडामध्ये असलो तरी महाराष्ट्रातील सांधण दरीची आम्हाला इथे आठवण आली.
Waterton-P2-017.jpgआर्जिलाइट (Argillite) प्रकारातील लोह खनिजयुक्त असलेला लाल रंगाचा दगड

बराच वेळ दरीच्या तळाशी बसत आम्ही गारव्याचा आनंद घेतला, काही फोटो काढले आणि वॉटरटनकडे परत निघालो. पार्किंग मधून बाहेर निघताच साधारण एक किलोमीटर अंतरावर पुन्हा एक अस्वल दिसले, यावेळी ते एक काळे अस्वल होते.
Waterton-P2-018.jpgकाळे अस्वल

आज काय सुरु होते हेच आमच्या लक्षात येत नव्हते. एकाच दिवसात अमेरिकेची सफर झाली, आधी ग्रीझली अस्वल दिसले आणि आता काळे अस्वल दिसले. आता असे वाटते कि कदाचित त्या दिवशी १ मिलियनची लॉटरी घेतली असती तर ती पण लागली असती.असो, पुन्हा वॉटरटनला येऊया.

अस्वल दिसले तिथे रस्ता अरुंद होता आणि मागे ट्रॅफिक, त्यामुळे आम्ही थांबलो नाही आणि पुढे निघालो ते गवे बघण्यासाठी "बायसन पॅडॉक"ला. एका मोकळ्या मैदानात पण कुंपणात इथे अनेक गवे ठेवले होते. आपल्याला गाडीत बसून अगदी थोड्याश्या अंतरावरून त्यांना बघता येत होते.
Waterton-P2-019.jpgबायसन पॅडॉक
Waterton-P2-021.jpgबायसन पॅडॉकमधील गवे

संध्यकाळ व्हायला सुरुवात झाली होती त्यामुळे आम्ही गव्यांची एक झलक बघितली आणि इन्फो सेंटर कडे परतलो. पण इथले इन्फो सेंटर हे काही साधे सुधे इन्फो सेंटर नसून अद्ययावत माहिती केंद्र होते याची प्रचिती आम्हाला आत गेल्यावर कळली व आत असणाऱ्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानाची माहिती झाली.
Waterton-P2-022.jpgइन्फो सेंटर मध्ये प्रवेश करतांना

आत शिरताच एका भव्य म्युरल पेंटिंगने आमचे लक्ष वेधून घेतले. त्यावर अनेक प्राणी, पक्षी आणि निसर्गसंपदेचे चित्रण होते.
Waterton-P2-023.jpgभव्य म्युरल पैंटिंग

सोबतीला इथे डिजिटल स्क्रीन होत्या, ऑडिओ विज्यूअल माहिती देणारे बूथ होते.
Waterton-P2-024.jpgऑडिओ व्हिज्युअल स्क्रीन

इथल्या मूलनिवासी लोकांचा टेंट,म्हणजेच "टीपी" होता. प्राण्यांच्या प्रतिकृती होत्या आणि इथे काही गेम्स पण होते. त्यापैकी एक खेळ होता, तो म्हणजे प्राण्यांच्या विष्ठेचा देखावा आणि त्यावरून तो कोणता प्राणी असेल हे आपल्याला ओळखायचे होते.या छोट्याश्या कुतूहलाचा खेळातून आपल्याला प्राणी कळतात आणि त्यांची माहिती ही मिळते व पुढील वेळी आपण जंगलात फिरताना जागरूक पद्धतीने प्राण्यांच्या विष्ठेकडे बघतो. इथे कयोटे, कुगर, हरीण, अस्वल इत्यादी प्राण्यांची माहिती आपल्याला मिळते.
Waterton-P2-025.jpgकुतूहल जागृत करणारा खेळ
Waterton-P2-026.JPGओळखा पाहू ? (क्लॉकवाईज – विष्ठेचे मॉडेल, पंजा, प्राणी)

याच्याच पुढील बाजूला पुन्हा एक मोठे म्युरल चित्र होते आणि यावर जलचर, भूचर, उभयचर असे अनेक प्राणी होते. इथे सोबतीला एक टच स्क्रीन होती आणि त्यावर या म्युरलचे डिजिटल चित्र होते. चित्रातल्या प्राण्याला स्पर्श केला की त्याची इत्यंभूत माहिती आपल्या समोर दाखवली जात होती. प्राण्याची माहिती शिकवण्याचे हे तंत्र आम्हाला फार आवडले.
Waterton-P2-027.JPGम्युरल आणि त्या समोरील टचस्क्रीन

या चित्राच्या बाजूला होते वॉटरटनचे 3D मॉडेल आणि याच्याही शेजारी एक टच स्क्रीन होती. यावर मात्र वॉटरटन मधील भूगोल आणि वातावरण या बद्दल माहिती होती.
Waterton-P2-028.jpgवॉटरटनचे ३D मॉडेल आणि टचस्क्रीन

हे पूर्ण इन्फो सेंटरच इंटरॲक्टीव असे तयार करण्यात आले होते, जेणे करून आपल्याला इथली माहिती मिळेल आणि त्या विषयात रुची निर्माण होईल. दिवसाच्या शेवटी असे आगळेवेगळे इन्फो सेंटर बघायला मिळाले हे बघून माझ्या सोबत आलेल्या मित्राच्या लहान मुलीला फारच आनंद झाला. तिच्यासाठी आजच्या दिवसातील हि सगळ्यात बेस्ट जागा होती. बाहेर अंधार पडायला सुरुवात झाली होती पण तिचा काही पाय निघेना, शेवटी आईसक्रीमच्या डील वर आम्ही पुन्हा गाडीत बसलो. जेवण करून कॅल्गरीला पोहोचायला रात्रीचे अकरा वाजले आणि एक सुखद अशी ट्रिप संपली.
Waterton-P2-029.jpgपरत येतांना झालेले चंद्र दर्शन

~ मध्यलोक

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान फोटो, सुंदर जागा..

"काय झाडी, काय डोंगार, काय हाटील" >>> हाच प्रतिसाद मनात आलेला Proud

छान ट्रिप झाली
उत्तम।लिहिलंय
बापू एका डायलॉग मुळे अख्ख्या वर्ल्ड मध्ये फेमस हां Happy