जे वेड मजला लागले... (भाग तीन)

Submitted by Abuva on 23 January, 2024 - 08:05
scarecrow on a fallow land (DALL-E)

काही वेळाने:

"मॅडम, तुमच्याशी बोलायचय.”
"हं बोल, पूनम..”
"ते माझी सॅलरी कधी सुरू होणार ते विचारायचं होतं.”
"पूनम, खरं सांगायचं तर मला तुझा पर्फॉरमन्स पटलेला‌ नाही. मगाशी आपण तुमच्या प्रोजेक्टचा रिव्ह्यू केला तर तुझ्याकडे बरंच काम पेंडिंग दिसतंय.”
"मॅडम पण..”
"थांब जरा. ऐकून घे. तू प्रत्येक गोष्टीला हो म्हणते आहेस. प्रत्येक पेंडिग काम तू पुढच्या आठवड्यात होईल असं म्हणते आहेस. जे काम गेल्या तीन आठवड्यात झालं नाही, ते एका आठवड्यात कसं होणार आहे?”
"नाही मॅडम, मधे माझी तीन दिवसांची सुट्टी झाली ना म्हणून ते झालं नाही.”
"हां, हा आणखी एक मुद्दा. तुझ्या सारख्या सुट्ट्या चालू असतात.”
"मॅडम, लग्नाचं पैलं वर्ष आहे. कुळधर्म-कुळाचार असतात, सणवार असतात.”
"हे बघ पूनम, मला हे सगळं मान्य आहे. पण सगळ्या प्रॉजेक्टवर यांचा परिणाम होतो त्याचं काय?”
"मॅडम, म्हंजे मी लग्न केलं हा गुन्हाच की!”
"पूनम, उगाच विषय भरकटवू नकोस. आणि रडून काय होणार आहे?”
"मॅडम, तिकडे घरी म्हणतात पगार नाही अन् काय नाही तर नोकरी कसली करते. तिथे घरी बोलणी खायच्या अन् इथं येऊन तुम्ही असं बोलता. तिथे सगळं घरचं आटपून मला सकाळी धा ला हितं यायचं. परत घरी जाऊन रातचं रांधायचं. ते म्हंतात की नोकरीवाली पोरगी‌ सांगितली म्हणून आम्ही करून घेतली. आता इतके दिवस झाले अन् तरी पगार कसा देत नाही घरी? का भायेर कुठं उधळतीस? आता मी तरी काय सांगू? आता फुडल्या मैन्यात आमच्या म्हायेरच्या देवीला जायाचं तं नवरा मंतो तू खर्च कर. आता मी पैसं कुठनं आणू. वडील तर लग्नाच्या खर्चातच डुबले हायेत. त्यांना कुठल्या तोंडानं मागू. हिते प्रियांकान कोमलकडून बी पैसं घेतलयत मी.”
...
"पूनम, झालीस का तू शांत? हे बघ, हे सगळे प्रॉब्लेम मला मान्य आहेत. पण त्याची उत्तरं तुलाच शोधायची आहेत. घरच्या प्रॉब्लेम मध्ये मी तुला मदत करू शकणारे का? मी एकच करते चल, या महिन्यापासून तुला पगार चालू करू. पण लक्षात ठेव, तुला असाईन केलेलं काम झालंच पाहिजे.”
"हो मॅडम नक्की करीन..”
(हे सगळं उरावर घेऊन ही काय काम करणार आहे? ईश्वरा, काय काय करायचं? ...)

दोन महिन्यांनंतर, एका शनिवारी सकाळी:

"कोमल, जरा इकडे ये. एक विचारायचय. हे शेजारचे काका मला सांगत होते की पूनम खूप वेळ बाहेर फोनवर बोलत उभी असते म्हणून? तासंतास बोलते म्हणे. आणि त्यांचं म्हणणं होतं जोराजोरात भांडणं आणि रडणं पण चालू असतं? काय खरं आहे?”
"नाही मॅडम, म्हणजे बोलते ती. पण म्हणजे... मॅडम, तिच्या घरी जरा प्रॉब्लेम चाललेत.”
"बाई गं! हे काही खरं नाही. कसले प्रॉब्लेम?”
"मॅडम, तिच्या नवऱ्याचं अन् तिचं भांडण झालंय. सासुरवास खूप आहे म्हणते ती.”
"मग?”
"सुटंल ते. तुम्ही नका पडू त्यात.”
"अगं पण शेजारपाजारच्या लोकांच्या डोळ्यावर येतंय ते. आपला असा हा वेगळा प्रयोग म्हणून आधीच लोकांचं लक्ष जास्त. त्यात जास्त इथे मुलींच. कसं सगळं मॅनेज करायचं? बरं, मला तर वाटतंय तो गणेश तिच्या कामावर पांघरूण घालतोय. ते काका म्हणत होते ते दोघं पण गप्पा मारत बाहेर उभे असतात. आता काकांची आपल्याला इतकी मदत होते, म्हणून त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलंच पाहीजे. त्यात ते आपले घरमालक. इथे काय होतं त्याची काळजी असणारच ना त्यांना.”
"हो मॅडम”
"हो काय? जरा कंट्रोल ठेवा. आणि बाहेरच्यांनी सांगण्या आधी तुम्ही मला सांगत जा ना. ठीक आहे. जा तू.”

त्याच दिवशी दुपारी:

"गणेश, ही डिलीव्हरी‌ झाली की मी पूनमला कोमलच्या टीम मध्ये शिफ्ट करणार आहे. तिकडचं काम वाढतंय. दुसरं, तू नव्या ट्रेनिंग बॅचमधली‌ मुलं तुझ्या टीम मध्ये घे.”
"कोमल आणि पूनम, कळलंय नं? पूनम, नीट काम करायचंय. काय? फोनवरचा वेळ कमी करा. बोलले आहे मी कोमलशी.”
"हो मॅडम”

सुमारे एक महिन्यातनंतर एका शनिवारी संध्याकाळचे चार वाजले आहेत.
स्वाती आणि गणेश हे अण्णासाहेबांच्या फॅक्टरीत इआरपीच्या इंम्प्लेमेंटेशनसाठी गेलेले‌ आहेत:

"हॅलो मॅडम!!!”
"काय गं कोमल, काय झालं?!”
"मॅडम, पूनमनी आत्ता औषध घेतलंऽऽ”
"औषध घेतलं म्हणजे? मला काही कळलं नाही.”
"मॅडम, पूनमनी आत्ता विषारी औषध घेतलं”
"काऽय?”
"हो मॅडम”
"ऑफिसमध्ये? कधी?”
"आत्ता. मनोजनं सरांना लगीच बोलावलं. ते तिला गाडीत घालून हॉस्पिटलला घेऊन गेलेत.”
"माय गॉड! माय गॉड! माय गॉड!”

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अरे बापरे!
पूनम आधीपासून गडबड girl वाटत आहे.