सोबत - २

Submitted by रघू आचार्य on 14 January, 2024 - 16:05

समोर एक मनुष्याकृती उभी होती
आधीच्या भागावरून पुढे चालू

पावसाची रिमझिम आता संततधार झाली होती.
काही क्षणातच मुसळधार पाऊस पुन्हा सुरू होईल हे दिसत होतं.
आताच नीटसं दिसत नव्हतं.
पावसामुळे एसी चालू ठेवून वायपर मीडीयम स्पीड वर ठेवलेले होते.
एलईडी हायलाईटने शाळेतल्या ढ मुलाप्रमाणे पावसातली आपली हुषारी खांदे उडवत कबूल केली होती.

थांबावं कि जावं ?

कि कोण आहे ते जाता जाता बघावं ?

मी गाडी स्लो केली. आतले दिवेही लावले.
स्त्री होती ती.

सलवार सूट सारखंच काहीतरी होतं ,अंधारात दिसत नव्हतं. पण इतके समजत होते कि पोषाख महिलेचा आहे.
छत्रीने दगा दिला होता. ती चांगलीच भिजलेली होती.
पुन्हा मनात विचार आला..

थांबावं कि निघावं ?
कोण असेल ही ?
या वेळी ?
अशा ठिकाणी ?
पोषाखावरून स्थानिक तर वाटत नाही.स्थानिक असती तर इथे वाट बघत उभी राहिली नसती.
बाहेरची असेल तर हिची गाडी पण दिसत नाही.

सापळा तर नसेल ?
छे ! अशा सापळेवाल्या बायका आणि इतके महागडे फॅशनेबल कपडे ? शक्य नाही.
चेहरा दिसत नसला तरी स्त्री तरूण आणि टिपटॉप होती.
नाही थांबलो आणि हिच्यावर काही प्रसंग आला तर ?
शाळेतल्या सरांनी मुलांनी मोठे झाल्यावर स्त्रियांचे रक्षण का करावे हे शिकवलेले आठवले. पुरूषांवर ही जबाबदारी असते.
आणि संकटात सापडलो तर ?
पुढे गेल्यावर हिने आरडाओरडा केला तर ?
आणि सर्वात महत्वाचे पण जी शक्यता मी मेंदूतच दाबून टाकायला बघत होतो. बॅक अप बफर मधून समोर येऊ देत नव्हतो...
ही "तसला" प्रकार तर नसेल ना ?

जे दाबायला पाहत होतो तेच उसळी मारून आलं.
आणि साहसाची एक शिरशिरी सर्वंगातून वीजेसारखी खालून वर गेली.
रिस्क घ्यायची प्रवृत्ती उफाळून आली.
"लेट अस टेक अ चान्स "

हाय रिस्क हाय गेन !
शेअर मार्केट आणि रिअल इस्टेटचा हा मंत्र सगळीकडेच चालू होतो.
मुलींच्या बाबतीत पण. जी मुलं रिस्क घेऊन पोरींना अ‍ॅप्रोच होतात त्यांनाच पोरी पटतात.
बाकिचे कण्हत कुथत "सभ्य" आयुष्य जगतात.
आयुष्यात कधी कुठल्या मुलीकडे पाहिलं नाही म्हणून मिरवत राहतात.
वपुंच वाक्य आहे एक " संधी मिळत नाही म्हणून प्रामाणिक".
संधी मिळत नसते. घ्यावी लागते.

पण इथे रिस्क जिवाची होती.
एक मन सांगत होतं, असं काहीही नसतं. बुद्धीही तेच सांगत होती.
पण इथल्या लोकांचे अनुभव, आताच्या जाणिवा वेगळंच सांगत होत्या.
कुठेतरी धोक्याच्या घंटा किणकिणायला लागल्या होत्या.

अजून चेहर्‍याचे दर्शन झालेले नसले तरी एकूण बांधा, पेहराव यावरून आकर्षक स्त्री वाटत होती.
एकीकडे द्वंद्व चालू असताना त्यातली एक बाजू एका क्षणी निर्णायक झाली आणि मी ब्रेक मारला.

"कुठे जायचंय ? काही मदत करू शकतो का ?"
अरे यार, हे तू काय बोललास ? हे स्क्रीप्ट मधे नव्हतं.माझं एक मन दुसर्‍याला बजावत होतं.
पण हे मलाही नकळत होत होतं. ब्रेक मारला गेला, तिला आमंत्रण पण दिलं. माझा माझ्यावर ताबा राहिला नव्हता.

तिने कारकडे पाहिलं असावं.
मग वाकून कारच्या आत पाहिलं. ती चार पावलं जवळ आली.
आत लाईट्स होते. तिला बाहेरून आतलं दिसत होतं. मला तिचा चेहरा अद्याप दिसला नव्हता.
तिने काचेवर टकटक केली .
मी काचा खाली घेतल्या.

"तुम्हाला काही त्रास होणार नसेल तर.."
" छे छे त्रास कसला ? असाही मोकळाच जाणार होतो"
" नक्की ना ?"
यार या बायकांचं हे काय असतं ? एकीचं म्हणून नाही, सगळ्या अशाच. कुणी मदत करत असला तरी ही धोबीपछाड टाकणारच.
नंतर म्हणायला मोकळ्या "मी नव्हते येणार,तुम्हीच आग्रह केला"
हा असा खोडा न कळणारे खरंच सुदैवी. ज्यांना समजतं त्यांना जाणूनबुजून खोड्यात शिरावं लागतं.
नाही म्हणजे सडेतोड उत्तर दिल कि मग ती म्हणणार " नाही नाही,तुम्ही जा,उगीच माझ्यामुळे त्रास"
मग खरी पंचाईत !
अशा वेळी एकटीला सोडून जाणे पुरूषाच्या जातीला काळिमा फासणारे ठरते.
तिलाही कल्पना असते.इनफॅक्ट याने स्वतःहून आग्रह केला तरच मी येणार ही खूणगाठ बांधलेली असते.
तुला गरज असेल तर मला लिफ्ट दे...

आणि हा प्रसंग येऊ नये म्हणून आपल्यालाच गरज आहे हे दाखवावेच लागतेल
तरूण , आकर्षक स्त्री ची सोबत कुणाला नकोशी वाटेल ?
कितीही सभ्य पुरूष असला तरी काही क्षणांची सोबत का नाकारेल ?
बुद्धीमान आणि चतुर पुरूष त्या हव्याहव्याशा सोबतीलाच सभ्यतेच्या कसोटीत टाकेल.

मी हसून म्हणालो "शुअर"
पुढचे प्रश्न अपेक्षेप्रमाणेच आले.
मग ठेवणीतले वाक्य तिला ऐकवले.
" इतकं फॉर्मल व्हायची गरज नाही. कुठल्याही पुरूषाने अशा ठिकाणी एखाद्या स्वाभिमानी आणि स्वतःवर विश्वास असलेल्या कर्तृत्ववान स्त्री ला सोडून जाणे सभ्यतेत बसत नाही. खरं तर स्त्रीच काय , कुणीही सभ्य व्यक्ती मग लहान मूला पासून वृद्ध कुणीही असो, मदत करायलाच पाहिजे."
" थँक्स"
असं म्हणत एकदाची ती दार उघडून आत आली.
"त्यात आभार काय मानायचे ? समजा तू गाडी चालवत असतीस आणि मी अशा वेळी इथे थांबलेलो असतो तर तू नसती मदत केली ?"
मी आगाऊपणे अरे तुरे करत होतो.
"नाही "
"काय नाही ?"
" म्हणजे मी नसते थांबले" ती हसू दाबत म्हणाली.
च्यायला ! बायकाच त्या. अशा प्रसंगात सुद्धा अशी उत्तरे देऊ शकतात. आपण नसतो बोललो असं..
थोडा चडफडलो. सणसणीत उत्तर द्यावंसं वाटलं.
" राग तर नाही ना आला ?"
हे एक आणखी. जखमा द्यायच्या मग मलम लावतोय म्हणून मीठ चोळायचं.
सगळ्या बायका जन्म घेण्याआधी पोलिसांकडून थर्ड डिग्री टॉर्चर शिकून आलेल्या असतात हा माझा आवडता सिद्धांत पक्काच झाला.
"छे छे, राग कसला ? "
हल्ली तर काही पुरूष सुद्धा ही ट्रीक वापरतात. आधी काहीतरी खडूस बोलतात.
मग समोरचा हिरमुसला कि "अरे तू ऑफेण्ड झालास ? मी तर गंमत करत होतो"
अरे एखाद्याने कानावर बंदूक ठेवली तर तेव्हढा सीन गंभीरपणेच घ्यायचा असतो.
तिथे हसत सुटलो आणि समोरच्याला राग आला तर रामनाम सत्य होण्याची शक्यता असते.

सोबत मिळाली होती.
पुढ्चा प्रवास आता मस्त होणार होता.
अब चाहे मां रूठे या बाबाच्या चालीवर आता रात्र होऊ दे नाहीतर पावसाचा जोर वाढू दे.. दुनिया गयी तेल लगाने !

"कुठे जायचंय ?"
"सांगेन मी. उतरायचं झाल्यावर थांबवेन "
" अरे पण किती लांब जायचेय वगैरे माहिती असेल तर तसं तयारीत रहायला "
ती बाहेरच्या बाजूला बघत राहिली. प्रश्नाचे उत्तर टाळले होते.
"मघाशी मी नाही म्हटले, तुम्हाला राग आला ना ?"
" अरे तुरेच ठीक आहे. नाही आला राग"
ती पुन्हा बाहेर बघत राहिली.
" का बरं नाही आला राग ?"
आयला ही आता क्राईम पॅट्रोल वाल्या पोलिसांसारखी कुरतडून काढणार. बायका आणि पोलीस. जगातले सगळे पुरूष जन्मजात गुन्हेगार असल्याच्या थाटात प्रश्न करतात. यांच्यासाठी कुठे कोर्स असतो प्रश्नांच्या सरबत्तीचा ?

"राग न येण्याचं कारण म्हणजे मी पुरूष आहे. एखाद्या तरूण मुलीने न थांबता जाण्यात तिचं बुद्धीचातुर्य दिसतं "
ती हसली.
"आणि तुमचं ?"
"तुझं"
ती पुन्हा हसली.
"बरं.तुझं ?"
" अरे यार ! हाच तर पेच असतो ना ?"
आणि छातीत धस्स झालं. हे काय गेलं तोंडून !
पण ती खळखळून हसली.बहुतेक पुरूषांची फजिती हा तिचा आवडता टाईमपास असावा.
आता बहुतेक रिव्हर्स रॅगिंग होणार प्रवासभर..

आणि डोक्यात ट्यूबलाईट चमकली.
आपण ज्या वेळी सोबत असलेल्या मुलींचं रॅगिंग करतो... रॅगिंग ?
नाही यार. त्या सुद्धा एंजॉय करतात..
पण हेच रिव्हर्स झालं कि फजिती झाल्यासारखे वाटते.
"कसला पेच ?"
" नाही नाही. असंच गंमतीने म्हणालो"
" अच्छा, विनोदी आहेस तर "
ती कष्टाने एकेरीवर येत म्हणाली.

"पण असा विश्वास मी बाई आहे म्हणून टाकला?"
" बाई ?"
" का बाई नाही का मी ?"
" छे ! मुलगीच म्हणेन"
कितीही चतुर असली तरी थोडी सुखावल्याने उसंत मिळणार होती.उसंत मिळाली कि प्रतीआक्रमण करता आलं असतं.
" थँक्स " थोडी तरी लाजली असेलच.
चेहरा अजूनही दिसत नव्हता. ओले केस चेहर्‍यावर होते .
मघाशी सीटवर बसल्यावर तिने तिचे कुरळे केस नॅपकीनने पुसले होते.
ते आठवून मी विचारलं
" एसी बंद करू का ?"
" आणि समोरचं कसं दिसणार ?"
" ते ही खरंच "
"मागे सीटवर जर्किन आहे. अंगावर ओढून घेतेस का ?"
तिने काही न बोलता हात मागे करून जर्किन ओढून घेतलं. तिला गरज होती.
" तू भिजली आहेस. कपडे ओले.त्यात एसी. सर्दी पडसं नक्कीच होणार"
" मला सर्दी होत नाही"
"कसं शक्य आहे ?"
" सर्दीच काय ताप थंडी पण कधीच नाही"
मी पुन्हा काही बोलणार, पण तिचं बोलणं विचित्र वाटत होतं.
" माझ्यावर का विश्वास टाकला ?"
" विश्वासापेक्षा वेळ आणि जागा. मागून कुणी गुंड आले असते तर ?"
" ते काय करणार होते ?"
" म्हणजे ?"
" मी माझं रक्षण करू शकते"
या नव-फेमिनिस्ट मुली मॅच्युअर्ड बायकांपेक्षा टोकदार उत्तरं देतात. ठीक आहे तू अबला नाहीस. मला तसं म्हणायचंही नाही. पण या नेहमी असाच उलटा अर्थ काढतात.
" मला तसं म्हणायचं नव्हतं. तू सक्षम आहेस. पण जास्त लोक असते तर ?"
तर काय ? जास्त लोक असते तर एकट्या पुरूषाला सुद्धा मुकाबला करता येणार नाही. ती असं बोलू शकते असं वाटलं.
" येस यू आर राईट "
जीव भांड्यात पडला.
"फक्त त्यासाठीच गाडी थांबवली ?"
हा प्रश्न फार सूचक असतो. हाच मी विचारला असता तर ती ऑफेण्ड होऊ शकली असती, हसली असती.... किंवा काहीही बोलू शकली असती.
मी फक्त हसलो.
" तू पण तर माझ्यावर विश्वास टाकलास ना ?"
" प्रथम दर्शनी तर सभ्य वाटतोस "
"थँक्स "
" पण मी कुणीही असू शकते ही शक्यता का नाकारलीस ?"
" कुणीही म्हणजे ?"
" कुणीही म्हणजे कुणीही "

हे संभाषण थोडं वेगळ्या दिशेला चाललं होतं.
एकीकडे तो साहसी जीन वळवळायला लागला होता.
कुणीही म्हणजे ? या घाटात ही एकटी कशी ? मघाशी धोक्याचे इशारे मिळाले होते.
परत दुसरे मन माझा मेल इगो कुरवाळू लागले.
'अरे काय घाबरतोस एका बाईला ? ती स्वतः घाबरलीय हे दाखवायचं नाही म्हणून तुला घाबरवतेय. जादा शहाणपणा करतेय'

एकाएकी गाडीत गारठा खूप वाढल्याचे जाणवले.
" थंडी वाजतेय का ?"
मी विचारलं"
"एसी वाढवलाय ना मघाशी तू ?"
मी वाढवला ? बहुतेक मघाशी एसी बंद करू का विचारताना चुकून वाढवला असेल.

एसी कमी केल्यावर जरा नॉर्मलला आलो.
पाऊस थांबला होता.
रात्रीला सुरूवात व्हायची होती. संधीप्रकाश सोबत होता.
पिठूर चांदण्याला अटकाव करेल एव्हढाही प्रकाश नव्हता. एक बरं झालं.
एसी आणि वायपर बंद केले. हीटर चालू केला.

गाडीतला गारठा कदाचित तिच्या ओल्या कपड्यांनीही असेल. मघाशी मी सुद्धा भिजलेलो.
हीटर ने खूप बरं वाटलं.

"कॉफी ?"
" गाडीत ?"
" नेसकॅफेचा ई स्मार्ट मग आहे १२ व्होल्ट डीसीचा. लगेच गरम होईल"
" तू घे. मला नको"
"अरे बरं वाटेल. इथे कुठे चहाची टपरी पण नाही मिळणार"
"मला नाही गरज चहा कॉफीची "
"तू घेत नसशील तर मलाही नाही घेता येणार. सिगारेट ओली आहे. हीटरने वाळवतो"
" माझ्याकडे आहे सिगारेट "
" तू ओढतेस ?"
" नाही"
"मग,तुझ्याकडे कशी ?"
तिने पुन्हा उत्तर टाळले.
दोन तीन तासांचा प्रवास. काय करायचीत सगळ्या प्रश्नांची उत्तरं ?
असेल कुणाची तरी.
"माझा विचार करू नकोस. चहा, कॉफी, सिगारेट काहीही संकोच न करता घे. गाडी चालवायचीय तुला"
सिगारेट कॉफी संपल्यावर घेऊयात असा विचार करून इलेक्ट्रीक केटल मधली कॉफी गरम केली.
" बघ हं, तुला नक्की नको ?"
" मी घेतच नाही कॉफी "

सर्दी, थंडी, ताप यातलं काही होत नाही. चहा , कॉफी नको, सिगारेट ओढत नाही पण हिच्याकडे सिगारेट आहे.
"एका प्रश्नाचं उत्तर तर देशील ?"
" डिपेन्ड्स "
" तू इथे कशी ?"
" हाच प्रश्न मी ही विचारेन म्हणत होते "
" माझं काय, मी पुरूष आहे"
" टिपीकल आन्सर "
’ अरे, यात काय टिपीकल ?"
’ म्हणजे पुरूष आहे म्हणून कुठेही फिरायचं.."
"अरे यार , इथे नको प्लीज, त्या मायबोलीवर हेच चालू असतं. कॉलेजपासून मुली हेच ऐकवतात. खरं सांगू का पुरूषांसाठी आता एक क्लासच काढायला पाहिजे "
ती हसली. पण मनापासून नाही. "टिपीकल" बायकी हास्य.
"मायबोलीवर असतोस ?"
" म्हणजे तू पण ?"
"तुझं सांग, कुठला आयडी ?"
" हे सीक्रेट आहे. तुझा कुठला आयडी ?"
" नाही मी मेंबर नाही. ऑफलाईन वाचते"
मी हुश्श केलं.
"तुझ्यासारखी हिट विकेट होणारे बरेच आयडी आठवले"
ही काय सोडत नाही आता. ही पोलीस नाही रॉ एजंट असणार. मायबोलीवरच्या स्त्रिया किमान आयबी एजंट्स तरी असतातच.

मी तिरक्या नजरेने पाहिलं तर ती बहुतेक हसत होती मान वळवून..
हिला मनातलं ऐकू जातं कि काय ?
खरं म्हणजे आयबी एजंटपेक्षा भूतच म्हणायचं होतं. पण किती तरी वेळ हा शब्द टाळत होतो.
भूत नाही हडळ.

भूतांमधे हडळींचं प्रमाण जास्त असतं. ज्याला ज्याला अमानवीय अनुभव आलाय त्यातल्या ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना हडळच भेटलेली असते.
बरोबर आहे जिवंतपणी समाधानी नसल्यावर हडळच होणार !
पुरूषांना बहुतेक मुक्ती मिळत असणार. पुन्हा सात जन्माचा धोका कोण पत्करणार ?

अगदी गरम नसली तरी कॉफी उबदार होती. तरतरी आली.

प्रवासात सोबत मिळाली होती खरी पण...

(क्रमश:)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>>ज्याला ज्याला अमानवीय अनुभव आलाय त्यातल्या ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना हडळच भेटलेली असते.
हाहाहा Lol खरे आहे.
खूपच मजा येते आहे. हडळ असावी बहुतेक. माबोवर वाचनमात्र दिसतेय हडळ. जपून रे बाबांनो.

मस्त लिहीलंय. Happy Lol
Happy आम्ही मारे वाचतोय निसर्गाचं वर्णन वगैरे तुम्ही मात्र एवढं गाव फिरवून पुन्हा माबोवरच आणलंत , 'सापशिडी'चं फील आलं. स्त्रीपुरूष विश्लेषण कथानायकासाठी spontaneous आणि म्हणूनच धमाल वाटले. अजून भाग येणार आहेत का ?

मायबोलीवरच्या स्त्रिया किमान आयबी एजंट्स तरी असतातच.
>>>> Lol माबोशैलीत सांगते---- हे फार जनरलाईज्ड विधान झालं , कारण काही एफबीआयच्याही असू शकतात. Wink Proud

संप्रति, 'फेमिनाईन मिस्ट्री'ला फिसकन हसले. Lol Lao Tse चे सुविचार अधुनमधून वाचण्यात येतात, त्यामुळे जरा जास्तच.

चीनी दार्शनिक लाओ त्से 'फेमिनाईन मिस्ट्री' (स्रैण रहस्य.) हे शब्द वापरतो. त्यावरून हे रहस्य शोधण्याची खटपट सगळीकडेच आणि फार प्राचीन काळापासून चालू असून, त्या रहस्यापुढे भल्याभल्यांनी डाव घोषित करून पळ काढलेला आहे, असं असं ऐकलंय. Happy
त्यामुळे पुढच्या भागाच्या उत्सुक प्रतीक्षेत.‌ Happy

अवांतर:
फिल्मसुख बांगडू,
परवा आलेला श्रीराम राघवनचा 'मेरी ख्रिसमस' हा सस्पेन्स मूव्ही बघितला काय? त्यात पण लक्ष घाला जरा. Happy

मस्त .. हा भागही छान..!
निरीक्षण शक्ती अफाट..!
संवादही खुसखुशीत आहेत..
मला तर वाटतेयं.. बिचारी नायिका हडळ नसून नायकच एखादा मुंजा असावा.. जो तिची सोबत करतोयं..!
येऊ द्या लवकर पुढचा भाग..!

मुंजा नसेल,
एवढ्या कमी वयात मेलेल्याना स्त्रियांच्या एवढया कलागुणाची पारख बालक असताना होणे शक्य नसावे.

दोन्ही भाग एकदम जबर्राट !! गाडी जंगल रस्त्यात आहे तर पेट्रोलिंग टीम / चौकी चेक पोस्ट वगैरे भेटेल की अध्ये मध्ये पुढे.

>>>>>मुंजा नसेल,
ब्रह्मराक्षस असावा. जो नेहमी भीत्यापाठी लागतो म्हणतात Happy किंवा खविस

समुद्र किनारी आढळणारं भूत असतं.याची शेंडी कापून कपाटात ठेवली तर आपल्यासाठी वाटेल ते पैसे संपत्ती मिळवून देतं, बरोबर ना रुपाली?

या इथे योग्य माहिती आहे Happy भुताखेतात पण जबरा रेसिझम आहे.रोटीबेटी व्यवहार तर होतच नसावेत.
https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%A4

हो अनु, हे भूतं खाडीकिनारी, खाजणात दिसायचं पूर्वी..रात्रभर चकवा लावून फिरवते अश्या वंदता होत्या.. पण तसं चांगलं असते बरं हे भूतं.. सगळेच फार टर उडवतात बिचाऱ्याची.. !!

लहानपणी आम्ही एवढया थापा मारायचो ह्या भूताच्या..!
कुणी सांगायचं माझ्या बाबांना हे भूत भेटलं, चकवा लावला त्याने तर कुणी म्हणे त्या अमुक - तमुक आजीने तवा तापवून ज्या दगडावर गिऱ्हा येऊन बसायचा त्यावर तवा ठेवून बिचाऱ्याच्या पार्श्वभागावर चटका दिला... काय एकेक कहाण्या असायच्या..!

पूर्वी लोकं शहरात चालत जात. येताना फार रात्र होई .. मग त्यांना त्यांच्या पुढे उजेड घेऊन कुणीतरी चालताना दिसे.. मग ती व्यक्ती कुणीतरी ओळखीची असे.. ( गिऱ्हा रूप घेऊन येई.. बहुरूपी भूत बरं हे..) ते खूप गप्पा मारत असे रस्त्याने.. थकल्यावर एका जागी थांबल्यावर ती प्रवास करणारी व्यक्ती तिथेच झोपून जाई आणि रूप घेतलेलं भूत गायब आणि सकाळी जाग आल्यावर त्या व्यक्तीला कळे की, आपण पुन्हा त्याच जागी आलो जिथून भूताने सोबत केली होती.. मग त्याला लक्षात येई की, गिऱ्ह्याने चकवा लावला म्हणून..!

भुताखेतात पण जबरा रेसिझम आहे.रोटीबेटी व्यवहार तर होतच नसावेत. >>>> Lol

गिरहा अश्या रीतीने अनेकांना गिरहाइक बनवत असे तर !!
>>>> Lol

सकाळी जाग आल्यावर त्या व्यक्तीला कळे की, आपण पुन्हा त्याच जागी आलो जिथून भूताने सोबत केली होती>> interasting..
ताई एक कथा लिहा याच्यावर दणदणीत...

गिरहा अश्या रीतीने अनेकांना गिरहाइक बनवत असे तर !>>
मी लिहिलं होतं ना, बिचाऱ्या आमच्या गिऱ्होबाची सगळेच टिंगल करतात म्हणून.. साधं - भोळं आमचं भूत ते..!

विरूजी , कथा लिहिण्याचा नक्की प्रयत्न करून पाहेन...