पहेलवान आणि मराठी म्हणी

Submitted by ASHOK BHEKE on 12 January, 2024 - 10:37

आखाड्याच्या मैदानात पहेलवानाला किमंत होती. दगडाला धोंडा म्हणा किंवा धोंड्याला दगड म्हणा. शेवटी आमचा पहेलवान म्हणजे सरतेशेवटी दगडच. धोंडया हे टोपण नांव. बिनामिशीचा पहेलवान..आंधळ्या गायीत लंगडी गाय शहाणी म्हणतात ना.. तसा आमचा पहेलवान,पोटात एक अन ओठात एक होतं.त्याचे आचार भ्रष्ट होते. आज तो जिंकला असेल किंबहुना अंबारीत बसायचा योग आला असेल. त्याला अर्थ नव्हता.पूर्वेचा सूर्य पश्चिमेला उगवला की काय.. लोक विचारात पडले होते. कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले काय, तरी ते कडुच. गुळावरल्या माश्या किंवा साखरेवरचे मुंगळे म्हणजे घुसळती पेक्षा उकळतीच्या घरी अधिक असलेले आठ पूरभय्ये आणि नऊ चौबे सोबतीला घेऊन गदा फिरवीत होता. देवाने दोन डोळे दिले होते. पण पहेलवानाला तिरळया समान पुणे नाशिकचे भाग्य लाभले होते. आपल्याच पोळीवर तूप कसे ओढून घेता येईल असाच त्याचा विचार होता. बुध्दी कामातून गेली पण सत्तेच्या ढिगार्‍यावर बसून आपला हात हा जगन्नाथाचा आहे... माजोर म्हणून नये त्याला बाजीरावाचा नातू असेच संबोधावे लागेल. अर्ध्या हळकुंडाने पिवळेपण आले होते. मी कोणीतरी याचा समज झाल्याने त्याला अस्मान ठेंगणे झाले होते. त्याच्या आकारे रंगती चेष्टा या कमालीच्या विषयाला फाटे फुटत होते. कुचेष्टे वाचून प्रतिष्ठा नाही म्हणतात ते अगदी खरे. उथळ पाण्याला खळखळाट दिसून आला होता. त्याला ठाऊक नव्हते ऊन पाण्याने कुणाचे घर जळत नाही. आज ना उद्या कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहणार नाही. ज्याची खावी पोळी त्याची टाळी वाजविणारा पहेलवान आपल्यावर उपकार करनारांशी इमानदारीने वागला होता. सांगितल्या कामाचा आणि दिल्या भाकरीला जागला होता. ज्या गावात बोरी चाखायला मिळाल्या त्याच गावात बाभळी देखील कधीतरी करामती केल्याशिवाय राहणार नाहीत.याचे भान नव्हते. पडलेले शेण देखील माती घेऊन उठते. पहेलवान का जिंकला असेल तर प्रतिस्पर्ध्याला ताकाला जा सांगून भांडेच लपवून ठेवल्यामुळे प्रतिस्पर्ध्याचे तेलही गेले, तुपही गेले आणि हाती धुपाटणे आले. प्रतिस्पर्ध्यास तोंड दाबून बुक्याचा मार दिला. दिवस बुडाला, प्रतिस्पर्धी उडाला अशी गत केली धोंडयाने. दाणे टाकून कोंबडे झुंजवावे अशी स्थिति आखाड्यात झाली होती. दाणे भलतेच टाकत होते. झुंजत वेगळेच होते. कोणीही मरोत, मनोरंजन आपलेच होणार आहे. कोणतीही विटी असली तरी दांडू मनोरंजन कर्त्याच्या हाती होता, नांव सोनुबाई हाती मात्र कथलाचा वाळा अर्थात नांव मोठे होते कर्तुत्व मात्र हलक्या दर्जाचे होते. जेथे पहेलवानाला फुले घातली गेली तेथेच ज्ञानी अज्ञानी यांनी गोवर्‍या रचून ठेवल्या. प्रतिस्पर्धी हरला होता. कानातल्या बाळया जाऊन तेथे फक्त भोकं शिल्लक राहिली होती. परंतु हातच्या कांकणाला, आरसा कशाला... तरी पहेलवान काय ते बोलले होते, काजीची मूठभर मिशी आणि हातभर दाढी हलली होती. मोर नाचल्यावर लांडोर देखील नाचू लागली होती. रिकामा न्हावी, भिंतीला तुंबड्या लावी त्याप्रमाणे मैदानात मुंगी होऊन साखर खाण्यापेक्षा लष्कराच्या भाकरी भाजीत धोंडयाचा पानउतारा सुरू झाला होता. पहेलवानाणे वडाची साल पिंपळाला लावली त्यामुळे वातावरणात गरमाहट झाली होती. शिळ्या कढीला ऊत आणून पहेलवाणाने बाजी मारली होती. प्रतिस्पर्ध्याचे सगळे मुसळ केरात गेले होते. शेवटी हिरा तो हिराच आणि गार ती गारच. हे सज्ञानाना न सांगणे बरे..

अशोक भेके

Group content visibility: 
Public - accessible to all site users