बिस्क्विकवाले गुलाबजामुन फ्रॉम अमेरिका

Submitted by स्वाती_आंबोळे on 2 January, 2024 - 21:30
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. बिस्क्विक पॅनकेक मिक्स (बिस्क्विकच. बाजारात पॅनकेक मिक्सचे अनेक ब्रॅन्ड्स मिळतात, पण आपण कुठला वापरणार सांगा? बरोब्बर! बिस्स्स्स्सक्विक!!)
२. खवा पावडर किंवा Whole milk powder ('होल' देवनागरीत लिहिलं आणि झोल झाला असं नको!)
३. हेवी क्रीम, किंवा निदान हाफ अ‍ॅन्ड हाफ (मिल्कफ्याटमध्ये कपात करू नये. हुकुमावरून!)
४. बारीक रवा
५. साखर
६. तेल आणि/किंवा तूप
७. वेलची पावडर आणि/किंवा केशर आणि/किंवा गुलाबपाणी
८. सुई किंवा सेफ्टी पिन (होय, तुम्ही बरोबर वाचलंत.)

क्रमवार पाककृती: 

१. डोळे मिटा, आणि 'एक... दोन... सहा!' हा मंत्र मोठ्याने म्हणा.
२. डोळे उघडा. (ही स्टेप महत्त्वाची आहे!)
३. रवा, बिस्क्विक आणि खवा/मिल्क पावडर यांचं प्रमाण या मंत्रात सांगितलेलं आहे.
४. तर समजा १ टेबलस्पून रवा कोमट हेवी क्रीम किंवा हाफ अ‍ॅन्ड हाफमध्ये साधारण पाऊण तास भिजत ठेवा**. ही झाली पूर्वतयारी.
५. आता एका शेगडीवर अगदी मंद आचेवर तेल/तूप तापायला ठेवा. इतकी मंद आच की आपण तापतोय हे तेला/तुपाला कळता कामा नये.
६. दुसर्‍या शेगडीवर उदाहरणार्थ १ (मेजरिंग) कप साखर तितक्याच पाण्यात मध्यम आचेवर विरघळत ठेवा.
७. उकळी आल्यावर दोनतीन मिनिटांनी पाकाखालची आच बंद करा. आपल्याला कच्चा पाकच करायचा आहे, ताराबिरा काढायच्या नाहीयेत.
८. पाकात वेलचीपूड आणि/किंवा केशराच्या काड्या आणि/किंवा चमचा-दीड चमचा गुलाबपाणी घाला.
९. एकीकडे परातीत २ टेबलस्पून बिस्क्विक आणि ६ टेबलस्पून खवा/मिल्क पावडर हाताने मिसळून घ्या.
१०. त्यात तो भिजवलेला रवा घाला.
११. हेवी क्रीम/ हाफ अ‍ॅन्ड हाफ थोडं थोडं घालत हे मिश्रण चांगलं मऊ कणकेसारखं होईतो मळून घ्या.
१२. हाताला किंचित तूप लावून त्या मिश्रणाचे पुजेच्या सुपारीएवढे गोळे करून घ्या.
११. आता एक छोटी गोळी त्या तेला/तुपात टाकून बघा. ती जर टाकताक्षणी उसळून वर आली तर याचा अर्थ तेल/तूप जरूरीपेक्षा जास्त तापलं आहे.
(म्हणजे दुसर्‍या शब्दांत तुम्ही आच सांगूनसुद्धा मंद ठेवली नाहीत किंवा पिठाशी चेंगटपणे खेळत बसलात.)
१२. तेल/तूप आचेवरून उतरवा.
१३. त्यात ते गोळे लालगुलाबी तळून घ्या.
१४. एखादी बॅच झाली की लागलं तर तेल/तूप परत मंद आचेवर चढवा. स्किल काय ते हे तेल/तूप नेमक्या तापमानाचं वापरण्यात आहे, बाकी आपली रेसिपी फूलप्रूफ आहे!
१५. तळलेल्या गोळ्यांना सुई किंवा सेफ्टीपिनेने चहूबाजूंनी टोचे द्या. म्हणजे सुई स्वच्छ बाहेर आली की गोळे नीट तळले गेल्याबद्दल तुमची खात्री पटेल, आणि पाकाला आत शिरायला वाव मिळेल.
१६. सोडा ते टोचलेले गोळे आता पाकात.
१७. ओव्हरनाइट मुरू देण्याइतका धीर धरवला तर उत्तमच, नाहीतर 'बघू एखादा' म्हणत खायला सुरुवात करा.
१८. मंत्र नीट म्हटला असेल आणि सूचना नीट पाळल्या असतील तर गोळे तळल्यावर दीडपट आणि पाकात मुरल्यावर निदान दुप्पट फुगतात.
१९. या वर दिलेल्या टेबलस्पूनच्या (१-२-६!) प्रमाणात मध्यम आकाराचे १२ ते १४ गुलाबजाम होतील.
२०. दुसर्‍या दिवशी गुलाबजाम पाक पिऊन बसले आणि आवश्यकता वाटली तर आणखी थोडा कच्चा पाक वरून घालू शकता.

वाढणी/प्रमाण: 
१२-१४ गुलाबजाम. किती नगांना खाऊ द्यायचे ते तुम्ही ठरवा.
अधिक टिपा: 

** मी रवा भिजवून केले, पण रवा न भिजवता कोरडाच मिसळला तरीही गुलाबजाम छान होतात असं आमच्या एका अधिकृत सूत्रांकडून कळलं.
मुळात रवा ऑप्शनल आहे. नुसतं बिस्क्विकच्या दुप्पट मिल्क/खवा पावडर अशा प्रकारेही हे करता येतात, पण रव्याने जे... रवाळ आणि जरा डेन्स टेक्स्चर येतं (मराठी वर्ड्स मेले रिमेम्बरच होत नाहीत एकेकदा!) ते मला आवडतं.
अमेरिकेबाहेर कुठे बिस्क्विक मिळतं का आणि वापरायची आवश्यकता आहे का (भारतात रव्याखव्याची पारंपरिक रेसिपी करता येईल उदाहरणार्थ) याबद्दल कल्पना नाही, म्हणून हे अमरीकावाले.

फोटो क्रेडिट : सिंडरेला ऊर्फ अधिकृत सूत्रं.

माहितीचा स्रोत: 
इंटरनेट आणि मैत्रिणी आणि प्रयोग
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा, आली रेसिपी. कालच केले होते, १ २ ६ं मंत्र दोनवेळा म्हटल्यावर २४ गुजांची प्राप्ती झाली. मी अगदी मोजून एका गुजासाठी अर्धा टीस्पुन गोळी घेतली पिठाची. आता फायनल प्रोडक्ट डब्यातले हल्दिरामचे गुजा असतात तेवढे आहेत आकारानं.

फोटो मस्त आहे !

भारतात रव्याखव्याची पारंपरिक रेसिपी करता येईल उदाहरणार्थ >>>> भारतातच कशाला ? इथे सुद्धा आता पारंपारिक रेसिपी करता येईलच की! अगदी सग्गळ सग्गळ मिळतं इथे Wink

भारी लिहिलेली रेसिपी Happy डोळे उघडावे ही स्टेप सर्वात जास्त आवडली.
कधी अमेरिकेत गेले तर नक्की बिसक्विक विकत घेऊन हे गुजा करेन. भारतात आहेच पण चितळे मिक्स.

३. रवा, बिस्क्विक आणि खवा/मिल्क पावडर यांचं प्रमाण या मंत्रात सांगितलेलं आहे.>> एक वाटी रवा, दोन वाटी बिस्क्विक, सहा वाटी मिल्क पाव्डर असे प्रमाण आहे का? नक्की कळत नाही आहे.

एकदम ज्योशीबेन रेसीपी. ... संदर्भ अनुपमा अमरिका गयी है.

बिस्क्विक नाहिये पण आणून करुन बघणार! क्रुती छान वाटतेय
माझी घरी करायच्या गोड पदार्थांची धाव दुधी हलवा आणि झालंच तर फ्रूट सॅलड, खीर इतकीच.>>> ये क्या सायोबेन आप खुद्केही मलई बर्फी को भुल रहे??

अर्धा टीस्पुन गोळी घेतली पिठाची >>> टेस्पुन

सायो, मला परवाच गुलाबजाम म्हटल्यावर आयरोल मिळाला एका हिंदी स्पीकिंग मैत्रिणीकडून Happy

सुंदर दिसतायत गुलाबजाम.

काही लोक गुलाबजाम तळताना मध्ये खडीसाखर ठेवतात. त्याने मधेही गोड चव रेंगाळते. अर्थात काहींना ते पटत नाही उदा - एवढे साखरेत घोळल्यावर, एवढुश्या खडीसाखरेच्या खड्याने काय फरक पडतो - असे वाटते.
मला मात्र ती कल्पना खूप सटल आणि मस्त वाटते.

मस्त फोटो!
गेल्याच आठवड्यात लेकाला बिस्क्विक आठवले होते! पूर्वी गुजा पासुन पॉटपाय पर्यंत सगळ्यासाठी बिस्क्विक वापरत असू , त्यामुळे महिन्याच्या ग्रोसरीत बिस्क्विकचा मोठा खोका मस्ट असे.

>>> इथे सुद्धा आता पारंपारिक रेसिपी करता येईलच की! अगदी सग्गळ सग्गळ मिळतं इथे
हो हो, ज्याला ती आवडते (read : जमते! Proud ) त्याने तीच करावी.
मला ते 'डाळीएवढा सोडा' प्रकरण झेपत नाही. कमी पडला तर गुजा फसतात (गिच्च होतात) आणि जास्त झाला तर हसतात. बिस्क्विकमध्ये मैदा आणि सोड्याचं नेमकं प्रमाण असल्यामुळे ते टेन्शन राहात नाही.

योक्या, बंधूंच्या रेडीमिक्सचेही छान होतात, पण ते इथे सगळीकडे मिळत नाही अजून. शिवाय हे घटकपदार्थ सहसा घरात असतातच, म्हणून बंधूंना हा भगिनींचा झब्बू. Proud

अमा, तुम्ही #३ पाशीच थांबलात का? तो ratio (गुणोत्तर) आहे. ज्या मापाने रवा घ्याल, त्याच्या दुप्पट बिस्क्विक आणि सहापट मिल्क पावडर.
पुढे #४,#९ आणि #१९ वाचलेत तर लक्षात येईल की १ टेबलस्पून रवा, २ टेबलस्पून बिस्क्विक आणि ६ टेबलस्पून खवा पावडर वापरून साधारण १२-१४ गुजा होतात असं लिहिलंय.

सायो, तुला हिंदी जामुन खटकलं पण इंग्रजी 'फ्रॉम अमरीका' नाही खटकलं होय! हा अमेरिकाधार्जिणेपणा आहे. Proud

सामो, या रेसिपीने पाक आतपर्यंत मुरतोच मुरतो, त्यामुळे ती खडीसाखरेची ट्रिक वापरायची आवश्यकता भासत नाही. पण ज्यांना आवड/सवय आहे त्यांनी तसं करायला हरकत नाही.

सर्व अभिप्रायदात्यांचे आभार. Happy

वा! वेगळीच आहे रेसिपी! अनायसे अमेरिकेत असल्यामुळे आणि कंपूभगिनी असल्यामुळे आता करून बघायलाच हवी. Proud

तिकडे साधा खवा मिळतो का? आमच्याकडे साधा आणि स्पे. गुलाबजामूनचा कडवट खवाही मिळतो. पण साध्या खव्याचे रवा न घालता केलेले अधिक चांगले लागतात आणि पाकालाही विशेष खव्याचा सुगंध ( कोणताही एसेन्स किंवा वेलची न घालताही) येतो. तो रवा घातल्यावर येत नाही. फरक एवढाच की रव्याचे जसे घट्टमुट्ट गोळे राहतात तसे खव्याचे राहातं नाहीत. अगदी नाजूक होतात.

हो, मुंबईत गुलाबजामचा खवा निराळा मिळत असे आणि आई तोच आवर्जून वापरायची हे आठवतंय.
इथे साध्या खव्याची पावडर मिळते - ती सोयीची पडते. आता मला वाटतं नानक ब्रॅन्डचा फ्रोझन खवादेखील मिळतो, पण मग ते मिश्रण फूड प्रोसेसर किंवा पुरणयंत्रातून काढावं लागेल नीट मिक्स होण्यासाठी.

नानकचा खवा खूप घट्ट असतो. तो अगदी बारीक किसणीवर किसावा लागतो चांगला मिळून यायला. वाडीलालच्या खव्याचं टेक्श्चर मला जास्त आवडतं.

अरे नका करू एवढा खटाटोप. नानक ब्रॅन्डचा खवा बरीच वर्ष मिळतो आहे. मी याआधी गुजा आणि मेरवान-स्टाइल कप-केक्ससाठी तोच वापरला आहे आणि परवा या रेसिपीनं गुजा करण्यासाठी पण घेतला. खव्याची एकदम घट्ट स्लॅब असते ती स्क्रेप करून नाही तर किसून घ्यायची. तो कीस हातानेच चुरून त्यात रवा/पीठ मळलं की सगळं एकजीव होतं. बाकी काही उठाबशा काढाव्या लागत ना ही त.

पावडर मला हाताशी असलेली बरी वाटते, कशातही मिसळायला सोपी आणि टिकायलाही.
आता तू इतकी खात्री देते आहेस तर एकदा त्या फ्रोझन खव्याचेही करून बघेन.

छान पाककृती. लिहिलीही पर्फेक्ट. हे 'फ्रॉम अमेरिका' वाचून मी इंप्रेस झाले आहे. मराठी चित्रपटात लक्ष्याचे 'आफ्रिकेचे काका' यायचे व बरीच इस्टेट वगैरे बाळगून असायचे. Proud

Bisquick ऐवजी self raising flour ही वापरता येईल, त्यातही ते 'हे' मोजूनच घातलेलं असतं, मुख्य म्हणजे घरात आहे. चितळे गुजा मिक्स म्हणजे ममव बिस्क्विक+ मिल्क पावडर आहे हे कळलं Wink

नानक खव्याला एकदम तूप सुटतं आणि तो कधीही एकजीव होत नाही, मैद्याशी फटकून वागतो. मी गुजा नाही पण कोफ्ते केलेले आहेत, फ्रेंडली नाही ते प्रकरण. मारून मऊ केल्यावर थोडे बरे वागू लागले. मी क्रीम आणि मिल्क पावडर कढीसारखं सरबरीत कालवून ते शिजवून खवा करते, कमी वेळात आणि फार छान होतो.

>>> फ्रेंडली नाही ते प्रकरण. मारून मऊ केल्यावर थोडे बरे वागू लागले
टीपापात ठेवून बघेन तास-दीड तास Proud

बाय द वे, ते अमांचं ज्योशीबेन/अनुपमा प्रकरण समजलं नाही - ते काय आहे ते विचारायचं राहिलं मघाशी.

भारीच की. फोटो पण मस्त आलाय.

मग आता (आधी आणलेल्या आणि उरलेल्या) चितळे गुजामिक्सचे कोफ्ते करावे झालं. Proud

Pages