बिस्क्विकवाले गुलाबजामुन फ्रॉम अमेरिका

Submitted by स्वाती_आंबोळे on 2 January, 2024 - 21:30
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. बिस्क्विक पॅनकेक मिक्स (बिस्क्विकच. बाजारात पॅनकेक मिक्सचे अनेक ब्रॅन्ड्स मिळतात, पण आपण कुठला वापरणार सांगा? बरोब्बर! बिस्स्स्स्सक्विक!!)
२. खवा पावडर किंवा Whole milk powder ('होल' देवनागरीत लिहिलं आणि झोल झाला असं नको!)
३. हेवी क्रीम, किंवा निदान हाफ अ‍ॅन्ड हाफ (मिल्कफ्याटमध्ये कपात करू नये. हुकुमावरून!)
४. बारीक रवा
५. साखर
६. तेल आणि/किंवा तूप
७. वेलची पावडर आणि/किंवा केशर आणि/किंवा गुलाबपाणी
८. सुई किंवा सेफ्टी पिन (होय, तुम्ही बरोबर वाचलंत.)

क्रमवार पाककृती: 

१. डोळे मिटा, आणि 'एक... दोन... सहा!' हा मंत्र मोठ्याने म्हणा.
२. डोळे उघडा. (ही स्टेप महत्त्वाची आहे!)
३. रवा, बिस्क्विक आणि खवा/मिल्क पावडर यांचं प्रमाण या मंत्रात सांगितलेलं आहे.
४. तर समजा १ टेबलस्पून रवा कोमट हेवी क्रीम किंवा हाफ अ‍ॅन्ड हाफमध्ये साधारण पाऊण तास भिजत ठेवा**. ही झाली पूर्वतयारी.
५. आता एका शेगडीवर अगदी मंद आचेवर तेल/तूप तापायला ठेवा. इतकी मंद आच की आपण तापतोय हे तेला/तुपाला कळता कामा नये.
६. दुसर्‍या शेगडीवर उदाहरणार्थ १ (मेजरिंग) कप साखर तितक्याच पाण्यात मध्यम आचेवर विरघळत ठेवा.
७. उकळी आल्यावर दोनतीन मिनिटांनी पाकाखालची आच बंद करा. आपल्याला कच्चा पाकच करायचा आहे, ताराबिरा काढायच्या नाहीयेत.
८. पाकात वेलचीपूड आणि/किंवा केशराच्या काड्या आणि/किंवा चमचा-दीड चमचा गुलाबपाणी घाला.
९. एकीकडे परातीत २ टेबलस्पून बिस्क्विक आणि ६ टेबलस्पून खवा/मिल्क पावडर हाताने मिसळून घ्या.
१०. त्यात तो भिजवलेला रवा घाला.
११. हेवी क्रीम/ हाफ अ‍ॅन्ड हाफ थोडं थोडं घालत हे मिश्रण चांगलं मऊ कणकेसारखं होईतो मळून घ्या.
१२. हाताला किंचित तूप लावून त्या मिश्रणाचे पुजेच्या सुपारीएवढे गोळे करून घ्या.
११. आता एक छोटी गोळी त्या तेला/तुपात टाकून बघा. ती जर टाकताक्षणी उसळून वर आली तर याचा अर्थ तेल/तूप जरूरीपेक्षा जास्त तापलं आहे.
(म्हणजे दुसर्‍या शब्दांत तुम्ही आच सांगूनसुद्धा मंद ठेवली नाहीत किंवा पिठाशी चेंगटपणे खेळत बसलात.)
१२. तेल/तूप आचेवरून उतरवा.
१३. त्यात ते गोळे लालगुलाबी तळून घ्या.
१४. एखादी बॅच झाली की लागलं तर तेल/तूप परत मंद आचेवर चढवा. स्किल काय ते हे तेल/तूप नेमक्या तापमानाचं वापरण्यात आहे, बाकी आपली रेसिपी फूलप्रूफ आहे!
१५. तळलेल्या गोळ्यांना सुई किंवा सेफ्टीपिनेने चहूबाजूंनी टोचे द्या. म्हणजे सुई स्वच्छ बाहेर आली की गोळे नीट तळले गेल्याबद्दल तुमची खात्री पटेल, आणि पाकाला आत शिरायला वाव मिळेल.
१६. सोडा ते टोचलेले गोळे आता पाकात.
१७. ओव्हरनाइट मुरू देण्याइतका धीर धरवला तर उत्तमच, नाहीतर 'बघू एखादा' म्हणत खायला सुरुवात करा.
१८. मंत्र नीट म्हटला असेल आणि सूचना नीट पाळल्या असतील तर गोळे तळल्यावर दीडपट आणि पाकात मुरल्यावर निदान दुप्पट फुगतात.
१९. या वर दिलेल्या टेबलस्पूनच्या (१-२-६!) प्रमाणात मध्यम आकाराचे १२ ते १४ गुलाबजाम होतील.
२०. दुसर्‍या दिवशी गुलाबजाम पाक पिऊन बसले आणि आवश्यकता वाटली तर आणखी थोडा कच्चा पाक वरून घालू शकता.

वाढणी/प्रमाण: 
१२-१४ गुलाबजाम. किती नगांना खाऊ द्यायचे ते तुम्ही ठरवा.
अधिक टिपा: 

** मी रवा भिजवून केले, पण रवा न भिजवता कोरडाच मिसळला तरीही गुलाबजाम छान होतात असं आमच्या एका अधिकृत सूत्रांकडून कळलं.
मुळात रवा ऑप्शनल आहे. नुसतं बिस्क्विकच्या दुप्पट मिल्क/खवा पावडर अशा प्रकारेही हे करता येतात, पण रव्याने जे... रवाळ आणि जरा डेन्स टेक्स्चर येतं (मराठी वर्ड्स मेले रिमेम्बरच होत नाहीत एकेकदा!) ते मला आवडतं.
अमेरिकेबाहेर कुठे बिस्क्विक मिळतं का आणि वापरायची आवश्यकता आहे का (भारतात रव्याखव्याची पारंपरिक रेसिपी करता येईल उदाहरणार्थ) याबद्दल कल्पना नाही, म्हणून हे अमरीकावाले.

फोटो क्रेडिट : सिंडरेला ऊर्फ अधिकृत सूत्रं.

माहितीचा स्रोत: 
इंटरनेट आणि मैत्रिणी आणि प्रयोग
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाबो! १ ते २० क्रमांक असलेली लांबलचक पाककृती बघून मी कधी ह्याला हात घालेन का माहीत नाही. शिवाय इकडे तो ब्रँडपण मिळत नाही (नाचता येई ना ...). पण फोटो सुंदरच आहेत. कधी भेट झाल्यास ही फर्माईश करेन.

स्वतः स्वातीकडून 'गुलाबजामुन' लिहिलं गेलेलं बघून आणि मग त्यावरची चर्चा वाचून 'यथा बाधति बाधते'ची आठवण झाली. Wink

ओके कळले प्रमाण इथे एक किमि रेडिअस मध्ये इतके होम डिलिव्हरी ओप्शन आहेत. गुलाब जाम मध्ये. १५ मिनिटात हजर. देशी मामला.

मस्त बनवुन खा बेस्ट विशेस.

अ‍ॅडमिनला सांगून या भारतातल्या लोकांच्या तयार गुजा ब्रॅगिन्ग पोस्टी उडवा पाहू. आमच्या भावना दुखावतात याचा काही विचार?

छान दिसतायत गुलाबजाम. किती तरी दिवसात चांगले गुलाबजाम करून खाल्लेच नाहीयेत. आता एकदा केले पाहिजेत. बघते इथे कुठलं रेडीमिक्स मिळतंय ते.

मस्त दिसतायेत करून बघेन एकदा. आम्ही कधी पाकीट वाले गुलाबजाम नाही खाल्ले अस म्हणणाऱ्या नवऱ्याला आता त्या पाकिटातले नको तर या बॉक्स मधले खा (भाकरी नसेल तर ब्रेड खा या चालीवर )अस म्हणून खायला लावते

टेम्पटिंग दिसताहेत गुलाबजाम.

गुलाबजाम खाऊया, मामाच्या गावाला जाऊया
हे मिटर मध्ये नीट बसत नाही म्हणुन गाण्यात पण गुलाबजामुन खाऊया असे केले आहे.

थँक्यू थँक्यू मानव! काही लोक बघा ना, नावालाच नावं ठेवत बसलेत. Proud
एकतर खरं नाव जामुनच (जांभळाच्या आकाराचे गोळे म्हणून!) आहे, ममवंनी त्याचं जाम/जांब करून ठेवलंय.
जाम/जांब फळ किती वेगळं दिसतं की नाही!
वर एवढं इन्टरनॅशनल स्टाइलचं (आठवा: सिरकेवाली प्याज) नाव दिलं ते अ‍ॅप्रिशिएट करायचं बाजूलाच, बाधतंय म्हणे! Proud Light 1

सर्व नवीन प्रतिसाददात्यांचे आभार. Happy

मस्त गुलाबजाम!
ते बिस्विक देशी मिळणे नाही तेव्हा गड्या अपुला बंधू बरा.

आम्ही कधी पाकीट वाले गुलाबजाम नाही खाल्ले अस म्हणणाऱ्या नवऱ्याला आता त्या पाकिटातले नको तर या बॉक्स मधले खा >>>
आवडलं. लगेच आचरणात आणण्यात येईल Happy

गुलाबजामुन अतिशय आवडतात. पण खव्याचे. ते Gits इत्यादी अतिशय बंडलेस्ट असतात.

आणि मी स्वतः काही करणार नाही, पण उत्साही (भारतातील) कीचन क्वीन्स, ज्या बिस्क्विक साठी खट्टू झाल्या आहेत, त्यांनी Nature's basket ला भेट द्या. मी पुण्यात KP मधील दुकानात पाहिलं आहे. इतर शाखांमध्येही असेल. flipcart वर पण दिसतं आहे. दोराबजी मधे मिळण्याचे high chances असतात. मुंबई मध्यें माहित नाही, पण आमच्या हिरानंदानीत असणार. मिळणार नक्की. Haiko मधे पाहावं लागेल.

Pages