भाग ५ : https://www.maayboli.com/node/84289
.. ..... .... .... ...
अंतिम भाग
करोनरी वाहिन्यांमध्ये Atherosclerosisमुळे मेद आणि अन्य घटकांचा पापुद्रा कसा तयार होतो ते आपण मागच्या भागात पाहिले. आता या आजाराचा पुढचा टप्पा पाहू.
आजार वाढत असताना एका स्थितीत हा पापुद्रा फुटतो. त्याचबरोबर रक्तातील बिंबिका पेशी (platelets) सक्रिय होतात. परिणामी रक्तगुठळी तयार होते तसेच रक्तवाहिनीचे आकुंचन होते. या सर्वांमुळे वाहिनीत बऱ्यापैकी अडथळा निर्माण होतो. हा अडथळा किती काळ टिकतो आणि त्याची तीव्रता किती, यानुसार रुग्णाला कुठल्या प्रकारचा त्रास होतो ते ठरते. साधारणपणे दोन प्रकारचे रुग्ण आढळतात :
१. निव्वळ छातीतील वेदना (stable angina)
२. हृदयविकाराचा झटका (myocardial infarction)
१. निव्वळ छातीतील वेदना : या प्रकारात अचानक कधीतरी छातीत दुखू लागते. ही वेदना मध्यम स्वरूपाची असते आणि ती सुमारे पाच ते पंधरा मिनिटे टिकते. बऱ्याचदा अशी वेदना कुठलेतरी श्रम केल्यानंतर होते. छातीत दुखू लागल्यानंतर विश्रांती घेतली किंवा nitroglycerinया औषधाची गोळी घेतली असता ती थांबते. काही जणांच्या बाबतीत स्वस्थ बसले असताना देखील अशी वेदना होऊ शकते आणि काही वेळेस धूम्रपान केल्यानंतर ती उद्भवते.
२. हृदयविकाराचा झटका : जेव्हा करोनरी वाहिन्यांमध्ये अडथळा मोठ्या प्रमाणात होतो तेव्हा हृदयस्नायूंना गरज असणाऱ्या रक्तापेक्षा खूप कमी पुरवठा होऊ लागतो आणि ऑक्सिजन अभावी त्या पेशींवर परिणाम होतो. परिणामी काही पेशींचा समूह मृत होतो (infarction). जेव्हा हृदयस्नायूंचा रक्तपुरवठा कमी होतो तेव्हा तिथे काही रासायनिक घडामोडी होतात आणि त्यातून काही आम्लधर्मी आणि अन्य पदार्थ तयार होतात. या पदार्थांमुळे वेदनेचे चेतातंतू सक्रिय होतात व त्यामुळे रुग्णाला वेदना जाणवते.
हृदयविकाराच्या झटक्याचे काही प्रकार असतात. त्यातील सर्वाधिक आढळणारा प्रकार आधी पाहू.
प्रकार-१चा झटका
रुग्णाला प्रत्यक्ष झटका येण्यापूर्वी एक दोन दिवस आधी छातीत कसेतरी होणे आणि खूप दमल्यासारखे वाटू शकते. परंतु सर्वांच्याच बाबतीत अशी पूर्वलक्षणे येत नाहीत. काहींच्या बाबतीत ध्यानीमनी नसताना अचानक झटका देखील येऊ शकतो.
हृदयविकाराचा जो नमुनेदार झटका असतो त्या प्रसंगी सर्वसाधारणपणे अशा घडामोडी होतात :
• बऱ्याच वेळेस हा झटका पहाटे किंवा सकाळी लवकरच्या वेळात येतो कारण या वेळेस शरीरातील नैसर्गिक स्थिती अशी असते :
१. sympathetic चेतासंस्था उत्तेजित होते. त्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात.
२. हृदय-ठोक्याची गती आणि रक्तदाबात वाढ होते.
३. हृदयस्नायूंचे काम वाढते आणि त्यांचा ऑक्सिजनचा वापरही वाढतो.
४. रक्तातील प्लेटलेट्स एकमेकांना चिकटण्याची प्रक्रिया वाढते.
• वेदनेचे वर्णन
१. तीव्र असते; एकदा दुखू लागल्यावर सुमारे अर्धा ते एक तासपर्यंत ती थांबत नाही.
२. ती छातीच्या मधोमध जाणवते. परंतु त्याचबरोबर मान, खांदा, जबडा किंवा डावा हात या भागांमध्येही ती पसरू शकते.
३. वेदनेचा प्रकार : छातीच्या मधोमध कोणीतरी वजन ठेवल्यासारखे वाटणे / किंवा पिळवटले जाणे / नुसतेच दुखणे किंवा जळजळणे.
४. काहींच्या बाबतीत पोटाच्या वरच्या भागात अस्वस्थता आणि वात अडकल्याची भावना देखील जाणवू शकते.
५. काही जणांत खालील अन्य लक्षणे उद्भवू शकतात :
* शरीरात काहीतरी भयंकर घडणार आहे अशी भावना
चक्कर येणे आणि/ किंवा बेशुद्ध पडणे
* खोकला, मळमळ आणि/ किंवा उलटी
* दरदरून घाम सुटणे
* दम लागणे, नाडीचे ठोके जलद आणि अनियमित होणे
* कोणीतरी आपला गळा घोटते आहे अशी भावना होणे.
* पोट फुगणे
• रुग्ण तपासणी :
रुग्णाचे निरीक्षण आणि स्टेथोस्कोपने तपासणी केली असता खालील बदल झालेले दिसतात :
१. नाडीची गती : बऱ्याच वेळा वाढलेली परंतु काही वेळेस कमी झालेली. तालबिघाड असू शकतात.
२. रक्तदाब : बऱ्याच वेळा वाढलेला परंतु काही परिस्थितीत कमी झालेला असतो.
३. श्वसनाची गती वाढलेली असते
४. तापमान : पहिल्या 24 ते 48 तासांमध्ये थोडा ताप येऊ शकतो
५. छातीची तपासणी : हृदयाचे विशिष्ट ध्वनीबदल, खरखर तसेच फुफ्फुसांच्या भागावरही काही बदल ऐकू येऊ शकतात.
६. हात व पाय : यांच्या टोकांना निळसरपणा किंवा पांढरेफटक पडणे किंवा सूज येणे.
• महत्त्वाच्या रोगनिदान चाचण्या :
१. इसीजी : यामध्ये हृदयातील विशिष्ट भागांच्या बिघाडानुसार निरनिराळे बदल दिसतात. असे बदल सुमारे 80 टक्के रुग्णांमध्ये दिसतात. अर्थात वैशिष्ट्यपूर्ण बदल न दिसणे किंवा इसीजी नॉर्मल येणे याही शक्यता असतात.
२. ट्रोपोनिनची पातळी : ही अत्यंत महत्त्वाची चाचणी आहे. या विषयावर स्वतंत्र लेख इथे वाचता येईल : https://www.maayboli.com/node/65025?page=3
जेव्हा हार्ट अटॅकचा संशय येण्यासारखी लक्षणे रुग्णामध्ये दिसत असतात तेव्हा डॉक्टरांनी ताबडतोब रक्तावरील ट्रोपोनिनची चाचणी करायची असते. जर ती पॉझिटिव्ह आली तर रोगनिदान पक्के होते. परंतु जर का ती निगेटिव्ह असेल आणि लक्षणे असतीलच, तर मग ती चाचणी त्यानंतर तीन आणि नंतर सहा तासांनी पुन्हा करायची असते.
म्हणजेच, रुग्णालयात लक्षणे असलेला रुग्ण दाखल होता क्षणीच ती चाचणी करणे महत्त्वाचे- नव्हे अत्यावश्यक- असते.
३. गरजेनुसार काही प्रतिमातंत्र चाचण्या (angiography) करता येतात.
रोगनिदान
MI चे निदान करण्यासाठी त्याची सार्वत्रिक व्याख्या करण्यात आली आहे. त्यानुसार :
MI चे शिक्कामोर्तब करण्यासाठी खालील गोष्टींची पूर्तता व्हायला हवी:
१. रक्तातील पुरेसे वाढलेले ट्रोपोनिन (विशिष्ट कटऑफच्या वर)
आणि
२. खालीलपैकी किमान एक घटना :
अ) करोनरी-विकाराची विशिष्ट लक्षणे रुग्णात दिसणे
आ) इसीजीतील विशिष्ट बदल किंवा
इ) हृदयाच्या ‘इमेजिंग’ तंत्राने मिळालेला पुरावा
* याप्रमाणे खात्रीशीर निदान झाल्यावर विशिष्ट तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ते उपचार केले जातात. या लेखमालेत सुरुवातीस स्पष्ट केल्यानुसार हा मुद्दा या लेखमालेच्या कक्षेबाहेर आहे.
लक्षणांची रुग्णभिन्नता
आतापर्यंत वर्णन केलेला आजार नमुनेदार आहे. परंतु काही रुग्णांमध्ये याबाबत भिन्नता आढळते ती अशी :
१. दीर्घकालीन मधुमेही रुग्णांच्या बाबतीत वेदनेशी संबंधित चेतातंतूवर परिणाम झालेला असतो. त्यामुळे त्यांना छातीत वेदना जाणवतेच असे नाही.
२. वृद्धांच्या बाबतीत स्मृतिभ्रंश किंवा बिघडलेले मानसिक संतुलन असल्यास त्यांना संबंधित लक्षणे समजू शकत नाहीत. त्यामुळे ही घटना कुटुंबीयांच्याही लक्षात यायला वेळ लागतो.
३. पुरुषांशी तुलना करता स्त्रियांमध्ये लक्षणविरहित झटका येण्याचे प्रमाण अधिक असल्याने बऱ्याचदा लवकर निदान होत नाही.
झटक्याचे अन्य प्रकार
वरील प्रकार-१ व्यतिरिक्त जे अन्य काही प्रकार असतात त्यातले दोन प्रमुख प्रकार पाहू.
A. प्रकार-२ : यामध्ये हृदयस्नायूंची ऑक्सिजनची मागणी वाढते परंतु त्या प्रमाणात पुरवठा होऊ शकत नाही म्हणून झटका येतो. हा प्रकार होण्यास करोनरी वाहिन्यांचे अचानक आकुंचन, एनिमिया किंवा श्वसन दुर्बलता हे कारणीभूत असतात.
B. प्रकार-३ : झटक्यामुळे आलेला तात्काळ मृत्यू. अशाप्रसंगी मृत्यू इतक्या वेगात येतो की त्यावेळेस रक्तात ट्रोपोनिन वगैरे रसायने सोडली देखील गेलेली नसतात. काही वेळेस असा रोगी रुग्णालयात मृत अवस्थेत आणला जातो किंवा तिथे आणल्या आणल्याच त्याला डॉक्टरने हात लावण्यापूर्वीच त्याचा मृत्यू होतो.
अनिश्चित रोगनिदान
छातीत दुखणे आणि त्याच्या जोडीने वर उल्लेख केलेली काही लक्षणे, हृदय वगळता इतर अनेक आजारांमध्येही दिसू शकतात. रुग्णाची तपासणी आणि चाचण्या केल्यानंतर प्रत्येक वेळेस ‘नमुनेदार चित्र’ दिसतेच असे नाही. अशा प्रसंगी त्याला रुग्णालयात थांबवून ठेवायचे की घरी सोडायचे असा पेचप्रसंग निर्माण होतो. या प्रसंगी खालील प्रकारचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन कामी येते :
संभाव्य लक्षणे >>> रुग्णालयात दाखल >> डॉ. नी तपासल्यानंतर The HEART score असा काढतात :
History
ECG मधले बदल
Age (<45 , >65 )
Risk factors ( 0/1-2/3)
Troponin ( पातळीनुसार)
वरीलपैकी प्रत्येक मुद्द्याला ० ते २ गुण देतात. त्यानुसार HEART score १० पैकी किती हे कळते.
मग निर्णयप्रक्रिया अशी :
0-3: कमी धोका >>> लवकर घरी पाठवता येते.
4-6: मध्यम धोका >>> रुग्णालयात निरीक्षण चालू.
7-10: सर्वाधिक धोका >>> तातडीने योग्य ते उपचार
भविष्यात या संदर्भात मशीन लर्निंगचा वापर करण्यासंबंधी संशोधन प्रगतीपथावर आहे. रुग्ण दाखल झाल्यानंतर त्याच्या रक्तावरील ट्रॉपोनिन चाचणी एकदाच केली जाईल आणि रुग्णाची इतर सर्व माहिती मशीन लर्निंग यंत्रणेला पुरवली जाईल. त्यातून अचूक निदान केले जावे अशी अपेक्षा आहे.
**************************************************************************
समाप्त
मी जे लिहिले आहे लोकसत्ता
मी जे लिहिले आहे लोकसत्ता बातमी ससून रुग्णालय विषयी , तेच कुमार सरांनी लिहिले आहे.
मटा मध्ये आलेली बातमी.
हेमंत, पेशंट ऍडमिट झाल्यानंतरची गोष्ट आहे 120 सेकंद.
अगदी बरोबर झकास राव त्या
अगदी बरोबर झकासराव. त्या बातमीमध्ये अजून काही उपयुक्त माहिती दिली आहे.
या प्रकारच्या यंत्रणेचा उपयोग बहुमजली असलेल्या मोठ्या रुग्णालयांना नक्कीच होतो. रुग्णालयातील कुठल्याही कक्षात संबंधित घटना घडली तर कुठूनही फक्त सात हा अंक डायल करायचा असतो. त्याच बरोबर धनिक्षेपकावरून लगेच घोषणा केली जाते. ती ऐकल्या क्षणीच कायम तयार असलेले ‘ब्ल्यू पथक’ संबंधित मजल्यावरील कक्षात दाखल होते.
हार्ट अटॅक कधीही येतो का? की
हार्ट अटॅक कधीही येतो का? की आधी आपल्याला समजतं जसे की श्वास 1 मिनिटाच्या आसपास थांबवला की फुफुस चांगले असतात आणि हार्ट अटॅक येऊ नाही शकत वैगरे
हार्ट अटॅक कधीही येतो का? की
हार्ट अटॅक कधीही येतो का? की आधी आपल्याला समजतं
>>> हे लेखात दिले आहे बघा :
* प्रकार-१चा झटका :
रुग्णाला प्रत्यक्ष झटका येण्यापूर्वी एक दोन दिवस आधी छातीत कसेतरी होणे आणि खूप दमल्यासारखे वाटू शकते.
आणि ..
* प्रकार-३ : झटक्यामुळे आलेला तात्काळ मृत्यू. अशाप्रसंगी मृत्यू इतक्या वेगात येतो की..
सुदैवाने प्रकार 3 चे एकूण प्रमाण जेमतेम चार-पाच टक्के आहे.
रुग्णाला प्रत्यक्ष झटका
रुग्णाला प्रत्यक्ष झटका येण्यापूर्वी एक दोन दिवस आधी छातीत कसेतरी होणे आणि खूप दमल्यासारखे वाटू शकते.
आणि ..>> हे माझ्या नवर्याच्या बाबतीत झाले होते. शनि वारी सकाळी तो गाडी घेउन ऑफिसात गेला . पण कार पार्क करुन पुढे दहा पावले चालावे लागते ते त्याला जमत नव्हते, दम लागत होता. पाउल पुढे टाकवत नव्हते. पण मला सांगितले नाही. रात्री सुद्धा होमिओ पाथ कडे गेला तिथून मला पिक अप कर म्हटला. हार्ट चा इशू आहे मला माहीत असते तर मी तेव्हाच त्याला अपोलो मध्ये भर्ती केले असते व तिथे राहिले असते त्याच्या बरोबर. पण हेल्थ ची काही ही माहिती रिपोर्ट हाताशी नव्हते. जायच्या आधी दहा दिवस सुद्धा मित्रा बरोबर त्याला चालता येत नव्हते. पण मला बोलला नाही.
अरेरे ! वाईट वाटले वाचून.
अरेरे ! वाईट वाटले वाचून.
कुठल्याही अस्वस्थतेकडे माणसाने दुर्लक्ष करू नये हे खरे...
कुठल्याही अस्वस्थतेकडे
कुठल्याही अस्वस्थतेकडे माणसाने दुर्लक्ष करू नये हे खरे...>> माझे एक निरीक्षण आहे ह्या बाबतीत. वैयक्तिक निरीक्षण. बरेच पुरुष आपल्याला त्रास होत आहे किं वा हॉस्पिटल मध्ये जाण्याची, रेगुल र टेस्ट्स करुन घेण्याची गरज आहे. हेस्वतः शी सुद्धा मान्य करत नाहीत. काही लोकाणा इगो प्रोब्लेम वाटतो तर काहींना गांभीर्य कळत नाही. किंवा कंटाळा येतो दुसृया कोणाचे तरी ऐकायचा. हे साहजिक आहे. पण त्यांना थोडे ट्रेनिन्ग देउन
आपल्या गरजा घरी बोलुन दाखवा, वीकनेस शेअर करा व उपाय उपलब्ध असतात हो. तुम्ही ते स्वीकारायला उपल ब्ध तर पाहिजे. नव्या पिढीत कदाचित हे प्रमाण कमी असेल. पण ब्र्वाडो डज नॉ ट वर्क इन हेल्थ केसेस.
बहुतकरून व्यसन असणाऱ्या
बहुतकरून व्यसन असणाऱ्या लोकांबाबत होते असे.
व्यसन सोडण्याचा प्रयत्न केलेला असतो बऱ्याचवेळा पण सुटत नाही हे ठाऊक असते. घरच्यांना सांगितले / डॉक कडे गेलो की आधी व्यसनाचा उद्धार होणार आणि परत त्यावर लेक्चर आणि व्यसन सोडण्याची सक्ती आणि सोडायला गेले की परत त्या व्यसनी पदार्थापासून होणारा मानसिक छळ याचे चित्र डोक्यात उभे रहाते आणि शहारा येतो घरी/डॉकला सांगण्याच्या कल्पनेने. मग "एक दिन तो सब को मरना ही है, देखेंगे क्या होता है" असा शौर्याचा उसना आव आणला जातो.
मी गेलो आहे यातून.
खरं आहे ! असे अनुभवाचे बोल
खरं आहे ! असे अनुभवाचे बोल मार्गदर्शक आहेत..
बरेच पुरुष आपल्याला त्रास होत
बरेच पुरुष आपल्याला त्रास होत आहे किं वा हॉस्पिटल मध्ये जाण्याची, रेगुल र टेस्ट्स करुन घेण्याची गरज आहे. हेस्वतः शी सुद्धा मान्य करत नाहीत. --->>> अगदी अगदी
पूर्ण सहमत.
इथे लिहायला हरकत नसावी...
इथे लिहायला हरकत नसावी...
माझी मोठी बहीण, वय ६०. सडपातळ, मधुमेह किंवा बीपी नाही. कोणतेही रेग्युलर औषध नाही. (लहान बहिणींनाच मधुमेहाच्या गोळ्या आहेत) खाण्यावरही योग्य नियंत्रण. वजन अगदी लिमिट मध्ये. महिन्याभरापूर्वी संध्याकाळी ७ वाजता अस्वस्थ वाटू लागले. उलटी झाली, स्वतःच डॉ. ला फोन केला. बाथरूम मधली उलटी साफ केली, कपडे बदलले. १० मिनिटात पुन्हा एकदा अॅटॅक आला असावा. बेशुद्ध झाली. दवाखान्यात नेण्यापर्यंत उशीर झाला होता.
घरी डिस्प्रीन च्या चार गोळ्या नेहेमी ठेवाव्यात, अॅटॅक आला की लगेच जिभेखाली ठेवाव्यात. व सीपीआर द्यावा असे एका डॉ. ने सांगितले.
कुमार सर, आपले काय मत आहे ( डिस्प्रीन बद्दल )?
केवळ पुरुषच नाही, बायका पण
केवळ पुरुषच नाही, बायका पण दुर्लक्ष करतात आणि अंगावर काढतात. ६ वर्षापूर्वी माझी मेव्हणी ३० डिसेंबरला गेली. साधारण १ आठवडा आधी तिचा डावा हात दुखत होता आणि छातीत अस्वस्थ होते असे म्हणत होती. प्रचंड डायबिटीस पण. सगळ्यानी सांगून पण डॉक्टर कडे गेली नाही, नवऱ्याला पण म्हणाली की नवीन वर्षात जाईन आणि न्यू इयर साठी माहेरी गेली. दुर्दैवाने ३० डिसेंबरला सोफ्यावर बसल्या बसल्या रात्री १० वाजता खेळ खलास.
अमा यांनी योग्य ते सांगितले आहे, कृपया दुर्लक्ष करू नका. Bravado आणि आळस चांगला नाही आरोग्याच्या बाबतीत.
घरी डिस्प्रीन च्या चार गोळ्या
@ विकु,
घरी डिस्प्रीन च्या चार गोळ्या नेहेमी ठेवाव्यात, अॅटॅक आला की लगेच जिभेखाली ठेवाव्यात
>>> चांगला प्रश्न . काही माहिती देतो आणि गैरसमजही दूर करतो.
१. जिभेखाली जी गोळी ठेवतात ती डिस्प्रीन नसून Nitroglycerin ही असते (ती फवाऱ्यामार्फतही देता येते). छातीत खूप दुखत असल्यास ती देतात.
2. Aspirin : डॉक्टरांनी पूर्वी सांगितलेली असेल तर ती nonenteric-coated chewable या प्रकारची द्यावी. ती भराभर चावून खाऊन टाकायची असते. काही प्रसंगी तोंडाने घेणे शक्य नसल्यास गुदद्वारात ठेवण्याची Aspirin देखील उपलब्ध असते
दुर्लक्ष कोणी करत नाही.
दुर्लक्ष कोणी करत नाही.
Heart विषयी ज्या समस्या आहेत त्याची जी लक्षण आहेत.
ती लक्षण कमीत कमी 100, आजाराशी संबंधित आहेत.
डॉक्टर ओळखू शकत नाहीत तर सामान्य व्यक्ती काय ओळखणारा लक्षणाचा अर्थ
कुमार, ही नॉन एण्ट्रीक कोटेड
डॉ कुमार, ही नॉन एण्ट्रीक कोटेड च्युएबल गोळी मेडिकल दुकानात कशी ओळखायची आणि मागायची?हे सर्व मागे लिहिलेलं असतं का?मेडिकल वाले ऍस्पिरिन मागितली तरी डिस्प्रिन देतात(दोन्हीचा रासायनिक फॉर्म्युला एक आणि ब्रँडनेम वेगळं असेल.)
Nitroglycerin हे फक्त
Nitroglycerin हे फक्त explosives च्या संदर्भातच ऐकले होते याआधी. (आल्फ्रेड नोबेलच्या प्रसिद्ध डायनामाईटमध्ये nitroglycerin असते.)
मेडिकल दुकानात कशी ओळखायची आणि मागायची? >> डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय, स्वत:च्या डोक्याने औषधे घेऊ नयेत असे माझे व्यक्तिगत मत आहे.
अस्पिरिनची सविस्तर माहिती
अस्पिरिनची सविस्तर माहिती पूर्वी या लेखात दिली होती
https://www.maayboli.com/node/68471
त्यातले हे महत्त्वाचे वाक्य :
“रुग्णाचा आजार आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार यांपैकी योग्य त्या Aspirin गोळीची निवड केली जाते. अर्थातच आजारानुसार तिचे ‘डोस’ वेगवेगळे असतात. गोळ्यांचे काही प्रकार हे चिठ्ठीविना (OTC) मिळतात, तर अन्य काहींसाठी (नियमानुसार) डॉक्टरांची चिठ्ठी आवश्यक असते”.
ॲमेझॉनवर निव्वळ माहिती म्हणून तुम्ही अस्पिरिनचे निरनिराळे ब्रँड्स, गोळीचे मिलिग्रॅम्स आणि इतर मूलभूत माहिती पाहू शकता. परंतु हृदयविकाराच्या बाबतीत स्वतःच्या मनाने त्यापैकी कुठली एक गोळी ठरवू नये.
चालू रुग्णांच्या बाबतीत डॉक्टरांनी पूर्वी काही सांगितलेलेच असते. आयुष्यात प्रथमच असा झटका आला असल्यास निदान आपल्या नेहमीच्या डॉक्टरांशी फोनवर बोलून मगच ठरवावे.
*Nitroglycerin हे फक्त
*Nitroglycerin हे फक्त explosives च्या संदर्भातच ऐकले होते
>>> अगदी बरोबर !
या रसायनासंबंधीच्या काही रंजक गोष्टी या धाग्यावर (https://www.maayboli.com/node/81015?page=1) या प्रतिसादात लिहिल्या आहेत :
Submitted by कुमार१ on 8 February, 2023 - 08:58
मला नाहीये हृदयविकार. एक
मला नाहीये हृदयविकार. एक प्रिकॉशन म्हणून जवळ ठेवाव्या की काय असा विचार करत होते.
लेख वाचते परत.
अंगदुखीची पारंपरिक अस्पिरिन (
अंगदुखीची पारंपरिक अस्पिरिन ( डिस्प्रिन इत्यादी) ही नेहमीच "डॉक्टरांच्या चिठ्ठीविना" या सदरात आहे. परंतु हृदयविकारासाठी जे निरनिराळे डोस आणि प्रकार उपलब्ध आहेत त्यासाठी नियमानुसार डॉक्टरांची चिठ्ठी हवी.
सॉर्बिट्रेट 5 mg रुग्णाच्या
सॉर्बिट्रेट 5 mg रुग्णाच्या जिभेखाली ठेवावी आणि रुग्णालयात पोचे पर्यंत दर पंधरा मिनिटांनी परत द्यावी अशा तीन गोळ्या देऊ शकता असे वाचले/ऐकले आहे.
माहितीतील काही लोक सॉर्बीट्रेट ठेवतात घरच्या वयस्कांसाठी.
जर कोणी आधीच डॉकना विचारून योग्य ती गोळी ठेवली नसेल अशा वेळेस हृदयविकाराचा झटका येत असताना ही सॉर्बीट्रेट गोळी देणे योग्य होईल का?
याचे उत्तर माझ्या मते “नाही”
मानव,
याचे उत्तर माझ्या मते “नाही” असं आहे. कारण सांगतो.
ही गोळी वाटते तितकी ‘सरळ’ प्रकारातली नाही. जर आपल्याला संशयित रुग्णाचा कुठलाही पूर्व इतिहास माहित नसेल( त्याचे अन्य आजार, तो अन्य कुठली औषधे घेतो आहे की नाही वगैरे), तर अशा वेळेस सामान्य माणसाने ही गोळी देण्याच्या फंदात पडू नये.
या गोळी साठी काही महत्त्वाची Contraindications आहेत (जसे की तीव्र anemia वगैरे). तसेच तिची गंभीर allergy सुद्धा येऊ शकते. रुग्ण अन्य काही औषधे घेत असल्यास त्याचा रक्तदाब कमी होऊन धोकादायक पातळीवर जाणे हा तिचा दुष्परिणाम देखील आहे
जेव्हा आयुष्यात प्रथमच असा ‘संशयित झटका’ आलेला असेल तर तातडीने सुसज्ज रुग्णवाहिका मागवून रुग्णालयात नेणे सर्वोत्तम !
याचे उत्तर माझ्या मते “नाही”
दु प्र
उत्तम माहिती, धन्यवाद!
उत्तम माहिती, धन्यवाद!
रुग्णालयातील गंभीर स्थितीत
रुग्णालयातील गंभीर स्थितीत असलेल्या रुग्णांना त्यांच्या किंवा नातेवाईकांच्या परवानगीशिवाय अतिदक्षता विभागात हलवता येणार नाही
केंद्र सरकारची नवीन मार्गदर्शक तत्त्वे :
https://www.msn.com/en-in/health/health-news/hospitals-cannot-admit-crit...
वडीलांना ज्या वेळी त्रास
वडीलांना ज्या वेळी त्रास व्हायला लागला त्यावेळी छातीच्या मध्यावर दुखत होते. त्यामुळे आम्हालाही फारसा अंदाज आला नाही. कदाचित डाव्या बाजूला दुखते अशी समजूत दृश्य माध्यमांमुळे झाली असावी.
नंतर त्यांच्या कार्डीओलॉजिस्टबरोबरच्या रेग्युलर तपासणीत शरीराचे मॉडेल पाहिले ज्यात ह्रदयाची पोझिशन तिरकी होती. म्हणजे वरची बाजू साधारण छातीच्या मधे झुकलेली होती. त्यामुळे मध्यभागी दुखत असेल तरी दूर्लक्ष करू नका.
@डॉ कुमार >>>> काही चुकले असेल तर प्लीज करेक्ट करा.
माम,
माम,
अगदी चांगला मुद्दा !
लेखात मी वेदनाचे वर्णन दिलेलेच आहे. त्यात तिची मुख्य जागा छातीच्या मधोमध हीच लिहिलेली आहे. हृदय-झटक्याची जी वेदना असते ती बऱ्याच वेळा ‘दुखणे’ (pain) या स्वरूपाची नसून अधिकतर छातीच्या मधोमध ‘कसेतरी/अस्वस्थ वाटणे’ या स्वरूपाची असते.
शरीरशास्त्राच्या भाषेत या वेदनेच्या उगमाची बरोबर जागा दाखवायची झाल्यास त्याला retrosternal असे म्हटलेले आहे. खालील चित्रात आपल्या छातीच्या मधोमधचे sternum हाड दाखवले आहे ( तिरंगी) :
दृश्य माध्यमांनी ‘छातीत डाव्या बाजूला जोरदार दुखणे’ या प्रकारचे एकूण अतिशयोक्त चित्रण केलेले आहे हे खरेच !
वेदनेचे वर्णन >>> सॉरी मूळ
वेदनेचे वर्णन >>> सॉरी मूळ लेख वाचून बरेच दिवस झाल्याने हा पार्ट विसरलेच होते.
लेखातल्या मुख्य चित्रातील
लेखातल्या मुख्य चित्रातील व्यक्तीनेही हात छातीच्या डाव्या बाजूवर धरले आहेत.
बरोबर ! अशीच चित्रे सहज
बरोबर ! अशीच चित्रे सहज उपलब्ध होतात
वेदनेचा उगम तसा मध्यभागी असतो आणि काहींच्या बाबतीत ती डाव्या हाताकडे आणि अन्यत्र पसरते हे खरे आहे.
पण बऱ्याच वेळा नमुनेदार चित्र दिसण्याऐवजी एखाद दुसरेच सुटे लक्षण देखील दिसू शकते.
Pages