हृदयसंवाद (६) : हृदयविकाराचा झटका

Submitted by कुमार१ on 30 October, 2023 - 00:51

भाग ५ : https://www.maayboli.com/node/84289
.. ..... .... .... ...
अंतिम भाग
करोनरी वाहिन्यांमध्ये Atherosclerosisमुळे मेद आणि अन्य घटकांचा पापुद्रा कसा तयार होतो ते आपण मागच्या भागात पाहिले. आता या आजाराचा पुढचा टप्पा पाहू.
आजार वाढत असताना एका स्थितीत हा पापुद्रा फुटतो. त्याचबरोबर रक्तातील बिंबिका पेशी (platelets) सक्रिय होतात. परिणामी रक्तगुठळी तयार होते तसेच रक्तवाहिनीचे आकुंचन होते. या सर्वांमुळे वाहिनीत बऱ्यापैकी अडथळा निर्माण होतो. हा अडथळा किती काळ टिकतो आणि त्याची तीव्रता किती, यानुसार रुग्णाला कुठल्या प्रकारचा त्रास होतो ते ठरते. साधारणपणे दोन प्रकारचे रुग्ण आढळतात :
१. निव्वळ छातीतील वेदना (stable angina)
२. हृदयविकाराचा झटका (myocardial infarction)

१. निव्वळ छातीतील वेदना : या प्रकारात अचानक कधीतरी छातीत दुखू लागते. ही वेदना मध्यम स्वरूपाची असते आणि ती सुमारे पाच ते पंधरा मिनिटे टिकते. बऱ्याचदा अशी वेदना कुठलेतरी श्रम केल्यानंतर होते. छातीत दुखू लागल्यानंतर विश्रांती घेतली किंवा nitroglycerinया औषधाची गोळी घेतली असता ती थांबते. काही जणांच्या बाबतीत स्वस्थ बसले असताना देखील अशी वेदना होऊ शकते आणि काही वेळेस धूम्रपान केल्यानंतर ती उद्भवते.

२. हृदयविकाराचा झटका : जेव्हा करोनरी वाहिन्यांमध्ये अडथळा मोठ्या प्रमाणात होतो तेव्हा हृदयस्नायूंना गरज असणाऱ्या रक्तापेक्षा खूप कमी पुरवठा होऊ लागतो आणि ऑक्सिजन अभावी त्या पेशींवर परिणाम होतो. परिणामी काही पेशींचा समूह मृत होतो (infarction). जेव्हा हृदयस्नायूंचा रक्तपुरवठा कमी होतो तेव्हा तिथे काही रासायनिक घडामोडी होतात आणि त्यातून काही आम्लधर्मी आणि अन्य पदार्थ तयार होतात. या पदार्थांमुळे वेदनेचे चेतातंतू सक्रिय होतात व त्यामुळे रुग्णाला वेदना जाणवते.

हृदयविकाराच्या झटक्याचे काही प्रकार असतात. त्यातील सर्वाधिक आढळणारा प्रकार आधी पाहू.

प्रकार-१चा झटका
रुग्णाला प्रत्यक्ष झटका येण्यापूर्वी एक दोन दिवस आधी छातीत कसेतरी होणे आणि खूप दमल्यासारखे वाटू शकते. परंतु सर्वांच्याच बाबतीत अशी पूर्वलक्षणे येत नाहीत. काहींच्या बाबतीत ध्यानीमनी नसताना अचानक झटका देखील येऊ शकतो.

हृदयविकाराचा जो नमुनेदार झटका असतो त्या प्रसंगी सर्वसाधारणपणे अशा घडामोडी होतात :
• बऱ्याच वेळेस हा झटका पहाटे किंवा सकाळी लवकरच्या वेळात येतो कारण या वेळेस शरीरातील नैसर्गिक स्थिती अशी असते :
१. sympathetic चेतासंस्था उत्तेजित होते. त्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात.
२. हृदय-ठोक्याची गती आणि रक्तदाबात वाढ होते.
३. हृदयस्नायूंचे काम वाढते आणि त्यांचा ऑक्सिजनचा वापरही वाढतो.
४. रक्तातील प्लेटलेट्स एकमेकांना चिकटण्याची प्रक्रिया वाढते.

वेदनेचे वर्णन
१. तीव्र असते; एकदा दुखू लागल्यावर सुमारे अर्धा ते एक तासपर्यंत ती थांबत नाही.
२. ती छातीच्या मधोमध जाणवते. परंतु त्याचबरोबर मान, खांदा, जबडा किंवा डावा हात या भागांमध्येही ती पसरू शकते.
३. वेदनेचा प्रकार : छातीच्या मधोमध कोणीतरी वजन ठेवल्यासारखे वाटणे / किंवा पिळवटले जाणे / नुसतेच दुखणे किंवा जळजळणे.
४. काहींच्या बाबतीत पोटाच्या वरच्या भागात अस्वस्थता आणि वात अडकल्याची भावना देखील जाणवू शकते.

५. काही जणांत खालील अन्य लक्षणे उद्भवू शकतात :
* शरीरात काहीतरी भयंकर घडणार आहे अशी भावना
चक्कर येणे आणि/ किंवा बेशुद्ध पडणे
* खोकला, मळमळ आणि/ किंवा उलटी
* दरदरून घाम सुटणे
* दम लागणे, नाडीचे ठोके जलद आणि अनियमित होणे
* कोणीतरी आपला गळा घोटते आहे अशी भावना होणे.
* पोट फुगणे

रुग्ण तपासणी :
रुग्णाचे निरीक्षण आणि स्टेथोस्कोपने तपासणी केली असता खालील बदल झालेले दिसतात :
१. नाडीची गती : बऱ्याच वेळा वाढलेली परंतु काही वेळेस कमी झालेली. तालबिघाड असू शकतात.
२. रक्तदाब : बऱ्याच वेळा वाढलेला परंतु काही परिस्थितीत कमी झालेला असतो.

३. श्वसनाची गती वाढलेली असते
४. तापमान : पहिल्या 24 ते 48 तासांमध्ये थोडा ताप येऊ शकतो

५. छातीची तपासणी : हृदयाचे विशिष्ट ध्वनीबदल, खरखर तसेच फुफ्फुसांच्या भागावरही काही बदल ऐकू येऊ शकतात.
६. हात व पाय : यांच्या टोकांना निळसरपणा किंवा पांढरेफटक पडणे किंवा सूज येणे.

महत्त्वाच्या रोगनिदान चाचण्या :
१. इसीजी : यामध्ये हृदयातील विशिष्ट भागांच्या बिघाडानुसार निरनिराळे बदल दिसतात. असे बदल सुमारे 80 टक्के रुग्णांमध्ये दिसतात. अर्थात वैशिष्ट्यपूर्ण बदल न दिसणे किंवा इसीजी नॉर्मल येणे याही शक्यता असतात.

२. ट्रोपोनिनची पातळी : ही अत्यंत महत्त्वाची चाचणी आहे. या विषयावर स्वतंत्र लेख इथे वाचता येईल : https://www.maayboli.com/node/65025?page=3

troponin.jpeg

जेव्हा हार्ट अटॅकचा संशय येण्यासारखी लक्षणे रुग्णामध्ये दिसत असतात तेव्हा डॉक्टरांनी ताबडतोब रक्तावरील ट्रोपोनिनची चाचणी करायची असते. जर ती पॉझिटिव्ह आली तर रोगनिदान पक्के होते. परंतु जर का ती निगेटिव्ह असेल आणि लक्षणे असतीलच, तर मग ती चाचणी त्यानंतर तीन आणि नंतर सहा तासांनी पुन्हा करायची असते.
म्हणजेच, रुग्णालयात लक्षणे असलेला रुग्ण दाखल होता क्षणीच ती चाचणी करणे महत्त्वाचे- नव्हे अत्यावश्यक- असते.

३. गरजेनुसार काही प्रतिमातंत्र चाचण्या (angiography) करता येतात.

रोगनिदान
MI चे निदान करण्यासाठी त्याची सार्वत्रिक व्याख्या करण्यात आली आहे. त्यानुसार :
MI चे शिक्कामोर्तब करण्यासाठी खालील गोष्टींची पूर्तता व्हायला हवी:
१. रक्तातील पुरेसे वाढलेले ट्रोपोनिन (विशिष्ट कटऑफच्या वर)
आणि
२. खालीलपैकी किमान एक घटना :
अ) करोनरी-विकाराची विशिष्ट लक्षणे रुग्णात दिसणे
आ) इसीजीतील विशिष्ट बदल किंवा
इ) हृदयाच्या ‘इमेजिंग’ तंत्राने मिळालेला पुरावा

* याप्रमाणे खात्रीशीर निदान झाल्यावर विशिष्ट तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ते उपचार केले जातात. या लेखमालेत सुरुवातीस स्पष्ट केल्यानुसार हा मुद्दा या लेखमालेच्या कक्षेबाहेर आहे.

लक्षणांची रुग्णभिन्नता
आतापर्यंत वर्णन केलेला आजार नमुनेदार आहे. परंतु काही रुग्णांमध्ये याबाबत भिन्नता आढळते ती अशी :
१. दीर्घकालीन मधुमेही रुग्णांच्या बाबतीत वेदनेशी संबंधित चेतातंतूवर परिणाम झालेला असतो. त्यामुळे त्यांना छातीत वेदना जाणवतेच असे नाही.
२. वृद्धांच्या बाबतीत स्मृतिभ्रंश किंवा बिघडलेले मानसिक संतुलन असल्यास त्यांना संबंधित लक्षणे समजू शकत नाहीत. त्यामुळे ही घटना कुटुंबीयांच्याही लक्षात यायला वेळ लागतो.
३. पुरुषांशी तुलना करता स्त्रियांमध्ये लक्षणविरहित झटका येण्याचे प्रमाण अधिक असल्याने बऱ्याचदा लवकर निदान होत नाही.

झटक्याचे अन्य प्रकार
वरील प्रकार-१ व्यतिरिक्त जे अन्य काही प्रकार असतात त्यातले दोन प्रमुख प्रकार पाहू.

A. प्रकार-२ : यामध्ये हृदयस्नायूंची ऑक्सिजनची मागणी वाढते परंतु त्या प्रमाणात पुरवठा होऊ शकत नाही म्हणून झटका येतो. हा प्रकार होण्यास करोनरी वाहिन्यांचे अचानक आकुंचन, एनिमिया किंवा श्वसन दुर्बलता हे कारणीभूत असतात.

B. प्रकार-३ : झटक्यामुळे आलेला तात्काळ मृत्यू. अशाप्रसंगी मृत्यू इतक्या वेगात येतो की त्यावेळेस रक्तात ट्रोपोनिन वगैरे रसायने सोडली देखील गेलेली नसतात. काही वेळेस असा रोगी रुग्णालयात मृत अवस्थेत आणला जातो किंवा तिथे आणल्या आणल्याच त्याला डॉक्टरने हात लावण्यापूर्वीच त्याचा मृत्यू होतो.

अनिश्चित रोगनिदान
छातीत दुखणे आणि त्याच्या जोडीने वर उल्लेख केलेली काही लक्षणे, हृदय वगळता इतर अनेक आजारांमध्येही दिसू शकतात. रुग्णाची तपासणी आणि चाचण्या केल्यानंतर प्रत्येक वेळेस ‘नमुनेदार चित्र’ दिसतेच असे नाही. अशा प्रसंगी त्याला रुग्णालयात थांबवून ठेवायचे की घरी सोडायचे असा पेचप्रसंग निर्माण होतो. या प्रसंगी खालील प्रकारचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन कामी येते :

संभाव्य लक्षणे >>> रुग्णालयात दाखल >> डॉ. नी तपासल्यानंतर The HEART score असा काढतात :
History
ECG मधले बदल
Age (<45 , >65 )
Risk factors ( 0/1-2/3)
Troponin ( पातळीनुसार)

वरीलपैकी प्रत्येक मुद्द्याला ० ते २ गुण देतात. त्यानुसार HEART score १० पैकी किती हे कळते.
मग निर्णयप्रक्रिया अशी :
0-3: कमी धोका >>> लवकर घरी पाठवता येते.
4-6: मध्यम धोका >>> रुग्णालयात निरीक्षण चालू.
7-10: सर्वाधिक धोका >>> तातडीने योग्य ते उपचार

भविष्यात या संदर्भात मशीन लर्निंगचा वापर करण्यासंबंधी संशोधन प्रगतीपथावर आहे. रुग्ण दाखल झाल्यानंतर त्याच्या रक्तावरील ट्रॉपोनिन चाचणी एकदाच केली जाईल आणि रुग्णाची इतर सर्व माहिती मशीन लर्निंग यंत्रणेला पुरवली जाईल. त्यातून अचूक निदान केले जावे अशी अपेक्षा आहे.
**************************************************************************
समाप्त

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केरळ : खोबरेल तेलाचा स्वयंपाकात वापर

याचा हृदयविकाराच्या प्रमाणाशी संबंध आहे :
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC6994761/#:~:text=In%20India...

अर्थात फक्त आहारातील एकाच घटकाला दोष देता येणार नाही. विषय गुंतागुंतीचा आहे.

एकदा तळण काढलेले तेल स्वयंपाकात पुन्हा वापरणे अशास्त्रीय आहे. परंतु हा प्रकार भारतातील बहुतेक सार्वजनिक खानावळी आणि टपऱ्यांवर चालतो.

हे जास्त घातक आहे.

ब्ल्यू कोड
रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णास अचानक हृदयविकाराचा झटका आला किंवा त्याचे हृदय बंद पडले ( arrest ) तर अशा प्रसंगी तातडीने उपचार मिळण्यासाठी ब्ल्यू कोड नावाची यंत्रणा वापरली जाते.

यासाठी एक स्वतंत्र पथक नेमलेले असते. रुग्णालयातील कुठल्याही कक्षात वरील आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली असता त्याची माहिती ध्वनीक्षेपकाद्वारे दिली जाते. त्यानुसार 120 सेकंदात संबंधित डॉक्टरांचा चमू संबंधित रुग्णास उपचार देतो.

महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयांमध्ये सर्वात प्रथम अशी योजना पुण्यातील ससूनमध्ये सहा महिन्यांपूर्वी चालू करण्यात आली होती. त्यानुसार आतापर्यंत 778 रुग्णांसाठी तिचा यशस्वी वापर केला गेलेला आहे.

( बातमी : छापील मटा, 25 डिसेंबर 2023)

माझ्या निरीक्षणानुसार, निदान डॉक्टर आणि आहारतज्ञ यांच्या घरांमध्ये तरी तो कटाक्षाने टाळला जातो !

असे नसते कुमार sir.
Doctor आणि आहार तज्ञ ही पण माणसचं आहेत.
माणसाच्या चांगल्या वाईट सवयी त्यांच्यात पण असतात

Heart attack .
1) strok .
अस्वस्थ वाटणे, शरीरातील काही भाग निष्क्रिय होणे.
मेंदू मध्ये काही भागात रक्त स्त्राव.
ह्या मध्ये रुग्ण झडपट मरत नाही.
पण उपचार नाही मिळाले तर मात्र मरू शकतो.
२) हार्ट अटॅक काहीच चान्स न मिळता माणूस २ मिनिटात मृत्यू पावतो.
अब्दुल कलाम, ह्यांना असाच अटॅक आला होता.
उपचार करण्यास वेळ च नाही.
अनेक लोक ..
असेच जातात नकळत एक दोन मिनिटात.
त्याला कोणतेच उपचार नाहीत.

कोड ब्ल्यू = हृदयविकार
कोड पिंक = नवजात बालक पळवून नेले
कोड सिल्व्हर = टेररिस्ट/ बंदूकधारी आला आहे
कोड ब्लॅक = बाँबचा धोका
कोड रेड = आग लागली आहे
अजून १-२ आहेत, ते विसरलो.

अच्छा.
वरील दोन्ही संदर्भांमध्ये कोड व्हाईटबाबत मात्र भिन्न माहिती आहे.
पहिल्या संदर्भात तो हिंसाचारासाठी म्हटले आहे. त्यासाठी पांढरा रंग का निवडला असावा ?

आमच्या जवळच्या इस्पितळात टेररिस्ट आणि बॉंबसाठीचे कोड पाहिल्याचे आठवत नाही. पुन्हा गेलो तर पाहून येईन.

हे सर्व कोड चालतात का.?
इतकी आधुनिक सुविधा नक्की भारतात प्रॅक्टिकल मध्ये अस्तित्वात आहे का?
मला तर अस्तित्वात असेल ह्यावर minus ९०% मध्ये पण विश्वास नाही

भारतात कागदावर इतक्या सुविधा आहेत की जगात कोणत्याच देशात नसतील पण practically
अशी अवस्था आहे की त्याला दुरवस्था हा शब्द पण कमी पडेल.
नवीन शब्द शोधावा लागेल

ससून हॉस्पिटलमध्ये कोड ब्ल्यू सिस्टीम सुरू केलीय.
120 सेकंदात alloted टीम पेशंटकडे पोहचते.
अर्थात मी लोकसत्ता मध्ये आलेली बातमी वाचलीय.
सुरू झाल्यापासून किती जीव वाचवले वै आकडेवारी आली होती. मला नेमकी लक्षात नाही. इच्छुकांनी online शोधून घ्यावे. सरकारी रुग्णालयात देखील इच्छाशक्ती असेल तर मार्ग काढता येतो हेच ह्या निमित्ताने सिद्ध झाले.

120 सेकंद मध्ये भारतात मदत मिळूच शकत नाही.
लोकसत्ता बकवास गिरी करत आहे.
चार तासांनी मदत मिळाली तरी खूप झाले

कडू आहे पण सत्य आहे.
भारतात आरोग्य सुविधा एकदम बकवास आहे.
डॉक्टर ना आजारी ,अपघात मध्ये जखमी झालेले, हार्ट अटॅक चे रुग्ण.
ह्या लोकात पैसे कमावण्याची संधी दिसते.
वेळेवर उपचार देण्यात ,योग्य उपचार देण्यात त्यांना
काडी चा इंटरेस्ट नसतो.
जितका रोगी गंभीर तितके त्याला जास्त भीती दाखवून पैसे कमावणे ह्या मध्येच सर्व लागलेले असतात

कोड ब्लु ने एका नातेवाईकांचा ऑपरेशन थिएटर मध्ये बंद पडलेला श्वास वेळेत चालू झाला आहे.पण अर्थात हॉस्पिटलमध्ये असेल तर हे सोपं पडतं.

गंभीर रुग्ण असेल तर विसा चे कायदे सर्व देशांनी खूप सोपे केले पाहिजेत.
कोणत्याही देशात सहज उपचार साठी जाता आले पाहिजे.


120 सेकंद मध्ये भारतात मदत मिळूच शकत नाही.
>>>
अहो हे हॉस्पिटलमध्ये पेशंट ऍडमिट असतानीचा डॉक्टरला पेशंट पर्यंत पोचायला लागणारा वेळ आहे.

ते पण भारतात शक्य नाही>>>
तुमच्या पूर्वजांमध्ये कोणी फोटोग्राफर होते का?
असो, कुमारजी अवांतर साठी क्षमस्व. नवनवीन माहितीची भर घालून धागा वाटेवर आणावा.

120 सेकंद मध्ये भारतात मदत मिळूच शकत नाही>>>>
सरकारी इस्पितळांविषयी नाराजी असते कारण पेशंटसची प्रचंड गर्दी, त्यामुळे डॉक्टर व इतर सेवकांवर आलेला ताण आणि सतत रुग्ण, दुःखी नातेवाईक, मरोस वातावरण बघितल्यामुळे निर्माण होणारी एक प्रकारची तटस्थता (ती नसेल तर कामच करता येणार नाही) अशी परिस्थिती असते आजूबाजूला. तरीही केईएमसारख्या इस्पितळात डेडीकेटेडली काम करणारे, विनोदबुद्धी शाबित ठेऊन रुग्णाला कानपिचक्या देणारे डॉक्टर्स बघितले आहेत. कुठल्याही इस्पितळात पेशंट सकम्ब होण्याची लक्षणं असतील तर आधीच थोडीफार तयारी करून पेशंटवर विशेष लक्ष ठेवलं जातं हे अनुभवलं आहे. आयसीयूमधे तर एक डॉक्टर व किमान एक नर्स सदैव हजर असतातच.
त्यामुळे प्रोटोकॉल बनवले असतील तर खाजगी किंवा सरकारी इस्पितळात २ मिनीटाचा रिस्पॉन्स टाईम अशक्य नाही.

मा म >>> +११
सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न असलेल्या रुग्णालयांबाबत अधिक/उणे नक्कीच आहे. परंतु त्यांची चांगली बाजूही दुर्लक्षिली जाऊ नये.
एकेकाळी प्रसिद्ध लेखक व पु काळे यांनी अशा रुग्णालयातील डॉक्टरांचे अनुभवसिद्ध मनसोक्त आदरयुक्त कौतुक त्यांच्या लेखनातून केलेले आहे. अनावश्यक तपासण्या लिहून देणे आणि सबळ कारण नसताना रुग्णाला (बाहेरून विकत घेण्यासाठी) महागडी औषधे लिहून देणे हे तिथले गुण त्यांनी सर्वांसमोर आणले.

प्रचंड गर्दीमुळे (आणि सरकारीपणामुळे) येणारी बेफिकिरी आणि अनास्था हे दुर्गुण आहेत हेही तितकेच खरे.

Pages