साडेसात घोड्यांची शर्यत... 6th lap

Submitted by विक्रम मोहिते on 22 December, 2023 - 03:07

याआधी...
१. पहिला भाग https://www.maayboli.com/node/84439
२. दुसरा भाग https://www.maayboli.com/node/84446
३. तिसरा भाग https://www.maayboli.com/node/84453
४. चौथा भाग https://www.maayboli.com/node/84461
५. पाचवा भाग https://www.maayboli.com/node/84466

पोलीस चौकीतून ढुंगणावर लाथ खाऊन बाहेर पडलेला सचिन सरळ नेहमीच्या गुत्त्यावर जाऊन बसला. एक तर त्या हवालदाराकडून झालेला अपमान त्याला दारूमध्ये बुडवायचा होता आणि असल्या आतल्या खबरी त्याला पण तिथूनच मिळायच्या. गुत्त्याच्या मालकाचा भाऊ असलेल्या सलीम चाचाकडून. सलीम चाचा म्हणजे गुन्हेगारी क्षेत्रामधला संत माणूस, जसा कि भांगेत तुळस किंवा चिखलात कमळ. बाकी सगळं कशाला, आपले बबनशेठ पण सलीम चाचाला मानायचे म्हणजे विचार करा. इतक्या सकाळी गुत्त्यावर तुरळक गर्दी होती, नावाला बस २-३ टेबल वर लोक बसलेले होते. कोपऱ्यातल्या टेबलवर सलीमचाचा ला बघून तो सरळ तिकडे गेला.
"सलाम चाचा. "
"अरे सचिन तुम? सकाळी सकाळी कसा आला इकडे?"
"अरे काय सकाळ काय रात्र, दारू माझा एकच मित्र. "
"शाबास, म्हणजे आजपण कोणाला तरी बाटलीमध्ये उतरवून आला आहेस तू!"
"बाटलीमध्ये नाही चाचा, शेतात... ऊसाच्या शेतात."
"अबे शैतान कि औलाद, तुझे वो चीज बेचने के लिये नही बतायी थी, तू उस लफडे से दूर रहे इसलिये बतायी थी. "
"क्या चाचा तुम भी, सचिन नाम है मेरा, जब तलक इस खबर से १०० ना बना दु मुझे चैन नही आयेगा. "
"और सचिनके तरह वो सौ शायद तेरे नसीब मे भी नही आयेगा."
"कशाला पणवती लावता चाचा?"
"बरं ठीक आहे, पणवती नको, घोडे लावू का?" सचिनच्या मागच्या टेबलवरून आवाज आला.
चमकून त्याने मागे वळून पाहिलं. हाफचड्डी आणि गोव्याला घालतात तसा शर्ट घालून एक माणूस मास्क लावून बसला होता. वरचा प्रश्न त्यानेच विचारला होता.
"अबे ओये शाण्या, चड्डीतच रहा, दारू पिऊन जास्त बकवास केलीस तर इथेच गाडीन." सचिनने उगाच हुलपट्टी दिली
"चक चक. देवा त्याला माफ कर, त्याला माहित नाही आहे तो कोणाशी बोलतोय."
"तुझ्या आईची ***" सचिन टेबल वरून उठून त्या माणसाच्या अंगावर जाणार इतक्यात बाजूच्या दोन्ही टेबलवर बसलेल्या दोन्ही माणसांनी त्याला वरच्यावर अलगद उचलला. मागच्या टेबलावरच्या माणसाने समोरच्या ग्लास मधली दारू एका घोटात संपवली आणि सचिनकडे मोर्चा वळवला.
"तर सचिन, हुलीया बदलायचं काम तर तू चांगलं करतोस ऐकलं होतं, आज पाहिलं सुद्धा. आता इथून पुढं मी जे सांगतो ते चुपचाप काही प्रश्न न विचारता करायचं नाहीतर हे दोघे तुझा हुलीया बदलून टाकतील. कायमचा..."
दोन्ही बाजूनी घट्ट पकडून ठेवला असल्यामुळे सचिन आधीच नरम झाला होता, त्यात समोरचा माणूस ज्या शांतपणे त्याला सूचना वजा धमकी देत होता त्याने तर त्याची अजून टरकली. तरी पण उगाच अवसान आणून तो गुरगुरला.
"तू कोण आहेस बे, माझी माहिती कशाला काढतोय?"
"चक चक. तुला आत्ताच सांगितलं ना प्रश्न विचारायचे नाहीत."
सट्ट... हाफ चड्डीवाल्या माणसाने सचिनच्या गालावर गणपती काढला.
"चल आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर देऊनच टाकतो. नाव बबन युवराज झेंडे. सगळी मुंबई आपल्याला बबनशेठ म्हणून ओळखते. "
"आईची जय!!!" नाव तर सचिनने आधी पण ऐकलं होतं, आणि ख्याती तर मशहूर होतीच.
"तर सचिन. माझ्याच गुत्त्यावर येऊन माझ्याच अंगावर येणार तुझ्या सारखा चू माणूस तूच. आता तुझ्याकडे माझं काय काम आहे ते ऐक. हि हिरव्या शेताची जी खबर तुला सलीमचाचाने दिली आहे ती माझ्याच सांगण्यावरून दिली, आणि तू ती जाऊन त्या लेडी लोहारला देणार हे आम्हाला आधीच माहित होतं. किंबहुना त्याचसाठी तर ती खबर दिली होती. आता, यापुढे मी सांगेन त्या आणि तेवढ्याच खबरी पुढे देत राहायच्या, स्वतःच डोकं न लावता. सलीमचाचाला मी वचन तर दिलं आहे कि काम संपल्यावर तुला जीवे मारणार नाही म्हणून पण तुझा एखादा हातपाय तोडणार नाही, किंवा माझ्या पनवेलच्या बार समोरच्या टपरीवर जो तुझा भाऊ आहे त्याला खपवणार नाही असं काही बोलणं नाही झालं बरं का आमचं, म्हणून एकदम शहाण्या बाळासारखं वागायचं. "
"हो साहेब."
"ना ना, ते साहेब वगैरे सगळं चौकीवर बोलायच्या गोष्टी, आपल्याला लोकांनी बबनशेठच बोललेलं आवडतं."
"ठीक आहे बबनशेठ. तुम्ही सांगाल ते आणि तसं करेन."
"वाह, लवकर समजलास. हुशार आहेस. चला, पुढच्या गोष्टी माझ्या फ्लॅटवर जाऊन करू. "

बबन बबन बबनशेठ, सगळ्याची विकेट थेट. लेडी लोहारच्या किल्ल्यात घुसायला ट्रोजन हॉर्स तर मिळाला, आता हा घोडा किती लोकांचे घोडे लावणार हे तर पुढच्या भागातच कळेल...

क्र... म... शः ...

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults