याआधी...
१. पहिला भाग https://www.maayboli.com/node/84439
२. दुसरा भाग https://www.maayboli.com/node/84446
३. तिसरा भाग https://www.maayboli.com/node/84453
"अरे अशोक साहेब, तुमचीच वाट पाहत होतो दोन दिवसापासून, मला वाटलं कार्ड सुद्धा मलाच देऊन टाकलं कि काय टीप म्हणून" ओशाळलेल्या चेहऱ्याने बार मध्ये येत असलेल्या अशोकला पाहून विशाल म्हणाला.
"ख्या: ख्या:, कायपण बोलता राव तुम्ही." अशोक अजून ओशाळा झाला.
"मग काय साहेब, अहो १०% वाली मोठी माणसं तुम्ही, असे १० कार्ड वाटू शकता आमच्या सारख्या गरिबांना. "
"जाऊ दे रे विश्वास."
"विशाल... "
"काय?"
"माझं नाव, विशाल. "
"साला २ दिवसात नाव पण चेंज केलं तू?"
"नाही साहेब, जन्मापासून म्हणजे बारशापासून हेच नाव आहे"
"बरं, विशाल तर विशाल. माझं कार्ड मिळेल का आता मला?"
"हो, कार्ड तर मिळेल पण १० वाजता, ते मी सांभाळून माझ्या रूम वर ठेवलं आहे. अर्ध्या तासाने माझी शिफ्ट संपली कि आपण सोबत जाऊन घेऊ. तोपर्यंत तुम्ही एखादा पेग घ्या, ऑन द रॉक्स, ऑन द हाऊस."
फुकटची दारू कोण सोडेल? तेपण अशोक सारखा गजराछाप माणूस तर नक्कीच नाही. कोपऱ्यातलं टेबल पकडून मॅक्सिचं गाणं ऐकत अशोक निवांत बसला. या पोरीला आधी कुठे तरी पाहिलं आहे हा विचार त्याच्या डोक्यात कुठेतरी पिंगा घालत होता. पण बँक मध्ये येणारी फॉर्मल ड्रेसमधली चष्मीश मॅक्सि आणि इथे नट्टापट्टा करून डिम लाईटमध्ये वन पीस घालून क्लास इंग्लिश गाणं गाणारी मॅक्सि एकच असतील हे त्याच्या बैलबुद्धीला पटणारं नव्हतं. गाणं संपवून मॅक्सि सहज जातेय दाखवत बार काउंटरकडे गेली.
"बैल आलाय" विशाल म्हणाला.
"हो पाहिलं. मी जरा लवकर निघेन आज, चौकातल्या टपरीवर वाट बघत थांबेन. याला घेऊन तिकडेच ये."
"हा चालेल."
शेवटचा पेग सर्व्ह करून विशाल चेंजिंग रूम मध्ये गेला आणि तिथून नेहमीचे कपडे घालून अशोकसोबत बाहेर पडला.
"तुझी मजा आहे यार विश्वास आपलं विशाल. रोज साला किती सगळी दारू वाहते तुझ्या हातातून, आणि आजूबाजूला पण फुल्ल दारूच्या बाटल्या- ते पण एकदम दर्जा"
"दारू काय साहेब, आज चढते उद्या सकाळी एकतर संडासात जाते नाहीतर डोक्यात. मग आहेच उतारा बितारा भानगडी. "
"हा आता त्याला काय इलाज आहे का"
"इलाज शोधला कि सापडतो, नाही का? "
"म्हणजे?"
"म्हणजे जसं माझ्या आजूबाजूला अखंड दारू वाहते, पण माझ्या पोटात काही जात नाही, तसं तुमच्या आजूबाजूला अखंड पैसा वाहतोय, पण तुमच्या खिशात काही जात नाही. पण त्याच्यावर इलाज आहे कि आपल्याकडे. "
अशोकने विशालकडे चमकून पाहिलं.
"म्हणजे?"
"तुम्ही प्रश्न फार विचारता अशोकसाहेब, रूमवर जाण्याआधी एक एक मस्त सुट्टा मारू आणि मग बोलत घरी जाऊ."
टपरीजवळ मॅक्सि दोघांची वाटच बघत होती.
"तू इथे?"
मॅक्सिला तिच्या नेहमीच्या कपड्यात पाहून अशोकने हैराण होऊन विचारलं.
"जिथे पैसा तिथे मॅक्सि, मग ती बँक असो किंवा बँकवाला माणूस. बाकी गप्पा आपण रूमवर जाऊन मारू, चालेल ना विशू बेबी?"
थोड्याच वेळात विशालच्या रूमवर तीन छोट्या गोल्ड फ्लेक शिलगावल्या गेल्या, आणि एका मोठ्या सुरुंगाची वात सुद्धा.
क्र... म... शः ...
मस्त पकड घेतली आहे गोष्टीने .
मस्त पकड घेतली आहे गोष्टीने ...