साडेसात घोड्यांची शर्यत... 3rd lap

Submitted by विक्रम मोहिते on 16 December, 2023 - 10:08

"झाला साला मा*** लाल...!!!"
प्रत्येक स्पीड ब्रेकरला 'भ'कारी, आणि लाल झालेल्या ट्रॅफिक सिग्नलला 'म'कारी, शिवी पण ठरलेली आणि पुढचं स्पष्टीकरणसुद्धा...
"अरे हे साले भो** स्पीडब्रेकर रे, एवढे मोठे यांच्या बापाने बांधलेले, गाडीचा पाटा घासून निघतो सगळा!" किंवा लाल सिग्नल असेल तर "हे मा** सिग्नल ना, आयुष्यातल्या साडेसात घोड्यासारखे असतात, एक लागला कि एकामागोमाग एक लागत जातात..." आता हे घोडे साडेसात कसे असं त्याला आजपर्यंत कोणी विचारलं नाही, आणि त्याने स्वतःहून सांगायचा तर सवालच येत नाही.

सायन वरून सुसाट निघालेली ती निळी स्कोडा पनवेल क्रॉस करून गोवा हायवे ला केंव्हा लागली कळलं सुद्धा नाही, पण गल्ल्या गल्ल्यामधून घुशीसारखी फिरत जेंव्हा ती एका गुत्त्यासमोर येऊन उभी राहिली तेंव्हा कुठे विशालने काच खाली करून मोकळा श्वास घेतला, आणि त्या श्वासासोबत पहिल्या धारेच्या देशीचा भपकारा त्याच्या नाकात गेला... नेहमी उंची मद्यात खेळणारा विशालने लगेच नाक मुरडलं नेमका तेंव्हाच बबनने बारच्या बाजूला असलेल्या टपरीवरच्या पोराला शिट्टी वाजवून गाडीच्या जवळ बोलवलं.

"छोटा डॉन बसलाय का वरती?"
"नाही,,, म्हणजे कोण छोटा डॉन, मला काही माहित नाही असा कोणी... "
"तुझ्या आईचा XXX..." डोळ्यावरचा मोठा गॉगल आणि तोंडावरचा रुमाल काढून बबनने हक्काची शिवी हासडली.
"अरे बबनशेठ तुम्ही, हे एवढं सगळं घातलंय ओळखलंच नाही मी. आहेत वरती दादा, मी सांगतो तुम्ही आलाय."
"अरे थोबाड दिसत नसलं तरी आवाज ओळखता येतो का नाय, ते सांगायचं राहू दे जा दोन कोल्ड्रिंक घेऊन ये वरती, मीच जातो डायरेक्ट..."
आता बबनशेठ वर जाणार मग आपण गाडीत वाट बघत थांबायचं कि सोबत जायचं असा विशालच्या डोक्यात विचार येण्यापूर्वी बबनने त्याचं उत्तर दिलं - "तुमच्याकडे हनिमूनला गेल्यावर गाडीतच बसून राहतात का खोलीत पण जातात?"
तोंड वाकडं करत विशाल गाडीतून खाली उतरला, या बबनची भाषा त्याला कधीच आवडायची नाही, पण अडला हरी बबनचे पाय धरी. असे मुंबईतले भरपूर हरी बबनपुढे वाकून उभे होते आणि त्यामुळेच २ वर्षांपासून कागदोपत्री तडीपार असूनसुद्धा बबन आख्ख्या मुंबईत राजरोसपणे फिरत होता.

त्या सडलेल्या पत्र्याच्या जिन्यावरून जाताना वरती अलिबाबाची गुहा बघायला मिळेल असं विशालला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. १० बाय १० च्या त्या खोलीमध्ये शवागारात असावा इतका गारवा होता, सगळीकडे नुसत्या वायरीच वायरीचं जाळं पसरलेलं होतं, अधून मधून कसले तरी ब्लिंक करणारे मॉनिटर होते, आणि या सगळ्याच्या मधोमध एखादा कोळी जाळं विणून बसावा तसा विकी Y2K चष्मा लावलेल्या मिचमिच्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत होता...

"बबनशेठ, तुम्हाला माहित आहे मला या जागेवर पाहुणे आलेले आवडत नाहीत." विकी.
"आणि मला आठवड्याचा हफ्ता कमी आलेला आवडत नाही, ते पण चार लाख कमी... " बबनशेठ
अवाक होऊन विकी बबनशेठकडे पाहत राहिला.
"हॅहॅहॅ, तुला वाटलं असेल मला कळणार नाय विकी, पण या बबनचा बबनशेठ असाच नाय झाला. बारा भानगडी करून आणि त्या निस्तरताना तेरावी चा प्लॅन करायचो म्हणून आज तुला इथं कामाला ठेवू शकतोय, नाहीतर आजपण खालच्या टपरीवर कोणाच्या तरी पानाला चुना लावत बसलो असतो. तेंव्हा परत मला चुना लावायचा प्रयत्न केलास तर तुला पानासकट खाऊन थुकून टाकेन, कुठल्या गटारीत जाशील पत्ता पण लागणार नाही कोणाला."

त्या दोघांचं भांडण ऐकून विशालची आधीच टरकलेली, ते ओळखून बबनशेठ हसत जरा वातावरण थंड करायला बोलायला लागला, : अरे विशाल तू कशाला टेन्शन घेतो, हे आमचं नवरा बायकोच भांडण असं चालूच राहतं. याची ओळख करून देतो, याचा नाव विकी, विकी Y2K. आता Y2K का विचारशील तर त्याची मोठी स्टोरी आहे, २००० साली जेंव्हा एकाच वेळी तीन झिरो सिस्टिममध्ये चालत नव्हते ना, तेंव्हा सगळ्याची गा फाटलेली, मग त्यांनी २००० च्या ऐवजी Y2K वापरायला सुरु केलं, त्याच वर्षांत अजून एक गफला झाला होता. पगारातली कॉइन ऍडजस्टमेन्ट काय असतं माहित आहे का?"
"हा पगारात राऊंड फिगर करायला थोडे पैसे वाढवले किंवा कमी केले जातात, म्हणजे पूर्ण रुपया बनतो ट्रान्सफर करायला. " विशाल.
"तू तर हुशार पण आहे रे, तर २००० सालामध्ये जितक्यापण लोकांचे पगार खाजगी बँकेत होते, त्यातल्या १०० मोठ्या बँका आम्ही निवडल्या- त्यांना संपूर्ण वर्षभर कॉइन ऍडजस्टमेन्ट निगेटिव्ह दिली, आणि जी रक्कम कमी केली गेली, ती परत बँकेत सुद्धा गेली नाही." बबनशेठ.
"मग?"
"ती आधी या विकीच्या लॅपटॉप मध्ये आणि मग या बबनच्या पोटात गेली."
१०० मोठया बँका गुणिले त्यातली हजारो पगाराची खाती आणि पगारातली ऍडजस्टमेन्ट गुणिले बारा महिने... विचार करूनच विशालचं डोकं गरगरायला लागलं.
"एकदम टाईमवर आला तू," पोऱ्याच्या हातातून बाटल्या घेत बबनशेठ म्हणाले. "घ्या विशाल शेठ, कोल्ड्रिंक घ्या आणि दिमाग थंड होऊ द्या. डोक्यात किती करोडचा गफला आहे हा हिशोब करून गरम झालं असेल ते. तुम्ही पण घ्या विकी साहेब, ४ लाखाचा कोल्ड्रिंक आहे हा."
बबनचा शालजोडीमधला जोडा विकीला बरोबर बसला.
"पुढच्या हफ्त्यात सगळे उरलेले पैसे पाठवून देतो एकत्र. आता या साहेबांची सुद्धा ओळख करून द्या. " विकी.
" याचं नाव विशाल, गेली २ वर्ष आपण ज्या हिरव्या शेतात घुसायचा विचार करतोय, त्या शेतातला एक बैल याच्या हातात लागलाय." बबनशेठ.
ग्रीन फील्ड बँकेसाठी हिरवं शेत इतका बाळबोध कोड वापरल्याबद्दल विकीला बबनच्या बुद्धीची किव आली, पण सध्या शांत राहणंच त्याच्या भलाईचं होतं.
"तेंव्हा शेताची माहिती घेऊन शेतात एन्ट्री कशी करायची आणि चारा खाऊन बिनबोभाट बाहेर कसं पडायचं याच्यावर काम सुरु करा दोघांनी."
"ठीक आहे, आज रात्रीपासून काम सुरु होईल."
"रात्री माझी शिफ्ट असते, मला काम करायला जमणार नाही रात्री." विशाल.
"कामाची फिकीर माझ्यावर सोड, तू फक्त त्या बैलाला माझ्या दावणीमध्ये आणून बांध, बाकी काम माझं" बबनशेठ बोलले.
"ठीक आहे मग तुम्ही बस शेट्टीला सांभाळा, बाकी बैलाला कसं झुलवायचं ते मी बघतो. हा, मला मॅक्सिची मदत लागेल त्यासाठी. " विशाल.
"डन समज मग, सगळ्यांनी आपली आपली कामं करा, पैशे मोजायचं आणि वाटण्या करायचं काम नेहमीप्रमाणे माझ्यावर सोडा. भरपूर पाणी पाजायला लागणार आहे या शेतात आणि पीक सुद्धा तितकंच घ्यायचं आहे." बबनशेठ
"चालेल." अचानक काहीतरी आठवल्यासारखं विशाल बडबडला, "ते कॉइन ऍडजस्टमेन्टची कल्पना सुपरमॅनमध्ये होती ना?"
"कल्पना करणं किंवा चित्रपटात पाहणं आणि रिऍलिटी मध्ये आणणं यात जमीन अस्मानाचा फरक आहे विशालशेठ. जसं कि मॅक्सि डिकॉस्टा सोबत संसार करायचा हि तुमची कल्पना आहे, आणि २००० हजार सालापासून प्रत्येक २ वर्षांनी त्या १०० बँकांचा पैसे Y2K माझ्या अकाउंट ला जमा करतो हि रिऍलिटी आहे. तेंव्हा आता बाकी विचार सोडा आणि कामाला लागा, आपल्याला लेट होतोय निघायला." बबनशेठ.
आपल्या आतल्या गोष्टीसुद्धा बबनला माहित असलेल्या बघून विशाल आतल्या आत चरफडला, पण तोंडावर हसू आणून गपचूप गाडीत जाऊन बसण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्यायसुद्धा नव्हता. पायऱ्या उतरताना बबनशेठने विकीला दिलेली पुसटशी धमकीवजा समज मात्र नक्की त्याच्या कानावर पडली...
"आणि जर का हि गोष्ट तिसऱ्या कोणाला कळली तर मग जीवाला मुकशील फुकट... "

क्र... म... शः ...

याआधी...
१. पहिला भाग https://www.maayboli.com/node/84439
२. दुसरा भाग https://www.maayboli.com/node/84446

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults