कालचा घोडपदेव...
विजयादशमीच्या दिनी देवीच्या मिरवणुका सुरू होत्या. आम्ही देखील त्या मिरवणुकीत सहभागी होतो. हा उत्सव असा आहे की, बालकांना नाचायला लावणारा, तरुणांना मस्त करणारा, वृध्दाना तारुण्याच्या स्मरणाने विव्हल करणारा, महिला वर्गाला गॅस-चुलीपासून दूर करीत आनंद घडविणारा.भक्तीचे अलौकिक दर्शन घडविणारा. चालता चालता विषय निघाले दिवसा निघणार्या विसर्जन मिरवणुका आता संध्याकाळी निघू लागल्या. नवीन पिढी आहे. त्यांच्या आवडीने घ्यावे. परमार्थाच्या पवित्र धाग्यात गुंफून घेतलेल्या तरुणाईला जे आवडेल तेच करणार. हळूहळू सर्वत्र बदल होत आहे. तो स्वीकारायचे काम मात्र जुन्याजाणत्यानी मोठेपणाने केले आहे.
विसर्जन मिरवणुकीत विद्युत रोषणाई अगदी डोळे दिपविणारी. डीजे मुळे छातीत होणारी धडधड आणि कमालीचा उष्मा असून देखील आबालवृध्द बहुसंख्येने सामील होतात. पाण्याची वेळ असून देखील महिलामंडळी तू माझी माऊली, मी तुझे वासरू अगदी भक्तिभावाने म्हणत चैतन्याची विजयादशमी साजरी करीत हौसेने सामील होतात. प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर नऊ दिवस जितका खर्च होतो त्याही पेक्षा अधिक विसर्जन सोहळ्यावर खर्च करण्यात आजच्या तरुणाईला मौज वाटते. त्यांना अडविण्याची, त्यांच्या बेताल खर्चावर अंकुश राखणारी मंडळी मनाला आवर घालतात. कारण ती तरुणाई आपल्याच घरातली असतात. शेवटी जगाच्या कल्याणासाठी मानवतेचे पसायदान मागताना या तरुणाईचे कौतुक करायला हवेच. विशेष म्हणजे विजयादशमी साजरी करण्यात केवळ हिंदुच होते असे नव्हे तर मुस्लिम समुदायाने, पारशी कम्युनिटी ने आपल्या मित्रांना हॅप्पी दशहरा म्हणून मेसेज पाठविले. यातून निश्चितच बोध घ्यायला हवा की देवीचा उत्सव असो वा गणेशोत्सव, मानवाचे मनपरिवर्तन होत असताना दिसत आहे. जे आयुष्य आपण जगतो, त्या आयुष्याचा अर्थ हिंदूंना नव्हे तर इतर समाजाला देखील कळलेला दिसतो. मानवतेचे मर्म सांगणारा आपला उत्सव सोशल मीडियामुळे जातधर्म विसरून माणुसकीचा धर्म सांगत आहे.
कालचा घोडपदेव हे शीर्षक देताना कालच वृत्तान्त नव्हे तर जरा भूतकाळात डोकावताना मात्र अनेक आठवणी आठवताना थोडेसे मागे सरकत गेलो. घोडपदेव हा विजयादशमीच्या दिवशी गजबजलेला असायचा. देवीची विसर्जन मिरवणूक करून मंडपात आरती करून आम्ही घरी जाऊन अंघोळ करून पुन्हा घोडपदेवच्या रस्त्यावर परतायचो. मारुती माळी चाळ, बुवाचाळीपासून ते हिरजी भोजराज, हारूसिंग सोभराज चाळ, सुभाषलेन पर्यन्त सर्वत्र आपट्याच्या पानाची जुडी घेऊन माणूस उभा असायचा. मोरेवाडी, पवारवाडी, लिंबाचीवाडी, लौकी ग्रामस्थ, घोडपदेव व्यायाम शाळा, जंनजागृती व्यायामशाळेतील, कापरेश्वर आखाड्यातील ग्रामस्थ आणि चाळीचाळीतिल आमचे रहिवासी बांधव एकमेकांना आपट्याची पाने देत आलिंगन देत होती. हे सारे वैभव मात्र कुणीतरी हिरावले. दुसर्या दिवशी आपट्याच्या पानांचे खच रस्त्यावर पडलेले असायचे. महापालिका कर्मचारी ते बघूनच भल्या सकाळी अर्धमेला होत होता. आज त्या ऐवजी फटक्याच्या खच, त्यांचे कागदी बॉक्स, फटाके महाग म्हणून नवीन आलेले कागदाचे कपटे, प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या बघायला मिळतात.
अजून एक आठवतंय. दसर्याच्या दिवशी खानावळीत जेवणार्या माथाडी कामगार, गिरणी कामगार आपल्याला जिच्या हाताने बनविले अन्न पोटात जाते त्या भगिनीला साडीचोळी वाजत-गाजत घेऊन जात असत. लेझिम जेव्हा दारात येत होते तेव्हा ती माय वर्षभराचा थकवा क्षणात दूर सारून आपल्या भाऊरायाचे आगतस्वागतात गढून जात होती. ज्याला साडीचोळी घेता नव्हती तो आपला ब्लाऊज पीस ओवाळणीच्या ताटात घालून आपला बंधुधर्म निभावत होता. हे भावरम्य वैभव सारे लयास गेले. का कुणास ठाऊक... मुंबईतल्या या देखण्या वैभवाला कुणाची नजर लागली? त्या विषयी कुणा नाही खंत ना दू:ख. कारणे ठाऊक आहेत. पण न बोलणे बरे... कालचा घोडपदेवचा चंदनाचा गंध दूर गेला असेल पण नव्या सहृदय तरुणाईकडून प्राजक्त फुलवित, नव्या दृष्टीचा घोडपदेव बघायला मिळत आहे. हे नाकारता येणार नाही. बिनदिक्कत नवलाईचे उत्सव साजरे होत राहणार कारण शुध्द अंत:करणाने देणगी, वर्गणी देणारा दाता जोपर्यंत जीवित आहे. त्याच्या विश्वासाला तडे जात नाहीत तोपर्यंत हे संस्कृतीचे व्यासपीठ अबाधित राहील.
अशोक भेके
उपनगरांत संमिश्र वस्ती वाढू
उपनगरांत संमिश्र वस्ती वाढू लागली हेच कारण.
छान.
छान.
धन्यवाद मित्रांनो
धन्यवाद मित्रांनो
आपला प्रतिसाद लाखमोलाचा