साडेसात घोड्यांची शर्यत...

Submitted by विक्रम मोहिते on 12 December, 2023 - 07:07

ए डिसेन्ट प्लेस...
खरं तर एखाद्या बार साठी हे नाव ठेवणं म्हणजे जरा अतीच होतं, पण मद्यपान हा श्रीमंतांचा शिष्टाचार झाल्यापासून या मदिरालयाला आणि तळीरामांना फार चांगले दिवस आले आहेत. त्यात आज शुक्रवार- म्हणजे तर हक्काचा दिवस… काउंटरवर एक एक ऑर्डर पास करता करता विशाल सगळ्या बारमध्ये नजर फिरवत होता, हि खरं तर त्याची नेहमीची सवय होती, रोजची गिर्हाईके सोडून नवीन आलेल्या लोकांचं निरीक्षण करायचं आणि त्यातला कोण नवखा कोण जुना, कोण दुसऱ्या बारचा याचा उगाच मनाशी अंदाज लावत बसायचं. टेबलावर शांत बसून आपला पेग संपवून आणि मग चांगली भरघोस टीप देऊन निघणाऱ्या गिर्हाईकांना त्याच्या लेखी काडीची किंमत नव्हती. त्यांना तो ब्रीझरछाप म्हणायचा. चढत नसेल तर दारू पिऊच नये असं त्याचं पहिल्या पेग पासून स्पष्ट मत होतं. म्हणजे किमान एखादा ग्लास तरी फुटल्याशिवाय पिण्यात कसली मजा! आज मात्र काउंटर समोरच्या टेबलवर बसलेलं गिर्हाईक त्याच्या आदर्श गिर्हाईकाच्या अपेक्षांना अगदी पुरेपूर उतरलं होतं. पहिल्या पेगच्या पहिल्या घोटापासून त्याची अखंड बडबड चालू होती, अशा बडबडीतलं निम्मं म्हणजे बकवास असतं इतकं त्याला अनुभवाने माहित होतं , पण तरीही- दारू पिऊन शेर झालेला माणूस बायकोच्या नावाने कसा गुरगुरतो हे बघण्याची मजा काही औरच होती. आजूबाजूच्या टेबलवरच्या जवळपास सगळ्यांचं लक्ष तिकडे होतं आणि हि थोडी काळजीची गोष्ट फक्त या साठी होती कि त्या लोकांची दारू प्यायचा वेग आणि पर्यायाने बारचं उत्पन्न आणि त्याचं कमिशन कमी व्हायला लागलं होतं. रोज ओल्ड मॉंक ढोसणाऱ्या माणसाने अचानक जॅक डॅनिअल मारल्यावर तो जसा बडबडायला लागतो तसंच त्या माणसाची अखंड बडबड चालू होती. अचानक त्याच्या तोंडातुन ग्रीनफील्ड बँक हे नाव येताच विशालचे कान टवकारले गेले, त्याचा सातवा पेग पुढे ठेवून विशालने हळूच विषय काढला.
"सर तुम्ही ग्रीनफिल्ड मध्ये काम करता का?"
"मी काम करतो का? मी सोडून भेंचो* एक तरी कोणी काम करतो का दाखव मला, आणि सापडला तर इथे त्या पोरींच्या ऐवजी मी नागडा होऊन नाचून दाखवेन तुला..."
त्या बेवड्याची ढेरी आणि अवतार बघून त्याला नाचवलं असतं तर आपल्या बार मध्ये दुसऱ्या दिवशीपासून कोणी कुत्रं पण आलं नसत ती खात्री होती विशालला, तरी ग्रीनफिल्ड मधला माणूस भेटणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती, गेली ४-५ वर्ष विशाल नोकरी सोडून स्वतःचा बार चालू करण्याचा विचार करत होता, धंद्यातले बारकावे त्याला आता बऱ्यापैकी माहित होते, जागा आणि माणसांची माहिती त्याने काढली होती, प्रश्न होता फक्त पैशांचा पण त्याच्यासारख्या नवख्या माणसावर इतका पैसे कर्जाऊ देऊ शकेल अशी एकच बँक होती आणि नशिबाने त्याच बॅंकेतला कोणी एक टूकोजीराव त्याच्या समोर बसला होता. दुभत्या म्हशीच्या लाथा गोड या हिशोबाने त्याची बडबड सहन करणे भागच होतं.
"बिल बनव माझं, आणि तुला किती टीप हवी आधीच सांग, आज आपण खूप खुश आहे. रोज ते भोस**चे बॉस लोक ५% घेतात, आज मी एकाच दिवशी ५ डील मध्ये १०% घेतले, त्यांना एक छदाम मिळू दिला नाय, आज घरी जाऊन बायकोला एकदम खुश करून टाकणार गजरा बिजरा नेऊन..."
विशाल स्वतःशीच हसला, ५ डील मधलं कमिशन घेऊनसुद्धा त्या टकल्याला गजरापेक्षा मोठी गोष्ट घ्यायची अक्कल सुचत नाही म्हणजे एकतर डील लहान असेल, किंवा त्या माणसाचा मेंदू. पण ग्रीनफिल्ड मधली डील लहान असण्याची शक्यता कमी होती, आणि याची अक्कल कमी असण्याची शक्यता जास्त, आणि स्वतःच्या कामासाठी असाच माणूस विशालला हवा होता.
"हे तुमचं बिल, आणि १०% डिस्काउंट माझ्याकडून, कारण आज तारीख १०, मिळालेलं कमिशन १०% म्हणजे १० हा तुमचा लकी आकडा आहे."
"एक नंबर बोलला बघ तू, आवडला आपल्याला. नाव काय तुझं?"
"विशाल."
"हा विशाल, हे माझं कार्ड घे आणि स्वाईप कर, माझा कोड नाईन एट नाईन टू. "
"नक्की सर."

बिल भरून आल्यावर कार्ड परत खिशात टाकून भेलकांडात जाणाऱ्या त्या माणसाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे विशाल एक मंद स्मित करत पाहत होता, स्वाईप करून झाल्यावर त्याने मुद्दाम कार्ड बदली केले होते, शक्यतो बार मध्ये विसरलेलं कार्ड घ्यायला नवखी गिर्हाईके परत येत नाहीत हा त्याचा अनुभव होता, पण या गजराछाप माणसाला त्याने बरोबर ओळखलं होतं, फक्त कार्ड घेण्यासाठी हा इसम नक्की परत येणार आणि त्यानंतर त्याने वर्षभर डोक्यात शिजवत ठेवलेला प्लॅन पूर्ण करायला हाच माणूस मदत करणार हे त्याच्या डोक्यात आता पक्कं झालं होतं, आता फक्त उद्याचा दिवस उजाडायची वाट बघायची होती..

क्र... म... शः ...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंटरेस्टिंग..!

मी क्रमशा कथा शक्यतो वाचत नाही.. ही तशी आहे हे माहीत नसल्याने फसलो.. पण आता उत्कंठा वाढली आहे Happy

सर्वांचे आभार, खरं सांगू तर कथेचा प्लॉट तयार आहे, जसा एक एक भाग लिहून होईल तसा गरमागरम पोस्ट करत राहीन.