चित्रकला - एक छंद - एक व्यक्त व्हायचे माध्यम
नुकतेच मायबोलीवर "कलर बाय नंबर" बद्दल समजले. अॅप डाऊनलोड करून चेक केले तर त्यात एका चित्राचे त्याच्या रंगसंगतीनुसार अगणित तुकडे केले होते. त्या तुकड्यांना नंबर दिले होते. प्रत्येक नंबरसोबत एक रंग होता. बोटाने प्रत्येक तुकड्याला टिकटिक करताच आपोआप ते रंग भरले जात होते. जसे ते क्रमाने नंबर ठिपके जोडून चित्र तयार करायचे असते, तसेच यात एक चित्र डोळ्यासमोर रंगताना बघून आनंद घ्यायचा असतो. विरंगुळा म्हणून नक्कीच छान आहे. पण चित्रकला म्हटले की माझ्या डोक्यात काहीतरी वेगळेच येते..
जसे लिहीने, गुणगुणने, नाचणे असते त्याचप्रमाणे चित्रकला देखील एक भावना व्यक्त करायचे माध्यम आहे. केवळ चित्र रेखाटणेच नाही तर एखाद्या चित्रात रंग भरताना देखील ते आपल्या मूडनुसार भरले जातात आणि त्यानुसार ते चित्र आपल्या मनात जसे असते तसे रंगून तयार होते. ते रंग जर दुसर्या कोणी आधीच ठरवले तर ते त्याच्या डोक्यातील चित्र तयार होताना बघण्यासारखे झाले.
आणि म्हणूनच असे वाटते की लहान मुलांना देखील त्यांच्या मनाप्रमाणे हवे तसे चित्र काढू द्यावे, हवे ते रंग त्यांच्या मनाने भरू द्यावेत. एका ठराविक वयापर्यंत तरी काही शिकवायच्या भानगडीत पडू नये. त्यांच्या आवडीनुसार वेळ आल्यावर ते ती ईच्छा व्यक्त करतीलच..
हे इतके अधिकारवाणीने बोलायचा मला हक्क आहे की नाही हे माहीत नाही. कारण माझी चित्रकला अगदी कोर्टनी वॉल्शच्या फलंदाजीसारखी आहे. जमत बिलकुल नाही. पण करायला आवडते. आणि कधीतरी लोकं त्यावर खळखळून हसतातही..
अर्थात यात काही नवल नाही. ज्याच्या हस्ताक्षरावर आजवर कोंबडीचे पाय असा शिक्का बसत आलाय, त्याची चित्रे काही मोराचा पिसारा फुलवणारी नसणार हे सांगायला पिकासोची गरज पडू नये. पण तरीही का माहीत नाही मला आपले उगाच वाटायचे की मी एक क्रिएटीव्ह जीव आहे. कारण अंगात कला नसली तरी किडा होता.
म्हणजे माझ्या चित्रकलेची सुरुवात देखील चारचौघांसारखीच झाली. त्रिकोणी डोंगर आणि डोंगरामागून उगवणारा सुर्य, पायथ्याशी एकुलते एक झाड,.. त्या शेजारी एक घर जे कौलारूच असायचे. त्यावर धुरांडे असायचे. ते नेहमी ऑपरेटींग कंडीशनमध्ये धूर ओकत असायचे, जणू घरात गिरणीच उघडली आहे.
घरासमोरून छान पायवाट जायची. पायवाटेच्या शेजारी गवत उगवलेले असायचे. गवत म्हणजे ४ चा आकडा ईतके सिंपल होते. जो जमिनीवर हिरव्या रंगात काढला की गवत झाले. तोच आकाशात काळ्या रंगात काढला कि कावळा झाला.
नदीत तरंगणारे मासे कंपलसरी होते. जे नदीचा व्हर्टीकल सेक्शन घेतल्याप्रमाणे आरपास दिसायचे. पुढे जसा मोठा झालो तसे नदीत एका पायावर उभा राहिलेला बगळा जमू लागला. त्याच्याही चोचीत एक मासा कंपलसरी होता.
मोठा कॅनव्हास मिळाला की डोंगरातून उगम पावणारी नदी जिथे जाऊन मिळते तो समुद्र देखील मी एका कोपर्यात दाखवून मोकळा व्हायचो. ज्याच्या डोक्यावर ढग असायचे जेणेकरून हायड्रॉलॉजिकल सायकल कम्प्लीट व्हायचे. काही मासे समुद्रात देखील असायचे. फक्त ते साईजने मोठे असायचे. सोबत मासेमारी करणारी शिडाची होडी असायची. नदी आणि समुद्रामध्ये काय फरक असतो याचे कन्सेप्ट क्लीअर होते. त्यामुळे समुद्राशेजारचे झाड देखील नारळाचे असायचे.
सुर्य काढताना नेहमी एक किरण छोटे आणि एक मोठे दाखवावे अशी घरचीच शिकवण होती. पण प्रत्यक्षात असे काही नसते हे पाचवीत गेल्यावर सायन्स वायन्स शिकल्यावर समजले. आणि तिथून माझा चित्रकलेकडे बघायचा द्रुष्टीकोण बदलू लागला.
म्हणजे बघा ना, ज्याने पहिल्यांदा आपली कल्पना लाऊन असा सुर्य काढला असेल, किंवा ओबडधोबड टेकड्या न दाखवता साधे सोपे त्रिकोणी तरीही खरेखुरेच वाटणारे डोंगर काढले असावेत, कोणालाही सहज काढता यावे अश्या मोजक्याच गोष्टी दाखवत अख्खा निसर्ग उभा केला असावा तो किती कल्पक व्यक्ती असावा..
बस, त्यापुढे मी सुद्धा हेच पक्के ध्यानात ठेवू लागलो. भले आपल्याला जमत का नसेना पण आता या चित्रकलेला घाबरायचे नाही. चित्राचा विषय काहीही असो, त्याचा आशय समोरच्यापर्यंत पोहोचवता यायला हवा.
जसे की मला माणसे काढणे बिलकुल जमत नव्हती. म्हणजे आजही जमत नाही. कधी शिकलोच नाही. कारण हाताला वळणच नाही. तरीही लोकं तेच दळण लावायची. मनापासून काढ, सरावाने जमेल. पण नाहीच जमत एखाद्याला. म्हणून मी नेहमी त्यांना पर्याय शोधू लागलो. जसे एसटी स्थानकाचे चित्र काढायचे आहे. काय गरज आहे सर्व गजबज दाखवायची. मी भलामोठा छानसा लालचौकोनी डबा दाखवायचो. त्यात खिडकीतून डोकावणारे काही गोलाकार चेहरे. ते झाले प्रवासी. मग आजूबाजूचे डिटेल भरायला. स्थानकाच्या नावाचा बोर्ड, गाड्यांचे टाईमटेबल आंणि ईंडिकेटर, एखादा स्टॉल, ज्यात दुकानदार म्हणून परत एक गोलाकार चेहरा, झाल्यास कोपर्यात एखादे सुलभ शौचालय... अश्या प्रकारे पट्टीचा वापर करून मारलेल्या सरळ ओळी, थोडीफार अक्षरे आणि मोजकेच वळणदार आकार वापरून पुर्ण होणारे चित्र काढायचो..
मैदानात खेळणारी मुले असा विषय असल्यास नेहमी स्टेडीयमध्ये बसून जे द्रुश्य दिसेल ते रेखाटायचो. जेणेकरून विविध हालचाली करणारी मुले बारीक सारीक डिटेलसह दाखवायची गरज पडू नये. अन्यथा माझी चित्रे काळाच्या पुढे होती. माझी मुले बावीसाव्या शतकातील वाटायची.. रोबोट दिसायची. पण तेच द्रुश्य दुरून पाहता सिंगल लाईनचा वापर करून वारली चित्रांप्रमाणे काटकुळी मुले दाखवणे चालून जायचे. मग दुरूनच बघत आहोत तर मैदानाच्या पलीकडे ईमारती किंवा तेच आपले झाडे, डोंगर, सुर्य काढून उरलासुरला कॅनव्हास भरून जायचा. पण बघणार्याच्या मनावर ठसायची ती मैदानात खेळणारी मुले.. आणि हेच ते आशय पोहोचवणे.
एकदा दहीहंडीचे चित्र काढायचे होते. आली का पंचाईत!
ईथे दोनचार मुले काढायची बोंब, तिथे एकमेकांत वरखाली आजूबाजूला गुंफलेली मुले कशी काढायची हा प्रश्न होता. पुन्हा एकदा सदर द्रुश्याकडे बघायचा द्रुष्टीकोण बदलला. आणि गगनचुंबी इमारतीतून दिसणारी दहीहंडी काढली. वरपासून खालपर्यंत जाणारी फक्त डोकी डोकी आणि डोकी.. सोबत त्यांना जोडून ठेवणारे काही खांदे. आणि कॅनव्हास भरायला रस्त्यावर पसरलेला डोक्याडोक्यांचाच अथांग जनसागर.
चित्र जमलेलेही चांगले. मित्रांनाही आवडलेले. पण चित्रकलेच्या बाईंना हा वेगळा विचार काही रुचला नाही. त्यांचे काम होते चित्रकला शिकवणे जी त्यांना माझ्या चित्रात दिसत नव्हती. दर चित्रकलेच्या तासाला चित्रे कशी नसावीत यासाठी माझी वही वर्गभरात फिरवणे हा त्यांचा आवडीचा छंद होता. पण एकदा मात्र कहरच झाला..
झाले असे,
होमवर्क म्हणून सर्कशीचे चित्र काढायचे होते. धिस ईज हाईट ऑफ पंचाईत!
आता मुलेच नाही तर जनावरेही काढणे अपेक्षित होते. ती देखील "ई फॉर एलीफंट" आणि "एल फॉर लायन" अशी पुस्तकात दाखवतात तशी साधीसुधी नाही, तर गुडघ्यावर बसून आणि सोंंड ऊचलून चेंडूचे खेळ दाखवणारा हत्ती किंवा गोलाकार फायर रिंगमधून झेपावणारा सिंह वगैरे..
चित्र होमवर्क म्हणून दिले असल्याने मित्राच्या घरी पोटमाळ्यावर बसून, पोरांचा ग्रूप जमवून, याचे त्याचे एक्स्पर्ट ओपिनिअन घेऊन, मित्रांच्या आईने बनवून दिलेल्या भज्यांवर ताव मारत, हसतखेळत गप्पा मारत चित्र काढणे चालू होते. ऊंट घोडे आकार घेत होते. पण हत्ती रंगवताना घात झाला. पुर्ण कॅनव्हासचा वरणभात झाला. रंगाची प्लेट कलंडली आणि काळा रंग वाट मिळेल तसा पळत सुटला. आईशप्पथ! धिस ईज एण्ड ऑफ पंचाईत!
पुन्हा नव्याने हत्ती घोडे काढणे माझ्या क्षमतेच्या पलीकडे होते. त्यामुळे पुन्हा एकदा समोर दिसणार्या द्रुश्याकडे बघायची द्रुष्टी बदलली. चित्रपटात सीन बदलावा तसे आता चित्र बदलले होते. सर्कशीत ऐन वेळी लाईट गेली होती. त्यामुळे काळोख पसरला होता. आणि त्यामुळे चित्र अंधारमय झाले होते. मलाच माझ्याच विचारांचे कौतुक वाटले. मित्रांना तो विचार धाडसी वाटला. चित्रकलेच्या बाईंना फालतू वाटला. आणि माझी चित्रकलेची वही त्यांनी भिरकावून दिली. असे घडण्याची ही काही पहीली वेळ नव्हती. पण यावेळी राग जास्त असावा. कारण वहीची काही पाने फडफडून फाटली. पण बाई ईतक्यावरच थांबल्या नाहीत.. छे! मुस्काटात मारायची पद्धत नव्हती आमच्या शाळेत म्हणून वाचलो. पण त्यांनी मला श्राप दिला. तू काही चित्रकलेची ईंटरमिजिएट परीक्षा पास होत नाहीस!
एलिमेंटरी आणि ईंटरमिजिएट अश्या चित्रकलेच्या दोन परीक्षा अनुक्रमे आठवीत आणि नववीत असायच्या. त्यातली एलिमेंंटरी मी आठवीत पास झालो होतो. ती कसा झालो याचे त्या बाई नेहमी आश्चर्य व्यक्त करून दाखवायच्या. खरे तर ती तुलनेत फार सोपी असायची. म्हणजे मी पास झालो याचा अर्थ नक्कीच सोपी असावी. ईंटरमिजिएटमध्ये मात्र एखादा विषय न झेपल्यास भले भले नापास होतात असा तिचा रेकॉर्ड होता.
Nature Drawing - हातात दिलेले सुर्यफुल काढून रंगवा,
Still Life / Object Drawing - समोर रचलेली भांडीकुंडी योग्य मापात काढून त्याची शेडींग करा,
Free Hand Drawing - यात एखादी नक्षी असायची.
हे तिन्ही विषय मला कसेबसे जमून जायचे.
मग यायची Geometry - भुमिती - जी अर्ध्या जगाला अवघड पण मला फार सोपी जायची.
सरतेशेवटी, Memory Drawing - हा तोच माझा कर्दनकाळ. जिथे मर्त्य माणसांना पर्याय नव्हता.
बाईंनी दिलेला श्राप घेऊन मी घरी आलो. त्या काळी पालकांनी शिक्षकांना चुकीचे ठरवायची पध्दत नव्हती. उलट दोन धपाटे घरूनही पडायचे. पण त्या दिवशी मात्र मला सुखद धक्का बसला. चित्रकलेच्या बाईंनीच असे विद्यार्थ्याचे मनोधैर्य खच्ची करणे माझ्या घरच्यांना पटले नाही. बघूयाच कसा पास होत नाही तू म्हणून वडिलांनी मला सपोर्ट केले.
ईथे एक सांगणे गरजेचे आहे की माझी चित्रकला कशीही असली तरी माझे वडील जेजे स्कूल ऑफ आर्टचे विद्यार्थी होते. तिथे ते काय शिकले हे त्यांनी मला कधी सांगितले नाही, आणि मी कधी विचारले नाही. पण ते त्यांच्या कलेसाठी पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. चाळीतील सत्यनारायणाच्या पूजेला जो भलामोठा पाच फूट बाय पंधरा फूट लांबीचा कापडी बॅनर बनायचा, ज्यावर अमुकतमुक मित्र मंडळ आपले सहर्ष स्वागत करत आहेत असे लिहिले असायचे, तो माझे वडील रंगवायचे. पूजेला आलेले विभागातील नगरसेवक आवर्जून त्याची चौकशी करायचे आणि आमच्या पार्टीसाठी बॅनर बनवता का म्हणून ऑफर द्यायचे. एकदोनदा पैश्यांची निकड असताना ती स्विकारून देखील झाली होती. तर थोडक्यात, आम्हा दोघांच्या चित्रकलेत बिलो एवरेज ते प्रोफेशनल ईतका फरक होता. त्यामुळे त्यांचे धीर देणे मला आश्वासक वाटले.
आईची धीर द्यायची पद्धत वेगळी होती.
ती म्हणाली, आणि झालास नापास तरी त्यात काय एवढे? आपला पप्पूदादा सुद्धा ईंटरमिजिएट नापास झाला आहे.
हे ऐकून मी चरकलोच. पायाखालची जमीन सरकली. कसाबसा तोल सावरला. कारण पप्पूदादा कोणी साधीसुधी व्यक्ती नव्हती.
दर मे महिन्याच्या सुट्टीत मी मामाकडे राहायला जायचो. मामाच्या घरात शिरताच समोर शिवाजी महाराजांची भलीमोठी तसबीर होती. तो विकत आणलेला फोटो नसून घरीच काढलेले चित्र होते यावर माझा विश्वास बसायला काही वर्षे जावी लागली होती. पप्पूदादा त्या चित्राचा चित्रकार होता.
असा हा पप्प्पूदादा त्या परीक्षेत नापास झाला होता. पण पुढे आईने पप्पूदादा नापास व्हायचे कारण सांगितले. तो म्हणे Geometry या विषयात ढ होता. आणि माझ्यासाठी तोच विषय सर्वात सोपा होता.
आईची धीर द्यायची पद्धत खरेच वेगळी होती.
जेव्हा शाळेतील ईतर मुले कॅमलिन आणि अप्सरा वापरण्यात धन्यता मानत होते तेव्हा Staedtler म्हणून एक जर्मन कंपनी आहे, जिची स्टेशनरी आणि कलर फार भारी असतात हा शोध मला वडिलांच्या कृपेने लागला. वडील सरकारी नोकरीत हेड ड्राफ्टसमन म्हणून कामाला असल्याचा फायदा झाला. ऐन परीक्षेच्या वेळी त्यांनी रसद पुरवली आणि माणसांची चित्रे वगळता ईतर सारे विषय माझ्यासाठी फार सोपे झाले.
आज ईतक्या वर्षांनी त्या Memory Drawing पेपरला कोणता विषय आलेला हे मला आठवत नाही. बहुधा दोन-तीन विषयांपैकी एक विषय निवडायचा असायचा आणि मी काहींची मनोमन तयारी करून गेलेलो त्यातलाच एक त्यात आला होता. त्यामुळे तितक्याच आत्मविश्वासाने सामोरे गेलो. पण बाईंना मात्र तो विश्वास तेव्हाही नव्हता. परीक्षेचे सेंटर आमच्याच शाळेत असल्याने परीक्षा चालू असताना शाळेतील चित्रकला विषय शिकवणार्या सर्वच बाई वर्गावर राऊंड मारून जायच्या. ज्यात त्या माझ्या फेव्हरेट बाई सुद्धा यायच्या. माझे नशीब सुद्धा असे होते की रोल नंबर नुसार वर्गातले टॉप थ्री चित्रकार माझ्याच आजूबाजूला बसायचे. त्यामुळे बाईंकडून त्यांचे कौतुक आणि मला सहानुभुतीचे टोमणे हे दर पेपरला व्हायचे.
निकाल लागला!
मी पास झालो. सी ग्रेड मिळाला. हा काही वाईट नसतो. ए आणि बी ग्रेड तेव्हा तरी तितक्याच खास मुलांना मिळायचा. आताचे माहीत नाही.
ज्या तीन मुलांवर सर्वांची नजर होती त्यातील एकाला ए ग्रेड मिळाला. दुसर्याला माझ्या सारखाच सी ग्रेड मिळाला. तिसरा चक्क नापास झाला.
जो नापास झाला आणि ज्याची चित्रकला माझ्यापेक्षा चांगली असूनही माझ्याच ग्रेडवर समाधान मानावे लागले त्या दोघांसाठी फार वाईट वाटले. कारण ते मित्रच होते. माझी स्पर्धा त्यांच्याशी कधीच नव्हती.
दुश्मन तर तश्या आमच्या बाई सुद्धा नव्हत्या. कदाचित मी चित्रकलेबाबत सिरीअस नाही हे त्यांना खटकत असावे, त्यामुळे त्यांचा माझ्यावर राग असावा. आणि कदाचित त्या आपल्या जागी योग्यही असाव्यात.
जे काही असेल, पण त्यामुळे कोणाला काहीतरी सिद्ध करून दाखवल्याचा आनंद मला त्या निकालाने दिला. ईतका आनंद स्कॉलरशिप मिळाल्यावर देखील झाला नव्हता. कारण तो माझा प्रांत होता. तेथील यश मला अपेक्षित होते. पण हे यश कसोटी क्रिकेटमध्ये परदेशात जाऊन मिळवलेल्या मालिका विजयासारखे होते. त्यानंतर आपली चित्रकला सामान्य असल्याचा न्यूनगंड माझ्या मनातून कायमचा गेला. पुढचे कित्येक वर्षे, किंबहुना आज देखील विषय निघाला की मी लोकांना अभिमानाने सांगतो, मी एलिमेंटरी-ईंटरमिजिएट पास आहे
असे म्हणतात, dance like nobody's watching...
मला नाचायची आवड आहे. पण जसे घरी मी न लाजता नाचतो तसे चारचौघात जमत नाही.
गाणे गायची आवड आहे पण ईथेही तेच.. सर्वांसमोर आवाज फुटत नाही.
न जमणार्या चित्रकलेचे प्रदर्शन देखील चारचौघात न लाजता मांडता येत नाही.
पण लिहायला आवडते. आणि तिथे मात्र कोण काय विचार करेल याचा विचार न करता मनातले कागदावर उतरवायला जमते.
थोडक्यात काय, तर कुठलेतरी एक माध्यम असावे आयुष्यात जिथे तुम्ही कोणाची भीड न बाळगता व्यक्त होऊ शकता.
एकापेक्षा जास्त असतील तर क्या बात!
घरी मुलांना हव्या तश्या भिंती रंगवू देणे , चित्रकलेला, नाचाला, त्यांच्यातील कुठल्याही कलागुणांना प्रोत्साहन देणे यामागे माझा कुठेतरी हाच विचार असतो.. त्यांना त्यांच्या परीने व्यक्त होणे जमू दे.
जर तुम्हालाही असे चित्रकलेतून व्यक्त होणे जमते, किंवा चित्रकला आवडते, किंवा तुमच्या मनात आपल्या चित्रकलेबद्दल जराही न्यूनगंड नाही, किंवा चित्रकला हा आपल्या आयुष्याचा छोटासा का असेना भाग वाटतो, तर तुमचे या धाग्यावर स्वागत आहे
धन्यवाद,
ऋन्मेऽऽष
अजून लिहिण्यासारखे बरेच आहे..
अजून लिहिण्यासारखे बरेच आहे....
ते प्रतिसादांसाठी ठेवतो.
शुभरात्री
यात एक चित्र डोळ्यासमोर
यात एक चित्र डोळ्यासमोर रंगताना बघून आनंद घ्यायचा असतो. >> असतो वगैरे काही नाही... ज्याला वाटतो त्याला वाटतो.
हजारो लाखो ॲपा आहेत त्यातील हे एक. जास्त काही नाही.
विरंगुळा म्हणून नक्कीच छान आहे. पण चित्रकला म्हटले की माझ्या डोक्यात काहीतरी वेगळेच येते>>>
कलर by number la चित्रकला कोणीही म्हणत नाही. ते चित्रकला ह्या गटात ही टाकलेले नाही तो विरंगुळा aahe- ज्याला वाटतो त्याला.
हो, सहमत आहे
हो, सहमत आहे
तो फक्त लेखाचा ट्रिगर पॉइंट आहे.. त्यावरून पुढे ज्या आठवणी सुचत गेल्या त्या लिहून काढल्यास इतकेच.
चित्रकला या विषयावर लेख, आणि
चित्रकला या विषयावर लेख, आणि लेखात एकही चित्र नाही! बहुत नाइन्साफी हय.
असो. आठवणी फार छान लिहिल्या आहेत. दहीहंडीच्या चित्राची कल्पना आवडली. तेव्हा इलिव्हेशन काढण्याऐवजी टॉप व्ह्यू काढावा हे स्वतःहून सुचल्याबद्दल खरं तर शिक्षिकेने त्या होतकरू कल्पक अभियंत्याचं कौतुक करायला हवं होतं. बहुतेक खाली फर्स्ट अँगल प्रोजेक्शन आहे की थर्ड अँगल हे स्पष्ट करणारं चिन्ह काढलं नसेल म्हणून चिडल्या असतील.
सर, मी परत एकदा सांगतोय कि
सर, मी परत एकदा सांगतोय कि ते फालतू धागे विणायचे सोडून द्या. असे काही तरी मराठी साहित्यात भर टाकणारे लिखाण करा.
अवांतर-- ते प्रोफाईल वरचे चित्र आधी सारुखचेच आहे असे वाटले.
आठवणी छानच !
आठवणी छानच !
खूप छान लिहिले आहे. ऋन्मेऽऽष
खूप छान लिहिले आहे. ऋन्मेऽऽष म्हणजे हरहुन्नरी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे.
छान लिहिले आहेस! चित्रकलेचा
छान लिहिले आहेस! चित्रकलेचा दोर मी कापला आहे पण लेकी मध्ये आहे ही कला तिला प्रोत्साहन देत असते.
छान लेख. आवडला. तुमचे
छान लेख. आवडला. तुमचे मुलांच्या शिक्षणाबद्दलचे विचार आवडतात. मुलांना प्रोत्साहन द्यावे, एका साच्यात न बसविता मुक्तपणे शिकू द्यावे, व्यक्त होऊ द्यावे या विचारांशी सहमत.
चित्रकलेवरून माझीही एक आठवण - शाळेच्या वार्षिक परीक्षेत मोराचे चित्र काढायचे होते. मोराचे पाय मी माणसांच्या पायांसारखे गुढग्यातून उलट्या बाजूला दुमडलेले दाखवले.
छान लेख
छान लेख
बहुतांश घटना, विचार relate झाले.
मी elementry pass झाले c grade पण पुढच्या परीक्षेला बसलेच नाही.
पण ती process खूप एन्जॉय केली.
कण्हेरी चं फुल आणि पानं होती आम्हाला.
स्थिर चित्रामध्ये बादली, नारळ आणि मग असायचा.
Design मध्ये दोन प्रकार असायचे, symmetrical आणि asyemmetrical.
माझ्याकडे परवापर्यंत ते पुस्तक होतं, नार्वेकर ह्यांचं. त्यात खूप छान मार्गदर्शन केलं होतं.
माझं ही भूमिती आवडतं होतं! कर्कटक आणि पेन्सिल आवडती टूल्स!
Colour tubs नाहीतर कधीच मिळाल्या नसत्या वापरायला.
आता मुलांनी भिंती रंगवून ठेवल्यात प्रत्येक रेघोटी काय आहे ह्याचं explanatiom आहे रमाकडे
तिला खूप सारे colouring books आणून दिलेत. शाळा सुद्धा प्रोत्साहन देते आहे. नर्सरी ला पेन्सिल नाहीच फक्त crayons!!
माबो वाचक,
माबो वाचक,
पाय दुमडलेला मोर!
पिकासो पण अशीच चित्रे काढत असे. आणि ती कोट्यावधी डॉलर्सना विकत असे.
दिवे घ्या.
दिवे का घ्या... मनावर घ्या
दिवे का घ्या... मनावर घ्या आणि कोट्यवधी डॉलर कमवा
किल्ली, भिंती रंगवणे क्लबात
किल्ली, भिंती रंगवणे क्लबात स्वागत आहे आपले
बाई दवे, त्याचा देखील वेगळा धागा आहे आपल्याकडे..
आणि मी इंटरमिजियट परीक्षा देण्याचे कारण हे होते की इजीनेरींगला प्रवेश घेताना त्याचे पाच गुण मिळतात
ऋ direct second year ला
ऋ direct second year ला सुद्धा त्या ५ गुणांचा फायदा होता का?
मी polytechnic + engg आहे
हपा,
हपा,
जुनी चित्रे सापडली असती तर जरूर टाकली असती लेखात. आता लेकीसोबत लहानपणी म्हणजे ती बालवाडीत असताना काहीतरी काढायचो. पण ती झपझप पुढे निघून गेल्याने आता तिने काढलेल्या चित्रांचे फोटो काढण्यातच धन्यता मानतो
,@ दहीहंडी चित्र, आता मला आठवत नाही की चित्रकलेचे कौशल्य म्हणून ते कितपत जमले होते. कारण आपण लहान मुलांनी वेगळा विचार केला की त्या विचाराचे कौतुक करतो. पण मोठ्यांकडून कौशल्य दाखवणे सुद्धा अपेक्षित असते.
मला आता बारीक सारीक आठवणी आठवत नाहीत. पण मला सफाईदार चित्रे जमत नसल्याने मी चित्रकलेच्या तासाला बरीच उडपटांग आणि फनी चित्रे काढून आजूबाजूच्या पोरांचं मनोरंजन करायचो. आणि मग घरी जाऊन जमेल तसे व्यवस्थित काढून ते पूर्ण करत असे.
आणि मी इंटरमिजियट परीक्षा
आणि मी इंटरमिजियट परीक्षा देण्याचे कारण हे होते की इजीनेरींगला प्रवेश घेताना त्याचे पाच गुण मिळतात Happy
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 12 December, 2023>>> काहीही
अस असतं तर याचच्यावत मुलांनी परीक्षा त्या दिल्या असत्या..
त्या architect kinva jj art school la lagyachya.
@किल्ली, कल्पना नाही.
@किल्ली, कल्पना नाही.
मी दहावी, बारावी, मग दहावीचया गुणावर डिप्लोमा, मग त्यावर डिग्री असे उलट सुलट केले असल्याने त्या गुणांचा फायदा कुठे कसा मिळवला आता आठवत नाही. आणि आता आणखी काही नियम बदलले असल्यास कल्पना नाही.
त्या architect kinva jj art
त्या architect kinva jj art school la lagyachya.
******
अच्छा.. असू शकेल. परीक्षा आम्ही सिरीअसाली द्यावी म्हणून बाईंनी फसवले असेल किंवा तशी अफवा मार्केटमध्ये असेल
अच्छा.. असू शकेल. परीक्षा
अच्छा.. असू शकेल. परीक्षा आम्ही सिरीअसाली द्यावी म्हणून बाईंनी फसवले असेल किंवा तशी अफवा मार्केटमध्ये असेल Happy
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 12 December, 2023 - 01:4>>>
बाता मारताना पाचातील अशा मारायच्या!
त्या परीक्षेचे पाच गुण मिळतात
त्या परीक्षेचे पाच गुण मिळतात हे माहीत होते. माझ्या माहितीनुसार इंजिनिअरिंगला होते. प्रत्यक्षात architects किंवा जेजे स्कूलला असतील... किंवा तिथे देखील मिळत नसतील तरी माझी हरकत नाही..
पण यात बाता मारून मला काय मिळणार..
बाई दवे,
आता मी गुगल केले..
तर असे पाच गुण इंजिनिअरिंगला मिळतात असे वाटणारी बरीच जनता आहे.
त्यामुळे अशी अफवा मार्केटमध्ये होती हे तरी खरे आहे
असो, या विषयावर हे मा शे पो.
इंजीनीरिंगचं माहित नाही, पण
इंजीनीरिंगचं माहित नाही, पण माझ्या भावाला दहावीत ह्या elementary - intermediate drawing exams दिल्या मुळे additional 5 मार्क्स मिळाले होते. तसं main मार्कशीट वर लिहून येतं- "Additional marks category - Drawing"
त्याच्या एका मैत्रिणीला 10 मार्क्स मिळाले होते, क्लासिकल dance साठी.
माझ्या बहिणीला दोन्ही परीक्षा
माझ्या बहिणीला दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होऊनही असे काही जास्तीचे मार्क कधी मिळाले नव्हते.
आणि परत तेच ५ मार्क दहावीला खूप फरक पाडणारे असायचे तास असतं तर सगळ्यांनीच त्या परीक्षा दिल्याचं असत्या.
मिळाले नव्हते. त्यावेळी तर आतापेक्षा मार्क/ admissions सगळच अवघड होत.
आमच्या सरानी स्काऊट घेतलं तर
आमच्या सरानी स्काऊट घेतलं तर दहावीला ५ मार्क की टक्के असं काहीतरी वाढेल असे सांगितले होते
छान लिखाण !!
छान लिखाण !!
चित्रकला - व्यक्त होण्यासाठी अगणित धाग्यांपैकी एक ! -
मालक, क्रिकेटची भजी झालीत तळून, आतां चित्रकलेची चटणी घेतोय करायला !!
धन्यवाद भाऊ
धन्यवाद भाऊ
आणि व्यंगचित्र..
मला वाटले की या रून्मेषने क्रिकेटची भजी केली आणि आता चित्रकलेची चटणी करतोय..
वीरू हो, स्काऊटचे मार्क मिळतात हे मी सुद्धा ऐकलेले. खरे खोटे आजही माहीत नाही. किंवा त्याचा वेगळा कोटा असायचा कॉलेज प्रवेशाला काही कल्पना नाही.
*आणि व्यंगचित्र..* - आपल्याला
*आणि व्यंगचित्र..* - आपल्याला जाम कौतुक आहे हां तुमचं; वयात खूप फरक असला, तरी आपुन पण ओरिजिनल दक्षिण मुंबैच्या चाळ संस्कृतीचेच प्रॉडक्ट हाय . !!!
अच्छा..
अच्छा..
मी देखील तुम्हाला कधी बोललो नाही. पण तुमचा क्रिकेट धाग्यावरचा उत्साह बघून मला नेहमी माझ्या आजोबांची आठवण येते.. लहानपणी घरात आम्हा दोघांनाच क्रिकेटचे भयंकर वेड. आणि त्यावरून दोघे खूप ओरडा खायचो
(हा धागा सुद्धा एक नोट करून ठेवतो.)
*आणि त्यावरून दोघे खूप ओरडा
*आणि त्यावरून दोघे खूप ओरडा खायचो* - मी व माझा नातू यांचाही क्रिकेट, टे. टे., फुटबॉल वरून वाद चालतो. बहुतेक वेळा तोच बरोबर असतो व मी वयाचा हुकमी एक्का न वापरता, तें मान्य करतो. अर्थात, कधी तरी खूप जुने किस्से सांगून मी त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न करतो. पण, new generation is too smart to give in to such gimmicks !!
आमच्या सरानी स्काऊट घेतलं तर
आमच्या सरानी स्काऊट घेतलं तर दहावीला ५ मार्क की टक्के असं काहीतरी वाढेल असे सांगितले होते>>> ह हा! आम्ही नाचलो असतो असा काही असतं तर.
इजीनेरींगला प्रवेश घेताना
इजीनेरींगला प्रवेश घेताना त्याचे पाच गुण मिळतात :
असे आम्हीही ऐकले होते शाळेत असताना. त्यामुळे बरीच मुले द्यायची ह्या परीक्षा. यात ऋ काही बाता मरत नाहिये. (आणि मी त्याची duplicate ID नाहिये
(ऋ दिसला की त्याला झोडला, Troll केले , आणि त्याच्या बाजूने बोलले की डुप्लिकेट id चे लेबल लावले गेले असे खुपदा baghte..)
Pages