इंटिरिअर आणि आम्ही-भाग ३(फायनली समाप्त बरं का पकवणे!!)

Submitted by mi_anu on 14 November, 2023 - 09:06

भाग 1 आणि 2 इथे वाचा:
भाग १
भाग २

अतिशय भिन्न विचार असलेली दोन किंवा माणसं वर्षानुवर्षे घरात नांदत असली की कोणतंही काम अगदी सुधेपणाने होत नाही.(आता मी यापुढे 'आणि यातच तर खरी आयुष्य जगण्याची लज्जत असते.आयुष्य रुपी जेवणाला चव आणणारं हे माईनमूळ लोणचं.संसाराच्या खमंग पोळीला लावलेलं चमचमीत वऱ्हाडी तिखट.असंच हाय हुय करत हे तिखट खात नंतर जिभेवर आलेली गोड आफ्टरटेस्ट न्यारीच.असंच हे तिखट लोणचं,प्रेमाचे गुलाबजाम,समजूतदारपणा चा वरणभात,गॉसिपिंग ची चटणी खात जे जेवण खाऊन एक दिवस यथावकाश मृत्यूरुपी तृप्त ढेकर द्यावा.' असं लिहून तुमच्या साठी वात्रट व्हॉट्सअप फॉरवर्ड अजिबात तयार करणार नाहीये. घाबरू नका.) इंटिरिअर वाल्याना विरोध करण्या वरून झालेले हे काही संवाद वानगीदाखल:

'अरे तू त्यांच्या सगळ्या सूचनांना हो म्हणून मान काय हलवतोस?त्यांचं काय जातंय सगळीकडे काचा लावायला?उद्या काचेच्या भिंती वाला संडास सुचवतील.'
'मग तू कर ना विरोध.तुला मी कधी अडवतो का?'
'मी करते आहेच.पण तू जर नेहमी साने गुरुजी बनून राहिलास तर मला नेहमी विरोध भूमिकेत जावं लागेल आणि ते पाठीमागे 'साहेब बिचारा भला माणूस पण त्याची बायको हडळ आहे' म्हणतील.'
'जसं काय आपण विरोध करत नाही तोपर्यंत आपल्या मागे ते आरत्याच ओवाळतात की नाही.विरोध तुझा आहे.व्यक्त तूच करायचा.'
'म्हणजे मी केला नाही तर तुला घरातल्या सगळ्या कपाटाना काचेची शटर आणि त्यातून दिसणारा पसारा चालेल का?'
'किती निराशावादी सिनिक आहेस गं तू!! पसारा होणाऱच असं सुरुवातीपासून धरून चाललं तर कठीण आहे.माझ्या कपाटात तरी अजिबात असं होणार नाही.'
'हे बघ,आतापासूनच शब्द देऊ नकोस.तुझे शब्द काय आहेत मला माहिती आहे.तू 3 वेळा सिडलिंग ट्रे आणून त्यात मायक्रोग्रीन वाढवून सॅलड खाणार होतास.3 वेळा ते गॅलरीत पडून सडलेले,तुटलेले ट्रे मी फेकलेत.'
'हे बघ,प्रत्येक भांडणात सिडलिंग ट्रे आणायची गरज नाही.दम है तो इंटिरिअर वाल्याना विरोध कर वरना ग्लास शटर बरदास्त कर.'
'सिडलिंग ट्रे' हे आमच्या सर्व भांडणांमधलं ब्रह्मास्त्र आहे.जसा ड्रॅकुला ला परतवायला क्रॉस तसा भांडणातल्या नवऱ्याला गारद करायला सिडलिंग ट्रे.

'ओ' ला अतिशय आवडणाऱ्या 2 गोष्टी: प्रोफाईल शटर्स उर्फ काचेची कपाट दारं आणि 'हायड्रॉलीक शटर्स' उर्फ वर उघडणारी दारं.दोन्हीला मी कडाडून विरोध केला.एकतर 15 वर्षांपूर्वी केलेल्या इंटिरिअर मध्ये आम्ही लांब राहत असल्याने पाहणी करायला सारखं येणं न जमल्याने आणि मुख्य सुतार 6 फूट 2 इंच असल्याने त्याने आपल्या उंचीनुसार लावलेली स्वयंपाकघरातली कपाटं.कोणतंही कपाट आतली वस्तू बरगडीत उसण भरल्याशिवाय किंवा कुठून तरी धडपडत शिडी घेऊन आल्याशिवाय दाद न देणारं.हायड्रॉलीक शटर्स वर उघडणारी सर्वात छतालगतच्या शेल्फ ला लावणं हा दिसायला एकदम सुंदर गुळगुळीत एकसंध, हँडल न दिसणारा प्रकार असला तरी बुटबैंगण माणसाला ऍक्सेस ला अतिशय मूर्खपणाचा आणि वेदनादायी होता.त्यामुळे शेवटी शेवटी माझा 'जब वी मेट' मधला अंशुमन, 'क्यो देखू मैं गनने के खेत, नही देखणे मुझे गनने के खेत!!!' झाला.आता यातल्या बऱ्याच शेल्फ ना हाताला येईल असा एक दांडा असतो, तो धरून झाकणं खाली ओढता येतात.

'कटकटी चिडकी बाई शक्यतो सगळ्याला नाही म्हणणार' हे 'ओ' ला माहीत असल्याने ओ चे साईट सुपरवायझर आधी सरांना फोन करून पटवून घेऊ लागले.मग आम्ही सर्व निर्णयात व्हिडिओ कॉल करून चर्चा करून एकमेकांना आणि 'ओ' ला सेम पेजवर आणलं.सुदैवाने हे प्रकार 10-20 मिनिटात आवरत असल्याने ऑफिस कामाला याचा फटका बसला नाही.

'ओ' ची काम करण्याची प्रोसेस शिस्तबद्ध होती.ठराविक टप्प्यात 2डी डिझाईन शेअर करणे, ठराविक रक्कम मिळाल्यावर बिल ऑफ मटेरियल शेअर करणे, ठराविक रक्कम मिळाल्यावर 3डी चे फोटो शेअर करणे(प्रत्यक्ष डिझाईन पाठवले जात नाही.),ठराविक रक्कम दिल्यावर मापं आणि फॅक्टरी फर्निचर ची कट लिस्ट बनवायला येणे, ठराविक रक्कम दिल्यावर सर्व मटेरियल साईट वर टाकणे असे.यात सर्वात जास्त नियमित गोष्ट अकौंन्ट कडून हफ्ता मागणी होती.मग असा कामाचा काही काळ सुरळीत गेल्यावर 'ओ' चा आणि आमचा नाच गं घुमा चा खेळ चालू झाला.

आम्ही: 'नाच गं घुमा!!'
'ओ': 'या गावचा, त्या गावचा, इलेक्टरीशीयन गावी गेला, पैसे नाही मला, सामान नाही मला, कामगार नाही मला,कशी मी नाचू!!'
आम्ही: 'नाच गं घुमा!पैसे घे तुला,कामगार दे मला, सामान घे मला, नाच गं घुमा!!'

'ओ' ची गंमत ही की हफ्ता मागणी करून हफ्ता घेण्याच्या 2 दिवस आधी ते साईटवर पूर्ण 4 सुतार,1 इलेक्टरीशीयन ची टीम लावत.मग खुश होऊन आम्ही हफ्ता दिला की दुसऱ्या दिवशी पासून फक्त एक पाप्याचं पितर प्लास्टर वाला, इन्व्हेंटरी नाही, साईट सुपरवायझर दुसऱ्या साईट वर असे प्रकार चालू होत.'ओ' ने आमचं काम घेतलं तेव्हा त्यांच्याकडे बिझनेस कमी होता.आमचं काम घेतल्यावर सृष्टीत पॉझिटिव्ह गुडलक लहरी निर्माण होऊन त्यांच्याकडे 5 मोठी प्रोजेक्ट आली आणि त्यांच्यावर छाप पाडणे महत्वाचे ठरू लागले.

त्यात 'ओ' च्या एकंदर रिसॉर्स मॅनेजमेंट मुळे एक इलेक्टरीशीयन येऊन आधीची पाहणी करणार, दुसरा येऊन भिंतींना खड्डे पाडून वायरीची खाच बनवणार,तिसराच येऊन स्विचबोर्ड लावणार असा सगळा खो खो होता.या खो खो मध्ये मूळ कॉन्स्टंट आम्हीच असल्याने आम्हाला डोकं ठिकाणावर आणि थंड ठेवून सर्वाना एका पानावर ठेवणं गरजेचं होतं.सुतार टीम बदलत राहिल्याने त्यांनी टीव्ही चं पॅनल 3 वेळा काढून परत बसवलं. आमच्या दोघांपैकी जे कोणी ऑफीस ला जाईल त्याचा व्हॉटसअप वर पहिला प्रश्न 'आज टीव्ही पॅनल परत तोडलं का लॅमीनेट बसवलं' हा असायचा.प्रत्येक ऑफिस ला जाणाऱ्या निरागस जीवाला 'आपण घरी येऊ तेव्हा काहीतरी एक आयटम जोडला गेला असेल,छान वस्तू लावता येतील' असं वाटायचं.घरी येऊन बघावं तर एखाद्या बिझी सलून मध्ये 5 माणसांच्या अर्ध्या अर्ध्या दाढ्या करून फोन घ्यायला बाहेर जाणाऱ्या माणसा सारखं एक कपाटाचे फक्त 2 कप्पे, दुसऱ्याचं दार,तिसऱ्याचं मॅग्नेट राहिलेलं असं सगळंच फर्निचर अर्धंमुर्ध दिनवाणं उभं असायचं.(सुतार काही चूक करत नव्हते. जितकी फायनल प्रोडक्ट लॅमिनेट लावलेली जास्त, तितकें ओरखडे, गोंद न सांडणे,वेल्डिंग कटिंग च्या ठीणग्या जाऊ न देणे याबद्दल जास्त जपावं लागतं.)आता आता जरा सगळ्या पृष्ठभागावर लॅमिनेट लागायला लागले.

ओ च्या चांगल्या गोष्टी या की मटेरियल आणि कामाची प्रत चांगली आहे.शिवाय त्यांनी आमच्या डोक्यातल्या अनेक अबस्ट्रॅक्ट कल्पना नीट पूर्ण केल्या.यातली महत्वाची माझ्यासाठी म्हणजे परदेशात असते तशी शूज, कोट्स आणि हेल्मेट काढून ठेवण्याची लिव्हिंग रूम च्या एका कोपऱ्यात करण्याची चिमुकली(आत नुसती उघडी शेल्फ असलेली) लाकडी खोली.(याला आम्ही 'पसारा करण्याची खोली' म्हणतो.आम्ही आता लिव्हिंग रूम च्या सर्व पृष्ठभागावर टाकतो त्या गोष्टी एकाच खोलीत टाकायच्या.)दुसरी गोष्ट म्हणजे पार्सल्स आत टाकता येतील अशी चौकोनी झडप खिडकी असलेलं दार.हे रेडिमेड दारांमध्ये पण मिळतं.

अश्या प्रकारे गणपती नंतर नवरात्रात 'पूर्ण होणार' अशी वदंता असलेलं काम दिवाळीत पूर्ण होणार होतं.पण 'तुमच्याकडे साईटवर बनवायच्या गोष्टी खूप जास्त आहेत' म्हणून ते अजून बाकी आहे.बहुतेक दिवाळी नंतर 15 दिवसात होईल.आम्हीही मख्खपणे सामानाच्या ढिगात स्वयंपाकघर आणि एक खोली मोकळी स्वच्छ आणि टापटीप ठेवून तिथे मजेत राहतो आहोत.जेव्हा होईल तेव्हा होईल.

सध्या सोसायटी वाले सोसायटीत चकरा मारता मारता भेटले की 'क्या बात है,अभीभी पुरा नही हुवा, महल बना रहे हो क्या' विचारतात.आम्ही पण शांतपणे 'ह्या ह्या ह्या, होने के बाद आ जाओ देखणे' म्हणून महाल बनवत असल्याच्या ऐटीत म्हणून पुढे निघून जातो!! कितीही छोटे बदल असले तरी आमच्यासारख्या कष्टाच्या व्हाईट मनी ने आयुष्यात कधीतरी मोठं काम काढणाऱ्या लोकांसाठी आमचा महालच तो.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो नावाला आहे.म्हणजे तो आधी असायचा.साईट वाढल्यावर तो दिवसातुन कुठेतरी जाताना पिंपळे गुरव पासून वाटेत आमचं घर लागतं म्हणून 15 मिनिटं चक्कर टाकतो.
'ओ' ने इंटर्नली आमचं 'वो उनको छोड दे, उनका बिलिंग आ गया है, नया पार्टी को देख.उनका पेमेंट्स बाकी है,इम्प्रेशन डालना मंगता' केलंय.पेमेंट न देण्याचा, अडवण्याचा ऑप्शन नव्हता, कारण साईटवर फर्निचर चे असेंम्बली तुकडे सर्व येऊन पडले होते आणि 'पेमेंट झाल्याशिवाय असेंम्बली काम चालू होणार नाही' असा पवित्रा होता.
राहिलेले मुद्दे लहान आहेत.पण घर पूर्ण व्हायला क्लोजर होणं या साठी त्या होणं गरजेचं आहे.आता सर्व राहिलेले मुद्दे फोटो आणि लिस्ट बनवली आहे.

स्थितप्रज्ञतेचा गीतोपदेश सर्वांनाच प्रत्यक्ष विश्वरूप दर्शन देऊन देणे शक्य नसल्यानेच भगवान श्रीकृष्णाने हे इंटिरियर वाले तयार केले असावेत.

कठीण आहे अनु.
आमच्या घराचं इंटिरिअर चालू होतं तेव्हा आम्ही दुसरीकडे रहात होतो. तेव्हा कोविड पूर्णपणे संपलेला नव्हता. तिसरी लाट यायच्या आधीचे दिवस. शिवाय सेकंड वेव्हच्या सुरुवातीला आमच्या एका शेजाऱ्यांनी त्यांच्या नवीन घराचं इंटिरिअर करताना लक्ष ठेवण्यासाठी तिकडे जाऊन बस्तान बसवलं आणि लोकांशी संपर्क आल्यामुळे
त्यांच्या घरातल्या आजीआजोबांपासून नातवंडांपर्यंत सगळ्यांना कोविड झाला होता. त्यामुळे आम्ही ताक फुंकून प्यायलो आणि 'लक्ष' ठेवण्यासाठी खूप वेळा नवीन घरी गेलो नाही.
पण त्यामुळे वेगळ्या प्रकारची डोकेदुखी झाली. 'मुकादम' नावाचा प्राणी तीनदा बदलला. पहिला चांगला होता (असं आम्हाला नंतर वाटलं) दुसरा चांगला नव्हता. पण त्याची बायको त्याच दरम्यान बाळंतपणात काही गुंतागुंत झाल्यामुळे वारली Sad म्हणून आम्ही त्याच्या कामाची तक्रार केली नाही. तिसरा मुकादम येईपर्यंत बरंचसं काम आटपत आलं होतं. त्यामुळे त्याच्या हातात फार काही नव्हतं. शक्य तितक्या चुका सुधारल्या, पण पुढे पुढे आम्हालाच चुका शोधायचा कंटाळा आला. ड्रेसिंग युनिटच्या कपाटाचं दार दोनदा बदललं, वॉर्डरोबचं एकदा, टीव्ही युनिटचं मोजमापच चुकलं म्हणून पूर्ण परत नवीन बसवलं. तरीही ते डिझाईन आम्ही सांगितलं होतं तसं नाहीच झालेलं. असं बरंच काय काय. स्वैपाकघरात ओट्याच्या वर जी कपाटं आहेत त्याच्या झडपा खालून वर उघडतात आणि आपण बंद करेपर्यंत त्या उघड्या, जमिनीला समांतर राहणं अपेक्षित आहे, पण काही महिन्यांतच त्या आपोआप बंद व्हायला लागल्या! त्यातली एक झडप सुरुवातीपासूनच आपोआप बंद होत होती ती तेव्हाच बदलून घेतली होती.
कटकट आहे.

विशाखा, फारच व्याप आहे हा म्हणजे!!(या हायड्रॉलीक पंप वाल्या झडपा चांगल्या दिसतात, शिवाय कपाट एकावेळी एकसंध उघडता येतं म्हणून आमच्यावर फोर्स करण्याचा बराच प्रयत्न झाला.पण किमान गुरुत्वाकर्षण असल्याने बंद राहतात हे बरं.उघड्याच राहिल्या असत्या तर अजून ताप.)

मंडळी, प्रतिसादांबद्दल धन्यवाद. सुतार पुढच्या आठवड्यात उपलब्ध असल्यास सर्व कामे क्लोज व्हावी अशी आशा आणि अपेक्षा.

आताच सगळे भाग वाचलेत. धमाल लिहिलंय..

सुतार पुढच्या आठवड्यात उपलब्ध असल्यास सर्व कामे क्लोज व्हावी अशी आशा आणि अपेक्षा.>> फारच संयम आहे तुमच्यात. चारपाच वर्षी पूर्वी कलर काम आणि काही दुरुस्ती चे काम काढले होते घरात. तो पसारा पाहून सरळ हिमालयात निघुन जावे असं वाटायला लागलं होतं. त्यानंतर अजून हिंमत झाली नाही घराला रंग द्यायची

<< Submitted by वावे on 2 December, 2023 >>

या सर्व धाग्यांवरून आणि इतरांच्या अनुभवावरून, एकंदरीत असं दिसतंय की पैसे देऊनही भारतात चांगल्या क्वालिटीचे काम करून मिळत नाही. सगळीकडे फक्त 'जुगाड' आणि 'चलता है'.

अनु... खूपच कटकट असते. सध्या घरात अगदी मामुली compound wall चे रंगकाम काढले आहे .तर इतका पसारा, अर्धवट काम , मागच्या आणि पुढच्या भिंतीची शेड मॅच न करणे, फाटकाला सांगितल्या पेक्षा वेगळाच कलर देणे...असे चालले आहे.
तुझे ते बाहेरून ठोसा मारून उघडायचे दार.. Lol
पण तुमचा उद्देश साध्य झाला की नाही छोट्या रूम चा?

बाहेरून ठोसा मारून उघडायचे दार त्याला साध्या ऐवजी स्प्रिंग बिजागरी बसवल्यावर ठीक होणार आहे.
कल्पना कागदावर बनताना नीट दिसतात.पण ऑफिस मध्ये बसलेला डिझायनर, त्याचे उंटावरून शेळ्या हाकणारे सेल्स बॉसेस, शहरात वेगवेगळ्या टोकाच्या लोकेशन ला पसरलेल्या साईट,सतत बदलत राहून ऐनवेळी इंव्हॉल्व केलेले आणि गोंधळून काहीही आश्वासने देणारे सुपरवायझर,आणि एक अतिशय स्वतंत्र एंटिटी असलेले,आपल्या मनाने कामं करणारे,काही समजलं नसेल तर स्पष्ट न विचारता 'हां हो जायेगा' म्हणणारे सुतार यात प्रचंड गोंधळ बनत आणि बिघडत राहतात.

स्वारगेट ला एक एकदम श्रीमंत फोल्डिंग फर्निचर चे(सगळा माल परदेशी, प्रेझेंटेशन स्टाईल परदेशी, बिजागऱ्या परदेशी,लॅमिनेट परदेशी वगैरे) दुकान आहे.त्यांनी सांगितलेले बजेट 'ओ' च्या दुप्पट होते.त्यात एक नवे घर आले असते एखाद्या छोट्या शहरात.'ओ' चे ही बजेट कमी नाही पण एकंदर गोंधळांमुळे एक्झिक्युशन ची प्रत हायवेवर रांगेत 'आई माता फर्निचर' 'न्यू इरा फर्निचर' नावाची एकगाळा टॅक्स लॉस दाखवायला काढलेली दुकाने असतात, त्याच्या जवळ जात चालली.

याला बेस्ट उपाय असतो घर घेताना आपल्या घरात वेड्यावाकड्या, दुकान फर्निचर च्या मापात न बसणाऱ्या रिकाम्या जागाच न ठेवणे आणि सर्व फर्निचर आयकिया किंवा पेपरफ्राय वरून आयते आणून मांडणे.किंवा कोणीतरी उत्कृष्ट नवसाचा सुतार शोधून त्याला आपल्या कल्पना सांगून करून घेणे.
बूट हेल्मेट च्या खोलीत पसारा करायला चालू केला आम्ही Happy
Screenshot_2023-12-03-07-25-37-417_com.miui_.gallery.jpg

हो रेडिमेड फर्निचर आणून मांडणं सोपं. पण त्याने सगळ्याच गरजा पूर्ण होत नाहीत हा प्रश्न आहे.
उ.बो., पैशाच्या आणि शोरूमच्या झकपकपणाच्या मानाने कामाची क्वालिटी नसते हे खरं आहे. मटेरियल चांगलं असलं तरी वेळ पाळण्याच्या बाबतीत आनंदीआनंद असतो.
अनु, तुमच्या सहनशीलतेची कमाल वाटते पण. तिथेच राहून तुम्हाला हा पसारा सहन करायला लागतोय.
मड रूमची कल्पना अत्यंत आवडली आहे. बघू जमलं तर कुठेतरी वापरू Happy

अंगावर काम देउन ( राजस्थानी ) सुतार नीट करेनात म्हणून अधिक।पैसे घेउन सोय करून देणारा ओ आला तरी प्रॉब्लेम आहे तिथेच आहे.
ह्या कटकटी होउ नयेत ही अपेक्षा असणे चुकीचे की काय असे वाटतेय आता.
लोकल सुताराचे काही पैसे अडवून ठेवू शकतो, ओ कडे हा option देखील बंदच.
ममव व्यक्तीला ही डोकेदुखी आहेच पैसे देउन देखील.

आम्हाला एक कळलं.एकावेळी जरा कमी कंटेंट दिला तर ते चांगले करतात.पूर्ण घर एकावेळी हातात सोपवलं की हम है राही प्यार के मधला मुश्ताक खान होतो 'वो सर हम जापानी टेक्निक से एक साथ 1000 कॉलर बना दिये और अब शर्ट के लिये कपडा कम पड गया'
डोकं शांत ठेवून परत परत अश्या 'ओ'लोकांना सौम्य टाचण्या टोचत राहून काम पूर्ण करून घेणे आणि आपली मान सोडवणे हा एकच पर्याय.
'ही घे एक खोली कर.ही छान झाली, पूर्ण झाली की आणि तरच दुसरी देऊ' असं करायला लागणार.

नव्या / रिकाम्या घरात सगळं इंटेरियर करणं आणि राहत्या घरात करणं यातलं दुसरं कठीण आणि कटकटीचं असावं. पण कधीतरी करावंच लागतं

इंटेरियर डिझायनर सोबत चर्चा करून डिझाइन मटेरियल इ.इ. फायनल करून एकेका प्रकारची कामं म्हणजे गवंडीकाम , रंगकाम , सुतारकाम, इल्क्टृशियन हे आपण बोलवून त्यांच्याकडून काम करून घेतलं तर?

मी सुतारकाम करून घेतलं होतं. तेव्हा कपाटं , इ. ची मापं , डिझाइन मीच फायनल केली. रिडर्स डायजेस्टच्या स्वीपस्टेक्सच्या मोहात पडून इंटेरियर , फर्निचरची काही जाड आणि जड पुस्तकं गळ्यात पाडून घेतली होती. त्यांचा उपयोग झाला. त्यात ऐनवेळी खर्च वाढण सोडलं तर दुसरा काही इश्यु आला नाही.

पेंटिंगचा अनुभव मात्र प्रत्येक वेळी डोकेदुखी होता.

मस्त दिसतोय व्हिडिओ किल्ली
शंकर शेट रोड ला स्पेसमॅक्स दुकान आहे ते या सगळ्या गोष्टी करते. पण किमती अर्थातच जास्त.
बाकी लोकल सुतार किंवा 'ओ' सारखी एजन्सी जिथे कोणालाही साईटकडे लक्ष द्यायला वेळ नाही कारण एकावेळी 10 साईट चालू ठेवून नोटा छापायच्या आहेत, त्यांना किचकट गोष्टी करायला दिल्यास भूत बनवून देतात.

कितपत pratical आहे काय माहिती पण हे animation बघून छान वाटत आहे>>> मॅक्सिमम स्पेस युटिलाइझ करण्याच्या नादात खुपच क्राउडेड वाटतिये...दरवाजाच्या मागेच वॉर्डरोब आहे आणी बेडच्या खालचे ड्रॉव्हर उघडायला दार लावावे लागेल...खालच्या बेडच्या वरती केलेले शेल्फ खुपच रिस्कि...कुठल्याही कारणाने डोक्याला लागण्याची शक्यताच जास्त आहे.
त्यापेक्षा रेग्युलर बन्कबेड करुन खालच्या बेड खाली स्टोरेज ड्रव्हर करता येतिल...हा आय़किया डेबेड पण चान्गला वर्क होतो
https://www.ikea.com/us/en/p/hemnes-daybed-frame-with-3-drawers-white-30...

#प्रदीर्घवैतागअनुदिनीडिस्क्लेमर

अतिशय साध्या सुध्या कामांमध्ये केस पांढरे करण्याची क्षमता.

एशियन पेंट्स ची पेंटर मंडळी आणि त्यांचा मुख्य माणूस
"इथे सिक्युरिटी डोअर ला ब्राऊन रंग द्यायचाय."
"नाही मी सांगतो ऐका, परत क्रीम कलर करा."
"डोअर ला धूळ आणि तेलकटपणा येतो.बारीक छिद्र साफ करता येत नाही.आतल्या बाजूला उघडत असल्याने पाणी मारून धुता येत नाही.आम्हाला ब्राऊनच हवेय."
"नाही मग काळंच करा.ब्राऊन घाण दिसेल."
"घाण दिसलं तर जबाबदारी आमची.ब्राऊनच करा.फर्निचर ला मॅच होणारा शेड.".
"नाही मी सांगतो तसं करा.काळाच द्या."

(इथे मी मनात 'ए xxxxx!! तुला आता स्पष्ट भाषेत सांगायचं का, आमचे पैसे आमचा रूल?आम्ही दार ब्राऊन करू नाहीतर मोरपिशी आणि फ्युशिया पट्टे रंगवू.नन ऑफ युवर ब्लx बिझनेस! )
शॉपिंग ची प्रचंड आवड, सर्वत्र पसरलेला आर्टिफिशियल इंटेलिजन्स यामुळे होणारं वाचन आणि एकंदर खरेदी मधला अनुभव यामुळे 'माझं ऐका, हेच घ्या' असं वाक्य इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स सोडून कोणत्याही संदर्भात सारखं आग्रहाने बोलणाऱ्या विक्रेत्याला मी मनोमन एक पेल्व्हीक एरिया लाथ मारते.तोही सगळ्या कस्टमर्स ना मारत असावा Happy जोवर मी 'काय करू सांगा' विचारत नाही तोवर सल्ले द्यायचे नाहीत.

हीच गत पेंट ची.
"हा भिंतीवर डल दिसतोय.आम्हाला नको."
"हा बेस्ट सेलिंग ब्रँड आहे.सगळे कस्टमर हाच घेतात."
"घेत असतील.आम्हाला नको आहे.आम्हाला ज्याला लस्टर आणि किंचित ऑईल पेंट सारखं दिसणारी चमक आहे असाच रंग हवाय."
"कस्टमर ना मॅट हवा असतो. लस्ट वाला वाईट दिसतो.क्लासी दिसत नाही."
"दिसू दे.जबाबदारी आमची.आम्हाला भिंतीवर किंचित चमकणाराच रंग हवाय."
"असा रंग एशियन पेंट मध्ये बनत नाही.मी घेतलाय तो बेस्ट कलर आहे."
"आम्ही दुकानात बघून येतो.ज्या ब्रँड मध्ये असा रंग येईल तो घेऊन पुढे चालू करू."(हे संभाषण दुपारी 3 वाजता. म्हणजे पेंटर चा वर्किंग डे संपण्याच्या 2 तास आधी.)
दुकानात कॅटलॉग मध्ये आम्हाला पाहिजे त्या टेक्श्चर चा रंग, तश्या lusture मध्ये 2 मिनिटात एशियन पेंट मध्येच मिळाला.तो कन्टीन्यू करून घरी आलो.
दुसऱ्या दिवशी हा पेंटिंग इनचार्ज:
"तुमच्यामुळे 2 दिवस वाया गेले." (इथे मी मनातल्या मनात त्या इनचार्ज ला चार पाच लाथा मारल्या.)
"2 दिवस कसे?आदल्या दिवशी 3 पर्यंत प्रायमर चं काम झालं.दुसऱ्या दिवशी सकाळी 10.30 ला आपण बोलतोय."
"मी आधीच्या टेक्श्चर चे 20 डबे सांगितले होते."
"मग का सांगितले?तो डल दिसतो तर डल दिसतो. आम्हाला लश्चर हवाय."
"मॅट चा 1 डबा उघडला.त्याचे पैसे भरावे लागतील."
"पैसे भरू.पण आम्ही निवडलेलाच व्हेरियन्त चुका न करता लागला पाहिजे."

ही चर्चा झाल्यावर पेंटर ने काम चालू केले.पहिल्या दिवशी हा गडी 4 वेळा 'कामानंतर जमीन स्वच्छ करून पाहिजे' सांगून पण खोलीत सर्वत्र चुना प्रायमर चे लपके ठेवून गेला.मग या घाण झालेल्या एरियांचे फोटो काढून वेगळ्या ग्रुपवर आरडा ओरडा केल्यावर दुसऱ्या दिवशी नीट साफसफाई झाली.यातही नव्या लश्चर पेंट बद्दल बोलण्यात 3 उल्लेख, डबे दाखवून चर्चा इतकं पेंटर समोर झाल्यावर पेंटर ने जुना मॅट पेंट तिथे पडलेला होता तो लावायला घेतला.मग त्याला थांबवून 'कुठेही पेंट मारताना डबा उचलला की मला दाखव' असं करून डब्याच्या टेक्श्चर चे, शेड नंबर चे फोटो ग्रुपवर टाकून मगच काम चालू असे बदल केले.

सुतार फुटलेला(चुकीचे हँडल किस्सा) आरसा नीट करायला आले.पण हा आरसा इतक्या चांगल्या ग्लू ने चिकटवला होता की सलग निघेचना.मग त्यांनी चित्रपटात कोणीतरी रागीट हिरो हातोड्याने काचा फोडतो तसं फोडत आरश्याचे तुकडे करून तो तुकडे तुकडे करत उपटला.सुतार आणि पेंटर एकत्र हा प्रकार झालाच नसता.पण 'ओ' चा साईट सुपरवायझर राजस्थानात फिरायला गेला होता.

हे सगळं दोघांच्याही ऑफिस मध्ये ख्रिसमस च्या आधी ची कस्टमर्स ची कामाची लगीनघाई, मिटिंग यात मध्ये येतं.मग तो 'गेला माधव कुणीकडे' मध्ये प्रशांत दामले 2 बायकांना वेगवेगळ्या प्रकारे मुंबईच्या वेगवेगळ्या घरी वेगवेगळ्या वेळी भेटत असतो तसं करावं लागतं.प्रत्येक जण आठवड्यात काही दिवस ऑफिस ला जाणार आणि पूर्ण घरच्या बाबी बाजूला ठेवत एकसंधपणे 9 तास काम करणार.ऑफिस म्हणजे लक्ष्मी यायचे दार.उसका अपमान कभी नही कर सकते.

या सगळ्यात घरात फुटणाऱ्या लाह्या:
"तो अजून आला का नाही?तो दुपारी येईल.मग 7 ला कटर चालवेल. मग आपला बिहारी शेजारी ग्रुपवर 'कामगारांचे शोषण' वाली पोस्ट लिहिल"
"तो काय आऊटलूक मिटिंग आहे का? त्याचं पहिल्या साईटवरचं काम झालं की येईल."
"त्याला पहाटे 4 ला येउदेत. तो मुद्दा नाही.ग्रुपवर टाकायला काय होतं उशीर होणार आहे?"
"सगळ्या गोष्टी काय आयटी मधले प्रोजेक्ट असतात का? तो येईल तेव्हा येईल.काम होईल तेव्हा होईल."
"आपण म्हटलं होतं का, 'पैसे येतील तेव्हा येतील.' ते आपल्या कडून 3 दिवसाच्या आत घेतले गेले ना?"
"तू ना, कुठेतरी आफ्रिकेत झोपडी बांधून तिथे राहा.अजिबात ह्युमन इंटरऍक्शन नको.सगळं आदर्शवादी पाहिजे."
"आफ्रिकेत झोपडीत पाली आणि साप येणार.ट्रांसील्व्हेनिया ला बांधून देशील का?"
"ते पण मीच करायचं? इक्वालिटी नको का? तुझी झोपडी तूच बांध."

2024 मध्ये घर कसंही, कोणत्याही अवस्थेत, काहीही काम पेंडिंग असलेलं असलं तरी मला 'ओ' च्या टीम ची आणि पेंटिंग टीम ची तोंडं घरात बघायची नाहीयेत.एकदोन कपाटं बिना हँडल उघडेन आयुष्यभर. नो वरीज.
(ही वैतागीय अनुदिनी लिहेपर्यंत सुताराचं एक हँडल लावून झालं Happy लगे रहो.)

खुसखुशीत कथा आहे .
पण बिल्डिंग च जेव्हा काम चालू असते तेव्हाच काय ये इंटेरियर करायचे आहे ते करून घ्या असाच कायदा असायला हवा .
बिल्डिंग पूर्ण झाली सर्व लोक राहण्यास आली की .
Maintance सोडून कोणत्याच कामाला पूर्ण प्रतिबंध हवा.
1) लोक स्वतःच्या हौसे साठी बिल्डिंग च्या मुळ structure मध्ये पण बदल करतात त्या मुळे इमारत कमजोर होते.
२) फक्त हौस म्हणून घरात बदल करणाऱ्या लोकांमुळे बाजू च्या,वर खाली राहणाऱ्या लोकांनची शांतता भंग होते.
काही कारण नसताना त्रास होतो.
३) धूळ,आवाज ह्याचा त्रास होतो.
अनोळखी लोक बिल्डिंग मध्ये ये जा करतात त्या मुळे बाकी लोकांची पण सुरक्षा धोक्यात येते.

"हा बिम इथे कसा काय? आम्हाला नको हा. कापून टाका."
"फॉल्स सिलिंग करा मग दिसणार नाही तो. दोन्हीला तेवढाच खर्च येईल."
"आम्हाला नाही करायचं फॉल्स सिलिंग कापुनच टाका."
"ठीक आहे साहेब."

"अरे हा कॉलम मध्येच कसा काय? आम्हाला कार पार्क करायला अडचण होते. पाडून टाका हा कॉलम."
"बरं साहेब."

अशी दृश्ये डोळ्यासमोर तरळून गेली पहिला मुद्दा वाचून.

धन्यवाद हेमंत, मानव आणि किल्ली
होय होय!! बराच टप्पा पार पडत आला.अजूनही गॅलरीत आणि एका खोलीत गोळा करून ठेवलेलं सामान मला घाबरवतं आहे, पण ते होईल काही आठवडे विकेंड ला थोडं राबून.

अशी दृश्ये डोळ्यासमोर तरळून गेली पहिला मुद्दा वाचून.

Submitted by मानव पृथ्वीकर on 7 December, 2023 - 03:38

मानव ह्या अशा लोकांचे प्रमाण कमी असेल पण अशी लोक आहेत.
Beam ,colum तोडायला पण मागे पुढे बघत नाहीत.
अशा लोकांमुळे इमारती कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत.
रिॲलिटी आहे ती

डोक्याला ताप बापरे बाप चित्रपट पाहून जितका होईल त्यापेक्षा हा जास्त डोक्याला ताप की.

लोकल पेंटर देखील असेच.
एकदा लावेंडर रंग सांगितलेला.
भाऊने दुकानातून आणला आणि त्यात काहीतरी छोट्या बाटलीटले रंगद्रव्य मिक्स केले. तो दिला त्याने. जर जरा डार्क वाटत होता पण भिंतीवर चट्टे दिसत होते. प्रायमर आणि पुट्टी काम न केल्याचे परिणाम.
ते झाकायला रंगाचे हातावर हात मारले.
आणि आमचा स्वप्नातील लावेंडर रंग अति डार्क जांभळा झालेला, ते ही हॉल चया विशेष कलाकुसर भिंतीवर.
तो पुल नी सांगितलेला योग असतो तसा आपल्याही आयुष्यात "धड काम पहिल्याच फटक्यात न होणे" हा विशेष योग असणार म्हणून शांत बसतो आता.

अनु, आता हे काम पूर्ण झालं (आणि मागची आवराआवर झाली) की दोन दिवस (तरी) सुट्टी काढून निवांत कुठेतरी जाऊन रहा Happy

Pages