भाग ५ : https://www.maayboli.com/node/84289
.. ..... .... .... ...
अंतिम भाग
करोनरी वाहिन्यांमध्ये Atherosclerosisमुळे मेद आणि अन्य घटकांचा पापुद्रा कसा तयार होतो ते आपण मागच्या भागात पाहिले. आता या आजाराचा पुढचा टप्पा पाहू.
आजार वाढत असताना एका स्थितीत हा पापुद्रा फुटतो. त्याचबरोबर रक्तातील बिंबिका पेशी (platelets) सक्रिय होतात. परिणामी रक्तगुठळी तयार होते तसेच रक्तवाहिनीचे आकुंचन होते. या सर्वांमुळे वाहिनीत बऱ्यापैकी अडथळा निर्माण होतो. हा अडथळा किती काळ टिकतो आणि त्याची तीव्रता किती, यानुसार रुग्णाला कुठल्या प्रकारचा त्रास होतो ते ठरते. साधारणपणे दोन प्रकारचे रुग्ण आढळतात :
१. निव्वळ छातीतील वेदना (stable angina)
२. हृदयविकाराचा झटका (myocardial infarction)
१. निव्वळ छातीतील वेदना : या प्रकारात अचानक कधीतरी छातीत दुखू लागते. ही वेदना मध्यम स्वरूपाची असते आणि ती सुमारे पाच ते पंधरा मिनिटे टिकते. बऱ्याचदा अशी वेदना कुठलेतरी श्रम केल्यानंतर होते. छातीत दुखू लागल्यानंतर विश्रांती घेतली किंवा nitroglycerinया औषधाची गोळी घेतली असता ती थांबते. काही जणांच्या बाबतीत स्वस्थ बसले असताना देखील अशी वेदना होऊ शकते आणि काही वेळेस धूम्रपान केल्यानंतर ती उद्भवते.
२. हृदयविकाराचा झटका : जेव्हा करोनरी वाहिन्यांमध्ये अडथळा मोठ्या प्रमाणात होतो तेव्हा हृदयस्नायूंना गरज असणाऱ्या रक्तापेक्षा खूप कमी पुरवठा होऊ लागतो आणि ऑक्सिजन अभावी त्या पेशींवर परिणाम होतो. परिणामी काही पेशींचा समूह मृत होतो (infarction). जेव्हा हृदयस्नायूंचा रक्तपुरवठा कमी होतो तेव्हा तिथे काही रासायनिक घडामोडी होतात आणि त्यातून काही आम्लधर्मी आणि अन्य पदार्थ तयार होतात. या पदार्थांमुळे वेदनेचे चेतातंतू सक्रिय होतात व त्यामुळे रुग्णाला वेदना जाणवते.
हृदयविकाराच्या झटक्याचे काही प्रकार असतात. त्यातील सर्वाधिक आढळणारा प्रकार आधी पाहू.
प्रकार-१चा झटका
रुग्णाला प्रत्यक्ष झटका येण्यापूर्वी एक दोन दिवस आधी छातीत कसेतरी होणे आणि खूप दमल्यासारखे वाटू शकते. परंतु सर्वांच्याच बाबतीत अशी पूर्वलक्षणे येत नाहीत. काहींच्या बाबतीत ध्यानीमनी नसताना अचानक झटका देखील येऊ शकतो.
हृदयविकाराचा जो नमुनेदार झटका असतो त्या प्रसंगी सर्वसाधारणपणे अशा घडामोडी होतात :
• बऱ्याच वेळेस हा झटका पहाटे किंवा सकाळी लवकरच्या वेळात येतो कारण या वेळेस शरीरातील नैसर्गिक स्थिती अशी असते :
१. sympathetic चेतासंस्था उत्तेजित होते. त्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात.
२. हृदय-ठोक्याची गती आणि रक्तदाबात वाढ होते.
३. हृदयस्नायूंचे काम वाढते आणि त्यांचा ऑक्सिजनचा वापरही वाढतो.
४. रक्तातील प्लेटलेट्स एकमेकांना चिकटण्याची प्रक्रिया वाढते.
• वेदनेचे वर्णन
१. तीव्र असते; एकदा दुखू लागल्यावर सुमारे अर्धा ते एक तासपर्यंत ती थांबत नाही.
२. ती छातीच्या मधोमध जाणवते. परंतु त्याचबरोबर मान, खांदा, जबडा किंवा डावा हात या भागांमध्येही ती पसरू शकते.
३. वेदनेचा प्रकार : छातीच्या मधोमध कोणीतरी वजन ठेवल्यासारखे वाटणे / किंवा पिळवटले जाणे / नुसतेच दुखणे किंवा जळजळणे.
४. काहींच्या बाबतीत पोटाच्या वरच्या भागात अस्वस्थता आणि वात अडकल्याची भावना देखील जाणवू शकते.
५. काही जणांत खालील अन्य लक्षणे उद्भवू शकतात :
* शरीरात काहीतरी भयंकर घडणार आहे अशी भावना
चक्कर येणे आणि/ किंवा बेशुद्ध पडणे
* खोकला, मळमळ आणि/ किंवा उलटी
* दरदरून घाम सुटणे
* दम लागणे, नाडीचे ठोके जलद आणि अनियमित होणे
* कोणीतरी आपला गळा घोटते आहे अशी भावना होणे.
* पोट फुगणे
• रुग्ण तपासणी :
रुग्णाचे निरीक्षण आणि स्टेथोस्कोपने तपासणी केली असता खालील बदल झालेले दिसतात :
१. नाडीची गती : बऱ्याच वेळा वाढलेली परंतु काही वेळेस कमी झालेली. तालबिघाड असू शकतात.
२. रक्तदाब : बऱ्याच वेळा वाढलेला परंतु काही परिस्थितीत कमी झालेला असतो.
३. श्वसनाची गती वाढलेली असते
४. तापमान : पहिल्या 24 ते 48 तासांमध्ये थोडा ताप येऊ शकतो
५. छातीची तपासणी : हृदयाचे विशिष्ट ध्वनीबदल, खरखर तसेच फुफ्फुसांच्या भागावरही काही बदल ऐकू येऊ शकतात.
६. हात व पाय : यांच्या टोकांना निळसरपणा किंवा पांढरेफटक पडणे किंवा सूज येणे.
• महत्त्वाच्या रोगनिदान चाचण्या :
१. इसीजी : यामध्ये हृदयातील विशिष्ट भागांच्या बिघाडानुसार निरनिराळे बदल दिसतात. असे बदल सुमारे 80 टक्के रुग्णांमध्ये दिसतात. अर्थात वैशिष्ट्यपूर्ण बदल न दिसणे किंवा इसीजी नॉर्मल येणे याही शक्यता असतात.
२. ट्रोपोनिनची पातळी : ही अत्यंत महत्त्वाची चाचणी आहे. या विषयावर स्वतंत्र लेख इथे वाचता येईल : https://www.maayboli.com/node/65025?page=3
जेव्हा हार्ट अटॅकचा संशय येण्यासारखी लक्षणे रुग्णामध्ये दिसत असतात तेव्हा डॉक्टरांनी ताबडतोब रक्तावरील ट्रोपोनिनची चाचणी करायची असते. जर ती पॉझिटिव्ह आली तर रोगनिदान पक्के होते. परंतु जर का ती निगेटिव्ह असेल आणि लक्षणे असतीलच, तर मग ती चाचणी त्यानंतर तीन आणि नंतर सहा तासांनी पुन्हा करायची असते.
म्हणजेच, रुग्णालयात लक्षणे असलेला रुग्ण दाखल होता क्षणीच ती चाचणी करणे महत्त्वाचे- नव्हे अत्यावश्यक- असते.
३. गरजेनुसार काही प्रतिमातंत्र चाचण्या (angiography) करता येतात.
रोगनिदान
MI चे निदान करण्यासाठी त्याची सार्वत्रिक व्याख्या करण्यात आली आहे. त्यानुसार :
MI चे शिक्कामोर्तब करण्यासाठी खालील गोष्टींची पूर्तता व्हायला हवी:
१. रक्तातील पुरेसे वाढलेले ट्रोपोनिन (विशिष्ट कटऑफच्या वर)
आणि
२. खालीलपैकी किमान एक घटना :
अ) करोनरी-विकाराची विशिष्ट लक्षणे रुग्णात दिसणे
आ) इसीजीतील विशिष्ट बदल किंवा
इ) हृदयाच्या ‘इमेजिंग’ तंत्राने मिळालेला पुरावा
* याप्रमाणे खात्रीशीर निदान झाल्यावर विशिष्ट तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ते उपचार केले जातात. या लेखमालेत सुरुवातीस स्पष्ट केल्यानुसार हा मुद्दा या लेखमालेच्या कक्षेबाहेर आहे.
लक्षणांची रुग्णभिन्नता
आतापर्यंत वर्णन केलेला आजार नमुनेदार आहे. परंतु काही रुग्णांमध्ये याबाबत भिन्नता आढळते ती अशी :
१. दीर्घकालीन मधुमेही रुग्णांच्या बाबतीत वेदनेशी संबंधित चेतातंतूवर परिणाम झालेला असतो. त्यामुळे त्यांना छातीत वेदना जाणवतेच असे नाही.
२. वृद्धांच्या बाबतीत स्मृतिभ्रंश किंवा बिघडलेले मानसिक संतुलन असल्यास त्यांना संबंधित लक्षणे समजू शकत नाहीत. त्यामुळे ही घटना कुटुंबीयांच्याही लक्षात यायला वेळ लागतो.
३. पुरुषांशी तुलना करता स्त्रियांमध्ये लक्षणविरहित झटका येण्याचे प्रमाण अधिक असल्याने बऱ्याचदा लवकर निदान होत नाही.
झटक्याचे अन्य प्रकार
वरील प्रकार-१ व्यतिरिक्त जे अन्य काही प्रकार असतात त्यातले दोन प्रमुख प्रकार पाहू.
A. प्रकार-२ : यामध्ये हृदयस्नायूंची ऑक्सिजनची मागणी वाढते परंतु त्या प्रमाणात पुरवठा होऊ शकत नाही म्हणून झटका येतो. हा प्रकार होण्यास करोनरी वाहिन्यांचे अचानक आकुंचन, एनिमिया किंवा श्वसन दुर्बलता हे कारणीभूत असतात.
B. प्रकार-३ : झटक्यामुळे आलेला तात्काळ मृत्यू. अशाप्रसंगी मृत्यू इतक्या वेगात येतो की त्यावेळेस रक्तात ट्रोपोनिन वगैरे रसायने सोडली देखील गेलेली नसतात. काही वेळेस असा रोगी रुग्णालयात मृत अवस्थेत आणला जातो किंवा तिथे आणल्या आणल्याच त्याला डॉक्टरने हात लावण्यापूर्वीच त्याचा मृत्यू होतो.
अनिश्चित रोगनिदान
छातीत दुखणे आणि त्याच्या जोडीने वर उल्लेख केलेली काही लक्षणे, हृदय वगळता इतर अनेक आजारांमध्येही दिसू शकतात. रुग्णाची तपासणी आणि चाचण्या केल्यानंतर प्रत्येक वेळेस ‘नमुनेदार चित्र’ दिसतेच असे नाही. अशा प्रसंगी त्याला रुग्णालयात थांबवून ठेवायचे की घरी सोडायचे असा पेचप्रसंग निर्माण होतो. या प्रसंगी खालील प्रकारचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन कामी येते :
संभाव्य लक्षणे >>> रुग्णालयात दाखल >> डॉ. नी तपासल्यानंतर The HEART score असा काढतात :
History
ECG मधले बदल
Age (<45 , >65 )
Risk factors ( 0/1-2/3)
Troponin ( पातळीनुसार)
वरीलपैकी प्रत्येक मुद्द्याला ० ते २ गुण देतात. त्यानुसार HEART score १० पैकी किती हे कळते.
मग निर्णयप्रक्रिया अशी :
0-3: कमी धोका >>> लवकर घरी पाठवता येते.
4-6: मध्यम धोका >>> रुग्णालयात निरीक्षण चालू.
7-10: सर्वाधिक धोका >>> तातडीने योग्य ते उपचार
भविष्यात या संदर्भात मशीन लर्निंगचा वापर करण्यासंबंधी संशोधन प्रगतीपथावर आहे. रुग्ण दाखल झाल्यानंतर त्याच्या रक्तावरील ट्रॉपोनिन चाचणी एकदाच केली जाईल आणि रुग्णाची इतर सर्व माहिती मशीन लर्निंग यंत्रणेला पुरवली जाईल. त्यातून अचूक निदान केले जावे अशी अपेक्षा आहे.
**************************************************************************
समाप्त
समारोप
समारोप
हृदयाच्या काही महत्वाच्या पैलूंचे विवेचन करणाऱ्या ‘हृदयसंवादाचा' समारोप करतो.
या चर्चेदरम्यान खूप चांगले प्रश्न विचारले गेले आणि काहींनी आपले अनुभवकथन सुद्धा केले.
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद !
मला ह्रदयविकाराचा त्रास
मला ह्रदयविकाराचा त्रास झाल्यावर माझ्या एका शाळामित्राने मला आवर्जून फोन केला होता.
या मित्राचे वडिल त्यांच्या वयाच्या चाळीशीतच ह्रदयविकाराने निधन पावलेले होते. व या मित्राचे आजोबाही अकाली निधन पावलेले होते.
हे सारे लक्षात घेऊन माझा हा मित्र तिशीत असल्यापासूनच ह्रदयविकार तज्ज्ञाच्या संपर्कात होता. व दरवर्षी या तज्ज्ञ्याच्या सल्ल्याने नियमित सर्व चाचण्याही करीत होता.
तसेच नियमित व्यायाम, योग्य आहार वगैरेवर लक्ष ठेऊन होता.
तरीही वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी या मित्राला मध्यरात्री एक..दोनच्या सुमारास अचानक अस्वस्थ वाटायला लागले. बाहेर पाऊस पडत होता. कार्डिअॅक अँब्युलन्सला फोन लागत नव्हता. याच्या पत्नीने मग अजिबात वेळ न घालवता त्याला रेनकोट वगैरे घालून हळुहळु दुचाकीवरुन रुग्णालयात दाखल केले.
तिथे डाॅ.नी ह्रदयविकाराचा झटका आल्याचेच निदान केले. व ताबडतोब रुग्णालयात आलात याकरता याचे आवर्जून कौतुकही केले.
पुढे या मित्राची बायपास केली गेली व त्याचा जीवही वाचला.
त्याने हे सारे सविस्तर सांगून ह्रदयविकाराबाबत एकंदरीतच समाजात फारच उदासीनता असते हे ही मला सांगितले.
आपली एकंदरीत जीवनशैली, अनुवंशिकतेमधून येऊ शकणारे विविध आजार, नियमित व्यायाम, भरपूर झोप व नियमित वैद्यकीय तपासणी या सगळ्यालाच सध्या अतिशय महत्व प्राप्त झालेले आहे. - विशेषतः ह्रदयविकार, स्ट्रोक, मधुमेह, रक्तदाब या सार्यांचा विचार करता तरी !
धन्यवाद !!
<< ह्रदयविकाराबाबत एकंदरीतच
<< ह्रदयविकाराबाबत एकंदरीतच समाजात फारच उदासीनता असते. >>
पूर्णत: सहमत नाही. सर्व काळजी घेऊनही, ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतरच समजते, हा खरा मुद्दा आहे.
वाटा आणि पळवाटा खूप असल्या
वाटा आणि पळवाटा खूप असल्या मुळे.
Heart attack कोणाला येईल ह्याचे वर्णन हवं तस करता येते.
खरे कारण कधीच पुढे येत नाही
. heart attack येण्याची सर्व गोष्टी एकध्या व्यक्तीत असतात.
आणि हार्ट अटॅक येण्याचे कोणतेच कारण एकाद्या व्यक्तीत नसते
तेव्हा उलट घडते आणि . हार्ट अटॅक साठी बिलकुल कोणतीच कारण नसणारी व्यक्ती हार्ट अटॅक नी मरते अशी उदाहरणे च जास्त आहेत .त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे dr मांडके
हृदयविकाराच्या धोक्याचा अंदाज
हृदयविकाराच्या धोक्याचा अंदाज हा अत्यंत गुंतागुंतीचा विषय आहे. हा अभ्यास करताना प्रामुख्याने तीन घटक समोर येतात :
1. आहारशैली
2. जीवनशैलीतील अन्य घटक
3. व्यक्तिगत जनुके
हे तिन्ही घटक एकमेकांमध्ये घट्ट गुंतलेले आणि गुंफलेले आहेत.
या विषयावरील संशोधन करताना खूप अंगभूत मर्यादा असतात. धोका वाढवणारे जे काही 50 घटक असतील त्या सर्वांचा एकत्रित अभ्यास करणे अशक्य असते. म्हणून साधारणपणे एका वेळेस एक/दोन घटक घेऊन त्याचा नीट अभ्यास केला जातो. असे अभ्यास जगाच्या निरनिराळ्या भागात चालू असतात आणि ते अर्थातच मर्यादित संख्येतील स्थानिक लोकांवर केले जातात. त्यामुळे अशा अभ्यासाचे निष्कर्ष हे सर्व जगासाठी सरसकट लागू करता येत नाहीत.
अगदी एकाच देशातील संशोधनापुरते बोलायचे झाल्यास तिथेही मर्यादा येतात, कारण अनेक देश मिश्रवंशीय आहेत. तिथल्या आहार पद्धती देखील विभिन्न आहेत.
अजून एक मुद्दा.
अशा प्रकारचे अभ्यास हे खूप दीर्घकालीन करावे लागतात. जीवनशैलीतील एखादा घटक एखाद्या आजाराशी कितपत संबंधित आहे हे प्रस्थापित करण्यासाठी अर्धशतक ते शतक इतका कालावधी देखील लागू शकतो. त्यामुळे एखाद्या पिढीत चालू झालेल्या संशोधनाचा फायदा बऱ्याचदा त्या पिढीला न मिळता पुढच्या पिढ्यांना मिळू शकतो.
एखादा आजार होणे आणि त्यामुळे मृत्यू होणे या नैसर्गिक गोष्टी आहेत. त्यांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अंदाज बांधताना मानवी मर्यादा येणारच. आधुनिक संशोधन पद्धतीने (उदा. AI) या मर्यादांवर मात करण्याचा प्रयत्न चालू असतो. तरीसुद्धा कुठलेही अत्याधुनिक तंत्रज्ञान एखाद्या आजाराचा धोका शंभर टक्के प्रमाणात जगातील सर्व लोकांमध्ये सांगू शकेल हे संभवत नाही.
नेमका आजच हा फॉर्वर्ड पुन्हा
नेमका आजच हा फॉर्वर्ड पुन्हा आलाय
https://www.youtube.com/watch?v=XFVNOIkNJ8M
डॉक्टर आणि विशेषतः सर्जन
डॉक्टर आणि विशेषतः सर्जन लोकांना कामाचा भरपूर ताण असतो. डॉक्टर मांडकेंच्या छातीत दुखू लागलं तेव्हा ते रात्री अडीच वाजता कार ड्राइव्ह करत घरी परतत होते.
सर्जन लोकांना कामाचा भरपूर
सर्जन लोकांना कामाचा भरपूर ताण असतो. >>> +११
.....
अनेक घटकांचा एकत्रित परिणाम यापलीकडे फार काही उत्तर देता येत नाही.
हृदयाचे विकार व आहारातले
हृदयाचे विकार व आहारातले ग्लूटेन
https://www.loksatta.com/lifestyle/health-tips/gluten-free-diet-can-harm...
माणूस कन्फ्युज होतो अशा
माणूस कन्फ्युज होतो अशा बातम्या न मुळे.
भारताच्या प्रतेक प्रदेशात आहाराची वेगवेगळी परंपरा आहे गव्हाचा रोज जेवणात वापर काही प्रदेशात केला जातो तर महारष्ट्र मधील काही भागात ज्वारी रोजच्या आहारात वापरली जाते.गहू कमी प्रमाणात वापरले जातो.
कोकण किनारपट्टी,बंगाल सारखी राज्य ह्यांच्या आहारात भात जास्त प्रमाणात वापरला जातो.
मग प्रदेशानुसार हार्ट अटॅक चे प्रमाण वेगवेगळे आहे का?
प्रदेशानुसार हार्ट अटॅक चे
प्रदेशानुसार हार्ट अटॅक चे प्रमाण वेगवेगळे आहे का?
>>> होय, असे काही अभ्यास झालेले दिसतात.
एकंदरीत पाहता केरळ, तामिळनाडू आणि पंजाबमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त दिसते.
या राज्यांमध्ये कोलेस्टेरॉलची वाढलेली पातळी आणि उच्चरक्तदाब याचेही प्रमाण तुलनेने जास्त आहे
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC6994761/#:~:text=In%20India....
अर्थात वरील निष्कर्ष एका
अर्थात वरील निष्कर्ष एका अभ्यासगटाचा आहे. अन्य संशोधनांमध्ये याहून थोडीफार वेगळी माहिती देखील सापडू शकते.
आपल्याकडे अजून एक मुद्दा म्हणजे या आजाराचे ग्रामीण व शहरी भागातील प्रमाण यानुसार देखील राज्यांचा विदा बदलतो :
prevalence rates :
( A = ग्रामीण; B= शहरी )
https://www.ahajournals.org/doi/full/10.1161/CIRCULATIONAHA.114.008729
जम्मू आणि काश्मीर शहरी आणि
जम्मू आणि काश्मीर शहरी आणि ग्रामीण दोन्ही ठिकाणी लाल रंगात च आहे.
भारत पाकिस्तान चा संघर्ष आणि अतिरेकी हल्ले कधी होतील ह्याची भीती.
त्या मुळे स्ट्रेस चे प्रमाण जास्त हे कारण असावे का?
चांगली माहिती डॉक्टर.
चांगली माहिती डॉक्टर.
सोमवारी हृदयविकाराचा झटका
सोमवारी हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक असते?
https://www.loksatta.com/lifestyle/health-tips/dhoom-director-sanjay-gad...
असं असतं ?
Doctor साहेब.
साद.
माझे हे मत आहे.
देवाची भक्ती करायची आहे ना ,त्याच्या संवाद साधायचा आहे ना तर स्वतः च साधा .
एजंट नको( म्हणजे पुजारी,ब्राह्मण वैगेरे)
ते कर्मकांड करायला लावतात.
त्या मुळे लोकसत्ता ,किंवा कोणतीही ही भारतीय मीडिया ह्यांची लिंक वापरून काही सांगणे मला तरी योग्य वाटत नाही.
त्या पेक्षा सरळ ज्या कोणी संशोधक नी हा निष्कर्ष काढला आहे त्याची original link ध्या.
किंवा जे स्वतः डॉक्टर आहेत त्यांनी स्वतःचे मत हक्काने व्यक्त करा .
आम्ही विश्वास ठेवूच
चीन मध्ये हल्ली कोणता तरी श्वसन रोग मुलांमध्ये आला आहे.
महाराष्ट्र टाईम म्हणजे टाइम्स ग्रुप आणि अशा प्रतिष्ठित मीडिया ग्रुप नी त्या विषयी अंतरणजित बातमी छापली आहे ती वाचून लोक अस्वस्थ होतील.
पण सायन्स अलर्ट वर.
जी माहिती आली आहे .
Who नी जी माहिती मागवली होती ती चीन नी पाठवली आहे.
कोणताही ही नवीन pathogen सापडला नाही.
हॉस्पिटल मध्ये काही रांगा वैगेरे लागल्या माहीत.
जुनेच जे माहीत आहेत तेच pathogen ह्या आजाराला कारणीभूत आहेत.
हे आजार संसर्ग जण्य आहे असा काही निष्कर्ष नाही..
डायरेक्ट देवा शी मनाने संबंध साधा एजंट नको
@Hemant 333
@Hemant 333
बरोबर आहे तुमचे. मला पण ते लोकसत्ता मधले पटले नाही
@Hemant 333
ड पो
बातम्या क्लिक बेट असतात,
बातम्या क्लिक बेट असतात, मुद्दाम वाचल्या जाव्या म्हणून हेडिंग सनसनाटी आणि आत काहीही ठाम निष्कर्ष किंवा पुरावे नसतात.
+१
+१
त्या वाक्यापुढे ? देऊन मथळा आकर्षक करणे हा त्यांचा हेतू उघड आहे. कुठल्यातरी एका रुग्णालयातला मर्यादित विदा घेऊन त्याचे सरसकटीकरण करण्यात काही अर्थ नाही.
बऱ्याच मुद्द्यांचा विचार करावा लागेल :
१. हार्ट अटॅक येणारा वयोगट : त्यातले निवृत्त किती आणि प्रत्यक्ष काम करत असलेले किती ?
२. स्त्री आणि पुरुषांचे प्रमाण ?
३. जगात सर्वच देशांमध्ये / सर्व व्यवसायांमध्ये रविवारी कार्यालयीन सुट्टी नसते.
४. जर शनिवार रविवार अशी दोन दिवस सुट्टी असेल तर शनिवारी रात्री ‘दंगा-पार्टी’ वगैरे होण्याची शक्यता अधिक आहे. मग रविवारी सकाळी झटका येण्याचे प्रमाण जास्त का नाही ?... वगैरे बरेच तर्क लढवता येतील.
अशा निरीक्षणांकडे संशोधनाच्या नजरेने पाहण्यात काही अर्थ नाही.
मी सहावी किंवा सातवीत असेन.
मी सहावी किंवा सातवीत असेन. मला छातीत दुखू लागले. बाबांनी सायन हॉस्पिटलमध्ये (लोकमान्य टिळक हॉस्पिटलमध्ये) नेले. तिथल्या डॉक्टरने (लोक त्यांना शिकाऊ डॉक्टर म्हणतात.) स्टेथोस्कोपने ठोके तपासले. मग मला माझ्या डाव्या हाताने त्यांचा हात जोराने दाबायला सांगितलं. मी तसे केल्यावर बोलले "अरे तुला काही झालेलं नाही. घाबरायचे कारण नाही. या गोळ्या घे दवाखान्यातून." गोल पांढऱ्या चपट्या गोळ्या होत्या. कंपांउंडरला विचारले तर त्याने सांगितले की या साध्या असेडिटीच्या गोळ्या आहेत. (अल्युमिनियम हाइड्रॉक्साईड म्हणजे जेल्यूसिल ).
असो. गंमतीचा भाग म्हणजे सोप्या टेस्ट आणि मी हल्ली तो प्रयोग करून आश्वासन देतो आजाऱ्यांना.
(हार्ट दुर्बल झाले की त्याच्या डाव्या हाताचा जोर जातो. कमी होतो. )
सोमवारी हृदयविकाराचा झटका??
सोमवारी हृदयविकाराचा झटका??
थोडं तथ्य वाटतंय आणि कुमार यांनी निदान बरोबर केलंय. रविवारी आराम आणि रात्रीचा धिंगाणा कारण असेल. होतं काय की पार्ट्या होतच असतात पण वयोमानानुसार 'दगडसुद्धा पचवायची तरुणपणी असणारी ताकद कमी होत गेलेली असते पण ते मान्य करत नाहीत. पोटातले न पडलेलं अन्न प्रभाव टाकू लागते.
मनावर ब्रेक उत्तम ब्रेक. ड्राइवींग आणि खाणे यासाठी.
Doctor.
Doctor.
Sinus node ची माहिती ध्या .
शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे
जे heart beat चालू ठेवते.
आणि त्याची माहिती शोधून पण मिळत नाही.
1) sinus node कोणाच्या नियंत्रणात काम करते( ब्रेन,हार्मोन्स).
२) ह्या सर्वात महत्वाच्या अवयव ल रक्त पुरवठा heart मधील कोणत्या रक्त वाहिन्या करतात.
३) हा अवयव ज्या टिश्यू न च बनला आहे त्या टिश्यू खास आहेत .त्यांची detail माहिती.
मिळत नाही.
आणि रॅपिड आय movement ची माहिती ध्या.
झोपेच्या ह्या काळात .
Heart beat वाढतात.
Blood pressure वाढते.
आणि हे दोन्ही प्रश्न अवांतर नाहीत.
Heart attack शी सबंधित आहेत
**Sinus node ची माहिती
**Sinus node ची माहिती
>> https://www.maayboli.com/node/84250
इथे आधीच दिलीय.
...
रॅपिड आय movement सवडीने पाहू.
Sinus node ची माहिती तुमच्या
Sinus node ची माहिती तुमच्या लेखात फक्त दोन चार वाक्यात आहे.
Sinus mode विषयी खूप शोधले पण
Detail व्यवस्थित माहिती कुठेच नाही.
मेडिकल सायन्स ला ह्या अवयव विषयी खूप कमी माहिती असावी .
असे मला तरी वाटत आहे.
माणसाचे आयुष्य च sinus node वर अवलंबून आहे .
तरी त्या विषयी कुठेच detail माहिती मिळत नाही.
म्हणून तुम्हाला विनंती केली होती
हृदयचेतना
हृदयचेतना
हृदयाची धडधड आणि पर्यायाने कार्य सतत चालू राहण्यासाठी एका चेतनेची (impulse) गरज असते. अशी चेतना हृदयातील काही विशेष टिशूत निर्माण होते. अशा टिशू चार ठिकाणी असून त्यातील प्रमुख केंद्राला SA node असे नाव आहे. त्यामध्ये P नावाच्या पेशी असतात ज्यांच्यामधून मूलभूत चेतना निर्माण होते. या केंद्राला हृदयाचा पेसमेकर म्हटले जाते.
इतकीच माहिती sinus नोड विषयी तुमच्या लेखात आहे आणि त्या माहिती वरून काहीच बोध होत नाही
हृदयचेतना
.
हृदयचेतना
.
SA node
SA node
त्याचे कार्य :
१.संदेश निर्मिती>> विद्युत संवेदना>>> ती हृदयभर पसरते>> स्नायूंचे आकुंचन
२. या पेशींना अजिबात विश्रांती अवस्था नसते.
३. जेव्हा करोनरी आजार बिकट होतो तेव्हा या पेसमेकर पेशींचा नाश होतो व
४. तेव्हा हृदयातील अन्य वेगळ्याच ठिकाणी (ectopic ) एक अनैसर्गिक पेसमेकर निर्माण होतो
एकंदरीत पाहता केरळ, तामिळनाडू
एकंदरीत पाहता केरळ, तामिळनाडू आणि पंजाबमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त दिसते.>>> केरळ,तामिळनाडू इकडे खोबर्याचा (ओला नारळ)किवा खोबरेल तेलाचा भरपुर वापर होतो त्यामुळे असेल का?
Pages