इंटिरिअर आणि आम्ही-भाग ३(फायनली समाप्त बरं का पकवणे!!)

Submitted by mi_anu on 14 November, 2023 - 09:06

भाग 1 आणि 2 इथे वाचा:
भाग १
भाग २

अतिशय भिन्न विचार असलेली दोन किंवा माणसं वर्षानुवर्षे घरात नांदत असली की कोणतंही काम अगदी सुधेपणाने होत नाही.(आता मी यापुढे 'आणि यातच तर खरी आयुष्य जगण्याची लज्जत असते.आयुष्य रुपी जेवणाला चव आणणारं हे माईनमूळ लोणचं.संसाराच्या खमंग पोळीला लावलेलं चमचमीत वऱ्हाडी तिखट.असंच हाय हुय करत हे तिखट खात नंतर जिभेवर आलेली गोड आफ्टरटेस्ट न्यारीच.असंच हे तिखट लोणचं,प्रेमाचे गुलाबजाम,समजूतदारपणा चा वरणभात,गॉसिपिंग ची चटणी खात जे जेवण खाऊन एक दिवस यथावकाश मृत्यूरुपी तृप्त ढेकर द्यावा.' असं लिहून तुमच्या साठी वात्रट व्हॉट्सअप फॉरवर्ड अजिबात तयार करणार नाहीये. घाबरू नका.) इंटिरिअर वाल्याना विरोध करण्या वरून झालेले हे काही संवाद वानगीदाखल:

'अरे तू त्यांच्या सगळ्या सूचनांना हो म्हणून मान काय हलवतोस?त्यांचं काय जातंय सगळीकडे काचा लावायला?उद्या काचेच्या भिंती वाला संडास सुचवतील.'
'मग तू कर ना विरोध.तुला मी कधी अडवतो का?'
'मी करते आहेच.पण तू जर नेहमी साने गुरुजी बनून राहिलास तर मला नेहमी विरोध भूमिकेत जावं लागेल आणि ते पाठीमागे 'साहेब बिचारा भला माणूस पण त्याची बायको हडळ आहे' म्हणतील.'
'जसं काय आपण विरोध करत नाही तोपर्यंत आपल्या मागे ते आरत्याच ओवाळतात की नाही.विरोध तुझा आहे.व्यक्त तूच करायचा.'
'म्हणजे मी केला नाही तर तुला घरातल्या सगळ्या कपाटाना काचेची शटर आणि त्यातून दिसणारा पसारा चालेल का?'
'किती निराशावादी सिनिक आहेस गं तू!! पसारा होणाऱच असं सुरुवातीपासून धरून चाललं तर कठीण आहे.माझ्या कपाटात तरी अजिबात असं होणार नाही.'
'हे बघ,आतापासूनच शब्द देऊ नकोस.तुझे शब्द काय आहेत मला माहिती आहे.तू 3 वेळा सिडलिंग ट्रे आणून त्यात मायक्रोग्रीन वाढवून सॅलड खाणार होतास.3 वेळा ते गॅलरीत पडून सडलेले,तुटलेले ट्रे मी फेकलेत.'
'हे बघ,प्रत्येक भांडणात सिडलिंग ट्रे आणायची गरज नाही.दम है तो इंटिरिअर वाल्याना विरोध कर वरना ग्लास शटर बरदास्त कर.'
'सिडलिंग ट्रे' हे आमच्या सर्व भांडणांमधलं ब्रह्मास्त्र आहे.जसा ड्रॅकुला ला परतवायला क्रॉस तसा भांडणातल्या नवऱ्याला गारद करायला सिडलिंग ट्रे.

'ओ' ला अतिशय आवडणाऱ्या 2 गोष्टी: प्रोफाईल शटर्स उर्फ काचेची कपाट दारं आणि 'हायड्रॉलीक शटर्स' उर्फ वर उघडणारी दारं.दोन्हीला मी कडाडून विरोध केला.एकतर 15 वर्षांपूर्वी केलेल्या इंटिरिअर मध्ये आम्ही लांब राहत असल्याने पाहणी करायला सारखं येणं न जमल्याने आणि मुख्य सुतार 6 फूट 2 इंच असल्याने त्याने आपल्या उंचीनुसार लावलेली स्वयंपाकघरातली कपाटं.कोणतंही कपाट आतली वस्तू बरगडीत उसण भरल्याशिवाय किंवा कुठून तरी धडपडत शिडी घेऊन आल्याशिवाय दाद न देणारं.हायड्रॉलीक शटर्स वर उघडणारी सर्वात छतालगतच्या शेल्फ ला लावणं हा दिसायला एकदम सुंदर गुळगुळीत एकसंध, हँडल न दिसणारा प्रकार असला तरी बुटबैंगण माणसाला ऍक्सेस ला अतिशय मूर्खपणाचा आणि वेदनादायी होता.त्यामुळे शेवटी शेवटी माझा 'जब वी मेट' मधला अंशुमन, 'क्यो देखू मैं गनने के खेत, नही देखणे मुझे गनने के खेत!!!' झाला.आता यातल्या बऱ्याच शेल्फ ना हाताला येईल असा एक दांडा असतो, तो धरून झाकणं खाली ओढता येतात.

'कटकटी चिडकी बाई शक्यतो सगळ्याला नाही म्हणणार' हे 'ओ' ला माहीत असल्याने ओ चे साईट सुपरवायझर आधी सरांना फोन करून पटवून घेऊ लागले.मग आम्ही सर्व निर्णयात व्हिडिओ कॉल करून चर्चा करून एकमेकांना आणि 'ओ' ला सेम पेजवर आणलं.सुदैवाने हे प्रकार 10-20 मिनिटात आवरत असल्याने ऑफिस कामाला याचा फटका बसला नाही.

'ओ' ची काम करण्याची प्रोसेस शिस्तबद्ध होती.ठराविक टप्प्यात 2डी डिझाईन शेअर करणे, ठराविक रक्कम मिळाल्यावर बिल ऑफ मटेरियल शेअर करणे, ठराविक रक्कम मिळाल्यावर 3डी चे फोटो शेअर करणे(प्रत्यक्ष डिझाईन पाठवले जात नाही.),ठराविक रक्कम दिल्यावर मापं आणि फॅक्टरी फर्निचर ची कट लिस्ट बनवायला येणे, ठराविक रक्कम दिल्यावर सर्व मटेरियल साईट वर टाकणे असे.यात सर्वात जास्त नियमित गोष्ट अकौंन्ट कडून हफ्ता मागणी होती.मग असा कामाचा काही काळ सुरळीत गेल्यावर 'ओ' चा आणि आमचा नाच गं घुमा चा खेळ चालू झाला.

आम्ही: 'नाच गं घुमा!!'
'ओ': 'या गावचा, त्या गावचा, इलेक्टरीशीयन गावी गेला, पैसे नाही मला, सामान नाही मला, कामगार नाही मला,कशी मी नाचू!!'
आम्ही: 'नाच गं घुमा!पैसे घे तुला,कामगार दे मला, सामान घे मला, नाच गं घुमा!!'

'ओ' ची गंमत ही की हफ्ता मागणी करून हफ्ता घेण्याच्या 2 दिवस आधी ते साईटवर पूर्ण 4 सुतार,1 इलेक्टरीशीयन ची टीम लावत.मग खुश होऊन आम्ही हफ्ता दिला की दुसऱ्या दिवशी पासून फक्त एक पाप्याचं पितर प्लास्टर वाला, इन्व्हेंटरी नाही, साईट सुपरवायझर दुसऱ्या साईट वर असे प्रकार चालू होत.'ओ' ने आमचं काम घेतलं तेव्हा त्यांच्याकडे बिझनेस कमी होता.आमचं काम घेतल्यावर सृष्टीत पॉझिटिव्ह गुडलक लहरी निर्माण होऊन त्यांच्याकडे 5 मोठी प्रोजेक्ट आली आणि त्यांच्यावर छाप पाडणे महत्वाचे ठरू लागले.

त्यात 'ओ' च्या एकंदर रिसॉर्स मॅनेजमेंट मुळे एक इलेक्टरीशीयन येऊन आधीची पाहणी करणार, दुसरा येऊन भिंतींना खड्डे पाडून वायरीची खाच बनवणार,तिसराच येऊन स्विचबोर्ड लावणार असा सगळा खो खो होता.या खो खो मध्ये मूळ कॉन्स्टंट आम्हीच असल्याने आम्हाला डोकं ठिकाणावर आणि थंड ठेवून सर्वाना एका पानावर ठेवणं गरजेचं होतं.सुतार टीम बदलत राहिल्याने त्यांनी टीव्ही चं पॅनल 3 वेळा काढून परत बसवलं. आमच्या दोघांपैकी जे कोणी ऑफीस ला जाईल त्याचा व्हॉटसअप वर पहिला प्रश्न 'आज टीव्ही पॅनल परत तोडलं का लॅमीनेट बसवलं' हा असायचा.प्रत्येक ऑफिस ला जाणाऱ्या निरागस जीवाला 'आपण घरी येऊ तेव्हा काहीतरी एक आयटम जोडला गेला असेल,छान वस्तू लावता येतील' असं वाटायचं.घरी येऊन बघावं तर एखाद्या बिझी सलून मध्ये 5 माणसांच्या अर्ध्या अर्ध्या दाढ्या करून फोन घ्यायला बाहेर जाणाऱ्या माणसा सारखं एक कपाटाचे फक्त 2 कप्पे, दुसऱ्याचं दार,तिसऱ्याचं मॅग्नेट राहिलेलं असं सगळंच फर्निचर अर्धंमुर्ध दिनवाणं उभं असायचं.(सुतार काही चूक करत नव्हते. जितकी फायनल प्रोडक्ट लॅमिनेट लावलेली जास्त, तितकें ओरखडे, गोंद न सांडणे,वेल्डिंग कटिंग च्या ठीणग्या जाऊ न देणे याबद्दल जास्त जपावं लागतं.)आता आता जरा सगळ्या पृष्ठभागावर लॅमिनेट लागायला लागले.

ओ च्या चांगल्या गोष्टी या की मटेरियल आणि कामाची प्रत चांगली आहे.शिवाय त्यांनी आमच्या डोक्यातल्या अनेक अबस्ट्रॅक्ट कल्पना नीट पूर्ण केल्या.यातली महत्वाची माझ्यासाठी म्हणजे परदेशात असते तशी शूज, कोट्स आणि हेल्मेट काढून ठेवण्याची लिव्हिंग रूम च्या एका कोपऱ्यात करण्याची चिमुकली(आत नुसती उघडी शेल्फ असलेली) लाकडी खोली.(याला आम्ही 'पसारा करण्याची खोली' म्हणतो.आम्ही आता लिव्हिंग रूम च्या सर्व पृष्ठभागावर टाकतो त्या गोष्टी एकाच खोलीत टाकायच्या.)दुसरी गोष्ट म्हणजे पार्सल्स आत टाकता येतील अशी चौकोनी झडप खिडकी असलेलं दार.हे रेडिमेड दारांमध्ये पण मिळतं.

अश्या प्रकारे गणपती नंतर नवरात्रात 'पूर्ण होणार' अशी वदंता असलेलं काम दिवाळीत पूर्ण होणार होतं.पण 'तुमच्याकडे साईटवर बनवायच्या गोष्टी खूप जास्त आहेत' म्हणून ते अजून बाकी आहे.बहुतेक दिवाळी नंतर 15 दिवसात होईल.आम्हीही मख्खपणे सामानाच्या ढिगात स्वयंपाकघर आणि एक खोली मोकळी स्वच्छ आणि टापटीप ठेवून तिथे मजेत राहतो आहोत.जेव्हा होईल तेव्हा होईल.

सध्या सोसायटी वाले सोसायटीत चकरा मारता मारता भेटले की 'क्या बात है,अभीभी पुरा नही हुवा, महल बना रहे हो क्या' विचारतात.आम्ही पण शांतपणे 'ह्या ह्या ह्या, होने के बाद आ जाओ देखणे' म्हणून महाल बनवत असल्याच्या ऐटीत म्हणून पुढे निघून जातो!! कितीही छोटे बदल असले तरी आमच्यासारख्या कष्टाच्या व्हाईट मनी ने आयुष्यात कधीतरी मोठं काम काढणाऱ्या लोकांसाठी आमचा महालच तो.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेट मी नो इफ यू नीड चीप अँड प्रोफेशनल अँड हार्डवर्किंग बिहारी लेबर्स ( ओह... येस! अनलाईक बिहारीज वी नो) काँटॅक्ट! असा मेसेज धाडून द्या.

त्यामुळे त्याला नुसते 'टायपिंग' 'टायपिंग' दाखवून काही मेसेज न पाठवता उचकवणे इतका सविनय सत्याग्रह आम्ही केला.
>>>>>> आवडले.
बाकी त्या बिहारी शेजार्याला हे विचारले पाहिजे होते कि बिहारी असो वा कोणी, कुठले कामगार त्यांच्या मनाविरुद्ध क्लायंटकडे थांबून काम करतात? एक वेळ काम सोडून देतील. हां, त्यांची मूळ कंपनी त्यांना राबवून घेत असेल तर त्यांच्याविरुद्ध भांड जा म्हणावं.

आज 'ओ' चा फोन आला होता की एक काम अपेक्षेपेक्षा बरंच जास्त जातंय, 15 दिवस पुढे वाढेल
>>>
ते 'ओ' येईपर्यंत काम करणार आहेतसं दिसतं. Biggrin

अर्रे देवा अनू संयमाची परीसीमा का काय ते चालू आहे. ये दिन भी जायेंगे असे म्हणुन पुढे चला.
त्या शेजार्‍याला उत्तर देण्यात वेळाचा अपव्यय आहे पण तरीही १ काय तो री. नवर्‍याला लिहू देत (बिहारी ना बहुधा स्पष्टवक्त्या स्त्रीया ही कॉन्सेप्ट सहन होत नाही/नसावी) म्हणजे सोसायटी वाल्यांसमोर तुमची निष्पाप बाजू समोर यावी.

त्याला 'आता हे रोज 10 पर्यंत काम करणार' वाटलं असावं.हा समजुतीचा भाग आहे.त्याचा मुद्दा आणि भीती काही प्रमाणात रास्त होती, अर्थात त्याने याचा सोसायटी ग्रुपवर आरडा ओरडा करायला योग्य आणि चलाख वापर केला.सोसायटी ला त्या ग्रुप वर भांडणं(पाळीव कुत्रे, पार्किंग,कचरा उचलणे, लाईट जाणे,इंटरनेट डाऊन वगैरे) वाचण्याची सवय आहे Happy कोण निष्पाप वगैरे ची काही पडलेली नसते कोणाला.

आता जे काम उरलंय ते फार जास्त तापदायक नाहीये.ते आरामात होईल.

एक छान मराठी ( हो..मराठीच कारण इकडेच छान खुसखुशीत डायलॉग मारता येतील) चित्रपट बनवण्याचे पोटेंशियल ह्या लेखन सीरीजमध्ये आहे

त्याला 'आता हे रोज 10 पर्यंत काम करणार' वाटलं असावं.हा समजुतीचा भाग आहे.>>आवाजा मुळे डिस्टर्ब पण होते ना. रात्री दहा प्रेन्त ठोक ठोक किर्र्र्र्र्र्र्र का ऐकायची. मी पन कंप्लेंट करेन सिकुरिटीकडे. आमच्या इथे दुपारी कामे बंद ठेवावी लागतात व सात नंतर अला उड नाही.

हो नक्कीच. आम्हीही ऐकणार नाही रोज 10 पर्यंत कोणी हे केलं तर.सोसायटीत असा नियम नाही.पण सगळे 10 नंतर अलिखितपणे पाळतात.मधल्या काळात ठीक 10 ला येत होते तेव्हा ते 6 ला जायचे.मग काम कमी, किंवा इन्व्हेंटरी चा ट्रक दुपारी येणार असे चालू झाल्यावर 11 ते 8 किंवा 2 ते 7.30 करायचे.

6 पर्यंत काम आवरून घरी जाणे मात्र शक्य नाही.

त्याने या सगळ्याचा परप्रांतीय आणि ngo असे मुळात चुकीचे मुद्दे वापरून सोसायटी ग्रुपवर स्कोअर सेटल करायला वापर केला ही मूळ दुखरी नस आहे.हे सर्व इंटिरिअर एजन्सी कडून ठरतं हे त्यालाही माहीत होतं.आम्ही ngo चालवत नाही हे त्यालाही माहीत होतं.

आता सुतार काम संपलं आहे(उरलेल्या कामात मशीन आणि कटर नाही) त्यामुळे हा सर्व तमाशा फक्त शनिवारी शेवटचा 1 दिवस झाला.

कोण निष्पाप वगैरे ची काही पडलेली नसते कोणाला>> हो पण गॉस्सीप मिळते लोकांना.
ते मुंबईकर्स नाही का म्हणत...बाहेरून येऊन भैया लोक्स आमचे जॉब्स घेतात, त्याचं उट्टं काढतोय तो माणूस

मी पन कंप्लेंट करेन सिकुरिटीकडे. >>>> अमा वर्सेस मी_अनू सामना रंगतदार Wink पॉपकॉर्न आणा!
ह.घेणे!

हायला हे वेगळंच काहीतरी
त्याला डिस्टरब होत असेल ठोकठोकी घर घुर आवाजाने हे समजू शकतो.
ते आपले मजूर नाहीत, त्यांनी एकतर कंत्राट घेतलेले असते आणि जितक्या लवकर पूर्ण करतील तितके त्यांना फायद्याचे हे सर्वांना माहितीय.
त्याला स्पष्टवक्त्या लेडिज चा रिप्लाय आवडत नसेल तर सगळे रिप्लाय तुम्हीच दिले पाहिजेत.
त्याची कक्षा रुंदावल्या तर बरंच आहे.

अर्र… आगाव कुठला.

त्याला नुसते 'टायपिंग' 'टायपिंग' दाखवून काही मेसेज न पाठवता उचकवणे >> Lol हे मस्त आहे.

(हे दुःख किंवा समस्या वगैरे नाही.एका कामात किती कामं निघावी याचा विनोदी गोषवारा आहे.)

1. आम्ही ओट्याचा 1 भाग 'डिशवॉशर शेल्फ' म्हणून उंच बनवला होता डिशवॉशर च्या आकाराचा आणि त्यावर एक सपाट कडाप्पा होता.
2. आम्ही डिशवॉशर घेतलाच नाही आणि त्या कपाटात टप्पे पाडून तो दळणाचे डबे ठेवायला वापरू लागलो. (हॅशटॅग स्टोरेजमॅनिकममव)
3. यांच्या वरच्या टॉप वर आम्ही मायक्रोव्हेव ठेवायचो.पण वॉटर फिल्टर त्याच्या जवळ असल्याने बाटली भरताना पाणी सांडलं तर ते मायक्रोवेव्ह च्या हिट सिंक च्या छिद्रात जाऊ शकलं असतं.
4. म्हणून मायक्रोव्हेव दुसरीकडे ठेवला आणि त्या टेबल टॉप वर आम्ही पसारा करायला लागलो.
5. 'ओ' ने हे डिशवॉशर कपाट वाला ओट्याचा भाग कापला.पण 'ओ' च्या तोंडाला एकंदर फेस आल्याने आणि रिसोर्स दुसऱ्या साईटवर वळवल्याने तो ओटा कापल्याचा जखमेचा व्रण जमिनीवर तसाच होता.
6. 'ओ' ने आधीची टीव्हीची जागा बदलली.आणि नव्या जागी परत टाटा स्काय वाला परत कनेक्शन करायला आल्यावर बिल्डर ने भिंतीतून काढलेली केबल टाटा स्काय ला चालणारी नाही असा शोध लागला.चौथ्या वेळा टीव्ही पॅनल तोडण्यापेक्षा आम्ही आयुष्यभर dth न बघणे पसंत करू असे ठरले Happy तितक्यात 'ओ' चा इलेक्टरीशीयन जवळच्या साईटवर असल्याने त्याला बोलावून टाटा स्काय वाला आणि तो यांच्या एकत्र डोक्याने ती वायर बसली.
7. 'ओ' ने वॉटर फिल्टर भिंतीवरून काढून कपाटावर लावला.ही दगदग वृद्ध वॉटर फिल्टर ला न झेपल्याने त्याच्या वायरीला भोक पाडून त्यातून ठिबक सिंचन पाणी गळायला लागले.
8. 'ओ' च्या सुतारांनी शेवटच्या दिवशीच्या घाईत(आठवा बिहारी शेजाऱ्याची चिडचिड आणि त्यांना तातडीने निपटावे लागलेले काम) 'डॉगी डोअर' (सिक्युरिटी दारात पार्सल टाकायला पाडलेले चौकोनी झडप दार) उलट बाजूने बसवले आणि त्याचे स्क्रू बाहेरून दिसतात.झडप दाराला स्प्रिंग बसवली नाही.त्यामुळे ते बाहेरून ठोसा मारून आत आणि मग आतून परत ठोसा मारून पहिल्या सारखे करावे लागते.शिवाय बसवलेल्या लॅमिनेट ला चिपिंग आहे.मग 'ओ' ला दाखवल्यावर 'बघतो' असे घसघशीत आश्वासन मिळाले.
9. लँड लाईन (हॅशटॅग माझाचआग्रह 'मोबाईल कंपन्या नश्वर आहेत, नैसर्गिक आपत्तीत लँडलाईन हवी तीपण सरकारी कंपनीची') ची केबल त्या आधीच्या उपसलेल्या लाकडी जागेवरून काढली ती बसवायला जो bsnl चा माणूस आला तो 'मला बिल्डर ने कसे जोडलेय ते कळत नाही' म्हणाला.पण त्याने ते समजावून घेऊन जोडलं.
10. वॉशिंग मशीन ची जागा बदलली, नव्या जागी बसवायला ड्रेनेज पासून पाईप केला त्यातून झुरळं यायला लागली.
11. 'ओ' च्या माणसाला बोलावून या सगळ्या बद्दल चिडचिड केल्यावर यातल्या 3 गोष्टी लगेच सुधारल्या गेल्या.
13. इतक्या सर्व बाहेरच्या माणसांना(प्युरीट, टाटा स्काय, bsnl) व्हिजिटिंग चार्ज ची खिरापत वाटावी लागली.
14. एकंदर पाहता 'ओ' नव्या घरांची कामे चांगली करतात.खूप जास्त डीमॉलिशन किंवा ऑन साईट जास्त असलेली कामं त्यांना झेपत नाहीत असे वाटले.डिझायनिंग आणि मटेरियल quality पार्ट मध्ये 'ओ' ने चांगली कामगिरी केली आहे.

मुद्दा क्रमांक 2 मध्ये हॅशटॅग थोडा बदलला पाहिजे
कुलकर्णी च्या जागी ममव चपखल बसेल Lol

ओ म्हणजे tv वर सतत जाहिरात असायची तीच कंपनी असावी असा अंदाज आहे

बिल्डर ने भिंतीतून काढलेली केबल टाटा स्काय ला चालणारी नाही असा शोध लागला>>> हे फार जुने प्रकरण झाले जेव्हा पॅरलल कनेक्शन्स एकाच अकाउंट मध्ये अधिक टिव्ही बघणे शक्य होते.
आता प्रत्येक टीव्हीला वेगळा सेट टॉप बॉक्स लागतो.
त्यामुळे भिंतीतून केबल असेल तर आम्ही कनेक्शन देणार नाही हा मुर्खपणा झाला.
आमच्या कडेपण टाटास्काय आहे आणि हॉल + ३ बेडरूम्स मध्ये भिंतीतून केबल टाकली आहे आणि त्यांचा जंक्शन बॉक्सही भिंतीत आहे.
टाटा स्काय वाला टेक्निशियन म्हणाला होता आधी, भिंतीतुन कनेक्शन देणार नाही. मग मी त्याचे आणि त्याच्या बॉसचे - जिला त्याने फोन लावून दिला तिचे - थोडे बौध्दिक घेतले, मग तयार झाले.

आता आम्ही सेट टॉप बॉक्स उचलून कुठल्याही रूम मध्ये लावू शकतो. अर्थात एका वेळी एकच टीव्हीला.

Epic आहे हे, actually त्यापेक्षाही जास्त scope आहे, scope is way beyond beyond feature, requuremt and tasks

>>जिरा काय, पूर्ण एक अजाईल स्टोरी Happy

खऱ्या अर्थाने अजाईल वे ने चाललेय म्हणायचे तुमचे काम Wink

जाडीने फरक पडायला नको. कोऍक्सिअल केबल आहे अद्याप टाटा स्कायची (की अगदी अलीकडे वेगळी आहे?)
त्यात आधी जास्त जाडीच्या असायच्या, आता कमी, पण एण्ड कनेक्टर साईझ तोच आहे. आमच्याकडे सुद्धा वरील डिस्क ते घरातला जंक्शन बॉक्स कमी जाडीची केबल आहे, जंक्शन बॉक्स पासून पुढे जास्त जाडीची.

फार तर, कनेक्टरची मागची बाजू (केबल कडील बाजू) वेगळी असू शकते कमी अधिक व्यासाची. पण त्यांच्याकडे दोन्ही साईझचे कनेक्टर्स असतात. किंवा अगदी सहज मिळतात दुकानात.

तिनही भाग फार भारी खुसखुशित झालेत...नविन अपडेट वाचतानाही मजा आली...आता हत्ती जावुन शेपुट राहिल असाव ते फक्त मारुतिच्या शेपटासारख लाबु नये म्हणजे झाल..
मडरुम्,पेट-डिलिव्हरी डोअर कल्पना मस्त आहेत..दिसतायत पण छान...सगळ मनासारख झाल की फोटो नक्की नक्की टाक!

(गंमत पुढे चालू)
1. 'ओ' ने एका कपाटाच्या आरसा लावला होता.या आरश्याला दार उघडायला ग्रीप नव्हती.
2. आरश्याच्या दाराला लावायला विशिष्ट वेगळी हँडल मिळतात, जी नुसती चिकटवून ऑपरेट होतात.हे 'ओ' च्या मॅनेजर ला माहीत होते आणि त्यावर चर्चा पण झाली होती.त्याने 'हे असं असं चिकटवण्याचं हँडल' म्हणून वर्णन केलं होतं.त्यावेळी सुतार नव्हता.
3. 'ओ' च्या सुताराला हे हँडल लावायचे असा निर्णय आहे हे माहीत नव्हते.त्याने आरश्याला ड्रिल मारून साध्या दाराचे हँडल लावले आणि आरसा एका बाजूने 2 इंच फुटला.
4. सुताराने एजन्सी ला फोन करून 'यांनीच हँडल लावायला सांगितलं म्हणून मी लावलं ' म्हणून आमच्याबद्दल माहिती दिली.
5. 'ओ' ने दाराला लावण्याची एक डेकोरेशन ची जाळी होती.त्याचे डायमेंशन चुकीचे बनवले आणि ती आयताकृती भगदाडाच्या एका बाजूला कमी पडते आहे.ती फॅक्टरीतून परत बनवून आणतील.
6. सर्व रिनोव्हेशन करणाऱ्याना एक सल्ला: एजन्सी ला आधी 1 खोली द्या.ती त्यांनी चांगली केली तरच त्यांना हळूहळू काम वाढवत पूर्ण घर द्या.
7. सुतार 'कोई दिक्कत नही, कर देंगे, ज्यादा से ज्यादा क्या, फूट जायेगा, बदल देंगे' म्हणाला.मी त्याला 'अरे बाबा रे, फूट जायेगा तो हमको दिक्कत है.पैसा हमारे जेब से जायेगा' म्हणाले.
7. या सगळ्याचा परिणाम असा झाला की कोणतंही लेखी संभाषण, तोंडी संभाषण कोणतीही संदिग्धता न ठेवता अतिशय जास्त संदर्भ देऊन करण्याची सवय लागली.म्हणजे आम जनता 'बेडरूमच्या कपाटात वरचा कप्पा' म्हणेल.मी लिहिताना 'सौदागर मध्ये 13 नंबरच्या घरात प्रवेशाकडून डावीकडे वळल्यावर बेडरूम लागेल त्यात तपकिरी कपाटात हँगर बार च्या पातळीत डोळे ठेवून डोकं ज्या उंचीवर येईल तो कप्पा' अश्या स्टाईल मध्ये करायला लागले Happy

देवा! हे अशा पद्धतीने लिहू शकताय म्हणजे तुम्ही स्थितप्रज्ञ झाला आहात.

या एजन्सीजकडे मुकादम नावाचा साइटवर राहून एजन्सीतला डिझायनर आणि कामगार यांच्यात को ऑर्डिनेट करणारा , सामान मागवणारा, ते बरोबर आहे की नाही हे पाहणारा प्राणी नसतो का?

Pages