२०१५ ला अमेरिकेत आल्यावरची पहिलीच दिवाळी. गणपती होताच इंडिया बझार मध्ये रांगोळीचे रंग, पणत्या, फुलांच्या माळा छान मांडून ठेवायला सुरुवात झाली होती. तर Costco मध्ये Christmas सजावटीचे सामान आलेले त्यातून लाईटची माळ उचलली. आकाशकंदील काही कुठे दिसला नाही. हल्लीच म्हणजे गेल्या दोन तीन वर्षांतच इकडे पटेल ब्रदरस् मध्ये आकाशकंदील पण बघायला मिळू लागलेत.
असो! मी गिफ्ट wrapping चे पातळ paper आणले. आणि करांजांचे जसे जमतील तसे आकाशकंदील बनवले.
लांबलचक बाल्कनीमध्ये लाईटच्या माळा लावल्या आकाशकंदील लावले. पण बल्ब लावायला काही सोय नव्हती त्यामुळे मग ते तसेच टांगले.
लाडू, चिवडा केला. बाकी फराळ भारतातून आईने पाठवलेला. जो आजपर्यंत प्रत्येक वर्षी ती पाठवते आहे.
पहिल्याच दिवशी जोराचा पाऊस-वारा आला आणि सगळे आकाशकंदील पावसात भिजून पार चिपाड झाले. सगळी मेहनत पाण्यात गेली. त्यानंतर परत कधी आकाशकंदील बनविले नाहीत .बाकी यथासांग घरच्या घरी दिवाळी साजरी केली .
दिवाळी निमित्ताने एका हौशी पालिकेच्या पुढाकाराने दरवर्षी शाळेतल्या शिक्षिकांसाठी छान लंच आखले जायचे. माझे ते पहिलेच वर्ष होते. मेनू ठरला. सगळ्या बायकांनी पदार्थ आपापसात वाटून घेतले. काही पालकांनी गिफ्ट साठी वर्गणी दिली. प्रत्येकीने ५० माणसांना पुरेल एवढा पदार्थ करून आणायचा. मुख्य मेनू मध्ये शेवयांचा उपमा, लेमन राईस, पुरी, श्रीखंड, रसमलाई, बटाट्याची डोसा भाजी, इडली, चटणी,सांबार, सलाड, आणि डोसे असा जंगी बेत ठरला. गिफ्ट बॅगमध्ये मिठाई म्हणून एकीने बेसनाच्या वड्या करायच कंत्राट घेतल - जवळ जवळ दोन अडीचशे वड्या. कोणीतरी फरसाणची जबाबदारी घेतली
ही जी पुढारी पालक होती तिने मुख्य दिवशी डोसा बनविण्याचे कंत्राट घेतले. स्टाफरूम मधील स्टोववर दोन-चार तवे टाकून लाइव्ह डोसा काउंटर करण्याचा तिचा मानस मला तर अगदीच महत्त्वाकांक्षी वाटला. पन्नास एक लोकांसाठी डोसे करायचे म्हणजे काय खायची गोष्ट आहे का?
नंतरच्या काळात इकडे भारतीय ( आणि बांगला देशी) महिलांना दोन-तीन दिवस राबून ४०-५० माणसांचा स्वयंपाक लिलया करताना पाहिलंय, अगदी ३-४ कोर्स जेवण, दोन अडीचशे दहीवडे, तीन एकशे पेढे, एका माणसाला उचलवणार नाही येव्हढी मोठी पातेली भरून उपमा वगैरे वगैरे. आणि हे सगळं मुलांच्या शाळा-क्लासेसना सोडण-आणण, घरातील इतर काम सांभाळून. ह्या महिलांच्या दहा टक्केही क्षमता गेल्या आठ वर्षांत सुद्धा कमवता आली नसल्याने त्यांना दंडवत ठोकून हा लेख पुढे नेते.
माझ्या वाट्याला तसा अगदीच (वरवर) सोपा वाटणारा पदार्थ आला, तो म्हणजे चाट सलाड.
सलाड असले म्हणून काय झालं, मुंबईत असताना सातआठ माणसांच्या वरती स्वयंपाक करायची अजिबात सवय तर नव्हतीच पण मोठ्या प्रमाणावर काही केलही नव्हतं कधी. कारण कधी पाहुणे आले तर स्वयंपाकाच्या मावशी, प्रशांत कॉर्नर, गोखले उपहारगृह असे बरेच पर्याय असायचे ताट सजवायला.
घरात एवढी मोठी भांडीही नव्हती, आणि ते बनवलेलं सलाड शाळेत घेऊन कसं जाणार हाही एक प्रश्नच होता. ते सगळे प्रश्न माझ्या शेजजारणीने चुटकीसरशी सोडवले. ती आणि मी मिळून सलाड करायचे आणि तिच्या गाडीने ट्रे घेऊन जायचे ठरविले.
मोड आलेले मूंग, काबुली चणे, बटाटे, कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, गाजर, बीट, आणि चाट मसाला.
दोन मोठे बेकिंग ट्रे आणले. त्यात सलाड भरून वर गाजर, बीट किस, कोथिंबीर पसरवून छान सजावटही केली.
गाडीने शाळेत गेलो. ते जड ट्रे घेऊन स्टाफ रूम मध्ये पोहचलो तर सुंदर सजावट केली होती- पताका, रांगोळ्या, गिफ्ट बॅग..
वरून डोसे, चटणी, सांबार ह्यांचा सुगंध आमचीच भूक चाळवून गेला.
छान सजविलेल्या टेबलांवर सगळे पदार्थ विराजमान झाले. प्रत्येक पदार्थाच्या समोर त्याचे नाव आणि त्यातल्या जिंन्नसांची यादी ठेवली गेली. बरोबर बारा वीसला एकेक शिक्षक/ शिक्षिका यायला सुरुवात झाली. तसा इकडे डोसा काउंटरही सुरू झाला. ज्या रीतीने ट्रे खालती होत होते, डोसे केले जात होते त्यावरून त्या सगळ्या गोऱ्या मंडळींना ते पदार्थ खूपच आवडलेले दिसले.
कोणाला सलाड आवडले, तर कोणाला श्रीखंड-रसमलाई. पण सगळ्यात जास्त भाव कुरकुरीत डोसे खाऊन गेले. एका प्रामाणिक शिक्षिकेने तिला भारतीय पदार्थ जरा तेलकट किंवा मसाल्याचे वाटतात पण सलाड आणि श्रीखंड मात्र खूप आवडल्याचे सांगितले. मी पण मनातल्या मनात सुखावत, मीच ते बनवल्याचे अजिबात कळू दिले नाही.
तर एकाने इतका कुरकुरीत गरमा गरम डोसा किंवा तसा कुठलाही पदार्थ आधी कधी काही खाल्ला नसल्याची कबुली दिली.
पण ती पालक त्याच वर्षी भारतात निघून गेल्याने मग नंतर शाळेत कधी दिवाळी पार्टी झाली नाही.
त्यानंतरच्या दरवर्षीची दिवाळी साधारण अशीच गेली. इकडच्या मित्र-मैत्रिणी, हाताच्या बोटावर मोजता येण्याइतके नातेवाईक, यांच्याबरोबर दिवाळी नंतरच्या वीकएंड ना साजरी करत. इकडे वणवे, लाकडाची घरे यांमुळे क्वचितच एखादी पेटी फुलबाज्या लावल्या तरच अन्यथा फटाके अगदीच तुरळक. पणत्याही अगदी मोजक्याच, शास्त्रा पुरत्या. मग हवे तर LED दिवे लावा हवे तेव्हढे. त्यातल्या त्यात त्याच जरा हौसेनी रंगवायच्या. हळू हळू इकडे रुळताना मग दिवाळीला इकडच्याच गोतावळ्यातील अभारतीय लोकांना दिवाळी निमित्ताने त्यांना मनापासून आवडलेली चितळ्यांची बाकरवडी किंवा रसमलाई खिलविणे हेही सालाबाद झाले. यंदा आमच्या शेजारणीने मी झाड लोट करत असताना हटकले, “लायटिंग लागल म्हणजे दिवाळी आली वाटतं? Happy Diwali“ मग मीही संभाषण पुढे नेत, “ तुला भारतीय मिठाई आवडते का? मी दिली तर आवडेल का तुम्हाला? “
“आम्ही कधी खालीच नाहीये. तू दिलीस तर आम्ही खाऊन बघतो. पण आम्ही चॉकलेट नाही खात. “
“chickpea (बेसन), clarified बटर (तूप) , wheat (rawa) अस असतं. चालेल का?”
“हो चालेल चालेल.”
त्यामुळे ह्या वर्षी शेजारीच ( उतार भारतीय कुटुंब) नाही तर पाजारीही (अमेरिकन कुटुंब)दिवाळी फराळ दिल्यावर अगदी जुन्या मनातल्या दिवाळीच्या एक पाऊल जवळ गेल्यासारखं वाटलं.
एक वर्षी दिवाळीत DMV (डिपार्टमेंट ऑफ मोटर वेहिकल) च्या ऑफिसमध्ये गेले होते तिकडे बऱ्याच अभारतीय स्त्री कर्मचारी लेहेंगा किंवा साड्या नेसून आल्या होत्याआणि मीच नेहेमीच्या जीन्स-हुडी मध्ये होते. त्या ताड-माड उंच, धिप्पाड गोऱ्या- काळया बायकांना त्या पोशाखात बघून एकदम गंमत वाटली.
बहुदा बे एरियात भारतीय लोकांच प्राबल्य असल्याने असेल परंतु इकडच्या बऱ्याच ऑफीसात, शाळेत म्हणजे कर्मचारी वर्गात दिवाळीच्या पार्ट्या होत असतात. ह्या वर्षी तर नासामध्ये ही पहिल्यांदाच छोटेखानी दिवाळी साजरी झाली हे एका नासा कर्मचारीच्या पोस्ट वरून कळले. Icecles ह्या आईसक्रीमच्या दुकानामध्ये दिवाळी स्पेशल “गुलाब जामून” फ्लेवरच ice-cream होतं.
Costco मध्ये त्यांच्या कीर्तीला शोभणारा भला मोठा साजूक तुपातल्या मोतीचुराच्या लाडवांचा बॉक्स मिळाला.
ह्या रेट ने बहुदा काही वर्षात Costco मध्ये दिवाळीत पणत्या, उटणे, आणि आकाशकंदील दिसले तरी आश्चर्य नको वाटायला.
ह्या वर्षीची दिवाळी तर झालिये, फराळही संपला असेलच! तो आमचा पण संपला. पण लगेच इकडे आमची आता Thanks Giviing सुट्टीची आणि ब्लॅक फ्रायडे सेलची तयारी सुरू झालीय.
--
---
--
--
--
--
--
--
---
---
--
छान लिहिलंय..
छान लिहिलंय.. फोटो पण मस्त
छान आठवणी
छान आठवणी
थोडा अजुन सम्पादित केला.
थोडा अजुन सम्पादित केला.
मनिम्याऊ आणि धनवन्ति धन्यवाद!
मस्तच.
मस्तच.
धन्य्वाद अन्जु!
धन्य्वाद अन्जु!
लेख आणि फोटो दोन्ही मस्त..!
लेख आणि फोटो दोन्ही मस्त..!
धन्यवाद रुपाली!
धन्यवाद रुपाली!
छान लिहिलंय..
छान लिहिलंय..
शर्मिला धन्यवाद!
शर्मिला धन्यवाद!
छान लिहिले आहे,फोटो पण छान
छान लिहिले आहे,फोटो पण छान आहे!
AhenS धन्यवाद!
AhenS धन्यवाद!