ग्लुकोज : आपली उर्जा, संपत्ती आणि बरंच काही

Submitted by कुमार१ on 19 February, 2018 - 00:30

आपल्या शरीराचा मूलभूत घटक म्हणजे पेशी. निरनिराळ्या अवयवांमध्ये अनेक प्रकारच्या पेशी असतात. सर्व पेशींना त्यांच्या अस्तित्वासाठी सतत उर्जानिर्मिती करावी लागते. त्यासाठी अर्थातच पुरेसे इंधन उपलब्ध झाले पाहिजे. ज्याप्रमाणे वाहनांसाठी काही प्रकारची इंधने असतात त्याचप्रमाणे पेशींमध्येही वेगवेगळी इंधने उपलब्ध आहेत. जो रासायनिक पदार्थ इंधन म्हणून वापरला जातो त्याचे ज्वलन (oxidation) होऊन त्यातून रासायनिक उर्जा (ATP) तयार होते. पेशींमधली विविध इंधने अशी आहेत:
ग्लुकोज
मेदाम्ले

ग्लिसेरॉल
किटोन बॉडीज
अमिनो आम्ले
यांपैकी कशाचा वापर उर्जानिर्मितीसाठी करायचा हे पेशीचा प्रकार आणि त्यातली परिस्थिती यानुसार ठरते.
बहुसंख्य पेशींच्या बाबतीत ग्लुकोज हे महत्वाचे इंधन आहे. काही पेशी त्याव्यतिरीक्त इतर इंधनेही वापरू शकतात. पण, रक्तातील लालपेशी मात्र फक्त ग्लुकोजच वापरतात. म्हणजे त्या ‘खाईन तर तुपाशी’ या प्रकारच्या पेशी आहेत. मेंदू सुद्धा शक्यतो ग्लुकोजचीच मागणी करतो पण आणीबाणीच्या परिस्थितीत तो इतर इंधन वापरू शकतो.

आहार आणि ग्लुकोजचा पुरवठा

आता एक नजर टाकूया आपल्या रोजच्या आहारावर. आहाराचा ६०-७०% भाग हा कर्बोदकांच्या रुपात असतो. पोळी, भाकरी आणि भात हे आपले पोट भरायचे मुख्य पदार्थ. त्या सगळ्यांत असतो ‘स्टार्च’. तर मांसाहारातून ‘ग्लायकोजेन’ हे कर्बोदक मिळते. मुळात स्टार्च आणि ग्लायकोजेन हे ग्लुकोजचे polymers आहेत. त्यांचे पचनसंस्थेत पूर्ण विघटन झाल्यावर आपल्याला भरपूर ग्लुकोज मिळते. तसेच आपण आहारात अनेक गोड पदार्थ, दूध व फळेही घेतो. त्यातून आपल्याला ग्लुकोजची भाईबंद असलेली अन्य काही कर्बोदके मिळतात. ती पचनसंस्थेतून शोषून जेव्हा पेशींत पोचतात तेव्हा त्यांचेही ग्लुकोजमध्ये रुपांतर होते. थोडक्यात कुठलेही कर्बोदक आहारात घेतले तरी पेशींमध्ये शेवटी त्याचे ग्लुकोज बनवले जाते. त्यामुळे ग्लुकोज हेच आपल्या शरीराचे मुख्य इंधन ठरते.
कर्बोदकांच्या पचनातून निर्माण झालेला ग्लुकोज नंतर रक्तात शोषला जातो. रक्तप्रवाहातून तो शरीराच्या सर्व अवयवांना पोचवला जातो. आता तो प्रत्यक्ष पेशीत शिरणे ही एक महत्वाची पायरी असते. यकृताच्या पेशींमध्ये तो अगदी सहज शिरतो पण स्नायू आणि मेदपेशींमध्ये मात्र तसे होत नाही. या दोन्हीकडे शिरण्यास त्याला इन्सुलिनची मदत लागतेच.

पेशींमध्ये ग्लुकोजचा वापर तीन प्रकारे होतो:
१. ५०% लगेचच ऊर्जानिर्मितीसाठी वापर. उरलेला ५०% हा पेशींना लगेच लागणार नसतो. म्हणून त्याचा ‘साठा’ खालील रूपांमध्ये होतो
२. १०% ग्लुकोजचे ‘ग्लायकोजेन’ मध्ये रुपांतर होते आणि
३. ४०% चे रुपांतर मेदात होते.

ग्लुकोजचा साठा करण्याचे मार्ग

आता ग्लुकोजचे जे दोन साठे होतात त्यांचा हेतू समजून घेऊ. इथे मला बँकेत पैसे ठेवण्याच्या ज्या नेहमीच्या पद्धती आहेत त्यांची उपमा द्यावी वाटते. समजा, मला रोज १०० रु. मिळतात. त्यातले ५० मला रोजच्या खर्चासाठी लागतात, म्हणून मी ते घरीच ठेवतो. उरलेल्या ५० मधले १० रु. मला त्या आठवड्यात कधीही लागू शकतात. पण, मला ते घरी ठेवायचे नाहीत कारण ते लगेच खर्च होण्याची भीती वाटते. मग मी ते माझ्या बचत खात्यात ठेवतो. शेवटी जे ४० उरले आहेत ते मला कधीतरी अडीअडचणीतच लागतात. म्हणून मी त्यांची मुदत ठेव बनवतो.

आता वळूया ग्लुकोजकडे. त्याचा १०% साठा हा ग्लायकोजेनच्या रुपात केला जातो. हे संयुग मुख्यतः यकृत व स्नायूंमध्ये साठवले जाते.यापैकी यकृतातील ग्लायकोजेनचे गरजेच्या वेळी अत्यंत वेगाने ग्लुकोजमध्ये रुपांतर होते. थोडक्यात हे झाले ग्लुकोजचे बचत खाते! आता त्याचा उपयोग बघा. रोज रात्रीचे जेवणानंतर ते दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या न्याहारीपर्यंत आपण ‘उपाशी’ असतो. तेव्हा मध्यरात्र ते सकाळ या काळात यकृतातील ग्लायकोजेनचे ग्लुकोजमध्ये रुपांतर होते आणि ते रक्तात सोडले जाते. मग सर्व पेशी ते वापरू लागतात. म्हणजेच, रोज दिवसभरात आपण आहारातला ग्लुकोज थेट वापरतो तर रात्रीत हा ‘बचत’ केलेला ग्लुकोज वापरात आणतो.

शेवटी जो ४०% ग्लुकोज उरलाय त्याचे मेदात रुपांतर केले जाते आणि ते मेद (fat) शरीराच्या मेदसाठ्यांमध्ये( adipose tissue) साठवले जाते. हे साठे खर्या अर्थाने ‘fixed deposits’ असतात! जेव्हा काही कारणाने दीर्घकाळ उपोषण घडते, त्या काळात त्यांचे विघटन करून त्यातून काही प्रमाणात ग्लुकोज मिळवला जातो. तसेच त्यातून मिळालेली मेदाम्लेही इंधन म्हणून वापरली जातात.
आपण साठवलेला मेद ही एका अर्थी आपली ‘संपत्ती’च असते. ज्याप्रमाणे व्यवहारातील कुठलीही संपत्ती निर्माण करण्यास मुळात आपल्याकडे भरपूर ‘चलन’ असावे लागते, तद्वत शरीरात जेव्हा ग्लुकोजचा पुरवठा भरपूर असतो तेव्हाच आपण मेदरुपी संपत्ती निर्माण करतो. ज्याप्रमाणे गरजेहून अधिक संपत्ती आयुष्यात कटकटी निर्माण करू शकते त्याप्रमाणे मेदाचे साठेही नको इतके झाल्यास काही व्याधी उत्पन्न होतात.

शरीरातील ग्लुकोजचे कार्य
१. सर्व पेशींमध्ये इंधन म्हणून ऊर्जानिर्मितीत वापर
२. ग्लुकोजपासून ribose तयार होते, जे DNA व RNA यांच्या उत्पादनासाठी लागते.
३. पुरुषाच्या जननेंद्रियात ग्लुकोजपासून fructose तयार होते, जे शुक्राणूंना उर्जा पुरवते.
४. स्तनांमध्ये स्तनपानाच्या काळात जे Lactose तयार होते त्यासाठी ग्लुकोज आवश्यक असते
५. ग्लुकोज हा अन्य मेद व प्रथिनांशी संयोग पावतो आणि त्यातून काही महत्वाची संयुगे तयार होतात, जी पेशींच्या बळकटीसाठी आवश्यक असतात.
या विवेचनातून लक्षात येईल की ग्लुकोज हा शरीरातील अनेक रासायनिक घटनांचा मूलाधार आहे.

ग्लुकोजचा चयापचय आणि हॉर्मोन्सचे कार्य

जेव्हा आपण नियमित पुरेसा आहार घेतो तेव्हा ग्लुकोजचा ग्लायकोजेन व मेदांच्या रुपात साठा केला जातो. या दोन्ही कामांत इन्सुलिनचा वाटा मोठा आहे. हे हॉर्मोन आपल्या स्वादुपिंडात तयार होते. जेवणानंतर जेव्हा आपली ग्लुकोजची रक्तपातळी वाढू लागते तेव्हा इन्सुलिनही अधिक प्रमाणात रक्तात सोडले जाते. ते पेशींमध्ये ग्लुकोजचा व्यवस्थित वापर आणि साठा करण्यात मोलाची मदत करते. त्याच्या या महत्वाच्या क्रियेमुळेच ग्लुकोजची वाढलेली रक्तपातळी अल्पावधीत पूर्ववत केली जाते. तेव्हा पुरेसा आहार आणि इन्सुलिनचे कार्य यांचा मिलाफ होऊनच ग्लुकोजपासून मेदनिर्मिती होते.

जेव्हा बऱ्याच तासांसाठी आपण आहार घेत नाही तेव्हा शरीरातील घडामोडी बघू. सुरवातीस रक्तातील ग्लुकोज पेशींकडून वापरले जाते. ते बऱ्यापैकी वापरल्यावर त्याची रक्तपातळी कमी होऊ लागते. आता हा ‘संदेश’ अन्य काही हॉर्मोन्सकडून टिपला जातो आणि ती अधिक प्रमाणात स्त्रवू लागतात. या हॉर्मोन्समध्ये प्रामुख्याने ‘ग्लुकॅगॉन’ व ‘एपिनेफ्रीन’ चा समावेश आहे. मुळात ही दोन्ही ‘इन्सुलिन-विरोधी’ गटातील आहेत. त्यामुळे त्यांच्या सर्व कृती या बरोबर इन्सुलिनच्या विरुद्ध असतात. आता ती कार्यरत झाल्यावर यकृतातील ग्लायकोजेनचे ग्लुकोजमध्ये रुपांतर होते आणि ते रक्तात सोडले जाते. जोपर्यंत पुढील अन्नग्रहण होत नाही तोपर्यंत हे ग्लायकोजेन ग्लुकोजची रक्तपातळी टिकवते. जास्तीतजास्त १६ तासांच्या उपासापर्यंत हा ग्लायकोजेनचा साठा टिकतो.

समजा, आता एखाद्याने त्याहीपुढे उपोषण करायचे ठरवले तर काय होते ते पाहू. आपण वर पाहिले आहे की लालपेशी आणि मेंदू यांना सतत ग्लुकोज लागतेच.त्यामुळे आता ती पातळी टिकवण्यासाठी एक नवीन प्रक्रिया यकृतात होते. तिला ‘नव-ग्लुकोज निर्मिती’ असे म्हणतात. ही एक अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे. त्यामध्ये शरीरातील प्रथिने आणि मेद यांच्या विघटनातून ग्लुकोज तयार होतो आणि मग रक्तात सोडला जातो. किंबहुना या अनोख्या क्रियेमुळेच माणूस( मर्यादित काळाचे) उपोषण करूनही जिवंत राहतो. या प्रक्रियेस गती देण्याचे काम
ग्लुकॅगॉन व एपिनेफ्रीन ही हॉर्मोन्स करतात.

रक्तातील ग्लुकोजची योग्य पातळी
आपले खाणे आणि ही पातळी यांचा थेट संबंध आहे. सकाळी उपाशी पोटी ही सर्वात कमी असते( ७० – १०० mg/dL ). जेवणानंतर ती वाढू लागते आणि एक तासाने ती सर्वोच्च असते. दरम्यान जे वाढीव इन्सुलिन स्त्रवलेले असते त्याच्या प्रभावाने ती पुढील तासाभरात बऱ्यापैकी खाली येते. निरोगी अवस्थेत जेवणानंतर दोन तासाने ती १४० mg /dL चे आत असते. ज्या लोकांचा जेवणानंतरचा ‘इन्सुलिन-प्रतिसाद’ अत्युत्तम असतो, त्यांचे बाबतीत तर ती उपाशी-पातळी इतकी खाली येते.
आपण आहारातील कर्बोदकांचे प्रमाण जेवढे वाढवू त्याच प्रमाणात स्वादुपिंड अधिक इन्सुलिन सोडते. ग्लुकोजची पातळी खाण्यानंतर बेफाम वाढू नये यासाठीच इन्सुलिनचा लगाम आपल्याला निसर्गाने दिला आहे. इन्सुलिन आणि इन्सुलिन-विरोधी हॉर्मोन्स यांच्यातील समन्वयाने संपूर्ण २४ तासांत ग्लुकोज-पातळी नियंत्रित राहते.

बिघडलेल्या ग्लुकोज-पातळीचे परिणाम

जेव्हा ग्लुकोज, इन्सुलिन आणि त्याविरोधी हॉर्मोन्स यांच्यातील समन्वय बिघडतो तेव्हा अर्थातच ग्लुकोजची रक्तपातळी जास्त वा कमी होते. या दोन स्थिती अशा:
१. ग्लुकोज अधिक्य(hyperglycemia) : याची महत्वाची कारणे अशी:
अ) इन्सुलिनची कमतरता
आ) इन्सुलिनचा पेशींवर प्रभाव न पडणे (resistance)
इ) इन्सुलिन-विरोधी हॉर्मोन्सचे अधिक्य
यापैकी (अ) आणि (आ) मिळून जो आजार होतो तोच ‘मधुमेह’. मधुमेह हे अवाढव्य प्रकरण असून तो एका स्वतंत्र लेखमालेचा विषय आहे. त्याबद्दल लिहिणे हा या लेखाचा उद्देश नाही.

मधुमेह या ‘कादंबरी’चा ग्लुकोज हा नायक तर इन्सुलिन ही नायिका आहे! निरोगी अवस्थेत या दोघांचा कसा सुंदर मिलाफ होतो ते आपण पाहिले आहे. किंबहुना ही पूर्वपीठीका समजून घेणे हे मधुमेहाबद्दल वाचण्यापूर्वी आवश्यक आहे. इन्सुलिनच्या कार्याअभावी गरजेपेक्षा जास्त ग्लुकोज रक्तात साठून राहतो कारण तो पेशींमध्ये शिरू शकत नाही. मग हा साठून राहिलेला ग्लुकोज ‘बिनकामाचा’ ठरतो आणि तो कटकटीही निर्माण करतो.

२. ग्लुकोज-कमतरता (hypoglycemia) : याची महत्वाची कारणे अशी:
अ) जे मधुमेही इन्सुलिनचे उपचार घेत असतात त्यांच्यात कधीकधी त्याचा ‘ओव्हरडोस’ होतो. त्यामुळे रक्तातील ग्लुकोज जास्त प्रमाणात पेशींत शिरते आणि त्याची रक्तपातळी नको इतकी कमी होते.
आ) अतिरिक्त मद्यपान : जर एका बैठकीत फाजील मद्यपान केले आणि त्यानंतर अन्न खायची शुद्धी राहिली नाही तर हा बाका प्रसंग ओढवतो. अल्कोहोलच्या प्रभावाने पेशींमधील नव-ग्लुकोजनिर्मितीस मोठा अडथळा होतो.

जेव्हा ग्लुकोजची रक्तपातळी कमी होत होत ४० mg/dL इतकी उतरते तेव्हा रुग्णात लक्षणे (चक्कर, आकलन न होणे) दिसू लागतात. याहीपुढे जर पातळी २० mg/dL चे खाली उतरली तर मात्र रुग्ण बेशुद्ध पडतो. ही स्थिती धोकादायक असते आणि तेव्हा रुग्णास तातडीने ग्लुकोज पुरवावे लागते.

.....तर असे हे ग्लुकोज – आपले महत्वाचे इंधन. आपल्याला क्षणोक्षणी लागणारे. तसेच आपल्या पेशींचा रासायनिक मूलाधार. मात्र त्याची रक्तपातळी योग्य प्रमाणातच हवी. ती फार जास्त झाल्यास कटकटीची तर फार कमी झाल्यास धोकादायक ठरणार. आपणा सर्वांची ती कायम आटोक्यात राहो या सदिच्छेसह लेख संपवतो.
**************************************************************************************************
टीप: आरोग्य लेखमालेतील या १०व्या लेखाबरोबरच ही माला आता थांबवत आहे. यादरम्यान वाचकांनी जे अजून काही विषय सुचवले आहेत त्यावर आता चिंतन व मनन करेन. कालांतराने त्यावर स्वतंत्र लेख लिहीता येतील. आपणा सर्वांचे सहकार्याबद्दल मनापासून आभार!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय ते एकदा ठरवा.

शरीरातील झालेला बिघाड म्हणजे मधुमेह असेल.
तर .
तो काही ही आहार घेतला तरी reverse होवू च शकत नाही.
शरीरातील बिघाड आहाराने कसा नष्ट होईल.

मधुमेह हा शारीरिक बिघाड नसेल तर .
जीवन शैली,आहार बदलून रिव्हर्स होवू शकतो.

एकदा काय ते ठरवा.
कॅन्सर हा पण शारीरिक बिघाड च आहे.
तो ठीक होवू शकत नाही.
फक्त आयुष्य वाढवता येते पण नॉर्मल जीवन त्या व्यक्ती ला कधीच जगता येत नाही
असंख्य औषध आणि पध्य पाळावी लागतात.
कॅन्सर झाला म्हणजे शारीरिक बिघाड झाला .
दुरुस्त करू शकत नाही.
तोच नियम मधुमेह साठी पण आहे.
तुम्ही काही ही आहार घ्या हवं ते शरीरात ठेवून नको ते बाहेर फेकून देणे हे काम निरोगी व्यक्ती मध्ये उत्तम रित्या होते.
सर्व मधुमेह नसणाऱ्या व्यक्ती न चा आहार योग्य च असतो असे काही नाही
मशीन आणि मनुष्याचे शरीर काही फरक नाही.
मोबाईल चा head Phone वर आवाज येत नसेल तर स्पीकर वर आवाज येवू शकतो.
ब्लू टूथ नी बाह्य उपकरणाशी कनेक्ट होवून आवाज येवू शकतो.
पण मोबाईल मधील मदर बोर्ड मध्ये च बिघाड असेल तर काहीच जुगाड चालत नाही .
नक्की बिघाड कोठे आहे हे शोधून तो पार्ट बदलावा लागतो.
पण ही कला अजून माणसाला साध्य नाही .
कारण मदर बोर्ड मध्ये दोष एका पार्ट पर्यंत मर्यादित नसतो.
तो दोष दूर करणे अशक्य असतें
तर मानवी शरीर जे मोबाईल पेक्षा पण कित्येक पट जास्त गुंतागुंत असणारे आहे.
त्याची माहिती माणसाला असणे शक्य च नाही.

सर्वांनीच वाचावा (विशेषता मधुमेह आणि मधुमेहपूर्व अवस्थेतील लोकांनी) असा हा लेख ( दीक्षित आहार पद्धती सर्वांसाठी आवश्यक नाही असे प्रतिपादन करणारा) :

डॉ. जगन्नाथ दीक्षित करत असलेले कार्य निश्चित कौतुकास्पद आहे, परंतु याचा अर्थ असा नव्हे की बाकी सर्व आहार, विहार आणि उपचार पद्धती फोल आहेत.
https://www.loksatta.com/sampadkiya/features/article-about-dr-jagannath-...

डॉक्टर दीक्षित हे एमबीबीएस, एमडी आहेत म्हणजे त्यांनी मॉडर्न मेडीसिनचा किमान अभ्यास तरी केला आहे.

लेखातील काही विधाने without reference वाटली.

<< याचा अर्थ असा नव्हे की बाकी सर्व आहार, विहार आणि उपचार पद्धती फोल आहेत. >> म्हणजे काय? उद्या लेखकाने सांगितले म्हणून होमिओपॅथीची औषधे घ्यायची का?

<< पोषणमूल्ये असणारा नाश्ता आवश्यक असतो. >> सकाळी सकाळी व्यायाम करणारे किती लोक असतील? नाश्ता खरोखर आवश्यक आहे का, याबद्दल मतभेद आहेत. मी तर असेही वाचले आहे की cereal कंपन्यांनी त्यांचा माल खपावा, म्हणून breakfast करा असा प्रचार सुरू केला. (खरेखोटे माहीत नाही.)

<< कोणता चांगला डॉक्टर आपल्या रुग्णांना नकारात्मक सूचना करेल? >>
चांगला डॉक्टर फायदे तोटे अश्या दोन्ही बाजू सांगतो. नकारात्मक माहिती दिली म्हणून तो वाईट होत नाही आणि केवळ सकारात्मक बोलतो म्हणून चांगला ठरत नाही.

<< गरजेनुसार आहार सुचवून सेलेब्रिटी व्यक्तींचे विशेषतः सिने कलाकार लोकांचे वजन आटोक्यात ठेवणाऱ्या एक आहार तज्ञ त्यांच्या अभ्यासानुसार सल्ला देतात, त्यात गैर काय? >> हे रुजुता दिवेकर संदर्भात आहे का? माझ्या माहितीनुसार त्या स्वघोषित आहारतज्ञ आहेत.

जाता जाता: इच्छुकांनी The Diabetes Code by Dr. Jason Fung हे पुस्तक वाचावे. मला स्वत:ला डायबेटिस नाही, पण हौस म्हणून मी अशी पुस्तके वाचत असतो.

तूर्त फक्त आहारपद्धतीबद्दल पाहू.
दिवसातून किती वेळा खावे ( दोन, तीन का चार) हा प्रचंड वादग्रस्त विषय आहे. यातील प्रत्येक प्रकाराचे समर्थन/विरोध करणारे असंख्य शोधनिबंध वाचायला मिळतील.
(उदा. https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/34420544/)

तसेच देश आणि वंश यानुसार देखील वैज्ञानिकांची मते वेगवेगळी आहेत.
आहारविषयक सल्ला देताना संबंधित व्यक्तीच्या ग्लुकोज पातळी, मेद पातळी, जीवनशैली, श्रमजीवी का बुद्धिजीवी, अन्य आजार ........ इत्यादी अनेक मुद्दे विचारात घ्यावे लागतात.

म्हणून दिवसातून फक्त दोनदाच खावे हे सरसकटीकरण मान्य होत नाही. यामध्ये व्यक्तिसापेक्षता (आणि तज्ञसापेक्षता) भरपूर आहे.

मला आजच्या छापील लोकसत्तेत हा लेख दिसला नाही. त्यांनी आताच डॉ दीक्षितांबद्दल का लिहिलंय? त्यांचा लेख लोकसत्तेत आला होता का?

उपाशी बोका, तुम्ही चक्क लेखातले स्पष्ट दिसणारे संदर्भ वगळून वाक्ये, वाक्यांश उचलून त्याला विदाउट रेफरन्स म्हणताय. तुमची तिसरे सर होऊ इच्छिता का?

डॉ कुमार, दीक्षित पद्धतीबद्दल मायबोलीवर रामायण महाभारत स्वरूप घमासान चर्चा झाल्या आहेत.

विदाउट रेफरन्स म्हणजे दुसरे काय करायला हवे? असे मला म्हणायचे होते.

मला एक वेळ गाढव म्हणा, पण सर म्हणू नका ओ. Wink

दीक्षित पद्धतीबद्दल मायबोलीवर रामायण महाभारत स्वरूप घमासान चर्चा झाल्या आहेत.
>>>अगदी बरोबर !

माझा काही वैद्यकीय परिषदांमधला अनुभव सांगतो. मधुमेहविषयक परिषदांमध्ये आमची संघटना बऱ्याच वेळा प्रशिक्षित आहारतज्ञांना (पीएचडी वगैरे) देखील बोलावते. त्यांच्यामध्येही आहारविषयक सल्ल्याबाबत एकवाक्यता नसते. प्रत्येकाचा अभ्यास, व्यावसायिक अनुभव आणि मुख्य म्हणजे कोणाला सल्ला देत आहोत ती व्यक्ती, यानुसार आहारसल्ला वेगवेगळाच राहतो.

सर्व संशोधकांबद्दल आदर आहे पण कुठलेच सरसकटीकरण नको असे वाटते.

डॉ दीक्षितांबद्दल का लिहिलंय? त्यांचा लेख लोकसत्तेत आला होता का?
>>>> होय.
14 नोव्हेंबरला जागतिक मधुमेह दिन होता. त्याच्या एक-दोन दिवस आधी इ -लोकसत्तामध्ये डॉक्टर दीक्षित यांचा लेख आलेला होता आणि तो मी वाचला होता.

लेखाचा उद्देश मधुमेहाबद्दल सर्वांगीण चर्चा करणे हा नसून दीक्षित पद्धतीतले दोष, तिच्या मर्यादा दाखवणे हा दिसतो. त्यासाठी लेखकाने सविस्तर कारणे दिली आहेत. तरीही आहार इतके वेळा का, कसा घ्यावा हे सविस्तर लिहिले आहे.
दीक्षित पद्धत - १ जनरली सगळ्यांसाठी एकच आहार पद्धत- यात वेळा पाळायच्या. काय खायचं हे त्यांनी तेव्हा तरी सांगितलं नव्हतं. रुग्णांना प्रत्यक्षात सांगत असल्यास कल्पना नाही. त्यांचा फोकस - एवढ्या टाइम झोनमध्ये खा. बाकी उपाशी रहा. चौरस आहार इ. ते बोलले नव्हते. म्हणजे आहार पद्धतीचाही उद्देश वजन आटोक्यात ठेवणे. हेही खरे नाही.
२ ) सलग ३५ की ४५ मिनिटे जलद चालणे हा एकच व्यायाम. - व्यायाम फक्त कॅलरी जाळणे, वजन कमी करणे यासाठी करत नाहीत.
३) मधुमेहावर उपचार करणार्‍या डॉक्टरांवर आरोप. यावर काही लिहायची गरज नाही. पण आजकाल इतकं स्पेशलायझेशन झालं आहे की आपल्या प्रकृतिनुरूप, रोग आटोक्यात ठेवण्यासाठी आहार काय हवा हे विचारायला आहारतज्ज्ञच लागतो. डॉ आजगावकर हे एक प्रसिद्ध मधुमेह तजज्ज्ञ होते. त्यांच्याकडे किचन स्केल असे. ते मधुमेह्यांना त्यांच्या घरची चपाती घेऊन यायला सांगत. त्या चपातीचे वजन करीत आणि त्यानुसार किती चपात्या खाव्यात हे सांगत, अस ऐकले आहे.

आणि मुळात इन्सुलिन तयार होण्याबद्दलचं आणि ते ५५ मिनिटं अ‍ॅक्टिव्ह असण्याबद्दलचं डॉ दीक्षितांचं गृहीतक अशास्त्रीय आहे. यावर मायबोलीवर भ र पू र चर्चा झाली आहे.

दिक्षितांचं म्हणणं: एकदा खायला सुरवात केली प्रत्येक वेळी इन्सुलिनचे एक ठरावीक माप पडते.
म्हणजे सकाळी मी नाश्ता करायला बसलो, दोन घास खाल्ले पडलं इन्सुलिनचं ठराविक माप जे पोटभर नाश्ता/जेवण, त्यात गोडधोड, यातून येणाऱ्या ग्लुकोजचा समाचार घेण्यास सक्षम आहे.
पण दोन घास खाल्ल्यावर मला ऑफिसातून अर्जंट कॉल आला, नाश्ता सोडुन तडक निघालो. आहाराद्वारे घेतलेली ग्लुकोज एवढीशी पण इन्सुलिनचे माप पडले पूर्ण.
रस्त्यात मी हायपोग्लायसेमिया होऊन बेशुद्ध पडेन का?

हा प्रश्न डॉक्टर न साठी आहे.
इन्सुलिन ह्या हार्मोन्स वर च रक्ता मधील साखर नियंत्रण करण्याची जबाबदारी आहे का?
बाकी पण संवगडी असतील ना त्याच्या जोडीला.
एकटा इन्सुलिन काय करणार.

ह्या विषयात काही नवीन संशोधन आहे का?

प्रत्येक वेळी इन्सुलिनचे एक ठरावीक माप पडते.
>>>
“माप पडले” हा शब्दप्रयोग अतिसुलभ वाटतो. जेवणानंतर जे इन्सुलिन स्रवू लागते त्याचा 40 मिनिटांचा oscillatory काळ असतो आणि त्यामध्येही प्रत्येकी चार मिनिटांचे pulses असतात. म्हणजेच हे स्त्रवणे चढ-उतार (पल्सेटाइल) प्रकारचे असते. हा मुद्दा नीट समजून घ्यायला आपल्याला बरेच खोलात जावे लागेल आणि अतिशास्त्रीय लिहिणे इथे टाळतोय.

थोडक्यात :
ग्लुकोजची वाढती पातळी आणि त्या अनुषंगाने इन्सुलिनचे चार मिनिटांचे pulses आणि त्याचबरोबर इन्शु-विरोधी Glugagon या हार्मोनच्या पातळीचा आलेख या सर्वांचा एकत्रित अभ्यास केल्यावर खरं चित्र स्पष्ट होतं.

हायपोग्लायसेमिया होणार नाही, कारण जर का इन्सुलिनचे कार्य फार जास्त होते असे वाटले तर ताबडतोब Glugagon त्याविरुद्ध कार्य करून ग्लुकोज पातळी नॉर्मलला आणते.

म्हणून इन्सुलिनचा एकतर्फी विचार करून चालणार नाही; शरीरात कायम इन्सुलिन- Glugagon जोडीचे एकत्रित कार्य होते (बॅलन्स).

( अर्थात हे सर्व विवेचन निरोगी व्यक्ती (= बिगर-मधुमेही ) गृहीत धरून केलेले आहे. एकदा का मधुमेह दीर्घकालीन झाला व त्याचे उपचार कितपत लागू पडले आहेत आणि आजार नियंत्रित आहे की नाही,.... असे मुद्दे पुढे आले की मग उत्तर देण्याची संदर्भ चौकट बदलते. )

धन्यवाद.
त्यांनी अनेक व्हिडीओज मध्ये तुम्ही एक पोळी खा की जास्त खा, प्रत्येक वेळी इन्सुलिनचे एक ठराविक माप पडते आणि मग पुढली पंचावन मिनिटे ते पुरते. पंचावन्न मिनिटात जेवण आटोपले नाही तर पंचावन्न मिनिटांनी दुसरे माप पडते असे सांगितले आहे.

तुमच्या वरच्या पोस्ट मधुन स्पष्ट झाले नक्की कसे कार्य करते.

मधुमेह झालेल्या व्यक्ती ना डॉक्टर्स एक च गोळी देत नाहीत .
किंवा फक्त इन्सुलिन च एक च इंजेक्शन ध्या असा उपचार करत नाहीत.

कमीत कमी चार तरी गोळ्या असतात.
ह्याचा अर्थ साफ आहे रक्तातील साखर कमी करण्यासाठी .
अनेक गोष्टीवर औषध द्यावी लागतात.
जांभळाच्या बियाणी sugar कमी होते असे ऐकून चार पाच बिया रोज उगळून पिणाऱ्या व्यक्ती च निधन रक्तातील साखर अचानक कमी झाल्या मुळे मृत्यू झाल्याचे उदाहरण ओळखी मधील आहे.
लोकांच्या डोक्यात काही गोष्टी फीट आहेत त्याच्या पेक्षा वेगळा ते विचार च करत नाहीत

( अर्थात हे सर्व विवेचन निरोगी व्यक्ती गृहीत धरून केलेले आहे. एकदा का मधुमेह दीर्घकालीन झाला व त्याचे उपचार कितपत लागू पडले आहेत आणि आजार नियंत्रित आहे की नाही,.... असे मुद्दे पुढे आले की मग उत्तर देण्याची संदर्भ चौकट बदलते. )

Doctor नी हे जे सुचवले आहे ते खूप खूप महत्वाचे आहे.

मधुमेह एकदा झाल्या नंतर आहार नियत्रंण करून रोग आटोक्यात ठेवणे हा उपाय असू शकतो.
पण कोणताही ,कसा ही आहार घ्या मधुमेह पासून मुक्ती नाही.
त्या साठी योग्य उपचार च घेणे गरजेचे आहे

जांभळाच्या बियाणी sugar कमी होते असे ऐकून चार पाच बिया रोज उगळून पिणाऱ्या व्यक्ती च निधन रक्तातील साखर अचानक कमी झाल्या मुळे मृत्यू झाल्याचे उदाहरण ओळखी मधील आहे.
>>>>

वैद्यकीय उपचारांमध्ये प्रमाणित मात्रेत औषध देणे याला फार महत्त्व आहे. अनेक प्रयोगांमधून तावून सुलाखून निघालेले नेमके औषध हे बरोबर काम करते आणि त्याच्या कमी अधिक कामाचा देखील अंदाज बांधता येतो .

crude उपचारांना नेहमीच मर्यादा असतात आणि त्यांचे धोकेही संभवतात .

विवेचन निरोगी व्यक्ती गृहीत धरून केलेले आहे.

पण डॉक्टर निरोगी व्यक्ती ?
कोणाला शास्त्रीय रित्या म्हणता येईल .
हा प्रश्न मानवी आरोग्यात सर्वात कठीण प्रश्न आहे.
आणि ह्याचे उत्तर सरळ दोन चार वाक्यात कोणाकडेच नसेल.हजार तरी पान भरतील इतके निकष त्या साठी लागतील.

मधुमेह म्हणजे थोडक्यात
१)अन्न खाणे - २)त्यांचे साखरेत किंवा योग्य परिपाकात रुपांतर होणे - ३)रक्तातून ते सर्व अवयवांकडे जाणे - ४)त्या अवयवांनी तो परिपाक मिळवणे - ५)रक्तातील उरलेल्या परिपाकाची विल्हेवाट लावणे या क्रियासाखळीत बिघाड होणे.

तो बिघाड क्रमांक (४) किंवा/आणि (५) मध्ये होतो.

हे "कायमचे" सुधारणे अजून तरी शक्य झालेले नाही. जे काही उपाय आहेत ते तात्पुरते आहेत.

मेडिकल शोध निबंध वाचून रोग बरा होत नाही.

'रिव्हर्स डाइबेटिस' च्या जाहिराती मात्र येतात. अशी औषधे करून विकणाऱ्या लोकांच्या घरातही मधुमेही असतात!!

'रिव्हर्स डाइबेटिस'
>>>
या विषयावरील सुमारे 100 संशोधनांचा वास्तववादी परामर्श इथे घेतलेला आहे : https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC6520897/

Reversal या शब्दाऐवजी remission हा शब्द वापरल्यास अधिक चांगले. अथक प्रयत्नांती काही रुग्णांच्या बाबतीत remission दीर्घकाळ राहू शकते.

दुर्मिळ .घटना.
पारा हा धातू पण द्रव स्वरूपात असतो
जेली फिश अमर असतात.
इतके रिव्हर्स diabetics दुर्मिळ आहे.
क्वचित एकादी घटना अपवाद म्हणून घडते.
निसर्गाचा चमत्कार असतो तो

क्रमांक (४) चा जो अडथळा आहे तो काढता आला पाहिजे. तेच कशामुळे होते हे समजलेले नाही असे वाटते.
४,५ या क्रिया पूर्वपदाला आणणे म्हणजे स्वयंचलित होणे म्हणजेच मधुमेह बरा होणे.

क्रमांक (४) चा जो अडथळा आहे....
>>>

हा जो मुद्दा आहे त्याला इन्सुलिन resistance असे म्हटले जाते. म्हणजेच, रक्तातील ग्लुकोज पुरेशा प्रमाणात स्नायूपेशींच्या आत जात नाही. मधुमेहाच्या उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक औषधांमुळे हा resistance कमी होऊन स्नायूपेशीची इन्सुलिनला सेन्सिटिव्हिटी वाढते.

अर्थात आजाराची कारणमीमांसा खूप गुंतागुंतीची आणि अनेक घटकांवर अवलंबून असलेली आहे. त्यामुळेच आजार ‘बरा होणे’ हा शब्दप्रयोग एक स्वप्नच राहते. तो बऱ्यापैकी नियंत्रणात ठेवणे हे मात्र अगदीच शक्य असते.

मी दोनतीन केसेस अशा बघितल्या आहेत.
१) मधुमेह चे निदान
२) औषध चालू.
पहिल्या गोळ्या च असतात .त्या नंतर गोळ्या नी मधुमेह कंट्रोल मध्ये नाही ,मग जास्त पॉवर च गोळ्या त्या पण निरूपयोगी ठरल्या की इन्सुलिन इंजेक्शन .

आणि तरी सुधा मधुमेह वर कंट्रोल राहत नाही
आणि त्या व्यक्ती च मधुमेह नी मृत्यू
आणि हा मृत्यू खूप वाईट असतो.
जखम बरी होत नाही,जखम दुखत नाही,डोळे काम करणे बंद करतात, स्मृती जाते.
आणि बरेच काही

औषध घेवून पण काही व्यक्ती न चा मधुमेह कंट्रोल मध्ये राहत नाही त्याला काय कारणे असावीत

पध्ये नक्की काय पाळावीत ह्याचा उडालेला गोंधळ हे एक कारण नक्की आहे.

औषध घेवून पण काही व्यक्तीचा मधुमेह कंट्रोल मध्ये राहत नाही
>>>
सर्वसाधारण निरीक्षणे अशी आहेत :
१. समजा, फक्त मधुमेह झालाय, त्याचे निदान लवकर झाले व उपचार वेळेत सुरू केले आणि चांगले लागू पडले. त्याच्या जोडीला आहार, व्यायाम यांचे पथ्यपाणी सांभाळले आणि कुठलेही घातक व्यसन नसेल तर आजाराचे नियंत्रण चांगले राहते आणि आयुष्यही चांगल्यापैकी मिळते.

२. पण, मधुमेहाच्या जोडीला उच्चरक्तदाब आणि/ किंवा मेदांची उच्च रक्तपातळी असेल अधिक धूम्रपानाचे व्यसन, तर मग परिस्थिती बिघडते. व नियंत्रण अवघड होऊन बसते.

३. मधुमेह नियंत्रित नसलेल्या रुग्णांमध्ये कालांतराने हृदय व रक्तवाहिन्या, मूत्रपिंड, चेतासंस्था आणि दृष्टीपटल यांच्यावर विपरीत परिणाम लवकर होतात.

मी इतक्यातच चाळिशीतल्या दोघा मधुमेह्यांबद्दल ऐकलंय . दोघांनीही आपल्या नियमित तपासण्यांकडे दुर्लक्ष केले. त्यातल्या एकाचा पाय कापावा लागला. दुसर्‍याचा पाय कापला नसला तरी पायाचं जखमेसाठी ऑपरेशन झालं.

यू ट्यूब वरील व्हिडिओज,आणि नेट वरील लेख लोकांचा गोंधळ उडवतात.
डॉक्टर नी दिलेला सल्ला प्रमाण मानून लोक वागत नाहीत.

दोन चार दिवसांपूर्वी च एक बातमी वाचनात आली.
एका व्यक्ती च्या पोटात दुखत होते त्यांनी गूगल सर्च वरून माहिती घेतली आणि आपल्याला कॅन्सर झाला आहे अशी समजूत करून घेतली .
आणि कॅन्सर च्या भीती नी आत्महत्येचा प्रयत्न केला.
तसे यू tuber.
कोण सांगते जांभळं खा.
कोण सांगते खावू नका.
कोण सांगते ज्वारी चांगली तर कोण सांगते ज्वारी बिलकुल नको.
कोण सांगते आधुनिक औषध काही कामाची नाहीत आयुर्वेद नी मधुमेह मुळातून नष्ट होईल.
कोण काय तर कोण काय सांगत असते.
आणि लोक चुकीचा आहार घेतात.
मी बघितले आहे .
औषध पण चालू आहेत.
आणि जांभळं, कारले,कडू लिंबाचा रस पण चालू आहे.
लवकर बर होण्यासाठी जास्त डोस.
शुगर फ्री म्हणजे गोड खाण्याचा फ्री पास च.
साखर बंद शुगर फ्री चालू.
प्रमाण किती असावे काही माहीत नाही.
असे बरेच आहेत.
अशा लोकांसमोर काय करणार डॉक्टर आणि त्यांनी दिलेली औषध.
मधुमेह रिव्हर्स होतो हे कसे पद्धतशीर पने पसरवले जात आहे..
हे ताजं उदाहरण आहेच

Pages