बाकी काही नाही

Submitted by किरण कुमार on 1 November, 2023 - 08:19

गडबड केली या ग्रहणाने बाकी काही नाही
सूर्य लपवला बघ चंद्राने बाकी काही नाही

रंग बदलला सर्पाचा पण दात विषारी आहे
कात टाकली असेल त्याने बाकी काही नाही

सगे सोयरे लोक आपले समजू नकोस भोळे
गळा कापतिल ते केसाने बाकी काही नाही

झळा उन्हाच्या खूप सोसल्या शेतकऱ्याने बहुधा
गहिवरला तो वर्षावाने बाकी काही नाही

पावसातली भेट तुझी अन आयुष्याची होळी
विसरत नाही दुर्दैवाने बाकी काही नाही

कायम होते त्याची बदली तरी सुधारत नाही
वागत जातो तो नियमाने बाकी काही नाही

दुःख तुझे जर पडले उघडे आठवते बघ आई
झाकून घेते ती पदराने बाकी काही नाही

मंदिरात तो जाउ लागला नास्तिक असतानाही
दिला इशारा जरा यमाने बाकी काही नाही

आयुष्याला आज गुलाबी रंग कशाने आला
नाळ जोडली साहित्याने बाकी काही नाही

- किरण कुमार

Group content visibility: 
Use group defaults

छान

छान.. आवडली..
गझलेतील नेहेमीच्या घटनांपेक्षा काही घटना वेगळ्या आहेत.

वाह क्या बात है..! सगळेच शेर नंबरवन.
पैकीच्या पैकी गुण दिले आहेत.

पावसातली भेट तुझी अन आयुष्याची होळी
विसरत नाही दुर्दैवाने बाकी काही नाही
आणि
मंदिरात तो जाउ लागला नास्तिक असतानाही
दिला इशारा जरा यमाने बाकी काही नाही

अहाहा. लैच भारी. चलो गले मिलो.

-दिलीप बिरुटे